विक्रम आणि वेताळ – भाग १०

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, ह्या खेपेला बराच उशीर केलास, काय कारण झालं? सोपवलेल्या कामाचा विसर तर पडला नाही ना तुला?”

“छे, छे, चांगलंच लक्षात आहे माझ्या सगळं. परंतु त्यासाठी तू काही कालमर्यादा घालून दिल्याचं मात्र स्मरणात नाही माझ्या. पण असो.”

“आपण बनवलेली ती सांकल्पनिक मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून दाखवल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणाला होतास तू मला!”

“पण काय रे, ती मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून बघण्यापूर्वी वास्तव म्हणजे काय हे नको का आपण समजून घ्यायला?”

“मग सांग ना वास्तव म्हणजे वास्तवात काय असतं?”

“बघ, वास्तव म्हणजे हे भौतिक जग (पदार्थ,वस्तू आणि घटना) असं आपण समजूया. त्यामुळे वास्तव समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या भौतिक जगाचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला भौतिक जगाचं ज्ञान कसं होतं तेही आपण मागे एकदा बघितलं होतं.”

“हो राजन्, आपल्या पंचेंद्रियांद्वारे.”

“ते तर खरं, पण आपल्या पंचेंद्रियांद्वारे आपल्याला फक्त जाणीव होते, त्या जाणिवेतून अर्थ उलगडण्याचं काम आपली बुद्धी करते.
म्हणजे बघ, आपल्याला आपल्या डाव्या डोळ्याने बघितलं तर जे दृश्य दिसतं त्यापेक्षा उजव्या डोळ्याने बघितलं तर थोडं वेगळं दृश्य दिसतं. परन्तु आपली बुद्धी, त्या दोन वेगवेगळ्या दृश्यांना एकत्र करून, दोन ‘द्विमितीय’ दृश्यांची सरमिसळ करून, त्यांतून एकच ‘त्रिमितीय’ अर्थपूर्ण दृश्य अनुमानाने निर्माण करते, आणि त्याद्वारे आपल्याला भोवतालच्या वस्तू, पदार्थ आणि त्यांतील अंतराचं किंवा अवकाशाचंही (space) ज्ञान होतं.”

“पण राजन्, आपल्या भोवतालचं जग, म्हणजेच वास्तव, तर सतत बदलतही असतं.”

“होय, ह्या सतत बदलणाऱ्या भौतिक जगात घडून गेलेल्या घटनांचा आपल्या स्मृतीतील क्रम आणि पुढे घडू घातलेल्या घटनांचं आपल्या बुद्धीने केलेलं अनुमान, ह्याद्वारे आपल्याला काळाचंही (time) ज्ञान होतं.
किंवा असं म्हण की आपली बुद्धी, आपल्या पंचेंद्रियातून होणाऱ्या जाणिवेचा अर्थ लावून, तर्क आणि कल्पनाशक्तीचा वापर करून, आपल्या भोवतालचं जग वास्तवात कसं आहे ह्याची स्थलकालसापेक्ष (time and space) प्रतिमा आपल्या मनात तयार करते.”

” म्हणजे काहीशी Google Maps सारखी म्हणतोयस का राजन्?
पण जर आपल्या भोवतालचं भौतिक जग किंवा वास्तव कसं आहे ह्याची आपण केवळ कल्पनाच करू शकत असलो तर वास्तवाची ती आपली प्रत्येकाची काल्पनिक प्रतिमा वेगवेगळीच असणार, नाही का?”

“हो, अतिशय थोड्या प्रत्यक्ष अनुभवांवरून आपण आपली वास्तवाविषयीची काल्पनिक प्रतिमा बनवत असतो, आपल्या प्रत्येकाच्या मनातील वास्तवाची ही कल्पनिक प्रतिमा सतत बदलणाऱ्या वास्तवाप्रमाणे, त्याच्याशी सुसंगत ठेवण्यासाठी, आपल्याला सतत बदलत राहावी लागते, तू म्हणतोस तशी, Google Maps सारखी. आणि गंमत अशी, की ती जर आपण वास्तवाशी पुरेशी सुसंगत ठेवू शकलो तर मग आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रतिमा जरी वेगवेगळ्या असल्या तरीही त्या सर्व प्रतिमा एकमेकींशी जुळतात, किंवा असं म्हण की वास्तव काय आहे ह्याबाबतीत सर्वांचं एकमत होऊ शकतं.”

“पण मग राजन्, वास्तवाविषयीची आपली ही काल्पनिक प्रतिमा, बदलणाऱ्या वास्तवाशी सुसंगत कशी ठेवायची?”

“अर्थातच स्थलकालानुरूप. घडलेल्या घटनांची नोंद घेऊन आपण आपल्या भौतिक जगाच्या प्रतिमेला सतत अद्ययावत करू शकतो.”

“ठीक आहे, हे झालं भूतकाळाबद्दल, पण तू असंही म्हणाला होतास की वर्तमानकाळ असा काही नसतोच. आपण एकतर गतस्मृतींमध्ये किंवा भविष्याच्या पूर्वानुमानातच जगत असतो आणि आपल्याला गतस्मृतींत रममाण होऊन फारसा फायदा नसतो, भविष्याच्या पूर्वानुमानाच्या अचूकतेवर मात्र आपलं जीवनमरण अवलंबून असतं. म्हणजे, भविष्यातील भौतिक जग किंवा वास्तव कसे असेल ह्याच्या पूर्वानुमानावर आपलं जीवनमरण अवलंबून असतं असंच म्हणायचं आहे ना तुला? पण मग भविष्यातील न अनुभवलेल्या वास्तवाशी किंवा भविष्यात भौतिक जगात घडू घातलेल्या घटनांशी आपल्या मनातील प्रतिमेला आपण सुसंगत कसं करणार?”

“हे बघ, आतापर्यंत आपण दृश्य वास्तवाची किंवा भौतिक जगाची चर्चा केली परंतु भविष्यात भौतिक जगात घडू घातलेल्या घटनांचं अनुमान करण्यासाठी आपल्याला थोडं अदृश्य वास्तवही जाणून घ्यावं लागेल.”

“हे तू माझ्याबद्दल बोलतोयस की काय राजन्?”

“नाही रे बाबा, तू कोण हे तू विसरला असशील कदाचित, पण हे मी विसरलेलो नाही, पूर्ण ओळखून आहे मी तुला.”

“सांग बरं मग मी कोण आहे ते.”

“सांगू कशाला, तूच बघून घे ह्या link ला click करून, (विक्रम आणि वेताळ, एप्रिल २०१३), मग आठवेल तुला सगळं. पण ते असो.
आपण अदृश्य भौतिक जगाबद्दल बोलतोय, तुझ्याविषयी नाही. तर दृश्य भौतिक जगात कोणतीही घटना घडण्यामागे अदृश्य कार्यकारणसंबंध किंवा निसर्गनियम कार्यरत असतात.”

“राजन्, चुकतोयस तू थोडा, दृश्य/अदृश्य म्हणण्यापेक्षा मूर्त/अमूर्त म्हणायचं असावं बहुतेक तुला.”

“हां, बरोबर, पण अमूर्त गोष्टी अदृश्यही असणारच ना?”

“तू पारलौकिक गोष्टींबद्दल बोलतो आहेस की काय राजन्?”

“नाही, आणि तसंही पारलौकिक असं काही असू शकत नाही, आपण ज्याला पारलौकिक समजतो ते केवळ काल्पनिक असतं. पण मी त्याबद्दलही बोलत नाही आहे.
हे जे जड वस्तू आणि पदार्थापासून बनलेलं भौतिक जग आहे ते तर मूर्त आहे आणि आपल्या पंचेंद्रियांद्वारे आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, परंतु आपल्या बुद्धिद्वारे आपण ह्या वस्तू आणि पदार्थांचे अमूर्त गुणधर्म वेगळे ओळखू शकतो, आणि त्या गुणधर्मांतील साम्य आणि वेगळेपणही जाणून घेऊ शकतो.
तसेच विश्वात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून, त्यांमागील निरपवाद एकविधता (uniformity), सार्विक (universal) निसर्गनियम किंवा कार्यकारण संबंध आपण शोधून काढू शकतो. या एकविधता शोधून काढणं सोपं नसतं, आणि विज्ञानाला ज्या एकविधता सापडल्या आहेत त्या प्राप्त होण्याकरता कित्येक शतकांतील हजारो वैज्ञानिकांचे संघटित प्रयत्न कारणीभूत झाले आहेत.
परंतु अशा एकविधता, निसर्गनियम किंवा कार्यकारण संबंध एकदा सापडले की त्यांचा उपयोग करून भविष्यात काय घडणार ह्याचे अनुमान आपण करू शकतो.”

“OK, म्हणजे आकाशात वीज चमकली की मग होणाऱ्या गडगडाटासाठी आपण तयार असतो असेच ना? परंतु राजन् ह्या विश्वात इतक्या व्यामिश्र घटना घडत असतात त्या सगळ्यांचे अचूक भविष्य वर्तवणे शक्य आहे का?”

“अर्थातच नाही, परंतु आपण केलेले अनुमान बरोबर आले की नाही ह्याचा पडताळा सतत घेत राहून, त्यानुसार नियमांबद्दल आणखीन संशोधन करून, आपण आपले अनुमान अचूक येण्याची संभाव्यता मात्र वाढवू शकतो.
परंतु हे सगळं करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे मग बरेचदा आपण ह्यावर शॉर्टकट शोधून काढतो.”

“काय म्हणतोस राजन्?”

“होय, प्रत्यक्षात स्वतः सत्यशोधन करणं हे अत्यंत जिकिरीचं, वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे. ते करणं प्रत्येकाला परवडू शकत नाही. म्हणून मग आपण आपल्या परिचयातील, आपल्या मते, जे जुने जाणते लोक असतील त्यांना विचारून त्यांच्या सल्ल्यावर विसंबून राहतो.
आणि ह्याचाच अतिरेक म्हणजे प्रत्यक्षप्रमाणाच्या भानगडीत न पडता आपण शब्दप्रामाण्य मानू लागतो. विज्ञानाची कास न धरता ज्योतिष्यांच्या कच्छपि लागतो.”

“हो, खरं आहे राजन्.
म्हणजे थोडक्यात, वास्तवात जसे दृश्य भौतिक जग आहे तसेच वस्तू आणि पदार्थांच्या गुणधर्मांचे, आंतरसंबंधांचे, गणिताचे, निसर्गनियमांचे असे एक अदृश्य/अमूर्त विश्व आहे जे भौतिक जगाचे नियमन करते. ह्या अदृश्य/अमूर्त विश्वाला रंग, रूप, रस, गंध काहीही नाही, ते सर्वव्यापी आहे, अनादि-अनंत आहे आणि ते जगन्नियन्ते आहे पण जडभौतिक जगाशी त्याचे अद्वैत आहे. आपण केवळ बुद्धिद्वारे त्याला जडभौतिकापासून वेगळे ओळखू शकतो, आपण त्याचा जितका अभ्यास करू, ते जितकं जास्त जाणून घेऊ तितका आपण भविष्याचा अचूक वेध घेऊन आपल्याला वास्तवाशी सुसंगत ठेवू शकू असंच म्हणणं आहे ना तुझं?”

“होय गोष्टिवेल्हाळा, आपण तत्त्वज्ञानात हेच शिकतो, मूर्त, जडभौतिक वस्तू, पदार्थ, म्हणजेच ‘तत् ‘ आणि त्यांचे अमूर्त गुणधर्म म्हणजेच त्यांचे ‘त्व’, ह्या दोन्हींचं ‘ज्ञान’ म्हणजेच तत्त्वज्ञान.
ह्या ‘तत्’ आणि ‘त्व’ चं जरी अद्वैत असलं तरीही आपण आपल्या नीरक्षीरविवेकाद्वारे त्यांचे विश्लेषण करून कधी मूर्त जगामागचं अमूर्तत्व शोधून काढतो तर कधी अमूर्ताला मूर्तत्वात आणतो.”

“खरंय राजन्, भाषेची निर्मिती ही मनुष्याने अमूर्तातून मूर्तत्वात/वास्तवात आणलेली पहिली गोष्ट असावी. असा आपला, कल्पना आणि वास्तवाचं जाळं विणण्याचा खेळ अखंड सुरू असतो. पण असो.
वास्तव म्हणजे काय हे तर आपण पाहिलं, पण आता तुला तू बनवलेली सांकल्पनिक मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून दाखवायची आहे.”

“हो रे बाबा, सुखदुःखाचंसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात वास्तव आणि कल्पनेतून बनलेलं असंच अजब मिश्रण असतं. ते जर नेमकं जाणून घ्यायचं असेल तर तू म्हणतोस त्यानुसार आपल्याला आपली सांकल्पनिक मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून बघावी लागेल.
आणि त्यासाठी आपल्याला मानवाने अमूर्तातून मूर्तत्वात आणलेल्या आणखीन एका गोष्टीची मदत घ्यावी लागेल.”

“कोणती गोष्ट म्हणतोस राजन्?”

“आपण मागच्या खेपेत त्याविषयी बोललो होतो. विसरलास की काय इतक्यात तू?”

“आता आठवलं राजन्, पैसा हे विनिमयाचं साधन जसं आहे तसंच किंवा त्याहूनही थोडं जास्त महत्त्वाचं म्हणजे तो एक मापदंड आहे, आपल्या अंतरंगातला भाव मोजण्याची ती एक मोजपट्टी आहे. कोणत्या गोष्टीला आपण किती महत्त्व देतो ह्याची. किंवा असं म्हणू की कोणती सुखदायक वस्तू किंवा सेवा आपल्याला किती हवीहवीशी वाटते ते ठरवण्याची, आपल्याला ती घेणं परवडतं की नाही ते ठरवण्याची.”

“बरोबर, आपण गेल्याखेपेत म्हटल्याप्रमाणे वस्तू आणि सेवा ह्यांच्या उपभोगातून आपल्याला सुख मिळते असे आपण समजतो, त्या वस्तू आणि सेवा तर भौतिक/वास्तव आहेत. त्या आपल्याला पैशाच्या मोबदल्यात मिळू शकतात. आणि तू केलेल्या वैयक्तिक सुखाच्या व्याख्येनुसार, प्रत्येक व्यक्तीने जो काही अग्रक्रम ‘स्वतःहोऊन’ निवडला असेल त्यानुसार ज्या गोष्टीस प्राधान्य दिले असेल त्या गोष्टीत त्या व्यक्तीला सुख असते. त्यामुळे, आपण निवडलेल्या अग्रक्रमानुसार, वस्तू आणि सेवा विकत घेऊन सुख मिळवू शकण्याची क्षमता आपल्या उत्पन्नावरून आपण ठरवू शकतो.”

“राजन्, पण खरंतर आपलं सुखदुःख हे खूप वेगवेगळ्या कारणांवर अवलंबून असतं. त्यात केवळ आर्थिकच नाही, तर कौटुंबिक, सामाजिक, नैसर्गिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, राजकीय असा पूर्ण वर्णपट असतो. एका बाबतीत सुखी असलेली व्यक्ती दुसऱ्या बाबतीत दुःखी असू शकते आणि तिसऱ्या एखाद्या बाबतीत निर्विकारही असू शकते.”

“खरं आहे, पण तू तो श्लोक ऐकला असशील ना?
लक्ष्मित्वयालंकृतमानवा ये
पापैर्विमुक्ता नृपलोकमान्याः,
गुणैर्विहीना गुणिनो भवन्ति
विशीलिनः शीलवतां वरिष्ठाः.
थोडक्यात, आपल्या बर्‍याचश्या उणेपणांवर, अडचणींवर, दुःखांवर आपण पैशाच्या साहाय्याने मात करू शकतो.”

“म्हणजे ‘The whole thing is that के भैय्या . . .”

“… सबसे बडा रुपैया’, त्यामुळे आपल्या सामाजिक संदर्भातही सुखाचा निकष आर्थिक ऐपत हाच आहे.
परंतु सुख हे आपल्या मानण्यावरही अवलंबून आहे, जे आपण गेल्याखेपेत केलेल्या आपल्या सांकल्पनिक मापदंडानुसार ठरवू शकतो.
त्यामुळे काल्पनिक आणि वास्तविक सुखदुःख जुळवून बघण्यासाठी आपल्याला केवळ एक मापदंड पुरेसा नाही तर आपल्याला त्याचा आलेख काढावा लागेल. त्यासाठी आपण एक प्रयोग करून बघू. तसा आलेख बनवण्यासाठी आपण सुखदुःखाच्या सांकल्पनिक मापदंडाला x axis बनवू. आणि y axis ला ऐपतीचा मापदंड बनवून बघू.”

“परंतु राजन् एक लक्षात घे, वास्तव हे सतत बदलत असते, त्यामुळे तुझा हा ऐपतीचा y axis गतिमान म्हणजेच dynamic असायला हवा. बदलणार्‍या परिस्थितीनुसार त्यात बदल होईल असं त्याचं इयत्तीकरण calibration तुला करावं लागेल.”

“होय, बरोबर आहे, त्यासाठी y axis ला आपण साधारण तीन ठोकळ भागांत विभागूया.
१) सगळ्यात खालच्या भागात शून्य ऐपत ते आपल्याला आपल्या मूलभूत गरजा (needs) भागवण्यासाठी लागणारे किमान उत्पन्न ठेवू.
२) त्यावर, आपल्याला आपल्या मूलभूत आणि आवश्यक अश्या दोन्हीं गरजा (needs and wants) भागवण्याइतकी ऐपत ठेवू. आणि,
३) त्याच्याहीवर मूलभूत गरजा, आवश्यक गरजा तसेच इच्छाआकांक्षा (needs, wants and desires) भागवण्याइतकी ऐपत ठेवू.”

“आणि राजन्, वरच्या टोकाला काय ठेवणार?”

“देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची ऐपत.”

“OK, म्हणजे ज्याच्याजवळ पोटाची खळगी भरण्याचीदेखील ऐपत नाही तो वास्तवात सर्वात दुःखी माणूस समजावा लागेल. आणि म्हणून शून्य ऐपत खालच्या टोकाला, –10 वर.
आणि वरच्या टोकाला, +10 वर, देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीची ऐपत, कारण सुखकारक वस्तू आणि सेवा विकत घेण्याची त्याची क्षमता सर्वोच्च असणार.”

“होय, आता बघ, तू म्हणालास त्यानुसार आपला y axis गतिमान झाला आहे. म्हणजे, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची तसेच आपण केलेल्या त्या तीनही भागातील ऐपत वास्तवातील परिस्थितीनुसार बदलत जाणार.:”

“बरोबर आहे राजन्, पण मग तू शून्य कुठे ठेवणार?”

“हां, आता हा मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ह्याचे चारपाच पर्याय असू शकतात.
पहिला पर्याय म्हणजे, सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या ऐपतीच्या अर्ध्यावर शून्य ठेवणे. पण ते फारसे सयुक्तिक होणार नाही.
दुसरा पर्याय म्हणजे,
(i) शून्यावर असे उत्पन्न ठेवणे, ज्यायोगे देशातील अर्ध्या लोकसंख्येची ऐपत त्याहून कमी असेल आणि अर्ध्या लोकसंख्येची ऐपत त्याहून जास्त असेल (median). किंवा
(ii) शून्यावर देशाचे सरासरी (mean) उत्पन्न ठेवणे. किंवा
(iii) देशात सर्वात जास्त लोकांचे जे उत्पन्न असेल (mode) तिथे शून्य ठेवणे.
तिसरा पर्याय म्हणजे, शून्यावर आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी लागणारे किमान उत्पन्न ठेवणे. कारण तिथे, म्हणजे शून्यावर, सुखकारक वस्तू आणि सेवा विकत घेण्याची ऐपत शून्य असणार. कारण केलेली सर्व कमाई केवळ मूलभूत गरजांची परिपूर्ती करण्यातच खर्च होणार.”

“परंतु राजन्, मूलभूत गरजा आणि आवश्यक गरजा ह्या दोन्हींची परिपूर्ती झाल्यानंतरच आपापल्या प्राधान्यक्रमानुसार सुखकारक वस्तू व सेवा विकत घेता येऊ शकतात त्यामुळे शून्य तिथे असायला हवे नाही का?”

“होय, तो आपला चौथा पर्याय. परंतु, आपण गेल्याखेपेत बघितल्याप्रमाणे, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या, आवश्यक कोणत्या आणि इच्छाआकांक्षा कोणत्या ह्याचा अग्रक्रम ठरवण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य व्यक्तिगत प्रत्येकाला आहे. त्यामुळे खरंतर प्रत्येक व्यक्तीसाठी शून्य वेगळ्या ठिकाणी असणार. हा झाला आपला पाचवा आणि सर्वात योग्य पर्याय.”

“बरोबर आहे राजन्.”

“आता आपण ह्या y axis वरील शून्यावर आपल्या सांकल्पनिक मोजपट्टीचे x axis चे शून्य ठेवू. अशाप्रकारे आपला x y axis चा आलेख, graph तयार झाला.
ह्याच्या y axis वर आता प्रत्येक व्यक्तीचे प्रत्यक्ष उत्पन्न ठेवायचे आणि x axis वर त्या व्यक्तीच्या कल्पनेनुसार ती सुखदुःखाच्या ज्या इयत्तेत असेल ती.
अशा प्रकारे आपल्या आलेखावर व्यक्तीचे काल्पनिक सुखदुःख आणि त्याला निदान काही अंशी तरी कारणीभूत असलेली वास्तविक परिस्थिती, असे दोन बिंदू तर निश्चित झाले.”

“अच्छा, म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीचा सुखाचा आलेख तयार करण्यासाठी आपल्याला तीन प्रश्न विचारात घ्यावे लागतील.
१) ती व्यक्ती स्वतःला सुखदुःखाच्या सांकल्पनिक मापदंडावरील कुठल्या इयत्तेत समजते?
२) त्या व्यक्तीला तिच्या मूलभूत आणि आवश्यक गरजा पूर्ण होण्यासाठी किती ऐपत असावी असे वाटते? (ह्यावरून आपल्याला y axis वर शून्य कुठे ठेवायचे ते कळेल.)
३) त्या व्यक्तीची प्रत्यक्ष, वास्तवात ऐपत किती आहे?
अशाप्रकारे त्या व्यक्तीच्या आलेखातील x y axis वरील शून्य, आणि सुखदुःखाचे काल्पनिक आणि वास्तविक असे दोन बिंदू निश्चित होतील.”

प्रस्तुत आलेख लेखातील पर्याय समजून घेण्यासाठी दिशादर्शक म्हणून आहे, ती पर्यायांची अचूक मांडणी नाही.

“अगदी बरोबर, आता ते दोन बिंदू, शून्य,आणि आपण यापूर्वी बघितलेले शून्य ठेवण्याचे इतर चार पर्याय ह्यांच्यातील अंतरांनुसार आपल्याला विदाविश्लेषणाद्वारे (data analytics) वेगवेगळे अर्थ/निष्कर्ष काढता येऊ शकतील.

आता तू सांगितल्याप्रमाणे सुखदुःखाची सांकल्पनिक मोजपट्टी वास्तवातील सुखदुःखाशी जुळवून दाखवली बघ.”

“राजन्, तू जुळवून दाखवलीस तर खरी, परंतु त्यांतून काढता येणार्‍या निष्कर्षांविषयी तू काही सांगितले नाहीस.”

“पण मी ती जुळवून दाखवण्याविषयीच फक्त बोललो होतो, त्यांतून काही निष्कर्ष काढून दाखवण्याचा वादा मी कधी केलाच नव्हता.
तेव्हा आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन झालं असल्यामुळे आणि माझ्या मौनाचाही भंग झाला असल्यामुळे मी तर हा निघालो. तुझं काय ते तू बघून घे.
हा, हा, हा!”

क्रमशः

अभिप्राय 3

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.