भीक की देणगी?

दि. ९ डिसेंबर रोजी पैठण येथील कार्यक्रमात मा. चंद्रकांत पाटील भाषण करत होते. या भाषणात संत विद्यापीठ सुरू करण्याच्या संदर्भाने पाटील म्हणाले, “शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्याची गरज काय? शाळा सुरू करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना कुणीही अनुदान दिले नाही, तर त्यांनी भीक मागून शाळा चालविल्या” या वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये, समाजामध्ये असंतोष पसरून पाटलांवर चौफेर टीका सुरू झाली होती. ‘भीक’ या एका शब्दामुळे टीका सुरू झाली होती. “या महापुरुषांनी वर्गणी मागून, देणग्या गोळा करून शाळा चालविल्या” असे म्हटले असते तर हा वाद सुरू झाला नसता; पण त्यांनी जाहीरपणे ‘भीक’ हा शब्द वापरला. कदाचित त्यामुळेच टीका झाली; अन्यथा खाजगीत जाणूनबुजून असं म्हणून हिणवणारे अनेकजण समाजात भेटतातच.

कुणी असेही म्हणेल की “भीक किंवा देणगी”, क्रिया तर एकच आहे. यात एका व्यक्तीने दुसऱ्याला आर्थिक, वस्तूरूपी किंवा इतर मार्गाने मदत केलेली असते. या शब्दांमधून अभिप्रेत असलेली क्रिया जरी एक असली; तरी त्या शब्दांमधील भावार्थ वेगवेगळा आहे. तो अर्थ-भावार्थ समाजात रूढ झालेला आहे. ‘भिके’त तुच्छता, अपमानजनक भाव दिसतो; तर ‘देणगी’त परोपकार, सन्मान दिसतो. त्यामुळे मा. चंद्रकांत पाटलांचे विधान या महापुरुषांप्रति तुच्छता, अपमानजनक भाव दर्शवतो का अशी शंका घेतली गेल्याने त्यावर टीका होणे, त्याचा निषेध होणे स्वाभाविक आहे. अशी मदत स्वीकारून समाजोपयोगी कार्य, समाजोद्धार होणार असेल; तर तिथे ‘भीक’ हा शब्दप्रयोग अनुचितच आहे, त्याला समाजमान्यता नाही. मा. चंद्रकांत पाटील ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात आणि ज्या मातृसंस्थेच्या मुशीत तयार झालेले आहेत, त्यांचे दोन उपक्रम मला माहीत आहेत. काही वर्षांपूर्वी मी संघ स्वयंसेवक होतो. तेव्हा संघाची शिबिरे भरवली जात होती. त्याकाळी आयोजन समितीतील कार्यकर्ते गावात जाऊन काही घरांमधून २-३ पोळ्या (चपात्या) गोळा करून आणत असत. बाकी अन्न जसे की भात, डाळ, भाजी इ. शिबिरस्थळी बनवले जात असे. या पोळ्या मागणे किंवा घरातून देणे यात कुठेही तुच्छता किंवा अपमानजनक भाव नसे. मी स्वतःदेखील त्या गोळा केल्यात, तसेच माझ्या घरातूनसुद्धा त्या दिल्या गेलेल्या आहेत. म्हणून २-३ पोळ्यांची भीक मागितली किंवा भीक दिली असे आजपर्यंत कुणी म्हटलेले ऐकिवात नाही. वास्तविक “अशी शिबिरे खरेच किती समाजोपयोगी आहेत?” यावर स्वतंत्र खल होऊ शकतो. पण; तरीसुद्धा तिथे ‘भीक’ हा शब्दप्रयोग कधीही झालेला नाही. पाटीलसाहेब कदाचित विसरले असतील की भाजप आणि संघ पुरस्कृत ‘राम मंदिर अभियान’ देशभर जोरात राबवले गेले होते. तेव्हा गावागावांतून मंदिरनिर्माण कार्यासाठी एक एक वीट गोळा केली. त्याला बरीच वर्षे झाली. पुन्हा गेल्या वर्षी मंदिरनिर्माण कार्यासाठी किमान १० रुपयांपासून पुढे इच्छेप्रमाणे रक्कम गोळा केली गेली. याठिकाणीसुद्धा संघपरिवाराबाहेरील व्यक्तीने “राम मंदिर निर्माणाकरता भीक गोळा केली” असे म्हटलेले नाही. वास्तविक “मंदिरामुळे भिकारीच निर्माण होतात” हे वास्तव दर्शवणारे प्रसिद्ध वाक्य असले; तरी राममंदिर अभियानात आर्थिक उलाढालीला कुणी ‘भीक’ हा शब्दप्रयोग वापरलेला नाही. 

चंद्रकांतदादांना भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले कदाचित प्रातःस्मरणीय नसतील; पण टिळकांना, आगरकरांना तरी ते जाहीरपणे नाकारू शकत नाहीत. न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, एकूणच डेक्कन एज्युकेशन सोसायटी उभारण्यात टिळक-आगरकर या द्वयीचे परिश्रम व योगदान सर्वश्रुत आहे. सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूल सरकारी मदत न घेता चालवली जात होती. परंतु जेव्हा शाळेचा पसारा वाढवण्याचे ठरले, तसेच कॉलेज काढायचे ठरले तेव्हा सरकारचे अनुदान घेतल्याशिवाय शाळेचा पसारा वाढवणे आणि विशेषतः कॉलेज काढणे शक्य नव्हते. परक्या सरकारचे मिंधेपण स्वीकारायचे की नाही यावर बरीच भवती न भवती होऊन अखेर सरकारचे साहाय्य घेण्याचे संस्थापकांनी ठरवले. तसेच नव्याने सुरू होणाऱ्या कॉलेजला गव्हर्नर जेम्स फर्ग्युसनचे नाव देण्याचे ठरल्यामुळे अनेक प्रश्न सोडवणे सोपे झाले. २ जानेवारी १८८५ रोजी प्राचार्य वर्डस्वर्थ यांच्या हस्ते ‘फर्ग्युसन कॉलेज’चे उद्घाटन करण्यात आले. फर्ग्युसन ‘साहेबा’ने कॉलेजसाठी आणि शाळेसाठी शनिवारवाड्याची जागा देण्याचे कबूल केले, पण पुण्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे शनिवारवाड्याऐवजी बुधवारबागेची आणि फरासखान्याची जागा देण्याचे सरकारने मान्य केले. शाळेच्या आणि कॉलेजच्या इमारतीची कोनशिला बसवली ती गव्हर्नर फर्ग्युसनने ५ मार्च १८८५ रोजी. बांधकामाचा एकूण खर्च दीड लाख रुपये येईल असा अंदाज होता. मूर आणि रीव्हज् या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे ठिकठिकाणच्या संस्थानिकांनी सत्तर हजार रुपये देणगीदाखल दिले. मुधोळ, मिरज, कोल्हापूर या संस्थानांतर्फे प्रत्येकी दहा हजार रुपये मिळाले. शिवाय आबासाहेब घाटग्यांनी व्यक्तिशः साडेपाच हजारांची देणगी दिली. मुंबई सरकारही खर्चाचा वाटा उचलण्यास तयार झाले. रानडे, तेलंग आणि हरी रावजी चिपळूणकर यांनी प्रत्येकी एक हजार रुपये दिले. एवढी मोठी रक्कम देणगीरूपाने गोळा झाली (संदर्भ: आगरकर – य. दि. फडके). शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातील हा इतिहास कसा विसरून चालेल. इथे या देणगीला कुणी भीक म्हणायला धजावेल का? 

मा. चंद्रकांत पाटील जबाबदार नेते आहेत, विद्यमान सरकारमध्ये शिक्षणमंत्री आहेत. त्यांना माहीत असेलच की ज्या पायाभूत सोयी-सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाकडे आहे, त्यापैकी एक ‘शिक्षण’ आहे. त्यामुळे असे उद्गार त्यांना शोभत नाहीत. शिवाय घरपट्टीपासून इमारत बांधकाम खर्चासह अनेक शासकीय उत्पन्नात ‘शिक्षण अधिभार’ वसूल केला जातो, मग तो कशासाठी? “शासन भिकेला लागले आहे का?” असे कुणी नागरिकाने म्हणणे जितके बेजबाबदार ठरेल तितकेच बेजबाबदार हे वक्तव्य आहे. शालेय पोषक आहार, शालेय माध्याह्न भोजन इ.सारख्या योजनांमधील अनियमितता आणि भ्रष्टाचार थांबलेला नाही. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची गणना प्रामाणिकपणे होत नाही, शिवाय दरवर्षी त्यात भरच पडते. शिक्षणासारख्या मूलभूत बाबीत शासकीय स्तरावर पराकोटीची उदासीनता असल्याने हे दृश्य दिसते. शिवाय भारतासारख्या खंडप्राय देशात सर्वच क्षेत्रात टोकाची विषमता आहे. तरीही अशी विधाने होत असतील तर ते भविष्यासाठी हिताचे नाही. शिक्षणासारखी मूलभूत सुविधा आणि त्यासाठीचे प्रयत्न चेष्टेचा विषय होऊ नये. याबाबत सर्व स्तरावर गांभीर्याने विचार होत राहणे गरजेचे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.