इतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २

“The educator has to be educated,in modern jargon,the brain of the brain-washer has itself been washed.”  — Karl Marx

इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान हे जेव्हा इतिहासाला स्व-रूपाची जाणीव झाली व ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली; तेव्हाच निर्माण होणे शक्य होते. अशी जाणीव पाश्चात्य परंपरेत आपल्याला अठराव्या शतकापासून निर्माण होत आलेली दिसून येते. ही इतिहासविषयक ‘जाणीवेची जाणीव’ असल्याने तिचे स्वरूप ‘चिकित्सक’ होते. इतिहासाविषयीची ही तत्त्वज्ञानात्मक चिकित्सा दोन दिशांनी झालेली आढळून येते. ह्या दोन दिशांतील मूलभूत भेद त्यांच्या मानवी प्रकृतीविषयक तत्त्वज्ञानात, तसेच इतिहास संशोधनाच्या रीतींमधील भेदांमध्ये आहे. तेव्हा, इतिहासाच्या चिकित्सक तत्त्वज्ञानाची भूमिका समजून घेण्यासाठी, त्यातील दोन मार्गांचा नीटपणे अभ्यास होणे आवश्यक ठरते. त्यापैकी पहिला मार्ग विज्ञानाची रीती अनुसरणारा आहे; तर दुसरा मार्ग इतिहासाला स्वायत्त मानणारा आहे. इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान समजून घेणे म्हणजे या दोन मार्गांनी इतिहासविषयक जे मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यांची उत्तरे म्हणून जे जे युक्तिवाद सादर केले आहेत, त्यांचे आकलन करून घेणे होय. आता, आपण चिकित्सक तत्त्वज्ञानात जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत, त्यांतील मूलभूत प्रश्नांकडे क्रमाक्रमाने वळूया.

ज्ञान
ज्याच्या सत्यतेविषयी कुणाही समंजस इतिहासकारांत संशय राहणार नाही असा निश्चितपणे सत्य असलेला वस्तुनिष्ठ इतिहास लिहिता येणे शक्य आहे काय? आणि अशा निश्चितपणे सत्य असलेल्या इतिहासाचे ज्ञान इतिहासकाराला प्राप्त होणे शक्य आहे काय? असल्यास कसे?

सर्वप्रथम, उपर्निर्दिष्ट प्रश्नांचे स्वरूप स्पष्ट करणे इष्ट ठरेल.

‘ज्ञान’ हा काहीसा प्रौढ शब्द आहे आणि व्यवहारात त्याचे उपयोजन हे भिन्न-भिन्न अर्थांनी केले जाते. उदाहरणार्थ, ‘दगड पाण्यात बुडतो हे ज्ञान मानवाला आहे.’ असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ‘दगड पाण्यात बुडतो’ हे विधान सत्य आहे आणि ते सत्य आहे, हे मानवाला अवगत आहे किंवा मग ‘दगड पाण्यात बुडतो’ या विधानाचा मानवाने सत्य म्हणून स्वीकार केला आहे, असे आपण म्हणत असतो. ह्या अर्थाने, ज्ञान हे सत्य असलेल्या आणि सत्य म्हणून स्वीकारलेल्या विधानाचे बनलेले असते. अशा ज्ञानाला ‘विधानात्मक ज्ञान’ म्हणूया.

पण, एखाद्याला पाककलेचे उत्तम ज्ञान आहे, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चविष्ठ, रूचकर, खमंग आणि स्वादिष्ट पक्वान्ने तो बनवू शकतो असा त्याचा अर्थ होतो. ह्या अर्थाने ज्ञान म्हणजे कमावलेले कौशल्य, कुवत, कसब असते. ह्या ज्ञानाला ‘क्रियात्मक ज्ञान’ म्हणूया.

इतिहास हा विधानांच्या सहाय्याने लिहिला जातो. तेव्हा, आपल्याला येथे विधानात्मक ज्ञानाचा इतिहासलेखनासंदर्भात विचार करायचा आहे.

तर, एखाद्या गोष्टीचे ज्ञान आपल्याला किंवा इतर कुणाला आहे, असे कधी म्हणता येते? (ज्ञान ह्या शब्दाऐवजी व्यवहारात ‘माहीत असणे’ हा अधिक साधा शब्दप्रयोग आपण करतो.) तेव्हा, एखादी गोष्ट आपल्याला किंवा इतर कुणाला माहीत आहे असे कधी म्हणता येते?

एखादी गोष्ट मला माहीत आहे, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा;

(अ) ती गोष्ट मांडणारे विधान वस्तुत: सत्य आहे
(ब) त्या विधानाच्या सत्यतेविषयी संशय घ्यायला काहीही कारण नाही,
(क) त्या विधानाचा मी सत्य म्हणून स्वीकार केला आहे,
(ड) त्या विधानाची सत्यता सिद्ध करणारा अनुकूल असा अनिवार्य व पर्याप्त पुरावा उपलब्ध आहे, आणि
(इ) त्या विधानाच्या सत्यतेची ग्वाही देण्याचा अधिकार मला आहे, असा दावा मी करतो, 
हे अभिप्रेत असते. आणि या अटींची पूर्तता झालेली असते. 

ऐतिहासिक पुराव्यासंदर्भातही हेच म्हणता येईल. विधान हे पुराव्याच्या आधारे सत्य ठरते. वेगवेगळ्या प्रकारची विधाने वेगवेगळ्या प्रकारच्या पुराव्याच्या आधाराने सत्य ठरत असणार. तेव्हा एखादे विधान ज्या पुराव्याच्या आधाराने सत्य ठरते त्या पुराव्याचा परामर्श घेऊन ते सत्य आहे, हे मी पारखले असेल तर त्याच्या सत्यतेची ग्वाही देण्याचा अधिकार मला असतो. तसेच, ते विधान सत्य आहे, हे मला माहीत आहे, असा दावा मी करू शकतो.

परंतु, ज्या पुराव्यांच्या आधारावर आपण विधानांची सत्यता आधारत असतो, त्या पुराव्यांच्या स्वरूपाचा परामर्श आपण आता घेतला पाहिजे. यासंदर्भात, पुराव्यांच्या स्वरूपाविषयी आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या ज्ञानाविषयी प्रा.मे.पुं. रेगे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानांच्या घडणीविषयक बर्ट्रांड रसेल यांच्या भूमिकेवर भाष्य करतांना प्रा. रेगे लिहितात, “कोणत्याही विधानाची सत्यता प्रस्थापित होते ती त्याला पुष्टी देणाऱ्या पुराव्याच्या आधारावर. हा पुरावा जर पुरेसा असेल तर त्या विधानाची सत्यता निश्चितपणे प्रस्थापित होते. पण पुरेसा पुरावा म्हणजे कोणत्या स्वरूपाचा पुरावा? एकतर त्या पुराव्यात अंतर्गत दोष असता कामा नये. पुरावा अर्थातच विधानांच्या स्वरूपात मांडण्यात येतो आणि पुरावा ज्या विधानांचा बनलेला असतो त्यांतील काही जर असत्य किंवा जर संशयास्पद असतील तर हा पुरावाच अंतर्गतदृष्ट्या सदोष ठरेल आणि त्याच्यावर आधारलेले विधानही संशयास्पद राहील. पण समजा पुराव्यात असा कोणताही अंतर्गत दोष नाही. मग पुरावा पुरेसा आहे ह्या म्हणण्याचा अर्थ असा राहील की सबंध पुरावा जर सत्य असेल तर त्याच्यावर आधारलेले विधानही सत्य असलेच पाहिजे. ते असत्य असणे अशक्य असले पाहिजे. एखाद्या विधानाच्या सत्यतेविषयी संशय घेणे म्हणजे ते विधान सत्य ठरवायला आवश्यक असलेला निर्णायक पुरावा उपलब्ध नाही, असे म्हणणे; आणि म्हणून ते विधान सत्य किंवा असत्य यांपैकी काही असू शकेल, त्या दोन्ही शक्यता उघड्या राहतात हे मान्य करणे. पण सर्व पुराव्याला सत्य म्हणून मान्यता दिल्यानंतरही ते विधान असत्य असण्याची शक्यता उघडी राहते असे म्हणणे कधी संयुक्तिक किंवा ‘समंजस’ ठरते? पुरावा पुरेसा किंवा पर्याप्त आहे हे ठरवायचे निकष कोणते?” (रेगे, मे.पुं, “तत्त्वज्ञानातील समस्या – प्रास्ताविक भाष्य”) 

प्रा. रेगे यांनी ज्या शक्यतांचे सूचन केले आहे, ते म्हणजे पर्याप्त पुराव्याअभावीच विधानांविषयी संशय घेण्यास जागा राहते, या वस्तुस्थितीचे सूचन होय. आता, अशी जागा जोवर राहते, तोवर पुरावा हा अपूर्णच समजला पाहिजे आणि कोणताही समंजस इतिहासकार हा अपूर्ण पुराव्यांचा आश्रय इतिहासलेखनात घेणार नाही. पण अनिवार्य आणि पर्याप्त पुराव्याअभावी त्याला इतिहास, आणि त्यातही वस्तुनिष्ठ इतिहास, लिहिताच येणार नाही, हेसुद्धा तो मान्य करील. तेव्हा, वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाच्या पुरस्कर्त्यांसमोर ऐतिहासिक ज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेविषयी जे प्रश्न उपस्थित होतात ते असे की, पुरावा पुरेसा आणि पर्याप्त आहे हे ठरविण्याचे वस्तुनिष्ठ निकष कोणते? आणि त्याने हे निकष एकदाचे निश्चित केलेच तर, पुराव्यांच्या पर्याप्ततेचे हे निकष कोणती रीत अवसरली असता त्याला प्राप्त झाले? ह्या रीतीचे प्रामाण्य पुन्हा कशावर आधारलेले असते? यांसारख्या प्रश्नांच्या उत्तरांमध्येच वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाच्या भावी विकासाच्या शक्यता दडलेल्या असणे शक्य आहे.

मूल्य
इतिहासाच्या चिकित्सक तत्त्वज्ञानातील अनेक मूलभूत प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विज्ञानाप्रमाणेच इतिहासही वस्तुनिष्ठ असू शकतो का? याला अर्थातच दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी उत्तरे देण्यात आलेली आहेत. इतिहास हा गतकालीन मानवी समाजाचा इतिहास असतो आणि त्या समाजाचे ऐतिहासिक ज्ञान म्हणजे सर्वसामान्य विज्ञानाचाच विस्तार असतो. येथे असा प्रश्न उपस्थित करता येईल की, हे ज्ञान इतिहासकाराला कसे प्राप्त होत असते? याचे उत्तर, ते सिद्ध करण्यास अनुकूल आणि पुरेसा ऐतिहासिक पुरावा सादर केला जातो. त्याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी केली जाते आणि मगच आपले इतिहासाचे आकलन शास्त्रीय व वस्तुनिष्ठ होते. अशाप्रकारे, विज्ञानातील सामान्य व विवक्षित रीतींच्या, नियमांच्या सहाय्याने आपण भूतकालीन घटनांचे आकलन करून घेत असतो आणि वस्तुनिष्ठ इतिहास लिहिणे शक्य होते. अर्थात येथे आणखी काही प्रश्न निर्माण होतात, इतिहास हा मानवाचा, त्याच्या समाजाचा इतिहास असतो हे खरे आहे. पण ज्याला आपण ऐतिहासिक घटना किंवा सामाजिक घटना म्हणू त्या विविध मानवी कृतींनी मिळून बनलेल्या असतात. इतिहासाच्या स्वरूपाविषयी निर्णय करायचा झाला, त्याचे वर्णन आणि स्पष्टीकरण द्यायचे झाले तर वैज्ञानिक ज्ञानाच्या सहाय्याने ते करता येईल, कारण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधताना वैज्ञानिक विचारपद्धतीचा अवलंब करणे योग्य असते आणि असा अवलंब करण्यात वैज्ञानिक वृत्ती प्रकट होते. पण असे मानणे कितपत रास्त आहे? ही भूमिका मानवी कृत्यांविषयी घेता येईल काय? मानवी कृत्य ही नैतिक कृत्य असतात. नैतिक मानवी कृतीचा आधार नैतिक विचार असतो. तेव्हा नैतिक विचारांच्या चिकित्सेशी वैज्ञानिक विचारपद्धतीचा काही संबंध असू शकतो का? असेल तर कोणत्या प्रकारचा संबंध असतो? हे स्पष्ट केले पाहिजे. विज्ञानाचे कार्य ‘काय आहे’ याचे स्पष्टीकरण देणे हे आहे. ‘काय असावे’ याचे स्पष्टीकरण देणे विज्ञानात अंतर्भूत नाही, ते नीतीचे कार्य आहे. पण भूतकाळात काय काय घडून गेले आणि ते जसे घडून गेले तसे विवरण देत असताना हे विसरता कामा नये की त्या ऐतिहासिक घटना मानवी कृत्यांनी युक्त होत्या. मानवी कृत्यांचे मूल्यमापन न करता भूतकाळाचे स्पष्टीकरण देणे अपूरे ठरेल. अपूर्ण इतिहास हा इतिहास म्हणूनच अप्रमाण ठरेल. पण प्रश्न असा आहे की मानवी कृत्यांच्या नैतिक मूल्यांचे वैज्ञानिक रीतीने मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला तरी, तो वस्तुनिष्ठ इतिहासलेखनकर्त्याला कसा शक्य होतो? इतिहासकाराला निवड करावी लागते. त्याच्यासमोर संपूर्ण इतिहास असतो. त्यापैकी विवक्षित घटनांची निवड तो करतो. काही घटना अनैतिहासिक म्हणून गाळून टाकतो. पण अमूक एक गोष्ट महत्त्वाची आहे की नाही हे ठरवणे म्हणजे तिचे मूल्यमापन करणे होय. तेव्हा इतिहासात मूल्यमापन हे अटळ ठरते. या भूमिकेला असे उत्तर देता येईल की, इतिहास कशाचा लिहायचा हे इतिहासकार ठरवतो, हे खरे आहे. पण या गोष्टीचा अधिक बारकाईने विचार केला पाहिजे. कशाचा इतिहास लिहायचा हे एकदा ठरवले की आपोआपच कशाचा इतिहास लिहायचा नाही, हेही ठरते. इतिहासविषय निश्चित केला की काही घटना त्याच्याशी असंबद्ध म्हणून वगळल्या जातील. उदाहरणार्थ, ‘वैदिक काळाचा इतिहास’ हा विषय एकदा निश्चित केल्यावर त्यात ‘स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास’ येणार नाही हे उघड आहे. आणि ही गोष्ट केवळ इतिहासाच्या बाबतीत घडते असे नाही, तर इतर कुठल्याही ज्ञानशाखेच्या बाबतीत घडताना दिसते. उदाहरणार्थ, नीतिशास्त्रात ‘उपयोगितावादाची नैतिक उपपत्ती’ हे विवरण देत असताना त्यात ‘कान्टची कर्तव्यवादी नीती’ येत नाही हेही स्पष्ट असते. हा भेद नीतिशास्त्रज्ञ कसा करतात? ह्या भेदामागे एक ‘तार्किक मूल्य’ नसते काय? कोणत्याही ज्ञानशाखेत कधीही आपण एका विवक्षित प्रश्नाचा विचार करीत असतो आणि त्या प्रश्नांशी असंबंधित असलेल्या गोष्टी अर्थातच ह्या विचारातून वगळल्या जातात. उदाहरणार्थ, विज्ञानात, जीवविज्ञानात जाती (स्पीशीज्) म्हणजे काय? हा प्रश्न विचारला जातो. आता, हा प्रश्न भौतिकशास्त्रातील, जडद्रव्य (मॅटर) म्हणजे काय? या प्रश्नापेक्षा निश्चित वेगळा आहे, हे उघड आहे. आणि, मन म्हणजे काय? हा मानसशास्त्राचा प्रश्न दोन्हींपेक्षा वेगळा आणि विशिष्ट आहे हेही उघड आहे. त्यांचे वेगळेपण प्रश्नांच्या विवक्षितत्वात (Particularity) दडलेले आहे. दोन भिन्न गोष्टींमध्ये, त्या दोन भिन्न गोष्टी आहेत, एवढेच काय ते साम्य असू शकते. अर्थात, त्यांच्या भिन्नतेतच त्यांचे विवक्षितत्व दडलेले असते.

इतिहासाच्या संदर्भात हेच सांगता येईल. उदाहरणार्थ, ‘शूद्र मूळचे कोण?’ हा एक विवक्षित प्रश्न झाला आणि ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हाही एक दुसरा विवक्षित प्रश्न झाला. ह्या दोन्ही प्रश्नांची अर्थात दोन वेगवेगळी विवक्षित उत्तरे देण्यात आली आहेत. पण ह्या दोन प्रश्नांपैकी कोणता प्रश्न विचारावा, हा निवडीचा भाग आहे आणि ह्या निवडीला ‘तार्किक मूल्य’ असते. इतिहासाची व्याप्ती एकदा निश्चित झाल्यावरही त्याच्याअंतर्गत कशाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवावे लागते. पण हा निर्णयही तार्किक असतो. तो तार्किक असतो कारण विवक्षित ऐतिहासिक घटनांची, त्यांतील कार्यकारणभावाची मिळून एक तार्किक उपपत्ती इतिहासकारास लावायची असते. असे करताना घटनानिवडीत साहजिक तार्किक अनुबंध असणार आणि एखाद्या घटनेचा उलगडा होण्यास पुरेशा इतक्याच घटनांची ‘ऐतिहासिक घटना’ म्हणून निवड करणे शास्त्रीय दृष्टिकोनाला धरून असते. त्याच घटनांना महत्त्वपूर्ण घटना म्हणून इतिहासकार ठरवू शकेल. अशाप्रकारे इतिहास वस्तूनिष्ठ असू शकतो.

ह्या भूमिकेला वेगळे उत्तर देता येईल. उदाहरणार्थ, अर्जुनाने युद्ध करावे की करू नये हा त्याचा प्रश्न आहे. अर्जुनाच्या प्रश्नाला श्रीकृष्णाने दिलेले उत्तर आपणांस माहीत आहे. आपल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात चाणक्याने राज्यकर्त्या राजास जी ‘चाणक्यनीती’ उपदेशली आहे, ती आपणांस माहीत आहे. नागसेनाने मिलिंदाच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे आपण जाणतो.

तेव्हा, इतिहासात केवळ या प्रश्नोत्तरांचे अथवा नैतिक कल्पनांचे विवरण करून भागणार नाही; तर दिल्या गेलेल्या उत्तरांचे मूल्यमापनही करावे लागते. ‘भारतीय नीतिशास्त्राचा इतिहास’ हा विषय इतिहासकाराने निवडल्यास त्याची ही निवड, ‘भारतीय कलेचा इतिहास’ यांसारख्या विषयापासून पृथक असेल आणि या निवडीला ‘तार्किक मूल्य’ असते हे मान्य करूनही, भारतीय नीतिशास्त्राचा इतिहास लिहिताना विविध नैतिक भूमिकांचे केवळ विवरण देऊन चालणार नाही, तर त्यातील संकल्पनांचे मूल्यमापनही करावे लागेल. उदाहरणार्थ, चार्वाक नास्तिक होता आणि त्याची नीती नास्तिकनीती होती एवढे म्हणून भागणार नाही; तर तत्कालीन संदर्भात आणि आजच्या आधुनिक समकालीन ‘नास्तिक’ शब्दाच्या संदर्भात चार्वाकनीतीचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक राहील. चार्वाक आज समकालीन आहे की नाही या प्रश्नाचे ते उत्तर असावे लागेल. असे उत्तर आपण देत नसू तर, ‘भारतीय नीतिशास्त्राचा इतिहास’ आपण लिहिला असे म्हणता येणार नाही. ते केवळ भूतकाळात होऊन गेलेल्या ‘नैतिक कल्पनांचे विवरण’ तेवढे असेल. तो इतिहास नसेल किंवा त्याला इतिहास म्हणायचे असेल, तर तो अपूर्ण इतिहास असेल, असे वर्णन सामान्य माणसेही देतच असतात. इतिहास म्हणजे केवळ घटितांचे (facts) संकलन नसून, त्यांचे परिशीलन (examination) आणि मूल्यमापनही (evaluation) असते.

तेव्हा, इतिहासकाराचे कार्य हे काटेकोर परिशीलनाचे असते. अर्थात इतिहासलेखनात मूल्यमापन अटळ आहे. श्री. बर्नाड विल्यम्स यांनी ‘कल्पनांचा इतिहास’ (History of ideas) आणि ‘तत्त्वज्ञानाचा इतिहास’ (History of philosophy) यात भेद केला आहे. या भेदाचा आधारही हाच आहे. कल्पनांचा इतिहास म्हणजे कल्पनांचे केवळ विवरण देणे होय आणि तत्त्वज्ञानाचा इतिहास हा भूमिकांतील बारकावे लक्षात घेऊन, समकालीन संदर्भ ध्यानात घेत, चिकित्सक परिशीलनाचा इतिहास असतो. इतिहासात परिशीलन अटळ असल्याने, इतिहासकारावर उपर्निदिष्ट दुसऱ्या प्रकाराच्या इतिहासलेखनाची जबाबदारी येऊन पडते आणि त्याने ती पार पाडली पाहिजे. ऐतिहासिक घटनांची तार्किक निवड केल्यानंतरही इतिहासलेखनामध्येच हे मूल्यमापन कशा प्रकारे अनुस्यूत असते, याचे उदाहरण प्रा. रेगे देतात, ते असे: “एखाद्या कृत्याला ‘खून’ म्हटल्याने त्याचे वर्णन होते व मूल्यमापनही होते. उलट, ज्या कृत्यांचे ‘खून’ असे वर्णन साधारणपणे मान्य झाले आहे, त्याचे केवळ ‘वध’ असे जर आपण वर्णन केले, तर त्याला ‘खून’ म्हणण्यात त्याचा जो नैतिक निषेध अभिप्रेत आहे, तो आपल्याला अमान्य आहे, असा त्याचा अर्थ होतो. अर्थात,मानवी कृत्यांचे वर्णन करणारी आपली जी नेहमीची भाषा असते, तिच्यात वर्णन आणि मूल्यमापन ह्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या असतात व त्यांची एकमेकांपासून फारकत करता येत नाही.” (रेगे, मे.पुं, ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’)

या भूमिकेला उत्तर कसे देता येईल हा वस्तुनिष्ठ इतिहासलेखन करणाऱ्या इतिहासकारापुढचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर असे असू शकेल की, इतिहासलेखनात वर्णन आणि मूल्यमापन एकमेकांत गुंतलेले असतात, त्यांची एकमेकांपासून फारकत होऊ शकत नाही हे खरे आहे; पण मूल्यमापन करणे हे इतिहासकाराचे काम नाही. ते नीतिज्ञाचे ,तत्त्ववेत्त्याचे कार्य आहे. ‘श्रमविभागणी’ तत्त्वानुसार नीतिज्ञाचे कार्य इतिहासकाराने करणे योग्य ठरणार नाही. तेव्हा मूल्यमापनाविषयी इतिहासकाराला जी भूमिका घेता येईल ती अशी की ‘मूल्यदृष्ट्या अपक्ष अशी भाषा’ तो बनवू शकेल आणि मूल्यमापन करणे आपले काम नाही हे ठरवू शकेल. अशाप्रकारे, वस्तुनिष्ठ इतिहासलेखन करणे त्याला शक्य होईल.

पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की, इतिहासलेखनातील मूल्यनिरपेक्षता आणि प्रत्यक्ष इतिहासातील मानवांच्या मूल्ययुक्त नैतिक कृती यांत काही सुसंगती, अनुरूपता असू शकते काय? जे जसे नाही, ते तसे आहे अशी कल्पना करून केलेले इतिहासलेखन वैज्ञानिकतेच्या मर्यादा ओलांडताना अवैज्ञानिक बनत नाही काय? एकीकडे, वास्तवाचे वर्णन करण्याची एकमेव प्रमाण रीत म्हणजेच वैज्ञानिक रीत आहे, असे समजणे आणि दुसरीकडे मूल्यमापन टाळत मूल्यदृष्ट्या अपक्ष भाषा बनविणे, यांतून वैज्ञानिक रींतींची आणि म्हणून वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाची मर्यादाच दिसून येत नाही काय?

मानवाच्या गरजा, नैसर्गिक-जैविक प्रेरणा, इच्छा, हित, सुख, श्रेय, आविष्कार, निर्मितीशीलता, निर्णयस्वातंत्र्य, स्वार्थ, कर्तव्य, न्याय, भावनिकता, काव्यमयता आणि नैतिक कृत्ये ह्या संकल्पना आणि त्यांच्यावर आधारलेली जीवनाची नियामक तत्त्वे ह्यांचा परामर्श इतिहासाच्या चिकित्सेत घ्यावा लागतो आणि तो घेतांना वैज्ञानिक रीतींचा आधार कसा घेता येईल हा प्रश्न निर्माण होतो. मानवी संस्कृतीच्या इतिहासात आतापर्यंत आदर्श, श्रेयस्कर जीवनाच्या ज्या विविध संकल्पना विकसित झालेल्या आहेत त्यांचाही विचार इतिहासकाराला या चिकित्सेत करावा लागेल. त्यातून माणसाच्या प्रेरणा आणि शक्ती यांच्या मिळून बनलेल्या मानवी प्रकृतीविषयी जे चित्र उभे राहील त्याची वैज्ञानिक ज्ञानाशी सांगड घालून विश्व आणि मानव यांचा संबंध काय आहे ह्याविषयीची एक दृष्टी घडवावी लागेल. हे कार्य वस्तुनिष्ठ इतिहासलेखनात अंतर्भूत नसते, तेव्हा ते कार्य त्याच्या कक्षेबाहेरच राहते. हे कार्य मग व्यक्तिनिष्ठ इतिहासाकडे देण्याची वेळ येते आणि असे व्यक्तीनिष्ठ इतिहासलेखन तत्त्वज्ञानाच्या प्रांतात येते. अशाप्रकारे इतिहास स्वायत्त असतो, असे म्हणता येते.

वैज्ञानिक ज्ञान हेच एकमेव प्रमाण ज्ञान आहे ही जाणीव वैज्ञानिक नाही. ही जाणीव खरोखरच वैज्ञानिक मानली गेली असेल तर ती स्वत:चेच खंडन करते असे म्हणावे लागते. कारण, मूल्यांच्या प्रश्नांविषयी वैज्ञानिक इतिहासलेखनात घेतली जाणारी मूल्यनिरपेक्ष भूमिका त्या जाणीवेचे खंडन करणारे उदाहरण म्हणून शिल्लक राहतेच. या आत्मव्याघातापासून सुटका करून घ्यायचा कोणता मार्ग वैज्ञानिक रीतींच्या आधाराने वस्तुनिष्ठ इतिहासलेखन करू पाहणाऱ्या इतिहासकाराजवळ उपलब्ध असतो? ह्या प्रश्नाचे समर्पक उत्तर त्याने दिल्याशिवाय वस्तुनिष्ठ इतिहास लिहिता येणे शक्य आहे, असे म्हणता येणार नाही. तेव्हा ते उत्तर वस्तुनिष्ठ इतिहासाच्या पुरस्कर्त्या इतिहासकाराने द्यायला हवे. ते देणे हे त्याचे कर्तव्य ठरते.

अशाप्रकारे, इतिहासाच्या चिकित्सक तत्त्वज्ञानातील या दोन भूमिकांमधील – अर्थात इतिहास वैज्ञानिक असतो आणि इतिहास स्वायत्त असतो या दोन भूमिकांतील – उर्वरित कित्येक मूलभूत प्रश्नांचे स्वरूप समजून घेत, त्यांतील युक्तिवादांचा परामर्श घेण्याचा आणि इतिहासाच्या चिकित्सक तत्त्वज्ञानाची ‘चिकित्सा’ करण्याचा प्रयत्न आपण लेखाच्या पुढील भागात करूया.

(अपूर्ण)
(एम.ए. द्वितीय वर्ष : अर्थशास्त्र )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.