प्रा.स.ह.देशपांडे यांचे राष्ट्रवादविषयक विचार (पूर्वार्ध)

प्रा. स. ह. देशपांडे जन्मशताब्दी विशेष

दिनांक १७ डिसेंबर २०२३ पासून थोर राष्ट्रवादी विचारवंत प्रा. डॉ. स.ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. राष्ट्रवाद हा सहंच्या अभ्यासाचा आणि जीवनभरच्या चिंतनाचा विषय होता. मुळात ‘अर्थशास्त्र’ या विषयाचे प्राध्यापक असलेले स. ह. उत्तरायुष्यात ‘भारतीय राष्ट्रवादा’च्या तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आकंठ बुडाले. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे आपले तत्त्वज्ञान मांडताना, मुस्लिम समाजाची कडवी धर्मनिष्ठा राष्ट्रवादाच्या आड येते आणि याची बीजे त्यांच्या धर्मात आहेत, असे ते निःसंदिग्धपणे म्हणत असत. पण म्हणून हिंदूंनी कडवे धर्मनिष्ठ होणे, हा त्या समस्येवरचा उपाय नाही; हेही ते तितकेच ठासून सांगत. रूढ असलेल्या डाव्या-उजव्या कोणत्याच विचारसरणीच्या चौकटीत त्यांची ही मांडणी बसत नव्हती. त्यामुळे कोणत्याच बाजूकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला नाही. तरीही खुर्चीचा मानसन्मान, निरनिराळी पदे यांपैकी कशाच्याही मोहात न गुंतता ते आपली धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भूमिका ठामपणे, अखंडपणे जनमानसात रूजविण्याच्या प्रयत्नात राहिले. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या ‘सावरकर ते भाजप : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख’ या ग्रंथाच्या आधारे त्यांचे राष्ट्रवादविषयक विचार आता आपण समजावून घेऊ.

हिंदू’ची व्याख्या

‘हिंदू’ची व्याख्या करताना स.ह. लिहितात की, राष्ट्रीय प्रवृत्तीचा कोणीही भारतीय – मग तो मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी कुणीही असो – म्हणजेच ‘हिंदू’ अशी मला मान्य असलेली हिंदूची व्याख्या आहे. म्हणून मी जेव्हा ‘हिंदुसंघटन’ म्हणतो तेव्हा राष्ट्रीय प्रवृत्तीच्या भारतीयांचे संघटन असा अर्थ माझ्या मनात असतो. मुस्लिम प्रश्न कितीही उग्र असला तरी तो सोडविण्यासाठी मुसलमानांशी भावनिक एकात्मता साधणे एवढा एकच पर्याय उपलब्ध आहे असे माझे मत आहे.

संघटना’चा अर्थ

ते पुढे लिहितात, “आणखीही एक खुलासा या संदर्भात करणे अवश्य वाटते. ‘संघटन’ म्हटल्याबरोबर शिस्तबद्ध व कदाचित शस्त्रसज्ज युवकांचे सैन्य संचलन करीत असल्याची चित्रे डोळ्यांसमोर तरळू लागतात. तसे होण्याचे कारण नाही. संघटन म्हणजे एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी लोकमताचे संघटन (मोबिलायझेशन). राष्ट्रवादी विचारांनी व भावनांनी जेवढा लोकसमूह भारला जाईल तेवढा मला हवा आहे. शक्य तर शंभर टक्केसुद्धा. एवढी लोकसंख्या लष्करी स्वरुपाच्या संचलनात किंवा काही दैनिक स्वरुपाच्या कार्यक्रमासाठी एका ठिकाणी एकत्र येऊ शकेल अशी शक्यता नसते; मात्र ती एका विचाराने भारून जाणे शक्य असते. एवढाच ‘संघटना’चा अर्थ केला पाहिजे व तेवढाच मी माझ्या मनात वागविला आहे.”

मुस्लिम प्रश्नावर पांघरूण नको!

मुस्लिम प्रश्नाविषयी विवेचन करताना स.ह. म्हणतात की, मुसलमान समाजाला राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे असे माझे मत आहे. माझ्या राष्ट्रवादी विचारांची चौकटही धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची आहे. मात्र असे असले तरी मुस्लिम प्रश्न मुद्दाम सौम्य करून मांडावा, त्याला मोहक मुलामा द्यावा असे मला वाटत नाही. या देशात अनेक विचारवंत असे आहेत की ज्यांना माझ्याप्रमाणेच या प्रश्नाची सोडवणूक व्हावी असे वाटते,मात्र असे करताना मुसलमान दुखावणार नाहीत, याची अतिरिक्त काळजी घेताना ते दिसतात. हा प्रकार योग्य नाही. …माझे मत असे आहे की मुस्लिम प्रश्न मुळात उग्र स्वरुपाचा आहे एवढेच नव्हे तर त्याची उग्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मला जे सत्य वाटते, ते सांगण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यावर पांघरूण न घालता विवेचन केले तरच या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल असा माझा विश्वास आहे.

चांगले जगण्या’अगोदर ‘जगण्या’ला प्राधान्य

पुरोगामी, डावे विचारवंत यांच्या विचारसृष्टीतील त्रुटी स.ह. दाखवून देतात. त्यांनी लिहिले आहे की, ज्यांना ‘पुरोगामी’, ‘डावे’, ‘साम्यवादी’, ‘समाजवादी’ वगैरे म्हटले जाते त्या विचारवंतांच्या विचारसृष्टीत प्रामुख्याने येणारे विषय म्हणजे वर्गकलह, शोषण, सामाजिक न्याय, आर्थिक समता, सामाजिक समता, दारिद्र्य, नवा किंवा जुना वसाहतवाद, जातिवाद इत्यादी. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत यात शंका नाही. पण मुळात देश म्हणून, समाज म्हणून जगणे हाही प्रश्न महत्त्वाचा आहेच. किंबहुना तो प्रश्न इतर सर्वांना पायाभूत असा प्रश्न आहे. असे म्हणता येईल की राष्ट्रवादाचा प्रश्न ‘जगण्याचा’ असेल तर वर उल्लेखिलेले विचारवंत ज्या प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करतात ते प्रश्न ‘चांगले जगण्याविषयीचे’ आहेत. आणि चांगले जगण्याअगोदर जगण्याला प्राधान्य दिले पाहिजे हे स्पष्ट आहे. अगोदर “जगणे” आणि मग “चांगले जगणे”, यावर आगरकरांनीही जोर दिला आहे. …अर्थात् राष्ट्रभावना सिद्ध होईपर्यंत सुस्थित आणि सुसंस्कृत जीवनाचा विचार करू नये असे नाही. किंबहुना चांगले जगण्यातल्या काही घटकांचा अंतर्भाव केल्याशिवाय समाज म्हणून नुसते जगणे हेही शक्य नाही. राष्ट्रवाद्यांच्या हे अनेकदा लक्षात येत नाही आणि ते सामाजिक न्यायाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. हेही टोक टाळले पाहिजे. …मात्र एवढे खरे की एकूण या देशात राष्ट्रवादी विचार गौण स्तरावर राहिलेला आहे.

देशनिष्ठा म्हणजे देशातल्या माणसांवर निष्ठा

भारतीय राष्ट्रवादाचा अर्थ अधिक खोलात जाऊन स्पष्ट करताना स.ह. लिहितात, “तात्त्विक विचारात न शिरता केवळ भारताच्या संदर्भात विचार करायचा तर आपण असे म्हणू या की आज (१९९७ साली) जो भारत देश विशिष्ट सीमांनी अंकित झालेला आहे त्यावर सर्व भारतीयांची सर्वोच्च निष्ठा असेल अशी स्थिती निर्माण होणे म्हणजेच राष्ट्रीय भावना निर्माण होणे. अर्थात् देशावर निष्ठा याचा अर्थ देशातल्या माणसांवर निष्ठा – भूमीच्या एका विशिष्ट खंडावर नव्हे. भूमीवरचे प्रेम हे राष्ट्रीय भावनेला पोषक ठरते हे खरे पण भूमिप्रेम म्हणजे राष्ट्रवादाचे सर्वस्व नाही. देशावर प्रेम करणे किंवा देशावर निष्ठा ठेवणे म्हणजे देशबांधवांवर प्रेम करणे किंवा निष्ठा ठेवणे; देशद्रोह म्हणजे ‘स्वजनां’चा, ‘देशबांधवां’चा द्रोह.

यात ‘स्वजन’ किंवा ‘देशबांधव’ ही कल्पना मूलभूत आहे. काही लोक ‘आपले’ आहेत,काही लोक ‘आपले’ नाहीत, किंवा ‘परके’ आहेत ही राष्ट्रवादाची मूळ धारणा आहे. ‘आपले’ जे लोक आहेत ते सर्वांत ‘जवळचे’, त्या मानाने इतर जनसमूह अधिक ‘दूरचे’ अशी ही विचारसरणी आहे. ‘जवळिकी’तूनच निष्ठा निर्माण होते. अशी एकत्वाची भावना वृद्धिंगत करणे म्हणजेच राष्ट्रीय भावना जागृत करणे. ‘राष्ट्रीय ऐक्य’ (नॅशनल इंटेग्रेशन) या शब्दसमूहाने हाच भाव निर्देशित केला जातो.”

स.ह. लिहितात की, राष्ट्रवाद म्हणजे ‘टोळीभावने’चा (ट्रायबल इंस्टिंक्ट) आधुनिक आविष्कार असे कधीकधी तुच्छतेने म्हटले जाते. आपण त्यातील तुच्छतेचा भाव काढून टाकून त्याचा मूळ अर्थ तपासला तर असे लक्षात येईल की टोळीभावनेची वेगळ्या स्वरुपात का होईना, आपल्याला आजही गरज आहे. आदिम माणसाभोवतालचे जग जसे स्पर्धाशील होते तसेच आजचेही जग आहे. …या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अंतर्गत ऐक्याची भावना प्रबळ करणे, आपल्या समाजाची संरक्षणक्षमता वाढविणे, त्याची समृद्धी वाढविणे – ही राष्ट्रवादाची उद्दिष्टे असतात.

मार्क्सवाद्यांच्या मीमांसेचे खंडन

मार्क्सवाद्यांच्या राष्ट्रवादविरोधी मीमांसेचे खंडन स.हं.नी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने केलेले आहे. ते लिहितात, “मार्क्सवाद्यांचा राष्ट्रविरोध प्रसिद्धच आहे आणि भारतातला राष्ट्रवादी विचार क्षीण आणि अविकसित राहण्याचे एक मोठे कारण साम्यवादी विचारवंतांचा प्रभाव हे आहे. प्रत्यक्षात साम्यवादी देशही राष्ट्रवादी झाले, आपल्या ‘आंतरराष्ट्रीयत्वा’चा त्यांनी बुरखा म्हणून उपयोग केला आणि इतर देशांमध्ये आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला हा सगळा ताजा इतिहास आहे. आर्थिक किंवा वर्गीय जाणिवांच्या तुलनेत राष्ट्रीय जाणिवाच अधिक प्रभावी आहेत हेच या इतिहासाने सिद्ध केलेले आहे. राष्ट्रवादाचा उगम आणि स्वरूप यांविषयीचे मार्क्सवादी विवेचन पूर्णपणे एकांगी आहे. मध्यमवर्ग (भांडवलदार) बाकीच्या समाजावर आपले वर्चस्व लादण्यासाठी राष्ट्रवादाचा पुरस्कार करतो, बाहेरच्या शत्रूंचे बुजगावणे उभे करतो आणि अंतर्गत शोषण बिनतक्रार चालू राहील अशी सोय करतो – अशी ही मीमांसा आहे. तीवर उत्तर असे की राष्ट्रवादाच्या आवरणाखाली काही वर्ग आपला स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करतील हे शक्य आहे. पण ते राष्ट्रवादाचे मूळ स्वरूप नाही. वर सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादाचे मूळ स्पर्धेतून निर्माण झालेल्या असुरक्षिततेत आहे. वर्गविहीन समाज कोठेही अस्तित्वात नाही; पण तसा तो आला तरी त्यालाही राष्ट्रवादाची गरज भासेल हे स्पष्ट आहे.”

राष्ट्रवादाचा पुरस्कार म्हणजे देशातल्या उपसंस्कृतींचा विनाश नव्हे!

राष्ट्रवाद एका सार्वदेशीय संस्कृतीच्या आधाराने उभा करणे याचा अर्थ देशातल्या उपसंस्कृतींचा विनाश घडवून आणणे असा नाही, हे स.ह. दाखवून देतात. “भारताची अस्मिता प्रकट होत असताना महाराष्ट्राची किंवा गुजराथची अस्मिता नष्टप्राय करावी लागत नाही. सार्वदेशीय आणि प्रादेशिक किंवा वांशिक अस्मिता एकत्र नांदू शकतात. …सांस्कृतिक स्वायत्ततेच्या नावाखाली असुरक्षित, अस्थिर आणि कदाचित् अविकसित जीवन जगणे हा पर्याय शहाणपणाचा नाही.”

हिंदू मनोवृत्तीच राष्ट्रवादाला प्रतिकूल

राष्ट्रवादाला प्रतिकूल अशा विचारप्रणालीची चर्चा करताना शेवटी आणखी एका प्रेरणेची आवर्जून दखल घेतली पाहिजे, असे स.ह. म्हणतात. किंबहुना भारतीय राष्ट्रवादाचा विचार करताना तिला अग्रस्थान दिले पाहिजे, असेही ते स्पष्टपणे सांगतात. ते लिहितात, “वर दिलेल्या राष्ट्रवादविरोधी विचारसरणीचा स्वीकार, त्या कितीही पोकळ असल्या तरी आपल्या विचारवंतांकडून सहज केला जातो. याचे कारण मुळात हिंदू मनोवृत्तीतच प्रखर राष्ट्रवादाला प्रतिकूल असे काही रसायन आहे. हे म्हणणे अनेकांना आवडणार नाही.” राष्ट्रवादाच्या विचारात हिंदू संस्कृतीचाच अडसर? कितीही आश्चर्यकारक वाटली तरी ही गोष्ट खरीच आहे. तिचे स्पष्टीकरण केले पाहिजे.

आध्यात्मिक तत्त्वज्ञानातली आपली लोकप्रिय परंपरा ‘अद्वैता’ची आहे. तिचा तात्त्विक अर्थ काहीही असो, परंतु आपण हिंदू लोक ‘भेद’ करायला तयार नसतो; उलट आधी म्हटल्याप्रमाणे ‘आपला’ आणि ‘परका’ हा भेद राष्ट्रवादाच्या मुळाशी आहे. सर्व मानवजात, सर्व प्राणिमात्र, एवढेच काय सर्व चराचरसृष्टी आपल्या सहानुभूतीच्या कक्षेत आली पाहिजे असा आपला पारंपरिक आग्रह आहे. सर्व विश्व म्हणजे एकच घरटे (एकनीडम्) आहे, विश्व हे एकच कुटुंब आहे (वसुधैव कुटुम्बकम्), सर्वभूतांच्या हितात आपली रति असली पाहिजे (सर्वभूतहितेरतः), आपला देव ‘विश्वात्मक’ असला पाहिजे (आता विश्वात्मके देवे), ‘आमुचा स्वदेश, भुवनत्रयामध्ये वास’ (तुकाराम) अशा विचारांचे हिंदू मनाला आकर्षण आहे. सावरकरांनी उपहासाने म्हटले आहे की दुसरा बाजीराव पेशवा अद्वैती असल्यामुळे इंग्रजांचे राज्य आणि आपले राज्य हा फरक त्याच्या लक्षात आला नाही! 

आपल्या आध्यात्मिक विचारात समता आहे पण प्रत्यक्ष समाजात जगात कुठेही सापडणार नाही अशी विषमता आहे. आपले अध्यात्म हा व्यवहारातल्या विषमतेचीच भरपाई करण्याचा प्रकार आहे की काय अशी शंका येते. ते काहीही असो, अद्वैताचा किंवा तत्सम विचारांचा आपल्यावर विलक्षण प्रभाव आहे यात शंका नाही. तो केवळ मंगल प्रसंगी ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ म्हणावे एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याची मुळे आपल्या मनात खोल गेलेली आहेत. आपल्या राजकीय विचारांवर व व्यवहारावर त्याचा घातक परिणाम झालेला आहे. अतिरिक्त अहिंसा आणि क्षमाशीलता ही त्याची प्रत्यंतरे आहेत आणि त्याची उदाहरणे इतिहासात अनेक वेळा दिसून आली आहेत. रवीन्द्रनाथ टागोरांनी भारताने राष्ट्रवाद स्वीकारता कामा नये असे सांगणारी व्याख्याने दिली होती! ‘जय जगत्’ हा आचार्य विनोबा भावे यांचा घोष होता. नेहरूंचे परराष्ट्रीय धोरण, त्यातले पंचशील, संरक्षण सिद्धतेविषयीची आपली उदासीनता, घुसखोरीकडे दुर्लक्ष इत्यादी अलीकडच्या काळातली अनेक उदाहरणे वरील मुद्द्यालाच पाठिंबा देणारी आहेत. एवढेच काय प्रखर राष्ट्रवादी म्हणून म्हटल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारप्रणालीवरही या प्रवृत्तीची छाया ‘सर्वधर्मसमभावा’च्या रूपाने पडली आहे याचा उल्लेख सहंच्या पुस्तकात आलेलाच आहे.

“राष्ट्रवाद ही जगण्याची कला आहे. एक समाज म्हणून आपण या जगात टिकून राहायचे आहे की नाही हे मुळात ठरवायला हवे. अखिल मानवतेचा विचार उदात्त आहे; त्याचे अवमूल्यन करण्याचा येथे हेतू नाही. मात्र तो विचार अंमलात आणण्यासाठी प्रथम आपण जिवंत व समर्थ असले पाहिजे एवढेच येथे म्हणायचे आहे.”

सर्व नीतिव्यवहाराचा निकष : राष्ट्रीय हित

राष्ट्रवाद आणि नीतिविचार यांविषयी स.ह. लिहितात, “राष्ट्रवादी विचार एरवीच्या समाजांतर्गत नीतिविचारापेक्षा वेगळा असू शकतो. सभोवतालचे उग्र आंतरराष्ट्रीय वास्तव लक्षात घेऊन राष्ट्रीय नेत्यांनी सर्वकाळ जागृत असावे लागते. अशा परिस्थितीत कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात हे लक्षात ठेवावे लागते. कुणाचे सुप्त हेतू काय असतील यावर नजर ठेवावी लागते. मनात सदैव संशय बाळगावा लागतो. पाठीत कुणी खंजीर खुपसतो की काय याबद्दल सावध असावे लागते. दुसरा हल्ला करण्याच्या तयारीत असेल तर आपणच अगोदर हल्ला चढवावा लागतो. म्हणजेच सर्व नीतिव्यवहाराचा निकष राष्ट्रीय हित हा बनतो.

खरे म्हणजे या विचाराचा वारसाही आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे.महाभारतात आणि कौटिलीय अर्थशास्त्रात तो सापडेल. पण हा रोखठोक व्यावहारिक विचार आपल्या देशात केव्हा तरी मागे पडला आणि ‘उदार’, ‘विशाल’, ‘समावेशक’, ‘जागतिक’, ‘वैश्विक’ अशा मोहक तत्त्वप्रणालींनी आपल्या मनाची पकड घेतली. त्या लुप्त झालेल्या वारश्याला पुन्हा उजळा देण्याची वेळ आली आहे.”

स.हं.नी ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व’ (आवृत्ती पहिली, १ जुलै २००२) या आपल्या ग्रंथात मांडलेले त्यांचे राष्ट्रवादविषयक विचार आता आपण समजून घेऊ.

राष्ट्रवादाचे मूलभूत प्रमेय

स.हं.नी आपली राष्ट्रवादविषयक भूमिका त्यांच्या ‘माझी भूमिका : धर्मनिरपेक्ष पण परंपरासापेक्ष राष्ट्रवाद’ या लेखामध्ये विस्तृतपणे मांडलेली आहे. ते लिहितात, “एक मूलभूत प्रमेय असे की आपणांला, म्हणजे भारतीयांना, एक अखंड, समर्थ आणि समृद्ध राष्ट्र म्हणून आपली घडण करणे नितांत गरजेचे आहे. याचे कारण जग स्पर्धाशील आहे आणि आपण दुबळे राहू तर आपले जीवन अनेक तऱ्हांनी धोक्यात येईल. राष्ट्रवाद आता कालबाह्य झाला आहे, जग हे एक खेडे झालेले आहे, राष्ट्रवाद मनुष्यजातीत भेद निर्माण करतो, तो युद्धखोर बनतो, तो एकाधिकारशाहीकडे झुकतो इत्यादी विधाने अपुऱ्या ज्ञानावर आधारलेली आहेत.

भाषिक तणाव, राज्याराज्यांतील संघर्ष, जातीय विद्वेष, धार्मिक कलह, आतंकवाद, पाकिस्तान, चीन, अमेरिका यांची भीतिदायक राजकारणे, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी इत्यादी अंतर्गत आणि बाह्य संकटांची नुसती आठवण केली तरी आपण घट्टपणे बांधून राहणे किती गरजेचे आहे हे लक्षात येईल.”

भारताच्या राष्ट्रवादाची वैचारिक मांडणी करण्यावर स.हं.चा भर होता. ते लिहितात, “हिंदुत्ववादातला ग्राह्यांश आत्मसात करून घेतलेला ‘हिंदी’ किंवा ‘भारतीय’ राष्ट्रवाद असे माझ्या प्रयत्नाचे स्वरूप आहे. पण केवळ कृत्रिमपणे समन्वय घडवून आणावा असा माझा हेतू नाही. परिस्थितीचा आणि विविध भूमिकांचा यथाशक्य अभ्यास करून मला जे निष्कर्ष काढावेसे वाटले ते मी मांडीत आहे.

सर्व भारतीयांना आपण एक आहोत, जगातल्या इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपण आपले ऐक्य टिकवून धरले तरच जागतिक स्पर्धेत टिकून राहू, राष्ट्रीय हित हेच आपले धोरण असले पाहिजे – असे वाटू लागले म्हणजे राष्ट्रीय भावना साकार झाली असे म्हणता येईल. हे होण्यासाठी सर्व भारतीयांना मनाने जोडणारी सूत्रे प्रस्थापित करणे म्हणजेच भारताच्या राष्ट्रवादाची वैचारिक मांडणी करणे होय.”

धर्मनिरपेक्ष परंतु परंपरासापेक्ष राष्ट्रवाद 

‘राष्ट्रवाद धर्मनिरपेक्ष असला तरी तो परंपरासापेक्ष असला पाहिजे’ असे स.हं.चे मत होते. आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना ते लिहितात, “धर्मनिरपेक्षता एक चौकट देते. ती आधारभूत चौकट आहे. या चौकटीतले कायदे, धोरणे, कार्यक्रम नागरिकांत भेदभाव करीत नाहीत. पण येथे थांबता येत नाही. राष्ट्रवादाला एका प्रबळ भावनिक घटकाची आवश्यकता असते. तिला आवश्यक अशी पूर्वअट धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था पुरी करते एवढेच. पण असा भावनिक घटक राज्यसंस्थेमधून निर्माण होत नाही.

हा भावनिक अंश म्हणजे सर्व नागरिकांची देशावर म्हणजे देशबांधवांवर निष्ठा असली पाहिजे. त्यांचे हित हे प्रत्येकाचे महत्त्वाचे मूल्य झाले पाहिजे. पण देशावरचे प्रेम किंवा निष्ठा ही भावना आपल्या देशात आपणांला गृहीत धरून चालता येण्यासारखी नसल्यामुळे ती प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागेल. त्यासाठी इतिहास, परंपरा, संस्कृती यांकडे वळणे अवश्य आहे. (हे सर्व शब्द मी तूर्त स्थूलपणे एकाच अर्थाने वापरीत आहे.

राष्ट्राच्या उभारणीत परंपरा परस्परसंलग्न अशी तीन कार्ये करते. एक, ती जगातल्या इतर मानव-समाजांपासूनचे आपले वेगळेपण म्हणजेच अस्मिता किंवा आयडेंटिटी प्रस्थापित करते. दोन, तीमधून एकत्वाचे बंध निर्माण होतात. (समान वारसा.) तिच्या रूपात वर्तमानकालीन कर्तृत्वाला आवश्यक अशी स्फूर्तिकेंद्रे उपलब्ध होतात.

मात्र परंपरा आधुनिकतेशी जोडून घ्यावी लागते. आज उपयुक्त आणि इष्ट काय आहे याचा विचार करताना आजच्या काळातली आणि आपल्या परंपरेत बव्हंशी अनुपलब्ध असलेली स्वातंत्र्य, समता, विवेकवाद ही मूल्ये ध्यानात घ्यावी लागतात. तेव्हा परंपरेच्या ज्या घटकांकडून राष्ट्रवादाने पोषण घ्यायचे ते घटक या नव्या मूल्यांशी शक्य तितके सुसंगत असले पाहिजेत. याचा अर्थ असा की, समग्र राष्ट्रवाद केवळ परंपरेच्या आधारावर मांडणे अशक्य आहे. मात्र तो परंपरेशी जोडून घ्यावा लागतो.”

स.ह. पुढे लिहितात, “परंपरेचा राष्ट्रबांधणीत आणखी एक उपयोग होतो. जी आधुनिक मूल्ये स्वीकारायची ती ‘नवी’ म्हणून स्वीकारावी लागतात. ती नवी याचाच अर्थ ‘अपरिचित’ आणि ‘बाहेरून आलेली’ असतात आणि या दोन्ही कारणांमुळे ती स्वीकारण्याच्या मार्गात मानसिक अडसर उद्भवू शकतात. अश्यावेळी ती अगदीच काही नवी नव्हेत, आपणांकडेही होती, असे दाखविता आले तर नव्या मार्गावरील प्रवास सुकर ठरण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, राजकीय लोकशाही आपणांकडेही होती हे दाखविण्याचा प्रयत्न काशीप्रसाद जयस्वाल यांनी ‘हिंदू पॉलिटी’ या ग्रंथात केला. राष्ट्रवाद हेही एका अर्थाने नवे मूल्य आहे; पण आपणांकडेही राष्ट्रवादाला उपयुक्त असे पारंपरिक संचित आहे असे दाखविण्याचा प्रयत्न राधाकुमुद मुखर्जी यांनी ‘फंडामेंटल युनिटी ऑफ इंडिया’ या पुस्तकात केला. अशा प्रयत्नांत कधीकधी आधुनिकतेला उपयुक्त असे सत्यही गवसते, कधी ते गवसल्याचा भास निर्माण केला जातो. यांपैकी दुसऱ्या प्रकाराने जे घडते ते ‘मिथक’ होय. अशी मिथकेही राष्ट्रउभारणीत वापरली गेली आहेत. तेवढ्या बाबतीत राष्ट्रवाद विवेकवादाशी फटकून राहतो. मात्र राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नात अ-विवेकी (इरॅशनल) घटक कमीत कमी येईल याची काळजी घेतली पाहिजे.

पण परंपरा म्हणजे सगळ्या जुन्याचे पुनरुज्जीवन नाही. आधुनिक मूल्यांच्या स्वीकाराच्या आड न येणारे परंपरेतले घटक त्यांच्या वर दिलेल्या ‘कार्या’च्या दृष्टीने निवडले पाहिजेत. अशी निवड झाली म्हणजे परंपरानिष्ठ राष्ट्रवाद हा पुनरुज्जीवनवाद (Revivalism) होणार नाही. तो परंपरेतून निवडकपणे पोषण घेईल पण तिच्या आहारी जाणार नाही, तिचे पुनरुत्थान करणार नाही.

परंपरासंबद्ध राष्ट्रवाद म्हणजे संपूर्ण सांस्कृतिक समानताही नव्हे. सर्व भारतीयांना आपल्या इतिहासाचे व परंपरेचे ज्ञान असले पाहिजे, सर्वांची काही समान अभिमानस्थाने असली पाहिजेत – म्हणजेच परंपरेचे काही घटक सर्वांना समान असले पाहिजेत. इतर घटक गटविशिष्ट असू शकतील. हे गट भाषिक, धार्मिक, वांशिक इत्यादी असतील म्हणजेच सांस्कृतिक वैविध्य कायम राहील. गटांच्या संस्कृतींचे आविष्कार कायदा, सुव्यवस्था आणि अखिल भारतीय निष्ठा इत्यादींशी अर्थातच सुसंगत असतील. तेव्हा सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे सर्वांवर एकाच संस्कृतीचा रूळ फिरवणे नव्हे.”

परंपरानिष्ठ राष्ट्रवादाचा वरचा आशय लक्षात घेऊन भारतीय संदर्भात त्याची रूपरेखा स.हं.नी पुढीलप्रमाणे दिग्दर्शित केलेली आहे –

पुनरुज्जीवन टाळून आधुनिकतेशी जुळणाऱ्या परंपरेच्या घटकांत थोर व्यक्तींची परंपरा हा मला सर्वांत महत्त्वाचा घटक वाटतो. या व्यक्ती आपल्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वामुळे थोर झालेल्या असतात. या व्यक्तींचे आपण ‘वारस’ आहोत ही जाणीव स्फूर्तिप्रद होते, ऐक्याला दृढता देते आणि व्यक्तिपरंपरा देशविशिष्ट असल्यामुळे अस्मिताही प्रस्थापित करते. राष्ट्रवाद म्हणजे एका अर्थाने पूर्वज-पूजा असते असे म्हटले गेले आहे ते खरेच आहे. राष्ट्रीय भावनेचा हा अर्कच होय असे म्हणायलाही हरकत नाही. या थोर व्यक्ती धर्मनिरपेक्षपणे आणि केवळ त्यांच्या कर्तृत्वाच्या निकषावर निवडल्या पाहिजेत. थोर पूर्वजांच्या गौरवात व स्मरणात हे अभिप्रेत आहे की तो गौरव त्यांच्या कर्तृत्वामागील मनःशक्तींचा असेल. उदाहरणार्थ, आदिशंकराचार्यांची प्रज्ञा महत्त्वाची; त्यांचा मायावाद ज्याला स्वीकारायचा त्याने स्वीकारावा, शासन त्याचा उपदेश करणार नाही.

संक्रमणकाळ : हिंदू जीवनपद्धतीचा प्रभाव

समाजाच्या आजच्या¹ भेगाळलेल्या स्थितीमधून एकात्मतेकडे प्रवास करताना जो संक्रमणाचा काळ असेल त्यात आणखी काही गोष्टी अपरिहार्य ठरणार आहेत, हे स.ह. स्पष्टपणे लक्षात आणून देतात. ते म्हणतात, “धर्मनिरपेक्षतेचा कितीही आग्रह धरला तरी केवळ हिंदुसमाज हा बहुसंख्य असल्याकारणाने भारतीय जीवनाच्या एकूण वळणावर हिंदू जीवनपद्धतीचा प्रभाव राहणार हे उघड आहे. (इतिहासातही तो तसा झालेला आहे.) हे वास्तव धार्मिक अल्पसंख्यांनी स्वीकारले पाहिजे आणि त्याच्याशी जुळवून घेतले पाहिजे. कोणत्याही देशातल्या अल्पसंख्यांना असे करावेच लागते. ही ‘हिंदुवर्चस्वा’साठी चेतावनी नाही; किंबहुना कुणाच्याही वर्चस्वाचा ध्वनी आपल्या राष्ट्रवादी आवाहनात उमटणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असे माझे मत आहे. प्राप्त परिस्थितीत काय स्वाभाविक आहे याचे दिग्दर्शन मी करीत आहे.”

(1. प्रस्तुत विधान हे ‘जुलै १९९८’ मधील ‘माझी भूमिका : धर्मनिरपेक्ष पण परंपरासापेक्ष राष्ट्रवाद’ या लेखातील असून हा लेख ‘नवभारत’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.)

राष्ट्रवादात परंपरेचा आशय ओतणे आवश्यक!

आपली राष्ट्रवादविषयक भूमिका रूढ हिंदी राष्ट्रवाद आणि रूढ हिंदुराष्ट्रवाद यांपासून ती वेगळी कशी हे स.हं.नी समजावून सांगितले आहे. ते लिहितात, “हिंदी राष्ट्रवाद सर्व भारतीयांना राष्ट्रीय समजतो. मीही तसेच करतो. मात्र फरक असा की, हिंदी राष्ट्रवाद बळकटपणे येथल्या परंपरेशी बांधलेला नाही. परंपरेला आणि जी मुख्यतः ‘हिंदू’ परंपरा असणार आहे तिला त्या विचारात मध्यवर्ती स्थान नाही. हिंदी राष्ट्रवादात परंपरेचा आशय ओतला की माझा विचार सिद्ध होतो. तो आशय नसेल तर काही भौगोलिक सरहद्दींच्या आत असलेले सर्व लोक राष्ट्रीय अशी प्रादेशिक राष्ट्रवादाची (टेरिटोरियल नॅशनॅलिझमची) अवस्था त्याला प्राप्त होते.”

हिंदुराष्ट्रवादाच्या दोन शाखा

हिंदुराष्ट्रवादाच्या दोन शाखांविषयी स.हं.नी लिहिलेले आहे. पहिली शाखा सावरकरांची. सावरकर हिंदू हा राष्ट्रीय समाज समजतात तो पुण्यभूमी या निकषावर. यात भारतात जन्म पावलेल्या धर्मांखेरीज इतर धर्मांचे लोक राष्ट्रीयत्वाच्या परिसरातून कायमचे हद्दपार होतात. हे स.हं.ना मान्य नाही. स.हं.चा राष्ट्रवाद समावेशक म्हणजे सर्व भारतीयांना कवेत घेणारा आहे. तो ‘इंटेग्रेशनिस्ट’ आहे; सावरकरांचा तसा नाही. मात्र सावरकरांनी कल्पिलेले हिंदुराष्ट्र प्रायः धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही स्वरूपाचे आहे. येथे स.हं.चा विचार सावरकरांशी जवळीक साधतो.

सावरकरांचा राष्ट्रवाद परंपरानिष्ठ आहे ही स.हं.ची सावरकरांशी आणखी एक जवळीक आहे. परंपरेतला ऐहिक अंश ते कटाक्षाने निवडतात हीही एक जवळीक आहे. शिवाय “सामाजिक समतेचा सावरकरांचा आग्रह मला जवळचा आहे”, असे स.ह. म्हणतात. मात्र सावरकर जेव्हा संस्कृतीविषयी बोलतात तेव्हा ते हिंदूंच्या संस्कृतीविषयी बोलतात; ‘मिश्र’ संस्कृती त्यांच्या मनात आहे असे दिसत नाही. येथे स.हं.ची सावरकरांपासून वेगळीक आहे.

संघाने हिंदूची व्यापक म्हणजे ‘भारतीय’ अशी व्याख्या करून बीजरूपाने धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा उच्चार केला आहे. मात्र ‘भारतीय राष्ट्रवाद’ असे नामाभिधान त्याला न देता त्याला ‘हिंदुराष्ट्रवाद’ म्हणावे हा त्यांचा आग्रह आहे. “माझाही तोच आग्रह माझ्या ‘सावरकर ते भा.ज.प.’ या पुस्तकात प्रकट झाला होता. पण अधिक विचार करता ‘भारतीय’ या नावाला पसंती द्यावी असे मला आता वाटते,” असे स.ह. लिहितात. “पण नाव अलाहिदा; समावेशक राष्ट्रवाद ही संघाशी माझी एक जवळीक आहे. दुसरी जवळीक (संघाला) हा राष्ट्रवाद परंपरेशी² नाते असलेला हवा या तत्त्वाबद्दल आहे,” हेही ते स्पष्ट करतात.

(2. परंपरेत धर्म, भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, नीतिमूल्ये, विज्ञान, तंत्रज्ञान, ललित कला इत्यादी सर्व मानवी कृतींचा समावेश होतो.)

आपल्या ‘राष्ट्रवाद आणि विवेकवाद’ या लेखाच्या आरंभी स.ह. लिहितात, “‘मानवता’ म्हटले की राष्ट्रवाद बाद होतो. राष्ट्रवाद बाद होणे मला रूचणारे नाही. तेव्हा प्रथम राष्ट्रवादाची गरज मला का वाटते आणि त्याचे स्वरूप काय हे अत्यंत संक्षेपाने सांगून नंतर राष्ट्रवादाचा नीतिविचाराशी व बुद्धिवादाशी कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो याचा शोध मी घेणार आहे.”

(उर्वरित भाग उत्तरार्धात)

अकोला,
ध्वनिसंपर्क : ९२२६५६९६८३

अभिप्राय 2

  • हिंदू या शब्दाचा प्रचलित अर्थ हिंदू धर्मीय व्यक्ती असाच होतो. त्या शब्दाचा वैयक्तिक अर्थ बदलून भारतीय असा करण्याचे कारणच काय? तसे करण्यामुळे समाजाचा मनात घोटाळा निर्माण होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्ष हिंदू या शब्दाचा अर्थ भारतीय असा घेण्यास तयार आहे काय? कोणत्याही धर्माचा नागरिक स्वतःला भारतीय म्हणून घेण्यास लगेच तयार होईल पण हिंदू म्हणून घेण्यास तयार होणे अवघड आहे. सध्या तरी मुस्लिम द्वेश हाच भाजपच्या राजकारणाचा मूलमंत्र आहे.

  • स.ह. ना धर्मनिरपेक्ष पण संस्कृतीसापेक्ष राष्ट्र हवे होते. यातला अंतर्विरोध त्यांना माहीत होता. एवढेच नव्हे तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद यावर होणारी टीका याची त्यांना कल्पना होती. त्यांच्या संकल्पनेला आपण घटनात्मक सांस्कृतिक, प्रजातांत्रिक राष्ट्रवाद म्हणू शकतो. यात घटना आणि घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वं कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा किंवा आगमग्रंथापेक्षा राज्यव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत प्रमाण रहाणार होती. मात्र त्यांच्या राष्ट्रवादाला एक महत्त्वाचा संदर्भ मुस्लिम प्रतिराष्ट्रवादाचा होता हे मान्य करायला हवे. इस्लामचा अंतर्प्रवाह हा मूलतत्ववादी असल्याने इतर संस्कृतीं किंवा उपसंस्कृतीं बरोबरच्या सहजीवनास ते सामान्यतः आणि सहसा तयार नसतात असे त्यांना वाटे. परस्परत्वाची (reciprocity) आणि समादराची (equal respect) भूमिका त्यांच्या समाजमनाला मान्य नसते असे ते म्हणत.‌ या साठी इस्लामवर (म्हणजे त्यांतील गुणदोषांवर) अभ्यासपूर्ण सार्वत्रिक चर्चा हवी असे त्यांचे मत होते.‌ शेषराव मोऱ्यांचे “मुस्लिम मनाचा शोध” हे पुस्तक त्यातील सैय्यद इफ्तिकार अहमद यांच्या खंडन-मंडन करणाऱ्या प्रास्ताविकासह त्यांनी “Islam: Maker of the Muslim Mind” या नावाने अनुवादित केले होते. हा त्यांच्या इस्लामच्या अभ्यासाचा एक भाग होता. त्यांचा उर्दूचाही अभ्यास होता आणि उर्दू वृत्तपत्रांच्या वाचनातून ते इस्लामिक दुनियेतील मतमतांतरे समजून घ्यायचा प्रयत्न करीत.

    हिंदू संस्कृती ही मूलतः निसर्ग पूजक, सर्वेश्वर वादी, बहुपंथी – तरीही एकतत्त्व वादी, उत्क्रांतीशील-परिवर्तनशील (संदर्भ: माझा Hinduism and Evolution हा SSRN वरील पेपर) असल्याने ती राष्ट्रधारणेसाठी पुरेशी टिकाऊ, समावेशक आणि लवचिक आहे असे त्यांना वाटत असावे. हिंदू = भारतीय का नाही? स.ह. नेमके हेच समीकरण मांडत होते. यानं गोंधळ होणार नाही का? ज्यांना गोंधळ घालायचाय ते घालणारच आहेत ! जास्त सुसंस्कृत मार्ग म्हणजे चर्चेतून आणि मतदानाद्वारे व्यक्त होणं. आज ते काही प्रमाणात, किमान मतदानाद्वारे, होताना दिसतंय.

    2012 नंतर भारतात अनेक बदल झालेत. स.ह. या बदलांवर कसे व्यक्त झाले असते याचं केवळ अनुमान करणं आपल्या हातात आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.