किर्लोस्कर मासिक, अंधश्रद्धा निर्मूलनाची एक सामाजिक चळवळ

महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली पहिला उद्योगसमहू काढला. ह्या किर्लोस्कर उद्योगसमहूाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. १९२० ऑगस्टला त्याचा पहिला अंक निघाला. 

आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रूढी बोकाळल्या आहेत त्यांचे स्वरूप उघडे करून त्यांना आळा घालण्याचे प्रयत्न हे मासिक करील असे आश्वासन शंकरराव किर्लोस्कर यांनी या अंकात दिले. सामाजिक सुधारणा, जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये वैचारिक पातळीवर किर्लोस्कर मासिकातून तर प्रत्यक्षात किर्लोस्करवाडीमध्ये जोपासली जातच होती. र.धों. कर्वे, महादेवशास्त्री दिवेकर, वि.दा. सावरकर, न.र. फाटक असे अनेक विचारवंत आपली परखड आणि बरेचदा प्रक्षोभक अशी मते ह्या मासिकात निर्भयपणे मांडीत असत. 

ऑगस्ट १९२५ च्या अंकात र.धों. कर्वे यांचा ‘अमर्याद संतती’ हा लेख छापून आला होता. या लेखावरून वादळ उठले. ह्यात महात्मा गांधीजींच्या ‘संतती निर्माण करण्याकरताच समागम करावा, एरवी ब्रह्मचर्य पाळावे’ ह्या मतावर टीका केली होती. हे अनैसर्गिक आहे असे म्हटले होते. संत रामदासस्वामी ह्यांचे 

लेकुरे उदंड झाली। तों ते लक्ष्मी निघोनि गेली।।
बापडी भिकेस लागली। काही खाया मिळेना।।

हे वचन त्यात दिले होते. ह्या लेखावर सनातन्यांनी टीकेची झोड उठवली. शंकरराव किर्लोस्करांचे गुरू पं. सातवळेकर ह्यांनीही त्यावर टीका केली. औंधच्या महाराजांनी पण त्याबाबत जाब विचारला. संस्थानचे दिवाण जेकब बापूजी यांनी विल्सन महाविद्यालयाच्या मिशनरी संचालकांकडे कर्व्यांविरोधात तक्रार केली. कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना बोलावून संततीनियमनाचा प्रसार बंद करण्यास सांगितले. ‘गणित शिकवायला तुम्हाला पाहिजे तेवढी माणसे मिळतील पण संततीनियमनाचा प्रसार मी केला नाही तर तो बंद पडण्याचा संभव आहे’ असे बाणेदार उत्तर देऊन त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

पुढे १९२७ मध्ये र.धों.चा ‘विनय म्हणजे काय?’ हा लेख संभाव्य वादंग टाळण्यासाठी किर्लोस्करने छापायचे नाकारले. त्यात विनय म्हणजे एक ढोंग आहे, नग्नतेकडे तटस्थ वृत्तीने पाहणाऱ्याला त्याची लाज वाटण्याचे कारण नाही असे मत मांडले होते. तेंव्हा नाईलाजाने र.धों. कर्व्यांनी लैंगिक जीवन, कुटुंबनियोजन ह्या विषयाला वाहिलेले आपले स्वतःचे ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सुरू केले. तोवर किर्लोस्कर मासिक ही एक वाचक चळवळ बनली होती. १९२७ साली वर्गणीदारांचे ‘उत्कर्ष मंडळ’ सुरू करण्यात आले होते. ‘उद्धारेदात्मनात्मानं’ हे मंडळाचे ब्रीदवाक्य होते. ‘मी स्वतःचा उत्कर्ष स्वतः घडवून आणीन. सत्य, प्रामाणिकपणा आणि नीती सोडणार नाही. आरोग्याचे नियम पाळून दीर्घायुष्य मिळवीन. माझा उद्योग करताना स्वतःच्या स्वार्थाबरोबरच समाजाची सेवाही करीन.’ हे मंडळाचे उद्दिष्ट होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ध्येयधोरणाशी हे खूप मिळतेजुळते वाटते.

१९२६ मध्ये वाईच्या प्राज्ञपाठशाळेतून आलेले आधुनिक विचारांचे लेखक महादेवशास्त्री दिवेकर किर्लोस्करला मिळाले. त्यांनी बुवाबाजीच्या विरोधात एक आघाडीच उघडली होती. मे १९३३ मध्ये महादेवशास्त्री दिवेकरांनी ‘ब्रह्मज्ञान व बुवाबाजी’ हा लेख लिहून बुवाबाजी विरूद्धच्या मोहिमेतील पहिली तोफ डागली. साकोरीचे उपासनी महाराज आणि केडगावचे नारायण महाराज यांच्या बुवाबाजीवर झगझगीत प्रकाश टाकणारे लेख किर्लोस्करमध्ये आले. महादेवशास्त्री दिवेकर लिहितात, “एकदा मी एकादशीला गंगेवर स्नानासाठी गेलो होतो. धाबळी आणि पंचपात्री वाळूमध्ये झाकून खुणेसाठी वाळूचे लिंग केले होते. अर्ध्या घटकेने येऊन बघतो तो काय शेकडो वाळूची लिंगे तयार करून लोक ती पूजत आहेत आणि भटजी त्यांना पूजा सांगत आहेत असे दिसले.” ते पुढे मार्मिक टिप्पणी करतात. “मूर्खांचा पैसा हा लुच्च्या माणसांचा खुराक असतो.” महादेवशास्त्री दिवेकर यांनी बुवाबाजीवर प्रखर टीका केली आणि धर्माच्या नावावर चाललेली लबाडी उघडकीस आणली. नारायण महाराज उपासनी उर्फ उपासनीबुवा ह्यांच्या भक्तांनी किर्लोस्कर आणि पं. महादेवशास्त्री दिवेकर यांच्यावर खटले भरले. बुवांच्या जबानीत, “मी धर्मशास्त्र वाचलेले नाही. मी वेदांतही पढलो नाही. मी सांगेन तेच धर्मशास्त्र होय.” असे अकलेचे तारे त्यांनी तोडले. “ज्यांच्या इच्छेला येईल ते माझ्या दर्शनास येतात. माझी पूजा-अर्चा करतात. बायका माझ्या पायखान्याचीसुद्धा पूजा करतात. माझी लिंगपूजा करतात. मला लोक मुली अर्पण करतात. अशा पाच मुली माझ्याकडे आहेत. ह्या मुलींना मी पिंजऱ्यात ठेवतो.”

ह्याहूनही बीभत्स गोष्टी उपासनीबुवांच्या जबानीतून बाहेर आल्या. हजारो रुपयांची त्याने जमवलेली मालमत्ता उघडकीला आली. बुवांच्या पूर्वचरित्रात मनुष्यवधाबद्दल त्यांना झालेल्या तुरुंगवासाचा प्रश्न निघताच हे ‘अनंत कोटी ब्रम्हांड नायकू’ काकुळतीला आले. बुवाबाजीची फजिती सर्वदूर पसरली. 

१९२८ साली निघालेल्या शंभराव्या अंकात दिवेकर शास्त्री लिहितात, “हिंदू समाजाची उन्नती का होत नाही? याला कारण आमच्यात बोकाळलेला दैववाद होय. दैव असे काही नसते. उद्योग करणे वा न करणे ह्यामुळे आपण दैव ओढवनू घेतो.” त्यांनी अपशकुन आणि फलज्योतिष ह्यांचीही खिल्ली उडवली. त्याकाळी किर्लोस्कर मासिक म्हणजे बुवाबाजीवर हल्ला असे समीकरण बनले होते. बुवाशाही हा विचार शक्ती खच्ची करणारा गुप्तरोग आहे, असे मासिकात म्हटले होते. बुवाबाजीने नाडलेल्या लोकांच्या तक्रारी घेणारा एक ‘बुवाबाजी विध्वंसक संघ’ स्थापन करण्यात आला होता. १९३३ साली किर्लोस्कर मासिकाचे १२ हजार सभासद होते.

१९३४ साली वि.दा. सावरकर यांचे हिंदू धर्मातील सवंग प्रथा, जातिभेदाच्या रूढी-परंपरा यावर घणाघाती हल्ला करणारे विज्ञाननिष्ठ लेख किर्लोस्करमध्ये छापून येत. ‘जातिभेद हा जन्मजात नसून पोथीजात आहे.’, ‘दुसऱ्या जातीतील आमटीचा भुरका मारताच जात मोडते आणि नंतर पंचगव्य प्राशन करताच ती परत जोडता येते.’ या शंकराचार्यांच्या शास्त्रार्थावरून ‘जात मानण्यावर आहे’ हेच सिद्ध होते. सावरकर पुढे म्हणतात, “जात राष्ट्रहितास घातक आणि म्हणून पातकच मानली पाहिजे. कुत्र्यामांजराने स्पर्श केलेला आपल्याला चालतो पण आपल्यासाठी कष्ट करणाऱ्या अस्पृश्याचा स्पर्श आपल्याला चालत नाही.” 

‘गो-पालन हवे, गो-पूजन नव्हे’ हा त्यांचा लेख गाईच्या व्यगंचित्रासकट छापून आला होता. त्यात ते लिहितात, “गाय हा एक उपयुक्त पशू आहे. परंतु तिला देवता समजून तिचे शेण, मूत पवित्र म्हणून पिणे ही हतबद्धतेची कमाल झाली.” सत्यनारायणाविषयी ते म्हणतात, “संकटातून सोडविले म्हणून देवाचा सत्यनारायण करताना प्रथम त्याने संकटात टाकलेच का? असा प्रश्न विचारण्याचा आपल्याला हक्क आहे.” नेमक्या भाषेत मांडलेले हे मुद्देसूद विवेचन आणि धारदार उपहास यांमुळे किर्लोस्करमधील सावरकरांचे हे विज्ञाननिष्ठ निबंध खूप गाजले. १९७७ मध्ये आ.रा. देशपांडे यांच्या ‘ज्ञानेश्वर समाधीचे संशोधन’ या लेखाने वारकरी लोक खवळले होते.

प्रा. न.र. फाटक यांनी पण काळाच्या पुढचे, प्रागतिक विचार किर्लोस्करमधून मांडले. हिंदुस्थान निधर्मी राष्ट्र कसे होईल यासंबंधी त्यांनी सहा उपाय सुचविले ते असे, 

१. धर्म आणि देवाची राज्यकारभारातून उचलबांगडी करणे
२. यात्रा, उरूस आणि उत्सव ह्याची दखल न घेणे
३. सणावाराच्या सुट्ट्या बंद करणे
४. देवळांसाठी, त्यांच्या जीर्णोद्धारासाठी वगैरे शासकीय मदत नाकारणे 
५. वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे कायदे न करणे
६. धर्मशिक्षणाचे उच्चाटन करणे

हे सहा उपाय आजही विचारार्ह आहेत. 

शेअरहोल्डर्सकडून तसेच सनातन्यांकडून होणाऱ्या विरोधाला न जुमानता एखाद्या उद्योगसमहूाने आपल्या मुखपत्रातून सातत्याने अनेक वर्षे समाजप्रबोधनाची अशी सक्रीय चळवळ चालवली ह्याची योग्य ती दखल सामाजिक संघटनांच्या इतिहासात, त्याचप्रमाणे अंनिससारख्या संघटनांनी घेणे योग्य ठरेल. अगदी अलीकडे, म्हणजे १९८२ साली श्याम मानव ह्यांनी स्थापन केलेल्या ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे अध्यक्षपदही मुकुंदराव किर्लोस्कर यांनी भूषविले होते.

किर्लोस्कर मासिकाच्या ह्या वाटचालीचा सुंदर आलेख शांताबाई किर्लोस्कर यांनी आपल्या ‘गोष्ट पासष्टीची’ ह्या पुस्तकात मांडला आहे. किर्लोस्कर कुटुंबाच्या काही खाजगी तपशीलाबरोबरच त्याकाळच्या सामाजिक परिस्थितीचा व्यापक आढावाही त्यात वाचायला मिळतो. 

prabha.purohit@gmail.com

अभिप्राय 3

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.