चिथावणीला बळी पडू नका

नमस्कार. मला प्रथम माझी एक आठवण सांगायची आहे. आमच्याकडे एकदा पाहुणे येणार होते. तर त्यांना चहाबरोबर काहीतरी खायला द्यावे लागणार! संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे कशासोबत हे सांगायची गरज नाहीये. काहीतरी मागवायचं होतं खायला. तर आईने मला सांगितलं, “अरे, घरातले काजू आणि बदाम संपले आहेत तर पटकन् जाऊन घेऊन ये.” मी गेलो तर दुकानात काजू-बदाम नव्हते, संपले होते. मी तिथून फोन केला माझ्या भावाला आणि म्हणालो, “आईला विचार की तिथे काजू-बदाम नाहीयेत. तर काय करू?” आईने झटकन् सांगितलं, “दाणे असतील तर दाणे तरी घेऊन ये.” तर काल संध्याकाळी आपल्या आयोजकांना कळलं की निरंजन टकले येणार नाहीयेत, तर जे काही दाणे तुमच्या नशिबात आले आहेत, त्यांना काजू-बदाम मानून घ्यावं अशी विनंती आहे. 

दुसरं एक, तेही ह्या निमित्ताने सांगतो की, मला एखाद्या विषयावर बोलायला कोणी बोलावलं तर, मी त्यांना सांगायचो, “मला विषय सांगू नका. विषय सांगितला नाहीत तर, तुमच्या मनातल्या विषयावर कदाचित मी बोलेनही. पण तुम्ही मला विषय सांगितला तर मात्र माझी पंचाईत होते.” आम्ही शाळेत असताना दगडावर नेम धरून दगड मारायचा खेळ चालायचा. त्याच्यामध्ये माझ्या मित्रांनी मला ओढल्यावर मी समोरचा दगड तिथं ठेवला आणि सांगितलं, “आता मी ह्याच्या आजूबाजूला मारेन” आणि मी पहिला येणं स्वाभाविकच होतं. कारण आजूबाजूलाच नेम धरला की तो नेम फसणं शक्यच नाही. तर मला जो विषय तुम्ही दिलेला आहे, त्याच्या आजूबाजूचं बोलणं हे आज तरी मला अगदी अधिकृतपणे करता येईल. तर तेही सांभाळून घ्यावं ही आणखी एक विनंती.

आजचा विषय आहे, ‘सामाजिक आणि राजकीय प्रश्नांमधील नास्तिकतेची भूमिका’. मला वाटतं की, जोपर्यंत आपण सामाजिक आणि राजकीय बाबी मुळात आणत नाही, तोपर्यंत आपल्याला नास्तिकतेची भूमिका सरळ, सुस्पष्ट, काहीही न लपवता अशी घेता येऊ शकते. आपण घेतोही बरेचजण. काहीजण बरेचवेळा उघडपणे सांगतात, काहीजण उघडपणे मांडत नाहीत. पण तिथेसुद्धा त्यांची पंचाईत अशी असते की त्यांच्यावर एक तर सामाजिक किंवा राजकीय दबाव असतो. म्हणून त्यांना आपली नास्तिकतेची भूमिका मांडता येत नाही. आता आपल्यासमोर विषय असा आहे की, ती भूमिका जर आपल्याला मांडायची असेल तर आपण पुढे येणाऱ्या सामाजिक – राजकीय प्रश्नांना कशा तऱ्हेने सामोरं जावं? बरं, नुसतं सामोरं जाऊन उपयोग नाहीये तर, आपल्याला त्या प्रश्नांना धसाला लावयाचं आहे. तर असं धसाला लावण्यासाठी योग्य मार्ग काय? असे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. याविषयी मला काय वाटतं, ते मी सांगतो.

यातला पहिला मुद्दा – आपले सहकारी कोण, हे ओळखणे. सकाळी जावेद साहेबांनी जो सांगितला तो सर्वांत महत्त्वाचा, अतिशय टोकाचा मुद्दा असा आहे की, आपले सहकारी कोण – म्हणजे खरे नास्तिक कोण? खरे नास्तिक ओळखण्यामध्ये सध्याच्या काळात आपली दमछाक होऊ शकते आणि आपल्याला गुंगारा दिला जाऊ शकतो. “मी नास्तिक आहे” असं जाहीरपणे, ठामपणे सांगणारे अनेकवेळा नास्तिक असले तरी धर्म, विशेषतः परधर्म मानणारे असतात. ते धर्म-परधर्म असे भेद मानतात आणि जात-परजात असाही भेद मानतात. ही काय भानगड आहे? म्हणजे नास्तिक आहे पण मी धर्मभेद मानतो यात त्यांना वदतोव्याघातही वाटत नाही. खरंतर याहून मोठा वदतोव्याघात असूच शकत नाही. कारण कोणताही धर्म असो, त्याची स्थापना ही परमेश्वरीय संकल्पनेच्या उपासनेवरच बेतलेली असते. परमेश्वर नाही आणि तो धर्म अस्तित्वात आहे असं जवळजवळ नाहीच. परमेश्वर आहे आणि तो मानला जातो. त्याचं कर्तृत्व किती मोठं याच्या तपशीलात धर्मा-धर्मात फरक असतील. तथापि, परमेश्वर आहे हे मी अजिबात मानत नाही पण परमेश्वराच्या उपासनापद्धतीवर आधारित असलेले भेद, त्यावर आधारित असलेले धर्म, त्यांच्यातील भेद मात्र मी मानतो, असे म्हणणारे लोक, संघटना आणि नेते या देशात पूर्वीपासून अस्तित्वात होते आणि आजही आहेत. या लोकांकडून आपली ऐनवेळी फसगत होण्याची किंवा गुंगारा दिला जाण्याची शक्यता आहे. जो खरा नास्तिक आहे तो ह्यातले कुठलेही भेद मानत नाही. त्याने ह्या लोकांपासून स्वतःला सर्वांत जास्त जपलं पाहिजे. नुसता धर्मभेद मानणं इथपर्यंतच ते मर्यादित राहत नाहीत तर, परधर्मद्वेषापर्यंत ते जातात. परधर्मद्वेष हा जणू देशभक्तीचा पुरावा असं मानलं जातं. ह्या पातळीपर्यंत आल्यावर आपण किती देशभक्त आहोत हे दाखवण्यासाठी आपला परधर्मद्वेष किती आहे हे दाखवण्याची अहमहमिका लागते. मुद्दा असा आहे की नास्तिकतेच्या नावाखाली हे सगळे लोक आपल्यासोबत येण्याची शक्यता असते. ‘मी नास्तिक आहे, मी देव वगैरे काही मनात नाही, आपल्याला काही ते पटत नाही.” अशा तऱ्हेची वाक्यं आपल्या तोंडावर फेकली जातात आणि आपण त्याकडे आकृष्ट होतो. या लोकांपासून सर्वाधिक सावध राहण्याची गरज आहे. बाकी काही नाही झालं तरी चालेल पण हा आपला सर्वांत मोठा शत्रू आहे, जो देव मानत नाही असा दावा करतो आणि देवाच्या उपासनापद्धतीवर आधारित जन्मसिद्ध धर्मभेद मात्र मानतो. समाजात फिरताना, राजकीय भूमिका घेताना अशा लोकांच्या साथीला जायचं की नाही, याचा विचार नास्तिकांनी करायला हवा. या विषयात कुठलीही भूमिका घेताना पहिला विचार हा करायला हवा की, ज्या माणसाबरोबर आपण जाऊ पाहत आहोत, तो खरा नास्तिक आहे की नाही?

मगाशी, मला वाटतं जावेद साहेबच बोलले की, आपल्याला ‘pseudo secular’ असे संबोधले जाते. ती जणू एक शिवीच बनली आहे. खरंतर मी वर वर्णन केलं ती माणसं pseudo नास्तिक आहेत. आपण यापुढे या शब्दाचा वापर सुरू केला पाहिजे. हे सगळे ‘pseudo नास्तिक’ किंवा ‘pseudo देशभक्त’ आहेत. हे खरंतर देशभक्तही नसतात, हे ‘द्वेषभक्त’ असतात. अत्यंत आंधळेपणाने अन्य धर्मांचा द्वेष करत जाणारे आणि त्याचा अपप्रचार करत जाणारे असे हे लोक असतात. सामाजिक किंवा राजकीय भूमिका घेताना अशा लोकांच्या कोंढाळ्यात तर आपण सापडत नाही आहोत ना, याची काळजी नास्तिक माणसाने घेतली पाहिजे. ही मंडळी जेव्हा आपल्याशी संपर्क करतात तेव्हाही कुठेतरी फार मोठं कार्य, कुठेतरी आदिवासींमध्ये, त्यांना ते ‘वनवासी’ म्हणतात, कुठल्यातरी शाळेचं काम, कुठल्यातरी सांस्कृतिक, क्रीडा किंवा काहीतरी अशा कारणांसाठी एकत्र येऊन, आपल्याला व्यासपीठावरही बोलवतात आणि आपल्याला मोठेपणही देतात. या अशा तऱ्हेच्या लोकांना आपण कटाक्षाने आपल्यापासून चार हात दूर ठेवलं पाहिजे. किंवा मग केतकरांसारखं त्यांच्याच व्यासपीठावरून, कोणाच्याही समोर जाऊन त्याच लोकांना अत्यंत परखडपणे चार खडे शब्द सुनावण्याची ताकद तरी असली पाहिजे. तशी ताकद आपल्या प्रत्येकात असेल असं नाही. त्यामुळे चार हात लांब राहिलेलं बरं, हा पहिला भाग मी सांगतोय. 

पुढचा जो भाग मला वाटतो, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक किंवा राजकीय भूमिका घेताना आपली गफलत कुठे होऊ शकते? ही गफलत आपल्यापैकीच काही लोकांची होताना मी पाहतो. उदाहरणार्थ, अमुक अमुक धर्माच्या लोकांमध्ये अमुक अमुक पेहराव आहे आणि तो पेहराव घालून शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जावं की नाही याच्या विरोधात एखादं आंदोलन आहे. आता यात आपली भूमिका काय असली पाहिजे? शंभर टक्के सत्य आहे की, तो पेहराव धार्मिक आहे. आणि आपण तर नास्तिक आहोत. मग आपली काय भूमिका पाहिजे? आपल्यातले अनेकजण इथे शुद्धतेचा आग्रह धरतात. शुद्धतेचा आग्रह म्हणजे अशा अर्थाने की “आपल्या धर्मातल्या लोकांना बोलतोस ना, गंध लावू नका किंवा असल्या पूजा करू नका किंवा पितांबर नेसू नका. मग ‘त्यांच्या’बद्दल का नाही बोलत?” इथे सगळे पेच येऊन थांबतात. अशा परिस्थितीत आपण नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे याविषयी आपल्यातल्या अनेकांची गफलत होते असं मला वाटतं. ह्या अश्या सामाजिक किंवा राजकीय बाबी आल्या की ही गफलत सुरू होते. याचं प्रमुख कारण असं आहे की, मुळात सामाजिक आणि राजकीय असं वेगळं नसतंच. ते एकत्रच असतं. समाजातूनच राजकीय भूमिका प्रेरित केल्या जातात आणि सामाजिक प्रेरणांमागेदेखील कुठेतरी राजकारण असतं. तर आपण राजकीय आणि सामाजिक असं वेगळं धरून बोलण्यात अर्थ नसतो. कुठल्याही सामाजिक विषयात भूमिका घेताना आपली ती भूमिका राजकीयदेखील असावीच लागते. ती सामाजिक दिसत असेल पण तिच्यामुळे राजकारण घडणार हे आपण समजून घ्यायला हवे. आपण जर शुद्धतावादी विचार करायला लागलो आणि आपण इतर धर्मियांना जर सुनावायला लागलो की तुम्ही तुमच्या चुकीच्या गोष्टी सोडा. त्यांच्या त्या बाबींवर आपण टीका करायला लागलो तर काय होईल? अशा रूढींचं समर्थन आपल्यापैकी कोणी दुरान्वयेही करू शकत नाही. चेहरा झाकणं किंवा डोकं झाकण या सगळ्या रूढी आहेत आणि ह्या धर्माधारितच आहेत. त्यामुळे नास्तिक म्हणून आपण याचं कधीही समर्थन करता कामा नये. पण याचबरोबर दुसरी बाजूही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की इथे, अशा बाबीत आपली भूमिका बहुसंख्याक सत्तेच्या विरुद्ध म्हणून अधिक महत्त्वाची आणि मोलाची आहे.

एखादी रूढी किंवा मागास पद्धत याच्यामध्ये अल्पसंख्याकांचं चुकत नसतं असं नाही. ते चुकतात. त्याबद्दल वाद नाही. पण जेंव्हा बहुसंख्याक ते एक हत्यार म्हणून वापरतात त्यावेळी आपण काय भूमिका घेतली पाहिजे? तर तिथे आपण त्यांच्या धर्मस्वातंत्र्याची भूमिका घ्यावी. कित्येकवेळा आपल्याला या पातळीपर्यंत जावं लागतं. हे आपण पक्कं लक्षात घेतलं पाहिजे. आपली गफलत तिथे अशी होते की, आपण दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीत जर तो आग्रह धरला नाही तर आपण नास्तिक कसे? नाहीतर आपण pseudo secular असे होतो.

ठीक आहे! मला तेही मान्य आहे. पण त्याबरोबरच माझं असंही म्हणणं आहे की, कुठल्याही धर्मियांनी पहिली भूमिका ही घ्यायला पाहिजे की मी माझ्या धर्मामध्ये वाढलो, त्या धर्माचा माझ्यावर पगडा आहे, ज्या लोकांमध्ये मी आहे, जे बहुसंख्याक माझ्या आजूबाजूला आहेत, त्यांनी प्रथम बदलायला पाहिजे. बाकी जे लहान लहान गट आहेत, पंथ आहेत किंवा धर्म आहेत त्या लोकांची कोंडी करून त्यांना बदलायला लावणं हा मार्ग लोकशाहीचा किंवा स्वातंत्र्याचा मार्ग नव्हे. मला हे संपूर्णपणे मान्य आहे की यामुळे एका अर्थी असं भासू शकतं की आपण मागे जाण्याची भूमिका घेतोय का? अर्थातच हे मी प्रत्येक बाबतीत लागू आहे असं म्हणत नाहीये. आपण नास्तिक आहोत. आपल्याला त्या-त्यावेळी या भूमिका घ्याव्या लागतात. सर्व धर्मियांचे जे पगडे जगभरच्या जनतेवर पक्के झालेले आहेत ते आपल्याला दूर करायचे आहेत. पण मग ही सुरुवात करायची कुठून? आपलं घर स्वच्छ करण्याच्या आधी दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं, त्याच्यावर टीका करणं हे करायचं का? ही बाब जावेद साहेबांनीसुद्धा सांगितली की दुसऱ्या धर्माबद्दल आपण लीलया बोलतो. विशेषतः ते जर अल्पसंख्य असतील तर जणू आपला सबंध देश त्यांच्याचमुळे मागे राहिला आहे असं बोलतो. मला तर कळूच शकत नाही की ८० आणि ९० टक्के लोकांना दहा ते पंधरा टक्के असलेल्या जनतेचा प्रश्न एवढा मोठा वाटू शकतो? जणू तो जगातला एकमेव प्रश्न असावा?

इतिहास बघितला तर साधारण ८५ ते ९० वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली होती. सव्वाशे वर्षांपूर्वी ज्यू धर्मियांना ते केवळ अल्पसंख्य असल्यामुळे याच तऱ्हेने वागवले गेले. हिटलर आणि मुसोलिनी यांची आपण नावे घेतो. ते फक्त तत्कालीन छडमाड नेते होते, पण त्यांना निवडून देणारी जनताही तेव्हा होती ना!! आणि तिचा हा विश्वास होता की जर्मनीसमोर किंवा इटलीसमोर किंवा शेवटच्या काही काळात नॉर्वेसमोरसुद्धा हा एकच प्रश्न होता की हे जे ३, ४ किंवा ५ टक्के ज्यू आहेत यांच्यामुळेच त्यांच्या देशाची वाट लागली. त्या देशातल्या जनतेचं दोघा नेत्यांच्या बाबतीत साधारण ३४ ते ३९ टक्के मतदान आहे आणि दोन्ही देशांची जनता, शेवटच्या आठवड्यापूर्वी वगळता रस्त्यावर नाही उतरली की, “अहो, माझ्या गल्लीत राहणारे ज्यू असे वाईट नाहीयेत. तुम्ही यांच्या विरोधात का जाता आहात? तुम्ही त्यांना का मारता आहात?” जनता नाही उतरली. या जनतेनेच निवडून दिले होते हिटलरला. ३२ ते ३८ टक्के!!

पहिल्यांदा हिटलर उभा राहिला होता, तेव्हा काहीतरी ३-३.५ टक्के मतं होती किंवा त्याहूनही कमी होती त्याला. ती एवढी वाढली? आणि सबंध युरोप तेव्हा असं समजत होता की, ज्यू लोकांना पूर्ण निष्कासित केल्याशिवाय आपला देश सुधारणार नाही. आज जवळजवळ तशीच भूमिका आपण दुसऱ्या धर्माबद्दल घेतो आहोत. ज्यू काय मागास नव्हते का तेव्हा? इतिहास वाचल्यावर कळतं, त्यांच्याकडे त्यावेळी अनेक जुन्या प्रथा होत्या. ते तेव्हा शहराच्या बाहेरच्या भागातच राहायचे, शहरात राहण्याची परवानगी प्रत्येक ठिकाणी नव्हती. अशी जवळजवळ ६० ते ७० वर्षं ज्यूंनी काढली होती. आणि त्या सगळ्या भागात “ज्यू म्हणजे फितूर, ते आपल्या देशावर प्रेम करत नाहीत. त्यांचं प्रेम ते तिथं, अरबस्तानातल्या जेरुसलेमवर.” ही अशी वाक्यं मध्यमवर्ग, उच्च-मध्यमवर्ग, उच्चभ्रू समाज एकमेकांशी बोलताना वापरत असत. ही अशाच तऱ्हेची वाक्यं अन्य धर्मियांबद्दल आपल्याकडे वापरली जात आहेत. फरक फारसा नाहीये. टक्केवारीतही फरक नाहीये. टक्केवारीसुद्धा तीच आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उच्चभ्रू समाज, मध्यमवर्गीय समाजसुद्धा तोच आहे. अशा तऱ्हेची वाक्यं बोलून त्यांची देशभक्ती ते दाखवू इच्छितात. त्यावेळी जर आपण असतो तर आपण ज्यूंच्या बाजूने उभे राहिलो असतो की नसतो? काय करायला पाहिजे होतं? त्यावेळीही तिथली काही माणसं तीन चार ठिकाणी काहीतरी फितुरीची कागदपत्रं – ती नेमकी ज्यूंच्याच हाती लागली होती आणि त्या ज्यूजना पकडलं गेलं, ८-९ ज्यूजना पकडलं गेलं, त्यातले चार खोटे होते, दोन खरे होते पण “ज्यू हे असेच असतात, ते फितुरच असतात”, असा प्रसार रेडिओद्वारे केला गेला. आणि लोक भुलले. ही जी ३५ ते ३८ टक्के जनता होती, ती भुलली. ती मनापासून समजायला लागली की ही माणसं नालायक आहेत, ह्यांना हद्दपार करायला हवे, ह्यांना ठार मारायला हवे. आज आपण जवळजवळ त्याच प्रकारची भाषा बोलतोय, भाषेमध्ये काहीही फरक नाही.

तिथे ९५ टक्के जनता जर्मन होती, ख्रिश्चन होती. पाच टक्के किंवा त्याहून कमी लोक ज्यू होते. ते खरोखर सबंध देशाच्या दुर्व्यवस्थेचं कारण होते का? खरोखर? हे आज खरं वाटू शकतं का आपल्याला? पण त्या वेळच्या जनतेला ते खरं वाटत होतं आणि तेच आज आपलं होतंय. मुद्दा असा की आपल्याला थोडं चुकीचं वाटलं तरी चालेल पण पहिला प्रश्न हा की नास्तिक माणसाला शुद्धतेची भूमिका घेता येणार नाही. जशी की मी यांनाही शिव्या घालेन आणि त्यांनाही शिव्या घालेन. “आता तू गप्प का?” अशी चिथावणी आपल्याला सतत फेसबुक, व्हॉट्सॲपवर दिली जाते. “आता त्यांनी असं केलं आहे, आता बोल. तू फक्त आमच्याविरुद्ध बोलतोस, त्यांच्याविरुद्ध बोल की.” या चिथावणीला बळी पडू नये. याच्यावर आपण शांतपणे त्यांचीच विसंगती त्यांना दाखवली पाहिजे. मी असं का म्हणतो आहे हे शांतपणे सांगायला पाहिजे. तरच आपल्याला जे साध्य करायचं आहे ते होईल.

कधी ना कधी आपलं संपूर्ण जग धर्म आणि परमेश्वर या संकल्पनेतून मुक्त व्हावं ही आपली इच्छा आहे. माझी आहे आणि तुमच्या सगळ्यांचीदेखील आहे. हे जर आपल्याला साध्य करायचं असेल तर जे सापडतील त्या सगळ्यांना आपण टीकेनं झोडपून काढून चालणार नाही. आपल्या एकाच धर्मात असे मागास लोक आहेत असं नाही हे खरं! जगभर प्रत्येक धर्मात, मागास आणि अत्यंत कट्टर, रूढीप्रिय, स्थितीप्रिय अशी माणसं आहेत. आपल्याला जर काम करायचं असेल तर अल्पसंख्याकांवर आक्रमण करू इच्छिणारे, त्यांना बदनाम करू इच्छिणारे जे बहुसंख्य आहेत, त्यांच्यापासून वाचवणं हे आपलं आद्यकर्तव्य ठरतं, असं मला वाटतं. मी बोलताना आता अनेकांना असं वाटू शकतं की, “नाही! त्यावेळी आपण सरळ भूमिका घ्यावी. त्यांचं चुकलं आहे ना, त्यांना निष्कासित करा”. मला वाटतं अशाच वेळी सावध राहण्याचा क्षण असतो. ते सत्तेवर का आले? तर ते बहुसंख्याक आहेत म्हणून आले. त्या बहुसंख्याकत्वाचा फायदा घेऊन अल्पसंख्याकांना चिरडण्याचा आणि त्यात तुमचा वापर होण्याची प्रचंड शक्यता आहे. या शक्यतेपासून आपण आधी लांब राहिलं पाहिजे. अशा तऱ्हेच्या चिथावणीला बळी न पडता आपली भूमिका ही नास्तिकतेची असली तरी त्याहून आजच्या काळात कुठल्याही अत्याचारित किंवा दुबळ्या झालेल्या घटकांना सांभाळणं ही अधिक महत्त्वाची भूमिका ठरते. मला वाटतं हेच शहाणपणाचे आहे. मी मुद्दामच कुठल्या तपशिलातली उदाहरणं आता घेतली नाहीत. कारण तपशील एकदा घेतला की त्यात अनेक कंगोरे येतात. यावर बोला, मग त्याच्यावर बोला. मला वाटतं आपण सगळे सुज्ञ आहोत. यातून मला नेमकं काय सांगायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहचत असेलच. त्या तपशिलात, त्याच्या बारकाईत जाण्याची गरज नाही. मात्र, आपण कशा बाबतीत अगदी निर्वेधपणे, अगदी मुक्तपणे किंवा आता हल्लीच्या भाषेत बिनधास्त आग्रही राहू शकतो? … तर मला असं वाटत की, आपण एक उदाहरण बघू या.

आपण अनेक ठिकाणी विविध कारणांसाठी सरकारी कार्यालयात जातो. सरकार हे कुठल्याही धर्माचं नाही, सरकार कुठल्याही परमेश्वराचे उपासक नाही. आपल्या संविधानात सरकार हे अमुकधर्मीय आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. पण गेल्या काही वर्षांत कुठल्याही सरकारी कार्यालयात गणेशचतुर्थीला गणपतीची मूर्ती बसवली जाते, तिचं विसर्जन यथासांग केलं जात. किंबहुना आलेल्या अनेक पुरवठादारांना काहीतरी देणगी द्या म्हणूनही सांगितलं जातं. तो पुरवठादार किंवा कंत्राटदार त्यांना अगदी भक्तिभाव असल्यासारखं दाखवत ते करतो आणि वरून “आमचं ते टेंडरचं काम होईल ना?” असं विचारतो. म्हणजे हे तर धडधडीत दिसत आहे. याच्याहून अधिक म्हणजे बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांच्या मागे किंवा टेबलावर कुठल्या न कुठल्या तरी बाबाची किंवा ज्या देवावर त्यांची श्रद्धा आहे त्याची एक प्रतिमा लावलेली असते. अगदी काही नाही तर कुठल्यातरी देवाचा जयजयकार तरी लिहिलेला असतो. काही ठिकाणी कुठलीतरी कॅसेट लावलेली असते. या गोष्टींच्या बाबतीत मात्र आपण टोकाचे आग्रही असले पाहिजे. हे गैर आहे, गैरपेक्षाही बेकायदेशीर आहे. हे त्यांचं घर नव्हे. ह्या सरकारी अधिकाऱ्यांना कुठल्या देवाबद्दल किंवा बाबाबद्दल श्रद्धा असेल तर त्यांच्या घरी हे सगळं करायचा अधिकार त्यांना आहे. सरकारी कार्यालयात हे करण्याचा अधिकार त्यांना नाही. पण आपलंही होतं असं की, आपलं काम असतं, “आता ह्याच्यावर कशाला बोला? आपलं काम करा आणि मोकळे व्हा” असा विचार करून आपण निघून जातो. गेल्या काही वर्षांत मला असं कुठलंही कार्यालय दिसलं नाही जिथे कुठल्यातरी अधिकाऱ्याच्या टेबलावर, खुर्चीच्या मागे परमेश्वराची प्रतिमा लावलेली नाही. रोज त्याला हार घातला जातो. आणि गेल्या काही वर्षांत अजून एक गोष्टसुद्धा दिसते की कार्यालयात सत्यनारायण घालतात. त्यासाठी टेबल बाजूला करतात. कोणालाही काहीही वाटत नाही. मला वाटतं की, आपण नास्तिकांनी याबाबतीतली आपली भूमिका कणखर आणि सडेतोड ठेवणं गरजेचं आहे. तिथे सरळ अधिकृतपणे तक्रार नोंदवावी. पुढे काय होईल ते होईल. आपण अन्यथासुद्धा त्याची पर्वा करण्याची गरज नाही. तर आपण अशा तक्रारी योग्य त्या ठिकाणी नोंदवणे किंवा अधिकृत ठिकाणी, वरच्या अधिकाऱ्याकडे पोहचवणे आवश्यक आहे.

अनेक मंदिरांच्या पटांगणांमध्ये कवायतीच्या शाखा भरवल्या जातात आणि आपण ज्याला अर्धसैनिकी म्हणतो ते प्रशिक्षण तिथे दिलं जातं. काल-परवाच केरळ हायकोर्टाने यावर बंदी घातली आहे आणि यासाठी मंदिरं वापरली जाऊ नयेत असा निकाल दिला आहे. आता आपली भूमिका अशी आहे की आपल्याला मंदिरंच मान्य नाहीत. आपण परमेश्वर मानत नाही. मंदिरं नकोत ही भूमिका आपण कितीही कागदोपत्री मांडली तरी ते होताना दिसत नाही. पण केरळच्या कुठल्यातरी माणसाने याचिका दाखल केली, ती संमत झाली आणि त्यानंतर त्या शाखा बंद झाल्या. मंदिराच्या परिसरात कुठल्याही खाजगी संघटनांनी येऊन अशा तऱ्हेच्या शाखा भरवू नयेत याची दक्षता घेण्यासाठी पोलीस नेमावेत, असा हायकोर्टाचा आदेश आहे. तेथील मंदिराच्या परिसराला आता पोलीस संरक्षण आहे. अशा बाबी आपण नक्कीच करू शकतो.

आजचं वास्तव बघता सामाजिक आणि राजकीय भूमिका मांडताना शुद्धपणाचा आग्रह ठेवून नास्तिकता राबवणं जास्त महत्त्वाचं की आजच्या घडीला बहुसंख्याक समाज हा अल्पसंख्याकांना चिरडू पाहतो आहे का, हे पाहणं जास्त महत्त्वाचं वाटतं? मला वाटतं दुसरा भाग हा अधिक महत्त्वाचा आहे. आपण मनापासून नास्तिक आहोत. पण “त्या धर्माविरुद्ध तू कर” ह्या चिथावणीला बळी पडणं म्हणजे सरळसरळ बहुसंख्याकवादाला बळी पडणं आहे.

याबरोबरच दोन-तीन अशाही गोष्टी आहेत की जिथे आपली फसवणूक होते. त्यातली एक अशी की आपल्याकडे लोक देणग्या मागायला येतात, तेव्हा आपण जागरूक नसतो. ते कुठल्यातरी सामाजिक कामासाठी देणग्या मागायला येतात. मी स्वतः या बाबतीत जागरूक असूनही कितीदातरी माझी फसगत झाली आहे. अगदी आयत्या वेळी कळतं की आपले पैसे नको त्या कवायतवाल्या, लाठी फिरवणाऱ्या संघटनेला गेले. तर याबाबतीत अधिकाधिक जागरूक असणं आवश्यक आहे. आपल्या अगदी जवळची माणसंदेखील आपल्याला फसवतात. आजची परिस्थितीच अशी आहे की आपल्याकडे अशी देणगी किंवा मदत मागायला येणाऱ्या लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे. अगदी आपण कुठलंही सामाजिक कार्य करणारे असू तरी आपल्याला अशा प्रकारची भूमिका घेणं आवश्यक आहे की आपली नास्तिकता त्या दुर्बलांच्या मदतीच्या आड येऊ नये. म्हणजे थोडक्यात एखाद्या आदिवासी समूहाला आर्थिक मदत करायची असेल तर, केवळ तो देवाची पूजा करतो म्हणून त्याला मदत न करता त्याच्याकडे हीन नजरेनं बघणं अयोग्य ठरेल. त्या लोकांना, म्हणजे जो अल्पसंख्य, दुर्बल समाज आहे त्या लोकांना आपण बळ देणं हे आता अधिक गरजेचं आहे. 

हे मी नुसतं दोन चार उदाहरणांवरून सांगतो आहे. मला जे म्हणायचं आहे, तो संदेश तुमच्यापर्यंत बहुदा पोहोचला असावा. यापलीकडे माझ्याकडे फार काही सांगण्यासारखं नाही. शेवटी दाणा तो दाणाच आणि काजू-बदाम ते काजू-बदामच. तुम्ही मला एवढा वेळ झेललंत, माझे शब्द शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल मनापासून आभार.

धन्यवाद! 

ह्या भाषणाचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
चिथावणीला बळी पडू नका

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.