न्यायासाठी संवाद आवश्यक

काही दिवसांपूर्वी क्षमावाणी दिवस होता. दरवर्षी या दिवशी जैन लोक त्यांनी कळत नकळत केलेल्या दुष्कृत्यांबद्दल क्षमायाचना करतात. कॉलेजच्या वेळेच्या मित्रमैत्रिणींच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्यादिवशी क्षमायाचनेचा असा एक संदेश एका जैन मैत्रिणीकडून आला. आम्ही सर्व गेल्या काही दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. यातील बहुतांश भारतात आहेत. अधूनमधून थट्टामस्करी, सठी-सहामाशी भेटीगाठी होत असतात. तो संदेश दिसल्यावर अनेक लोकांचे जोडलेल्या हातांचे ईमोजी आले. एकाने मिच्छामी दुक्क्डम हा त्या दिवसाशी संबंधित प्राकृत वाक्यांश लिहिला. मी लिहिले ‘यु आर फरगिव्हन’. आता मागितली कोणी क्षमा तर आपणही करावं ना मन मोठं.

ते प्रकरण कदाचित तिथेच संपलं असतं. पण त्यावर मैत्रिणींने लिहिलं की ती भावना पवित्र असल्यामुळे तिने शेअर केली आहे. एक दिवस सुरू करून हळूहळू क्षमेची ही भावना नेहमीसाठी आत्मसात करायची. हा विचार नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये माझ्या मनात भीनत असलेला उपहास उफाळून आला. पन्नाशीत असलेल्या सायन्स ग्रॅज्युएट्सना अशी भावना आपल्या निकट गटात विशद करावीशी वाटावी? तेही आजूबाजूला सुरू असलेल्या वादळात शांत राहून? बिल्किस बानो प्रकरणानंतर त्या बलात्काऱ्यांना शिक्षा करण्याबद्दल (किंवा क्षमा करण्याबद्दल) कोणी काही लिहिलं नव्हतं. मी तसं लिहिल्यावर एकाने मान्य केलं की आपण अनेक ग्रुप्समध्ये फक्त चांगल्या गोष्टींबद्दलच बोलतो. हे ग्रुप जुजबी ओळख असलेल्या लोकांचे असतील तर तसं होणं कदाचित समजू शकू. पण ज्यांना अनेक दशके ओळखतो त्यांच्याशीपण जर बऱ्या-वाईट मुद्द्यांवरून बोलता नसेल येत तर मुळात कुठेतरी काहीतरी बिघडलं असल्याचं ते द्योतक आहे. 

मतवैविध्यामुळे वाद होऊ शकतात आणि मित्रामित्रांमध्ये ते का पत्करा असा एक युक्तिवाद केला जातो. पण मतवैविध्यतर असायलाच हवं. सगळे एकसारखाच विचार करत असतील तर त्याचा अर्थ एकतर कोणीच विचार करत नाही किंवा त्यापैकी एकच व्यक्ती विचार करते. शिवाय असहमती ही अप्रिय शब्दातच दर्शवावी लागते असेही नाही. ज्याप्रमाणे घराघरात संवाद व्हायला हवे तसेच अशा ग्रुप्स-ग्रुप्सवरपण व्हायला हवे (निर्दिष्ट उद्देश असलेले ग्रुप याला अर्थात अपवाद – पण बिल्किस बानोसारखं प्रकरण असलं तर तिथेही निदान हळहळ प्रगट व्हायला हवी). असे संवाद होत राहिले तरच लोकशाही जिवंत राहू शकेल.

मी या आधारावर थोडंफार लिहिल्यावर एकाने माझी बाजू उचलून धरली आणि विषयादाखल एक दोन व्हिडीओ पोस्टही केले. त्यानंतर मात्र कोणाचेच काही नाही. कदाचित फॉरवर्ड्सना कंटाळत असतील लोक. साहजिक आहे. त्यामुळे केवळ व्हिडीओ किंवा लिंक्स पोस्ट करण्याऐवजी स्वतःची मतं दर्शवणे अत्यावश्‍यक आहे. यामुळे आपलं स्वतःचं नेमकं मत काय आहे हे कळायलाही मदत होते.

दोनच दिवसांनी ग्रुपमधील एकीचा वाढदिवस आला आणि आतापर्यंत जणू त्या गावचेच नाही असं दर्शवणाऱ्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रांग लावली. त्यानंतर पुन्हा शांतता. अशा तऱ्हेने एका ग्रुपला बोलतं करण्याची साठा प्रश्नांची कहाणी असफल झाली. पण असे प्रयत्न थांबणार नाहीत, थांबायला नको.

जगभर अनेक देशांमध्ये आलटून-पालटून का होईना जहालमतवादी गट राज्यसत्ता मिळवण्यात यशस्वी होत आहेत.  अमेरिकेत राज्याध्यक्ष न्यायमूर्तींची नेमणूक करू शकत असल्यामुळे, मागील राजवटीच्या कृपेने सध्याचं सुप्रीम कोर्ट वाट्टेल ते निर्णय देऊ शकते आहे. यातला अगदी अलिकडचा सर्वांत कठोर निर्णय गर्भपातासंबंधित आहे. बलात्कारामुळे गर्भधारणा झालेल्यांनाही सहा आठवड्यांनंतर गर्भपात करता येणार नाही (९ पैकी ६ न्यायाधिशांची याला सम्मती होती – ६-३) असा निर्णय अनेक राज्यांमध्ये घेतला गेला. या निकालापाठोपाठ मानवतेला काळिमा फासणारे आणखी काही निकाल दिले गेले.[१] एका निकालाप्रमाणे कोणीही बंदूक घेऊन फिरणं बेकायदेशीर नाही – तो व्यक्ती-स्वातंत्र्याचा एक भाग आहे (६-३). या बंदूकधाऱ्यांमुळे अमेरिकेत मरत असलेल्यांची संख्या सतत वाढत असतानाही असे झाले. दुसऱ्या एका निकालाप्रमाणे धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळाही राज्य अनुदानाला पात्र असतील (६-३). धर्म-राज्य यातील विभाजनाच्या हे थेट उलट आहे. कोव्हिड काळात लसीकरणाचा दाखला द्या किंवा टेस्ट करा हे कार्यालयांच्या मोठ्या गटांना लागू करता येणार नाही असाही निर्वाळा कोर्टाने दिला (६-३).  पोलिओची लस लहानपणी घेतल्यामुळेच अनेक लोक वाचले आहेत हे या लस विरोधकांच्या गावीही नाही का?

अमेरिकन लोक स्वतःच्या हक्कांबद्दल जास्त सजग आहेत. वरील अनेक गोष्टींबद्दल सगळीकडे थोडीफार तरी चर्चा होतांना दिसते. ते आवश्यकही आहे. तरीही न्यायलयाची ही स्थिती आहे. सोशल मीडियाच्या साधनांमुळे बुजऱ्या लोकांनादेखील वाचा मिळाली आहे, त्याचबरोबर IT cells राज्यकर्त्यांसाठी हवा तसा प्रसार करताना दिसतात. असामनेतेची, अन्यायाची ही परिस्थिती बदलायची असेल तर मूक राहून चालणार नाही. नाहीतर हॉलोकास्टवरील मार्टिन निम्यॉलरच्या वक्तव्यातल्यासारखी गत व्हायची.  १९४६मध्ये नाझी राजवटीदरम्यान चूप राहिल्याबद्दल खंत व्यक्त करताना निम्यॉलरने म्हणले होते,[२]

प्रथम ते समाजवाद्यांसाठी आले, आणि मी बोललो नाही – कारण मी समाजवादी नव्हतो.

मग ते ट्रेड युनियनिस्टांसाठी आले, आणि मी बोललो नाही – कारण मी ट्रेड युनियनिस्ट नव्हतो.

मग ते ज्यूंसाठी आले, आणि मी बोललो नाही – कारण मी यहूदी नव्हतो.

मग ते माझ्यासाठी आले – आणि माझ्यासाठी बोलायला कोणीही उरले नव्हते.

खरंच, आपण आवश्यक तिथे आवाज जर उठवला नाही तर आपल्यासाठी कोणी पुढे येऊ शकणार नाही. सध्या तर चक्क हुकुमशाही असलेल्या इराणमध्येदेखील नैतिक पोलिसांविरुद्ध निदर्शनं सुरू आहेत. आपण बोलल्याने काय होणार असा पोकळ विचार न करता आवश्यक तिथे आवाज उंचावला पाहिजे. सुरुवात स्वतःच्या घरी आणि मित्रांमध्ये नाही झाली तर कुठे होणार?

असे प्रयत्न सफल होतीलच असं नाही. शाळेतल्या एका WhatsApp ग्रूपमध्ये राजकारणावर बोलणं सुरू झालं, काही लोक टोकाला गेले, आणि ग्रूपचं विभाजन झालं. यात बरेच मुद्दे येतात: (१) शक्यतोवर टोकाची भूमिका घ्यायची नाही. गरज भासल्यास फोन उचलून सरळ बोलायचं. खरी मैत्री असल्यास त्यात काहीच वावगं नाही. मतभेद शक्य तोवर मिटवायचे, पण केवळ समोरच्याला काय वाटेल म्हणून माघार घ्यायची नाही. आपल्याला एखाद्या मुद्द्याबद्दल जास्तच प्रकर्षाने काही वाटत असले तर ज्याप्रमाणे आपण सपशेल चूक असू शकतो त्याचप्रमाणे एखादेवेळेस कदाचित केवळ आपणच बरोबर असू शकू. (२) अप्रिय शब्द टाळल्यास जुनी मैत्री तुटायचा प्रश्न उद्भवणार नाही. (३) त्याउपरही फूट पडलीच तर कदाचित ती मैत्री दिखाव्यापुरतीच होती. सगळ्यांनी विश्वामित्र असायलाच हवं असं नाही. 

कालच लॉरेन गंडरसनच्या Silent Sky[३] या पुस्तकावर आधारित नाटक पाहिलं. हार्वर्डमध्ये फोटोग्राफिक प्लेट्सवरून अवकाशीय स्रोतांचे तक्ते बनवण्याचं महत्त्वाचं काम अनेक स्त्रियांच्या हाती होतं. मात्र त्यांना प्रत्यक्ष संशोधन करण्याची मुभा नव्हती. त्यातलीच एक हेनरिएटा लेव्हिट हिच्यावर हे पुस्तक/नाटक आहे. ती एका ठिकाणी त्यांच्यावरील या बंधनाला त्रासून इतरांना अनुचित वाटणारे उद्गार काढते. तसं इतरांनी म्हणल्यावर ती म्हणते: ‘Life is about getting appropriately upset’. एकदम बावनकशी वाक्य आहे हे. हे एकच आयुष्य आहे आणि त्याचं सोनं करायचं असल्यास सभोवतालचं जग जगण्यायोग्य असावं आणि ते तसं बनवायची जबाबदारी आपलीच आहे, आपल्या सगळ्यांची मिळून. आणि कधीकधी ती जबाबदारी निभावायला काही संबंध कठीण मनाने तोडावेही लागू शकतील. पण कदाचित त्याचमुळे जास्त लोकांचं भलं होईल.

केवळ बोलून काय होणार असा प्रश्न पडू शकतो (न बोलणाऱ्यांना हा जास्त जवळचा आहे). बोलल्यामुळे विचारांची देवाणघेवाण सुरू होते. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जसा जनुकांचा प्रसार होतो तद्धतच या मनुकांचा (वैचारिक जनुकं) प्रसार एका व्यक्तीपासून दुसरीपर्यंत, एका ग्रुपपासून दुसऱ्यापर्यंत होणार. सुरुवात मात्र एकाच्या बोलण्याने होणार.

न्याय आपणच एकमेकांना देऊ शकतो. न्यायाधीशही आपल्यातलेच असतात. संवादातूनच सांकेतिक स्वर्ग गाठणं शक्य आहे.

[१] https://www.nytimes.com/interactive/2022/06/21/us/major-supreme-court-cases-2022.html

[२] https://encyclopedia.ushmm.org/content/en/article/martin-niemoeller-first-they-came-for-the-socialists 

[३] https://www.laurengunderson.com/all-plays/silent-sky

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.