आजच्या शाळा आणि पाठ्यपुस्तके आजच्या जगासाठी मुलांना तयार करत आहेत का?

विदासंकलन आणि विश्लेषण : विनय, निलेश, अंजली, कांचन, प्रशांत, पायल, गणेश

७ वर्षांपूर्वी एका गावात सुदीपला भेटलो (बदललेले नाव), वय वर्षे २६. सुदीप आणि त्याचा भाऊ १०वीपर्यंत सोबत शिकले. त्याच्यानंतर घरातील आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्यामुळे दोघांपैकी एकाचेच शिक्षण शक्य होते. घरातील हुशार मुलगा म्हणून सुदीपचे शिक्षण सुरू ठेवले आणि दुसऱ्या भावाने शेतीची जबाबदारी घेतली. सुदीपने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले, आणि मग कामाचा शोध सुरू झाला. तीन वर्षांपासून त्याच्या हाती काही लागत नाही आहे. घरातील शेतीमध्येही मन लागत नाही आणि इतर काही कामही जमत नाही. त्यामुळे घरच्यांवर ओझे असल्याची भावना सतत त्याला खाते आहे. काही दिवसांपूर्वी तो पुन्हा भेटला. एका मार्केटिंग कंपनीत कंत्राटी तत्त्वावर काम करतो आहे, ८-१० हजार रुपये मिळत आहेत. पुढील कामाची शाश्वती नाही, नवीन कौशल्ये विकसित करण्याची संधी आणि मार्गदर्शनही नाही. वय ३२-३३ झाले आहे. लग्न झाले, एक मूल आहे. तथाकथित वरच्या सामाजिक स्तरातून येतो, त्यामुळे गावात जाऊन छोटे-मोठे काम करण्याचीही लाज वाटते. अजून दोन, चार वर्षांनी काय होईल? तो कसे आयुष्य जगत असेल याची कल्पना करूनही काळजी, भीती वाटते.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार २०१९ साली भारतातील १५ ते २९ वयोगटातील ३४% युवा कोणत्याही कामात, शिक्षणात किंवा प्रशिक्षणामध्ये नाहीत. आज जगातील संसाधने मर्यादित आहेत, आणि लोकसंख्या वाढते आहे. अशा परिस्थितीत हा आकडा अजूनच मोठा होत जाईल. त्यात आता कृत्रिमप्रज्ञा, स्वयंचलन तंत्रज्ञान यामुळे कामाच्या संधी झपाट्याने कमी होत जातील आणि बदलतही जातील. त्यामुळे आज ज्या गोष्टींसाठी आपल्या शाळा मुलांना तयार करत आहे, त्यामध्ये मुलांचे भविष्य खरोखरीच सुरक्षित आहे का? किंवा ज्या जगात आपण प्रवेश करत आहोत (केला आहे) त्यासाठी आज आपल्या शाळा आपल्याला कितपत तयार करत आहेत? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या उत्तराचा गंभीरपणे मागोवा घेतला तर आणि तरच आपण अशी शिक्षणव्यवस्था निर्माण करू शकू जी मुलांना या बदलत्या, आव्हानात्मक जगासाठी तयार करू शकेल. 

प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा एक मार्ग म्हणजे आज मुले शाळेत जे कृतीकार्यक्रम करत आहेत, प्रश्न सोडवण्याचा जो सराव करत आहेत त्यातून ह्या बदलत्या जगात ज्या कौशल्यांची मागणी आहे, ती विकसित होणार आहेत का याची पडताळणी करणे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ‘Future of Jobs Report 2023’ मध्ये  आजच्या अर्थव्यवस्थेत सर्वांत जास्त मागणी असणाऱ्या २६ कौशल्यांची यादी दिलेली आहे. आम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता ४ थी आणि इयत्ता १० वी मधील पुस्तके उघडली आणि पहिल्या ९ पैकी कोणत्या कौशल्यांचा वृद्धीसाठी, किती आव्हाने, अनुभव पाठ्यपुस्तकांमध्ये निर्माण करण्यात आलेले आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पुस्तकातून यादृच्छिक नमुना पद्धतीने (Random Sampling) ५ पाने निवडण्यात आली आणि त्या पानांवर दिलेले प्रश्न, कृतीकार्यक्रम, आव्हाने यांची यादी केली. मग तो-तो प्रश्न सोडवताना कोणती कौशल्ये वापरावी लागतील (किंवा त्यांचा अभ्यास/सराव होईल) यानुसार मूल्यांकन केले. 


वरील आलेख दर्शवतो त्याप्रमाणे बहुतेक प्रश्नांचा भर हा ‘विश्लेषणात्मक विचार’ या एकाच कौशल्यावर केंद्रित आहे. किंबहुना मुले जसजशी मोठ्या वर्गात जातात तसतसा सर्जनशीलता, स्वभान, नेतृत्व आणि सामाजिक कौशल्य यांवरील भर आणखी कमी होतो. त्यामुळे आज बहुतांश मुले पदव्या तर घेतात मात्र, प्रत्यक्ष कामामध्ये लागणारी कौशल्ये त्यांना अवगत होत नाहीत. ही समस्या व्यवसायातील आणि आयुष्यातील कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अजून गंभीर होईल. कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञानाची एक सर्वांत मोठी ताकद म्हणजे विश्लेषणात्मक कौशल्य. त्यामुळे ज्या काही विश्लेषणात्मक कौशल्यावर आधारित कामाच्या संधी उपलब्ध आहेत, त्याही संपुष्टात येतील. कृत्रिमप्रज्ञा तंत्रज्ञानामुळे शाळेतील एका विशिष्ट पठडीतील शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी उपजीविकेची समस्या अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे या शतकामध्ये सामाजिक-भावनिक कौशल्ये,  लवचिकता, सर्जनशीलता, स्वतःहून काहीतरी निर्माण करण्याची क्षमता या कौशल्यांना अधिक महत्त्व येणार आहे आणि त्यानुसार मुलांच्या अनुभवाप्रमाणे आपले शालेय शिक्षण बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

प्रथमदर्शनी असे वाटू शकते की जर सर्वच कौशल्यांचा अनुभव मुलांना द्यायचा असेल तर प्रत्येक कौशल्यासाठी थोडी थोडी संधी असू शकते. पण शिक्षणाची नैसर्गिक, अनुभवाधारित पद्धती अवलंबली तर एकच कृती करताना, प्रश्न सोडवताना मुलांचा विविध कौशल्यांचा सराव होत असतो. त्यामुळे यातील प्रत्येक कौशल्यासाठी ३०-४०% पेक्षा अधिक वेळ/संधी उपलब्ध असणे सहज शक्य आहे. याच सर्वेक्षणातील नमुन्यामध्ये ३% कृतीकार्यक्रम/प्रश्न असे होते ज्यामधून ५ किंवा जास्त आणि २२.५४% कृतीकार्यक्रम/प्रश्न असे होते, ज्यामधून ४ किंवा जास्त कौशल्यांचा अभ्यास होतो. सर्वांगीण विकासाला पोषक असे प्रश्न ३% आहेत, तर मग ४०-५०% का असू शकत नाहीत? त्यासाठी मुलांसाठी अधिक सजगपणे अनुभवनिर्मिती करणे गरजेचे आहे. एक उदाहरण पाहू. 


दहावी गणिताच्या पुस्तकातील हे एक गणित आहे. हे गणित सोडवताना मुले थोडेफार विश्लेषण करतील, त्यांना शिकवलेल्या सूत्रांचा उपयोग करतील आणि उत्तर लिहितील. हा प्रश्न सोडवताना मुलांची थोडीफार विश्लेषणक्षमता, थोडीफार चिकाटी, आणि बारकाव्यांकडे थोडेफार लक्ष ही कौशल्ये कामी येतील. देशातील कितीतरी ठिकाणी, कितीतरी लोकांसाठी हा प्रश्न काल्पनिक नाही. याच प्रश्नाचे प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर केले तर? एखाद्या गावामध्ये १० च्या मुलांच्या गटाला प्रत्यक्षात एखादा तलाव बनवण्याचा प्रकल्प सहज देऊ शकतो आणि सांगू शकतो की विशिष्ट साठवणक्षमतेचा तलाव बनवण्यासाठी सर्व काम तुम्हाला करायचे आहे. कल्पना करा, या अनुभवाभोवती या प्रश्नात अपेक्षित असलेले कितीतरी भूमिती, बीजगणित आणि शिवाय केवळ विश्लेषणात्मक कौशल्यच नव्हे तर सर्जनशीलता, चिकाटी, लवचिकता आणि अनुकूलन क्षमता, अंतःप्रेरणा आणि स्वभान, उत्सुकता आणि शिकण्याची मानसिकता, तांत्रिक साक्षरता, विश्वासार्हता आणि बारकाव्यांची सजगता, सहभावना आणि ऐकण्याची क्षमता, नेतृत्व आणि सामाजिक प्रभाव या सर्व कौशल्यांचा सराव होईल. 

मात्र दुर्दैवाने गणिताचा पूर्ण वर्षभराचा पाठ्यक्रम अशाच काल्पनिक प्रश्नांनी भरलेला आहे. त्यामुळे शाळेतल्या वयातली प्रचंड कल्पनाशक्ती, ऊर्जा आणि शिकण्याची भूक असलेली मुले आपले शेकडो तास अनुत्पादक आणि चवहीन कामांमध्ये घालवत मोठे होतात. हेच कारण आहे की, ७ एकर शेत असलेला सुदीप हे कधीच शिकू शकला नाही की त्याच्या शेतामध्येच किती उत्पादनक्षमता, गंमत आणि ज्ञान आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. योग्य ज्ञान आणि नियोजनाचा आधार घेऊन काही युवा अगदी ३-५ एकर शेतामध्ये वैभवसंपन्न शेती करत आहेत. वयाच्या ५ व्या-६ व्या वर्षांपासून आपल्या शेतीतील बारकावे, आव्हाने सुदीप शिकला असता तर आज ७ एकर शेती असलेला हा तरुण शहरामध्ये आपली संधी, संपन्नता शोधत भटकला नसता. मुद्दा हा नाही की जो जिथे असेल त्याने तेच करावे. मुद्दा हा आहे की आपला पाठ्यक्रम अधिक विकेंद्रित, त्या-त्या ठिकाणच्या भौगोलिक, सामाजिक-आर्थिक वास्तवाशी जुळलेला असेल, मुले स्वभान, आपल्या अवतीभोवतीच्या संधी आणि आव्हाने आणि महत्त्वाची सामाजिक-भावनिक कौशल्ये शिकली तर अशी पिढी तयार होईल ज्यांना जीवन, गरजा, आनंद याविषयी समतोल समज आहे, जे स्वतःहून आपलं विश्व निर्माण करू शकतात. अन्यथा अशीच तरुण पिढी तयार होत राहील जी केवळ कोणीतरी काम देईल अशा परावलंबी मानसिकतेमध्ये जगते. हे बदलावे यासाठी आपल्याला सातत्याने याविषयी चर्चा करण्याची, प्रश्न विचारण्याची, वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामधून आजच्या शिक्षणव्यवस्थेची केवळ डागडुजी होणार नाही, तर तिच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणता येईल.  

अभिप्राय 4

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.