मुलांमधली सर्जकता ओळखण्याचे प्रयोग शिक्षणात व्हावे

मुलांमधली सर्जकता ओळखण्याचे प्रयोग शिक्षणात व्हावे,
तेव्हाच बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल. !!
 

मागच्या वर्षी अकोला जिल्ह्यात पोलिसशिपाई पदासाठीच्या ३७७ जागांसाठी चाळीस हजार पदवी, पदव्युत्तर झालेल्या युवक-युवतींनी अर्ज भरले होते. अकोला पोलिसविभाग रोज १५०० युवकांना मैदानात बोलावून भरतीप्रक्रिया राबवून घेत होता. आणि यावर्षी तलाठी भरतीच्या बातम्या तुमच्या वाचण्यात आल्या असतील. तलाठी भरतीमध्ये अकरा लाखांहून अधिक अर्ज भरले गेले. अशा घटनांमधून शिक्षित, उच्चशिक्षित असूनही बेरोजगार असणार्‍या युवकांचा प्रश्न दिवसेंदिवस किती गंभीर होत आहे हे लक्षात येतं. 

बेरोजगारीचं हे चित्र आपल्याला गावांत आणि शहरांत सगळीकडे सारखं पाहायला मिळतं. माझ्या मित्रयादीत दहापैकी आठ असे मित्र आहेत जे पदव्युत्तर झालेले आहेत. परंतु त्यांच्याकडे ‘परीक्षाकेंद्री’ शिक्षणानुभवाशिवाय नोकरी करून जगण्यासारखं दुसरे कौशल्य नाही, हे मी त्यांच्या परवानगीने इथे लिहू आणि सांगू शकतोय. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे गावामध्ये राहणाऱ्या अनेक युवकांची मार्केटिंग कंपन्यांकडून फसवणूक होताना दिसते. मागच्या वर्षी गावातल्या एका युवकाने घरी कोणालाही न विचारता एका मार्केटिंग कंपनीत चाळीस हजार रुपये भरले, आणि त्या कंपनीत रूजू झाला.  कंपनीने अमुक तमुक साहित्य विकावं लागेल, तुम्हाला क्लायंट वाढवावे लागतील, नंतर मॅनेजरचे पद मिळेल असे सांगून दहा दिवस हॉटेलवर त्या युवकाला मुक्कामी ठेवलं, आणि लॉकडाऊन लागणार आहे आता तू घरी जा म्हणून त्याला सांगितलं. त्याप्रमाणे तो युवक घरी परतला. घरी परतल्यावर तिसऱ्या दिवशी कंपनीकडून फोन आला, की ती आता बंद झाली आहे. पुढे काही दिवसांनी गावामध्ये कळलं की त्या युवकाने एका सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन त्या कंपनीला दिले होते. हे उदाहण फक्त एका युवकाचं होतं. शहरात राहून, कॉलेज करणाऱ्या, वसतिगृहात राहणाऱ्या, स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींचं वेगळं वास्तव आहे.

मुद्दा हा आहे की आपल्या शाळा, आपली कॉलेजेस, आपल्या विद्यापीठांमध्ये काय होत आहे? मुलामुलींना चार भिंतीतल्या चाकोरीबद्ध शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळं काही गुणवत्तापुर्ण शिक्षण दिलं जात आहे का? तसे प्रयोग होत आहेत का? हे तपासायला हवं. आजच्या घडीला आपल्या राज्यात पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त, जीवनकौशल्य व रोजगारक्षम गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या शाळा असतील. त्या शाळांप्रमाणे अकोला जिल्ह्यातल्या टिटवा (बेडा) येथील अक्षरभूमी शाळेतल्या मुलामुलींबरोबर आम्ही करत असलेल्या शिक्षण अनुभवातले काही प्रयोग तुम्हाला या लेखात उदाहरण म्हणून सागंता येतील.

तर अक्षरभूमी शाळेत येणारी मुलं ही शिकार करून उपजीविका करणाऱ्या समुहातल्या माणसांची आहेत. या मुलांबरोबर शिक्षणावर प्रयोग करताना आम्हाला अनेक गोष्टी तपासून पाहता आल्या. ही मुलं दिवसभर काय करतात? कुठे जातात? अक्षरभूमीमध्ये शिकायला येणाऱ्या मुला-मुलींच्या घरामध्ये रोज काय काय घडतं? हे आम्ही आधी तपासलं आणि या मुलांमधल्या संवादाच्या जागा ओळखून आम्ही मुलांबरोबर शिक्षणाच्या कामाला लागलो. 

मुलांसोबत हे काम करत असताना आमच्या आयुष्यात गट्टू, बाली, तन्या, गोविंदा यांसारखी मुलं आली. या मुला-मुलींमध्ये शेती आणि आपल्या परिसरात आढळणार्‍या जैवविविधतेबद्दलचं अद्भुत ज्ञान आहे, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली आणि प्रत्येक वर्षी आम्ही या मुलांना सोबत घेऊन अक्षरभूमी शाळेमध्ये शेतीचे प्रयोग करतोय. उन्हाळ्याच्या सुट्टीत या मुलांना फळं, भाजी, वाणाच्या बिया जमा करून घ्यायला लावतो, आणि त्या बियांचे शाळेत रोप तयार करायला लावतो. मुलं शाळेच्या बाजूच्या तलावातली काळी माती आणून जमा करतात. ती व्यवस्थित पसरतात. उगवलेल्या रोपट्याची देखभाल करतात. रोपट्याभोवती दगडाचं कुंपण घालतात. एका-एका रोपट्याची जबाबदारी घेतात. या प्रयोगातून मुलांमध्ये स्वतःमध्ये स्पर्धा निर्माण होते, आणि व्यवस्थापनाचं शिक्षण होत जातं. यावर्षी अक्षरभूमीच्या अंगणात मुलांनी काकडी, चमेली, आणि मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे. काकडीच्या वेलांना सध्या फुलं लागली आहेत. अक्षरभूमी शाळेतल्या शेतीतून मिळणारा भाजीपाला यावर्षी जवळच्या गावच्या आठवडी बाजारात विकण्यासाठी घेऊन जायचं असं अक्षरभूमी शाळेने ठरवलं आहे.

शेती, जंगल, पक्षी, प्राणी, आणि जैवविविधतेबद्दल कुतूहल असणाऱ्या मुलामुलींमधले असे गुण लक्षात घेऊन, दर आठवड्याला या  मुलांची शिवारफेरी काढली जाते. परिसरात दिसणाऱ्या जैवविविधतेचं निरीक्षण करताना मुलांकडून येणाऱ्या प्रश्नातून शिवारफेरीमध्ये शिक्षकांनाही तिथे नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. या प्रयोगातून कोणत्या मुलामध्ये कुठली कौशल्यं आहेत हे ओळखायला आम्हाला मदत होते. मुलांसोबत शिक्षणाचा हा प्रयोग करताना आमच्यामध्ये खूप बदल झाला आहे. मुलांच्या जगात काय चालतं हे आता आम्हाला मुलांसोबत राहून कळायला लागलंय. शिक्षण देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाजवळ एखाद्या मुलाने स्वत:हून येऊन त्याला पडणारे प्रश्न मोकळेपणाने व्यक्त करणं, हे सर्जनशील आणि आनंददायी शिक्षणाची पहिली पायरी आहे असं मला वाटतं. या संवादातून मुलांमधली सर्जकता ओळखायला मदत होते.

दुसरी गोष्ट, बेरोजगारीवर उपाय म्हणून शासनाने कोणतीही योजना राबवताना यंत्राने काम करून घेण्याचे कमी मार्ग अवलंबवावे. उदाहरण म्हणून ग्रामीण क्षेत्रात वनविभागाची जंगलात करण्यासाठीची अनेक कामे निघतात. बंधारे, डीप सीसीटी, चरे, यांतली काही कामे तरुण आवडीने करू शकतात. परंतु जेसीबीच्या सहाय्याने ही कामे करवून घेतात. शासनाने त्यांच्या धोरणात बदल करून ग्रामसभा सक्षम करण्यावर लक्ष दिलं तर काही प्रमाणात गावाकडील युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटू सकतो. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात मेंडालेखा, पाचगाव यांसारख्या गावांमध्ये युवकांसोबत असे प्रयोग करून प्रभावी काम झालं आहे आणि तिथला रोजगाराचा प्रश्न सुटलाय असं मिलिंद बोकील सरांच्या एका पुस्तकात माझ्या वाचण्यात आलं. माझ्या गावातील असे अनेक मित्र असे आहेत ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, पण बँका त्यांना कर्ज देत नसल्यामुळे ते राहून जात आहे. तेव्हा बँकानीही कोणतीही अट न ठेवता, बेरोजगार युवक-युवतींना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी वेगळं धोरण ठरवावं. या प्रयत्नातून नेटसेट, डीएड, बीएड करून बेरोजगार राहिलेल्या तरुणांच्या आयुष्यात काहीतरी केल्याचं समाधान मिळेल!!

अक्षरभूमी शाळा,
टिटवा (बेडा), झेप संस्था

अभिप्राय 3

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.