हरिहर कुंभोजकर ह्यांचा ‘हिरण्यकश्यपूचे मिथक……’ हा लेख आणि निखिल जोशी ह्यांना त्या लेखात सापडलेल्या विसंगती हे दोन्ही ‘आजचा सुधारक’च्या जानेवारीच्या अंकात प्रकाशित झाले होते. “हे एकाच वेळी प्रकाशित झाले ह्याचा अर्थ निखिल जोशी ह्यांना मूळ लेख प्रसिद्धीपूर्वीच उपलब्ध झाला होता” अशी तक्रारवजा मांडणी हरिहर कुंभोजकर ह्यांनी त्यांच्या प्रतिवादात केली आहे. ही त्यांची तक्रार रास्तच आहे. परंतु ह्या विषयावर चर्चा घडवून आणावी ह्या हेतूने जाणूनबुजून केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. ह्यामुळे हरिहर कुंभोजकरांना त्यांच्या लेखात आणखीन स्पष्टता आणण्याची संधी मिळाली हे त्यांनीही त्यांच्या प्रतिवादात मान्य केले आहे.
आजचा सुधारक सध्या दर तीन महिन्यांनी प्रकाशित होत आहे. एखाद्या लेखावर प्रतिक्रिया आणि त्यांचा प्रतिवाद करायचा झाल्यास मधल्या तीन महिन्यांच्या दरम्यान तो मुद्दा शिळा होऊन जातो. ह्यावर उपाय म्हणून आम्ही मूळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया एकत्र प्रकाशित केले. एवढेच नव्हे, तर यानिमित्ताने, एखाद्या लेखावरील प्रतिक्रिया, त्यांचा प्रतिवाद, अशाप्रकारच्या चर्चेसाठी पुढील अंकाच्या प्रकाशनाची वाट न बघता ते येत जातील तसतसे प्रकाशित करण्याचा मानस आहे.
तेव्हा आता प्रकाशित होणाऱ्या कुंभोजकर ह्यांच्या प्रत्युत्तरासोबतच त्यांच्या मूळ लेखावर आलेली आणखी एक प्रतिक्रियाही प्रकाशित करतो आहोत. आजचा सुधारकच्या माध्यमातून अशा वैचारिक चर्चांना योग्य व्यासपीठ मिळते आहे याहून अधिक समाधानकारक काय असणार?
समन्वयक,
आजचा सुधारक