गुणवत्ता विरुद्ध आरक्षण

गुणवत्ता विरुद्ध आरक्षण हा आपल्या समाजात निरंतर सुरू असलेला आणि विशिष्ट गंड निर्माण करणारा प्रश्न आहे.

खरे तर घटनाकारांनी विशिष्ट समाजघटकांसाठी स्वातंत्र्यानंतर काही मर्यादित काळासाठी आरक्षणाची तरतूद ठेवली होती. तथापि राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी आरक्षण हा घटनेचा मूलभूत अधिकार असल्यासारखे प्रस्थापित केले. सध्या तर आरक्षणाविरुद्ध जो कोणी काही बोलायचा, करायचा प्रयत्न करेल तो राष्ट्रद्रोही असे ठरवण्याइतकी गंभीर परिस्थिती आहे. घटनाकारांनी नेमून दिलेल्या कालावधीत विशिष्ट समाजाचा विकास आपण करू शकलो नाही याचे वैमनस्य अथवा अपराधीपण राज्यकर्त्यांना कधीच वाटले नाही आणि त्याचा उपयोग करून आपला विकास करून घेण्याची संधी गमावल्याचे वैषम्य तशा समाजघटकांनाही वाटले नाही. 

मागासलपणाचे वैषम्य वाटण्याइतकी जाणीव जरी शिक्षणाने अशा समाजात निर्माण झाली तर त्यांचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. सध्या आरक्षण हा एक हक्काचा भाग समजला जातो जे संपूर्णपणे चूक आहे.

मागासलेल्या व्यक्तीच्या मानसिक आणि वैचारिक प्रगतीसाठी आजच्या शिक्षणपद्धतीने कितपत फरक पडतो आहे किंवा नाही ते आपण बघतोच आहे. समाजातल्या मागास समजल्या जाणाऱ्या घटकांमध्ये प्रथम सुधारणेची/प्रगतीची मानसिकता निर्माण होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी शासनासोबत सामाजिक संस्था, व्यक्ती, संघटना, समूह यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्रगती ही आरक्षणाने होऊ शकते हा समज समाजमनातून निरस्त करणे गरजेचे आहे. 

आरक्षणामुळे अनेक चांगली आणि होतकरू मुले चांगल्या संस्थांच्या प्रवेशापासून वंचित राहतात आणि त्यामुळे ती विदेशात शिक्षण घेण्याचा विकल्प निवडून तिकडेच स्थायिक होतात. आरक्षण व्यवस्थेचा ब्रेन-ड्रेन हा एक मोठा दुष्परिणाम आहे. तथापि सध्या अनेक चागल्या संस्थांची संख्या आणि पर्यायाने प्रवेशसंख्या वाढल्याने चांगल्या मुलांचा होणारा कोंडमारा थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होतो आहे असे वाटते.

शिक्षणाच्या समान संधी सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन शिक्षणप्रणालीत काही चांगले बदल केले आहेत ज्यांमध्ये विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार, सरजनशीलतेनुसार पर्याय निवडण्याची मुभा आहे. त्यामुळे विशिष्ट अभ्यासक्रमाचा हेका धरून शिक्षण घेणाऱ्या मुलांना आपल्या बुद्धी/शक्तीचा अदमास घेऊन शिक्षण घेता येईल.

समाज आणि देश मला जे काही देतो ते समाजाला अथवा देशाला आपल्या शक्ती-बुद्धीनुसार परत करणे ही कर्तव्यभावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे हा जाणीवजागृतीचा एक भाग आहे. देशाच्या, पर्यायाने मानवी समाजाच्या प्रगतीसाठी सगळ्यांच्या जाणिवा जागृत असणे आवश्यक आहे. तेव्हाच  व्यक्तींचा संवाद सह्रदयतेने, कृती सद्विचाराने आणि जीवन सुख-समाधानाने व्यतीत करता येईल. शिक्षणाचा मूळ उद्देश ही अशी सुशिक्षित, सुजाण आणि सुविद्य पिढी निर्माण करणे हा आहे. नोकरी/व्यवसाय/व्यापार करता येईल असे शिक्षण हे जीवनाचा चरितार्थ चालवणयासाठी पुरेसे होऊ शकेल पण जीवनाचा मतितार्थ समजून जीवन जगणे आणि ते पूर्णत्वाला नेणे यासाठी प्रयत्नशील असणारी सुसंस्कारित पिढी निर्माण होणे हा शिक्षणाचा अंतस्थ हेतू आहे.

नवीन भारताच्या जडणघडणीत विविध समाजघटकांच्या विचारात एकजिनसीपणा, आचारात एकवाक्यता आणि मनात कमालीचे प्रेम आणि सौहार्दता निर्माण होणे गरजेचे आहे आणि तीच मानवधर्माची शिकवण आहे. या शिकवणीला मूर्त स्वरूप देण्याचे शिक्षण हे एक साधन आहे.

राजकीय पक्षांनी आपले स्वार्थ देशासाठी बाजूला ठेवून जर जात-पात, धर्म, पंथ इत्यादी अधिष्ठित आरक्षण रद्द करून आर्थिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण सरसकट सर्वांसाठीच लागू केले तर ते समाजातील सर्वच घटकांसाठी उपयोगी ठरेल आणि त्यांच्या मनात एकमेकांबद्दल निर्माण होणारा आकस अथवा सामाजिक तेढ असणार नाही.

गुणवत्ता तपासण्याचे निकष ठरवायचे असल्यास विद्यार्थ्याच्या I.Q. (intelligence quotient) सोबत E.Q. (emotional quotient), A.O. (adverse quotient), S.Q. (spiritual quotient), C.Q. (creative quotient) सुद्धा तपासणे गरजेचे आहे. गुणवत्तापरीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊन चांगल्या संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी जीवनाच्या परीक्षेत चांगला टिकाव धरतीलच असे निश्चित सांगता येणार नाही.

बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता अतिशय वाढलेली आहे कारण त्यांच्या कोवळ्या मनावर येणारा ताण सहन करण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. त्यामुळे सुखाच्या भ्रामक कल्पना मनाशी बाळगून आपले अख्खे जीवन उद्ध्वस्त करायला निघालेली हुशार मुलांची संख्या बघून नवी पिढी कशी असणार हा एक मोठाच प्रश्न आहे.

खरे सुख बाह्य जगात नसून आपल्या आतच आहे हे मनावर बिंबवणारे संस्कार, त्यानुरूप शिक्षण, विचार आणि आचार याची जाणीव विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. कृष्णमूर्ती म्हणत असत – find out who am I अथवा समर्थ म्हणतात 

नाना विद्यांचे ज्ञान,
नाना शास्त्रांचे ज्ञान,
नाना अस्त्रांचे ज्ञान,
म्हणजे ज्ञान नव्हे ||

तर ज्ञान म्हणजे
आत्मज्ञान.

आपल्या संस्कृतीची खरी ओळख विद्यार्थ्यांना झाली तर अत्यंत हुशार आणि जिज्ञासू वृत्तीच्या आजच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे आणि पश्चिमेच्या अंधानुकरण करण्याच्या प्रवृत्तीपासून थांबवणे ही दोन मोठी आव्हाने आहेत.

अभिप्राय 2

  • आरक्षणापाठीमागचा हेतू हा शतकानुशतकाच्या एका वेगळ्या प्रकारच्या गुलामीतून बाहेर पाडण्याचा मार्ग, तोदेखील काही प्रमाणात व्हावा ही इच्छा. ती समजून घेतली आहे असे वाटत नाही. “जात नाही ती जात” अशी सामाजिकता आणि जिचे गोडवे गायले जातात ती संस्कृती आपल्याला सतात सांगत असते. आजदेखील सफाई कामात १००% शूद्रच आहेत. त्यासंदर्भातदेखील बोलले गेले पाहिजे. आज जे आरक्षणाच्या सहाय्याने उच्चशिक्षण घेतात त्यांच्या खडतर वाटेचा विचार न केल्यामुळे आरक्षणाच्या बरोबरीने समाजिकतेमध्ये बदल न घडवला गेल्यामुळे इतर सहाध्यायांच्या “मागासलेले” म्हणून मिळाणाऱ्या वर्तणुकीमुळे आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या ज्या अनेक घटना आपण ऐकतो त्या म्हणजे या मुलांना होणाऱ्या त्रासाचे फक्त दृश्य स्वरूप आहे.
    त्यांचा संघर्ष असतो तो एकाकी असतो. आणि या प्रश्नांकडे बघण्यासाठी आपण जे गुणवत्तेचे निकष मानले आहेत त्यानुसार सामाजिक आणि अन्य अडसर कसे पार केलेत हेदेखील त्या मुलांच्या गुणवत्ता मोजण्याच्या पद्धतीचा भाग असायला हवा.
    ब्रेनड्रेनदेखील आरक्षण लाभार्थीवर दोषारोप करण्यासाठी वापरणे हे आजच्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल, बेकारीबद्दल आणि धर्माच्या नावाखाली वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अशांत वातावरणाचा परिणाम किती हे समजून घेणे आवश्यक आहे.
    प्रथम शिक्षण घेणारी पिढी, गरीबीमुळे आणि शिक्षणातील खाजगीकरणाचे रान, बंद होणाऱ्या सरकारी शाळा या मुलभूत प्रश्नांबद्दल विचार करायला हवा. गावगाड्याचे स्वरूप बदलले आहे का? आरक्षणाचा मुद्दा या सर्व अडथळ्यांना पार केल्यावर येतो.

  • श्री. दिलीप भराडे यांनी या लेखात अतिशय योग्य विचार मांडले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय समाजासाठी मर्यादित काळासाठी आरक्षणाची तरतूद केलेली होती. त्यांची विचारधारणा होती की, आरक्षणाचा लाभ घेऊन प्रगत झालेले मागासवर्गीय समाजातील लोक आपल्या ज्ञाती बांधवांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतील; व सर्व मागासवर्गीय समाज सुधारेल. पण झाले उलटच. प्रगत झालेल्या मागासवर्गीयांनी आपल्या समाजाशीच नाही, तर जन्मदात्या आई,वडिलांशीही फारकत घेतली. ते आपली जात लपवून उच्चवर्णीय समाजाशी जवळिक करू लागले. इतकेच नाही; तर आपल्या जातीवर आधारित आरक्षणाचे लाभ आपल्या मुलांसाठीही घेत राहिले. जाती,जातित वैमनस्य निर्माण व्हायला हीच त्याची वृत्ती कारणीभूत आहे. त्यावेळी सत्तेवर असलेल्या कांग्रेस पक्षाच्या सरकारने आपल्या राजकीय लाभासाठी आरक्षणाच्या तरतूदित ओबीसीची भर घातली. आज आपल्या महाराष्ट्रात चालू असलेल्या आरक्षणाच्या लाभासाठीच्या संघर्षाचे मूळ कांग्रेस सरकारच्या त्या निर्णयात आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.