जग कुठे आणि भारत कुठे…

असं म्हटलं जातं, जगभरामध्ये सर्वांत शक्तिशाली देशांपैकी भारत हा तिसरा सगळ्यांत मोठा देश आहे. पण खरं वास्तव काय आहे आपल्या देशाचं? या देशातल्या शेवटच्या घटकांत राहणाऱ्या माणसांमधले भय अजूनही संपलेले नाही. इतिहासातल्या घटनांना वर आणून त्याला पुष्टी व पाठबळ देण्याचं काम आपल्या देशातली व्यवस्था सध्या करत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं भय म्हणजे अंतर्गत सामाजिक सुरक्षेचं. या देशातले अल्पसंख्याक, इथले भटकन्ती करणारे आदिवासी माणसं सध्या सुरक्षित नाहीत. या बांधवांवर कुठेही झुंडीने हल्ले होतात. अश्या घटनांमुळे भारत सध्या जगामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटनांनी इथल्या अल्पसंख्याक जनतेच्या माणसांमध्ये धडकी भरली आहे. तर दुसरीकडे भारतातला मुस्लिम तरुण अस्वस्थ झाला आहे. हे भारतातल्या व्यवस्थेला वेगळं सांगायची गरज नाही. काश्मीर प्रश्न हे आपल्यासमोरचं ताजं उदाहरण आहे. 

सार्‍या जागाला अहिंसेचा, शांतीचा संदेश देणारा महात्मा गांधींचा हा भारत देश आज कमालीचा असहिष्णू माणसांचा झालाय का? असा प्रश्न तांड्यावर राहणाऱ्या मुलाला पडलाय. दर सात-आठ दिवसांतून बातम्यांमधून भारतातल्या कोणत्यातरी शहरात खाण्यावरून, कपड्यांवरून हल्ला झाल्याचा घटना वाचण्यात येतात. आणि दुर्देवानं अशा क्रूर घटना करणाऱ्या माणसांना पोसण्याचं काम सत्ताधारी वा विरोधातल्या राजकारणी वर्गातल्या काही माणसांकडून केलं जातं. उदाहरणं बरीच देता येतील.

जगामध्ये काही कट्टर धर्मवादी देशांना वेगळं सोडता मोठ्या मोठ्या देशांनी मानवतेचं तत्त्व स्वीकारलं आहे. परंतु भारतामध्ये आजही एखादा जन्मदाता बाप परिस्थितीला हार मानून आपल्या मुलीला, मुलाला वीस-पंचवीस हजारात गुजरात वा हैद्राबाद येथे विकून देतो. भारतातल्या पोलिसव्यवस्थेचंच उदाहरण पहा. जगातल्या पोलिसयंत्रणेच्या तुलनेत भारतातली पोलिसयंत्रणा ही खूपच लुच्चाट व्यवस्था आहे. माझ्यासारखा सामान्य तरुण जेव्हा कोणत्याही आदिवासी बांधवाला सोडवायला जातो तर पोलिसव्यवस्था, त्यातले अधिकारी दम देतात. “ए भडव्या, तुझं काय काम?” म्हणून शिव्या देतात. 

भारतामध्ये फुटपाथवर गाडी घेऊन भाजीपाला विकणार्‍या गरीब माणसांना इथले पोलीस खात्यामधले अधिकारी बेदम मारहाण करतात, त्याचे व्हिडीयो काढून ते व्हायरल करतात. त्या छोटा व्यवसाय करणार्‍या माणसांचं गाडीसहित सगळं साहित्य तोडून टाकतात. आणि आपण हतबल होऊन घटनांचे व्हिडीयो पाहून समाजात जगत राहतो. आपल्या देशाचे पोलीस म्हणजे विचार आणि शरीरातल्या संवेदना मेलेली माणसं. पोलिसांमधल्या संवेदना खरंच बोथट झाल्या आहेत असं काही घटनांमधून लक्षात येतं. 

जगभरात भारत एकमेव असा देश असेल जिथली सगळ्यांत मोठी न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणात चालते. ती यंत्रणा सध्या इतिहास बदलायला निघाली आहे. सध्याच्या घडीला भारतीय न्यायव्यवस्थेत निपक्षीय निकाल, निर्णय दिले जात नाही. भारतात मागच्या काही वर्षांत खरं बोलणार्‍याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सगळ्यांत मोठं दुर्देव म्हणजे भारतातल्या लेखकांना संपवलं जात आहे. व्यक्त होणाऱ्यांची अशी ही गळचेपी इतिहासात कधीही झाली नसेल. खाण्यावरून, पेहरावावरून, एखाद्या शहराच्या नावावरून या देशातल्या गरीब माणसांना संपवलं जातंय. कारण काय तर ते इतिहास बदलायला विरोध करतात. एकूणच भारतातला हा सध्याचा काळ काळजी करण्यासारखा आहे. आम्ही तांड्यावर राहणारे तरुण निर्भीड आणि ठाम आहोत. आम्हाला सत्य जिथे जिथे दिसेल त्याच्यासाठी आणि तिथे तिथे आम्ही आवाज बनत राहू!!

अभिप्राय 3

  • लेख अगदीच लहान झाला आहे. पण नेमक्या प्रश्नांवर बोट ठेवतो. साहेबराव राठोड हे कृतिशील कार्यकर्ते आहेत. म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन मिळते.

  • यातील पोलिस खात्याविषयी चा मजकूर हा वैयक्तिक अनुभवातून नमूद केल्याचं दिसतंय…. सर्वांना एका तराजू मध्ये तोलणे योग्य नाहीच शिवाय आपला हा लेख एकांगी वाटतो…पोलिसांविषयी आपल्या मनात तिरस्काराची भावना असल्याचेच दिसून येते…. लेखाचे नाव आहे… जग कुठे आणि भारत कुठे…. मात्र आपले सदरचे लेखात विषयांतर झाल्याचं दिसतंय….. संकुचित विचाराने लिहिलेला व्यापक विषयाचा लघुलेख असंच म्हणावं लागेल…. बाकी लेखकांची यातील पोलिस खात्याविषयी चा मजकूर हा वैयक्तिक अनुभवातून नमूद केल्याचं दिसतंय…. सर्वांना एका तराजू मध्ये तोलणे योग्य नाहीच शिवाय आपला हा लेख एकांगी वाटतो….व्यापक विषयावरचा संकुचित विचाराने लिहिलेला लघुलेख….. बाकी मांडणी चांगली आहे…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.