भारतीय तत्त्वज्ञान परंपरेत एक अत्यंत मानवी असा आशीर्वाद वारंवार उच्चारला जातो “सर्वेऽपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः”. याचा सरळ अर्थ असा की सर्व लोक सुखी व्हावेत, सर्व लोक निरोगी राहावेत. प्राचीन ऋषींच्या चिंतनातून उमटलेली ही भावना इतकी वैश्विक होती की तिच्यात कोणत्याही जाती, धर्म, वर्ण, राष्ट्र यांचे बंधन नव्हते. ही भावना म्हणजे भारतीय विचारसरणीच्या सार्वत्रिक मानवी दृष्टिकोनाचे जिवंत उदाहरण आहे. मानवी जीवनाचा ध्यास केवळ मोक्ष, परलोक, आत्मसाक्षात्कार एवढ्यावर मर्यादित नसून, प्रत्यक्ष जगात लोकांनी सुखाने जगावे, ही देखील ह्या विचारांच्या मुळाशी असलेली आकांक्षा होती. याची पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील उपयुक्ततावादाशी (Utilitarianism) काही प्रमाणात तुलना करता येईल. जेरेमी बेंथम व जॉन स्टुअर्ट मिल यांसारख्या तत्त्वज्ञांनी मांडलेले “the greatest good for the greatest number” हे सूत्र. मुळात मानवी कृतींचे मापन त्यांच्या परिणामांवरून करावे, आणि ज्या कृतीतून सर्वाधिक लोकांना जास्तीत जास्त सुख मिळते ती कृती नैतिक ठरते, असा त्याचा सारांश आहे. म्हणजेच, भारतीय परंपरेतील ‘सर्वे सुखिनः’ आणि पाश्चिमात्य उपयुक्ततावाद ह्या दोन्हींचा केंद्रबिंदू मानवी सुख हाच आहे. फरक इतकाच की भारतीय परंपरेत हे अधिक भावनिक, प्रार्थनासदृश व सांस्कृतिक मूल्य म्हणून मांडले गेले, तर पाश्चिमात्य विचारांत ते तर्काधिष्ठित नैतिक मापदंड म्हणून आले.
पण सुख म्हणजे काय? हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकाच गुंतागुंतीचा आहे. ह्या प्रश्नाला सर्वात टोकदार आणि इहवादी उत्तर देणारी विचारसरणी म्हणजे ’चार्वाक’ किंवा ’लोकायत’. इ.स.पूर्व सहाव्या शतकात जेव्हा भारतात उपनिषदांचा अध्यात्मप्रधान प्रवाह, बौद्ध- जैनांचे तपश्चर्यावादी प्रवाह आणि वैदिक यज्ञातील कर्मकांड यांची स्पर्धा सुरू होती, तेव्हा चार्वाकांनी ठामपणे एक वेगळा सूर लावला. त्यांच्यानुसार फक्त प्रत्यक्ष अनुभव हेच ज्ञानाचे प्रमाण. श्रोत्रिय वेदांवर आधारित ज्ञान, युक्तिवादातून सिद्ध न होणाऱ्या गृहितकांवर आधारित अनुमान किंवा परलोकाचा आधार घेणारे तर्क, हे सर्व त्यांनी नाकारले. त्यांच्या मते ह्या जगात जे आपण अनुभवतो तेवढेच सत्य आहे. आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक, ईश्वर यांचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेऊ शकत नाही, त्यामुळे ते अस्तित्वातच नाहीत. मृत्यूनंतर शरीर भस्म झाले की सगळे संपते. म्हणूनच त्यांनी म्हटले — “यावज्जीवेत् सुखं जीवेत्, नास्ति मृत्योरगोचर:। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।” म्हणजे, जोवर जीवन आहे तोवर सुखाने जगावे. मृत्यूनंतर अगोचर आत्मा वगैरे काहीही अस्तित्वात राहत नाही. शरीर भस्मीभूत अर्थात् जळून राख झाल्यावर पुनर्जन्म होणार कसा? पण वैदिकांनी चार्वाकांची बदनामी करण्यासाठी ह्या श्लोकात “नास्ति मृत्योरगोचर:”च्या जागी “ऋणं कृत्वा घृतं पिबेत्” अशी प्रक्षिप्त शब्दयोजना करून चार्वाक हे कसे ऋण काढून सण साजरा करायला सांगणारे उच्छृंखल होते, परलोकवाद हा इहवादापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या तोंडी ’पैशाची चिंता करून दुःखी का व्हावे? आवश्यक असेल तर कर्ज घेऊन का होईना पण तूप पिऊन सुखाचा उपभोग घ्यावा. असे ते म्हणत’, हे ह्या श्लोकात प्रक्षिप्त शब्दयोजना करून वैदिकांनी सावाचा आव आणत सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला हा श्लोक मूळचा, खरा आहे असे वाटल्यामुळे चार्वाकांचे हे विचार ऐकले की आपल्याला चार्वाक अतिशय स्वार्थी होते, उथळ होते, असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण आपण आदर्श म्हणून त्याग, संयम, धर्म, परोपकार यांचा पुरस्कार करत आलो आहोत. परंतु वास्तवातले जीवन पाहिले तर चार्वाकांचे विधान चुकीचे नाही हेच चक्षुर्वै सत्य आहे असे दिसते. कारण बहुतेक लोक आपल्या दैनंदिन प्रयत्नांमधून ह्याच तत्त्वाचा पाठपुरावा करत असतात. आपल्याला जे सुख वाटेल, आणि आयुष्य अधिक सुलभ होईल तेच करण्यासाठी आपण धडपडत असतो. म्हणजेच, चार्वाकांनी ज्या गोष्टीला सरळपणे ध्येय मानले, त्याला आपण कधीकधी लपवाछपवी करून, ‘धर्म’, ‘कर्तव्य’, ‘मोक्ष’, ‘आध्यात्मिक उन्नती’ अशा भारदस्त शर्करावगुंठित शब्दांत मांडत असतो.
सुख वाटणे हा केवळ व्यक्तिगत अनुभव असतो. कारण एकाला जे सुखदायी वाटते ते दुसऱ्याला दुःखदायी वाटू शकते. उदाहरणार्थ, एखाद्यासाठी भरपूर संपत्ती मिळणे हे सुख असेल, पण दुसऱ्यासाठी शांत निवांत जीवन हेच सुख असेल. एकाला सत्ता मिळणे सुखदायी वाटेल, पण दुसऱ्याला साधी मैत्री हीच सर्वोच्च गोष्ट वाटेल. त्यामुळे सुख व्यक्तिनिष्ठ आहे. पण तसे पाहिले तर आपले सारेच अनुभव व्यक्तिनिष्ठ आहेत. आपण ज्या अनुभवांना सर्वमान्यता देतो, त्यांनाच वस्तुनिष्ठ म्हणतो. मग प्रश्न उभा राहतो की सुखाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे शक्य आहे का? विज्ञान-तंत्रज्ञानाच्या व सांख्यिकीच्या साधनांचा वापर करून आपण व्यक्ती व समाजाच्या सुखाचे काही प्रमाण मोजू शकतो का? याच प्रश्नाला उत्तर देण्याचा एक आधुनिक प्रयत्न म्हणजे आनंदी जीवनाचा जागतिक निर्देशांक (World Happiness Index) शोधणे. २०११ पासून सुरू झालेल्या ह्या निर्देशांकाचा उद्देश असा की, केवळ देशाची आर्थिक प्रगती किंवा GDP यावरूनच नागरिकांचे कल्याण मोजता येत नाही. सुखासाठी इतरही घटक महत्त्वाचे आहेत. म्हणून सहा निकषांवर प्रत्येक देशाचे मूल्यमापन केले जाते.
(१) देशांतर्गत प्रति व्यक्ती उत्पन्न, (२) सामाजिक आधार, म्हणजे गरजेच्या वेळी मदत करणारे लोक उपलब्ध आहेत का, (३) निरामय आयुर्मान, (४) जीवनपद्धतीतील निवडीचे स्वातंत्र्य, (५) औदार्य वा परोपकार करण्याची वृत्ती, आणि (६) भ्रष्टाचाराचा अभाव. ह्या निकषांच्या आधारे जेव्हा भारतीयांचे मूल्यांकन केले गेले, तेव्हा चित्र फारसे उत्साहवर्धक नव्हते. २०१३ साली १५६ देशांत भारताचे स्थान १११ वे होते. २०२४ पर्यंत मात्र भारत १२६ व्या स्थानावर फेकला गेला. म्हणजेच, जगातल्या बहुतांश देशांपेक्षा भारतीय नागरिक कमी सुखी मानले गेले. “अच्छे दिन आयेंगे” ह्या राजकीय घोषणेच्या नेमक्या उलट दिशेने प्रत्यक्ष सुखाचा अनुभव येऊ लागला, म्हणजे माणसे जास्तीत जास्त दु:खी होऊ लागली.
पण येथे महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की, वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समधील हेच सहा निकष सुखाचे संपूर्ण चित्र तयार करतात का? निश्चितच नाही. कारण सुख इतके बहुआयामी आहे की, ते केवळ आर्थिक समृद्धी, सामाजिक आधार किंवा भ्रष्टाचार कमी होण्यातूनच मोजता येत नाही. तर मानसिक आरोग्य, सांस्कृतिक अभिव्यक्ती, सामाजिक विषमता, पर्यावरणीय शाश्वतता, लिंगसमानता, शिक्षणाची गुणवत्ता, कामाचा ताण, तंत्रज्ञानाचा परिणाम हे सारे घटक सुखाशी जोडलेले आहेत. म्हणूनच चार्वाकांचा ‘ऐहिक सुख’ हा मुद्दा आजही जिवंत व सुसंगत आहे. पण ते ऐहिक सुख केवळ व्यक्तिनिष्ठ उपभोगापुरते मर्यादित न राहता, समाजाच्या सामूहिक जीवनमानाशी जोडले गेले पाहिजे. सुखाची पातळी प्रत्यक्ष वाढवण्यासाठी व्यक्ती, समाज व शासन ह्या सर्व पातळ्यांवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण सुखाचे स्वरूप जितके व्यक्तिनिष्ठ आहे तितकेच सामाजिकही असते. व्यक्तीच्या पातळीवर प्रत्येकजण वेगळ्या निकषांवर सुखाचे मूल्य ठरवतो. एखाद्याला आर्थिक सुरक्षितता, तर दुसऱ्याला नातेसंबंध, तिसऱ्याला सर्जनशीलतेची संधी ह्यातून समाधान मिळते. पण समाजाचे कल्याण मोजताना काही सामूहिक मापदंड ठरवावे लागतात. शेवटी धोरणे, शासनयोजना, संसाधनांचे वाटप ह्यांचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असतो. म्हणून सुखाचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी वर दिलेले सहा निकष पुरेसे नाहीत. ह्या सहा घटकांमधून सुखाचे मोजमाप करणे म्हणजे बहुआयामी संकल्पनेला खूपच अरुंद चौकटीत बसवणे होय.
उदाहरणार्थ, प्रति व्यक्ती GDP हा घटक आर्थिक प्रगतीचे एकूण चित्र दाखवतो, पण त्या उत्पन्नाचे वितरण किती न्याय्य आहे हे सांगत नाही. जर काही मूठभर लोकांच्या हाती संपत्ती केंद्रित झाली आणि उर्वरित बहुसंख्य लोक किमान गरजांसाठी झगडत राहिले, तर GDP जरी वाढला तरी बहुसंख्य लोकांच्या सुखाची पातळी वाढेलच असे नाही. याचप्रमाणे, ‘सामाजिक आधार’ हा घटक महत्त्वाचा असला तरी तो केवळ संकटसमयी मदतीपुरता मर्यादित नाही. सामाजिक आधार म्हणजे समता, भेदभावाचा अभाव, लिंगसमभाव, जातीय सलोखा, धार्मिक सौहार्द अशा अनेक गोष्टी. भारतीय समाजात जातीय व धार्मिक तणाव अद्यापही विद्यमान असल्यामुळे, नागरिकांच्या प्रत्यक्ष सुखात मोठी तडजोड होते. ‘निरामय आयुर्मान’ हाही निकष थोडा एकांगी ठरतो. कारण जरी सरासरी आयुर्मान जास्त असले तरी जीवनातील मानसिक आरोग्य, नैराश्य, कामाचा ताण, एकाकीपण यांची नोंद होत नाही. आज जगभरात मानसिक आरोग्य हा मोठा प्रश्न आहे. भारतात विशेषतः तरुणवर्गामध्ये नैराश्य, आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे आयुर्मान हा निकष पुरेसा नाही; आयुष्याचा दर्जाही (quality of life) महत्त्वाचा आहे.
‘जीवनपद्धतीच्या निवडीचे स्वातंत्र्य’ हाही निकष लोकशाही मूल्यांशी जोडलेला आहे. परंतु फक्त मतदानाचा अधिकार किंवा राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नाही. जीवनातील रोजच्या निर्णयांमध्ये करिअर, विवाह, राहणीमान, अभिव्यक्ती, लिंग ओळख, धार्मिक स्वातंत्र्य ह्या बाबतीत जर दडपशाही असेल, तर ते खरे स्वातंत्र्य नाही. त्यामुळे हा निकष आणखी अधिक अचूकपणे मोजला पाहिजे. ‘औदार्य’ म्हणजेच दान करण्याची किंवा मदत करण्याची प्रवृत्ती हा घटक महत्त्वाचा आहे, पण समाजातील परस्परविश्वास आणि सामाजिक भांडवल ह्याच्याशीही तो निगडित आहे. भारतासारख्या देशात दानधर्म मोठ्या प्रमाणात होत असला तरी त्यातून सामाजिक विषमता कमी होत नाही, उलट कधीकधी जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी मिळते. त्यामुळे औदार्याचे मूल्यांकन करताना त्याचे सामाजिक परिणामही तपासले पाहिजेत. ‘भ्रष्टाचाराचा अभाव’ हा घटक सर्वमान्य आहे. कारण भ्रष्टाचार म्हणजेच संसाधनांचे अन्याय्य वितरण, ज्यामुळे प्रामाणिकपणे जगणाऱ्या नागरिकांचे जीवन अधिक कठीण होते. पण इथे केवळ आर्थिक किंवा प्रशासकीय भ्रष्टाचार नाही; राजकीय भ्रष्टाचार, विचारांचे दमन, माध्यमांचे नियंत्रण हेसुद्धा लोकांच्या सुखावर परिणाम करतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
ह्यावरून असे दिसते की, वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स महत्त्वाचा असला तरी तो एकूण वास्तवाचे चित्र दाखवण्यासाठी अपुरा आहे. त्यामुळे त्याला पूरक काही अतिरिक्त निकष लावणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिला म्हणजे मानसिक आरोग्य. जीवन कितीही आरामदायी असले तरी जर लोक तणाव, नैराश्य, असुरक्षितता, एकाकीपणा यांचा सामना करत असतील, तर त्यांचे सुख कमी होते. त्यामुळे मानसिक आरोग्याचा सूचकांक महत्त्वाचा ठरतो. दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे सामाजिक विषमता. केवळ सरासरी आकडे दाखवले तर खरे चित्र दडपले जाते. उदाहरणार्थ, उत्पन्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार ह्या बाबतीत श्रीमंत-गरीब, पुरुष-स्त्री, शहरी-ग्रामीण, उच्चजात-खालची जात यांमध्ये प्रचंड दरी असेल तर समाजातील एक भाग खूप सुखी दिसेल, पण दुसऱ्या भागातील बहुसंख्य लोक वंचित राहतील. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील सुखाचे गुणांकन चुकीचे ठरणार नाही का? तिसरा निकष म्हणजे पर्यावरणीय शाश्वतता. जर प्रदूषण, पाणीटंचाई, हवामानबदल यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त होत असेल, तर आर्थिक प्रगतीचा काही उपयोग नाही. भारतात विशेषतः शहरांतील वायुप्रदूषण, ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई, हवामानामुळे शेतीवर येणारे संकट, ह्या सर्वांचा लोकांच्या सुखावर थेट परिणाम होतो. चौथा निकष म्हणजे सांस्कृतिक अभिव्यक्ती व जीवनाचा अर्थ. माणूस केवळ भाकरीसाठी जगत नाही. कला, संस्कृती, बौद्धिक स्वातंत्र्य, सर्जनशीलता, समुदायातील सहभाग, नातेसंबंध यांतूनही सुखाचा अनुभव मिळतो. जर समाजात सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन नसेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपले जात असेल, तर लोकांची मानसिक समाधानाची पातळी घसरते. पाचवा पूरक घटक म्हणजे न्यायव्यवस्था व कायदा-सुव्यवस्था. नागरिकांना न्याय लवकर मिळतो का? स्त्रिया व दुर्बल गट सुरक्षित आहेत का? गुन्ह्यांवर अंकुश आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरे थेट सुखाशी जोडलेली आहेत.
ह्या सर्व मुद्द्यांवरून लक्षात येते की, सुखाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करताना व्यापक चौकट आखणे आवश्यक आहे. चार्वाकांनी ज्या ‘ऐहिक सुखाला’ सर्वोच्च स्थान आणि मान दिला, ते केवळ व्यक्तीगत उपभोगापुरते न राहता सामाजिक न्याय, मानसिक आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक उन्नती यांच्याशी निगडित आहे. वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समधील भारताचा घसरलेला क्रमांक ही काही आकस्मिक बाब नाही. तर गेल्या दशकात वाढती बेरोजगारी, सामाजिक-धार्मिक ध्रुवीकरण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कमी गुंतवणूक, भ्रष्टाचार, पर्यावरणीय संकटे यामुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान खालावले आहे. त्यामुळे आर्थिक वाढीच्या दाव्यांनंतरही प्रत्यक्ष सुखाचा अनुभव नागरिकांना मिळत नाही. म्हणून वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्सने दिलेले सहा निकष उपयोगी असले तरी ते अंतिम नाहीत. कारण सुखाचा संबंध केवळ बाह्य परिस्थितींशी नसून अंतर्मनाशीही आहे. उदाहरणार्थ, दोन माणसांचे उत्पन्न समान असले तरी त्यांची समाधानाची पातळी पूर्णपणे भिन्न असू शकते. त्यामुळे सुख = भौतिक समृद्धी + मानसिक समाधान + सामाजिक संबंध + मूल्यात्मक जाण ह्या सर्वांची एकत्रित फलश्रुती मानता येईल.
भारतीय तत्त्वज्ञानातही सुखाची हीच बहुआयामी कल्पना दिसते. उपनिषदांमध्ये “आनंद” ही संकल्पना केवळ इंद्रियभोगाशी जोडलेली नाही, तर अंतर्गत शांती व आत्मबोधातून मिळणारे परिपूर्णतेचे भावविश्व अशी तिची व्याख्या आहे. बौद्ध तत्त्वज्ञानात “निर्वाण” म्हणजे दुःखातून मुक्त होणे, आणि जैन परंपरेत “कैवल्य” म्हणजे आसक्तीमुक्त आनंद. म्हणजेच भारतीय परंपरेत सुख हे फक्त उपभोगाचे नाव नाही, तर मनःशांती आणि संतुलन यांचे दुसरे नाव आहे. याच्या उलट चार्वाकांनी ’सुख म्हणजे इंद्रियसुखाचा अनुभव’ असा वेगळा दृष्टिकोन मांडल्यामुळे चार्वाकांच्या तत्त्वज्ञानाचा उथळ अर्थ घेतले गेला आणि चार्वाकांविषयी चुकीची समजूत रूढ करण्यात आली. आजचा आधुनिक उपयुक्ततावादी समाजही हळूहळू चंगळवादी होत अशा मार्गावर चालायला लागला आहे. त्यामुळे भौतिक संपत्ती जितकी जास्त तितकं सुख जास्त, अशी एक चुकीची समजूत तयार होत आहे. पण मानसशास्त्रज्ञ डॅनियल कॅहनमन आणि अँगस डिटन यांच्या संशोधनानुसार उत्पन्नाची मर्यादा ठराविक पातळीपर्यंत पोहोचली की त्यापुढे ती सुख वाढवू शकत नाही. म्हणजेच, पैसा आवश्यक आहे, पण तो सर्वस्व नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकरी किंवा शहरी मध्यमवर्गीय यांच्याकडे फार मोठी संपत्ती नसली तरी ते सामाजिक संबंधांमुळे, उत्सव-परंपरांमुळे किंवा कुटुंबातील जवळीकीमुळे “सुखी” असल्याची जाणीव ठेवतात. दुसरीकडे, महानगरांतील संपन्न वर्गाकडे पैसा असूनही एकाकीपण, मानसिक ताण, नैराश्य ह्या समस्यांचा धोका अधिक आहे. पण ह्या प्रकारचे सामाजिक बंध आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती ह्या घटकांचे मूल्यांकन वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये फारसे केले गेलेले नाही.
शिवाय, पर्यावरणीय घटकांचाही विचार सुखासाठी अत्यावश्यक आहे. प्रदूषित हवेतील, गर्दीच्या, गोंगाटमय महानगरात राहणाऱ्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने आणि मानसिक शांतीच्या दृष्टीने सुख मिळणे कठीण जाते. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने अलीकडे “सस्टेनेबल डेव्हलपमेंट” हे सुखाचे एक मुख्य अंग मानले आहे. “सुखी माणूस तोच जो निरोगी आहे आणि निसर्गाशी सुसंवाद साधत जगतो.” हा विचार आता जागतिक स्तरावर अधिक अधोरेखित होतो आहे. म्हणून चार्वाकांनी ज्या ऐहिक सुखाला महत्त्व दिले, ते आजच्या समाजासाठीही आवश्यक आहे. पण त्याला पूरक म्हणून मानसिक शांती, सामाजिक समता, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि पर्यावरणीय संतुलन ही चार पायाभूत तत्वे नसतील तर सुखाचे संपूर्ण चित्र पूर्ण होणार नाही. कारण सुख जरी व्यक्तिनिष्ठ असले तरी सुखाची कल्पना केवळ वैयक्तिक किंवा मानसिक अनुभवापुरती मर्यादित नसते. तिचा विस्तार माणसाच्या संपूर्ण जीवनपद्धतीत, सामाजिक नात्यांत आणि शासनाच्या धोरणांत दिसतो. व्यक्ती कितीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत असली तरी तिच्या भोवतालची समाजपरिस्थिती आणि त्यामागे उभे असलेले शासन जर प्रतिकूल असेल, तर तिच्या सुखाला मर्यादा येतात. त्यामुळे सुखाची वृद्धी ही एक बहुआयामी प्रक्रिया आहे, ज्यात व्यक्ती, समाज आणि शासन ह्या तिन्हींचा सहभाग अत्यावश्यक ठरतो.
व्यक्तिगत पातळीवर पाहिले तर सुखाची खरी बीजे अंतर्मनात असतात. आपल्याकडे किती आहे यापेक्षा आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे ठरते. भौतिक साधनसंपत्ती नक्कीच उपयुक्त असते, पण तिच्यापलीकडे मानसिक संतुलन, आत्मनियंत्रण आणि समाधान यांची गरज अधिक आहे. सततच्या तुलना, स्पर्धा आणि इच्छांच्या ओघात माणूस सुखाचा शोध घेतो, पण सुखाचा स्रोत त्याच्याच जीवनपद्धतीत असतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणावनियंत्रण ह्या जीवनशैलीतील घटक सुखाची पायाभरणी करतात. तसेच, सामाजिक नाती जपणे, जवळच्या माणसांशी संवाद साधणे, परस्परांना आधार देणे यामुळे सुखाला दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होते. जीवनाला केवळ उपभोगाचे नाही तर उद्दिष्टाचे रूप दिल्यास, म्हणजेच स्वतःच्या क्षमतांचा उपयोग इतरांसाठी करण्याच्या वृत्तीने वागल्यास, माणूस अधिक परिपूर्ण आनंद अनुभवतो.
समाजपातळीवर सुखाचा पाया हा समता, समानता, एकात्मता आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीमध्ये सापडतो. विषमता, समरसता आणि अन्यायाने ग्रासलेल्या समाजात व्यक्तींचे सुख खऱ्या अर्थाने उमलत नाही. येथे आपल्याला समता, समानता आणि समरसता ह्या तीन शब्दातील फरक लक्षात घ्यावा लागेल; म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल. *समता म्हणजे प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार न्याय्य वागणूक मिळणे. समानता म्हणजे व्यक्तींमधील भिन्नता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भिन्न गरजा लक्षात न घेता सगळ्यांना एक सारखी वागणूक देणे. तर समरसता म्हणजे व्यक्तींनी आपल्या आहे त्या जातीय विषमतेच्या स्थितीत समाधान मानून एकमेकांशी सलोख्याने वागणे.* पण जाती, धर्म, लिंग, वर्ग यांवर आधारित भेदभाव नष्ट करून समाजात समतेची आणि सहजीवनाची भावना निर्माण झाली तरच लोकांचा एकंदर जीवनानुभव अधिक सुखद होईल. तसेच, समाजातील सांस्कृतिक अभिव्यक्तींनाही सुखवृद्धीसाठी महत्त्व असते. उत्सव, कला, साहित्य, संगीत यांतून निर्माण होणारी सामूहिक ऊर्जा माणसाला केवळ मनोरंजन देत नाही, तर एकमेकांच्या मनात भावनिक एकात्मता निर्माण करते. ह्या प्रक्रियेमुळे व्यक्तीचा एकाकीपणा कमी होतो आणि तिच्या सुखाची पातळी अधिक उंचावते. समाजाने आपल्या उपभोगपद्धती पर्यावरणपूरक ठेवल्या तरच दीर्घकाळ टिकणारे सुख साध्य होते. कारण पर्यावरणाचा ऱ्हास हा माणसाच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर थेट परिणाम घडवतो. याशिवाय समाजात आधारव्यवस्था मजबूत असेल, म्हणजे वृद्ध, विकलांग, आजारी किंवा वंचित घटकांना आधार देणाऱ्या यंत्रणा सशक्त असतील, तर समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या जीवनाचा दर्जा उंचावण्याची संधी मिळते आणि सामूहिक सुखाचा स्तर वाढतो.
शासनपातळीवर सुखाची वृद्धी करण्याची जबाबदारी अधिक व्यापक असते. शासनाचे धोरण केवळ आर्थिक वाढ साधण्यापुरते मर्यादित नसून ती वाढ सर्वांपर्यंत पोहोचली जात आहे की नाही हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे असते. शिक्षण आणि आरोग्य ही सुखाची दोन अत्यावश्यक अधिष्ठाने आहेत. दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण दिल्याशिवाय सामाजिक समता येत नाही आणि निरोगी जीवनशैली सुनिश्चित केल्याशिवाय व्यक्ती सुखी होऊ शकत नाही. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक शासनामुळे नागरिकांचा विश्वास टिकून राहतो. भ्रष्टाचारामुळे केवळ आर्थिक संसाधनांचे नुकसान होत नाही, तर लोकांच्या मनातील सुरक्षिततेची भावनाही डळमळते. म्हणून शासनाने मानसिक आरोग्याच्या धोरणांना तितकेच महत्त्व दिले पाहिजे. कारण नैराश्य, तणाव आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढल्यास सुखाचा पाया हादरतो. पर्यावरणीय संरक्षण हेही शासनाचे मोठे कर्तव्य आहे. कारण हवामान बदल आणि प्रदूषणामुळे भविष्यातील पिढ्यांचे सुख धोक्यात येते. त्याचबरोबर न्यायव्यवस्था जलद, पारदर्शक आणि सुलभ असली तर लोकांना आपल्या हक्काचे संरक्षण मिळते, आणि ही सुरक्षिततेची भावना लोकांच्या सुखाला बळ देते. ह्या सर्वांवरून हे स्पष्ट होते की, सुखाचा प्रश्न हा एकट्या व्यक्तीने सोडवण्याचा किंवा शासनाने लादण्याचा नाही. व्यक्तीच्या स्वप्रयत्नांनी, समाजाच्या आधाराने आणि शासनाच्या सुयोग्य धोरणांनी मिळूनच खरे सुख फुलू शकते. हे तिन्ही घटक परस्परपूरक असतील तेव्हाच “सर्वेऽपि सुखिनः सन्तु” ही प्राचीन भारतीय संकल्पना व्यवहारात साकार होईल.
सुख ह्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील काही ठळक प्रयोग आपल्याला विचारात घ्यावे लागतील. त्यात सर्वांत महत्त्वाचा म्हणजे भूतान ह्या छोट्या हिमालयीन देशाचा “ग्रॉस नॅशनल हॅपिनेस” हा प्रयोग. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भूतानच्या राजाने असे जाहीर केले की, देशाच्या विकासाचे अंतिम उद्दिष्ट केवळ आर्थिक प्रगती नसेल, तर लोकांचे सर्वांगीण सुख असेल. त्यामुळे “ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट” (GDP) ऐवजी “ग्रॉस नॅशनल हॅपिनेस” (GNH) हा संकल्पनात्मक पर्याय त्यांनी मांडला. ह्या निर्देशांकात आर्थिक घटकांसोबतच सांस्कृतिक परंपरा, पर्यावरण संरक्षण, चांगले शासन, मानसिक आरोग्य, समुदायाशी बांधिलकी यांसारख्या घटकांना महत्त्व दिले गेले. त्यामुळे भूतानने विकासाला केवळ औद्योगिकीकरण किंवा पायाभूत सुविधा यापुरते मर्यादित न करता मानवी जीवनाच्या विविध पैलूंना एकत्रित स्वरूप दिले.
ह्याच्या तुलनेत युरोपातील नॉर्डिक देशांचे मॉडेल वेगळे आहे. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे देश दरवर्षी वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये सर्वांत वरच्या स्थानावर असतात. त्यामागचे गुपित म्हणजे त्या देशांची सर्वसमावेशक कल्याणकारी धोरणे. उच्च करप्रणाली असूनही ह्या देशांतील नागरिक समाधानी असतात, कारण त्यांना दर्जेदार सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, मोफत किंवा स्वस्तात उपलब्ध शिक्षण, निवृत्तीवेतन, बेरोजगारी भत्ता, महिलांसाठी सुरक्षित आणि समान संधी, तसेच पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त शासन मिळते. येथे सुख केवळ वैयक्तिक संपन्नतेवर अवलंबून नसून समाजाने निर्माण केलेल्या सुरक्षिततेच्या आणि विश्वासाच्या भावनेवर आधारलेले आहे. त्यामुळे व्यक्तींना आपल्या जीवनात निवडीचे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान टिकवून जगता येते.
ह्या दोन प्रयोगांवरून भारतासाठी काही महत्त्वाचे धडे मिळतात. भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात सुखाचे मोजमाप केवळ GDPच्या वाढीवर आधारित ठेवले तर त्याचा फायदा मर्यादित वर्गालाच होतो. खरे सुख मिळवण्यासाठी विकासात समतेचा, पर्यावरणाच्या रक्षणाचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा विचार करणे गरजेचे आहे. भूतानसारखे “हॅपिनेस इंडेक्स” https://mansampark.com/2012/05/21/manna/तयार करून प्रत्येक धोरणाची मोजणी फक्त आर्थिक नफ्यावर नव्हे तर लोकांच्या जीवनाच्या दर्जावर ठरवली जावी, अशी दिशा भारताने स्वीकारणे आवश्यक आहे. तसेच, नॉर्डिक देशांप्रमाणे सामाजिक सुरक्षा आणि सार्वजनिक सेवा ह्या घटकांना प्राधान्य दिल्यास भारतीय समाजातील असुरक्षिततेची भावना कमी होईल. आज बेरोजगारी, विषमता, शिक्षणातील असमानता आणि आरोग्यसेवेतील अपुऱ्या सुविधा ही भारतीयांच्या सुखातील मुख्य अडचणी आहेत. ह्या समस्यांचे निराकरण केल्याशिवाय भारत वर्ल्ड हॅपिनेस निर्देशांकात वरच्या स्थानावर येऊ शकत नाही. याशिवाय भारतासाठी एक आणखी मोठा धडा म्हणजे कारभारात पारदर्शकता आणणे आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचार, राजकीय ढोंग आणि सामाजिक तणाव हे सुखाच्या विरोधात उभे राहतात. नॉर्डिक देशांच्या अनुभवावरून दिसते की, जेथे नागरिकांचा शासनावर आणि एकमेकांवर विश्वास आहे, तेथे सुखाचे प्रमाण अधिक असते. भारतात हा विश्वास डळमळीत आहे. तो पुन्हा निर्माण करण्यासाठी शासनाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्षात लोकांच्या जीवनात सुधारणा करणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
ह्या आंतरराष्ट्रीय प्रयोगांमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, सुखाचे मोजमाप आणि वृद्धी करत जर राष्ट्राला खऱ्या अर्थाने प्रगत व्हायचे असेल, तर त्याने केवळ आर्थिक प्रगतीवर न थांबता नागरिकांच्या जीवनातील गुणवत्तेला प्राधान्य द्यायला हवे, तरच “सर्वेऽपि सुखिनः सन्तु” ही भारतीय परंपरेतील संकल्पना जागतिक पातळीवर नव्या रूपात अधोरेखित होईल. ह्या प्राचीन भारतीय संकल्पनेतून मानवतेचा उदात्त विचार व्यक्त होतो. हे केवळ धार्मिक प्रार्थनेतील वाक्य नाही, तर सामाजिक न्याय, समानता आणि समृद्धी यांचा उद्घोष आहे. आधुनिक काळात जेव्हा राष्ट्रांची प्रगती केवळ सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (GDP) मोजली जाते, तेव्हा ह्या मंत्राचे स्मरण आपल्याला अधिक व्यापक दृष्टिकोनाकडे नेते. जीवनाचा खरा उद्देश केवळ भौतिक संपत्ती निर्माण करणे नाही, तर प्रत्येकाला सन्मानाने, आरोग्यपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगता येणे, हा आहे.
चार्वाकाच्या इहवादी विचारसरणीने हे स्पष्ट केले की, मानवाने जे सुख मिळवायचे आहे ते ह्या जगातच आहे. परलोकावर अवलंबून राहणे म्हणजे वास्तविकतेपासून पलायन करणे होय. म्हणूनच सामाजिक संस्थांचे उद्दिष्ट, राज्यकारभाराचे ध्येय आणि शिक्षणाचा आत्मा हा इहलोकी सुखवृद्धीच्या दिशेने असावा. आज मानसिक आरोग्याच्या समस्या, नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी, सामाजिक असमानता आणि राजकीय ध्रुवीकरण हे घटक जागतिक स्तरावर भारताला सुखाच्या क्रमवारीत घसरवतात. यावर उपाय म्हणून भारतीय परंपरेतील सामूहिकता, करुणा आणि संयम ह्या मूल्यांना नव्या पिढीच्या जीवनपद्धतीत रुजविणे आवश्यक आहे. वर्ल्ड हॅपिनेस निर्देशांकात भारताची घसरलेली स्थिती केवळ आकड्यांच्या क्रमवारीच्या खेळापर्यंत मर्यादित न ठेवता, एक गंभीर सामाजिक इशारा म्हणून घ्यायला हवी. अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरी समाजातील सर्व घटकांपर्यंत त्या वाढीचे सुख पोचत नाही हे वास्तव नाकारून कसे चालेल? रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरणाचा समतोल आणि नागरिकांचा आवाज ह्या घटकांना डावलून खरे सुख मिळणार नाही. त्यामुळे राज्याने धोरणनिर्मिती करताना केवळ आर्थिक विकासाचे निकष न पाहता, नागरिकांच्या जीवनमानातील गुणवत्तेवर भर द्यायला हवा.
ह्या सर्व विचारातून एक प्रेरणादायी संदेश पुढे येतो. तो म्हणजे –व्यक्तीचे सुख हे समाजाच्या सुखाशी जोडलेले आहे, आणि समाजाचे सुख हे जगाच्या कल्याणाशी. जर खऱ्या अर्थाने “सर्वेऽपि सुखिनः सन्तु” ह्या मंत्राला आधुनिक जीवनात उतरवायचे असेल तर आपल्याला विवेक, विज्ञाननिष्ठा, करुणा आणि समानतेवर आधारित धोरणे राबवावी लागतील. हीच चार्वाक परंपरेची आधुनिक पुनर्व्याख्या आहे. जगात सुखाचा प्रसार करणे हा केवळ तत्त्वज्ञानाचा विषय नाही, तर प्रत्येक धोरण, प्रत्येक कृती आणि प्रत्येक मानवी नातेसंबंधाचा मूलाधार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी, धोरणकर्त्यांनी आणि नागरिकांनी मिळून सुखशास्त्राला समाजजीवनाच्या केंद्रस्थानी आणले पाहिजे. अशा प्रकारे, भारतीय वारशाकडून प्रेरणा घेत आणि आधुनिक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांच्या संगमातूनच आपण खऱ्या अर्थाने समतोल, सुखी आणि प्रगत समाजाची निर्मिती करू शकू. तुम्हाला काय वाटते?