आवाहन

स्नेह

पोषक अन्न, सगळ्या ऋतूंत संरक्षण देणारी वस्त्रे आणि सोयींनी युक्त निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजांमध्ये आता शिक्षण आणि आरोग्य ह्यांचाही समावेश झाला आहे. भारतात शिक्षणाचा संबंध ज्ञानार्जनाशी कमी आणि अर्थार्जनाशीच जास्त आहे. परंतु world economic forum नुसार भारतातील दरवर्षी शिक्षण घेऊन रोजगार शोधण्यास निघणाऱ्या जवळपास सव्वा कोटी तरुणांपैकीव्यवस्थापनाच्या क्षेत्रातील प्रत्येकी चारपैकी एकच तरुण रोजगारक्षम (employable) असतोअभियांत्रिकीच्या क्षेत्रातील पाच पैकी एकतरप्रत्येकी दहा पदवीधर तरुणांपैकी एकच तरुण रोजगारक्षम असतो.

‘मुख्यतः अर्थार्जना’साठी शिक्षण घेणाऱ्या भारतीय तरुणांची प्रत्यक्ष रोजगारक्षमतेत ही परिस्थिती आहे. ह्याचा अर्थ शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारी कौशल्ये शिकवली जात नाहीत.

शिक्षणात आपला मुख्य भर स्मरणशक्तीद्वारे माहिती साठवण्यावर आणि काही प्रमाणात त्याचे विश्लेषण करण्यावर असतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे स्मरणशक्तीत साठवलेले गरज पडेल तसे, तेव्हा आणि तितकेच वापरण्यावर असतो.ह्या कौशल्यांचा ना रोजगारक्षमता वाढीशी फारसा संबंध ना ज्ञानार्जनासाठी. गंमत अशी की आता आपण कृत्रिमप्रज्ञा, AI, निर्माण केली आहे आणि तिला नेमक्या ह्याच गोष्टींत, (माहिती साठवणे, तिचे अत्यंत वेगाने विश्लेषण करणे आणि गरज पडेल तेथे नेमक्याने वापर करणे), अफाट क्षमता प्राप्त करून दिली आहे. ही क्षमता इतकी विलक्षण आहे की वैयक्तिक मानवी बुद्धिमत्तेची स्मरणशक्ती आणि विश्लेषणक्षमता ही तिच्या खिजगणतीतही उतरत नाही. अश्या तऱ्हेने आपणच आपल्याला एक अमानवीय प्रतिस्पर्धी निर्माण केला आहे जो आपल्याला सध्या असलेले रोजगाराचे बरेचसे स्रोतही गिळंकृत करणार आहे. कारण सतत विकसित होत जाण्याच्या कृत्रिमप्रज्ञेच्या गतीशी स्पर्धा करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे आपल्यातील ह्या दोन क्षमता/कौशल्ये यापुढे अनावश्यक किंवा कुचकामी ठरण्याचीच शक्यता आहे. (‘आजचा सुधारक’चा मागील अंक ह्याच विषयावर आहे. www.sudharak.in/ताजा-अंक-जुलै-२०२३/)

त्यामुळे प्रतिस्पर्ध्यास अवगत नसलेले पण मानवास अवगत असलेले इतर गुण (जसे, सर्जनशीलता, नेतृत्व, जिज्ञासा, कल्पकता, इत्यादी) विकसित करण्यावर आता आपल्याला भर द्यावा लागणार आहे.

गुणवत्ता विरुद्ध आरक्षण हा संघर्ष नवा नाही आणि त्यात आरक्षण बाजी मारते आणि गुणवत्ता मार खाते असे कथानक प्रस्थापित केले गेले आहे. गुणवत्तावाद्यांचे साधारण आक्षेप असे असतात, १) आरक्षणाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची (विशेषतः डॉक्टर, इंजिनिअर अश्या व्यावसायिक शिक्षणात) संधी नाकारली जाते, आणि २) आरक्षणातून शिकलेले व्यावसायिक व्यवसायात आल्याने ते देत असलेल्या सेवांचा दर्जा घटतो.

परंतु गुणवत्ता म्हणजे नेमकं काय? स्पर्धापरीक्षांचा केवळ सराव केल्याने गुणवत्ता खरोखरच वाढते का? वेगाने बदलत असलेल्या या परिस्थितीत, शिक्षणाचा मूळ हेतू काय असावा? ते देण्याची पद्धत कशी असावी? सर्जनशीलतेसारखी कौशल्ये शिकवणे शक्य आहे काय? आणि महत्त्वाचे म्हणजे हे सारे तपासण्याचे निकष कोणते? ह्या सगळ्याच गोष्टींचे पुनरवलोकनकरून त्यांत आवश्यक ते बदल घडवून आणण्याची गरज आहे.

‘आजचा सुधारक’च्या आगामी अंकात (ऑक्टोबर २०२३) हा विषय चर्चेसाठी घेत आहोत.

आपले साहित्य लेख, निबंध, कविता, कथा, रेखाचित्रे, व्यंगचित्रे, ऑडिओ, व्हिडीओ अशा कुठल्याही स्वरूपात पाठवू शकता. शब्दमर्यादा नाही. आपले साहित्य २४ सप्टेंबरपर्यंत aajacha.sudharak@gmail.com यावर पाठवा अथवा +91 9372204641 ह्या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.