कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग

कृत्रिम बुद्धिमत्ता, औद्योगिक विकास आणि निरूपयोगी समाजाचे वरदान

जोपर्यंत समाजातील सर्वांत वरच्या कुलीन वर्गाच्या हितसंबंधांना बाधा येत नाही, तोपर्यंत ती घटना चर्चेच्या केंद्रस्थानी येत नसते. कुलीन वर्गाचा विकास म्हणजे संपूर्ण समाजाचा विकास आणि कुलीन वर्गाचे नुकसान म्हणजे ते सर्व समाजाचे नुकसान, अशी एक धारणा जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेली आहे. कुलीन वर्गातील एका व्यक्तीवरील संकट हे संपूर्ण देशावरील संकट असल्यासारखा प्रचार केला जातो. आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचे परिणाम याविषयी चर्चा करण्यापूर्वी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कुलीन वर्गाचे हितसंबंध धोक्यात येण्याची शक्यता दिसत नव्हती, तोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) विकास आणि वापर सरळसोटपणे सुरू होता. एआयचा उपयोग करून जगाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘आधार’ आणि तत्सम उपाययोजना करून, पेगासिसचा नागरी समाजात वापर करून जनतेचे स्वातंत्र्य संकुचित करण्यात आले. हे सर्व घडत असताना कुलीन वर्ग उघड्या डोळ्यांनी पाहात होता. आतापर्यंत हा वर्ग एआयचे सर्व प्रकारचे लाभ घेत राहिला. पण आता एआयच्या नवीन अवताराने कुलीन वर्गाच्या बौद्धिक क्षमतेपुढेच आव्हान उभे केले आहे. त्यांची जैविक-बौद्धिक मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. कृत्रिम सामान्य बुद्धिमत्तेचे (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स – एजीआय) पहिले संशोधन चॅटजीपीटी, जीपीटी-४, अ‍ॅपल व्हिजन प्रो, मेटा क्वेस्ट थ्री आदींचा प्रसार करण्यात आल्यामुळे कुलीन वर्गाचेही अस्तित्व संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एजीआयचा भस्मासूर कुलीन वर्गालाही गिळंकृत करण्याची शक्यता दिसू लागताच सर्वांना कंठ फुटला आहे.

मानवी बुद्धीमधील न्यूरॉन्सच्या धर्तीवर एआयसाठी न्यूरल नेटवर्कचे संशोधन विकसित करणारे डॉ. जेओफ्री हिंटन यांनी एआयच्या भस्मासुराचा उल्लेख करून गूगलचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे एक कारण त्यांचे वृद्धत्वदेखील आहे. त्यांनी ज्या गूगलचा राजीनामा दिला, त्या गूगलने, २०१२ पासून विज्ञानाच्या नावाखाली रे कुर्झवेल यांच्या छद्मविज्ञानाच्या संशोधनाला कोट्यवधी डॉलर्सचा पुरवठा केला आहे. त्यावेळीही डॉ. हिंटन गूगलमध्ये कार्यरत होते. आता एआयच्या भस्मासुराबाबतही असाच प्रकार सुरू आहे. ‘विक एआय’ने (अशक्त कृत्रिम बुद्धिमत्ता) कुलीन वर्गाची भरभराट घडवून आणली. एआयच्या क्षमतांवरून एआय संशोधनाचे वर्गीकरण केले जाते. पहिल्या टप्प्यातील एआयला ‘विक एआय’ म्हटले जाते. पूर्ण विकसित एआयला ‘स्ट्राँग एआय’ (सशक्त कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हटले जाते. हे स्ट्राँग एआय म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (एजीआय) होय. मानवी मेंदूमध्ये बुद्धिमत्ता आणि जाणीव कार्यरत असते. सध्या एआय तंत्रज्ञानात मेंदूतील बुद्धिमत्तेची कॉपी केली जात आहे. त्यापुढील कृत्रिम जाणीवांचे संशोधन सुरू आहे.

एजीआय म्हणजे मानवी बुद्धीप्रमाणे जाणिवेसह पूर्ण विकसित कृत्रिम बुद्धिमत्ता होय. एआयच्या विकासामध्ये कृत्रिम जाणीवयुक्त एजीआयचे संशोधन गृहीत आहे. मानव अमर होण्यासारख्या संशोधनावर काम करणारे रे कुर्झवेल यांनी २०२९ मध्ये एक कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता (एजीआय) तयार होणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्याप्रमाणे इतर शास्त्रज्ञांचेही एजीआय संशोधनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे ओपनएआय कंपनीचे चॅटजीपीटी व जीपीटी-४, अ‍ॅपलचे अ‍ॅपल व्हिजन प्रो आदी कृत्रिम जाणीवयुक्त प्राथमिक अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. अशी उपयोजने भविष्यात अस्तित्वात येणार असल्याचे लक्षात घेऊन २०१५ मध्ये स्टिफन हॉकिंग यांच्यासह ८०० संशोधक, शास्त्रज्ञ यांनी एआयच्या संशोधनाविषयी भीती व्यक्त करून इशारा दिला होता. त्यावेळी कुलीन वर्गाने त्या ८०० संशोधकांच्या इशार्‍याविषयी अविश्वास दाखविला होता. या लेखाचा हा विषय नसल्याने त्यावर पुन्हा कधी तरी सविस्तर लिहिता येईल. 

आधुनिक एआय तंत्रज्ञान हा मानवी विकासाच्या वाटचालीतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. १९९० च्या दशकापासून, जगभरात आणखी एक दळणवळण क्रांती झाली. कनेक्टिव्हिटी आणि बँडविड्थची वाढती क्षमता असलेल्या मोबाइल फोनच्या वायरलेस कम्युनिकेशनचा प्रस्फोट झाला. दळणवळणाच्या इतिहासातील हे सर्वात जलद पसरणारे तंत्रज्ञान आहे. भारतात इंटरनेटची फोर-जी बँडविड्थ सेवा दिली जाते. आता ऑक्टोबर २०२२ पासून फाईव्ह-जी बँडविड्थ सुरू करण्यात आली आहे. त्यातून वायरलेस कम्युनिकेशनची गती आणखी वाढली आहे. इंटरनेट, वर्ल्ड वाइड वेब आणि वायरलेस कम्युनिकेशन ही पारंपरिक अर्थाने प्रसारमाध्यमे नाहीत. मुळात ती परस्परसंवादाची माध्यमे आहेत. परंतु टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्रे ही जनसंवादाची माध्यमे आणि इतर सर्व प्रकारच्या कम्युनिकेशनमधील सीमा अस्पष्ट होत आहेत. स्पेक्ट्रम आणि बँडविड्थ गुंतवणुकीच्या वेगाने होणार्‍या प्रगतीमुळे व्यवसाय, शहरे आणि वाहतूक, ऊर्जा व युटिलिटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरला जोडले गेले आहे. त्यातून डिजिटल मार्केट प्लेसेस आणि डिजिटल वर्क फोर्सेस ‘इंटरनेट पोकळ करणे’ (हॉलोविंग ऑऊट दि इंटरनेट) शक्य झाले आहे, म्हणजे व्यवसाय आणि लोक जोडले जाऊन उत्पादने व सेवांची देवाणघेवाण करू लागले आहेत. उद्योग-व्यवसायातील तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अर्थव्यवस्थेला गती आली आहे.

उत्पादनवाढीत तंत्रज्ञानाची भूमिका

मानवी संबंध, उत्पादनरचना आणि समाजरचना हे समाजातील तंत्रज्ञानाच्या उपयोगावरून ठरत असतात. आज आधुनिक जगात चौथ्या औद्योगिक क्रांतीतील संगणकीय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव (रोबोटिक्स), बायोजेनेटिक्स, ३डी प्रिंटिंग अशा अनेक तंत्रज्ञानात्मक शाखा विकसित होऊन माणसाचे सर्व आयुष्य नियंत्रित करीत आहेत. मानवाने पहिली औद्योगिक क्रांती म्हणजे कृषीक्रांती केली. कृषीक्रांतीतील अर्थव्यवस्थेत ‘मानवी श्रम’ हे ऊर्जेचे कार्य करीत होते. नफा वाढविण्याकरिता अधिकाधिक जमीन व मानवी श्रम वाढवावे लागत होते. त्यातून उत्पादनात वाढ होत होती. मर्यादित मानवी व पशू-ऊर्जा हा उत्पादनातील मोठा अडथळा होता. यंत्राच्या संशोधनानंतर व निर्मितीनंतर कारखाने स्थापन करण्यात आले. यंत्रामुळे मानवी प्रयत्नांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक उत्पादन होऊ लागले. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला गती मिळाली. यंत्राच्या ऊर्जेची मानवी श्रमाला जोड मिळाली. तसेच यंत्र चालविण्याकरिता नवे रोजगार निर्माण झाले. कृषीक्रांतीनंतर यंत्रांनी अर्थव्यवस्थेला अधिक गती दिली. यंत्रांनी उत्पादन, रोजगार आणि गुंतवणूकदारांचा नफा वाढविला.

अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक विजेते रॉबर्ट एम. सोलो यांनी १९५६ मध्ये ‘ए कॉण्ट्रिब्युशन टू दि थेअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ’ हा शोधनिबंध आणि ऑगस्ट १९५७ मध्ये दुसरा एक निबंध ‘टेक्निकल चेंज अँड दि अग्रेगेट प्रॉडक्शन फंक्शन’ प्रकाशित केला.(१) त्या काळात गुंतवणुकीसाठी बचत करण्याच्या असमर्थतेवर आणि मागणीत वाढ करण्यासाठी काही सरकारी प्रयत्नांतून प्रोत्साहन मिळवून देण्याच्या गरजेवर जॉन केन्सचा शास्त्रीय अर्थशास्त्रीय सिद्धांत जोर देत होता. दुसर्‍या महायुद्धांमुळे जर्मनी व जपान आणि वसाहोत्तर देश जर्जर झाले होते. त्यांच्या पुनर्बांधणीची गरज होती. त्यावेळी सोलो यांनी उत्पादनघटकांमधील निश्चित गुणोत्तर प्रमाणाच्या ‘केन्सीयन’ मान्यतेचा त्याग करून गुणोत्तराच्या विविधतेची ओळख करून दिली. त्यांच्या प्रारूपामध्ये वृद्धीचा आधार म्हणजे एकीकडे भांडवलानुसार कामगारांची भरती आणि दुसरीकडे तंत्रज्ञानात्मक विकास. सोलो तंत्रज्ञानात्मक प्रगतीला दीर्घकालीन विकासाचा मुख्य घटक मानतात. त्यांनी १९०९ ते १९४९ दरम्यान अमेरिकन गैरकृषी क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीच्या निव्वळ उत्पादनात दुप्पट वाढ ही तंत्रज्ञान बदलाच्या आणि भांडवलाच्या वापरामुळे झाल्याचे सांगितले.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे माहिती-संवाद समाजशास्रज्ञ प्रा.मॅन्युअल कॅसल्स सांगतात, की केंड्रीक यांनी समांतर सिद्धांत मांडून तसाच निष्कर्ष काढला आहे. तथापि सोलो यांनी आपल्या मांडणीच्या निष्कर्षाचे विश्लेषण करताना तंत्रज्ञानाच्या बदलाचा परिणाम उत्पादकतेवर झाल्याचे सांगितले. आकडेवारीत सांगायचे झाल्यास उत्पादनवाढ ही तंत्रज्ञान बदलामुळे ८७ टक्के आणि उर्वरित १२ टक्के भांडवलामुळे झाली. त्यांनी दर्शविले की, प्रति तास उत्पादनवाढ अधिक कामगार वाढविल्याने झालेली नसून केवळ थोडेसे भांडवल वाढवल्याने झाली. मात्र ही वाढ इतर मार्गाने येते, ज्याला त्याच्या उत्पादनप्रक्रिया समीकरणात सांख्यिकीय ‘अवशिष्ट’ म्हणून व्यक्त केले जाते. सोलो यांनी ‘अवशिष्ट’ म्हणून मांडणी केलेल्या शोधानंतर दोन दशकांत उत्पादन वाढीवरील बहुतेक अर्थशास्त्रज्ञांनी कार्य केले आहे.(२) पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर मार्क्सने उत्पादन प्रक्रियेत संचित श्रम, भांडवल, यंत्रे वस्तुमान यांचा उत्पादनसाधने म्हणून समावेश केला आहे. याशिवाय त्याने उत्पादनवाढीत नफा मिळविण्याचे उद्दिष्ट(३) ही प्रमुख प्रेरणा मानली आहे. तसेच यंत्रामुळे वाढणारे प्रचंड उत्पादन लक्षात घेतले आहे. तर सोलो, केंड्रीक, रिचर्ड नेल्सन यांनी तंत्रज्ञानात्मक बदल हादेखील उत्पादनवाढीचा प्रमुख घटक असल्याचे सांगितले. नेल्सन यांनी तंत्रज्ञानात्मक बदल हा उत्पादनवाढीतील प्रमुख घटक असल्याच्या प्रमेयावर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला आहे. १९४० नंतर संगणकयुगाचा उदय झालेला आहे. त्यामध्ये संगणक हा प्रमुख घटक समाजाच्या सर्वच क्षेत्रांत प्रभावशाली ठरला आहे.

आर्थिक मंदीतून सुटका

१९६० च्या दशकात द्वितीय महायुद्धाने जर्जर झालेल्या युरोप व जपानी अर्थव्यवस्थांची पुनर्निर्मिती सुरू होती. परंतु १९७० चे दशक येता-येता अमेरिकन अर्थव्यवस्थेला उभारी देणारा ऑटोमोबाईल उद्योग दीर्घ मुदतीच्या सरळ पुनरुत्पादनात बुडाला. अमेरिकी वर्चस्व कमी होऊ लागताच जागतिक अर्थव्यवस्थेत तीव्र स्पर्धा निर्माण झाली. त्याचा फटका अमेरिकेला बसला. १९७४-७५ मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेने एका पूर्ण विकसित संस्थात्मक संकटात प्रवेश केला, ज्यामुळे दीर्घ मुदतीच्या आर्थिक तेजीला लगाम लागला आणि दशकांपासून वाढत जात असलेल्या कुंठिततेचे संकेत मिळाले. भांडवलसंचयाच्या कमकुवत परिस्थितीत अमेरिकन अर्थव्यवस्थेचा वास्तविक विकासदर सतत घसरणीला दिसत होता. तो १९७० च्या दशकात १९६० च्या दशकापेक्षा कमी होता, १९८० व १९९० च्या दशकात १९७० च्या दशकापेक्षा कमी होता.(४) या परिस्थितीकडे आर्थिक विश्लेषक हॅरी मॅगडॉफ व पॉल स्विजी यांनी लक्ष वेधले होते. त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याकरिता अमेरिकन सरकारला हातपाय हलविणे आवश्यक होते. याच काळात अमेरिकन डिफेन्स अ‍ॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला. १९६९ मध्ये अमेरिकन लष्कराने इंटरनेटचा शोध लावला. त्यानंतर १९९० मध्ये इंटरनेटच्या खासगीकरणानंतर टेलिकम्युनिकेशनच्या ट्रान्समिशन क्षमतेमध्ये वाढ झाली. १९९० मध्ये टीम बर्नर-ली यांनी वर्ल्ड वाईड वेबची (www) निर्मिती केल्यानंतर यंत्रे एकमेकांशी व मानवाशी बोलू शकतील, असे एक नवीन युग आले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे संशोधन

१९५६ च्या डार्थमाऊथ कॉन्फरन्समध्ये ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’ संकल्पनेचा जन्म झाला. या परिषदेचे आयोजक डार्थमाऊथ कॉलेजचे संगणकतज्ज्ञ जॉन मेकार्थी यांनी १९७३ मध्ये ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’ या संकल्पनेची व्याख्या केली. त्यात मॅकर्थी म्हणतात, की कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय़) एक विज्ञान आहे; ते जटिल परिस्थितीत समस्या सोडविणे आणि उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास आहे. २००७ मध्ये मॅकर्थी यांनी ‘व्हॉट ईज आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’ हा शोधनिबंध सादर केला. जॉन मॅकर्थी यांनी एआयबाबत संकल्पना विकसित केल्या. एआयमध्ये माहिती, आवाज, छायाचित्रे, चलचित्रे व तर्कावर प्रक्रिया केले जाते. तसेच मानवी स्वभाव, इच्छा, आकांक्षा, भावना, कृती, आजाराची लक्षणे, खरेदीची पद्धती आदी सर्वांचे संकेतीकरण केले जाते. एआयने समाजाच्या वाटचालीचा प्रवाह बदलला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अल्गोरिदम्समुळे डॉक्टर बदलण्याऐवजी एआययुक्त रोगनिदान अ‍ॅप त्यांना सक्षम बनवीत आहे. एआयच्या संशोधनानंतर माहिती तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढीसोबत अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. १९८६ मध्ये भारतात संगणक उपयोगात आणण्यास परवानगी मिळाल्यापासून सर्वसामान्य माणसाला संगणक तंत्रज्ञानाचा परिचय झाला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन आणि सेवा प्राप्त करता येतात. २०१८ मध्ये भारताने ‘नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ घोषित केली आहे. त्यामध्ये नीती आयोगाने एआयचा लाभ करून घेण्याकरिता कोणकोणत्या क्षेत्रात वाव आहे, याची माहिती दिलेली आहे. माहिती तंत्रज्ञानात इंटरनेटच्या वापराने आमचे जग बदलले आहे. आपण कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित समाजाकडे वाटचाल करीत आहोत. आपण पारंपरिक मास मीडियापासून इंटरनेट आणि वायरलेस कम्युनिकेशन केंद्रित कम्युनिकेशन नेटवर्क्सच्या प्रणालीकडे वळल्याने मूलभूत सांस्कृतिक परिवर्तनाच्या स्रोतावर अनेक संप्रेषण पद्धतींचा परिचय आपल्याला झाला आहे. त्यातून व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (आभासी वास्तव) आपल्या वास्तविक जगाचा एक आवश्यक घटक बनत चालली आहे. 

भारतात भांडवलशाहीची पुनर्रचना 

भारतात १९५० ते १९८० या कालावधीत उत्पादनवाढीचा दर ३.५ पर्यंत खाली आला होता. तर २०२०-२१ च्या आर्थिक सर्वेक्षणात वर्षभरात पडलेली निराशेची काळी छाया दिसून आली. भारताचा जीडीपी ७.७ टक्के कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. उत्पादनात पहिली सहामाही १५.७ टक्के घसरण आणि दुसर्‍या सहामाहीत ०.१ टक्क्याची घसरण दिसून आली.(५) आधीच नोटबंदी व जीएसटीने मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर कोव्हिडच्या प्रादुर्भावानंतर मोठा आघात झाला. परिणामी अर्थव्यवस्थेत २०२० च्या पहिल्या तिमाहीत -२१ टक्के (उणे) आणि ७.५ टक्के आकुंचन दिसून आले. याचा अर्थ अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. भांडवलशाही अडचणीत येते तेव्हा आर्थिक धोरणात बदल करीत असते. उत्पादनव्यवस्थेत व संरचनेत बदल करीत असते. आरिष्ट्यातून बाहेर पडण्यासाठी वित्ताच्या प्रवाहाची गती वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.

आरक्षण धोरणामुळे आणि मोठ्या उद्योगांच्या राष्ट्रीयकरणाच्या धोरणामुळे देशातील कुलीन वर्गाचा जीव गुदमरत होता. त्यामुळे या दोन्ही धोरणांविरोधात कुलीन वर्ग सातत्याने मोहिमा चालवीत असतो. १९६० ते १९९० हा काळ कुलीन बंडखोरीचा आहे. कुलीन वर्गाची बंडखोरी १९९० मध्ये फलदायी ठरली. १९९० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाला भारतात प्रवेश देण्यात आला. गॅट करारातून आलेल्या आर्थिक उदारीकरणाद्वारे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. माहिती तंत्रज्ञानाने पैशाला एका देशातून दुसर्‍या देशात अनिर्बंध पद्धतीने पोहोचविणे सुरू केले. त्याकरिता इंटरनेटचा व्यापारी वापर सुरू करण्यात आला. पी.व्ही. नरसिंहराव सरकारने डंकेल प्रस्तावावर सही करून आर्थिक उदारीकरण स्वीकारले. भारताच्या सरकार नियंत्रित भांडवलशाहीचे रूपांतर बाजारू भांडवलशाहीमध्ये करण्यात आले. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पैशांचा अनिर्बंध व्यवहार आणि कुलीन वर्गाला स्वातंत्र्य देण्याकरिता राज्यघटनेतील बहुसंख्य कायदे बदलण्यात आले.

युरोप, अमेरिकेप्रमाणे आर्थिक आरिष्ट्यातून बाहेर पडण्यासाठी, भारतानेदेखील तंत्रज्ञानात्मक व्यावसायिक गरजांनुसार, आर्थिक उदारीकरण स्वीकारले आहे. २०१८ पासून सरकारने नॅसकॉमसोबत काम सुरू केले आहे. नॅसकॉमने संशोधन, प्रतिभा, सहयोग, विश्वस्त आणि समावेशन यावर लक्ष केंद्रित केले आहे. एआय, आयओटी आणि सायबर-सुरक्षेमध्ये ‘इनोव्हेशन हब’ म्हणून भारताला तयार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे. तंत्रज्ञान एक साधन म्हणून चांगली उत्पादने बनविणे, उत्पादनांची क्षमता वाढविणे, नवीन घटक तयार करणे तसेच नवीन उत्पादने व सेवांचा शोध घेणे सुलभ बनविते. हे उत्पादन प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करते. मूल्यसाखळीत कार्यक्षमता आणते आणि कार्यात्मक सुधारणांद्वारे उत्पादकता वाढविते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चालना मिळालेल्या डिजिटल क्रांतीचे श्रेय ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला जाते.

या पार्श्वभूमीवर २०२०-२१ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात डॉ. रॉबर्ट सोलो यांच्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढीच्या सिद्धांताचा संदर्भ देण्यात आहे. त्या सर्वेक्षण अहवालात तंत्रज्ञानाचा अर्थव्यवस्थेत उपयोग करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, योगदान दिलेल्या काही प्रक्रिया संबंधित सुधारणांमध्ये, जसे की ई-संचितच्या माध्यमातून पेपरलेस एक्झिम व्यापारप्रक्रिया सुरू करणे, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने ‘ट्युरंट कस्टम’चे निर्धार मूल्यांकन, मुख्य बंदरांवर स्कॅनर बसविणे, सर्व महत्त्वाच्या बंदरांवर ‘पोर्ट कम्युनिटी सिस्टम १ -एक्स’ची अंमलबजावणी करणे, ट्रोल व ट्रेससाठी सर्व एक्झिम कंटेनरची टॅगिंग, टोल प्लाझा आदीच्या वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी अनिवार्य इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली (एफएएसटीएग) आदी करण्यात येत आहे.

तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढीत हनुमानउडी

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उदय झाल्यापासून, इंटरनेटने जागतिक दळणवळणात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. इंटरनेट हे माहिती निर्मितीमध्ये आणि प्रसारामध्ये प्रचंड वाढीचे माध्यम आहे. ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे बिग डेटा निर्माण होत असतो. तंत्रज्ञानाची प्रगती उद्योगांचा आकार बदलत आहे आणि नवीन उद्योगांच्या उदयास गती देत आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ब्लॉकचेन, क्वांटम कॉम्प्युटिंग, ३-डी प्रिंटिंग, ५-जी कम्युनिकेशन आणि इतर अनेक नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे सर्व उद्योगांमध्ये उत्पादन, पुरवठासाखळी आणि संचालन प्रक्रिया बदलत आहे. त्यातून नवीन उद्योजक तयार होत आहेत. संधी, नवीन नोकर्‍या आणि नवीन सेवांची मागणी वाढत आहे. ही तंत्रज्ञाने स्वयंचलन, पुढच्या पिढीतील संप्रेषण, देयक आणि वाहतूकप्रणाली विकसित करण्यात आघाडीवर आहेत, जे उच्च उत्पादकता आणि आर्थिक वाढ आणण्याचे वचन देतात.(६) त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योगांमध्ये ‘मास प्रॉडक्शन’ (मोठ्या प्रमाणावर उत्पादन) हा मूलमंत्र आहे. या मास प्रॉडक्शनसाठी मोठ्या कंपन्यांची निर्मिती ओघानेच आली. मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन एकाच देशात विकणे शक्य नाही. त्याकरिता इतर देशांमधील ग्राहकांचा शोध घेतला जातो. उत्पादन एका देशात, परंतु त्याची विक्री जगभरातील विविध देशांमध्ये केली जाते. त्यातून एखाद्या देशाच्या सरकारपेक्षाही शक्तिशाली महाकाय आंतर्राष्ट्रीय कंपन्या अस्तित्वात आल्या आहेत. या आंतर्राष्ट्रीय कंपन्यांच्या संचारातून जागतिक अर्थव्यवस्था जन्माला आली आहे. या आंतर्राष्ट्रीय कंपन्यांचा पैशांचा प्रवाह एका देशातून दुसर्‍या देशात निर्वेध होण्याकरिता त्या-त्या देशातील कायदे, नियम, धोरणे आदी बदलविली जात आहेत.

१९९० च्या आर्थिक उदारीकरणापूर्वी १९७५-७६ ते १९८४-८५ मध्ये भारतातील विकासदर ४.३ टक्के होता. या संथगतीने होणार्‍या विकासाला ‘हिंदू ग्रोथ रेट’ नाव देण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या आर्थिक व्यवहारासाठी भारत सरकारने कायदे बदलून कुलीन वर्गाला व्यापार-उद्योगासाठी अनिर्बंध स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानंतर १९९० ते २०१३ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेने विकासदर वाढीचा अनुभव घेतल्याचे दिसते. काँग्रेसच्या कार्यकाळात अस्तित्वात असलेल्या नियोजन आयोगाच्या पंचवार्षिक स्थिर किंमतींवर आधारित वास्तविक जीडीपी वाढीचा दर १९९०-९२ मध्ये ३.२ टक्के, आठव्या पंचवार्षिक योजनेत (१९९२-९७) ६.५ टक्के, नवव्या योजनेत (१९९७-२००२) ५.६ टक्के, दहाव्या योजनेत (२००२-२००७) ७.६ टक्के, अकराव्या योजनेत (२००७-२०१२) ७.८ टक्के, बाराव्या योजनेतील २०१२-२०१४ मध्ये ५.७५ टक्के आणि त्यानंतरच्या २०१४-२०१५ मध्ये ७.५ टक्के होता.(७) विकासदरातील वाढ तंत्रज्ञानाचे उद्योग-व्यापारातील महत्त्व अधोरेखित करणारी आहे. माहिती तंत्रज्ञानाचा भारताच्या विकासात मोठा हातभार लागला आहे. तंत्रज्ञानामुळे सरकारला १९९० च्या आर्थिक अरिष्ट्यातून बाहेर पडणे शक्य झाले आहे.

वस्तुंच्या किंमतीमध्ये घट

मार्क्स म्हणतो की सर्वसाधारण श्रमापेक्षा वरच्या दर्जाचे किंवा जास्त गुंतागुंतीचे श्रम हे जास्त महाग श्रमशक्तीचा व्यय असतात. ही श्रमशक्ती निर्माण करण्यास जास्त काळ लागलेला असतो आणि कष्ट पडलेले असतात. म्हणून अकुशल किंवा साध्या श्रमशक्तीपेक्षा तिचे मूल्य जास्त असते. ही शक्ती जास्त मूल्याची असल्याकारणाने तिचा उपयोग म्हणजे वरच्या दर्जाचे श्रम असतात आणि हे श्रम, अकुशल श्रमापेक्षा तेवढ्याच वेळात त्या प्रमाणात जास्त मूल्य निर्माण करतात.(८) यामध्ये मार्क्सने मानवी श्रमकाळ लांबवून वरकड मूल्य निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर नवीन अर्थव्यवस्था कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे. बुद्धिमान यंत्रामुळे कमी श्रमशक्तीनंतरही उत्पादन क्षमतेत वाढ होते. परिणामी उत्पादित वस्तू स्वस्त किंमतीला उपलब्ध होतात. औद्योगिक अर्थव्यवस्थेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ताधारित अर्थव्यवस्था वस्तूची किंमत घटविते. एक लक्षात येण्याजोगा फरक असा आहे, की ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेत ज्ञानावर आधारित उत्पादने आणि सेवा यांची गुणवत्ता व कार्यक्षमता कालांतराने वाढूनही किंमतीत सतत घसरण होण्याची शक्य असते. आयटीसी हार्डवेअरच्या किंमतीत घसरण आणि त्यांच्या सुधारित क्षमतांमुळे, जे त्यांच्या उत्पादन साखळीतील कार, इंजिन, असेंबली लाईन, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर, आयटीसीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात, त्यांच्या नाविन्यपूर्णतेचा प्रसार व मोठ्या प्रमाणात किंमतीमध्ये घट होण्यास चालना मिळते. तंत्रज्ञानाच्या किंमतीमध्ये घट होऊन त्यावर आधारित इतर मानवी गरजांच्या वस्तूंचे उत्पादन वाढते. उत्पादनवाढ झाल्याने आधीच्या तुलनेत महागाई कमी होऊ लागते. त्यातून रोजगारवाढीला चालना मिळते.

श्रमिकांच्या वेतनात वाढ व सौदा शक्तीत घट

अर्थव्यवस्थेच्या विस्ताराबरोबर कुशल कामगारांची मागणी वाढत राहते. मागणी व पुरवठ्याच्या सिद्धांताप्रमाणे कुशल कामगारांची संख्या कमी असल्याने त्यांच्या वेतनात मोठी वाढ होते. कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित अर्थव्यवस्थेत श्रममात्रेत घट करून त्याची जागा बुद्धिमान यंत्र घेते. त्यातून अतिरिक्त मूल्यनिर्मिती होत असते. बुद्धिमान यंत्र कमी वेळात मानवी श्रमापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाचे उत्पादन न थकता करीत असते. मार्क्सने दिलेल्या सूत्रात, नव्या उत्पादनप्रक्रियेमध्ये बदलत्या भांडवलात घट होऊनही वरकड मूल्यात वाढ होईल. मात्र, बदलत्या भांडवलात घट झाली तरी वरकड मूल्यात घट होत नाही. नवे तंत्रज्ञान उत्पादनखर्चात घट करून, एकीकडे कॉर्पोरेटचा नफा वाढविते तर त्याच वेळी कामगारांच्या सौदाशक्तीवर परिणाम करते. उत्पादनप्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, श्रमिकांची घट होऊन बेरोजगारीमध्ये भर पडत जाते. श्रमबाजारात कामगार मुबलक प्रमाणात उपलब्ध राहतात. परिणामी श्रमिकांची सौदाशक्ती कमी होते. त्यामुळे कारखानदाराला ज्या किंमतीला पाहिजे त्या किंमतीवर सौदा करून श्रम उपलब्ध होतात.

ऑनलाईन व डिजिटल व्यवहारामुळे व्यापार, व्यवसाय अडचणीत

माहिती तंत्रज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था इंटरनेट प्लॅटफॉर्माधारित आहे. या प्लॅटफॉर्माधारित व्यवहारातून नेटवर्क अर्थव्यवस्था आकाराला येत आहे. डिजिटल नेटबँकिंग व्यवहार वाढल्याने त्याचा परिणाम व्यवसाय, व्यापार आणि रोजगारावरही झाला आहे; परंतु सरकारी पातळीवर त्याच्या परिणामांचे मूल्यांकन अद्याप करण्यात आलेले नाही. ओला, उबेर यांच्याकडे एकही टॅक्सी नसतानाही ते जगातील विविध देशांमध्ये प्रवासी व्यवसाय करीत आहेत. स्विगी, झोमॅटो, ओयो या एआय सॉफ्टवेअर अ‍ॅपआधारित कंपन्यांच्या मालकीचे एकही हॉटेल नसताना जागतिक पातळीवर ग्राहकांना सेवा देत आहेत. या अ‍ॅपच्या भरवशावर ओला, उबेरला टॅक्सीव्यवसाय करण्याकरिता प्रवाशांचा शोध घेण्याची गरज राहिलेली नाही. या अ‍ॅपमुळे अनेक हॉटेल्स व टॅक्सीमालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. काही मालकांचा व्यवसाय एकदम वाढला आहे, तर बहुसंख्य लोकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. जे टॅक्सीमालक ओला, उबेरच्या नेटवर्क साखळीमध्ये समाविष्ट नाहीत, त्यांचा व्यवसाय सुरुवातीला काही प्रमाणात कमी झाला. काही कालावधीनंतर तो पूर्णपणे बुडाला.

उबेर कंपनीचा प्रवास मानवचलित टॅक्सीपासून सुरू झाला. तो आता स्वयंचलित (सेल्फ ड्रिव्हन) टॅक्सीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे यापुढे उबेरला व्यवसाय करण्याकरिता भारतीय व्यक्तींच्या टॅक्सींची गरज राहणार नाही. टेस्ला, गूगल, वायम व इतर कंपन्यांमध्ये स्वयंचलित वाहन उत्पादनासाठी स्पर्धा लागली आहे. स्वयंचलित टॅक्सीच नव्हे तर फ्रान्समध्ये बनविलेली पूर्ण स्वयंचलित बस फेब्रुवारी २०१५ पासून ग्रीसमधील शहर त्रिकालाच्या मध्यभागात सेवा देत आहे. यात प्रवासखर्च कमी होत असला तरी इतरांचा व्यवसाय संपुष्टात येत आहे. त्यामुळे त्यांची क्रयशक्ती कमी होऊन गरिबी वाढत आहे. रोजगार घटत असल्याने लोकांच्या हातात पैसा जात नाही. क्रयशक्ती कमी होऊन ग्राहकांअभावी व्यवसाय-उद्योगात मंदी आली आहे.

अर्थव्यवस्थेत मूठभरांचा एकाधिकार

प्लॅटफॉर्माधारित व्यवहारातून नेटवर्क अर्थव्यवस्था आकाराला येत आहे. या नेटवर्कचे नियंत्रक असलेल्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या व्यापार-उद्योगातील वाटा स्वत:कडे ओढत असतात. त्यातून ते लहान उद्योग-व्यापार्‍यांचे अस्तित्व संपुष्टात आणत असतात. तंत्रज्ञानामुळे स्पर्धा संपुष्टात आणणे अधिक सोपे झाले आहे. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष दुकानात जाऊन सामान खरेदीवर बंदी होती. त्या काळात अ‍ॅमेझॉन, अलिबाबा, फ्लिपकार्ट यांचा कोणी स्पर्धक अस्तित्वात नव्हता. तेव्हापासून ऑनलाइन बाजारपेठेने मोठी झेप घेतली आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने ‘रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया’सोबत भारतीय बाजाराचा अभ्यास केला. भारतात २०१९ मध्ये किरकोळ विक्रीचा बाजार ०.७ ट्रिलियन डॉलरपेक्षा कमी होता. तो २०३० पर्यंत १.८ -२.० ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे देशातील या क्षेत्रात पाच मोठ्या किरकोळ व्यावसायिकांचा वाटा २०१९ मध्ये ५ टक्क्यांपेक्षा कमी होता. तो २०३० मध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.(९) हा ऑनलाइन खरेदीमध्ये पडलेला फरक आहे. या अभ्यासात सामान्य लोकांपेक्षा उच्चभ्रूंचा कल ऑनलाइन खरेदीकडे अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये उच्चभ्रू लोकांनी ऑनलाइन संकलकाद्वारे कोविडपूर्वी २९ टक्के व कोविडनंतर ४२ टक्के, कंपनी वेबसाइटवरून कोविडपूर्वी २० टक्के व कोविडनंतर ३० टक्के आणि कॉल (तोंडी मागणी) करून कोविडपूर्वी ५१ टक्के व कोविडनंतर २८ टक्के खरेदी केली.

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन माध्यम एक मजबूत प्रभावशाली माध्यम म्हणून उदयास येणे सुरू आहे. मोबाइल फोनमध्ये, ग्राहकांच्या उत्पन्नाच्या विभागांमध्ये वर्तन वेगळे असते. कोविडनंतर प्रभावशाली पारंपरिक माध्यमांची भूमिका या श्रेणीमध्ये समाजमाध्यमे आणि इतर ऑनलाइन चॅनेल्स प्रबळ प्रभावकार म्हणून उदयास आले आहेत. ग्राहकांसाठी ऑनलाईन सेवांमध्ये वाढ झाली आहे, तर कमी उत्पन्न असलेले ग्राहक अजूनही तोंडी मागणीच्या प्रक्रियेशीच जुळलेले आहेत. मात्र, ते किती काळ थेट खरेदी प्रक्रियेवर अवलंबून राहतील, याचे भविष्य कोणीही सांगू शकत नाही. अ‍ॅमेझॉन, मॅशो, फ्लिपकार्ट, बिग बाजार, स्विगी, उबेर, ओला, ओयो यांसारख्या बाजारपेठेतील मोठ्या खेळाडूंनी किरकोळ व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. मोठ्या खेळाडूंकरिता भारतसरकारने पायघड्या घातल्या आहेत.

रोजगारविहीन विकासाकडे वाटचाल 

२०२२ मध्ये रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रात आणि खासगी क्षेत्रात निर्माण झालेल्या रोजगाराचे आकडे प्रकाशित केले आहेत. या तक्त्यामध्ये(१०) सर्वांत ठळक बाब म्हणजे खासगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्रात रोजगारनिर्मिती होण्याचे प्रमाण आणि नोकर्‍यांची संख्या अधिक आहे. १९९० मध्ये आर्थिक उदारीकरण स्वीकारण्यात आल्यापासून १९९० ते १९९८ सालापर्यंत सार्वजनिक क्षेत्रात रोजगार वाढ झाली. याचा अर्थ तोपर्यंत खासगीकरणाचा वेग मंद होता. त्याचा रोजगारनिर्मितीवर फार फरक पडला नाही. मात्र १९९९-२००० मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये घट दिसून येते. 

सार्वजनिक आणि संघटित खाजगी क्षेत्रातील रोजगार (लाखात)

वर्षसार्वजनिक-क्षेत्र
(मार्च शेवटी)
खाजगी-क्षेत्र
(मार्च शेवटी)
रजिस्टरवर व्यक्तींची संख्या
(डिसेंबर अखेरीस)
२००५-०६१८१.९८८.१३९३.५
२००६-०७१८०.९२.७४१४.७
२००७-०८१७६.७९८.८३९९.७
२००८-०९१७८.१०३.८३९१.१
२००९-१०१७८.६१०८.५३८१.५
२०१०-१११७५.५११४.५३८८.३
२०११-१२१७६.१११९.७४०१.७
२०१२-१३एनएएनए४४७.९
२०१३-१४एनएएनए४६८.
२०१४-१५एनएएनए४८२.६
२०१५-१६एनएएनए४३५.
२०१६-१७एनएएनए४३३.७६
२०१७-१८एनएएनए४२४.४
२०१८-१९एनएएनए४२१.२

खाजगी क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये २००७-०८ ते २०१०-११ या चार वर्षांत घट झाली. पुढे तीन वर्षे वाढ झाल्यानंतर नोटबंदी आणि जीएसटीचा एकूण रोजगारनिर्मितीवर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. २०१४-१५ मध्ये एकूण ४८२.६० दशलक्ष लोकांना नोकर्‍या देण्यात आल्या होत्या. ज्या काळात कोरोना आलेला नव्हता, त्या २०१८-१९ मध्ये सार्वजनिक व संघटित खाजगी क्षेत्रात नोकर्‍या ४२१.२० दशलक्षांपर्यंत घटलेल्या आहेत. लोकसंख्या वाढलेली असताना रोजगारनिर्मितीमध्ये सातत्याने घसरण झालेली आहे. एकीकडे भांडवलदारांची व श्रीमंतांची संपत्ती वाढत असताना इतर लोकांकडे संपत्तीचे संतुलित विकेंद्रीकरण होण्याचे प्रमाण घटलेले आहे. रोजगारविहीन विकासाला सुरुवात झालेली आहे. विकासदर आणि रोजगारवाढीचा दर एकमेकांशी ताळमेळ बसवित नाही. 

जीडीपी आणि रोजगारवाढीचा दर

सकल देशांतर्गत उत्पादन दर रोजगार वाढीचा दर  
वर्षजीडीपीवर्षशहरीग्रामीण
१९६५-६६ ते १९७४-७५४.३१९८२-८३ ते १९८७-८८२.७१.३६
१९७५-७६ ते १९८४-८५४.९१९८७-८८ ते १९९३-९४३.३९२.०३ 
१९८५-८६ ते १९९४-९५६.२१९९३-९४ ते १९९९-००२.२७०.६६
१९९५-९६ ते २००४-०५.१९९९-०० ते २००४-०५३.२२१.९७

एनएसओच्या आकडेवारीवर आधारित या तक्त्यावरून(११) असे लक्षात येते की, जेवढी जीडीपीमध्ये वाढ होते, तेवढीच वाढ रोजगारात होत नाही. उलट रोजगारवाढीचा दर जीडीपी दराच्या निम्मा असतो. याचा अर्थ, देशाचा विकास झाला तर रोजगारातही आपोआप वाढ होते, या गृहितकाला हा तक्ता छेद देत आहे. देशात भांडवली विकास होत आहे; परंतु तो विकास सर्व लोकांपर्यंत झिरपताना दिसत नाही.

२००८ मधील जागतिक मंदीची कोंडी फोडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित उद्योगांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे नवे रोजगार निर्माण झाले आहेत. तंत्रज्ञानामुळे कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढून बहुसंख्य लोकांच्या गरजा पूर्ण होत आहेत. यंत्र आणि तंत्रज्ञानाचे संशोधन मानवी गरजांच्या निर्णायक टप्प्याच्या जवळपास पोहोचले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेव्यतिरिक्त माणसाने स्वत:चा क्लोन तयार केला आहे. मनुष्याने निर्माण केलेली श्रमाची साधने, कृत्रिम बुद्धिमत्ताधिष्ठित तंत्रज्ञान व बुद्धिमान यंत्रे, त्याच्या कर्तृत्वाला संपविण्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहेत; परंतु मानवाला त्याची जाणीव नाही. मानवी श्रमाची जागा बुद्धिमान यंत्रे घेत आहेत. आपण ज्या नव्या युगाची कल्पना करीत आहोत, त्यात मानवी श्रमाचे स्थान कमी-कमी होत चालले आहे. त्यात मानवी भावनांना कोणतेही स्थान नाही. 

२०१६ मधील जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतातील उत्पादनक्षेत्रातील व आयटी उद्योगातील ६९ टक्के नोकर्‍यांना स्वयंचलनाचा धोका आहे. भारताच्या तुलनेत चीनमधील ७७ टक्के नोकर्‍या स्वयंचलनामुळे धोक्यात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(१२) या स्वयंचलनाचा पहिला मार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर बसला आहे. २०१७ मध्ये अमेरिकेतील कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या माहिती तंत्रज्ञान कंपनीन सहा ते दहा हजार कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली होती. ही कंपनी फेसबुकसाठी संहिता नियंत्रक म्हणून काम करते. त्यानंतर ऑक्टोबर-२०२०मध्ये कॉग्निझंटने फेसबुकसाठी संहिता नियंत्रकाचे काम करणार्‍या सुमारे ६,००० कर्मचार्‍यांना नोकरीतून कमी करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी ३,००० कर्मचार्‍यांनी कॉग्निझंट व फेसबुकविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.(१३) कॉग्निझंटच्या टाळेबंदीचा परिणाम भारतातही झाला होता. भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या मुख्यत: अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांसाठी आऊटसोर्सिंगचे काम करीत आहेत. भारतातील रोजगार अमेरिका व जागतिक आस्थापनांवरही अवलंबून आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच प्राध्यापक, पत्रकार, वकील, सीए आदी व्यावसायिक क्षेत्रातील नोकर्‍या संपण्याच्या मार्गावर आहेत.

ऑक्सफर्ड मार्टिन प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी अँड एम्प्लॉयमेंट (२०१३) च्या अभ्यासानुसार, २००० पासून, पूर्वी अस्तित्वात नसलेल्या केवळ ०.५ टक्के नवीन नोकर्‍या निर्माण झाल्या आहेत. तर जी-७ च्या देशांमध्ये पुढील आठ वर्षांत १७३ दशलक्ष नोकर्‍या स्वयंचलित होईल. एमआयटीचे अर्थशास्त्रज्ञ डॅरॉन असेमोग्लू आणि पास्कुअल रेस्ट्रेपो (२०१८) यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन अँड वर्क’ या शोधनिबंधात प्रत्येक रोबोटने प्रति १००० कामगारांची वेतन पातळी ०.२५-०.५० टक्क्यांनी कमी केल्याचे सांगितले. शिवाय, जागतिक स्तरावर ७०२ व्यवसायांचे परीक्षण केल्यानंतर, ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलमधील अर्थशास्त्रज्ञ कार्ल बेनेडिक्ट फ्रे आणि मशीन लर्निंग तज्ज्ञ मायकेल ऑस्बोर्न (२०१३) यांनी, भारताकडे ६५ टक्के जागतिक आयटी ऑफ-शोअर कामे आणि ४० टक्के जागतिक व्यवसाय प्रक्रिया असताना, तेथे २०३० पर्यंत औपचारिक रोजगारामध्ये ६९ टक्के नोकर्‍या स्वयंचलित होणार असल्याचे म्हटले आहे.(१४) आगामी काळात स्वयंचलित कार, ट्रक्स, लॉरीज्, बसेस रस्त्यावर धावणार आहेत. स्वयंचलित वाहने आल्यानंतर त्यापैकी किती वाहनचालकांच्या नोकर्‍या शिल्लक राहतील? 

निरुपयोगी लोकांचे करायचे काय? 

यापूर्वी अमेरिकन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या नोकर्‍या आणि कामे भारतातील कामगारांना मिळाली आहेत. भारतात, कॉल सेंटर कामगार आणि माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांचे सैन्य आहे. कापडनिर्मिती उद्योगातही स्वयंचलन सुरू करण्यात आले आहे. वाढत्या स्वयंचलनाचा परिणाम म्हणून, कापडव्यवसायात सरकारच्या एक कोटीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २९ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. २०१६ मध्ये रेमंडने जाहीर केले होते, की ते पुढील तीन वर्षांत त्यांच्या ३३,००० कामगारांपैकी १०,००० रोबोट्स बदलतील.(१५) गोल्डमन सॅक्स बँकेचा एक अभ्यासअहवाल चॅटजीपीटी, जीपीटी-४ च्या नंतर आला आहे. त्यामध्ये १९४० मध्ये अस्तित्वात असलेल्या रोजगारांपैकी ६० टक्के रोजगार संपुष्टात येणार असल्याचे सांगितले आहे. ३०० दशलक्ष पूर्णवेळ नोकर्‍यांची जागा एआय घेऊ शकते, असेही त्यात म्हटले आहे.(१६)

जग रोजगारविहीन समाजाकडे वाटचाल करीत आहे. कामगार उपलब्ध आहेत, ते श्रम करण्यासही तयार आहेत, परंतु त्यांना रोजगार मिळत नाही, अशा स्थितीकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. भारतात, एकीकडे केंद्रसरकारने नवीन कामगार कायद्यांमध्ये भांडवलदारांना स्वातंत्र्य बहाल केले आहे. ‘हायर अँड फायर’चे धोरण लागू करण्यात आले आहे. कारखाना मालकाने नोकरीवरून काढून टाकले तरी त्यांना दाद मागता येणार नाही, दाद मागितली तर न्याय मिळणार नाही, अशा तरतुदी नवीन कामगार कायद्यात करण्यात आलेल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे रोजगार संरचनेची पुनर्रचना होत आहे. त्यात दलित, आदिवासी, मुस्लीम यांच्याकरिता प्रवेश कठीण बनत चालला आहे. तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल. मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन, अतिरिक्त उत्पादनामुळे लोकांना काम करावे लागणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगारापासून मुक्ती मिळणार आहे; परंतु हे रोजगारपासून स्वातंत्र्य दलित, आदिवासी, ओबीसींकरिता शिक्षा ठरणार आहे. त्यांचे जगणे कठीण बनविणार आहे. सुदृढ व कौशल्यसक्षम असूनही त्यांच्या हाताला काम राहणार नाही. त्यांना लाचारीचे जीवन जगावे लागेल. या निरुपयोगी लोकांचा प्रश्न सरकारपुढे उभा राहणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना, खास करून अफाट लोकसंख्येच्या भारताला विचारपूर्वक पावले उचलण्याची गरज आहे. मोदी सरकारच्या काळात सार्वजनिक (सरकारी) उद्योग व उपक्रमांचे सरसकट सुरू असलेले खासगीकरण पाहता ही चिंता आणखी वाढली आहे.

भारतातील अब्जाधीश आणि दरडोई उत्पन्न 

स्वयंचलन आणि जागतिकीकरणाच्या वाढीचा परिणाम कनिष्ठ कुशल व उच्च्रभू मध्यमवर्गीय नोकर्‍यांवर होत आहे. त्यातून समाजात ‘डिजिटल विभाजनाची’ विषमता आणि मूठभरांची एकाधिकारशाही निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे अर्थव्यवस्थेचे आणि उद्योगांचे केंद्रीकरण होत आहे. त्यातून उद्योजकांची, कुलीन वर्गाची संपत्ती अफाट वाढत चालली आहे. प्रसिद्ध ‘फोर्ब्ज’ मासिकाने २०२२ ची जागतिक श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केला तेव्हा भारतातील गौतम अदानी अनेक श्रीमंतांना मागे टाकून पाचव्या क्रमांकावर होते. त्यानंतर सहा महिन्यांतच ते जागतिक क्रमवारीत चौथ्या आणि त्याच्या दोन महिन्यांनंतर दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले. २०१८ मधील फोर्ब्सच्या लेखात भारत व फ्रान्समधील अब्जाधीशांची तुलनात्मक माहिती देण्यात आली होती. त्या लेखानुसार, भारतातील अब्जाधीशांची संख्या १०० पेक्षा जास्त होती. तर फ्रान्समधील अब्जाधीशांची संख्या केवळ २० च्या आसपास होती. म्हणजेच भारतातील संपत्ती केवळ श्रीमंत लोकांच्या हातात एकवटली आहे.

फ्रान्समधील गरीब व्यक्तीच्या तुलनेत भारतातील गरीब व्यक्ती अत्यंत वाईट अवस्थेत जगत आहेत. फ्रान्सचे दरडोई उत्पन्न सुमारे २५ लाख रुपये तर भारतात ते सुमारे १७ हजार रुपये होते. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी २१.२ टक्के लोक म्हणजे २६ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती. दारिद्र्यरेषेखाली येणारे हे लोक दररोज २०० रुपयांपेक्षा कमी पैसे कमावीत होते. भारतातील सर्वात गरीब लोकांची लोकसंख्या सुमारे चार फ्रान्सच्या बरोबरीची आहे. जेव्हा सरासरी भारतीयांची कमाई १,९४० डॉलर होती. त्याच वेळी फ्रेंच प्रति व्यक्ती ३८,४७७ डॉलर म्हणजेच प्रति भारतीयांच्या २० पट कमावीत असत. अमेरिकेत प्रति व्यक्ती ३२,३२२ डॉलर, कॅनडा ४५,०२३ डॉलर, जर्मनी ४४,४७० डॉलर आणि चीनमध्ये दरडोई कमाई ८,८२७ डॉलर्स आहे. जागतिक बँकेच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, भारतीयांची वस्तू खरेदी शक्ती म्हणजे क्रयशक्तीमध्ये भारताचे दरडोई ७,०६० डॉलर आणि फ्रान्सची दरडोई क्रयशक्ती ४३,७२० डॉलर आहे. याचाच अर्थ भारतात कुलीन वर्गाने संपत्ती स्वत:कडे ओढून घेतली आहे. 

समाजातील कुलीन वर्गाच्या भोगवादी वृत्तीमुळे तापमानवाढ अणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही दोन महासंकटे निर्माण झाली आहेत. या दोन महासंटकांनी मनुष्यजातीच्या अस्तित्वापुढे आव्हान उभे केले आहे. तापमानवाढीमुळे मानवप्राणी पृथ्वीवर शिल्लक राहणार की नाही, असा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या संकटाबाबत अनेकजण चिंता व्यक्त करीत आहेत. तापमानवाढीपेक्षाही एआयचे संकट आत्ताच आपल्या दारावर आले आहे. या संकटाने मानवाच्या घरात व बुद्धीमध्ये प्रवेश केला आहे. एआयने मानवी बुद्धीची जागा घेणे सुरू केले आहे. तापमानवाढीमुळे मानवजात शिल्लक राहणार नसेल तर त्या एआयचे करायचे काय? कुलीन वर्गाची भोगवादी विकृती मानवजातीला संपविण्याच्या मार्गावर आहे. या भोगवादी वृत्तीला लगाम लावण्याची वेळ आली आहे.

संदर्भ:

१. रॉबर्ट सोलो – टेक्निकल चेंज अँड दि अ‍ॅग्रगेट प्रॉडक्शन फंक्शन, एमआयटी प्रेस, http://www.jstor.org/stable/1926047

२. मॅन्युअल कॅसल – दि राईज ऑफ नेटवर्क सोसायटी, खंड-१, दुसरी आवृत्ती, विली ब्लॅकवेल, ऑक्सफोर्ड, यूके, २०१०, पान -७९

३. कार्ल मार्क्स – राजकीय अर्थशास्त्राची समीक्षा, आवृत्ती -२९, अनुवाद- वसंत तुळपुळे, प्रागतिक पुस्तक प्रकाशन, पुणे, १९८८, पान -१८५

४. जॉन बेलामी फोस्टर, रॉबर्ट डब्ल्यू. मॅक्केस्नी- अन्तहीन संकट, अनुवाद -दिगंबर, गार्गी प्रकाशन, सहारनपूर, २०१५, पान -५७

५. आर्थिक सर्वेक्षण, २०२०-२१, प्रकरण-१, खंड-२, वित्त मंत्रालय, भारत सरकार, २०२१, पान -३

६. मीत नौशाद कबीर – नॉलेज बेस्ड सोशल एन्टरप्रीनरशिप, पॉलग्रेव्ह, न्यूयॉर्क, २०१९, पान- १९,२०

७. सुब्रता के. मित्रा – पॉलिटिक्स इन इंडिया : स्ट्रक्चर, प्रोसेस अँड पॉलिसी, द्वितीय आवृत्ती, रॉटलेज, लंडन, २०१७, पान – १९१

८. कार्ल मार्क्स – भांडवल, खंड-१, अनुवाद- वसंत तुळपुळे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पुनर्मुद्रण, २००१, पान- २१७

९. https://web-assets.bcg.com/4d/fe/415839064c4b94a0a1364ce1a4c4/bcg-rai- report-retail-resurgence-in-india.pdf 

१०. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया-https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Publications/PDFs/14T1B49B28491214EB387C3FAFD6 EF 1416C.PDF

११. https://www.semanticscholar.org/paper/Economic-growth-and-employment-generation-in-India-Ghosh-Chandrasekhar/1697af0eed619adf1d7dd701 ef8c5b70e37d4dbe

१२. http://www.bbc.com/hindi/vert-fut-40044882

१३. https://economictimes.indiatimes.com/tech/ites/over-3000-us-employees-file-class-action-suit-against-cognizant/articleshow/74647607.cm

१४. फ्रान्सिस कुरिअ‍ॅकोसे व दीपा अय्यर- ऑटोमेशन अँड द फ्युचर जॉब्स इन इंडिया, रिसर्चगेट, २०१८, https://www.researchgate.net/publication/327987947 _Automation_ and_the_ Future_ of_ Jobs_in_India

१५. इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड द फ्युचर ऑफ वर्क इन इंडिया, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, टँमेड रिसर्च, जिनेव्हा, २०१८, पान-९

१६. https://www.bbc.com/news/technology-65102150

मोबाईल क्र. ९४०५३२५०४८
(लेखक वरिष्ठ पत्रकार असून त्यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता’ हे पुस्तक लोकवाङमय गृह, मुंबईने नुकतेच प्रकाशित केले आहे.) 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.