नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा आणि प्रसारमाध्यमांतील नास्तिक्याची भूमिका

शिवप्रसाद महाजन : नास्तिक कायमच गंभीर असतो असा आपल्याकडे साधारणपणे बऱ्याचजणांचा समज असतो. किंवा बरेचजण तसे जाहीरपणे बोलतदेखील असतात. आपले सकाळपासूनचे कार्यक्रम बघितले तर त्यामध्ये चर्चासत्रं झालीत, परिसंवाद होतोय, काही गाण्यांचे कार्यक्रम झाले, नंतर एकांकिका आहे, रात्री पुन्हा गाण्याचे कार्यक्रम आहेत. तर असं काही नसतं की नास्तिक नेहमी गंभीरच असतो. तो सर्व क्षेत्रात आपापल्या परीनं आपापली भूमिका बजावत असतो. बरेचजण त्यापैकी यशस्वीपण झालेले आहेत. नास्तिक यशस्वी झालेला आहे असं म्हटलं की समोरून एक प्रश्न हमखास येतो, त्यांची नावे सांगा. आणि मग इथे आपली जरा पंचाईत होते. कारण नास्तिक्याची जाहीरपणे भूमिका घेणारे आपल्याकडे खूप कमी आहेत. खाजगीत बरेचजण मी नास्तिक आहे हे मान्य करतात, पण जाहीरपणे मी नास्तिक आहे, विशेषतः ज्यांचा प्रभाव आहे आणि जे प्रतिभावान आहेत त्यांनी जाहीरपणे नास्तिक्याची भूमिका घेतली आहे असं खूप कमी दिसतं. इथं ब्राईट्स सोसायटीची भूमिका महत्त्वाची ठरते. ज्यांना ज्यांना आपलं नास्तिक्य जाहीरपणे मांडायचं आहे, त्यांच्यासाठी ब्राईट्स सोसायटीकडून एक व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आपण आज परिसंवाद आणि चर्चासत्रे करतो आहोत.

ब्राईट्सची जी काही प्रमुख उद्दिष्टे आहेत त्यापैकी जाहीर नास्तिक्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे एक उद्दिष्ट आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही लोकशाहीची पायाभूत मूल्यं आहेत. राजेशाही आणि धर्मसत्ता यांनी आपल्या अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांवरती गदा आणलेली आहे आणि आपल्यावर ते इतकं आरूढ झालेलं आहे की आपण आपलं स्वातंत्र्य विसरून गेलो आहोत. आता राजेशाही बऱ्याच देशांमधून बऱ्यापैकी नष्ट झालेली आहे, पण धर्मसत्तेचं जोखड अजूनही आपल्या मनावरती आहे, आपल्या विचारावरती आहे, आपल्या आचारावरती आहे. आता जर तुम्ही बाहेर चालू असलेले उत्सव पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की त्या उत्सवांचं स्वरूप, त्यात चालू असणारं म्युझिक, नंतर आपल्या जत्रा, यात्रा त्यासाठी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धडपडणारं प्रशासन आता तर काही काही ठिकाणी धर्मगुरूसुद्धा प्रचारामध्ये जाहीरपणे यायला लागलेले आहेत. इतकं ते धर्मसत्तेचं जोखड आपल्या विचारावरती, आपल्या आचारावरती आहे, हे जोखड जर झुगारायचं असेल तर ती प्रेरणा आपल्याला नास्तिक्यानं मिळते. नास्तिक्य ज्यानी स्वीकारलेलं आहे, तो बंधमुक्त जीवन जगू शकतो. तो मुक्त विचार करू शकतो आणि धर्मसत्तेची जोखड जाहीरपणे झुगारून देऊ शकतो. माझ्या मते, नास्तिक्याचे सामर्थ्य ह्यात आहे.

तरीही सर्वसामान्यांवर धर्मसत्तेचा पगडा एवढा आहे की नास्तिक्यामुळे आपण जरी बंधमुक्त झालो असलो तरी, नास्तिक्य लोकप्रिय नाहीये. नास्तिक्याला अजूनही बरेच जण कलंक असल्यासारखं पाहतात. त्याच्याकडे थोडंसं वेगळ्याच नजरेनी पाहिलं जातं. आणि नास्तिक्य लोकप्रिय नसल्यामुळे आपले राजकीय नेते, आपले समाजसुधारक, किंवा आपले सामाजिक कार्यकर्ते हे नास्तिक्याबद्दल जाहीरपणे बोलत नाहीत, जाहीर भूमिका ते घेत नाहीत. पत्रकार, सामाजिक नेते, कार्यकर्ते नास्तिक्याला घाबरतात का? नास्तिक्याबद्दल बोलण्यासाठी, तर्कशुद्ध विचार करण्यासाठी, तर्कशुद्ध विचार पुढे आणण्यासाठी किंवा त्याला प्रमोट करण्यासाठी घाबरतात का? ही एक भिती मनामध्ये आहे.   खरोखर वास्तव तसं आहे का? हे जाणून घेण्यासाठी ब्राईट्स सोसायटीने हा एक विषय परिसंवादासाठी, चर्चेसाठी घेतला आहे. तो विषय आहे नास्तिकतेचं सामर्थ्य आणि मर्यादा. यात अजून एक दुसरा विषय येतो – प्रसारमाध्यमांमधील नास्तिकतेची भूमिका. आपल्याकडे बऱ्याच चर्चांमध्ये असा एक विषय येतो की नास्तिकांची संख्या वाढायला लागलेली आहे आणि माध्यमांमधल्या काही सर्व्हेप्रमाणे काहीजण असं मानतात की नास्तिकांची संख्या जगभरात टप्प्याटप्पाने वाढत आहे. मानवी विकासाच्या निर्देशांकात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये नास्तिकांची संख्या वाढताना दिसते. ही संख्या बघितल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की ज्या ज्या देशांमध्ये मानवी विकासाचा निर्देशांक म्हणजे यात शिक्षण आहे, आरोग्य आहे, असे जे काही निकष आहेत, या निर्देशकांवर जेव्हा आपण निकष लावतो, तेव्हा लक्षात येतं की तिथे नास्तिकांची संख्या वाढली आहे. प्रश्न असा आहे की नास्तिकांची संख्या वाढली आहे म्हणून ते देश प्रगत आहेत? की देश मुळातच प्रगत होते म्हणून तिथे नास्तिकांची संख्या वाढली आहे? मग पुढचा प्रश्न असा येतो की नास्तिकांमुळे जर खरंच देश विकसित होत असेल किंवा मानवी विकासाच्या निर्देशांकात जर भर पडत असेल तर, या आघाडीवर प्रसारमाध्यमं जशी सरकारची ध्येय-धोरणं, त्यांची उद्दिष्टं लोकांपर्यंत पोहोचवत असतात किंवा प्रसारमाध्यमांतून त्या सरकारच्या ध्येय-धोरणांची चिकित्सा केली जाते, त्याच्यावर टीका केली जाते, पण नास्तिक्यामुळे जर आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या रोजच्या दैनंदिन प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेमध्ये जर वाढ होत असेल तर प्रसारमाध्यमं नास्तिकांच्या प्रश्नाला किंवा नास्तिकतेला प्राधान्य का देत नाहीत? किंवा नास्तिकतेला जनतेपर्यंत का पोहोचवत नाहीत? बऱ्याचवेळेला लक्षात येतं की नास्तिकांचे काही प्रश्न आले की प्रसारमाध्यमे थोडी संकुचित भूमिका घेतात. मागे एक मदर टेरेसांचा विषय झाला होता आणि त्यावर एक अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. तो अग्रलेख काही दबावामुळे मागे घ्यावा लागला. इतका प्रसारमाध्यमांवर धर्माचा, धर्मसत्तेचा प्रभाव आहे. नास्तिकतेमुळे काही प्रश्न सुटत असतात याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तो आहे. आता विद्यमान खासदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे प्रसारमाध्यमातील नास्तिक्याची भूमिका या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करतील.

कुमार केतकर : मी पोडियमवर जाऊन बोलणार नाही. कारण पोडियमवर गेलं की मला एक विद्वत्तेचा आव आणावा लागेल. तो वक्त्यामध्ये तसा येऊ शकतो. आणि प्रसारमाध्यमं आणि नास्तिकता हा जो विषय आहे तो एकाच पातळीवरती विज्ञान, तत्त्वज्ञान आणि धर्म या तिन्ही विषयांशी निगडीत आहे. त्याच्यामुळे पोडियमवर जाऊन मला त्याची तशा प्रकारची मांडणी करायची नाही. 

साध्या प्रश्नापासून सुरुवात करता येते ती म्हणजे अशी की आपण नास्तिक कधी होतो? या प्रश्नाचं उत्तर देताना असं आपसूक गृहीत धरलं जातं की आपण आधी आस्तिक होतो. तर आपण आस्तिक का असतो? आणि मग नास्तिक का होतो? तर नास्तिक होणं ही प्रक्रिया पूर्णपणे स्वेच्छेनं, वैचारिक आणि बौद्धिक पातळीवरची आहे. आपण जन्माला आल्यानंतर, जसं जावेदभाईंना सांगितलं की धर्म आपल्यात स्वाभाविकपणे घुसवला जातो, तसंच देवपण घुसवला जातो. त्यातून बाहेर पडणं म्हणजे नास्तिक होणं. आता जी माणसं नास्तिक झालेली आहेत जगात, त्यांनी जे त्याच्याबद्दल लेखन केलेलं आहे म्हणजे अगदी ना.सी.फडक्यांसकट इतर अनेक, त्या सगळ्यांचं लेखन वाचलं तर ती एकप्रकारची नकारात्मक नास्तिकता असते. म्हणजे, त्या देवानं आम्हाला काय दिलं? अशाप्रकारची. त्या देवानं आमच्या घरात सगळी दुःखच दिली, त्या देवानं आम्हाला दारिद्र्य दिलं. मग का मी विश्वास ठेवायचा त्याच्यावर? म्हणजे ह्यात वाक्यरचनाच अशी आहे की ‘देवानी दिलं’, म्हणजे याचा अर्थ की मी देव मानतो. त्या देवानं आम्हाला दारिद्र्य दिलं, त्या देवानं आम्हाला रोगराई दिली, त्या देवानं आमची आई नेली, त्या देवानं आमचे वडील नेले. आणि त्याच्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडाला की देवानी माझं काहीही भलं केलेलं नाही. या सगळ्या रचनेमध्ये देव गृहीत आहे. त्यामुळे ती नास्तिकता हे आस्तिकतेचीच फक्त प्रतिकृती आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या प्रकारच्या नास्तिकतेकडे आपण नाही जाऊ. नास्तिक होणं ही जी बौद्धिक, वैचारिक प्रक्रिया आहे ती व्यक्तिगतच असू शकते. एखादा संपूर्ण समाज “आम्ही नास्तिक आहोत” असं म्हणू शकत नाही. कारण ती वैचारिक, बौद्धिक, व्यक्तिगत पातळीवर होणारी प्रक्रिया आहे.

इंग्लंडमध्ये एक संस्था आहे. ती संस्था म्हणते की आम्ही सगळे अमर आहोत. त्या संस्थेचं नाव आहे immortality society. We are immortal. म्हणजे आपण सगळे गृहीत धरतो की आपण सगळे मर्त्य आहोत. तर त्यांचं म्हणणं असं की आम्ही इतके कट्टर विज्ञानवादी आहोत की आत्ता जरी आम्ही मर्त्य असलो तरी लवकरच विज्ञानामुळे आम्हाला immortality प्राप्त होणार आहे म्हणजे अमर्त्य प्राप्त होणार आहे. म्हणून आम्ही त्या भविष्यकालीन कल्पनेचे, भविष्यकालीन समाजाचे घटक म्हणून आत्ताच जाहीर करतो की आम्ही अमर्त्य आहोत. आता आपण असं म्हणू की हे रिडिक्युलस आहे. ‘आम्ही अमर्त्य आहोत’ तर हे ‘आहोत’ कसं होईल? ‘आम्ही अमर्त्य असू’ असं होईल.पण  तसं नाही. आपण राज्यघटनेमध्ये ज्यावेळेला, आपल्याच नव्हे जगातल्या सर्व राज्यघटनांमध्ये ज्यावेळेला लिहितात, त्यावेळी त्याच्यामध्ये आयडियल, आदर्श म्हणूनच लिहितात. Liberty, Equality, Fraternity हे फ्रेंचांनी जाहीर केलं. पण प्रत्यक्ष फ्रेंच समाजामध्ये या घडीपर्यंत या तीनही गोष्टी पूर्णपणे उपलब्ध नाहीत. अमेरिकेनं Liberty आणि Pursuit of happiness सांगितलं, त्यांनी त्यांच्या घटनेमध्ये Equality लिहिलीच नाही. तेसुद्धा त्यांनी भविष्याकरता सांगितलं. आजही अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी अनेक संस्थांना किंवा व्यक्तिंना ज्याप्रमाणात लिबर्टी अभिप्रेत आहे, त्याप्रमाणात ती नाही. किंबहुना ट्रम्पच्या काळामध्ये तर आपल्याला ते अधिकच स्पष्ट दिसतं. आपण आपल्या राज्यघटनेमध्ये ज्यावेळेला म्हटलं की ‘आम्ही समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष’, हे आपण प्रीॲम्बलमध्ये लिहिलं, त्याचा अर्थ असा नाही की आपला संपूर्ण समाज हा समाजवादी विचाराचा आणि धर्मनिरपेक्ष आहे. पण ते आपलं स्वप्न आहे. आपल्याला ते साध्य करायचं आहे. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते जर आपण लिहू शकतो तर मग, ‘वी आर इममॉर्टल’ असंही आम्ही लिहू शकतो, असं त्या संस्थेचं म्हणणं आहे. त्या संस्थेची घटना असं मानते की ते इममॉर्टल होतील. हे उदाहरण अशासाठी दिलं की नास्तिक होण्याची प्रक्रिया ही अशी सामूहिक होऊ शकत नाही. तुम्ही रोटरी क्लबचे सदस्य होऊ शकाल, तुम्ही लायन्स क्लबचे सदस्य होऊ शकाल, तुम्ही एखाद्या पक्षाचे सदस्य होऊ शकाल, तुम्ही युनायटेड नेशन्सचे सदस्य होऊ शकाल. पण आमचा समाज हा सगळाचा सगळा नास्तिक होईल हा व्यक्तिगत निर्णयच असू शकतो, सामाजिक निर्णय होऊ शकत नाही. 

आता हे तर्कशास्त्र तुमच्या आजच्या ह्या विषयाला लावून पहा. मला प्रश्न विचारला आहे तो प्रसारमाध्यमांमधील नास्तिकतेबद्दल. आता प्रसारमाध्यमं म्हणजे कोण? मी एक संपादक होतो. मी पन्नास एक वर्षं पत्रकारितेत काढले आहेत, पूर्ण पन्नास. त्यातली जवळजवळ २५-२६ वर्षं मी इंग्रजी पत्रकारितेत काढली आहेत, म्हणजे इकॉनॉमिक टाईम्स, टाईम्स ऑफ इण्डिया, इण्डियन एक्स्प्रेस आणि ऑब्झरवर आणि उरलेली २५ वर्षं मराठी पत्रकारितेत – महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, दिव्य मराठी, लोकमत. आता समजा मी नास्तिक आहे, पण म्हणून लोकसत्ता किंवा इकॉनॉमिक टाईम्स नास्तिक आहेत असं होऊ शकत नाही. किंवा अगदी आमचा मालक नास्तिक आहे तरीसुद्धा त्याच्यामुळे तो पेपर नास्तिक होईल असं होत नाही. म्हणजे प्रसारमाध्यमांची भूमिका ही नास्तिकते-आस्तिकतेवरती आधारलेलीच नाही आहे. त्याच्यावरती असं आरोपण करणं की प्रसारमाध्यमांत तुम्ही नास्तिक आहात का? हे होऊ शकत नाही. व्यक्तिगत पातळीवरती एखादा मनुष्य नास्तिक असू शकतो. प्रसारमाध्यमातून ते व्यक्त होईलच असं जरी नसलं तरी, प्रसारमाध्यमांमध्ये आपण काही जबाबदारीनं नक्कीच वागू शकतो. 

आता टेलिव्हिजनवरती ज्या सगळ्या सीरिअल्स सध्या चालू आहेत, त्या जवळजवळ प्रत्येक, जवळजवळ नाहीच, १०० टक्के सीरिअल्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात धर्म, सण वगैरे दिसतात. तेसुद्धा करायला हरकत नाही, केवळ सामाजिक सत्य म्हणून दाखवायचं असेल तर! पण त्याचा इतका प्रचार आणि प्रसार असतो की, ते बघणं अशक्य असतं. आता त्या सीरिअल्सचा निर्माता जरी नास्तिक असला तरी त्या सीरिअल्समधून त्याला टीआरपी मिळत असतो. त्यासाठीच तो तसे करतो. त्याला जर प्रेक्षकांचा प्रतिसादच त्या अंगानं मिळत असेल तर ते तो करणारच. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये नास्तिकता हा प्रश्न माझ्यामते काही अंशी भ्रामक ज्याला म्हणतात, निरर्थक, तशा प्रकारचा आहे. प्रसारमाध्यमांमध्ये नास्तिकता येणं हे जवळजवळ अशक्य आहे. कारण ती एक व्यक्ती नाही आहे, एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. अनेक धर्मांचे, जातींचे, विचारांचे, पगड्यांचे लोक आहेत आणि त्याच्यामुळे प्रसारमाध्यमांकडून तशी काही अपेक्षा आपण करूच नये. 

आता गेल्या काही वर्षांमध्ये प्रसारमाध्यमांमधून धर्म आणि धर्माशी संबंधित असलेला विचार हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आग्रही आणि आक्रमक पद्धतीनी मांडला जातो, त्याअनुषंगानं जर आयोजकांनी हा विषय ठेवला असेल तर त्याच्याबद्दल मात्र मी सांगू शकेन. आत्ता, विशेषतः गेल्या ९ वर्षांमध्ये हा फरक अधोरेखित होण्याइतका दिसतो आहे. एक प्रसिद्ध इंटरव्ह्यू आहे. कदाचित गूगलवरती तो मिळेलसुद्धा. टाईम्स ऑफ इण्डियाचे मालक विनीत जैन यांची एक चर्चा आहे. त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आम्ही म्हणजे विनित जैनांनी आमच्या चॅनल्सना – त्यांची बरीज चॅनेल्स आहेत. टाईम्स नाऊ आहे, झूम आहे, मुंबई मिरर आहे, वेदर नाऊ आहे त्या चॅनल्सना अशा सूचना दिल्या आहेत की सगळ्या चॅनेल्सवर धर्माबद्दलचा प्रसार वाढला पाहिजे, तो विचार मांडला गेला पाहिजे. मग तो तुम्ही सीरिअल्समधून मांडा किंवा सिनेमे दाखवणार असाल तर त्या पद्धतीचे दाखवा, तुम्ही पॅनल डिस्कशन ठेवाल तर पॅनल डिस्कशनमध्ये तो विचार प्रामुख्यानी येतो की नाही ते पहा. धर्माचा विचार म्हणजे हिंदू धर्माचा अशा अर्थानं. हा त्यांचा इंटरव्ह्यू वायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांना विचारायला सुरुवात केली की असं तुम्ही कसं म्हणू शकता? तुम्ही संपादकांना अशा सूचना कशा देऊ शकता की त्यांनी सर्व वाहिन्यांवर धर्मप्रसार म्हणजे मुख्यतः हिंदूधर्मप्रसार करायला हवा? तर ते म्हणाले की हल्ली जे चाललेलं आहे ते मला आवडत नाही म्हणून मी ते उपहासानी म्हटलं होतं. पण त्यांनी ते उपहासानी म्हटलेलं नव्हतं. कारण त्याच्यात एक वाक्य पुढे असंही होतं की ह्याच्यासाठी आपण २००० कोटी रुपये बाजूला करून ठेवतोय. अर्थात, अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार आपल्या विविध कार्यक्रमातून व्हावा असं जी संस्था त्यांना सांगत होती, ती संस्था त्यांना २००० कोटी रुपये द्यायला तयार होती. हे बऱ्याचअंशी मी सांगितलं त्याच स्वरूपात गूगलवर उपलब्ध आहे. इतकंच नाही तर, ते म्हणले की काही लोक अखंडभारत असं म्हणताहेत. मी तर काही लोकांना सांगतोय की आपल्याला महाअखंडभारत पाहिजे. अखंडभारतपण नाही. तर महाअखंडभारत म्हणजे काय? अखंडभारतात मला वाटतं अफगाणिस्तान आहे, कारण गांधारी तिथून आली असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीलंका तर आहेच, कारण रावणानी सीता तिकडे नेली होती. त्यानंतर म्यानमार आहे, भूतान आहे, नेपाळ आहे. हे सगळं अखंडभारतामध्ये आहेच. महाअखंडभारतामध्ये म्हणजे जिथे जिथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे असे जे प्रदेश आहेत ते ह्या महाअखंडभारतामध्ये येतात. अशी त्यांची ही व्याख्या आहे आणि ही चर्चापण नेटवर उपलब्ध आहे. आता जो मनुष्य असं म्हणतो की महाअखंडभारत पाहिजे आणि जो मनुष्य असं म्हणतो की धर्माचा प्रसार आपल्या वाहिन्यांवरून आणि वर्तमानपत्रातून व्हायला हवा, तर अशा एकूण वातावरणामध्ये सगळाच मीडिया आहे. मी फक्त हे एक उदाहरण दिलं. बाकी सगळे त्याच स्वरूपाचे आहेत. 

आणखी एक उदाहरण असं की ते वर्तमानपत्रं नेहमी भगवद्गीता स्पर्धा घेतात. किंवा मग भगवद्गीता पठनाचे दहा-दहा दिवसांचे कार्यक्रम घेतात. हे कोणत्याही प्रकारे प्रचाराचं कार्य नसतं. त्याला स्पॉन्सरशिप असते. त्याला मल्टीनॅशनल कंपन्या भरपूर देणग्या देतात. त्यामुळे त्या भगवद्गीता स्पर्धेतून आणि त्या भगवद्गीतेच्या चर्चांमधून त्या वर्तमानपत्रांना भरपूर नफा होतो. त्याच्या स्पॉन्सरशिपमधून ते पैसे मिळवतात. तो स्पॉन्सररसुद्धा वस्तू विकण्यासाठीच धर्माचा प्रसार करत असतो. हा संपादक किंवा तो पेपरही पैशांसाठीच धर्माचा प्रसार करत असतो. आणि येणारे अंक सारखे धर्माला वाहिले जात असतात. त्यामुळे मीडियामध्ये अलिकडच्या काळात हे मात्र प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या पार्श्वभूमीवर हा विषय ठेवला गेला असेल की सध्या माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढताहेत तर ते खरं आहे. त्याचं एक कारण असं आहे की आपण सगळेजण माध्यमांकडे विचार किंवा विचारांसंबंधित गोष्ट म्हणून पाहतो. ते तुम्ही डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. तो स्वातंत्र्यचळवळीतला भाग होता. स्वातंत्र्यचळवळीमध्ये स्वातंत्र्यासंबंधीच्या आणि त्या संबंधातील मूल्यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी माध्यमं म्हणजे वर्तमानपत्र मुख्यतः आणि पॅम्प्लेट्सही होती. 

आताची माध्यमं, मग ते कोणतंही माध्यम असेल, अगदी सोशल मीडियाचं माध्यम असेल, ते जर एखादी कंपनी चालवत असेल तर ती मुख्यतः अर्थकारणासाठी चालवली जाते. तिचं संपूर्ण अर्थव्यवस्थापन असतं. ते अर्थव्यवस्थापन अतिशय महागडं असतं. ती महागडी अर्थव्यवस्था चालवायची तर त्याच्यासाठी रेव्हिन्यू लागतो, म्हणजे उत्पन्न लागतं. ते उत्पन्न कुठे मिळेल आणि कसं मिळेल त्याप्रमाणे सगळे निर्णय होतात. त्यामुळे आपण जे वाचतो, किंवा जे वाचत नाही, जे दिलं जात नाही, आपण जे पाहतो किंवा पाहात नाही, आपण ज्या प्रश्नांची उत्तरं वर्तमानपत्रांना देतो ती छापली जातात किंवा छापली जात नाहीत हे सगळं त्या अर्थकारणाच्या आणि त्या संपादकांच्या आणि त्या मालकांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अर्थव्यवस्थापनातून आणि अर्थव्यवस्थापनेतून येणाऱ्या विचारव्यवस्थापनातून होतं हे लक्षात ठेवलं की तुम्ही आपल्या वर्तमानपत्राकडे किंवा टीव्हीकडे पाहताना नुसत्या संशयाने नव्हे तर माझ्या मते तुम्ही पाहणं किंवा वाचणंच बंद करा असंच मी सुचवेन. टेलिव्हिजन पाहणं हेच मुळी हल्ली वाईट झालंय. वर्तमानपत्र वाचणंसुद्धा. काही लोक वर्तमानपत्र फक्त कोडी सोडवण्यासाठी घेतात. ते चांगलं काम आहे. त्यामुळे तुम्ही वर्तमानपत्र कोडी सोडवण्यासाठी किंवा कार्टून स्ट्रिप्स असतात त्या पाहण्यासाठी किंवा क्रिकेटचा स्कोअर बघणं वगैरेसाठी वापरत जा. बाकी वर्तमानपत्रातून विचारांची वगैरे अपेक्षा करू नका. यासंबंधात एक प्रसिद्ध विनोद आहे. तो विनोद हिटलरच्या काळातला आहे. काही लोक तो लेनिनच्या काळातला असंही सांगतात. तर एक अमेरिकन पत्रकार जर्मनीमध्ये गेला, हिटलरच्या काळात. आणि त्यानं विचारलं, “अरे, तुमच्या वर्तमानपत्रात अमुक छापून आलं आहे, तमुक छापून आलं आहे. हिटलरनी एवढी उपलब्धी आहे, त्यानं साक्षात एवढं सिद्ध केलेलं आहे जर्मनीमध्ये. असं कसं?” तर तो तिथला जर्मन संपादक त्याला म्हणाला, “आमच्या पेपरमध्ये त्या दिवसाची तारीख आणि फुटबॉलचा स्कोअर एवढंच फक्त खरं असतं, बाकी काहीच खरं नसतं.” जवळजवळ तीच अवस्था आपल्या स्वदेशी हिटलरच्या राज्यामध्ये सध्या चालू आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही वर्तमानपत्रांकडून, निधर्मी तर फारच झालं, साधी ऑब्जेक्टिव्ह, रिअल न्यूजचीसुद्धा अपेक्षा करू नका. तुम्हाला टेलिव्हिजनवर किंवा वर्तमानपत्रातून ती मिळूच शकत नाही. 

कालच इण्डिया आघाडीनं २४ अँकर्सची नावं दिली आहेत की यांच्याबरोबर इंटरव्ह्यूला पॅनेलवरती जाऊ नये. आता त्या पॅनेलवरती मी जवळजवळ २० वर्षं गेलेलो आहे. गेल्या ५ वर्षांत नाही गेलेलो. पण त्यातले सगळे नाविका कुमार असेल, राहुल शिवशंकर असेल, अर्णव गोस्वामी असेल, राहुल कंवल असेल, त्या सगळ्यांबरोबर मी मूर्खासारखे, अनेकवेळेला तासन् तास, निर्रथक वाद घातलेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की ते किती व्यर्थ आहे. आता इण्डिया आघाडीने अधिकृतपणेच ठरवलंय की जायचं नाही. हा अत्यंत चांगला निर्णय आहे. कारण चॅनलवाल्यांना फक्त चिवडायला हवं असतं. बाकी काही नाही. त्यांना त्यांच्या विचारांचा प्रचार हा दुसऱ्यांच्या विचारांचं खंडन करून मांडायचा असतो. त्यामुळे त्यांना इतर लोक लागतात. आणि म्हणून तुम्ही पाहाल की आपल्या सीरिअल्समध्येसुद्धा काय दिसतं? अमेरिकन सीरिअल्स पहा तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला ब्लॅक्स दिसतात, मेक्सिकन दिसतात, टर्कीशसुद्धा दिसतात, अफगाण, सगळी निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या भाषा बोलणारी मंडळी दिसतात. तुम्ही बीबीसीचे न्यूज अँकर्स पहा. त्यामध्येसुद्धा आफ्रिकन असतात, एशियन असतात, इण्डियन असतात. सत्यमूर्ती वगैरे अशा नावाची माणसं बीबीसीचे अँकर असतात. योगिता लिमये, आपल्या महाराष्ट्रातील मुलगी तिथे अँकर आहे. फ्रान्सच्या मीडियामध्ये जय देशमुख नावाचा अँकर वार्ताहार आहे. भारतातल्या कोणत्याही सीरिअलमध्ये इतर कोणत्याही समाजामधली चित्रं तुम्हाला दिसत नाहीत. तुम्हाला आदिवासी दिसणार नाहीत, तुम्हाला दलित दिसणार नाहीत, धारावी दिसणार नाही, जंगलांमधल्या जमिनी कशा अदानी किंवा इतर उद्योगपती लुटताहेत ते दिसणार नाही. तुम्हाला फक्त कौटुंबिक, तेसुद्धा एकाच दिवाणखान्यात शूट करून जे दाखवलं जातं, तेवढंच दिसेल. तुमची बुद्धी आणि तुमचे विचार हे पूर्णपणे एका कोंदणामध्ये जणू फिक्स करून टाकायचं आहे अशा पद्धतीनी हिन्दी आणि मराठी आणि इतर बहुतेकश्या इतर भाषांमधल्या सीरिअल्स दाखवल्या जातात. त्या ह्याच पद्धतीने दाखवल्या जातात. ती बहुसांस्कृतिकता आणि बहुविचारांचा प्रसार हा आपल्या देशामध्ये होत नाही. आपण युनिटी आणि डायव्हर्सिटी असं फक्त बोलतो. प्रत्यक्षात आपण डायव्हर्सिटी नाकारत आलो आहे. विशेषतः गेल्या १० वर्षांमध्ये. आता जर मुस्लिम कुणी दाखवायचं असेल – माझ्या माहितीमध्ये जवळजवळ ९० टक्के मुस्लिम असे आहेत की ते अशी लांब दाढी, ती अशी टोपी असं काहीही वापरत नाहीत. ते अगदी व्यवस्थित – म्हणजे त्याला जर उभा केला तर त्याचं आडनाव गोडबोले, देशपाण्डे वाटू शकेल अशा प्रकारचे खूप मुस्लिम माझे मित्र आहेत. किंवा एखादा दलित मुस्लिम असेल, किंवा ओबीसी मुस्लिम असेल, आहेतच खूप मोठ्या प्रमाणावर, पण तुम्हाला जर सीरिअलमध्ये, चर्चेमध्ये मुस्लिम दाखवायचा असेल तर तो हमखास मौलवी टाईपचाच असतो. त्यामुळ मुस्लिम म्हणजे कोण याचा एक टाईपिफाय करून जो प्रचार होतो, तो निव्वळ प्रचाराचाच भाग असतो. ते म्हणण्यापुरतं असतं की आम्ही मुस्लिम माणसालापण चर्चेमध्ये आणलं, शीख माणसालापण चर्चेमध्ये आणलं. पण सगळे मुस्लिम तसे नसतात. सगळे मुस्लिम तसा पोशाख घालत नाहीत आणि असल्या भंपकपणामुळेच एकदा मोदी जाहीर भाषणात असं म्हणाले की “मै सामने देख सकता हूं कि कौन कौनसे ड्रेस में आया है. और उससे पहचान सकता हूं कि वो कहां का है.” इतकं उघडउघड जातीयवादी किंवा धर्मवादी अशा प्रकारचं भाष्य आपले पंतप्रधान करू शकतात अशा वातावरणात आपण आहोत. त्यामुळे माध्यमांकडून ऑब्जेक्टिव्हिटी, नास्तिकता तर फार दूरचं राहिलं, ऑब्जेक्टिव्हिटी आणि सत्यतासुद्धा आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

लोकेश शेवडे : आता मी त्या २४ अँकर्समधला एक नाही असं समजून एक प्रश्न विचारतो. अशी परिस्थिती आहे हे आम्हा सगळ्यांना, – इथे जेवढे आहेत त्या सर्वांना – मान्य असेल. आम्हाला तुम्ही असं काही सांगू शकता का की ही जरी आजची परिस्थिती असली तरी – याच्यावर तुम्ही एक सूचना दिली की टीव्ही बघणं बंद करा किंवा फक्त नॅशनल जिओग्राफी पहा – तर, आपल्याला यापलिकडे काही करण्यासारखं आहे का? कारण तुमचा जो आत्ताचा सूर होता, तो बऱ्यापैकी निराशेचा वाटला. “आपल्या हातातच काही नाही” अशा तऱ्हेची ती मांडणी होती…

कुमार केतकर : नाही नाही… तो अतिशय आशावादी सूर होता. तुम्ही टीव्ही जेवढे कमी पाहाल, किंवा वर्तमानपत्र जितकं कमी वाचाल तेवढं तुमच्या मनावरचं निराशेचं धुकं जाईल. कारण ती वर्तमानपत्रं तुमच्या मनामध्ये निराशा कोंबताहेत आणि समाज किती वाईट वळणावर लागलाय, समाज कसा चाललाय आणि मुसलमान किती वाईट आहेत अशाच प्रकारचे किंवा क्राईम किती वाढलेला आहे, अशा सर्व प्रकारचे नकारात्मक थॉट्स तुमच्या डोक्यात घुसवताहेत. म्हणजे इतके कलुषित झालेले आहेत विचार लोकांच्या डोक्यामध्ये की कोणत्याही गुन्ह्याची बातमी आली, मग तो बलात्कार असेल, दरोडा असेल तर दरोडा घालणारा हिंदू आहे की मुसलमान आहे हाच विचार डोक्यात येतो. याहीपुढे जाऊन ॲक्सिडेंटमध्ये मेलेली व्यक्ती ब्राह्मण होती, की ओबीसी होती की मुस्लिम होती इथपर्यंत लोक बातमीमध्ये जातीयवाद किंवा धर्मवाद शोधतात. इतका तो प्रसार झालेला आहे लोकांच्या डोक्यामध्ये. त्यामुळे पेपर वाचतानाच आपण आपले ते बांध तयार करतो. त्यामुळे वाचलं नाही तर आपले ते बांध कमी होतील. हा त्यातला आशावाद आहे.

लोकेश शेवडे : मला एक प्रश्न यानिमित्ताने विचारायचा आहे. एक प्रचंड गाजलेलं प्रकरण २०१२ सालचं होतं. ते म्हणजे ‘निर्भया प्रकरण’. आता ते ५ की ६ जण होते ते करणारे आणि हे सगळे कोणत्या धर्माचे होते? त्यातला एक तर ब्राह्मणच होता पण बाकीचे कोणत्या धर्माचे होते ते कळूनही `तशी’ मांडणी त्याकाळी झाली नाही. आता मात्र एखादा गुन्हा सापडला की त्याच्यामध्ये गुन्हा करणारा जर परधर्मीय असेल -म्हणजे तुम्ही म्हणाला तसं मुस्लिम असेल- तर त्याचं नाव हमखास तिथे टाकलं जातं. आणि तो जर बहुसंख्याकधर्मीय असेल -म्हणजे जर हिंदूधर्मीय असेल- तर ती बाब अनेकदा, “त्या मुलीच्या ओळखीतला होता” वगैरे असं काहीतरी करून त्याला महत्त्व दिलं जात नाही, नाकारलं जातं. हे जे होतं आहे, हे एक वाचक म्हणून आपण कुठे नोंदवू शकतो का, काही सांगू शकतो का? काय करावं याच्यावर?

कुमार केतकर : ही परिस्थिती बिघडत गेलेली आहे, ही एकदम आलेली नाही. जोशी-अभ्यंकर खटला १९७६ चा आहे. ज्यांचा खून झाला ते ब्राह्मण होते, ज्यांनी त्यांना मारलं, त्यांच्यापैकी एक ब्राह्णण होता, आणि इतरही होते. एक मला वाटतं मुस्लिम होता, बाकी सगळे हिंदूच होते. त्यावेळेला त्याच्यात अशी काही चर्चा झाली नाही की दोन वृद्ध हिंदू ब्राह्मणांची हत्या एका मुस्लिमाच्या वगैरे…. त्यावेळी ती बातमी एक गुन्ह्याची बातमी म्हणून लोकांनी वाचली आणि पत्रकारांनी ती दिली. ७६ सालचा जोशी-अभ्यंकर खून आणि २०१२ चं निर्भया याच्यामध्ये ते गुन्हा करणारे कोणत्या जातीचे होते हा प्रश्न नाहीये. त्याला एका दुसऱ्या प्रकारचं वळण होतं. ते वळण असं होतं की त्यावेळेला काँग्रेसची राजवट होती. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा होत्या. तुम्ही जर ती चर्चा आठवलीत, जवळजवळ सहा महिने ते प्रकरण टीव्हीवरती चालू होतं, सहा महिने – ते मोर्चे होते, ते बॅरिकेड तोडणं चालू होतं, स्त्रियांचे मोर्चे होते, सर्व पक्षांचे मोर्चे होते आणि त्या सर्व मोर्च्यांमध्ये सातत्याने एक मांडणी होती – काय करत आहेत सोनिया गांधी? सोनिया गांधी असतानासुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या काळामध्ये असं होतंय. म्हणजे तो जो रोख होता, निर्भयासारखे गुन्हे घडताहेत याचा रोख, त्यावेळेच्या काँग्रेस राजवटीकडे होता. आता हाथरसची घटना झाली, त्यावेळी कुठे असा रोख होता? बिल्किस बानूची घटना घडली, त्यावेळी कुठे असा रोख होता? म्हणजे निर्भया प्रकरणसुद्धा काही प्रमाणामध्ये राजकीय बायसमध्ये होतं. बलात्कार वाईट होता, हॉरिबल होता, गुन्हा मोठा होता. शिक्षा व्हायलाच हवी होती, बातमी दाखवायलाच हवी होती. पण त्याचं टोक, सहा महिने तो चालला – हाथरसची बातमी २-३ दिवसांत संपली. याचं कारण काय होतं? तर याचं कारण, हाथरसचं प्रकरण ज्या राजवटीत चाललं, त्या राजवटीला मीडियाची सहानुभूती होती. आत्ता मीडियाची सहानुभूती सर्रास अशाप्रकारची आहे की कोणतीही घटना घडली तर त्याचं खापर मोदींच्यावरती, भाजपवरती, मोदी सरकारवरती किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती फोडलं जाऊ नये. आत्ता थोड्या वेळापूर्वी जी उदाहरणं दिली गेली, ते पेशाब करण्याचं वगैरे, त्यात भाजपचे लोक सामील होते, थेट. पण ती बातमी कटाक्षाने खाली दिली जाते, टाळली जाते किंवा ती माहिती लपवली जाते. अशा प्रकारचं सगळं रिपोर्टिंग असल्यामुळे परिस्थिती बिकट वाटते. अण्णा हजारेंचं आंदोलन संपलं आणि बरोबर त्यानंतर लगेच निर्भया प्रकरण सुरू झालं. २०११ ला अण्णा हजारे आंदोलन संपलं, २०१२ ला निर्भया प्रकरण सुरू झालं. त्यामुळे एक संपल्यानंतर त्यांना सरकारवरती सातत्याने हल्ला चालू ठेवायचा होता. निर्भया मुद्दा त्यांनी बरोबर उचलला आणि त्यामुळे निर्भया प्रकरण हे दुर्दैवानी, जे गुन्हेगारीचं प्रकरण होतं, ते पॉलिटिकल झालं. त्यानंतर एक सर्वांत मोठी गोष्टी कोणती लपवल्या गेली? मागणी काय होती की सोनिया काय करताहेत? राहुल काय करतोय? राहुलनं तिकडे आलं पाहिजे. सोनियानं तिकडे गेलं पाहिजे. आठवत असेल तुम्हाला. दररोज त्या चर्चा असायच्या. नंतर त्या निर्भयाच्या, त्या मुलीच्या आईनं एका मुलाखतीत सांगितलं की त्या कुटुंबाला जो आधार मिळाला, जगण्यासाठी आणि शिक्षणासाठी आणि पैश्यांचा, तो राहुल गांधींनी पर्सनली दिला. राहुल गांधींमुळे त्यांचं कुटुंब पुन्हा उभं राहू शकलं. ही बातमी वर्तमानपत्रांनी जवळजवळ टाळली. हा तर मीडिया आहे.

लोकेश शेवडे : मला यानिमित्तानं आणखी एक आठवतंय. २०१८ मध्ये अचानक २१ ऑक्टोबर रोजी, हे खरं स्वातंत्र्य होतं म्हणून आवाज उठवला गेला. १९४३ मध्ये नेताजींनी सिंगापूरला प्रतिसरकार स्थापन केलं होतं, “ते खरं सरकार होतं, आपण तेव्हाच स्वतंत्र झालो होतो, पण आपल्या ह्या पुढच्या काळात आपल्यापासून ती बातमी लपवली गेली.” अशा तऱ्हेचं जवळजवळ सगळ्या मीडियामध्ये आणि दूरदर्शनवर, चॅनल्सवर, वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रात बातम्या येत गेल्या. व्हॉट्सअपवर तर याही पलीकडचं येत होतं. पण ह्यातला एक मुद्दा एकानंही लिहिला नाही की नेताजींच्या त्या ७ जणांच्या मंत्रिमंडळात ४ मुस्लिम होते. त्याची कुठेच माहिती नाही. कुणीतरी स्वतःला देशाचा प्रमुख समजणारा, देशाचा सेवक समजणारा, सेवक आणि प्रमुख याच्यापैकी वेगवेगळ्या वेळी भूमिका बदलणारा, त्यानं नेताजींची टोपी घालून तिथे सलामी दिली. पण त्या कार्यक्रमात किंवा त्या बातम्यांमध्ये ही गोष्ट मात्र कुठेही आली नाही. कारण ते जर नेताजींचं सरकार होतं, त्याच्यात जर सात मंत्री होते, तर ते कोण होते, त्याचीपण माहिती देणं तितकंच आवश्यक होतं. असं जेव्हा घडत असतं, तेव्हा याला आपण कश्या पद्धतीनं बघावं, किंवा याचे खुलासे कसे करावे असं काही सांगू शकाल का तुम्ही?

कुमार केतकर : खुलांश्यांचा प्रश्नच नाही. त्यावेळी तिथे ड्युटीवर असलेला न्यूज एडिटर किंवा संपादक ह्या दोघांनी काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारचा पक्षपात त्यातून व्यक्त होणार नाही. पण त्यांचाच तो बायस असेल तर मात्र प्रश्नच मिटला. तो त्यातून व्यक्त होणारच. यातला अजून एक मुद्दा असा की त्यावेळेला, म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या तुम्ही सांगितलेल्या ह्या कथेपेक्षा त्याअगोदर वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर जवळजवळ वर्षभर एक कॅम्पेन चालत होतं. सुभाषचंद्र बोसांचा जो सगळा पत्रव्यवहार आहे, ज्या सगळ्या फाईली आहेत, त्या सगळ्या ताबडतोब बाहेर काढा. त्यांना असं वाटत होतं की त्यात नेहरूंवरती कडाडून टीका आहे. नेहरूंनी कसा अन्याय केला बोसांवरती ते त्यात दिलेलं आहे. त्या सगळ्या फाईली काढायचा आग्रह झाला. त्याला ‘७२ फाईल्स’ म्हणायचे. ७२ फाईल्स रिलेटेड टू सुभाषचंद्र बोस मस्ट बी इमिजिएटली पब्लिश्ड, अशी दररोज मागणी व्हायची – पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर, मीडियामध्ये. अखेरीस त्या ७२ च्या ७२ फाईली बाहेर आल्या. त्या बाहेर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंचे किती जवळचे संबंध होते, किती मैत्रीचे संबंध होते. ती चर्चा तेव्हापासून ते या घडीपर्यंत गडप झाली. त्या ७२ फाईलींमध्ये तुम्हाला जे एवढं रहस्यमय वाटत होतं, ते काही सापडलं नाही तर मग ते तरी सांगा की. त्या ७२ फाईलींमध्ये, तुम्ही अगोदर जो प्रचार केला वर्षभर, त्या प्रचारामधलं काहीच नव्हतं, हे पण सांगायला हवं. त्यानंतर त्यांच्यावर खटले भरल्याच्या ज्या गप्पा करता, त्या खटल्यांमध्ये बोसांच्या बाजूने वकील होते नेहरू. हेदेखील सांगत नाहीत. त्यामुळे हे जे न सांगणं आहे, जे छापत नाहीत ते आणि जे छापतात ते हे दोन्ही अविश्वसनीय आहे. आणि म्हणून म्हटलं की मीडिया विश्वास ठेवण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. 

पाकिस्तानसंबंधीच्या बातम्यातसुद्धा असं करतात. म्हणजे आता उदाहरणार्थ, तुम्हाला सगळ्यांना त्या अभिनंदनचं नाव आठवत असेल. कुठे गेला तो अभिनंदन? तो एकदम गडप आहे. बालाकोटनंतर अभिनंदन गडप. तर का झाला गडप? कोणत्याही वर्तमापत्रानं विचारलं नाही की त्याचं पुढे काय झालं? तो काय करतो? त्याला प्रमोशन मिळालं का? काय झालं काय? तर तो गडप होण्याचं कारण असं आहे की अभिनंदनचं प्रचंड कौतुक चाललं होतं, त्याला काय वीर अमुक अवॉर्ड द्या, तमुक अवॉर्ड द्या वगैरे त्याच्या एक ८ दिवसांनीच त्याच्या आईनं तामिळनाडूध्ये, ती तामिळ आहे, एका वर्तमानपत्राला मुलाखत देऊन सांगितलं की त्यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधींबद्दल प्रचंड आदर आहे. अभिनंदनच्या आईनं त्या मुलाखतीत असं सांगितलं. झालं, खल्लास, गडप. त्या दिवसापासून ती बातमी गडप. जशी त्या निर्भयाच्या आईनं मुलाखत दिल्यानंतर ती बातमी गडप झाली. अशा प्रकारे हा सगळा मीडिया चालतो. त्या अभिनंदनचं नाव गडप झालंय. त्याला कोणी आता काही विचारत नाही. तो कुठे आहे? तो काळा आहे का गोरा आहे, काही माहिती नाही. त्यावेळेला मात्र काही काही मथळे वर्तमानपत्राचे आठवत असतील तुम्हाला, तर एवढा एकच शब्द “अ भि नं द न”, अरे, मग एवढं तुम्ही देता, तर पुढे काय झालं तेही सांगा. पुढे काय झालं सांगायला कोणी तयार नाही. याचं कारण, मीडियात आता कसंही करून, कोणत्याही परिस्थितीत, एक ओळ किंवा एक शब्दसुद्धा अशा पद्धतीनं जाता कामा नये ज्याचा ओरखडा मोदी सरकारवर उमटेल. आता सर्व टीव्ही आणि सर्व चॅनेलचं अशा पद्धतीनं काम चालू आहे. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. ते आठवतं की नाही तुम्हाला माहिती नाही. किती लोकांना आणि काय आठवतं तेच मला कळत नाही हल्ली. साधारणपणे १०-११ वर्षांपूर्वी इंग्लिश वर्तमानपत्रात तर नक्कीच, मराठीतसुद्धा दररोज फ्रंटपेजवर एक बातमी असायची. दररोज किंवा दर २-३ दिवसांआड की कुठेतरी पाकिस्तानमध्ये, इराकमध्ये, लिबियामध्ये किंवा कुठेतरी मुस्लिम देशामध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी कोणातरी गरीब बिचाऱ्या निर्वासिताला पकडून आणले आहे आणि त्याला ठार मारण्याच्या तयारीत हे आहेत. ते मग असे मफलर बांधलेले, इकडे टोपी घातलेले आणि हातात कुऱ्हाड की काहीतरी हत्यार असलेले असा त्यांचा फोटो आणि तसा फोटो नसेल तर बातमी की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक प्रवाश्यांना तिकडे जात असताना काही मुस्लिम अतिरेक्यांनी पकडले आणि त्यांची कत्तल केली, खांडोळी केली. आता त्यांची बायको इकडे आलेली आहे आणि ती त्यांचा शोध घेतेय. अश्या बातम्या. मग त्या बायकोनं घेतलेल्या शोधाच्या बातम्या. ह्या अशा फ्रंटपेजवरती, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर. मुस्लिमांनी केलेल्या कत्तलींच्या किंवा अश्या गुन्ह्यांच्या बातम्या दर ३-४ दिवसांनी इंग्रजी पेपरमध्ये तर असायच्याच, मराठीतसुद्धा  फ्रंटपंजवर असायच्या. कुठे गेल्या त्या बातम्या? आता काय तिकडचे मुस्लिम अत्याचार करायचे थांबले की काय? कुठे गेल्या त्या बातम्या? त्या बातम्या येण्याचं कारण असं होतं की ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ म्हणून हंटिंग्टननी जे पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकात त्यानी सिद्धांत असा मांडला होता की आता, ९१ साली कम्युनिझम संपलं. आता ह्याच्यापुढचं जागतिक युद्ध हे इस्लाम विरूद्ध इतर धार्मिक राष्ट्र किंवा धर्म असलेली राष्ट्र असं होणार आहे. तर हा जो एकूण इस्लामोफोबिया झाला हा एका प्लॅनचा भाग आहे. 

अजून एक आठवण तुम्हाला सांगतो. २००१ ला वर्ल्ड ट्रेड सेन्टरची घटना घडली. परवाच्याच सप्टेंबरला त्याला १२ वर्षं पूर्ण झाली. ती घटना घडली, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी, तिथल्या वेळेनुसार सकाळी पावणे नऊला. सुरुवातीला लोकांना तो अपघात वाटला. ते विमान त्या टॉवरमध्ये घुसलं म्हणून. नंतर लोकांच्या लक्षात आलं की तो आतंकवादी हल्ला होता. आता तो आतंकवादी हल्ला होता हे कळल्याबरोबर २४ तासांच्या आत त्यावेळेचे ज्युनियर जॉर्ज बुश टीव्हीवर आले, जागतिक टीव्हीवर आणि म्हणाले की तो हल्ला अल् कायदानी केलेला आहे. २४ तासांत तुम्हाला कळलं, कुणी हल्ला केला आहे? नंतर ते म्हणाले, अल् कायदानं हल्ला केला, इतकंच नव्हे तर ओसामा बिन लादेन ह्याच्या अफगाणिस्तानमधून आणि दुसरं इराकमधून झालेल्या हल्ल्याचा तो भाग आहे. नंतर त्या १९ नावांचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यामध्ये इराकी कुणीच नव्हता, अफगाणीपण कुणीच नव्हता. त्यातले बहुसंख्य लोक होते सौदी अरेबिया, लिबिया वगैरे देशांतले. इराकमधलं कुणी नव्हतं. पण त्या निमित्तानं अमेरिकेनं संबंध अफगाणिस्तान बेचिराख केलं बॉम्बिंगमध्ये. संपूर्ण इराक बेचिराख केलं, कुवैत स्वतंत्र करण्याच्या निमित्तानं. कुणी कुठे आवाज उठवला की तुम्ही बेचिराख केले दोन देश? पूर्ण बेचिराख केलेत? त्या पार्श्वभूमिवर आज तालिबान वाढत गेलेलं आहे. तालिबानच्या बातम्या सध्या कुठेच नाहीत. तालिबान नाही कुणी आता बोलत. गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या आठवणी तुम्ही काढा. दररोज फ्रंटपेजवरती तालिबान होतं, दररोज. मग आता कुठे गेलं तालिबान? आता मणिपूर नाही, तालिबान नाही. आता फक्त युक्रेन. तर ह्या बातम्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅनेज केल्या जातात. कोणत्या बातमीला किती आणि कधी महत्त्व द्यायचं? आता अफगाणिस्तानला द्या, आता इस्लामच्या विरोधातल्या बातम्या द्या. मणिपूरला देऊ नका. अशा प्रकारे ही सगळी न्यूज मॅनेजमेण्ट आहे. ही ग्लोबल न्यूज मॅनेजमेण्ट आहे. तिथे ग्लोबल न्यूज एजन्सीज् आहेत. तो एक प्रचंड मोठा बीझिनेस आहे. कोणतंही वर्तमानपत्र म्हणू शकणार नाही आता की आम्ही एएसपीची बातमी घेत नाही किंवा आम्ही एपीची, एपी म्हणजे असोसिएटेड प्रेस, अमेरिकेची बातमी घेत नाही. कोणत्याही संपादकाची ताकदच नाही असं म्हणायची. कारण दुसरं काही नसेलच त्याच्या हाताशी. ज्या बातम्या तुमच्या टेबलावर येतात, त्यातनंच निवडून तुम्ही देता ना. दुसऱ्या कुठल्या देणार? कारण पाठवतच नाहीत ते बाकीच्या बातम्या. अशा प्रकारचं संपूर्ण इंटरनॅशनल न्यूज मॅनेजमेण्ट आहे. आपण त्याचा एक भाग आहोत. तशाच प्रकारची न्यूज मॅनेजमेण्ट इथेपण चालते आणि ती न्यूज मॅनेजमेण्ट चालत असल्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला असल्यामुळे मी म्हणतो, की तुम्ही वर्तमानपत्रं नाही वाचली, तर तुम्ही जास्त इन्फॉर्म्ड नागरिक व्हाल.

लोकेश शेवडे : आता, एक प्रश्न वेगळ्या  प्रसारमाध्यमाबद्दल. आत्ता आपण बोललो, ते दूरचित्रवाणी आणि वाहिन्या आणि वर्तमानपत्र यांच्याबद्दल बोललो. सध्याच्या प्रसारमाध्यमांमध्ये एक व्हॉट्सअप किंवा तत्सम समाजमाध्यमं आहेत. सध्याच्या काळात, म्हणजे गेल्या विशेषतः ७-८ वर्षांत, इथे अनेक ग्रुप्स स्थापन झाले आहेत आणि त्या ग्रुप्समध्ये, दुर्दैवानं आपले नातेवाईक, किंवा आपण स्वतः आणि आजूबाजूचे मित्रमंडळ किंवा आपण राहणाऱ्या इमारतीतले अन्य लोक असे बरेच आहेत. तर या मीडियावर ज्या पोस्ट्स येतात त्याला आम्ही कसं सामोरं जावं किंवा जसा तुम्ही सल्ला दिला टीव्ही पाहाणं बंद करा. तर या बाबतीत तुम्ही काय सल्ला द्याल?

कुमार केतकर : नाही. सोशल मीडिया बंद करा असं मी सांगणार नाही. सोशल मीडियावरती हुशारीनं सीलेक्टिव्ह रहा. किंबहुना मी असं म्हणेन की सोशल मीडिया हे आता तुमच्या हातात असलेलं, ह्या सगळ्या मीडियाच्या विरोधातलं एक मोठं शस्त्र आहे. कारण तिथे तुम्हाला आता तरी कुणी थांबवू शकत नाहीयेत. जरी त्यांचा तसा प्रयत्न आहे. पिगॅससच्या माध्यमातून आणि एकूण यू-ट्युबवरतीसुद्धा कंट्रोल करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आपले व्हॉट्सअप ते बघू शकताहेत. तुम्ही अलीकडे बातम्यात पाहिलं असेल कोर्टामध्ये व्हॉट्सअप वगैरे सादर करतात. परंतु तरीही मला जे हवं ते मी सध्यातरी लिहू शकतो, म्हणू शकतो. त्यात बेजबाबदारपणा, जातीयवाद, धर्मवाद, हिंसा हे सगळं येतंय. त्याच्या विरोधात आपण लिहू शकतो. त्याला निदान आत्तातरी आपल्याला कुणी आडकाठी करू शकत नाहीये. मग आडकाठी कुठून करतात ते? व्हॉट्सअप तेवढं इनोसण्ट राहात नाही, कारण त्यांनी  फायनान्स करून सोशल मीडिया ग्रुप्स तयार केले आहेत. बीजेपीचं सेल आहे, आयटी सेल. त्या आयटी सेलमध्ये फेक न्यूज आणि फॉल्स प्रपोगंडा हे मोठ्या प्रमाणावरती पसरवण्याचं त्यांचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया आहे. आणि त्यामुळे सारखं ते आपलं खोटंनाटं, चुकीचं, हिंसक याचा प्रसार करत असतात. त्याला तर आपण थांबवू शकत नाही. तो त्यांचा मोठ्ठाच्यामोठ्ठा प्रोजेक्ट आहे, मल्टिमिलीयन रुपये, खरं म्हणजे मल्टिमिलीयन डॉलर्स ते त्यावर खर्च करताहेत. त्याला उत्तर द्यायला आपल्या हाताशी काही नाही. आपलं guerilla warfare, म्हणजे आपणदेखील आपले व्हॉट्सअप मेसेजेसचे, आपल्या टाईपच्या विचारांचे ग्रुप्स नुसते वाढवायचे नाहीत तर आपणसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे हा सोशल मीडिया वापरायचा. सोशल मीडिया बंद करा असं मी म्हणणार नाही, पण त्यातले काय बघायचे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार सुदैवानं आपल्याला आहे. तो मॅक्झिमम वापरा असंच उलट मी म्हणेन.

लोकेश शेवडे : तुम्ही आता जे सुचवलं आहे, त्याच्याशी निगडीत एक प्रश्न मेधा कुलकर्णींनी मांडला आहे. केतकरांनी वर्णन केलेल्या अशा स्थितीतदेखील ऑल्टन्यूज, द वायर, रवीशकुमार यांच्यासारखे यू-ट्युब चॅनल्स चालवत आहेत. यांना आपण बळ दिलं पाहिजे, बळ देत राहिलं पाहिजे, यावर तुमचं मत काय?

कुमार केतकर : मी मगाशी तेच सांगितलं. माझ्या मते, तेसुद्धा त्यांच्या पद्धतीनं मीडिया guerilla warfare करताहेत. आपण त्यांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. एवढंच नाही तर आपण ते अधिकाधिक प्रमाणात आणि अधिकाधिक वेगाने केलं पाहिजे. रवीशकुमारनी अलीकडे केलेल्या एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे त्याला ताबडतोब ५० लाख वगैरे व्ह्यूअर्स आले होते, त्याच्याबद्दल तो म्हणला, हे ५० लाख व्ह्यूअर्स आलेले आहेत, पण हे ५० लाख व्ह्यूअर्स असे आहेत की जे माझ्या विचाराशी सहमत आहेत. हे तेच लोक आहेत आणि तेवढे लोक आहेत आपल्या देशात, ५० लाख लोक माझ्याशी सहमत असलेले आहेत या देशात. ज्यावेळेला माझे विचार टीव्हीवरती जातात, त्यावेळेला मला माहीत नसतं की ऑडियन्स कोण आहे? त्यात माझ्याशी असहमत असलेले लोकदेखील असतात. ते जनरल पब्लिकपर्यंत पोहोचतं. ते त्यांच्यापर्यंत जाण्याची प्रक्रिया आता थांबली आहे. त्यामुळे आपण ओव्हरएस्टिमेट करू नका की सोशल मीडियावर मला एवढा पाठिंबा आहे. याचा अर्थ ‘आय हॅव रिप्लेस्ड माय टीव्ही चॅनल’ असं अजिबात समजू नका. आय कॅन नॉट रिप्लेस माय टीव्ही चॅनल. कारण टीव्ही गोज् ऑल ओव्हर दि वर्ल्ड, २४x७, करोडो अपरिचित श्रोत्यांपर्यंत. Whereas my audience here are rather known in that circuit. Therefore it’s impact is limited. पण मेधा म्हणते ते बरोबर आहे. असे खूप जण आहेत सध्या. त्या सगळ्यांना आपण बळ दिलं पाहिजे. त्या सगळ्यांचा प्रचार केला पाहिजे. त्यांच्या क्लिप्स अधिकाधिक लोकांना पाठवल्या पाहिजेत. त्यातले काही ऐकतील, वाचतील,काही  सोडून देतील, पण मॅक्झिमम ठिकाणी त्या क्लिप्स गेल्या पाहिजेत, कारण आत्ता आपल्या हातात मीडियाचं हत्यार तेवढं आहे. ते सुद्धा किती काळ राहील सांगता येत नाही. तेसुद्धा बंदी करण्याची टेक्नॉलॉजिकल कॅपॅबिलिटी ह्या सरकारकडे आहे. इस्राईलनी त्यांना तशा प्रकारचं तंत्रज्ञान पुरवलेलं आहे. त्या तंत्रज्ञानाच्या आधारे ते आपलं व्हॉट्सअप ब्लॉक करू शकतात, आपलं यू-ट्युब ब्लॉक करू शकतात. आपले मेसेजेस थोपवू शकतात. तुम्ही पाहिलं असेल, कालच अजितदादा पवारांनी तक्रार केली मी त्यांचा ट्विटर मेसेज थांबवला. अशा प्रकारच्या तक्रारी येत राहतात. एवढंच नाही, आता ट्विटर आणि फेसबुक ह्या कंपन्यांना सरकारकडून डायरेक्टली मेसेज जातो की तुम्ही  अमुक-ढमुक थांबवा. कारण आमच्या देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्हाला हे गैर वाटतंय. आणि मग त्या कंपन्या ते थांबवतात. त्या का थांबवतात? त्या थांबवतात याचं कारण असं की तो त्यांचा बीझिनेस आहे. They look at social media as business. Everything is business now. त्यामुळे तो बीझिनेस टिकवण्यासाठी आपलं सरकार आणि त्या कंपन्या, त्या कंपन्या आहेत, त्या काही स्वातंत्र्यासाठी निघालेल्या चळवळी नाहीयेत – त्या फेसबुक असतील किंवा ट्विटर असतील किंवा इन्स्टाग्राम असतील, बीझिनेस हाऊसेस आहेत ती. त्याच्यातून प्रचंड नफा आहे. किंबहुना तुमचे व्हॉट्सअप मेसेजेस गेले, तर त्याच्या प्रमाणात त्यांना पैसे मिळतात, यू-ट्युबवरती पैसे मिळतात. यू-ट्युबवरून लोक इन्कम करतात. शेखर गुप्तांच्या प्रिन्टवरती त्यांचं मोठ्या प्रमाणात इन्कम आहे. आता ते इन्कम जर त्यांना टिकवायचं असेल तर, त्यांना व्ह्यूअरशिप पण टिकवायची असते. ती व्ह्यूअरशिप टिकवायची म्हणजे त्या प्रमाणात त्यांना त्या बातम्या आणि ते लेख आणि मतं व्यक्त करावी लागतात. त्यामुळे सोशल मीडियावरतीसुद्धा नियंत्रण आहेच. हे नियंत्रण राहणारच. पण तरीही ज्याप्रकारे ते वर्तमानपत्र थोपवू शकतात, चॅनल थोपवू शकतात, त्याप्रकारे ते अजूनतरी सोशल मीडिया थोपवू शकत नाहीत. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तो प्रयत्न चालेल. कुणास ठाऊक, २०२४ नंतर तो प्रयत्न ते अधिक वेगाने करू शकतील. जर त्यांचं राज्य आलं तर. त्यांचं राज्य येणार की नाही हे आपल्या आणि आपल्या सोशल मीडियाच्या हातात आहे.

ह्या चर्चेचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.