प्रा. स.ह.देशपांडे यांचे राष्ट्रवादविषयक विचार (उत्तरार्ध)

प्रा. स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष

पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे प्रा.स.ह. देशपांडे यांच्या ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व’ (आवृत्ती पहिली, १ जुलै २००२) या ग्रंथात त्यांनी विवेचिलेले त्यांचे राष्ट्रवादविषयक विचार आपण समजावून घेत आहोत.

राष्ट्रवादाची गरज व त्याचे स्वरूप 

.ह. म्हणतात, “राष्ट्रवादाचे मूळ गृहीतक असे की जग स्पर्धाशील आहे. टोळ्या म्हणून,जमाती म्हणून, वंश म्हणून किंवा वेगवेगळे धार्मिक समूह म्हणून मानवजात गटागटांत विभागली गेली आहे आणि हे गट कधी या रूपाने तर कधी त्या रूपाने एकमेकांशी स्पर्धा करीत आलेले आहेत. गेली काही शतके ‘राष्ट्र’ हा मानवगट या स्पर्धेतला एक महत्त्वाचा एकक (यूनिट) झालेला आहे. या स्पर्धेचा इतिहास एकमेकांवर कुरघोडी, आक्रमण, अत्याचार, हिंसा, शोषण यांचा आहे. आजही या परिस्थितीत मूलतः बदल झालेला नाही अशी राष्ट्रवादी विचाराची धारणा आहे. गटांची अंतर्गत घडण आणि साधने बदलली असली तरी गटस्वार्थाच्या प्रेरणा आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या कृती बव्हंशी कायम आहेत असे राष्ट्रवाद मानतो.

अर्थात् राष्ट्रा-राष्ट्रांत सहकार्यही असतेच, किंबहुना तेही वाढल्याचे लक्षात येते. टपालाची जागतिक यंत्रणा, इंटरपोल, एक (क्षीण) आंतरराष्ट्रीय कायदा व काही संकेत, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अनेक संस्था – ही या सहकार्याची उदाहरणे होत. आता तर शस्त्रास्त्रनिर्मूलनासाठी वाटाघाटी होत आहेत. दुष्काळ, भूकंप, पूर अशा संकटांच्या प्रसंगी देश एकमेकांना मदत करतात असेही दृश्य दिसते.

मात्र सगळेच सहकार्य भूतदयेच्या किंवा मानवतेच्या प्रेरणेतून आकाराला येते असे समजणे चूक ठरेल. किंबहुना बव्हंश सहकार्य स्वार्थप्रेरित असते असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. सहकारी चळवळीतला ‘सहकार’ तपासून पाहिला तर असे लक्षात येईल की बहुतेक उदाहरणांत स्वार्थ हेच सहकारी समूहाच्या सदस्यांचे ध्येय असते. एकत्र येऊन प्रत्येकाचा स्वार्थ अधिक चांगल्या रीतीने साधण्याची शक्यता असेल अशाच वेळी व्यक्ती स्वेच्छेने सहकार्य करतात आणि असाच सहकार यशस्वी होतो. एवढेच नाही तर व्यक्तींनी समूहाच्या उपक्रमात जी निविष्टा (इन्पुट) घातलेली असते, धन किंवा श्रम स्वरूपात, तिच्या प्रमाणात तिला फायदा होत असेल तरच सहकार स्थिर पायावर उभा राहतो. (सहकार म्हणजे निःस्वार्थीपणा, परोपकार असे अभ्र त्याच्याभोवती उभे करण्यात आल्यामुळे भारतात अशी स्थिती झालेली आहे की त्याचे खरे स्वरूप लोकांना कळत नाही, वर्तनात दंभ शिरतो आणि सहकाराचे उपक्रम अशास्त्रीय पायावर उभे राहतात.) सहकार्य म्हणजे ‘शाहणा स्वार्थ’ हे अर्थातच खरे आहे, पण तरी अखेरीस तो स्वार्थच असतो. म्हणजे सहकार्य करणाऱ्या समूहाच्या प्रत्येक सदस्याचा स्वार्थ असतो हे विसरून चालणार नाही. राष्ट्राराष्ट्रांच्या सहकार्याबाबतही हे खरे आहे. विशुद्ध भूतदया किंवा मानवी अनुकंपा यांचा अंश आंतरराष्ट्रीय सहकार्यात असतो पण तो फार थोडा असतो.

‘प्रत्येकाविरुद्ध बाकीचे सर्व’ (ईच अगेन्स्ट ऑल) अशा या परिस्थितीत कुठल्याही समूहाला टिकून राहण्यासाठी आपली शक्ती वाढवणे अवश्य ठरते. येथेच राष्ट्रवादाची गरज निर्माण होते. भारत आज अशाच जागतिक परिस्थितीत आहे. त्यामुळे त्याला एक अखंड, सुदृढ आणि समृद्ध समूह म्हणून जगायचे तर राष्ट्रवादाची कास धरली पाहिजे.”

राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय नीतिमत्ता

राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय नीतिमत्ता यांविषयी काही स्पष्ट मते मांडताना स.ह. लिहितात की, राष्ट्रवादाची पहिली अट म्हणजे ‘आपले’ कोण आणि ‘परके’ कोण हे ठरवणे. ‘आपपरभाव’ हा अशा रीतीने राष्ट्रवादाचा पाया असतो. इथेच मानवतेला छेद जातो. स्पर्धा जितकी उग्र तितकी मानवतेवर आधारलेल्या न्याय, नीती इत्यादि मूल्यांची अवहेलना अधिक. आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे नजर टाकली तर असे सहज लक्षात येते की परक्याच्या हेतूबद्दल प्रत्येक राष्ट्र साशंक असते. मैत्री-तह-शांतताकरार हे राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून केवळ सोयीसाठी केले जातात (आणि सोयीनुसार मोडले जातात); दिलेला शब्द पाळला जातोच असे नाही; कधीकधी इतरांचा बळी देऊन किंवा त्यांना नुकसान पोचवून राष्ट्रहित साधले जाते; तुम्ही शेजारचा देश गिळला नाही तर त्याच्या पलीकडे असलेला शत्रुदेशच त्याला गिळून तुमच्या दारावर धडका मारू लागेल या भीतीने शेजारच्या देशाचाच स्वाहाकार केला जातो, इत्यादी.

मुख्य मुद्दा असा की अशी वर्तणूक अनेकदा अपरिहार्य असते. एक मानवसमूह म्हणून जगू पाहण्याचा हा स्वाभाविक परिणाम असतो. जगद्राज्य स्थापन होईपर्यंत या स्थितीला पर्याय दिसत नाही. (आणि) ते तर अजून दृष्टिपथातही नाही.

राष्ट्रवाद आणि अंतर्गत नीतिमत्ता

राष्ट्रवादाला एक बाहेरची बाजू असते आणि तिचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय व्यवहारात येतो.तिची नोंद स.हं.नी वरील परिच्छेदात घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादाला असलेली आतली बाजू ते विशद करतात. ते म्हणतात की, आतली बाजू सांभाळताना अंतर्गत ऐक्य किंवा संघटन साधावे लागते. या ऐक्याला बंधुभाव अवश्य असतो. तसा तो निर्माण होण्यासाठी किमान सामाजिक न्यायाची प्रस्थापना करावी लागते. राष्ट्रवादाच्या विकासाच्या प्रारंभिक इतिहासात हे झाले नव्हते आणि तरीही प्रखर राष्ट्रवाद प्रत्ययाला येत होता हे खरे आहे. मात्र लोकशाही स्वरूपाची जागृती जगभर होत असताना आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्कांची जाणीव वाढत्या प्रमाणावर होत असताना येथून पुढच्या काळात राष्ट्रउभारणी करू इच्छिणाऱ्या नेत्यांना आपल्या राष्ट्रवादी विचारांत सामाजिक न्यायाचा आशय प्रविष्ट करून देण्याशिवाय गत्यंतर नाही.

शिवाय एकूणच अंतर्गत वातावरण बंधुभावाचे असणे याचा अर्थ परस्परविश्वास, दिलेला शब्द खरा करण्याची तयारी, अहिंसा, वाद सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब – या व अशा गोष्टींना मूल्ये म्हणून मान्यता देणे असा आहे.

सारांश, जगातल्या इतर समाजांपेक्षा आपण वेगळे आहोत (अस्मिता) आणि अंतर्गतदृष्ट्या सर्वसाधारणपणे एक आहोत (ऐक्य) अशी भावना म्हणजे राष्ट्रवाद. अशी भावना असली की राष्ट्रीय हित हे राजकारणाचे प्रमुख सूत्र ठरते.

राष्ट्रवादापुढे मानवतेला मुरड!

‘परंपरा, आधुनिकता व राष्ट्रवाद’ या आपल्या लेखात राष्ट्रवादाच्या संदर्भात विवेकवाद (रॅशनॅलिझम) आणि मानवतावादी नीती (ह्यूमॅनिस्टिक एथिक्स) यांबद्दल निर्माण होणाऱ्या प्रश्नांची चर्चा स.हं.नी केली आहे. ते म्हणतात, “मी असे मांडले आहे की राष्ट्रवादाला काही स्फूर्तिस्थाने अवश्य असतात, त्यासाठी मिथकांचा वापर करावा लागतो, परिणामी पूर्ण विवेकवादी म्हणजे सत्यावर आधारित भूमिका घेता येत नाही; त्याचप्रमाणे ‘राष्ट्रहित’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले म्हणजे मानवतेवर आधारलेल्या सत्य, न्याय, बंधुभाव इत्यादी तत्त्वांना मुरड घालावी लागते.”

ते पुढे लिहितात की, सर्वच राष्ट्रांचा व्यवहार या पद्धतीने चालतो. आपलेही नेते जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात ही पद्धत अवलंबतात तेव्हा आपणही मनातून त्यांचे कौतुक करतो. मात्र हे वास्तव स्पष्टपणे बोलून दाखविण्याची आपल्या मनाची तयारी नसते. उलट, सत्य, न्याय, मानवता, जगच्छांती इत्यादी तत्त्वांचा घोष होत राहून देशहित दृष्टीआड राहते.म्हणून या अरुचकर पण हितकारी तत्त्वाकडे लक्ष वेधणे जरूर वाटले.‌

राष्ट्रवाद आणि जगाचा नैतिक स्तर

.ह. हे दाखवून देतात की, राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय नैतिक अराजकाची एक काळी बाजू असली तरी राष्ट्रवादाच्या विकासाचा जगावरचा एकूण नैतिक परिणाम विधायक स्वरूपाचा झाला असण्याची शक्यता आहे. येथे ‘राष्ट्र’ म्हणताना धर्म, वंश, भाषा इत्यादींवरच्या निष्ठा ओलांडून पुढे गेलेल्या व व्यापक आणि अधिक विवेकी (रॅशनल) निष्ठांचा अवलंब केलेली आधुनिक पाश्चात्य राष्ट्रे माझ्या डोळ्यासमोर आहेत, असे स.हं.चे प्रतिपादन आहे. या देशांमध्ये नागरिकांच्या निष्ठा भौगोलिकदृष्ट्या अधिक विस्तृत प्रदेशावर व अधिकाधिक मोठ्या लोकसंख्येवर केंद्रित होत गेल्या. स्थानिक संकुचित निष्ठांचा लोप झाला. हा एक प्रकारचा नैतिक विकासच होय. कारण या प्रक्रियेतून बंधुभावाची व्याप्ती वाढली, अशी स.हं.ची मीमांसा आहे.

ते पुढे म्हणतात की, आंतरराष्ट्रीय संघर्ष चालूच आहेत. युद्धे होतच आहेत. त्यांची संहारकता वाढलेली आहे. हे सर्व खरे आहे. पण त्याचबरोबर जगातल्या फार मोठ्या भूखंडावर अंतर्गत शांतता व सामरस्य यांचा अंमल चालू आहे. आधुनिक राष्ट्रवादाचा उदय होण्यापूर्वीच्या मध्ययुगातली स्थिती आणि आजची स्थिती यांची तुलना करता राष्ट्रवादाच्या विकासामुळे जगाचा एकूण नैतिक स्तर उंचावला आहे असे मान्य करावे लागते.

आक्षेपांचे निराकरण 

श्री. वसंत पळशीकर यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देताना स.ह. लिहितात, “मी (रा.स्व.) संघाची कड घेतो, तळी उचलतो, त्याला चुचकारतो, पुष्टी देतो म्हणजे काय करतो? व का? या बाबतीतली माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो. मुळात संघ हा राष्ट्रवादी आहे अशी माझी धारणा आहे आणि राष्ट्रवाद मला गरजेचा एवढेच नव्हे तर निकडीचा वाटतो. देशाचे अखंडत्व राखणे, त्याला समर्थ करणे, त्याचा सन्मान वाढेल असे करणे या, समाज म्हणून आपल्याला टिकायचे असेल तर, आजच्या प्राथमिक गरजा आहेत.”

.ह. ठामपणे प्रतिपादन करतात की, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरणे, पक्षनिहाय, संस्थानिहाय वेगळी असू शकतात. पण राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्र म्हणून हा देश उभा राहणे हे उद्दिष्ट सर्वांचेच असले पाहिजे.

यानंतर श्री‌. अशोक कोतवाल यांनी घेतलेले आक्षेप क्रमाने देऊन त्यांना स.हं.नी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी राष्ट्रवादाशी संबंधित काही प्रश्नोत्तरी खालीलप्रमाणे – 

. ‘मतांसाठी सरकार मुस्लिम धर्मपंडितांना खूष करायला बघते व असे होऊ नये हे कबूल.पण त्याचे दुष्परिणाम बहुतेक शहाबानोसारख्या सामान्य मुस्लिम नागरिकांस भोगावे लागतात; हिंदूंना नव्हे.’ 

उत्तर : (मुस्लिम) धर्मपंडितांना ‘खूष’ करणे एवढी ही साधी गोष्ट नाही. समान नागरी कायदा नसावा एवढेच नव्हे तर समान असलेला फौजदारी कायदाही बदलावा यामागचा (मुस्लिम धर्मपंडितांचा) आग्रह हे धर्मनिरपेक्षतेला आह्वान आहे. आणि राष्ट्रीय प्रवाहात हट्टाने सामील न होण्याचा त्यात प्रयत्न असल्याने ते आह्वान राष्ट्रवादालाही आहे. या दोन्ही प्रवृत्तींना आजपर्यंतची³ सरकारे उत्तेजन देत आली आहेत.

(3. प्रस्तुत विधान हे ‘फेब्रुवारी १९९४’ मधील ‘अशोक कोतवाल यांचे आक्षेप’ या लेखातील असून हा लेख साप्ताहिक ‘विवेक’मध्ये प्रसिद्ध झाला होता.)

. ‘हिंदुसंघटनाचा प्रयत्न म्हणजे दारिद्र्यनिर्मूलनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून चित्त विचलित करणे होय.’

उत्तर : राष्ट्रवादी प्रवृत्तीचा फैलाव झाला तरच देश अभंग, अंतर्बाह्य सुरक्षित आणि शांततेच्या स्थितीत राहू शकेल. आर्थिक विकासाची ही पूर्वअट आहे हे कोतवाल कसे विसरतात?

. ‘अमेरिकेची जी प्रचंड भरभराट झाली ती राष्ट्रवादामुळे झाली नाही; तर व्यक्तिस्वातंत्र्याला व विचारस्वातंत्र्याला प्राधान्य दिल्यामुळे झाली.’

उत्तर : कोतवालांचे हे विधान सर्वसामान्य पातळीवर अ-समाजशास्त्रीय आणि अमेरिकेच्या संदर्भात अनैतिहासिक आहे. कुठलीही सामाजिक घटना हा अनेक कारणांचा परिणाम असतो. निरनिराळ्या देशांच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी प्रेरणांना महत्त्वाचे स्थान आहे हे आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकाला सहज समजून येण्यासारखे आहे. अमेरिकाही याला अपवाद नाही.

अमेरिकन विकासातले व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान मी नाकारीत नाही. पण या व्यक्तिस्वातंत्र्याला आणखीही एक अर्थ आहे हे मला ध्यानात आणून द्यावेसे वाटते. व्यक्तिस्वातंत्र्य हे जसे अमेरिकन समाजरचनेचे एक तत्त्व आहे तसेच ते तिच्या राष्ट्रवादाचेही प्रतीक आहे. अमेरिकेची राष्ट्रवादी प्रक्रिया इतर देशांच्याहून वेगळी आहे. अमेरिकेला ‘भूतकाळ’ नाही; तिचा जन्म व्यक्तिस्वातंत्र्य, विज्ञान आणि विवेकवाद यांच्या युगात (एज ऑफ रीझन) झाला. म्हणून ही नवी मूल्ये अमेरिकेच्या राष्ट्रवादाची प्रतीके आणि राष्ट्रीय अभिमानाची केंद्रे ठरली. भूतकाळ नसल्यामुळे भविष्याविषयीच्या आकांक्षा हा राष्ट्रीय ऐक्याचा महत्त्वाचा घटक ठरला आणि या आकांक्षांमध्ये जगात व्यक्तिस्वातंत्र्याचा संदेश पोचविणे (मेकिंग द वर्ल्ड सेफ फॉर डेमॉक्रसी) ही एक आकांक्षा समाविष्ट झाली. जगातले इतर देश आपल्या प्रेरणास्रोतांसाठी आपल्या मध्ययुगाकडे आणि प्राचीन काळाकडे वळले; पण हा त्यांचा भूतकाळ स्वातंत्र्याच्या ऊर्मी नष्ट करणाऱ्या ‘सरंजामशाही’ वगैरे व्यवस्थांचा असल्यामुळे तो अंधारयुगाचा वारसा आपल्याला नाही यातच अमेरिकनांनी स्वतःचे सुदैव मानले आणि वर्तमान युगातले व्यक्तिस्वातंत्र्य हा राष्ट्रीय अभिमानाचा विषय बनविला. तेव्हा अमेरिकेतील व्यक्तिस्वातंत्र्याला जसा एक सामाजिक अर्थ आहे तसा राष्ट्रीय अर्थही आहे. अमेरिका व्यक्तिस्वातंत्र्यवादी आहे म्हणजेच राष्ट्रवादीही आहे.

. मी एका प्रतिज्ञापत्रकाच्या आधारे राष्ट्रीय कोण आणि अराष्ट्रीय कोण हे ठरवावे आणि अराष्ट्रीयांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करावे असे सुचविले आहे. त्यावर कोतवालांनी बरीच झोड उठविली आहे.

उत्तर : माझा प्रयत्न काय आहे हे कोतवाल लक्षात घेतील तर त्यांना असे दिसेल की धर्मनिरपेक्ष आणि सर्वमान्य आधुनिक मूल्यांशी सुसंगत, मात्र परंपरेचे अधिष्ठान असणारा असा राष्ट्रवाद मी मांडू इच्छित आहे. एका बाजूने भावनिक ऐक्याचे त्यातल्या त्यात उत्तम असे तत्त्व मी सुचवू पाहतो आणि सर्व समूहांना (माझ्या मते) आदर्श वाटावी अशी व्यवस्था मांडू पाहतो; दुसऱ्या बाजूने सामाजिक समझोत्याच्या आदर्श अटी पाळण्याचीही ज्यांची इच्छा नाही, म्हणजेच, ज्यांना फुटीरपणाच हवा आहे, त्यांना शिक्षा हवी असे म्हणतो. ही शिक्षासुद्धा कत्तल, धर्मांतर किंवा हकालपट्टी अशा स्वरूपाची नाही. ज्यांना समान कायदे नको आहेत त्यांना कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत भागीदारी देता कामा नये अशी माझी सरळ आणि साधी मागणी आहे. (दलवाईंचीही तशीच होती.)

संस्कृतिनिष्ठ राष्ट्रवाद साक्षेपाने उभा केला पाहिजे!

‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाविषयी’ या लेखात स.हं.नी मंडळाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. हुसेन जमादार यांनी मांडलेले अतिशय महत्त्वाचे विचार वाचकांपुढे ठेवलेले आहेत. ते विचार असे – “मुसलमानांनी मुसलमान राहूनही आपले मूळ शोधावे व या देशातील सन्माननीय परंपरांना आपल्या संस्कृतीचा भाग बनवावे.” तुर्कस्तान, ईजिप्त, इराक, इराण व इंडोनेशिया या मुस्लिम देशांतील मुसलमान आपापल्या देशांतील इस्लामपूर्व, म्हणजेच बिगर-इस्लामी, परंपरेचा गौरव कसा करतात याची उदाहरणे त्यांनी पुढे दिली आहेत.

यावर स.ह. लिहितात की, ही सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना आहे. बीजरूपात ती मांडून जमादार यांनी एक पुढचे पाऊल टाकले आहे. या पावलाचा अर्थ समजावून घेणे जरूर आहे. तो असा की नुसते धर्मनिरपेक्ष शासन कितीही आवश्यक असले, तरी राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या विकासाला ते पुरेसे नाही; भावनात्मक ऐक्य निर्माण होण्यासाठी समान सांस्कृतिक बंध निर्माण झाले पाहिजेत याची जाणीव जमादार यांच्या मांडणीत दिसून येत आहे.

दुसऱ्या बाजूने पाहिले तर हिंदुत्ववादीही, विशेषतः संघपरिवार, सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिकाच मांडीत आहेत. तेव्हा या दोन चळवळी एकाच वैचारिक भूमिकेवर एकत्र येऊन राष्ट्रीय ऐक्याची प्रक्रिया वेगवान करू शकतील आणि हिंदू-मुसलमान बंधुभावाला एक नवा आधार देऊ शकतील, अशी आशा मनात उत्पन्न होते.

संस्कृती याचा अर्थ जुन्या घातक रूढींचे पुनरुज्जीवन असा होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. एकूण समता, व्यक्तिस्वातंत्र्य, इहवाद इत्यादी आधुनिक मूल्यांशी सुसंगत असा संस्कृतिनिष्ठ राष्ट्रवाद साक्षेपाने उभा केला पाहिजे, अशी सूचनाही स.ह. नेमकेपणाने देतात. ते म्हणतात की, आधुनिक मूल्यांशी सुसंगत असा संस्कृतिनिष्ठ राष्ट्रवाद कसा उभा केला पाहिजे या प्रश्नाचा संघपरिवारातल्या मुसलमानांनीही विचार करावा. ते राष्ट्रवादी आहेत आणि ज्या अर्थी ते संघपरिवारात आहेत, त्या अर्थी ते सांस्कृतिक राष्ट्रवादही मानतात असे समजले पाहिजे. मात्र धर्मसुधारणेच्या प्रश्नाबाबत त्यांनी फारशी उपक्रमशीलता दाखविली आहे, असे दिसत नाही! त्यांनाही आपली भूमिका निश्चित करावी लागेल. मात्र त्यांचा हातभारच नव्हे तर पुढाकारही या विचारपरिवर्तनाला लागला तर एक आशादायक बदल घडून येऊ शकेल.

याचबरोबर पुरोगामी विचारवंतांनीही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेची चर्चा करून, तिचा तपशील ठरवून या प्रवाहाला गती द्यावी अशी विनंती स.हं.नी त्यांना केलेली आहे. पुरोगामी विचारवंतांनी एकच लक्षात ठेवायचे की संस्कृतिनिष्ठ राष्ट्रवाद अनेक तऱ्हांनी मांडता येतो आणि मांडला जातही आहे; मात्र त्यातली एक तऱ्हा पूर्णपणे आधुनिक मूल्यांशी सुसंगत असू शकते, याकडे सहंनी त्यांचे लक्ष वेधले आहे.

इस्लामी बंधुभाव – राष्ट्रीय जीवनातील अडसर

भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या दृष्टीने इस्लाममधले सर्वात अडचणीचे तत्त्व म्हणजे ‘इस्लामी बंधुभावा’चे तत्त्व. जगातला कुठलाही मुसलमान केवळ मुसलमान म्हणून आपल्या देशबांधवापेक्षा जवळचा हा या तत्त्वाचा अर्थ आहे. यातून राष्ट्रवाद आपोआपच वगळला जातो. खरे म्हणजे जगात अनेक इस्लामी राष्ट्रे आहेत आणि त्यांच्या-त्यांच्या स्वतंत्र अस्मिता आहेत. पण भारतात तरी अशी स्थिती आहे की येथल्या मुसलमानांना जगातले इतर मुसलमान आणि त्यांचे कल्याण या गोष्टी भारताचे भवितव्य आणि भारतीय अस्मिता यापेक्षा अधिक महत्त्वाचे वाटतात; एवढेच नव्हे तर ते तसे वाटले पाहिजेत असे त्यांचे पुढारी त्यांना सांगत असतात. तेव्हा या बाबतीत धर्माची शिकवण बाजूला ठेवली पाहिजे या मुद्द्यावर (मुस्लिम सत्यशोधक) मंडळाने अधिक जोर देणे आवश्यक आहे. धर्मटीकेला येथून प्रारंभ झाला पाहिजे. देशनिष्ठा ही पहिली निष्ठा असा उ‌द्घोष केला पाहिजे आणि तिच्या आड जी धर्मतत्त्वे येतील ती निग्रहाने बाजूला सारण्याचे आवाहन मुसलमान समाजाला केले पाहिजे.

हे परिवर्तन घडून येण्यासाठी अनुकूल भूमी कशी तयार करता येईल याचा विचार हिंदुत्ववाद्यांनीही केला पाहिजे. त्यांनाही आपल्या हिंदुराष्ट्रवादाची मांडणी धर्मनिरपेक्ष आणि समाजनिष्ठ पद्धतीने करावी लागेल. मुसलमानांना जर ‘धर्मापासून बाजूला व्हा’ असे सांगायचे तर सांगणाऱ्यानेही सामाजिक बाबतीत धर्माला बाजूला ठेवणे ओघानेच येते. ‘आमचा धर्म राष्ट्रवादाच्या आड येत नाही’ अशी भूमिका येथे घेऊन चालणार नाही; कारण वर म्हटल्याप्रमाणे मुळातला प्रश्न धर्माचे प्रामाण्य नाकारण्याचा, म्हणजेच बुद्धिवाद स्वीकारण्याचा आहे.

राष्ट्रवादाची मुळे सांस्कृतिक संचितात!

‘रा.स्व.संघ आणि वैचारिक आघाडी’ या लेखात स.ह‌. म्हणतात, “मी राष्ट्रवादाची गरज मानतो आणि सामान्यपणे कोणत्याही देशाच्या राष्ट्रवादाची मूळे त्या देशाच्या ऐतिहासिक परंपरेत, सांस्कृतिक संचितात असतात, अशी माझी धारणा आहे. या अर्थाने सांस्कृतिक राष्ट्रवाद हे एक तत्त्व म्हणून मला स्वीकार्य वाटते. शिवाय राष्ट्रवादाच्या संदर्भात देशापुढे आज जे प्रश्न आहेत, उदा. काश्मीर प्रश्न, समान नागरी कायदा, अल्पसंख्य आयोग, घुसखोरी इत्यादी यांच्याबद्दल आग्रही भूमिका घेणारा भारतीय जनता पक्ष हा एकमात्र पक्ष आहे.तो पुढे जावा, अशी माझी इच्छा आहे.”

राष्ट्रवादाची उपेक्षा

राष्ट्रवादाच्या उपेक्षेविषयी स.ह. खेदपूर्वक लिहितात की, माझ्या मते हिंदू राष्ट्र, हिंदी राष्ट्रवाद हा काहीसा गौण विषय आहे. या विधानाचे आपल्याला आश्चर्य वाटेल, म्हणून खुलासा करतो. भारतातल्या विचारवंतांच्या, विशेषतः ज्यांना पुरोगामी असे म्हटले जाते, त्यांच्या जगात राष्ट्रवाद हा विषयच उपेक्षित राहिला आहे. त्याची कारणे अनेक आहेत. मार्क्सवाद राष्ट्रवादविरोधी आहे. आणि आपल्याकडच्या विचारवंतांवर मार्क्सवादाचा पगडा अजून भरपूर आहे. राष्ट्रवाद म्हणजे आक्रमणशीलता, वसाहतवाद, युद्धखोरी, फॅसिझम अशीही समीकरणे रूढ आहेत. जी नवी आर्थिक घडी जगात बसू लागलेली आहे, तीत राष्ट्रवादाला अर्थ उरलेला नाही, असेही एक मत आहे. पोस्ट मॉडर्निझमची एक शाखा प्रादेशिक, स्थानिक, वांशिक संस्कृतींना उत्तेजन देऊन फुटकळपणाकडे वाटचाल करीत आहे. राष्ट्रवाद म्हणजे जुन्या रूढीचे पुनरुज्जीवन, अर्थात प्रतिगामी दृष्टिकोण हे तर जुनेच अद्वैत मानले गेलेले आहे आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वकुटुंबवाद, सर्वभूतहितरती, अद्वैत वेदान्त, अहिंसा हा आपला, म्हणजे हिंदूंचा वारसा आपपरभावाच्या विरोधी आहे. आणि आपला कोण आणि परका कोण, याची नेमकी ओळख हा तर राष्ट्रवादाचा पाया आहे. यामुळे विश्वशांतीच्या स्वप्नाळू आदर्शांना हिंदू मन लवकर बळी पडते.

पुरोगामी विचारवंतांच्या विचारांची पुढील वैशिष्ट्ये आहेत :

. त्यांना राष्ट्रवादच मुळात अमान्य आहे. मार्क्सवाद्यांबद्दल तरी असे म्हणता येईल. त्यांतले जे लोकशाही समाजवादी आहेत ते राष्ट्रवादविरोधी आहेत असे म्हणता येत नाही पण या विषयाचा गंभीरपणे विचार करावा असे त्यांना वाटत नाही. तसा विचार करायचा तर परंपरेचा विचार अपरिहार्य ठरतो आणि मग सर्वांत जुनी आणि बहुसंख्येची परंपरा ही हिंदू आहे हे वास्तव लक्षात घ्यावे लागते. येथे या मंडळींचे गाडे अडते कारण त्यांना ‘हिंदू’ हा शब्दच तिरस्करणीय वाटतो.

. हिंदुत्व चळवळीचे त्यांचे विश्लेषण मार्क्सवादी प्रभावाखाली गेली कित्येक दशके एकाच प्रकारचे राहिलेले आहे. ते म्हणजे आपले नव्या युगात डळमळणारे स्थान सावरू इच्छिणाऱ्या आणि आपल्या जातींचे हितसंबंध जपू इच्छिणाऱ्या उच्चवर्णीयांची ती छावणी आहे व तिला राष्ट्रवादाचा मुलामा देण्यासाठी त्यांनी मुस्लिम प्रश्नाचा बागुलबुवा उभा केला आहे.

हे सगळे लक्षात घेऊन स.ह‌. म्हणतात की, अशा स्थितीत वैचारिक जगतात राष्ट्रवादाच्या गरजेची पुनःप्रस्थापना करणे हे प्रारंभिक कार्य आहे असे मला वाटते. एकदा ही गरज मान्य झाली म्हणजे राष्ट्रवादाचे परंपरेशी नाते असावे लागते, ही गोष्ट लक्षात येण्यास वेळ लागत नाही. म्हणजेच सांस्कृतिक राष्ट्रवादाशी मनाने जवळीक होते. पुढे जे प्रश्न उरतात, ते तपशिलाचे असतात.

अशाप्रकारे, प्रा‌.स.ह. देशपांडे यांनी अत्यंत तळमळीने राष्ट्रवाद या विषयावर अतिशय सकस अशी वैचारिक मांडणी केलेली आहे.

अकोला,
ध्वनिसंपर्क
: ९२२६५६९६८३

अभिप्राय 4

  • भारताची फाळणी (१९४७), इज्राएलची स्थापना (१९४८), सोवियत युनियनचे विघटन (१९९१), युगोस्लावियाचे विघटन (१९९२), युरोपियन युनियनची स्थापना (१९९३).. गेल्या शतकातील आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातील या अनेक घटनांमुळे राष्ट्रवाद, त्याचा टिकाऊपणा, जागतिकीकरण, राष्ट्रवादाच्या वेगवेगळ्या छटा आणि त्याचे फायदे तोटे या सर्वांचा विचार स्वतंत्र भारतात व्हायला लागला (तो स्वातंत्र्य पूर्व काळातही काही प्रमाणात होत होता). या संदर्भात ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व’ (२००२) हे प्रा. स. ह. देशपांडे यांचे पुस्तक आणि त्याचा सारांश सांगू पाहणारे श्री भूषण देशपांडे यांचे हे दोन लेख महत्वाचे आहेत. राष्ट्रवाद, हिंदुत्व यांचे समर्थक आणि विरोधक या दोघांनी वाचण्याजोगे!

  • अतिशय समतोल विचार, ओघवती शैली,स्पष्ट, समर्पक आणि सहज समजेल अशा सोप्या शब्दात मांडणी त्या मुळे राष्ट्रवादासारखी विविध पैलू असलेली आणि म्हणून समजायला जरा कठीण संकल्पना सुंदर समजावून सांगितली आहे स.ह.नी! त्यांचे द्रष्टेपण सुध्दा जाणवते जागोजागी उदा.राष्ट्रवादाचा विचार करताना modern democracy आणि सद्य स्थितीत सामाजिक न्यायचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता आणि धर्म निरपेक्ष सरकारचे dynamics! एकूणच पुस्तकाचा विषय, आशय आजही अतिशय relevant आहे. पुस्तक मुळातून वाचावेसे वाटते. हे पुस्तकाचे आणि या लेखाचेही यश आहे.

  • आपल्याला हिंदू राष्ट्र पाहिजे का धर्मनिरपेक्ष असे भारतीय राष्ट्र पाहिजे याचा खुलासा सर्वांनी केला पाहिजे. हिंदू राष्ट्र या कल्पनेतच अन्य धर्मियांना गौण नागरिकत्व मिळणार हे अनुसूचित आहे.

  • हिंदू राष्ट्र की धर्मनिरपेक्ष राष्ट्र? भारतीय घटनेनुसार याच उत्तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र असच आहे. स.ह. देशपांडे यांचे हेच उत्तर होते.(येथे धर्म हा शब्द faith based religion किंवा theology या अर्थाने घेतला आहे; धर्म या शब्दाचा व्यापक संस्कृत अर्थ अभिप्रेत नाही).

    राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष (पंथनिरपेक्ष) असू शकते पण संस्कृती-निरपेक्ष असू शकत नाही; लोकशाहीत बहुसंख्यांक संस्कृती ही राष्ट्र या संकल्पनेचा आधार आहे. हे गृहीतक ज्यांना मान्य आहे ते राष्ट्रवादी. एकदा राष्ट्रवाद स्वीकारला तर प्रजासत्ताक भारतात तो हिंदू राष्ट्रवाद असणार हे उघड आहे. येथे हिंदू ही एक “अतिरिक्त” छत्री-संज्ञा (umbrella term) आहे; तिचा कोणत्याही धर्माशी/पंथाशी अनन्य संबंध नाही असे राष्ट्रवादी मानतात.

    सध्या भारताच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादाचे विरोधक असा खरा संघर्ष आहे. राष्ट्रवादाचे विरोधक अनेक देशी/विदेशी विचारवंत होते आणि आहेत (उदा.: आईन्स्टाईन, रवींद्रनाथ टागोर आणि अनेक अर्वाचीन ज्ञानपीठ विजेते साहित्यिक). या बरोबरच कित्येक उपसांस्कृतिक उपराष्ट्रवादी राजकारणी एकात्म भारतीय राष्ट्रवादाला विरोध करतात. मात्र स.ह. देशपांडे एकात्म भारतीय राष्ट्रवादी होते असं म्हणायला हरकत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.