हर्मिट क्रॅबच्या निमित्ताने…

(हर्मिट क्रॅबची कवितेला कारण ठरलेली वार्ता https://www.bbc.co.uk/news/science-environment-68071695 या दुव्यावर आहे)

कुठल्याशा झाडांच्या सावलीत खोपा बांधणारे
प्लास्टिकच्या बाटलीत झुलले
कुठल्यातरी अंतराळातले प्रगत जीव म्हणाले
अरेरे, प्लास्टिकने यांना गिळले

कुठल्याशा झाडांच्या सावलीत ढोलीत झोपणारे
प्लास्टिकच्या डबड्यात निजले
कुठल्यातरी अंतराळातले प्रगत जीव म्हणाले
अरेरे, प्लास्टिकने यांना गिळले

कुठल्याशा झाडांच्या सावलीत निवारा शोधणारे
प्लास्टीकच्या पत्र्यात डुलकले
कुठल्यातरी अंतराळातले प्रगत जीव म्हणाले
अरेरे, प्लास्टिकने यांना गिळले

कुठल्याशा झाडांच्या सावलीत कुटीत राहणारे
प्लास्टीकच्या बंगल्यात सुखावले
कुठल्यातरी अंतराळातले प्रगत जीव म्हणाले
अरेरे, प्लास्टिकने यांना गिळले

उडणारे, सरपटणारे
सरपटणारे, चालणारे
चालणारे, विचार करणारे
सगळे सगळे म्हणाले
यती खेकडूकडून आम्ही हे ज्ञान घेतले…

कुठल्यातरी अंतराळातले प्रगत जीव म्हणाले
अरेरे, प्लास्टिकने यांना गिळले…

अर्थ कळला पण प्लास्टिकला दाद द्यायला हवी असे एकजण म्हणाले. मनात आले, मग यांना कोणता अर्थ कळला? अशीच ती कविता माऊली. वाचकाला त्याच्या मनोव्यापारानुसार वेगवेगळे दर्शन घडवून आनंदपान करवते…

मला वाटतं, इथे न केवळ प्लास्टिकला, एकंदरीत निसर्गाला दाद द्यायला पाहिजे.

प्लास्टिक निर्माण होते, त्याने उत्क्रांतीच्या एका स्तरावरच्या जीवांना सौख्य मिळते, त्याच्या अतिरेकाने काही समस्या निर्माण होतात, थोडे अधिक शहाणे समजणारे त्या समस्यांना बघून आता संपले, हे याच्या आहारी गेले म्हणतात… निसर्गाचा खेळ इतक्यात संपत नसतो. ज्याने चोच दिली तो दाणे देणार म्हणतात…

शंख – शिंपले कमी झाले म्हणून मृदुकाय जीवांचा आसरा कमी झाला, त्यांना हानी पोहोचेल असे वाटत असतानाच मृदूकाय प्राणी प्लॅस्टिकचा आसरा करायला लागलेत असे दिसते… की अधिक शहाणे पुन्हा हळहळतात…

कदाचित प्लॅस्टिकच्या आश्रयाने मृदुकाय जीवांचे जीवन अधिक सुखकर बनलेले असू शकते…

शास्त्रज्ञ निसर्गाचे गूढ उकलण्याचा तळमळीने प्रयत्न करत राहतात… नवे शोध यातूनच तर लागतात…

मी प्लॅस्टिकच्या अतिरिक्त वापराचे समर्थन करत नाही. तसे कोणत्याच अतिरेकाचे, हळहळण्याचे, तर नाहीच नाही. प्रत्येक नवा शोध हा गरजेतून लागतो, त्याचे स्वागत आहे. त्यातून समस्या निर्माण होणार… नव्या शोधांची जननी म्हणून त्यांचेही स्वागत आहे.

प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून जीवन पुढे नेणे म्हणजे काय याचे हर्मिट क्रॅबच्या निमित्ताने यथार्थ दर्शन झाले. म्हणून त्याची कविता झाली.

कविता हाच फॉर्म निवडला गेला कारण तिथे बरेचसे विश्लेषण आणि अर्थ लावणे वाचकाच्या आकलनावर सोडून देता येते. बहुतेक चांगल्या कवितांचा अर्थ कळाला असे वाटेपर्यंत त्यात आणखीही काही आहे समजून घेण्याचे असे रसिक वाचकाला वाटत जाते. कवीलाही फोड करून सगळेच समजावता येत नाही, अजून बरेच तर अज्ञातच आहे असे वाटते तेव्हा त्या अनुभवाची कविता होते… इति अनुभूति:।

धन्यवाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.