कृत्रिमप्रज्ञेच्या युगात भविष्यातील शिक्षण

सगळीकडे आर्टिफिशिअल इंटलिजन्सची चर्चा सुरू आहे. Chat-GPT, AI हे शब्द विविध समाजमाध्यमांत, न्यूज चॅनेल्सवर ऐकू येत आहेत. काही जणांच्या मते हे खूळ आहे. तर काही जणांना वाटते की यामुळे जग बदलेल. पण खरे सांगू का? तुम्हाला-आम्हाला काय वाटते ते आता महत्त्वाचे राहिलेले नाही. त्या AI रोबोट्ला काय वाटते ते महत्त्वाचे आहे. हो, बरोबर वाचताय तुम्ही. कारण माणसांनी जरी AI रोबो बनवले असले तरी त्यांना माणसाची बुद्धिमत्ता प्रदान करून दिल्यामुळे हे माणसांपेक्षा जलदगतीने आणि अचूक निर्णय घेऊ शकतात. म्हणून तर मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये बरेच ठिकाणी CEO म्हणून AI रोबोट्सना नियुक्त केले गेले आहे. 

विविध अहवालांनुसार पुढील पाच ते आठ वर्षांत ३४% नोकऱ्या नाहीशा होतील. या नोकऱ्यांमध्ये जे काम माणसे करायची ते काम आता रोबोट् चॅट-बॉट AI च्या माध्यमातून करतील. त्यामुळे पुढील काही वर्षांत आपल्या सर्वांना नवीन कौशल्यांवर काम करावे लागेल, अर्थात Re-skill करावे लागेल. वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या रिपोर्टनुसार २०३३ पर्यंत ४०% विद्यार्थी अशी नोकरी किंवा व्यवसाय करणार आहेत जे आज अस्तित्वातच नाही. त्या व्यवसायाला-नोकरीला लागणारे कौशल्य मात्र आजच निश्चित झाले आहे. ते म्हणजे क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि क्रिटिकल थिंकिंग. याला मी नाव दिले आहे ‘4C’. आणि ही ४ कौशल्ये शिकवणे हेच भविष्यातले शिक्षण आहे. 

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास करणारे शिक्षण देणे हे प्रत्येक शाळेचे प्रथम कर्तव्य असेल. आत्तापर्यंत आपली शिक्षणपद्धती किंवा बऱ्याच शाळा या विद्यार्थ्यांची बौद्धिक बुद्धिमत्ता कशी विकसित होईल यावर लक्ष देत असत. आता ChatGPT AI हे बौद्धिक बुद्धिमत्तेमध्ये प्रगत आहे. AI ने माणसाकडून बौद्धिक बुद्धिमत्ता तर घेतली किंबहुना आपण ती त्याला दिली. आता माणसांनी फक्त भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर काम करायचे आहे. त्यांच्यासाठी तेच शिल्लक राहिले आहे. या राहिलेल्या दोन बुद्धिमत्ता AI प्राप्त करून घेऊ शकत नाही. टेक्नॉलॉजी कितीही विकसित झाली तरी EQ आणि SQ ह्यांची जागा कुणी घेऊ शकत नाहीत. खरेतर आयुष्यात यश फक्त IQ ने येत नाही. EQ आणि SQ ची जोड आवश्यक असते. तरी मागील सर्व पिढ्या IQ च्या जोरावरच प्रगती करत आल्या. आता माणसाजवळ ChatGPT असल्यामुळे IQ कमी असला तरी यश मिळू शकेल. फक्त भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास झालेला असणे अत्यंत गरजेचे ठरेल. मागील पिढीला ही EQ ची अट इतकी अनिवार्य नव्हती. आता ती मूलभूत गरज असेल. 

म्हणूनच, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन गोष्टींवर अधिक भर देते. 

१) सामाजिक, भावनिक बुद्धिमत्ता ज्याला SEL म्हणतात. (सोशल इमोशनल लर्निंग) 

२) पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान ज्याला त्यांनी FLN (Foudational Literacy and Numeracy) म्हटले आहे. 

एकदा सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता प्राप्त झाली की पुढे जास्तीत जास्त भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर काम करणे हेच शालेय शिक्षण असेल. मी मध्यंतरी आर्टिफिशिअल इंटेलिजन्ममध्ये मास्टर कोर्स केला. त्यात मी चाळीसहून अधिक AI टूल्स शिकलो. ChatGPT ला तुम्ही कुठलेही प्रश्न विचारा, AI बरोबर उत्तर देते. मग प्रश्न शिक्षणक्षेत्रातले असोत, कायदा, मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र, आहारशास्त्र, पर्यावरण कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असो, त्यांची उत्तरे तुम्हाला हव्या तेवढ्या शब्दांमध्ये मिळतात. AI कविता करतो, नाटक लिहितो, चित्र काढतो. इमेज तयार करतो. विषय सांगा, त्यावर PPT बनवून देतो. संशोधनपर अहवालदेखील तयार करतो.

फक्त तुम्हाला योग्य प्रश्न विचारता यायला हवा. ज्याला ‘prompt’ म्हटले जाते. प्रश्नासोबत जितके अचूक prompts तितकी अचूक उत्तरे मिळतील. याचाच अर्थ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना “प्रश्न कसे विचारायचे” हे शिकवले पाहिजे. आईन्स्टाईनचे एक प्रसिद्ध वाक्य आहे – ”Important thing is not to stop questioning.” शिक्षण हे प्रश्नांच्या आधारावर हवे, उत्तरांच्या आधारावर नाही. प्रश्नांच्या आधारावर शिक्षण आणण्यासाठी वर्गामध्ये शिक्षकांना खूप मोकळे वातावरण ठेवावे लागेल. तूर्त शिक्षणप्रक्रियेत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत असे वातावरण नाही. ते बदलावे लागेल. सोबत सर्जनशीलता, संवादकौशल्य, एकत्र काम करण्याचं कौशल्य आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य, ज्यांना मी ‘4C’ म्हटलं आहे ती शाळेमध्ये प्रयत्नपूर्वक शिकवावी लागतील. यापुढे पालक मुलांना शाळेत पायथॅगोरस शिकण्यासाठी पाठवणार नाहीत. ऑनलाईन शिक्षणातून जगातले उत्तम शिक्षक त्यांना पायथॅगोरस शिकवतील. विद्यार्थी शाळेत येतील ते नाचायला, गाणी म्हणायला, मैदानावर खेळायला; जीवनातले संगीत आत्मसात करायला. सवंगड्यांसोबत एकत्र राहून शिकायला. यातूनच भावनिक, सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास होईल. भविष्यात डॉक्टर्स, इंजिनीअर्सपेक्षा इतर क्षेत्रांना जास्त महत्त्व असणार आहे. पुढील पंधरा वर्षातील नोकऱ्या या पर्यावरण, मानसशास्त्र, क्रीडा, कला, यंत्रप्रशिक्षण या संदर्भातल्या अधिक असणार आहेत. 

औद्योगिक क्रांतीनुसार समाजात नोकऱ्या असतात आणि या नोकऱ्यांच्या धर्तीवर शिक्षण असतं. जशी औद्योगिक क्रांती तशा प्रकारच्या नोकऱ्या. आता भारतात जीपीटी-४.o ची औद्योगिक क्रांती आली आहे तर एकूणच जगात खास करून युरोपमध्ये ५.० ही औद्योगिक क्रांती येत आहे. त्यात सगळीकडे AI असेल. त्यामुळे बऱ्याच जणांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा १९७० साली संगणक आला तेव्हासुद्धा नोकऱ्या जातील असे भाकीत केले होते. पण तसे झाले नाही. उलट, संगणकक्षेत्रात अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या. पण आता तसे होणार नाही. AI हा माणसाच्या बौद्धिक बुद्धिमत्तेच्या समान पातळीवर चालतो. तो ड्रायव्हरविना कार चालवू शकतो. वर्गात गणित, शास्त्र हे विषय शिकवू शकतो. एकसारखी, वारंवारिता असणारी बरीच कामे करू शकतो. निर्णय घेण्यात मदत करतो. जसे या लेखाला काय शीर्षक द्यायचे असा प्रश्न मनात आला. मी ChatGPT ला मराठीतून हे आर्टिकल पोस्ट केले आणि विचारले, “याला छान शीर्षक सांग.” त्याने मला पाच पर्याय दिले (१) AI च्या फुलपाखरेने आधुनिक शिक्षणाच्या वाटा बदलणार (२) आधुनिक शिक्षणाचा नवीन चेहेरा: AI सोबत कौशल्य (3) एकत्रित बाल-शिक्षण: AI च्या साथीने घेतलेले भविष्य (४) जगाचे मार्गदर्शन करणारे AI: शिक्षणात उभे करणारा आधुनिक साथी (५) AI च्या युगात भविष्यातील शिक्षण

 त्यातील मी शेवटचे पाचव्या क्रमांकाचे शीर्षक निवडले.

मागच्या आठवड्यात एलोन मस्कचे ट्वीट वाचले. त्यांनी केसाच्या आकाराची एक चिप बनवली आहे. मेंदूमध्ये ती बसवता येते. जेणेकरून ज्या रुग्णाला अर्धांगवायू झाला आहे त्यांच्या मेंदूतल्या त्या मज्जातंतूला ती उत्तेजित करेल, जेणेकरून अर्धांगवायू झालेली व्यक्ती लगेच बरी होईल. याला अमेरिका मान्यता देत नव्हती. पण नुकतीच FDA ने त्याला मान्यता दिली. 

एका मुलखतीमध्ये एलोन मस्क म्हणतो, “मी अशी neurolink chip बनवतोय ज्याने शाळेमधील सगळे गणितीज्ञान, शास्त्रविषयाचे ज्ञान मी या केसाएवढा चिपमध्ये टाकेन आणि विद्यार्थ्यांच्या मेंदूत बसवेन, ज्यायोगे १०-१५ वर्षे वाया घालवायची गरज उरणार नाही.” अजून तरी या गोष्टीला मान्यता नाही पण भविष्यात ती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

म्हणून मी म्हणतो, “भविष्यातले शिक्षण पूर्णपणे बदलणार आहे. जे AI रोबो घेऊ शकत नाही ते कौशल्य, ती बुद्धिमत्ता हे माणसाचे शिक्षण असेल. हे शिक्षण म्हणजे भावभावनांची जाण, आनंदी राहण्याची वृत्ती, अपयश पचवण्याची वृत्ती, वेळ, पैसा याचे महत्त्व, त्याचा योग्य वापर, एकमेकांसोबत एकत्र राहण्याचे कौशल्य, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे ज्ञान.”

भारत एक मोठे राष्ट्र आहे. त्याच्या स्वतःच्या काही समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठीसुद्धा AI ची मदत घेतली जाईल. लोकांचे राहणीमान सुधारले जाईल. जे तंत्रज्ञान तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडवू शकते ते खरे राष्ट्राच्या कामाचे! असे संस्कार देणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागेल. उदाहरणार्थ, दरवर्षी गटार साफ करताना कितीतरी मजुरांचा गुदमरून मृत्यू होतो. भावी विद्यार्थ्यांमध्ये अशी संवेदना हवी की मी असा रोबो निर्माण करेन जो गटारामध्ये जाऊन गटार साफ करेल आणि त्या मजुराची नोकरीसुद्धा टिकून राहील. असे सामाजिक भान निर्माण करणारे शिक्षण ही काळाची गरज असेल. 

बाकी गुणाकार-भागाकारपासून ते पीएच.डी. च्या प्रबंधाचे काम ChatGPT कडून होईल. माणूस घडवणारे शिक्षण, सोबतीला प्रश्न विचारण्याची कला आणि ‘4C’ कौशल्य हा भविष्यातील शिक्षणाचा पाया असेल.

शिक्षण अभ्यासक, नाशिक

अभिप्राय 5

  • Agree sir. It has its own pros and cons
    We are heading with technology towards progression as well as destruction, that is what I feel.

  • तुमचा लेख वाचून खरंच खूप छान वाटते. नव नवीन गोष्टी शिकायला भेटतातच. तसेच तुमची विद्यार्थ्यांबद्दलची त्याचा करिअर बद्दलची जाण तळमळ पण दिसते.

  • सचिन आर्टिकलचं विषय अत्यंत आकर्षक आहे. भविष्यातील शिक्षणच्या संदर्भात, AI युगातील शिक्षणाचे वैशिष्ट्य आणि प्रभाव गमावलेले आहेत. यापूर्वी शिक्षणाचा स्वरुप खास रिक्तिस्थान आहे. ग्रंथालयातील पुस्तकांमुळे शिक्षण वाढतं, किंतु AI च्या युगात, शिक्षण प्रक्रियेच्या नवीन साधनांना वापरून, विद्यार्थ्यांना वास्तविक आणि संपूर्ण अनुभव प्रदान करण्याची क्षमता असते.

    AI विद्यार्थ्यांना विविध विद्यार्थी सुधारणा करण्यात मदत करू शकते. त्यामुळे, शिक्षणाची व्यक्तिगतीकरण होते आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आवड, क्षमता आणि वाचनस्वीकारात्मकता ध्यानात घेतली जाते. इथे AI अनुकूल पद्धतीचा वापर करून, विद्यार्थ्यांना त्यांच्या आणि आपल्या क्षमतेच्या अनुसार पाठवण्याची संधी मिळते. ह्या प्रकारे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणांमुळे त्यांचा अभिप्रेत विद्यालय कार्यक्रम तयार केला

  • सचिनबेटा या अंकातील पहिले चार लेख मी वाचले, पण तुझा लेख अतिशय समर्पक आणि भविष्यातिल परिस्थिवर भाष्य करणारा आहे. चाट जीटीपी मुळे सध्याचे विज्ञान, गणिताचे शिक्षण काही कामाचे नसणार आहे. पण तूं कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वर्मावर बोट ठेवलेस. कृत्रिम बुध्दीमत्तेमध्ये माणसासारखी भावनिक आणि सामाजिक जाण निर्माण करणे अवघड आहे; आणि हाच माणूस आणि रोबोट मध्ये फरक असणार आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेचे विश्लेषण करताना भविष्यातिल मानवाच्या कार्यक्षेत्राची जाणीव करून दिली आहेस. खूपच छान! (माझी प्रतिक्रिया थांबवताना मी सांगू इच्छितो की आज मी त्र्यांशिव्या वर्षात असल्यामुळे तुला बेटा असे संबोधले आहे. राग नाही ना आला?)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.