दर्जेदार शिक्षण 

गुणवत्ता म्हणजे काय आणि शिक्षणातून गुणवत्ता कशी वाढवायची?

मी काही स्वत:ला शिक्षणतज्ज्ञ समजत नाही. पण तरीही हा विषय माझ्या खास जिव्हाळ्याचा आहे. १९७९-८० सालातली गोष्ट आहे. तेंव्हा मी वीस वर्षांची होते. पुणे विद्यापीठात जर्मन या विषयात एम.ए. करत होते. त्या काळी हा विषय तसा नवाच असल्यामुळे शाळांमध्ये जर्मन शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्याही तशी बेताचीच होती. तेव्हा एका शाळेतील ९वी व १०वीच्या वर्गांना जर्मन विषय शिकवणारे शिक्षक अचानक सत्राच्या मध्यातच सोडून गेले. अशावेळी त्यांची अडचण सोडवण्यासाठी आमच्या सरांनी मला त्या शाळेत शिकवायला पाठवले. त्यासाठी माझे विद्यापीठातले तासही सरांनी ॲडजस्ट केले. अशा रीतीने माझे शिक्षणक्षेत्रात अचानक पदार्पण झाले. 

पुढे मी अनेक वर्षे महाविद्यालयात जर्मन हाच विषय शिकवला. लग्नानंतर घरचे वातावरणही पोषक होते. सासूबाई महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाच्या विभागप्रमुख तर सासरे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ. त्यांनी या विषयावर विपुल लेखन केले होते. घरी अनेकदा यासंबंधी चर्चा होत व त्यात मी हिरीरीने भाग घेत असे. मी महाविद्यालयाव्यतिरिक्त इतरत्रही व्यक्तिमत्वविकासाच्या विविध कार्यशाळांमध्ये मार्गदर्शक म्हणून काम करत होते. थोडक्यात वयाच्या विसाव्या वर्षी जी अध्यापकाची वस्त्रे पांघरली ती कायमचीच. तरुण पिढीशी होत असणाऱ्या संवादातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्याला जर आदर्श आणि सुसंस्कारित भावी पिढी निर्माण करायची असेल, तर पहिली सुधारणा आपल्यातच झाली पाहिजे. आपल्यात म्हणजे या पिढीवर संस्कार करणाऱ्या अध्यापकांमध्ये. आणि या संपूर्ण शिक्षणपद्धतीतच सुधारणा व्हायला हवी. शिक्षण हे गुणवत्तेला अधिक प्राधान्य देणारे आणि दर्जेदार हवे. 

दर्जेदार आणि गुणवत्तेला केंद्रस्थानी मानणारे शिक्षण ही एक व्यापक संकल्पना आहे. यात शिक्षणाच्या विविध पैलूंचा समावेश होतो. या विषयाला एका व्याख्येच्या चौकटीत बसवणे कठीण आहे. तरीपण आपण ढोबळमानाने असे म्हणू शकतो, की जी शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना उत्तम, अर्थपूर्ण आणि प्रभावी शिक्षण उपलब्ध करून देते, तिला आपण दर्जेदार शिक्षणपद्धती म्हणू शकतो. दर्जेदार शिक्षण कशाला म्हणता येईल याचे काही निकष आहेत. 

मुळात विद्यार्थ्यांसाठी जो अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे, तो त्यांच्या गरजांशी, आवडीनिवडींशी सुसंगत तर हवाच पण त्याचबरोबर आधुनिक जगामध्ये जगण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी जी काही कौशल्ये असणे अत्यावश्यक आहे, त्यांना पुष्टी देणारा हवा. उदाहरणार्थ, पर्यावरणविज्ञान हा जर विषय असेल, तर केवळ पुस्तकी अभ्यासापेक्षा शाळेमध्ये कायमस्वरूपी बाग बनवणे, किंवा शेती यांसारखे उपक्रम राबवता येतील.

शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वा विद्यार्थिनींची पार्श्वभूमी काहीही असो, त्यांना शैक्षणिक संधी आणि संसाधनांची उपलब्धता समानच असली पाहिजे. खरे तर ही गोष्ट बोलायला जरी सोपी असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवणे महाकठीण आहे. आपल्याकडे ज्या शाळांना सरकारी अनुदान मिळते, त्या शाळांमध्ये प्रत्येक वर्गात आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील, तसेच आरक्षित जातिजमातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची शासनाने शाळांवर सक्ती केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्गात अशा मुलांना प्रवेश दिला जातो. यामागचा शासनाचा उद्देश जरी समभावाचा व सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्याचा असला, तरी तो खरोखर सफल होताना दिसतो का, हा मुख्य प्रश्न आहे. अशाच एका उच्चभ्रू वस्तीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मी एका कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गेले होते. कार्यक्रमानंतर जेव्हा तिथल्या शिक्षकांशी बोलत होते, तेव्हा कितीतरी शिक्षक या व्यवस्थेवर नाराज होते. या ‘अशा’ मुलांना प्रवेश देण्याची सक्ती आहे, ती वर्गात अंघोळ न करता घाणेरडे कपडे घालून कशी येतात, शिवीगाळ करतात, अभ्यास करत नाहीत, वगैरे वगैरे. जर खुद्द शिक्षकांचाच हा दृष्टिकोन असेल, तर वर्गातील इतर मुले ह्या मुलांशी कसे वागत असतील, हे न विचारलेलेच बरे. ते ऐकून मला फार दु:ख झाले. मग “त्या मुलांनी असे वागू नये यासाठी, किंवा त्यांच्यावर आपल्याला अपेक्षित ते ‘सुसंस्कार’ करण्यासाठी, इतर विद्यार्थ्यांनी ह्यांना आपल्यात सामावून घ्यावे यासाठी शाळेजवळ काय विशेष योजना आहे?” असे मी त्यांना विचारताच, “छे हो! वर्गात ६०-६० मुले असतात, वर्षासाठी नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण करतानाच नाकी नऊ येतात…” अशी उत्तरे मिळाली. त्यात शासनाकडून दोन-दोन वर्षे अनुदान येत नाही वगैरे विषयही निघाले आणि सर्वसमावेशक शिक्षणाचा प्रश्न बाजूलाच पडला. 

खरे तर दर्जेदार शिक्षणामध्ये कुशल आणि उत्साही शिक्षकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे, त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणारे अध्यापक जर सुरुवातीपासून त्यांच्या आयुष्यात असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडून येतो.

शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाची संरचना ही अत्यंत महत्त्वाची असते. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सखोल विचार करण्यास, आणि आपण होऊन समस्या सोडवण्यास प्रोत्साहन देणारा असावा. तो पाठांतरावर आणि केवळ स्मरणशक्तीवर भर देणारा नसावा, तर विद्यार्थ्यांच्या विश्लेषण करण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारा असावा. हे सगळे Socratic Questioning (शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचाराला उद्युक्त करणारे प्रश्न विचारणे किंवा त्यांना प्रश्न उपस्थित करण्यास प्रोत्साहन देणे), वर्गात वादविवाद आणि चर्चा घडवून आणणे, विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी देणे (उदाहरणार्थ, स्थानिक परिसराच्या शुद्धतेचा किंवा कचरा निर्मूलनाचा प्रश्न कसा सोडवावा?), ‘केस स्टडी’, वाचलेल्या पुस्तकावर चर्चा, शैक्षणिक खेळ, ग्रुप स्टडी, विद्यार्थ्यांना शाळेत शिकलेल्या गोष्टींविषयीचे जर्नल ठेवण्यास सांगणे, रोल प्ले अशा विविध मार्गांनी साध्य करता येईल. 

शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे, विविध संस्कृती आणि सभ्यतांना समाविष्ट करणारे असले पाहिजे असे आपण म्हणतो. पण हे नेमके साध्य कसे करायचे? याची सुरुवात अभ्यासक्रमापासून करता येईल. उदा. भाषेच्या वर्गात वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या लेखकांचे साहित्य विद्यार्थी अभ्यासू शकतील. यात केवळ भारतीय भाषांमधीलच नव्हे तर जगातीलही परकीय भाषांमधील साहित्य हेही अनुवादित स्वरूपात पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करता येईल. आज विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘वैश्विक गाव’ ही संकल्पना रुजलेली असून राष्ट्राराष्ट्रांमधील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. त्यामुळे या मार्गाने विद्यार्थ्यांच्या मनात विश्वबंधुत्वाची संकल्पना रूजवता येईल. शाळा व महाविद्यालयांच्या वार्षिक स्नेहसंमेलनांच्या कार्यक्रमात परप्रांतीय तसेच विदेशी लोकनृत्यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करता येईल. 

शिक्षणाच्या माध्यमाव्यतिरिक्त वेगळी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना विचारात घेऊन द्विभाषिक पाठ्यपुस्तके तयार करणे, अनुवादकांची मदत घेऊन अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासवर्गांचे आयोजन करणे इत्यादी गोष्टी करता येतील. विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचयातील गोष्टींची उदाहरणे देऊन त्यांचे वर्गातील शिक्षण अधिक मनोरंजक बनवता येईल. दिव्यांगांसाठी सर्व पाठ्युस्तके व इतर सामग्री ऑनलाइन उपलब्ध करून देणे इष्ट ठरेल. त्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन हे करावे लागेल. उदाहरणार्थ, दृष्टिबाधितांसाठी पुस्तके व नोट्स ऑडिओबुक्सच्या स्वरूपात उपलब्ध करून देणे ही शिक्षणसंस्थेची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत: धावपळ करण्याची वा बाहेरील स्रोतांची मदत घेण्याची गरज पडता कामा नये. परंतु दुर्दैवाने आज दृष्टिबाधितांना त्यांच्या उत्तरपत्रिका लिहून देण्यासाठी या शिक्षणसंस्था स्क्राईबची व्यवस्थासुद्धा करताना दिसत नाहीत. मग त्यांना बाकी सुविधा उपलब्ध करून देणे तर दूरची गोष्ट. 

जसे विद्यार्थी विविध स्तरातून आलेले, विविध पार्श्वभूमी असलेले असतात, तशीच विविधता जर शिक्षकांमध्येही असेल, तर शिक्षक- विद्यार्थी नातेसंबंध हे अधिक सामंजस्यपूर्ण होतात. आपल्याकडे अनुदानित शाळांना शिक्षकांच्या नेमणुकीच्या संदर्भात शासनाच्या काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते, त्यातून हे साध्य करण्याचा प्रयत्न असतो. खरा प्रश्न येतो तो खेड्यापाड्यांमधील शाळांमध्ये. तिथे तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधाही उपलब्ध नसतात. कधीकधी शाळेच्या वर्गांची, इमारतीची दुरवस्था असते, देवळात शाळा भरवावी लागते, दोन किंवा तीन यत्तांसाठी एकच शिक्षक असतो, वीज नसते, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. शहरातील सुशिक्षित शिक्षक खेड्यात जायला तयार नसतात. अशा वेळी ‘आदर्श शिक्षणपद्धती’ ही केवळ एक संकल्पनाच होऊन बसते. यासाठी एकेका उद्योगसमूहाने एक एक खेडे दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचे जर ठरवले, किंवा निदान त्या ठिकाणच्या शाळेच्या विकासाचा उपक्रम हाती घेतला, तर या अडचणींवर मात करता येईल. शहरातील शिक्षकांनी काही ठराविक मुदतीसाठी किंवा महिन्यातून दोन-तीन दिवस आळीपाळीने आपल्या जवळपासच्या खेड्यांमध्ये जाऊन तेथील मुलांच्या शंकांचे निरसन करायचे ठरवले, तरी त्यातून बरीच मदत होऊ शकेल. 

पाठ्यपुस्तकातील शिक्षण तर गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनकौशल्यामध्ये पारंगत होण्याची संधी मिळायला हवी. उदाहरणार्थ, संभाषणकौशल्य, टीमवर्क आणि डिजिटल साक्षरता.

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे केवळ तोंडी आणि लेखी परीक्षेवर आधारित असावे की नाही हा एक चर्चेचा विषय आहे. एक गोष्ट खरी की मूल्यमापनपद्धती ही निष्पक्ष आणि पारदर्शक असलीच पाहिजे. त्यात केवळ विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षा न होता त्यांची स्वतंत्र विचार करण्याची इच्छा व क्षमता, तसेच आकलनशक्ती यांचा कस लागला पाहिजे. 

दर्जेदार शिक्षण हे कधीच साचलेल्या डबक्याप्रमाणे असू नये तर ते परिवर्तनशील आणि विकसनशील हवे. ते शिक्षण बदलत्या शैक्षणिक गरजा आणि सामाजिक गरजांशी जुळवून घेणारे असले पाहिजे. 

एखाद्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याची, सुरक्षिततेची आणि कल्याणाची जबाबदारी ही काही प्रमाणात त्या संस्थेवरही असते. ही संस्था जर निवासी असेल, तर संस्थेवरची जबाबदारी कैक पटींनी वाढते. अशा सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वाढ व्यवस्थित होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. शिक्षणसंस्थेद्वारे विद्यार्थ्यांचे मोफत समुपदेशन, तसेच त्यांची नियमित शारीरिक तपासणी या गोष्टी आज बऱ्याच ठिकाणी होताना दिसतात, ही चांगली गोष्ट आहे. 

केवळ सराव केल्याने गुणवत्ता खरोखर वाढते का?

खरे तर हा प्रश्न म्हणजे एक Rhetorical question आहे. 

केवळ सराव केल्याने कोणत्याही व्यक्तीची गुणवत्ता वाढू शकत नाही हे तर वादातीतच आहे. पण ज्याला ‘Hands on learning’ (प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे शिक्षण) आणि Experiential learning (अनुभवातून शिक्षण) म्हणतात, त्या दोन्ही गोष्टी गुणवत्तेत वाढ होण्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जसे उत्तम गायक होण्यासाठी जात्या गोड गळा आणि सुरांची समज आवश्यक आहे, त्याचप्रमाणे गुरूकडून संगीताचे ज्ञान मिळणे, प्रशिक्षण आणि रियाझ या गोष्टींचे महत्त्वही डावलून चालणार नाही. हेच तत्त्व विद्यार्थ्यांच्या बाबतीतही लागू आहे. प्रत्येक मूल वेगळे असते. काही मुले एका जागी बसून एकलक्षीपणे कोडी सोडवतात, चित्रे काढतात तर काही अगदी लहान वयापासून मैदानी खेळांमध्ये रस दाखवतात. कुणाचा विज्ञान, गणित अशा विषयाकडे कल असतो, तर कुणाला भाषेत गती असते. मुलांचा नैसर्गिक कल कशात आहे हे घरी पालकांना आणि शाळेत शिक्षकांना अगदी बालवर्गापासून ओळखणे शक्य असते. मग मुलांना काही महत्त्वाचे विषय सामायिक ठेवून शिवाय त्यांचा स्वाभाविक कल जिकडे आहे, तो विषय शिकण्याची शाळेतच संधी मिळाली, तर ते योग्य होईल. 

सराव केल्याने विद्यार्थ्यांची शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय गुंतवणूक होते. ते प्रयोगशील बनतात. अभ्यासाद्वारे, विद्यार्थ्यांना विषयाची सखोल आणि अधिक व्यावहारिक समज प्राप्त होते. सराव केल्याने त्यांना दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्याचे आणि निर्णय घेण्याचे आव्हान मिळते. अनुभवाधिष्ठित शिक्षणात विद्यार्थ्यांना संवेदी अनुभव (sensory experience) मिळतात आणि त्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने त्यातून मिळालेले ज्ञान त्यांच्या मनात खोलवर रूजते.

थोडक्यात सांगायचे तर आपल्या झपाट्याने बदलणार्‍या जगात व्यक्तीचा वैयक्तिक विकास होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी रूजून ते सक्षम झाले पाहिजेत. त्याचबरोबर मुलांच्या मनातील देशप्रेम, सामाजिक बांधिलकी यांसारख्या जाणिवा जागृत करून त्यांना खतपाणी घालण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शालेय व आंतरशालेय स्तरावर देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा, नाट्यछटा व निबंधस्पर्धांचे आयोजन, शाळा व महाविद्यालयीन पातळीवर वक्तृत्वस्पर्धांचे आयोजन इत्यादी उपक्रम यासाठी राबवता येतात. विविध दिवसांचे औचित्य साधून कोणते सांस्कृतिक कार्यक्रम वा उपक्रम आयोजित करण्यात यावे याचे आदेश शिक्षणखात्याकडून शिक्षणसंस्थांकडे वर्षाच्या सुरुवातीलाच जात असतात व त्यांचे या संस्थांकडून पालनही होताना दिसते ही जमेची बाजू आहे. 

आरक्षण आणि गुणवत्तेचे समीकरण 

भारतातील आरक्षणप्रणाली, ज्याला सकारात्मक कृती म्हणून संबोधले जाते, ती समाजात पिढ्यानुपिढ्या चालत आलेला भेदभाव, तसेच सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आणि समानता आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आली होती. भारतामध्ये शिक्षणात जातीवर आधारित आरक्षण असणे हे न्याय्य आहे की नाही हा प्रश्न गुंतागुंतीचा आणि वादग्रस्त असून त्याविषयी अनेक परस्परविरोधी मते विचारवंतांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहेत. पण माझ्या मते कोणत्याही एका बाजूचा पुरस्कार करून केवळ तीच बाजू बरोबर आहे असे म्हणणे योग्य नाही. 

मी स्वत: जर तथाकथित उच्च जातीत जन्माला आले असेन आणि लहानपणापासून मला पावलोपावली स्वत:ला सिद्ध करत असताना या आरक्षणाचा सामना करावा लागला असेल, मग तो हव्या त्या वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचा प्रसंग असो, नाहीतर नोकरीत पदोन्नतीची बाब असो, केवळ विशिष्ट जातीचे नसल्याबद्दल मला डावलून तिथे दुसऱ्या कुणाला जागा मिळणार असेल, तर आरक्षणाबद्दलचे माझे विचार अर्थातच नकारात्मकच असणार. त्यामुळे समजा आरक्षण ठेवायचेच झाले, तरी ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे या एकाच निकषावर असायला हवे, त्यात जात-पात मध्ये आणण्यात येऊ नये, हे माझे मत असणार. पण त्याचबरोबर समाजातील तथाकथित नीच जातीत जन्माला आलेल्या मुलांना कोणत्या जीवनसंघर्षाला तोंड द्यावे लागते, याची कल्पना मला कुठून असणार? हा जीवनसंघर्ष कदाचित केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या परंतु उच्च जातीत जन्माला आलेल्या व्यक्तीच्या वाट्याला येईलच, असे नाही. 

ज्या व्यक्तींना जन्मापासून सतत समाजाकडून हीन दर्जाची वागणूक देण्यात येते, अशा माणसांचा खच्ची झालेला आत्मसन्मान त्यांनी परत कसा मिळवायचा? ज्यांना घरातूनच शिक्षणाचे किंवा चारित्र्यसंपन्नतेचे संस्कार मिळत नसतील, ज्यांच्या पालकांसमोर केवळ कुटुंबाचे पोट भरण्याचीच विवंचना असेल, ज्यांना पोट भरण्यासाठी समाजात हीन दर्जाची मानली गेलेली कामे (केवळ त्या जातीत जन्माला आल्यामुळे) करावी लागत असतील, अशांनी दर्जेदार शिक्षण मिळवायचे तरी कसे? तुम्ही जर अशा मुलांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी प्रवेशाचे निकष थोडे शिथील केले, तर त्यात गैर काय आहे? शेवटी संधीची समानता हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. म्हणूनच आरक्षण हा तसे पाहायला गेले तर जरा ‘ग्रे’ एरिया आहे.

आरक्षणामध्ये धोरणात्मक बदल घडवून आणणे, मागासवर्गियांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने त्यांना अधिकचे मार्गदर्शन, वह्या, पुस्तके व इतक शैक्षणिक सामग्री मोफत उपलब्ध करून देणे हे मार्ग आहेत. त्याचप्रमाणे मागासवर्गियांसाठी जरी एखाद्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे नियम शिथील करण्यात आले, तरी तो विद्यार्थी जेव्हा पदवी प्राप्त करून बाहेर पडेल, तेव्हापर्यंत त्याचा शैक्षणिक दर्जा हा त्याच्याबरोबर शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांएवढाच उंचावलेला असेल, ही अपेक्षा आहे. 

सर्जनशीलतेसारखी उच्च कौशल्ये शिकवणे शक्य आहे काय? 

याचे उत्तर हो असे आहे. सर्जनशीलता ही गोष्ट काही प्रमाणात शिकवणे आणि वाढवणे शक्य आहे. सर्जनशीलतेमध्ये जन्मजात प्रतिभा किंवा मानसिक कल यांचा समावेश असतो, परंतु ती विविध शैक्षणिक आणि अनुभवात्मक पद्धतींद्वारे विकसित आणि वर्धितही केली जाऊ शकते. वर्गात विशिष्ट वातावरण तयार करून विद्यार्थ्यांना नवीन कल्पना शोधण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि Out of the box विचार करण्यासाठी शिक्षक आणि मार्गदर्शक प्रोत्साहन देऊ शकतात. शाळा व महाविद्यालयात कायमस्वरूपी प्रकल्प सुरू करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची, संशोधनाची संधी देता येते. यातून त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते. आणि कुतूहल-चलित (curiosity driven) शिक्षण सर्जनशीलतेला चालना देऊ शकते.

एका गोष्टीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात ही कल्पना विद्यार्थ्यांना लहान वयातच शिकवण्यात आली पाहिजे. आपल्यापेक्षा विभिन्न संस्कृतीच्या व्यक्तींना आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेऊन एकोप्याने व परस्परसामंजस्याने खेळीमेळीच्या वातावरणात राहण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना लहान वयापासून वर्गातच मिळाले पाहिजे. म्हणजेच त्यांचे विचार संकुचित न राहाता सर्वसमावेशी बनतात. 

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढवण्यासाठी त्यांना आव्हाने स्वीकारण्याचे व प्रसंगी धोका पत्करण्याचे महत्त्वही प्रत्यक्ष प्रयोगातून शिकवता येऊ शकते. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही, पण म्हणून अपयशाने खचून जाऊन प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत, हे विद्यार्थी यातून शिकतात. 

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या व मर्यादित संसाधने असलेल्या वैविध्यपूर्ण देशात, दर्जेदार आणि सर्वांना परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देणे हे एक जटील आव्हान आहे, परंतु हे साध्य करण्यासाठी काही धोरणांचा अवलंब करता येईल. उदाहरणार्थ, दुर्गम प्रदेशात शिक्षणाची गंगा पोचवण्यासाठी डिजिटल शिक्षण, पब्लिक प्रायव्हेट (सामुदायिक-खाजगी) भागीदारी व खाजगी क्षेत्राचा सहभाग, मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (व्यावसायिक सामाजिक जबाबदारी) अंतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य, ओपन सोर्स सामग्रीचा शिक्षणासाठी मोफत वापर आणि सामाजिक संस्थांचा तसेच व्यक्तींचा सहभाग अशा कितीतरी मार्गांनी आपण काही वर्षांत आपल्या देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावू शकू, यात शंका नाही. सुस्थितीत असलेल्या, प्रापंचिक जबाबदारीतून मोकळ्या झालेल्या अनेक सुशिक्षित नागरिकांना आपल्या परिसरातील शाळेत जाऊन तेथील शिक्षकांच्या कामात हातभार लावता येईल. त्यासाठी त्या शाळेला, तेथील विद्यार्थ्यांना नक्की कशा स्वरूपाच्या मदतीची गरज आहे, हे समजून घेण्यासाठी अशा व्यक्तींनी एकत्र येऊन जवळपासच्या शाळेतील शिक्षकवर्गाची गाठ घ्यायला हवी, काय करता येईल याविषयी संघटित स्वरूपाची चर्चा घडून यायला हवी. आज सर्वच शाळांमध्ये पालकसंघ, शिक्षकसंघ असतात आणि त्यांच्यातर्फे निदान काही शाळांमध्ये तरी असे उपयुक्त उपक्रम राबवण्यात येताना दिसतात. त्या उपक्रमांत जवळच्या परिसरातील नागरिकांनाही सहभागी करून घेता येईल. समाजसेवा करणे याचा अर्थ केवळ सामाजिक संस्थांना आर्थिक मदत देणे असा नसून समाजाला जिथे गरज असेल तिथे आपला वेळ देणेही तेवढेच महत्त्वाचे असते. माझ्याच परिचयाचे एक उच्चशिक्षित पतिपत्नी त्यांच्या शहरातील एका आश्रमशाळेत जाऊन आठवड्याचे काही तास तेथील मुलांना मोफत पदार्थविज्ञान व गणित हे विषय शिकवतात. तसेच त्यांचाच मुलगा आठवड्यातील शनिवार व रविवारी घरातून संगणाकाद्वारे दूरच्या खेड्यात राहणाऱ्या वंचित मुलांसाठी मोफत अभ्यासवर्ग घेतो. आपल्या घरी घरकामासाठी येणाऱ्या स्त्रियांना साक्षर बनवणे, त्यांच्या मुलांना शिक्षणाला मदत करणे, अभ्यासात मार्गदर्शन करणे हे तर आपल्यापैकी प्रत्येकजण करू शकतो. 

शिक्षणाचा दर्जा उंचावणे ही केवळ सरकारची जबाबदारी आहे असे न मानता प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग त्यात द्यायला हवा, तरच हे शक्य होईल. 

अभिप्राय 7

  • शिक्षक म्हणून काम करताना उपयोगात येणार्या गोष्टी आपण सांगितला आहात. धन्यवाद!

    • दर्जेदार शिक्षणासाठी काय करता येईल यासंबंधीच्या अत्यंत उपयुक्त आणि व्यवहारात आणण्यासारख्या सूचना आपल्या लेखात आहेत. शिक्षकांच्या प्रशिक्षणात त्याचा आवर्जून उपयोग करायला हवा.

  • शिक्षणक्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कल्पना उत्तम आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात अंमलात आणण्यायोग्य आहे.

  • माननीय लीनाताईंनी अगदी सखोल विचार व्यक्त केले आहेत. मुळात त्यांचा अनुभवच खूप मोठा आहे शिक्षण क्षेत्रातील, त्यामुळे या विषयावर सर्व अंगांनी त्यांनी विचार केला आहे हे वाचताना जाणवते. शिक्षक आणि पालकांनी आधी स्वतःला बदललं पाहिजे हे शंभर टक्के खरं आहे. मुलांचा कल लहानपणीच ओळखून त्या दृष्टीने त्याचा कसा विकास होईल हे बघणं हा शिक्षणाचा मुख्य हेतू असावा हे अगदी बरोबर आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर त्यांनी संयमितपणे विचार व्यक्त केले असले तरी ते सुयोग्य आहेत. सर्व बाजूंचा साधकबाधक विचार करूनच आरक्षणाच्या निकषांचा पुनर्विचार व्हावा हवा. एकुणातच शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवा यात शंकाच नाही. लेख आवडला. सर्वांगीण झाला आहे.

  • अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर व्यापक, विस्तृत आणि वेचक विवेचन! लेखिका स्वत: हुशार विद्यार्थिनी असल्याने तसेही घडण्यासाठी लागणारा दृष्टिकोन या लेखाचा गाभा असावा! तसेच नंतरचे अध्यापनातील स्वानुभव सुद्धा डोकावताना दिसतात. एकंदरीत सर्वांगीण, अर्थपूर्ण, वैचारिक आणि व्यावहारिक मुद्द्यांचा संतुलन राखत दिशा दर्शक आणि विचार करायला लावणारा लेख!!

  • प्रत्यक्ष प्रयोगातून आणि अनुभवातून शिक्षण मिळवण्यासाठी अभ्यासक्रमात तसे नियोजन केले पाहिजे.
    उदा.टॉर्च बॅटरी तयार करणे, मोबाईलची बॅटरी करणे,
    साबण तयार करणे, परफ्युम तयार करणे, माचिस काडी तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, पंख्याची रचना, वॉटर प्युरिफायर तयार करणे , इलेक्ट्रॉनिक सायकल , सॅनिटायझर hand-wash तयार करणे इत्यादी ..
    तसेच खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी किमान तालुक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक मैदान पाहिजे..
    सिंथेटिक ट्रॅक, खेळांविषयी माहिती व मार्गदर्शन करणारे शिक्षक..

  • लीनाबेटी, तूं खरोखरच या लेखात सध्याच्या शिक्षणव्यवस्थे विषयी चांगले विश्लेषण केले आहेस. पण फारच थोडे शिक्षक एक ध्येय म्हणून या क्षेत्रात येतात. जास्त करुन शिक्षक हे कुठेच नोकरी मिळत नाही, म्हणून नाइलाजाने शिक्षक होतात. त्यामुळे ते एक इतिकर्तव्य म्हणून शिकवत असतात. माझ्या लहानपणी पन्नासच्या दशकात जिल्हापरिषदेच्या शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी धडपडत असत. आजही थोडेफार शिक्षक चांगले आहेत, त्यामुळे कांही जिल्हापरिषदेच्या आणि नगरपालिकेतिल शाळांचे रिझल्ट शंभर टक्के लागतात. पण खरेतर आपल्या देशात सुरुवातीपासूनच शिक्षण क्षेत्रात हेळसांड करण्यात आलेली आहे. पहिली ऐए क, दोन दशकं शिक्षणमंत्री मदरशात शिकलेले मौलवी होते. तसेच शिक्षणक्षेत्राला आपल्या राष्ट्रीय उत पन्नातिल फक्त आडीच टक्के निधी उपलब्ध करण्यात येत असे. अजुनही त्यात हवी तशी वाढ झालेली नाही. इंग्रजांच्या काळातिल फक्त कारकून बनवणारी शिक्षणपद्धती चालू आहे. पण आता गेल्या कांही वर्षांपासून केंद्रातिल आणि आपल्या राज्यातिल सरकार शिक्षणक्षेत्रात मूलभूत सुधारणा करण्यासाठी पाउलं उचलत आहे. त्यामुळे कदाचित पुढील काही वर्षात शिक्षणक्षेत्रात काही चांगला बदल होण्याची अपेक्षा करायला हरकत नसावी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.