कलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व

वकिलीचे शिक्षण घेताना मला प्रकर्षाने असे जाणवायचे की, समोर आलेल्या पुराव्यावरून निकाल तर दिला जातो. पण तो न्याय्य असतोच असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. ‘कुसुम मनोहर लेले’सारखी नाटके आपल्या समाजातील स्थितीला दर्शवतात. वास्तवातही कुसुमला न्याय मिळाला नाहीच. नाटकात शेवट गोड करता येतो पण समाजात केवळ ठोस पुराव्याअभावी कितीतरी अपराधी आपल्या आजूबाजूला दिसत असतात. किंवा निरपराध लोक कायद्याच्या चकाट्यात अडकलेले दिसतात. कायदा आहे, तशा त्याला पळवाटाही आहेत आणि सद्य:स्थितीत या पळवाटा अधिराज्य करताना दिसतात. समाजात एखादा गुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी एक प्रकारची भीती बसावी या उद्देशाने शिक्षेचे स्वरूप ठरवलेले असते. परंतु पळवाटांनी तेही बोथट झाले आहे असे जाणवते.

जेव्हा बलात्कारासारख्या घटना घडतात तेव्हा बरेचदा ताशेरे स्त्रीच्या चारित्र्यावर, तिने परिधान केलेल्या कपड्यांवर ओढले जातात. पण अंगभर कपडे परिधान केलेल्या स्त्रीलाही अशा विकृत मनोवृत्तीला सामोरे जावे लागते; तेव्हा मात्र पुरुषाच्या ह्या विकृत मानसिकतेवर बोलणारे फारसे कोणी पुढे येत नाहीत. आणि जे येतात त्यांना ‘स्त्रीवादी’च्या शिक्क्याचे लेबल लावले जाते. ‘पिंक’सारख्या चित्रपटातून खूप चांगल्या पद्धतीने ‘नो म्हणजे नो’ ही भूमिका मांडली गेली आहे.

‘स्पर्श’सारख्या चित्रपटातून स्त्रीच्या सर्व समर्पित करण्याच्या भूमिकेवरही नायकाचा अहंकार आडवा येतो आणि तिची साथ घेण्यास तो नाकारतो. अर्थात या चित्रपटांकडे आपण कोणत्या संदर्भाने पाहत जातो तसतशी आपली मनोभूमिका प्रत्येकवेळी बदलत जाते. 

ॲसिड हल्लाप्रकरणी ‘चेहऱ्यामागची रेश्मा’ या पुस्तकातून किंवा ‘छपाक’ या चित्रपटातून निष्कारण बळी पडलेल्या या मुलींची जगण्याची धडपड आणि त्यातून त्यांनी घेतलेली झेप ही सामान्य मुलींची असामान्यच कथा समोर मांडली आहे. पण हा प्रवास वाचताना, पाहताना अंगावर शहारे येतात.  हे सगळे अगदी आपल्या आजूबाजूला घडत असताना ह्याच समाजातील एक घटक म्हणून आपण याकडे कश्या पद्धतीने पाहत आहोत…? ह्यावर कश्या पद्धतीने व्यक्त होत आहोत…? की आपले पण इतरांसारखे अलिप्ततावादी धोरण आहे आणि आपल्याला थेट झळ बसली नसल्यामुळे आपल्या जाणिवा, संवेदना कायमस्वरुपी बोथट झाल्या आहेत? हे विचार अस्वस्थ करून सोडतात. पण दु्दैवाने ही अस्वस्थतापण त्या त्या वेळेपुरती असते. आणि हे अधिक गंभीर आहे. त्यामुळे कदाचित सोयीने याची फारशी कोणी दूरगामी दखल घेतही नाही. आणि त्यावरील चर्चासत्रांना फारसे फुटेजही दिले जात नाही.

‘द ग्रेट इंडियन किचन’ या तामिळ चित्रपटात केरळसारख्या १००% साक्षर असलेल्या राज्यात स्त्रीने कितीही उज्ज्वल यश संपादन केले तरी तिच्याभोवती असलेल्या तिच्या जबाबदाऱ्या, स्वयंपाकघर हे कसे सुटत नाही, अखंड स्वयंपाकघरातील त्याच त्या गोष्टी पाहून एका क्षणी प्रेक्षकही कंटाळतो पण त्या स्त्रीची त्यातून सुटका नाही हे वास्तव रेखाटण्यात लेखक-दिग्दर्शक कमालीचा यशस्वी झाला आहे.

अगदी अलीकडे मी जयंत पवार लिखित ‘माझं घर’ हे नाटक वाचले. हे नाटक डिसेंबर १९९९ ला रंगमंचावर आले. त्याचे एकूण २२० प्रयोग झाले. अमेरिकावारीही झाली या नाटकाची. काही प्रयोग तिथेही झाले. तरी याही नाटकाची म्हणावी तशी चर्चा झाली नसल्याचे शल्य या पुस्तकाच्या मनोगतात जयंत पवार यांच्या पत्नी संध्या नरे पवार यांनी मांडले आहे. अनेकवेळा अनेकांचे विस्थापन होत असते. कष्टकऱ्यांच्या माथी तर ते पाचवीला पूजलेलेच असते. स्थलांतराच्या नावाखाली त्यांच्यावर विस्थापन लादले गेलेले असते. स्त्रीच्या बाबतीत लग्नानंतर आणि लग्न मोडताना झालेले ते एक प्रकारचे विस्थापनच असते. हा मुद्दा अधोरेखित करीत जयंत पवार यांनी ‘माझं घर’ हे नाटक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ११ सप्टेंबर २०२२ रोजी मालवण सिंधुदुर्ग येथे जेष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते झाले.

‘माझं घर’ या पुस्तकाच्या मनोगतात संध्या नरे पवार यांनी मांडलेले पुस्तकाचे सार मला खूप महत्त्वाचे वाटते. मनोगतात त्या म्हणतात,

“मुलगी ज्या घरात जन्माला येते त्या घरावर तिचा अधिकार नाही. त्या घरात तिला कायम परक्याचं धन मानले जाते. लग्न होऊन ज्या घरात जाते तिथेही ती जागा सासऱ्यांच्या किंवा नवऱ्याच्या मालकीची. अगदी नवरा-बायको दोघांनी मिळून, कर्ज काढून घर घेतलेले असले तरी अपवाद वगळता घराच्या कागदपत्रांवर मालक म्हणून पुरुषाचे, नवऱ्याचेच नाव असते. या अशा घरावर, ज्यासाठी ती खपते, खस्ता काढते, त्या नवऱ्याची ती बायको आहे तोवरच तिचा अधिकार असतो. तोही राहाण्याचा, निवाऱ्याचा. एकदा नवऱ्याने घटस्फोट दिला, पोटगी दिली की तिचा निवारा तिने शोधायचा. माहेरी गेली तर तिथेही तिचे स्थान आश्रित म्हणून किंवा वाढीव जबाबदारी म्हणूनच. अगदी आजही बहुसंख्य स्त्रियांच्या बाबतीत हेच वास्तव कायम आहे. किंबहुना जगभरचेच ते वास्तव आहे. स्त्रियांना वारशावरच्या, संपत्तीवरच्या मालकीहक्कातून बेदखल करतच जगभरची पुरुषसत्ता रुजलेली आहे. स्त्रीवादी विचारविश्वात या मुद्द्याची अनेक अभ्यासकांनी चर्चा केली आहे. स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांमधील संघर्षात आर्थिक संसाधनांवर मालकी हक्क मिळवून, स्त्रीला संपत्तीपासून वंचित करून पुरुषाने आपली सत्ता कायम राखली आहे. या पुरुषकेंद्री व्यवस्थेत स्त्री हीच पुरुषाच्या मालकीची वस्तू बनली आणि तिचे स्वतंत्र आर्थिक अस्तित्व नष्ट झाले. पुरुषाच्या मालकीची वस्तू बनलेली स्त्री त्याचे, त्याच्या कुटुंबाचे नाव लावू लागली. आपण कोणाची तरी पत्नी आहे हे सांगणारी वैवाहिक चिन्हे धारण करू लागली. आपले नसलेले घर आपले मानू लागली आणि नवऱ्यासाठी, त्याच्या सुखासाठी स्वतःला विसरून खपू लागली. पायाखालची जमीन आणि डोक्यावरचा निवारा आपला नसला की एक वेगळीच मानसिक गुलामगिरी आकाराला येते. आजवरच्या बहुसंख्य स्त्रिया या अशाच मानसिक गुलामगिरीत जगत आल्या. ‘माझं घर’ या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग भौतिक जगातील हक्क, अधिकार यांच्याशी जोडत नायिकेला पुरुषसत्ताक समाजरचनेत ताठ मानेने जगण्याचे इंधन पुरवते. 

आजही शेतजमिनीवर, घरावर बाईचे नाव लावले जात नाही. मुलीला माहेरच्या संपत्तीत वाटा देण्याचा कायदा आहे. पण तरीही बहुसंख्य घरांमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ स्वतःच्या नावावर जमीन, घर चढवताना बहिणींकडून ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ वर सही घेतात. प्रत्येक नांदत्या लग्नात घटस्फोटाची शक्यता कायम एका कोपऱ्यात स्तब्धपणे उभी असते. स्त्रियांना याची नकळत जाणीव असते. त्यामुळेच कायदा असूनही भावाबरोबर भांडून माहेरच्या संपत्तीत हिस्सा घ्यायला बहुसंख्य स्त्रिया तयार होत नाहीत. माहेरचा, भावाचा आधार हवा, ही भावना यामागे असते आणि त्यातूनच भावाच्या नावावर सगळी जमीन-जागा चढवायला त्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’वर सही करतात. लग्नानंतर स्त्रिया ज्या नवऱ्याच्या घरात, शेतात आयुष्यभर राबतात त्या एकत्रित वैवाहिक मालमत्तेत त्यांना आज आधुनिक कायद्यातही समान अधिकार नाही. आणि बाईच्या स्वमालकीचे घर किंवा शेत ही बाब आजही अपवाद म्हणूनच आहे. त्यामुळेच परिस्थिती जशी बदलत जाते तसे बाईच्या वाट्याला विस्थापन येते. सगळ्यात पहिले विस्थापन लग्नामुळे येते. मात्र माहेर आणि सासर या गोंडस नावाखाली हे विस्थापन दडवण्यात येते. कन्यादानाला पुण्य मानत पाठवणीच्या विधीला सांस्कृतिक भावविश्वात एक वेगळेच वलय देण्यात आले आहे. माहेरच्या घरापासून सासरच्या घरापर्यंतच्या प्रत्येक पावलात आपल्या पायाखालची जमीन हिरावून घेतली जात आहे. याचं भान वधूला येईपर्यंत ती उंबरा ओलांडून सासरच्या घरी आलेली असते. आपल्या आयुष्याचे नेमके काय होत आहे हे कळेपर्यंत ती आई होऊन मातृत्वात गुरफटून गेलेली असते. वर्ष सरत जातात तसा आपला वाटलेला नवरा परका होत जातो, मुलं मोठी होत जातात आणि घराच्या चार भिंतींचाच आधार उरतो.

कदाचित म्हणूनच आपला नवरा आपल्याकडे केवळ घटस्फोट मागत नाही आहे, तर आपल्यापासून तो आपले घरही हिरावून घेत आहे, या जाणिवेने ‘माझं घर’ मधील नायिका विभा अधिक विकल होते. मी घटस्फोट देते पण मला माझे घर हवे, ही भूमिका घेते. नवऱ्याला घराचे अर्धे पैसे देऊन घराचा ताबा घेते. भावाने दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव आणल्यावर “मी पुन्हा विस्थापित होणार नाही” असे सांगते. लग्नानंतर संबंधित पुरुषाने माझ्या घरी राहायला यावे, असे सांगत “माहेरच्या घरी रुजवलेली मुळे पुन्हा सासरच्या घरी रुजवताना स्त्री कशाकशातून जाते, हे कधीतरी पुरुषालाही कळू दे”, असे म्हणते. ती असे म्हणत असताना तिच्यासमोर अनेक गुंते असतात. ते मानसिकदृष्ट्या थकवणारे असतात, नव्याने काही प्रश्न निर्माण करणारे असतात पण तरीही विभा आपल्या म्हणण्यावर ठाम राहते. कारण जिथून आपल्याला कधीही, कुणीही “जा” म्हणून सांगणार नाही, असे हक्काचे छप्पर आपल्या डोक्यावर हवे, हे विभाला अधिक महत्त्वाचे वाटते. आपल्या सुखी संसाराच्या कोषात मग्न राहात झापडबंद आयुष्य जगणाऱ्या स्त्रियांना हे नाटक म्हणजे एक इशारा आहे. किंबहुना वास्तव दाखवणारा आरसा आहे. पारंपरिक कौटुंबिक साच्यातला हा आधुनिक, स्त्रीवादी उद्गार आहे.”

संध्याताईंनी विस्तृत लिहिलेल्या या मनोगतात स्त्रीच्या भावविश्वासोबतच एकूणच परिस्थितीवर डोळसपणे प्रकाश टाकणारी ही एक हृदयस्पर्शी कलाकृती जाणवते.

सध्याच्या सहजपणे तुटत चाललेल्या नातेसंबंधांवर एक सजग न्याय्य बाजू मांडताना नेमकेपणाने कोणता विचार केलाच जात नाही त्यामुळे स्त्री कशी एकाकी पडते किंवा कोषात जाते हे तिचे तिलाही कळत नाही हे लक्षात येते.

प्रत्येकाने आपापल्या भूमिकेतून विचारप्रवृत्त व्हावे व स्वतःला सुधारण्याची संधी द्यावी हा विचार आवडला. त्यामुळे माणूस जास्त विचारप्रवण होतो. अंतर्मुख होतो.

समाजवास्तवाकडे अत्यंत बारकाईने पाहत ते उत्तम शब्दात मांडल्याने या नाटकातील हे प्रातिनिधिक कुटुंब दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहते. 

सध्याच्या ट्रेंडमध्ये बक्कळ पैसा कमवणाऱ्या चित्रपटातील स्त्री-भूमिका या मध्यवर्ती व्यक्तिरेखादेखील साकारणाऱ्या नाहीत असे प्रकर्षाने जाणवते. पण जुनी आणि अलिकडची काही नाटके मात्र रंगभूमीवर आजही अधिराज्य करताना दिसतात.

यामध्ये ‘चारचौघी’ नाटकाचाही विशेष उल्लेख करावा लागेल. ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या व्यवसायिक नाटकातदेखील “घरातील स्त्रीला गृहीत धरणं थांबवा आता, तीही एक स्वतंत्र व्यक्ती आहे”, याचे भान आईच मुलीला करून देताना दिसते. 

एकूणच आपण खूप सोयीने अनेक मुद्द्यांवर बोलायचे टाळतो किंवा मी बोलून, मी लिहून काय फरक पडणार आहे? समाजव्यवस्था थोडीतरी बदलणार आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जातो. पण काहीवेळा स्त्रीच्या अस्तित्वासाठी, तिच्या आत्मसन्मानासाठी किंवा हे आत्मभान येण्यासाठी अशी नाटके, चित्रपट डोळ्यांसमोर राहिले तर विचारांची बैठक पक्की व्हायला नक्कीच मदत होते. एक विचारप्रवाह तरी सुरू होतो. दरवेळेस कर्वे, टिळक, जोशी आंबेडकर यांची साथ आपल्या पाठीशी असेलच असे नाही. तरी आपल्याला तारतम्याने आपले अस्तित्व ताठ मानेने, सुंदरपणे जगायचे आहे. नाटके, चित्रपट ही जरी मनोरंजनाची साधने म्हणून आपण पाहत असलो तरी त्यातून व्यक्त होणारी घटना ही समाजाचेच एक प्रतिबिंब असते. त्यामुळे प्रेक्षक त्यावर आपले जीवन ताडून पाहत असतो. त्यामुळे या दृकश्राव्य माध्यमातील तिच्या अस्तित्वामधून समाजबदलाचे वारे जर वाहू लागले तर निश्चितच ते समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने स्वागतार्ह ठरेल.

वेंगुर्ला, 9689902367/9403364764

अभिप्राय 2

  • स्त्रीचे विस्थापन या वास्तवाकडे लक्ष वेधणारा ‘ माझे घर’ या नाटकाचा परिचय कालोचित आहे.सध्याच्या परिस्थितीत स्त्रीने आर्थिक दृष्टया पूर्णपणे स्वावलंबी होणे/ राहणे हा एकच उपाय या परिस्थितीत दिसतो.कितीही अप्रिय असला तरीही घटस्फ़ोटाची शक्यता गृहित धरून चालणे आणि मूल होऊ देण्यापूर्वी त्याचा विचार दोघांनीही स्पष्टपणे करणे आवश्यक आहे.

  • Thank you. Very insightful and thought-provoking comments.
    Amongst the many important initiatives that the late Shri Sharadji Joshi had launched,
    one was that every farmer should add the name of his wife also as an owner (or something very similar). Fortunately, many thousands of farmers had responded very positively and had
    done this. I am afraid I do not know the subsequent status.
    Thanks again and namaskar

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.