अज्ञानकोश

पुस्तकांमधील ‘शामची आई’ जशी आठवणीत आहे; तशी कित्येक पुस्तकंसुद्धा. अशीच एक आठवण. मी लहान असताना एकदा शास्त्रीजींकडे (तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी) बाबांचं काही काम होतं. ते मलाही घेऊन गेले. एका विद्वान व्यक्तीला आपण भेटणार आहोत एवढीच माझी समज. मी गेलो. पुस्तकांच्या गराड्यातच ते बसले होते. त्यांची आणि बाबांची काय चर्चा झाली हे काही मला कळत नव्हतं, पण तिथल्या एका पुस्तकाकडे मात्र माझं लक्ष खिळून राहिलं.

ते पुस्तक होतं ‘अज्ञानकोश’ (Encyclopaedia of ignorance)! माझ्या नजरेतली उत्सुकता पाहून शास्त्रीजींनीच मला माहिती दिली. 

ते संपादित करत होते तो विश्वकोश, तो तर ज्ञानाचा कोश, सतत वर्धिष्णू होणारा आणि हा होता अज्ञानकोश. मानवी ज्ञानाच्या कक्षा जसजशा विस्तारत जातील तसतसा आक्रसत जाणारा हा कोश. निदान त्या कोशकारांनी सुरुवातीला तरी तसं म्हटलं होतं. पण असं थोडंच असतं? ज्ञानाचं क्षितिज विस्तारत जातं तसंतसं अज्ञानाचंही क्षितिज विस्तारत जातं. त्यामुळे हा अज्ञानकोशही प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णू होत जाणारा. 

म्हणूनच की काय, त्याचं मुखपृष्ठ तर अत्यंत चतुराईनं चितारलं होतं. एक माणूस एक जिना चढतो आहे. एका चौकोनी इमारतीवर असलेला हा चौकोनी जिना. म्हणजे एक चक्कर मारली की माणूस पुन्हा तिथेच. नीट पहिलं तर असं लक्षात येतं की या जिन्याला मुळी अंतच नाही. अखंडपणे त्याचा शोधाचा प्रवास चालूच आहे.

बऱ्याच वर्षांनी हे पुस्तक मी ऑनलाईन चाळलं. हे १९७० साली प्रसिद्ध झालंय. नवी आवृत्ती मात्र नाही. हा अज्ञानकोश आहे. तेंव्हा आपापल्या क्षेत्रात अज्ञात काय आहे यावर या लेखात भाष्य आहे. “सध्या आम्हाला हे माहीत नाही पण येत्या काही काळात हे अज्ञान दूर होईल अशी आशा आहे”, असं सांगणारे हे लेख आहेत. निरनिराळ्या ज्ञानशाखांबद्दल सुमारे साठ लेख आहेत. पानांच्या रचनेबद्दल आहे, माणसाच्या उत्पत्तीबद्दल आहे, गुरुत्वाकर्षणाच्या कोड्यापासून ते माणसं व्यसनी का बनतात? अशा अनेक विषयांवरील लेख आहेत. 

ह्यात अल्बर्ट आइनस्टाईनचा लेख आहे. स्टीफन हॉकिंगचा आहे. डी.एन.ए.च्या रचनेचा शोध लावणारा फ्रान्सिस क्रीक इथे आहे. अनेकजण अज्ञातावर लिहिता लिहिता अंतर्मुख झाले आहेत. निश्चित समजल्या जाणाऱ्या विज्ञानाची अणूगर्भातील अनिश्चिततेशी नुकतीच गाठ पडली होती, त्या काळातील हे पुस्तक. 

‘अज्ञानाचा कोश’ ही भन्नाटच कल्पना आहे. अज्ञानाची जाण खूप महत्त्वाची आहे बरं. पूर्वी नव्यानेच लोकं दूर दूर बोटी हाकू लागले आणि नवनवे प्रदेश पादाक्रांत करू लागले. ह्या लोकांचा १४५९चा नकाशा पाहिला तर यात किनाऱ्याकडील ज्ञात भूभाग अगदी नीट रेखाटलेला दिसतो आणि जो भाग अजून अज्ञात आहे त्या भागात, भुतेखेते, अप्सरा, चित्रविचित्र प्राणी अशी अगदी रेलचेल दिसते. पण साठ-सत्तर वर्षानंतरचा (१५२५) नकाशा पहिला तर तो बराचसा मोकळा मोकळा दिसतो. जे माहीत नाही त्या जागा चक्क मोकळ्या सोडलेल्या दिसतात. आज आपल्याला ह्यात काही विशेष वाटत नाही पण स्वतःच्या कर्तृत्वाकडे पहाण्याचा एक वेगळा आयाम यात दिसतो. अमुक एक गोष्ट माहीत नाही अशी जाहीर कबुली ह्यात दिसते. असं म्हणतात की ‘अज्ञानाचा शोध’; ‘अरेच्च्या ह्या ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत बरं का’; हा शोध मानवाला लागलेला एक अत्यंत महत्त्वाचा शोध आहे. अज्ञानाचा स्वीकार ह्यात दिसतो आणि अज्ञानाच्या कबुलीजबाबानंतरच ज्ञानाकडे प्रवास सुरू होतो, नाही का?

अभिप्राय 1

  • Excellent writeup. Greatly enjoyed. Special thanks for pointing out the theme of the cover
    page, I had seen the book many years ago, but had missed the significance completely 🙁
    The author list is indeed impressive.
    Fortunately, the book is available on archive.org – but not for downloading 🙂 One can log in and borrow it for one hour at a time! “Tuka Mhane he hee nase thodake!”.
    Many thanks once again and namaskar

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.