गुणाकाराची बेरीज – वजाबाकी

लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे. गोष्ट तेव्हाच संपलेली होती पण माझ्या मनात मात्र हा भस्मासूर पेटतच राहिला. 

आता जेव्हा संगणक, तंत्रज्ञान, किंवा चॅटजीपीटीबद्दल विचार करतो तेव्हा मला आज्जीने सांगितलेली गोष्ट आणि त्यातील सत्य उमगायला लागते. भस्मासूर त्या गोष्टीतला हीरो, नव्हे सुपर हीरो असेल तर मग, त्या गोष्टीतला व्हिलन कोण? हां, तोच तो विष्णू, ज्याने मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला नष्ट केले तो! पण मग, त्या भोळ्या शंकराचे काय? त्याने त्या भस्मासुराला असे वरदान का दिले? या विचारापर्यंत पोचण्याची गरज आजच्या एकूणच परिस्थितीकडे पाहून जाणवायला लागते. चॅटजीपीटीसारख्या विषयावर बोलताना जरा जपूनच बोलावे लागते. कारण या सोयीला विरोध करणाऱ्यांना विष्णू म्हणून (किंवा विषाणू म्हणून) व्हिलन ठरवले जाते. पण त्या भोळ्या शंकराचे काय? हा प्रश्न उरतोच. मानव म्हणून आपण नवनिर्मिती करता करता पुनर्निर्मितीच्या मोहात केव्हा पडलो हेच कळले नाही. 

एका ठरावीक वर्गाने स्वतःच्या फायद्यासाठी खेळ या अतिशय मूलभूत गोष्टीचा वापर मनोरंजनाचे साधन म्हणून केला आणि आता खेळातील खेळकरपणाच निघून गेला. निश्चित परिणाम साधण्याच्या या शर्यतीत आपण ‘म्याच फिक्स’ करत गेलो. खेळाच्या माध्यमातून एक ठरावीक वर्ग तीन तासात ती म्याच बघणाऱ्यांना रोमांचकारी मनोरंजनाचे गाजर देऊन करोडो रुपये लुटून घेऊन जातो. बघणारे मात्र त्या रोमांचकारी, मनोरंजक अनुभवावर चर्चा करत बसतात, टाळ्या वाजवतात. यात खेळ ही गोष्ट वाईट नाही म्हणजे व्हिलन क्रिकेट नाहीच. पण आपल्याला हे आता ठरवावे लागेल, शोधावे लागेल की नेमका खलनायक आहे कोण? 

मनोरंजनाचे हेच तीन तास आज भारी पडत आहेत. 

एन्टरटेनमेन्ट…… एन्टरटेनमेन्ट……. एन्टरटेनमेन्ट…. 

असे एक ब्रीदवाक्य आपल्याचपैकी कोणीतरी निर्माण केले आणि याची किक आपल्याला अशी काही बसली की, त्या मोहिनीतून आपण बाहेर येऊ की नाही हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. मनोरंजनाचे हे साधन वापरता वापरता आपणच आता या मनोरंजनाच्या हातातले खेळणे बनलो आहोत. गणनशक्ती संगणना म्हणजेच संगणक हे साधन म्हणून वापरताना सुटलेला आपला विवेक आता आपल्याला त्याच संगणकाचे साधन बनवत जात आहे. आणि याचा फायदा काही एक विशिष्ट वर्ग घेत जातो आहे. परंतु या सत्याकडे आपण पाहतच नाही आहोत कारण आपण मनोरंजनात व्यस्त झालो आहोत. आता केवळ तीन तास नव्हे तर ट्वेंटीफोर बाय सेव्हन……. 

मानवाने आपली भाषा स्वतः विकसित केली. आणि त्या भाषेची नानाविध रूपे निर्माण केलीत. कोणत्याही माहितीचा अचूकपणा आणि तपशील एकमेकांना पोचवण्यासाठी भाषेचा वापर आपण करतो. माहिती संकलन करणे, ती जपून ठेवणे आणि दूर अंतरापर्यंत ती पोचविणे यासाठी आपण विविध साधने, माध्यमे आणि त्या माध्यमांचा वेग वाढवण्याचे तंत्र विकसित करत गेलो. सुरक्षितता निर्माण करण्यासाठी केलेली ही सगळी धडपड आहे. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल भय किंवा अनिश्चितता वाटते त्याबद्दल अधिक माहिती गोळा करणे आणि संभाव्य संकटांना टाळण्यासाठी या माहितीचा वापर करणे हा आपल्या भाषाविकासाचा हेतू बनलेला आहे. या हेतूच्या मुळाशी असुरक्षितता हा एकच भाव आहे. ही असुरक्षितता घालवण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी आपण माहिती गोळा करणे, साठवणे आणि ती जलद गतीने पसरविणे याचा वेग वाढवण्याचे तंत्र विकसित करत असतो. मानवाने आपली भाषा विकसित केली आणि भाषेला एक साधन म्हणून वापरण्याचे तंत्र व यंत्र विकसित केले. इथपर्यंत सगळे आटोक्यात होते असे म्हणायला हरकत नाही. परंतु ज्या वेळेस या यंत्रालाच भाषा विकसित करण्यासाठी विकसित केले. तिथून मात्र नव्या आव्हानांची एक साखळी प्रतिक्रिया सुरू झाली. येथेच आपण आपला विवेक सोडला आणि या भस्मासुराला स्वनिर्मितीचे वरदान दिले. 

उत्क्रांतीच्या टप्प्यात मानवाने भाषा विकसित केली. गणितासारखे प्रभावी माध्यम निर्माण केले. परंतु या भाषेला गणिताची जोड दिली आणि येथेच त्याने एका भस्मासुराची निर्मिती केली. या चराचर सृष्टीत प्रत्येक सजीव घटकाची स्वतःची अशी भाषा आहे. मानवाखेरीज इतर प्राण्यांना त्यांची भाषा ही त्यांचे उपजत ज्ञान म्हणून प्राप्त झाली आहे. उपजत मिळालेल्या या भाषेमध्ये नवे संकेत किंवा इशाऱ्याची भर घालण्याचा गुण मानव सोडून इतर प्राण्यांमध्ये नाही. मानवाच्या तुलनेत वनस्पती म्हणजे झाडांची भाषा जास्त प्रगत आणि नैसर्गिक आहे. झाडांनी आपल्या मूलभूत गुणांना वापरून आपली भाषा विकसित केली आहे. मानवाने मात्र आपल्या मूलभूत गुणांना वापरून भाषेला आकार देण्याचे कसब आत्मसात केले. आणि हे करत असताना आपल्या मूलभूत गुणांनाही आकार देण्याचे काम मानवाने केले. आपल्या गुणांना आकार देण्याच्या या संकल्पनेला आपण गुणाकार म्हणू शकतो. कसे हे या उदाहरणाने समजून घेऊया. जसे सगळेच प्राणी आणि वनस्पती आपले अस्तित्व टिकावे म्हणून आपले मूलभूत गुण वापरत असतात. उदाहरणादाखल जिवंत राहणे याकरिता निरीक्षण किंवा अवलोकनाचा मूलभूत गुण सगळेच प्राणी वापरतात. या माध्यमाने मिळालेली माहिती निर्णयात्मक कृती घडविते. म्हणजे डोळ्यांनी, कानांनी, नाकाने, जिभेने किंवा स्पर्शाने अवलोकनाचा गुण वापरून त्यावर कृती घडत असते. कृतीकरिता मूलभूत गुणांचा वापर करण्याची ही नैसर्गिक पद्धत आहे. ज्यात शरीराची विविध इंद्रिये वापरली जातात. मानवाने तर याहीपलीकडे जाऊन आपल्या नैसर्गिक इंद्रियांची गती वाढावी याकरिता आपल्या मूलभूत गुणांना आकार देण्याचा शोध लावला. थोडक्यात काय तर, अवलोकनाच्या गुणांची गती आणि अचूकता वाढावी यासाठी ‘कॅमेरा’ची निर्मिती केली. म्हणजेच अवलोकनाच्या मूलभूत गुणालाच आकार दिला. गुणांना आकार देण्यासाठी जे निर्माण केले त्याला मराठीत उपकरण आणि इंग्रजी भाषेत डिव्हाईस म्हणतात. मानवाने आपल्या सगळ्याच मूलभूत गुणांना आकार देत त्याची उपकरणे शोधली, निर्माण केली आणि भस्मासुराचा जन्म झाला. 

भाषा हा मानवाचा मुख्य गुण आहे. या भाषागुणामुळेच मानव आपले विचार, भावना आणि माहिती यांची देवाणघेवाण करून प्रगती करतो आहे. ध्वनिमाध्यमावर आधारित बोलीभाषा, यानंतर याच भाषेला कलेच्या माध्यमाने सांकेतिक रूप देऊन मानवाने लेखी भाषेचा शोध लावला. आपली, म्हणजे मानवाची, भाषा जोवर लेखी संकेतांवर आधारित होती तोवर मानवाच्या उत्क्रांतीची, भाषाविकासाची, विचार करण्याची, अनुभवाची, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपकरणनिर्मितीची गती यांचा ताळमेळ साधला जात होता. ही गती मानवाच्या विकासाच्या दिशेने जात होती. परंतु आता या संगणकीय युगात आपली उपकरणनिर्मितीची गती ही अनैसर्गिक पद्धतीने वाढली आहे. तंत्रज्ञानावर आधारित उपकरणात आपण भाषेतील संकेतांना गणिती पद्धतीने वापरत आहोत. भाषेला दिलेल्या गणिताच्या या वाहनाचा वेग मानवाला विनाशाच्या दिशेने घेऊन तर जाणार नाही ना? असा प्रश्न मनात यायला लागला आहे. कारण आता तर आपण भाषेचे आणि भाषेचा मुख्यत्वे वापर करून विचारनिर्मिती करण्याचे उपकरण शोधून काढले आहेत. गुणाकाराच्या प्रक्रियेने प्राप्त झालेल्या निर्मितीच्या या वेगाच्या मोहात आपण पडलो आहोत. इच्छित परिणाम साधणे आणि तेदेखील जलद गतीने. वास्तविक येथे आता जलद या शब्दाला बदलून आपण प्रकाशगतीने असे म्हणालो तर वेग वाढल्याचा अंदाज आपल्याला नक्कीच येऊ शकेल. त्वरित ऊर्जा निर्माण करणे, त्या निर्मितीचा वेग वाढवणे हे गणितामुळे आपल्याला शक्य झाले आणि आपण अणूबॉम्बचा शोध लावला. अणूबॉम्बच्या प्रयोगाने किंवा वापराने किती मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते, याची कल्पना शोध लावताना केली गेली होतीच, तरीही जेव्हा प्रत्यक्षात अणूबॉम्बचा वापर केला गेला तेव्हा झालेल्या विध्वंसाची वास्तविकता आपल्या कल्पनेच्या कितीतरी पलीकडे होती. म्हणजेच आपल्या कल्पनांची बेरीज करणे ही आपल्या आटोक्यातली किंवा आपल्याला झेपणारी प्रक्रिया आहे. पण आपल्या कल्पनांचा गुणाकार हा आपल्यासाठी आपणच निर्माण केलेला अस्तित्वाचा धोका ठरू शकतो. अणूबॉम्बमधला हा धोका आपण प्रत्यक्षात अनुभवला आणि अणूबॉम्ब न वापरण्याचा करार आपण एकमेकांसोबत केला. असाच विवेकी विचार आपल्याला चॅटजीपीटीसारख्या तंत्रशक्तीबद्दल करायला हवा. 

भाषा हे कल्पनेला वास्तवात रूपांतरित करण्याचे शस्त्र आहे. भाषेच्या वापराने आपण आपली उत्क्रांती आणि विकास करत आलो आहोत. या भाषेला वापरण्याकरिता आपण दोन माध्यमे उपयोगात आणलीत. एक म्हणजे कला आणि दुसरे माध्यम म्हणजे गणित. या दोन्ही माध्यमांच्या विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने आपण कल्पनाशक्तीचे रूपांतर करीत असतो. भाषेला वापरत असताना आपण कोणते माध्यम निवडतो हे येथे महत्त्वाचे आहे. प्रत्येक माध्यमाला स्वतःची एक लयबद्ध गती असते. कल्पनेला वास्तवात रूपांतरित करण्याचा गणिताचा वेग हा कलेच्या वेगापेक्षा मूलतः जास्त आहे. यामुळे भाषेची ही शक्ती जेव्हा गणिताच्या माध्यमाने वापरली जाते तेव्हा भाषा हे अस्त्र बनते. आपल्या मेंदूप्रमाणेच चॅटजीपीटी हे तंत्रज्ञान भाषेला गणिताच्या माध्यमाने वापरण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. फरक इतकाच की मेंदू हा नैसर्गिक गतीने काम करतो परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम साध्य करण्याचा वेग हा मानवी कक्षेच्या आटोक्यात राहणार नाही हा धोका आपण वेळीच ओळखायला हवा. पण सध्यातरी आपण सगळेच केवळ त्या वेगाच्या विस्मयकारी रूपाकडे बघत आहोत. परिणामाच्या मनोरंजनात आपण अडकलो आहोत. किंबहुना सध्यातरी आपल्याला केवळ मनोरंजनच महत्त्वाचे वाटत आहे. या गणिती माध्यमात अचूक परिणाम साधण्याची शक्ती आहे, परंतु विवेक नाही. आणि विकासाची विवेकहीन गती ही विनाशाकडे नेते याचा अनुभव आपल्याला आलेला आहे. 

भाषा जेव्हा कलेच्या माध्यमाने वापरली जाते तेव्हा मात्र ती एक शस्त्र बनते. असे शस्त्र जे मानवी गतीच्या मर्यादेला पूरक वेग सांभाळून असते. कला माध्यम हे भाषेतील गुणांचे केवळ वाहक आहे. भाषेतील गुणांची केवळ बेरीज किंवा वजाबाकी कलेच्या माध्यमात होत असते. कला हे माध्यम गुणांचा उपयोग करून भावनांना किंवा विचारांना आकार देण्याचे साधन आहे. कला माध्यम हे कोणत्याही शक्तीच्या गुणांचा वारंवार वापर करीत कल्पनांना वास्तवात आणण्याचे काम करते. तर गणित हे माध्यम कोणत्याही शक्तीच्या गुणांना आकार देत वास्तव निर्माण करते. कोणत्याही शक्तीच्या गुणांची बेरीज करणे यात विवेक आहे. तंत्रज्ञानाच्या अतीव वापराने आपण आता शक्तीचा गुणाकार करू लागलो आहोत. या गुणाकारात विवेक नाही. कला माध्यमाने कल्पनांची गती कमी होत नाही, तर या कलेच्या माध्यमाने प्रत्येक कल्पना वास्तविकतेत आणण्याचा अट्टहास नाहीसा होतो. हाच तो विवेक. गणित या माध्यमात मात्र ही मोकळीक नाही. कल्पनेला वास्तवात रूपांतरित करण्याची विसम्यकारी गती गणिताच्या माध्यमात आहे. याच गतीच्या मोहात आपण अडकलो आहोत. हेच मोहिनी रुप आता काय नष्ट करणार याची कल्पना करूया. आणि आजीने सांगितलेल्या भस्मासुराच्या गोष्टीतला नेमका खलनायक कोण होता, हे ठरवण्यात मनोरंजन होणारच आहे. चिंता नसावी. 

मोबाईल: ९२८४८२१९०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.