नास्ति(ऐ)क्याची गोची!

नास्तिक म्हणून काहीही लिहिताना दहा वेळा विचार करावा लागतो. प्रथम “लिहायची गरज आहे का? सगळे तेच तेच तर लिहितात!” ही स्वतःलाच बजावणी! घरच्यांना सांगितल्यावर “तुला काय करायचे ते उद्द्योग कर बाहेर, आम्हांला नको सांगू, तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही” अशी आपण वाल्मिकी होण्याची कोणतीही शक्यता नसतानाही वाल्या-कोळ्यास कुटुंबाकडून मिळालेली सणसणीत प्रतिक्रिया आपणास देतील का? तरीही मनाचा हिय्या करून लेख लिहिल्यावर तो “छापणाऱ्याला आवडेल का आणि लोक तो वाचतील का? अश्या असंख्य प्रश्नांना पार करून मगच हा लेखरूपी गर्भ आकार घेऊ लागतो!

हा लेख केवळ वैयक्तिक अनुभवातून लिहिला आहे त्यामुळे तो सर्व नास्तिकांचे प्रतिनिधित्व करीत नाही किंवा कोणतेही सांख्यिकी दावे करीत नाही असा एक डिस्क्लेमर आधीच टाकून ठेवतो. नास्तिक माणसाची होणारी सर्वसाधारण गोची, आपल्यासारखा विचार करणारे लोक न भेटल्याने होणारी कुचंबणा यावर मंथन करण्याचा प्रयत्न ह्यामध्ये केला आहे. नास्तिक मनुष्यास खरे तर विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असणे तितकेच आवश्यक आहे! आजच्या अक्राळ-विक्राळ युगात या विनोदबुद्धीमुळेच आपले मानसिक स्वास्थ्य टिकून राहू शकते आणि विवेकी माणसाला तर याची जास्तच गरज आहे! जगाला अद्भुत आणि अतींद्रिय गोष्टींचे आकर्षण वाटू लागण्याच्या जमान्यात “बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर” छापाची भूमिका घेणे खूप अवघड! दैवी अनुभव, अनुभूती, चमत्कृती इत्यादींकडे ओढा असणाऱ्या समाजात पायाखालील माती अजूनच भुसभुशीत होत जाताना पाहून तुम्ही पाय रोवून कसे उभे राहणार? आपल्याकडे महाराष्ट्रात तरी “दहावीनंतर विज्ञानशाखेकडे जाणाऱ्यांनीच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा” असा एक अलिखित समज आहे की काय कोण जाणे! पण बहुतांश इतर क्षेत्रात गेलेले लोक वैज्ञानिक विचारांना फारसे आत्मसात करण्यात उत्सुक दिसत नाहीत. हे व्हॉट्सॲपवर येणाऱ्या काही(च्याकाही) मेसेजेसवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येकडे पाहून पटते. पुढारलेल्या, विकसित देशात जसे वैज्ञानिक नजरेतून विचार हा लहानपणापासूनच मुलांमध्ये बिंबवलेला असतो तसे आपल्याकडे नाही. त्यांच्याकडच्याही व्हॉट्सॲप विद्यापिठात अलिकडे “पृथ्वी सपाट कशी आहे” असे लेख येतात पण ते अपवादात्मक. त्यामुळे चिकित्सेचा आळस हा आपल्या समाजाचाच विवक्षित स्थायीभाव आहे. 

काही निवडक मोठ्या शास्त्रज्ञ लोकांची असलेली देवभक्ती, अती श्रद्धाळू असणे हे पण एक न सुटलेले कोडे आहे. कदाचित देव नावाचा अंतिम कठीण प्रश्न ऑप्शनला टाकून जगातली बाकीची सर्व रहस्ये वैज्ञानिक चिकित्सेने सोडवायचे त्यांनी ठरवलेले असावे. असा हा माणसाचा मेंदू (आणि त्यातले मन) हे अजूनही पूर्ण थांगपत्ता न लागलेले एक अद्भुत रहस्य आहे. ज्याप्रमाणे राजा हिरण्यकश्यपूने आपल्याला मृत्यू येऊ नये म्हणून मागितलेल्या वरामध्ये अटी होत्या –  “त्याला कुणी रात्री मारू शकणार नाही आणि दिवसाही नाही, मनुष्य नाही आणि प्राणीही नाही, जमिनीवर नाही आणि आकाशात नाही, घरात नाही आणि घराबाहेरही नाही!” या सर्व अटी भेदून नरसिंहरूपातील विष्णूने त्याचा वध केला. तद्वत माणूस नावाचा प्राणी आहे. हा एकाच वेळी मठ्ठ-बिनडोक आहे आणि चाणाक्ष-बुद्धिमानही, क्रूर-निर्दयी आहे व मृदू-प्रेमळही, साध्या-भोळ्या स्वभावाचा आहे आणि कपटी-कुटिलही! हिरण्यकश्यपूच्या वधाच्या प्रसंगाशी साधर्म्य असणाऱ्या कूटप्रश्नांतून प्रत्येक व्यक्तीचा मेंदू घडला आहे असा भास होतो. तो एकाच वेळी सगळीकडे विहार करतो आणि कुठेच नसतोही! अश्या मेंदूमध्ये रॅशनल, विवेकी विचार आपोआप, निसर्गतःच येणे आणि ते टिकून त्याचा एक अखंड प्रवाह तयार होणे कर्मकठीण आहे. ज्याप्रमाणे लोकशाही टिकेल हे गृहीत धरता येत नाही तसेच माणसाचा विवेकही शाश्वत, सर्वसमावेशी राहील हे ग्राह्य धरता येत नाही. 

तर! आपल्याला (बहुतेक नास्तिकच हा लेख वाचत असतील असे गृहीत धरून “आपल्याला”, दुसरे कोण वाचणार?) माहीत आहेच की देवांची निर्मिती मानवाने भय-भावनेतून केली. दोन प्रकारची भीती – एक, स्वतःला वाटणारी पार्थिव गोष्टींची भीती (यात इतर प्राणी, माणसे, भुते-खेते, संकटे सर्व आले) आणि दोन, इतर मनुष्यांवर अधिकार गाजवण्यासाठी, त्यांना काबूत ठेवण्यासाठी आयुध म्हणून वापरायची भीती. 

स्वतःला वाटणाऱ्या भयातून मग भक्ती निर्माण झाली. वैयक्तिक वा सामुदायिक पातळीवर त्याचा लाभही झालेला असू शकतो – जसे की काही लोक पापभीरू राहिले, व्यसनांपासून आणि वाईट सवयींपासून दूर राहिले, त्यांची मनःशांती श्रद्धेमुळे टिकली, इत्यादी. 

दुसऱ्याला दाखवण्याच्या भयातून धर्म आले, वंश-जातीच्या उतरंडी उभ्या राहिल्या, मग राजकारण आले आणि एक शोषणव्यवस्थाच उभी राहिली, वगैरे वगैरे. सामूहिक पातळीवर काही फायदेही झाले. जसे की विविध कला निर्माण झाल्या आणि भक्तिरसाने त्या फुलल्या व वाढल्या, अत्युच्च पातळीवर सादर झाल्या. संस्कृतीवर्धन झाले. उत्सवाच्या निमित्ताने जनता मिळून मिसळून राहू लागली. त्यातून वारकरी संप्रदायासारखे शिस्तबद्ध, श्रद्धाळू पंथही तयार झाले. इरावतीबाई कर्वे यांनी म्हणून ठेवले आहेच की “पंढरपूरचा विठ्ठल हा उभ्या महाराष्ट्राचा मानसोपचारतज्ज्ञ आहे”. 

हे सर्व फायदे दिसत असताना “उगीच नास्तिकता मिरवून काय दिवे लावणार?” “हे खूळ घेऊन कुठे जाणार?” असे स्वाभाविक प्रश्न नास्तिकाला विचारले जातातच. खरे म्हणजे नास्तिक विचार हे काही मिळवण्यासाठी, सर्वांना आपल्यासारखे बनविण्यासाठी नाहीतच. नास्तिकाने स्वतः नास्तिक राहून आपली आस्तिकांप्रतिची कर्तव्ये आस्थेने करत राहणे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ, आई-आजीस दर गुरुवारी/शनिवारी ठरलेल्या देवळात दर्शनाला घेऊन जाणे, अपत्यप्राप्तीसाठी नवरा वा बायकोला कुलदैवताला साकडे घालायला जायचे असल्यास बरोबर जाणे, एखाद्या देवळाच्या (वा दरगाह, गुरुद्वारा, चर्चच्या) उत्सवात/कीर्तनात सहभागी होणे, मित्रांबरोबर कंपनी म्हणून तीर्थाटन करणे, इत्यादी. हे सर्व माफक प्रमाणात करीत असताना नास्तिकाने उगाच प्रबोधन करण्याचा आव आणू नये वा चिडचिडही करून घेऊ नये. कारण शेवटी (देवापेक्षा) माणूस व नाते महत्त्वाचे. आपल्या जवळच्या व्यक्तींना अंधश्रद्धा टाळून(च) खूष ठेवणे अगत्याचे. फक्त त्यांना चिकित्सा/विचार करायला लावण्याची संधी सोडू नये. जमेल तसे सोप्या भाषेत श्रद्धांमधील विसंगती दाखवीत राहावे. आपल्या विचारांवर, विवेकावर, बुद्धिप्रामाण्यवादावर जर का आव्हान निर्माण व्हायला लागले तर जरूर दंड थोपटून उभे राहावे. उदाहरणार्थ, जेंव्हा लोक काही विशिष्ट विषयांवर व्हॉट्सॲप फॉरवर्ड पाठवितात, जसे की भाभा अणुभट्टीचा फोटो दाखवून “शंकराची पिंड म्हणजे आमचे न्यूक्लिअर एनर्जी सोर्सेस होते” – तेंव्हा पडताळणीसाठी मी त्यांना डॉ. नारळीकर/डॉ. काकोडकर यांसारख्या शास्त्रज्ञांनी यावर काही लेख लिहिला आहे का तो दाखवा असे विचारतो. भारतीय वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेले काही दस्तावेज उपलब्ध आहेत का जेणेकरून कोणतेही पाश्चात्य विज्ञान न वापरता अणुभट्टीची पुनर्निर्मिती करता येईल? नसेल तर सत्याचा शोध तुम्ही कसा घेणार असा प्रश्न करतो! तेंव्हा “अर्थातच हे सगळे शास्त्र लिहून ठेवले होते आपल्याकडे, पण इंग्रजांनी ते नष्ट केले, किंवा कदाचित नारळीकरांनाही माहीत नसावे, केम्ब्रिजला शिकले ना ते!” याही उत्तराची अपेक्षा ठेवावी. इथे बोलणे खुंटते, पण तुम्ही विवेकी विचाराचे एक पिल्लू तरी त्यांच्या मनात सोडले याचे समाधान बाळगावे. 

नास्तिकाला आपले अस्तित्व दाखवावेसे प्रकर्षाने कधी वाटते? जेंव्हा देवावरचे अवलंबित्व प्रमाणाबाहेर वाढते आणि माणूस प्रयत्नवादाकडून दैववादाकडे अधिकच झुकू लागतो तेंव्हा. एक प्रकारचे असंतुलन तयार होऊ लागते. सगळ्याची जबाबदारी त्या नियंत्यावर टाकून माणसे मोकळी होतात. नास्तिकाला इथेच खुपू लागते. कुणी काय करावे, कोणाला भजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एखाद्या गोष्टीच्या/भक्तीच्या आहारी गेल्याने जगाची उत्पादनक्षमता तिकडेच वाया जात असल्याचे पाहून नास्तिकाला वाईट वाटते. अर्थात देव-श्रद्धा ही एकच गोष्ट यासाठी जबाबदार नसते. उदाहरणार्थ, अति-क्रिकेटच्या अति आहारी गेलेल्या समाजासही हे लागू पडतेच की‍! पण विषय नास्तिकतेचा असल्याने आस्तिकतेबद्दलच जास्त बोलणे होणार हे ओघाने आलेच. त्यात व्हॉटअबाऊटरी नको म्हणून क्रिकेटचा उल्लेख करून टाकला झाले! काही ठिकाणी लोक छोटे कोनाडे शोधून त्यात मूर्ती उभी करतात, पूजा सुरू करतात. मग हळूहळू तिथे राहणारे लोकही या ‘देखल्या’ देवास दंडवत ठोकणे सुरू करतात. मग त्या देवाच्या जन्मतिथीस उत्सवाचा घाट घातला जातो. स्पीकर येतात, डीजे येतो, जेवणावळी, देणग्या येतात आणि भक्तीचा बाजार उठतो. भावनांचा कल्लोळ उडवून त्यांना अधिकच संवेदनशील केल्यावर मध्यममार्गी विरोधाचा प्रश्नच उरत नाही. यातून निर्माण होणाऱ्या सार्वजनिक उच्छादाने सर्वच भरडले जातात. मग ते दहावीचा अभ्यास करणारी मुले असोत किंवा वृद्ध. आधीच सतरा ठिकाणी होणाऱ्या जयंती उत्सवात हे का सामील होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीतच आहे. थोड्याफार फरकाने हे सर्वच ठिकाणी होत असते. या गोष्टींचा सर्वोत्तम उपयोग अर्थातच राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी सनातन काळापासून करीत आले आहेत.

आस्तिकांकडून विचारले जाते की जगणे कठीण झाल्यावर अध्यात्मासाठी तुम्हाला धर्म, देव वगैरे लागणारच की हो! त्याशिवाय मनःशांती कशी मिळेल? विज्ञान थांबल्यावर अध्यात्म सुरू होतेच वगैरे. यासंदर्भात आपले वाईचे सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी “नास्तिकांचे अध्यात्म” नावाचा उत्कृष्ट लेख लिहिला आहे. जिज्ञासूंनी तो जरूर वाचावा. आपल्याकडचे बहुतेक बाबा-बुवा हे कोणत्यातरी देवाच्या सगुण-रुपाला पुढे करूनच अध्यात्म सांगतात. त्याच देवांच्या सुरेल प्रार्थना गीते म्हणतात. पुराणातल्या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या अध्यात्माचा टेकू उभा राहिलेला असतो. मग ह्या सर्व गोष्टींचा आधार न घेणारा नास्तिकांचा अध्यात्मिक बाबा असू शकतो का? आपल्याकडे होऊन गेलेल्या ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम, एकनाथ ते अगदी गेल्या शतकातील स्वामी/महाराजांपर्यंत सर्व संत महान आत्मे होतेच. काही नास्तिकांसाठी मात्र ते उत्तम साहित्यिक आहेत ज्यांनी धार्मिक भक्तिमार्गातून लोकांना सत्शील करण्याचा चंग बांधला. पण ते सगळेच नास्तिकांचे आध्यात्मिक गुरु होऊ शकतील का? मला नाही वाटत. संतांनी महाराष्ट्राला उदासीन बनवले असे पूर्वी कुणीतरी प्रसिद्ध लेखक म्हणून गेलेच आहेत. प्रयत्नवादी राहणे आणि योग्य तो(च) वेळ श्रद्धेसाठी ठेवून बाकीचा उत्पादक कामकाजात घालणे याचे तारतम्य आपल्या समाजाला बाळगता येत नाही हेच खरे!

कोणताच धर्मपुरस्कृत आध्यात्मिक आधार मनाला उपलब्ध नसल्याने किंवा असल्या कुबड्यांचे सर्व दोर स्वतःच कापून टाकल्याने म्हणा, नास्तिक प्रयत्नवादी राहून मार्ग काढू शकतो. आस्तिक मध्यमवर्गीय-शिक्षित लोकांनाही श्रद्धेच्या कितपत आहारी जायचे याचे तारतम्य असते. मात्र सर्वांना ते स्वातंत्र्य नाही. आपला व्यसनी मुलगा देवकृपेने सुधारेल असे आमच्याकडे घरकामासाठी येणाऱ्या मोलकरणीला वाटले. म्हणून तिने मानसिक किंवा वैद्यकीय उपचार आधी केलेच नाहीत. व्यसनांमुळे कावीळ, पोटाचे विकार अश्या आजारांनी त्याला ग्रासले. छोटी मुलगी बरोबर घेऊन त्याची बायकोही कंटाळून माहेरी गेली. मुलाच्या शुश्रूषेचा भार आमच्या या बाईंवर आला. सर्व उपाय करून झाले. डॉक्टर, वैद्य, कुडमुडे, मंत्र-तंत्र झाले, विविध कुलदेवांना/देवींना नवससायास करून झाले. आम्ही फक्त आर्थिक आणि थोडी मानसिक मदत करू शकत होतो. तब्येतीत प्रगती न झाल्याने त्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट बघवेना. विवेकाची चार मुक्ताफळे त्यांना ऐकवण्याची  कितीही खुमखुमी आली तरी त्या रंजल्या-गांजल्या, अशिक्षित कुटुंबाला या गोष्टींचा काय उपयोग? त्यांच्या भवतालाप्रमाणेच त्यांना वागावे लागते. अशी किती कुटुंबे नियतीचे भोग भोगत असतील याची गणना नाही. इथे शिक्षण, सामाजिक स्थान, पिअर प्रेशर यांचा मोठा हात आहेच. 

असाही एक युक्तिवाद केला जातो की “तुम्ही काहीही म्हणा – त्या मंदिराच्या वास्तूत गेल्यावर प्रसन्न वाटते की नाही? तिथे एक प्रकारची ऊर्जा मिळते की नाही आपल्याला?” मग आमचे ठरलेले उत्तर “होय हे खरे आहे –  बऱ्याचश्या प्रार्थनागृहांमध्ये असे वाटते! पण मग एखाद्या उत्तम युनिव्हर्सिटीतील अभ्यासिकेत किंवा वाचनालयात गेले तरी तसे वाटते.” त्यांची संख्या मात्र आपल्याकडे कमी आहे आणि तिथे जाणारे त्याहून कमी – मग ते सर्वांना कसे समजणार? पुढील प्रश्न असा असतो की “श्लोक, मंत्रोच्चारामुळे वातावरण किती सुंदर होते!”. त्यावर “भल्या सकाळी लता मंगेशकरांचे किंवा सुधीर फडक्यांचे एखादे गाणे ऐकले तरी एखाद्याची भाववृत्ती ताजी होऊ शकते” हा माझा उतारा असतो. पण या गोष्टी मापट्यात टाकून मोजण्यासारख्या नाहीत ना!! त्यामुळे जे बहुसंख्य, त्यांना वाटणारी प्रसन्नताच जास्त खरी असा समज दृढ होऊ शकतो. एवढी ईश्वरभक्ती जगभरात ओसंडून चाललेली असतानाही आपण समजा जगातील विविध दुःखे, युद्धे, अत्याचार, पोराबाळांची हेळसांड इत्यादी घटनांचा संदर्भ देऊन हे कसे काय होते आहे, यांचा देव कुठे आहे, असे विचारले तर “आध्यात्मिक पातळीवर या गोष्टी फार क्षुल्लक आहेत, ती पातळी गाठल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही” अथवा “मागील जन्माचे पातक!” अशा स्वरुपाचे चापलुसी उत्तरही ऐकायला मिळू शकते. हे सर्व अतर्क्य पातळीवर गेल्याने यापुढची चर्चा विवेकावर आधारित ठेवणे कठीण होऊन बसते. 

आमच्या घराजवळील मारुती मंदिरासमोर सिग्नल आहे. तिथे लोक सिग्नल तोडून हमखास पुढे येतात, देवळासमोर रस्त्याच्या मध्येच थांबून गाडीवर बसूनच देवाला नमस्कारही ठोकतात, आणि ग्रीन सिग्नलमधून आलेल्यांना अडथळा आणतात. हे बघून पलीकडच्या रेड सिग्नलला थांबलेल्या आम्हांला नास्तिक म्हणून जो जळफळाट होत असेल तेवढाच तिथल्या आस्तिकांना होतो का हा प्रश्न मला नेहेमी पडतो. “इन्स्टंट कर्मा”सारखे त्या बजरंगबलीने सिग्नल तोडलेल्या माणसाच्या गाडीचे टायर तिथल्या तिथे पंक्चर करून शिक्षा द्यायला पाहिजे असा एक विचार मनाला चाटून जातो. पण हाय रे दैवा! तोच माणूस पुढे सगळे सिग्नल तोडून बिनधास्त इप्सितस्थळी पोहोचतो आणि पोलीस तिसऱ्यालाच अडवतात. कदाचित “देव तारी त्याला… ” असे असेल! मग नियम न पाळणाऱ्यानाच वाचवणारा देव कसा? नमस्कार केल्यावर देवही आपल्या पृथ्वीवरचे कायदेकानू विसरतो की काय, आणि गोष्टींमध्ये देतो तसा वर देतो का की “वत्सा, पुढील सर्व सिग्नलवर तुला पोलिसांपासून अभय”!?  असे चिकित्सक प्रश्न ओघाने आलेच. खरे म्हणजे मोठे गुन्हे करणारे उजळ माथ्याने मिरवताना आणि भलतेच कैदी ट्रायलविना तुरुंगात खितपत पडताना पाहून “अरेच्या, देवाने काहींना वर तर नाही दिला?” असाही प्रश्न पडतो. आपल्या पुराणांतही अति-भोळे देव “हा मनुष्य या वराचा काय व कसा उपयोग करेल, त्याची कुवत काय आहे?” याचे त्याच्या स्वभावानुसार विश्लेषण न करता प्रसन्न होऊन बिनबोभाट वरांची खिरापत वाटतात याची असंख्य उदाहरणे आहेत (उदा: हिरण्यकश्यपू, बळी राजा इत्यादी). झालो प्रसन्न दे वर, झालो प्रसन्न दे वर! आस्तिक व नियममोड्या भक्तांचे देव पण असेच प्रसन्न होऊन काहीच्याकाही वर देत असावेत. उदाहरणार्थ, “पुढील सहा महिने कितीही सिग्नल तोड तुला पोलिसांपासून अभय! नो पार्किंग/हेल्मेट न घातल्याचे आर.टी.ओ तिकीट घरी येणार नाही”. आता यावर अगदीच अंगाशी आल्यावर मग देव “एखाद्या मनुष्याचा तुझ्या गाडीमुळे गंभीर अपघात झाल्यास हा वर नाहीसा होऊन तू जेलमध्ये जाशील” असा उप-वर देत असावेत. आता जे देव अश्या स्वरूपाच्या गुन्हेगार, राक्षसी, अहंकारी लोकांना “वर” देऊन आधार देतात, त्या देवांच्या कथांमध्ये राजकारण्यांना आपल्या ‘कृष्ण’कृत्यांचे समर्थन करायला युक्तिवाद मिळणारच ना! एकदा भावनेला हात घालून कशाचेही समर्थन करणे शक्य झाले की मग आजच्या काळातल्या कायदेकानू, उच्च नैतिक मूल्ये ह्यांना कोण भीक घालतो? हे झाले सगुण भक्तीचे, भारतीय पुराणांचे. निर्गुण भक्तीत आणि प्रेषित धर्मात अर्थातच एकाच धर्मग्रंथात लिहिलेल्या (किंवा कुणीतरी घुसडलेल्या) गोष्टींमुळे काय अनर्थ होतो हेही सर्वांना माहीत आहेच. 

लहानपणी तिसरीत असताना वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली तेंव्हा बरेचदा अश्या बातम्या वाचण्यात यायच्या (दुर्दैवाने अजूनही येतातच!) – “पुणे येथून दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भक्तांच्या व्हॅनला शिरूरजवळ पहाटे दोन वाजता भीषण अपघात, ५ मृत्यू ३ अत्यवस्थ”. हीच बातमी कधी दर्शनाला जाणाऱ्या गाडीच्या अपघाताबद्दलही असायची. खरे म्हणजे त्या अपघाताला जबाबदार असतात ते तात्कालिक घटक जसे की रात्रीचे ड्रायव्हिंग, दारू पिऊन गाडी चालविणे, रस्त्यातील खड्डे, समोरून बेफाट येणारे वाहन इत्यादी. पण बातमीचा केंद्रबिंदू देवदर्शन! मला तर वाटत आले आहे की हे छापणारा बातमीदारच नास्तिक असावा. म्हणूनच माझ्यासारख्या संभ्रमितांची नास्तिकता पक्की होण्यास मदत झाली असावी. साधारण त्याच वयात मी तिरुपती बालाजीच्या दर्शनास कधीही न जाण्याची प्रतिज्ञा केली आणि आज पस्तीस वर्षे झाली, मी ती पाळली आहे. ज्या देवालयात प्रवेशप्राधान्य हे कोण किती खिसा मोकळा करते यावर ठरते, तिथे देव असण्याची शक्यता मी नगण्य धरली होती. जर का देव असलाच तर तो गरीबांचा आधी असेल, श्रीमंतांचा नंबर नंतर लागला पाहिजे. पण कसचं काय! इथेही शोषणातून देव (की माणूस?) आपण नसल्याचीच आमची भावना बळकट करतो! 

तीर्थयात्रा, देवदर्शन यामध्ये जाणारा वेळ वाचत असल्याने नास्तिकाने फावल्या/सुट्टीच्या वेळात काय करावे? प्रत्येकवेळी इतर लोक काशी-मथुरेला गेल्यावर आपण गोव्याला जाऊन बीचवर लोळावे का? अर्थातच नाही. आपल्या संस्कृतीत बहुतांश उत्सव हे देव-देवतांशी निगडीत गोष्टींवर आधारलेले आहेत. कुटुंबाबरोबर त्यात योग्य तो सहभाग घेत असतानाच आपण आपले छंद उत्तमपणे जोपासणे आवश्यक आहे. या विरंगुळ्याच्या गोष्टी आपल्याला स्वतःच शोधायला लागतात. त्यात मन रमवायला हवे. सध्याच्या वाढलेल्या टोकाच्या धार्मिक वातावरणात या अल्पसंख्याक समुदायाची घालमेल होणे ओघाने आलेच. शिवाय लोक भावनेला हात घालायला सततच तयार असल्याने मर्यादा पाळून विवेकी चर्चा होणे अशक्य. मग नास्तिकांनी त्यांचे उत्सव काढावेत का? मेळावे करावेत का? त्यांचेही लांगूलचालन करणारे राजकीय पक्ष तयार होतील का? असे प्रश्न उगम पावतात. 

नास्तिकांनी मेळावे भरवावेत का? किंवा एकी करावी का? यावर अर्थातच नास्तिकांमध्ये दुमत आहेच. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही म्हंटल्याप्रमाणे मेळावे करण्याची काही आवश्यकता नाही. शहीद भगतसिंग किंवा इतर कुणालाही नास्तिकतेचे चेहरे बनवून नवीन देव तयार करू नयेत. हे ठीकच आहे. आत्तापर्यंत भारतीय आणि जागतिक परिप्रेक्ष्यात नास्तिक्याच्या विचारांबद्दल काय काम झाले आहे याचे ज्ञान होण्यासाठी काहीतरी व्यासपीठ/अधिष्ठान हवेच. आधार म्हणून नव्हे तर माहितीचा स्रोत म्हणून हे आवश्यक आहे. आपल्यासारखेच विचार असणारे कुणीतरी भेटल्याचा आनंद नास्तिकांनाही मिळावा. विचार करायला आळस करणाऱ्या समाजात एरवी नास्तिकता म्हणा, बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा, तसूभरही फरक पडणार नाहीये. कितीही डोके आपटले तरी आपली जनता, मग ती शिक्षित असो की अशिक्षित, “आमाला आमच्या लायनीप्रमानं जाऊ द्या” असंच म्हणत राहणार! जागतिकीकरणानंतर सगळी सरमिसळ होऊन, शिक्षण आणि आरोग्य परिस्थिती सुधारेल आणि लोकांना धर्माच्या अफूच्या गोळीचा आधार घ्यावा लागणार नाही असा एक समज होता. पण झाले भलतेच. उदारीकरणानंतर आलेले उथळीकरण आणि त्यातून झालेले समाजाचे बधिरीकरण सगळ्याच ध्रुवांवर पसरले (ती अमेरिका असो की भारत!) आणि आपण अजूनच कट्टर धार्मिक, अविवेकी झालो. शाळेत असताना रसायनशास्त्रात आपण एक ‘उदासीनिकरणाची’ प्रक्रिया शिकलो. पुढे तिचा वापर फक्त आमची विवेकी विचार करण्याची क्षमता उदासीन करण्यात झाला असावा!

मला असे कायम वाटत आले आहे की लोक कधीच ‘कन्व्हर्ट’ होऊन आस्तिकचे नास्तिक होत नाहीत. ती जन्मतःच नास्तिक असतात. बरीच वर्षे सामाजिक रीतीप्रमाणे ते आस्तिक म्हणून वावरतात. आणि मग प्रौढ झाल्यावर एखाद्यालाच जसे आपले लैंगिक ओरिएन्टेशन वेगळे आहे हे उमगावे त्याप्रमाणे नास्तिक स्वतःलाच उलगडत जातो. त्यामुळेच तो (वा ती) आपले आत्तापर्यतचे आस्तिकांबरोबरचे रूटीन सुरू ठेवू शकतो/ते. किंवा नास्तिक म्हणून नास्तिकाला काही वेगळे करावे लागत नाही. एक तत्त्व म्हणून त्याने वा तिने हे कायम जवळ बाळगणे (वाटले तर!) आवश्यक आहे! त्यातही कदाचित जहाल नास्तिक आणि मवाळ नास्तिक असे दोन गट पडत असतील. माझ्यासारखे मवाळ धोरण बाळगणारे हा ‘तात्त्विक अंतःप्रवाह’ सुरू राहावा एवढे तरी पाहत असतात. असो. आपण कायम चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी असावे आणि प्रश्न विचारणे सोडू नये! लोक चेष्टा करतीलच, आपण विनोदाची ढाल पुढे ठेवावी!

हा लेख संपवण्याची घटिका जवळ आली आहे. आज दत्तजयंती – त्यामुळे “किमान आज तरी देव्हाऱ्यातील देवांना गरम पाण्याने आंघोळ घालून पूजा, आरती घडव रे बाबा” असा सांगावा बायकोकडून आला आहे. तो लवकर पूर्ण करणे आवश्यक! आता थांबतो. इथपर्यंत लेख वाचलात म्हणजे माझे भाग्य किती थोर! ईश्वराची कृपाच जणू. सॉरी सॉरी – तुम्हाला हे आवडणार नाही. माफ करा. नुसतेच आभार मानतो!

ता. क.: जाता जाता एक विचार मनात आला. आमच्या घराजवळील रिक्षा (स्टॅन्ड) वाल्यांनी उभारलेल्या छोट्या दत्तमंदिराचा उत्सव आज जोरात साजरा होत आहे. आपणही असेच एखादे नास्तिक मंदिर काढून नवीन उत्सव सुरू करावा काय? तेवढाच नास्तिक(ता) भक्त संप्रदायाचा जीडीपी वाढेल आणि एखाद्या नास्तिकाने या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याचा विचार केलाच तर भविष्यातील मतदारांची सोय! त्या मंदिरात मूर्ती कोणती ठेवावी यावर विचारविनिमय सुरू आहे. असो.  

अभिप्राय 2

  • विनोदाचे थेंब उडवत लिहीलेले वैचारिक लेख कमी असतात. हा लेख त्या जातकुळीतील आहे व भट्टी छान जमली आहे.स्वत: लेखकांनी म्हटले आहे की विनोदबुद्धीमुळेच नास्तिकांचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. श्री कृ कोल्हटकर यांनी आपल्या विनोदबुद्धीने समाजातील अनेक विसंगती दाखवल्या. पण त्याचबरोबर विज्ञानबुध्दीची कमतरता आपल्या समाजात जाणवते. अनेक धार्मिक विसंगती विज्ञानबुध्दी समोर घळाघळा विरघळतात.तेव्हा विज्ञानाकडे आस्तिक आणि अवैज्ञानिक गोष्टींकडे नास्तिक नजरेने बघण्यात मोठं शहाणपण आहे. देवाधर्माच्या बाबींकडे दुर्लक्ष हा सर्वोत्तम मार्ग आहे.

    • श्री रायकरजी – प्रतिक्रियेबद्दल (लेखकाकडून) धन्यवाद! थोडासा तिरकस भाषेतील लेख आपल्याला आवडला हे वाचून बरे वाटले. “विज्ञानाकडे आस्तिक नजरेने बघण्यात” म्हणजे विज्ञान प्रमाण मानून असा अर्थ घेत आहे. देवाधर्माच्या बाबींकडे दुर्लक्ष हा सर्वोत्तम मार्ग आहे – हे अगदीच पटण्यासारखे आहे! आपल्या प्रतिक्रियेमुळे असेच विनोदी शैलीतील गंभीर काही लिहिण्याची प्रेरणा मिळेल! आभारी आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.