भारतीय उपखण्डात अनेक स्थानिक विश्वास-प्रणाली (belief systems) फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. “कर्म, पुनर्जन्म, मोक्ष” (कपुमो) ही चौकट या सर्व प्रणालींत समान आहे. कपुमो चौकट कधीपासून आणि कुणी सुरू केली किंवा झाली हा विषय इथे नाही. या चौकटीला आपण हिन्दू-वैदिक (ब्राह्मण परंपरा) किंवा बौद्ध (श्रमण परंपरा) हे आपापल्या विचारांनुसार किंवा आवडीनुसार म्हणू शकतो. भारतीय उपखण्डात जन्मलेले पण या चौकटीबाहेर राहिलेले दोन समूह आपण ढोबळ मानाने रेखांकित करू शकतो: एक म्हणजे निसर्गपूजक, बहुदेवतावादी (polytheist), चेतनवादी (animist) असलेला अतिप्राचीन किंवा इतिहासपूर्व (prehistoric) समूह ज्याचा एक मोठा भाग कपुमो चौकटीत यथावकाश आणला गेला आणि ज्याला आता अतिप्राचीनतेमुळे सनातनी (followers of eternal religion) असे संबोधिले जाते. हिंदू, बौद्ध, सनातनी हे सर्व शब्द आपण समकक्ष किंवा समतुल्य (equivalent) मानले आहेत. कपुमो (कर्म-पुनर्जन्म-मोक्ष) ही तीन मुख्य लक्षणे. पण त्यालाच जोडून इतर लक्षणे येतात. जसे की, मोक्ष कशासाठी? तर (४) दु:ख निवारणासठी. तो कसा मिळेल? तर (५) ज्ञानाने. त्यासाठी (६) वाद-संवाद आणि प्रमाण चर्चा आवश्यक. एकदा कर्म ही विश्वाची एक मिती मानल्यावर कपुमो चे चक्र (जन्म-मरण-पुनर्जन्माचे फेरे) हे विश्वाला लागू झाले. त्यातून आले (७) उत्पत्ती, स्थिती, विलय या चक्रातून जाणारे भवचक्र किंवा चक्रीयविश्व. ही सप्तलक्षणे: [कर्म, पुनर्जन्म, मोक्ष, दु:ख-निवारण, ज्ञान, वाद-संवाद, भवचक्र ] सर्व कपुमो प्रणालींना थोड्या-फार फरकाने लागू पडतात.
कपुमो चौकटीबाहेर जाणीवपूर्वक राहिलेला पण या चौकटीबरोबर वाढलेला दुसरा एक लोकसमूह (लोकायत) आपल्याला बघायचाय. लोकायत एकजिनसी नव्हता. कपुमो चौकटी-बाहेरच्या लोकांचे प्राचीन संदर्भ आपल्याला वैदिक आणि बौद्ध-जैन साहित्यात दिसतात. या संदर्भांवरून, विशेषतः बौद्ध-जैन संदर्भांवरून आपल्याला त्यातले काही प्रवाह समजतात. त्यातले समान सूत्र म्हणजे हे सर्व प्रवाह कपुमो मध्ये बंदिस्त होऊ शकत नाहीत. जसे की: कर्म आणि पाप-पुण्य या संकल्पना नाकारणे (पुराण कश्यप, अक्रियावाद), स्वेच्छा आणि ईश्वरेच्छा नाकारणे (मक्खली घोशाल, नियतीवाद), मरणोत्तर अस्तित्व नाकारणे (अजीत केशकंबल, उच्छेद वाद), भौतिक मूलतत्वांचे अविनाशित्व मानणे (पकुध कच्चायन, शाश्वत-द्रव्य वाद), निश्चित अनुमान किंवा भूमिका नाकारणे (संजय बेलत्तीपुत्त, संशय वाद किंवा अज्ञेय वाद) वगैरे. जर बुद्ध-काल “सामान्य युग पूर्व” (सायुपू, BCE, Before Common Era) पाचव्या-सहाव्या शतकात मानला तर या संदर्भांवरून हे लोकायतचे प्रवाह याच काळाच्या आगे-मागे स्थापित झाले असावेत. लोकायत ही छत्री-संज्ञा (umbrella term) यातील बहुतेक पंथांसाठी नंतर वापरली गेली. यातील मक्खली घोशाल याचा नियतीवाद – जो नंतर आजीवकांशी जोडला गेला – सोडला तर बाकीचे विचार आजच्या भौतिकवादाच्या वेगवेगळ्या छटांशी मेळ खातात. बृहस्पति आणि चार्वाक (चारु वाक् – गोड बोले) यांची नावे लोकायत परंपरेशी जोडली जातात. लोकायतचा उल्लेख महाभारत (शांतिपर्व), मनुस्मृती आणि कौटिलीय अर्थशास्त्र यांत आला आहे. अर्थशास्त्रातील उल्लेखांत लोकायत हे आन्वीक्षिकी (science of inquiry) मानले आहे. त्यामुळे, लोकायत हा भौतिकवाद (materialism) किंवा त्याचा प्रकार असला तरी तो तत्कालीन तर्क-न्याय शास्त्र यांचा वापर करून समजून घेणे अपेक्षित असावे. बाकीचे दोन उल्लेख हे निंदाव्यंजक आहेत. मात्र या उल्लेखांवरून सामान्ययुग (सायु, CE, Common Era) सुरू होण्यापूर्वी लोकायत हा शब्द विचार-प्रणाली या अर्थाने वापरात आला असावा असे अनुमान काढायला जागा आहे. लोकायत प्रणालीची सूत्रबद्ध मांडणी झाल्याचे अवगत नाही. लोकायताची बृहस्पतिसूत्रे ही सायुपू द्वितीय शतकात संकलित झाली असावीत (सं. पातंजल महाभाष्य); पण ही सूत्रे आज उपलब्ध नाहीत.
माधवाचार्य यांचे सर्वदर्शनसंग्रह (सायु चौदावे शतक) यांत लोकायत प्रणालीचे विवरण केले आहे. या ग्रंथात सोळा विश्वास प्रणालींची चर्चा आहे. माधवाचार्यांनी सर्वप्रथम लोकायत खण्डनासाठी घेतले. पण त्यांतील पूर्वपक्ष हा लोकायत प्रणालीचे संपूर्णपणे प्रातिनिधित्व करतो असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ “यावज्जीवेत्सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् | भस्मीभूतस्य देहस्य, पुनरागमनं कुतः ||” या ओळी चंगळवादी वाटतात. पण लोकायतचे अनुयायी चंगळवादी होते असा सरसकट निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. सायुपू पाचव्या-सहाव्या शतकातील अजीत केशकंबल आणि पुराणकश्यप सारखे पंथगुरु हे तापस जीवनशैली जगणारे होते. इतरांवर कमीतकमी अवलंबून राहून आपल्या गरजा कमी केल्यास आपले स्वातंत्र्य अबाधित राहू शकते हा विचार त्यामागे असू शकेल. इतर काही ग्रंथांत शेती, पशुपालन, व्यापार, व्यवस्थापन या सारख्या उपजीवीकांचा वापर करून भौतिक सुखांचा आस्वाद घेण्याचा सल्ला बृहस्पतीच्या नावाने दिला जातो. या खेरीज रामायणातील जाबाली सारखे ऋषी श्रीरामांना नास्तिक मतांचा अवलंब करून राज्याची जबाबदारी स्वीकारण्याचा सल्ला देतात. (आयोध्या कांड, २.१०८.१७). श्रीराम हा सल्ला मानत नाहीत ही गोष्ट वेगळी. मुद्दा हा की लोकायत म्हणजे चंगळवाद हे समीकरण सरसकट लागू पडत नाही.
सर्वदर्शनसंग्रहातील लोकायत फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानते. अनुमान सुद्धा नाही. पंचभूतातील फक्त चार मूलतत्वे मानते, आकाश नाही. जशी मद्य वगैरेंची नशा शरीरात उद्भवते तशीच चेतना शरीरात उद्भवते. वेद म्हणजे कविकल्पना. यज्ञ वगैरे पुरोहितांनी त्यांच्या उपजीविकेसाठी कल्पनेतून निर्माण केलेले विधी असे लोकायत मानते. खेरीज, बौद्ध-जैन ग्रंथांतील सदर्भांवरून लोकायतिक (किंवा तत्सम विचार असलेले चार्वाकादि लोक) मरणोत्तर अस्तित्व मानत नाहीत किंवा कपुमो चौकटच मानत नाहीत हे स्पष्ट आहे. या सर्वाची दखल बाकीच्या विश्वास (श्रद्धा) प्रणेत्यांनी घेतलेली दिसते. अन्यथा सर्वदर्शनसंग्रहात लोकायतिकांना सर्वप्रथम खण्डनासाठी घेतले नसते.
लोकायत सायु बाराव्या शतकानंतर गायब झाले. सर्वदर्शनसंग्रहात (सायु चौदावे शतक) त्याचा उल्लेख, ज्याला आपण शैक्षणिक नोंद (academic record) म्हणतो, त्या स्वरूपाचा आहे. त्यांत लोकायत हा मूर्खांनी अनुसरलेला पंथ असे म्हंटले असले तरी सर्वदर्शनसिद्धांतातील खंडनाच्या स्वरूपात केलेली नोंद एकूणच महत्त्वाची आहे. कारण त्यांतील लोकायताचे तुकडे हे सध्याच्या विज्ञाननिष्ठ भौतिक-वादाशी मिळते-जुळते आहेत. किंबहुना आजचा भौतिकवाद हा लोकायतचा पुनर्जन्म आहे असे म्हणायला हरकत नाही. यातला भाषिक विरोधाभास (oxymoron) हा सुधारकच्या वाचकांच्या लगेच लक्षात येईल.
जर विज्ञाननिष्ठ भौतिकवादाची जुळ्णी आपल्याला लोकायतबरोबर करायची असेल तर आजच्या लोकायताचीसुद्धा काही प्रमाणात पुनर्बांधणी करावी लागेल. त्याला भारतीय प्रमाणशास्त्राची (आस्तिक, नास्तिक) नवीन समन्वयी बैठक द्यावी लागेल. आजचा लोकायतिक फक्त “प्रत्यक्ष” प्रमाणावर विसंबून रहाणार नाही तर तो ज्ञानशास्त्रातील अनुमान, अर्थापत्ती, शब्द वगैरे इतर प्रमाणांचा योग्य वापर करेल. त्याला विज्ञानाची भक्कम बैठक देईल. यासाठी विज्ञानाच्या पदार्थ, जीव, उत्क्रांती, खगोल, गणित या सर्व शाखांचा वापर तो करेल. विज्ञानातील प्रामाण्य हे पुनरावर्ती (iterative) रचनात्मक प्रयोग प्रक्रियेतून होते याचा विसर त्याला पडणार नाही. विज्ञानाच्या मर्यादांचा आधार घेऊन काही प्रति-नास्तिक ‘बुद्धिनिष्ठ अधिरचना’ (Intelligent Design) या सारख्या सिद्धांताची मांडणी करतात. याचे खंडन आजचा लोकायतिक कशाप्रकारे करेल हे दाखवण्याचा प्रयत्न ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या ‘आजचा सुधारक’मधल्या लेखात मी केला आहे. यामध्ये भारतीय तत्त्वपरंपरेतील पूर्व-पक्ष, उत्तर-पक्ष याप्रकारची मांडणी आणि संक्षिप्त प्रमाणचर्चा आहे.
आजचा लोकायतिक (लोकायत अनुयायी) भारतीय परंपरेत वावरेल आणि विचार करेल का? तसा त्याने केला नाही तर तो लोकायतिक या संज्ञेला पात्र होणार नाही. लोकायत हा पंथ आणि त्यांतले आदि-गुरु हे भारतीय उपखण्डात, बहुतांशी बृहत् मगधात (आजचा बिहार, पूर्वांचल) येथे जन्मले आणि वावरले होते. त्यांची जीवनशैली स्थानिक (तापस) होती. ती श्रमण परंपरेतून आली होती. त्यांची भाषा (पाली, मागधी, अर्धमागधी, प्राकृत यापैकी) स्थानिक होती. त्यांचा एकेमेकांशीच नव्हे तर इतर कपुमो प्रणालींबरोबर वाद-संवाद होता. लोकायतचा प्रभाव केवळ बौद्ध-जैन या पंथांवर नव्हे तर सांख्य-योग-वैषेशिक-वेदांत या प्रणालींवरसुद्धा दिसून येतो.. जसे की रचयित्याविना रचना, कर्त्याविना कर्तृत्व, निर्मात्याविना निर्मिती (सृष्टी) याप्रकारची मीमांसा. ही मीमांसा बहुतेक कपुमो प्रणालींत अधिकारीभेद वापरून अत्युच्च पातळीवर शिकवली गेली आहे. वैदिक (ब्राह्मण) आणि श्रमण परंपरा यांतील देवाण-घेवाणींतून कपुमो चौकट तयार झालेली आहे हे याचे कारण असावे. अजातवाद (बौद्ध-माध्यमिक) आणि अजातिवाद (शांकर किंवा गौडपादीय वेदांत) हे श्रमण आणि ब्राह्मण परंपरांच्या समक्रमाचे (isomorphism) आणि समन्वयाचे (syncretism) उदाहरण आहे. ही मीमांसा आणि त्याच बरोबर अजात-अजातिवाद आधुनिक लोकायतिक समजून घेऊ शकेल. लोकायतिक कपुमो प्रणालींवर विश्वास (श्रद्धा) ठेवेल असे अजिबात नाही. पण जर विज्ञान-निष्ठा आणि विवेकवाद भारतीय जनमनात रुजवायचा असेल तर भारतीय परंपरांशी शत्रुत्व घेऊन किंवा त्यांपसून पूर्ण फारकत घेऊन हे होऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात येईल. कपुमो श्रद्धा प्रणालींचे मूळ भारतीय (हिंदू-बौद्ध) जनमानसांत का आणि कसे रुजले याचा विचार एका समाजशास्त्रज्ञाच्या तटस्थ भूमिकेतून तो करू शकेल. यासाठी आधुनिक उत्क्रांतीवादाची (Evolution Theory) मदत तो घेईल. समाजशास्त्रीय उत्क्रांती केवळ जैविक (biological) नसते तर त्याबरोबरीने सांस्कृतिक (cultural), मौलिक-मूल्यात्मक (axiological), आणि दीर्घकालीन प्रक्रियात्मक (developmental) असते याची जाणीव त्याला असेल. सर्वप्रकारच्या उत्क्रांतीसिद्धांतांचा पाया हा अहेतुक (non-teleological) आणि विवेकवादी (rational) असल्यामुळे लोकायत मीमांसा ही त्याच तटस्थ आणि विवेकवादी पायावर उभी राहील. अशा प्रकारचा प्रयत्न मी स्वतः करून पाहिला आहे. (२०१९)
या प्रयत्नात काही गोष्टी लक्षात येतात:
(१) हिंदू-बौद्ध कपुमो अध्यात्मिक परंपरांचे (विश्वास-प्रणाली, श्रद्धा-प्रणाली) पाठ्यकरण हे या परंपरांची केवळ नोंद ठेवणारे नव्हते तर परंपरांतील बदल किंवा परिवर्तन स्थिर झाल्यावर त्यांना सामावून घेणारे होते,
(२) कपुमो परंपरांचा अतिप्राचीन स्तर हा निसर्गपूजक, बहुदेवतावादी आणि सर्वात्मक (pantheist, animist) होता,
(३) कर्मिक मूल्यवाद हा उत्क्रांतीवादाला सुसंगत आहे,
(४) कित्येक हिंदू देव-देवतांचे दैवतीकरण हे मनुकवादाला (memetics) अनुसरून झाले,
(५) उत्तर आणि पश्चिम भारतात दुग्ध-संस्कृती का आणि कशी विकसित झाली याचे विवेचन जनुक-मनुकशास्त्राला (genetics-memetics) अनुसरून करता येते,
(६) सांख्य, वेदांत, माध्यमिक, विज्ञानवाद ही हिंदू-बौद्ध दर्शने समक्रमित (isomorphic) आहेत. ही सर्व दर्शने एकमेकांच्या वाद-संवादातून आणि समन्वयातून (syncretism) विकसित झाली आहेत,
(७) “सर्व जीवसृष्टीचा पूर्वज एक आहे” ही उत्क्रांतीवादातील संकल्पना “वसुधैव कुटुंबकम्” या औपनिषद वचनाशी सुसंगत आहे. तथाकथित कनिष्ठ योनीतील प्राण्यांनासुद्धा हिंदू संस्कृतीत देवत्व दिले गेले आहे. याचाच एक भाग म्हणजे दशावतार मधले कूर्म (कासव) आणि वराह (डुक्कर) हे अवतार वैष्णव परंपरेत समाविष्ट झाले आहेत,
(८) “वसुधैव कुटुंबकम्” या भावनेला छेद देणारे भाग काही स्मृतिग्रंथांत आणि ब्रह्मसूत्रात आहेत (उदा: अपशूद्राधिकरण). याचे खंडन विवेकानंदांसारख्या नवहिंदूंनी आणि आंबेडकरांसारख्या नवबौद्धांनी पूर्वीच केले आहे. उपनिषदांचा आणि तर्काचा आधार घेऊन एक सामान्य लोकायतिकसुद्धा हे खंडन कपुमो चौकटीत शिरून सहज करू शकतो,
(९) वैदिक कपुमो चौकटीत कर्म हे विश्वाची एक अविभाज्य मिती (dimension) या स्वरूपात येते. याचमुळे कर्मिक उत्क्रांती ही सर्व-विश्वाची मौलिक-भौतिक (axio-physical) प्रक्रिया या स्वरूपात पाहता येते,
(१०) न्यायदर्शन वगळता बाकी कोणत्याही असांप्रदायिक दर्शनात सृष्टिनिर्माता (ईश्वर) नाही. असांप्रदायिक कपुमो प्रणालीत ईश्वरप्राप्ती, स्वर्गप्राप्ती वगैरे अंतिम साध्य नाही. मोक्ष (निर्वाण, कैवल्य, मुक्ती वगैरे) हे अंतिम साध्य आहे. ते कपुमो चौकट परिभाषित करत असले तरी अविद्या निवारून, अहंकार नष्ट करून कपुमो चौकटीच्या पलिकडे जात दु:खनिवारण करणे हेच मोक्षरूपी अंतिम साध्य उरते. लोकायतिक कपुमो चौकटीच्या बाहेर राहून दु:खनिवारण म्हणजेच सुखप्राप्तीचा प्रयत्न करतो.
कालचे उपलब्ध लोकायत जरी आज काही प्रमाणात लोकप्रिय होत असले तरी आधुनिक लोकायतिकाला त्याचे अपुरेपण नक्कीच जाणवेल. कपुमो प्रणाली नैतिक मूल्यव्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न करतात. दु:ख निवारण हे त्यांचे एक लक्षण (खर तर लक्ष्य) आहे. त्यांची मूल्यव्यवस्था (पंचयम, पंचशील, पंचव्रत, ज्ञान, साधन-चतुष्ट्य, द्वादशनिदान वगैरे) याच हेतूने बनलेली दिसते. ती किती प्रमाणात यशस्वी होते (किंवा नाही) हा अभ्यासाचा विषय आहे. मात्र उपलब्ध लोकायतामधे (fragments) असा प्रयत्न झालेला दिसत नाही. लोकायत चंगळवादी असेल किंवा नसेल; पण ते अपुरे निश्चित आहे. देवत्व (transcendence), मिथक (myth), नैतिकता (morality), आणि विधी (rites) ही श्रद्धा-प्रणालींची (religion) चार प्रमुख लक्षणे मानली तर लोकायत त्यामध्ये बसत नाही; पण कपुमो प्रणाली बसतात. येथे आपण श्रद्धा = विश्वास हे समीकरण मानले आहे. प्रमुख चार लक्षणांचे प्रकटीकरण कशाप्रकारे होते यावरून श्रद्धा आणि विश्वास यामध्ये फरक करता येतो. त्यावरून पूर्व-मीमांसा वगळता बाकी असांप्रदायिक कपुमो प्रणालींना विश्वास-प्रणाली म्हणता येईल. यामध्येसुद्धा वेदप्रामाण्य मानणाऱ्या प्रणाली (आस्तिक) आणि ते न मानणाऱ्या प्रणाली (नास्तिक) असे म्हणण्याची पद्धत आहे. बहुतेक सर्व शैव, शाक्त, वैष्णव सांप्रदायिक प्रणालींना श्रद्धा-प्रणाली म्हणायची पद्धत आहे. यामध्ये काश्मीर शैव आणि तंत्र प्रणाली यांना खरे तर विश्वास-प्रणाली म्हणणे योग्य ठरेल, पण त्या खोलात इथे जाण्याची आवश्यकता नाही.
सर्व श्रद्धा-प्रणालींचे ढोबळ वर्गीकरण करायचे झालेच तर ते दोन प्रकारांत करता येईल:
(१) स्थानिक श्रद्धा, परंपरा आणि विधी यांनी बांधल्या गेलेल्या, “संदेश” विरहीत, धर्मांतरण आणि परिवर्तन यासाठी अनुत्सुक अशा प्रणाली ज्यांना आपण प्राथमिक श्रद्धा-प्रणाली म्हणू. बहुतांशी हिन्दू-वैदिक, जैन, आणि थेरवादी (बौद्ध) कपुमो प्रणाली – त्यांची दर्शने वगळून – या वर्गात येतील,
(२) वैश्विक प्रणाली बनण्याची इच्छा असणाऱ्या, संदेश देणाऱ्या, त्या संदेशाबद्दल आग्रही असणाऱ्या, त्या आग्रहाचा भाग म्हणून मतप्रसार करणाऱ्या श्रद्धा-प्रणाली या दुसऱ्या वर्गात येतात. जगभर पसरलेल्या इस्लाम (एकेश्वरवाद), महायान बौद्ध (सम्यक् व्यवहार) आणि ख्रिस्ती (येशूद्वारे ईश्वराचे प्रेम) श्रद्धा-प्रणाली या वर्गात बसतील. धर्मप्रसार हे या प्रणालींचे व्यवच्छेदक लक्षण. म्हणून आपण त्यांना धर्मप्रसारक प्रणाली म्हणू.
महायान वगळता या प्रणालींनी आपापसात आणि इतरांबरोबर धर्मप्रसारासाठी भरपूर हिंसा केल्याचा इतिहास आहे. कपुमो प्रणालींनी आपापसात भांडणे केली पण धर्मप्रसारक मंडळींनी केलेल्या युद्धांच्या तुलनेत ही भांडणे म्हणजे चहाच्या कपातली वादळे होती. लोकायत हा कपुमो प्रणालींचा भाग नव्हता. पण कपुमो अनुयायांनी त्यांच्या विरुद्ध हिंसा केल्याचे पुरावे नाहीत. लोकायत बाराव्या शतकानंतर नाहिसा झाला. ईश्वर न मानणाऱ्या लोकांचे तेव्हां आजच्यापेक्षा कठीण असावे. त्यांना संस्थात्मक आधार नव्हता. राजाश्रय नव्हता. नालंदा सारख्या विद्यापीठात असलेली मुक्त विचारांची परंपरा इस्लामच्या आक्रमणानंतर नष्ट झाली होती. दैनिक संस्कार आणि विधींचा अभाव, तसेच प्रणालीला आधार आणि संदर्भ देणार्या ग्रंथसंपदेचा अभाव या कारणांमुळे लोकायत इतिहास जमा झाला.
आता मूळ प्रश्नाकडे वळू! दु:खनिवारण हा कपुमो प्रणालींचा मुख्य हेतू आहे. लोकायत किंवा लोकायतिकांना अमान्य असलेल्या कपुमो प्रणाली आणि धर्म-प्रसारक प्रणाली, यांनी दु:ख निवरण केले का? लोकायतिकांनी दु:ख निवारणाऐवजी सुखप्राप्तीवर भर दिला. त्यांत आक्षेप घेण्यासारखे काही नाही. मरणोत्तर आपले काय होते याचा विचार करत बसण्याऐवजी शेती, व्यापार आणि व्यवस्थापन यांसारख्या भौतिक मार्गांचा वापर करून ऐहिक सुखे मिळवावीत असा हा साधासरळ विचार होता. पण शारीरिक आणि भौतिक सुखाच्या पलीकडे सुखाच्या आणि दु:खाच्या मानसिक भावना असतात. त्याचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींकडूनच त्या व्यक्त होऊ शकतात. आजसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण करणाऱ्या संघटना किंवा संस्था मध्ययुगीन काळात नव्हत्या. राष्ट्रीय समूहमनाचा आनंदांक (nation-wide happiness index) ही संकल्पना तेव्हा असण्याची शक्यता नव्हती.
गेली कित्येक वर्षे एक “जागतिक आनंद अहवाल” (WHR: World Happiness Report) संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने दरवर्षी प्रसिद्ध होतो. त्यातली विदा (data) Gallop Analytics नावाची संस्था गोळा करते. त्यांत चालू वर्षाचा तसेच विगत तीन वर्षांचा असे दोन प्रकारचे आनंदांक सरासरी काढून प्रत्येक वर्षी प्रसिद्ध केले जातात. यासाठी सामाजिक आधार, दरडोई उत्पन्न, आयुर्मान, स्वातंत्र्य, औदार्य, भ्रष्टाचार, असामनता असे निकष वापरले जातात. यातले उत्पन्न आणि आयुर्मान वगळता बाकीचे निकष भावात्मक (perceptional) आहेत. यातले भावांक (सूचकांक) हे श्रेणी (country rank) आणि अनुभवांचे गुणात्मक मूल्यमापन (life evaluation on १ -१० scale) या स्वरूपाचे असतात. मार्च २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात २०२४ चे सूचकांक आहेत. तसेच प्रत्येक वर्षी विगत वर्षांचे सूचकांक प्रकाशित झाले आहेत. (पहा, WHR चे आंतर्जाल स्थल). खालील तक्ता २०११ – २०२४ या कालखंडासाठी आहे. यात फक्त काही घटकांचे सूचकांक दिलेले आहेत.
वर्ष | भारताची सरासरी श्रेणी | स्वातंत्र्य-श्रेणी | असमानता-श्रेणी | अनुभव-मूल्य |
२०२४ | ११८ | २३ | ११८ | ४.३८९ |
२०२३ | १२६ | २९ | १०८ | ४.०५४ |
२०२२ | १२४ | २७ | १२४ | ४.०३६ |
२०२१ | १३६ | ३३ | १०६ | ३.७७७ |
२०२० | १३९ | २५ | ११० | ३.८१९ |
२०१९ | १४४ | ४८ | १२० | ३.५७३ |
२०१८ | १४० | २९ | ७३ | ४.०१५ |
२०१७ | १३३ | ३६ | २१ | ४.१९० |
२०१६ | १२२ | ५५ | २५ | ४.३१५ |
२०१५ | ११८ | ६९ | ७४ | ४.४०४ |
२०१४ | ११७ | ४७ | १०६ | ४.५६५ |
२०१३ | १०३ | ६६ | ८६ | – |
२०१२ | १११ | १०३ | १०३ | ४.७७२ |
२०११ | ९४ | ४० | ४८ | ४.९७५ |
या सूचकांकामध्ये वर-वर काही विसंगती आढळतात:
(१) जर २०११ ते २०१४ चे श्रेणी-सूचकांक तुलनेने चांगले होते तर तेव्हांचे UPA सरकार २०१४ ची लोकसभेची निवडणूक प्रचंड फरकाने का हरले? नंतरचे सूचकांक तुलनेने चांगले नसले तरी २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका विरोधक का जिंकू शकले नाहीत?
(२) २०२४-२५ मध्ये नेपाळचा सरासरी श्रेणी सूचकांक भारताच्या तुलनेत खूप चांगला होता (९२ वि. ११८) तरी नेपाळचे सरकार असंतोषामुळे पत्त्यासारखे कोसळले. नेपाळचा सूचकांक किंवा अनुभवांक यामध्ये याची कोणतीही खूण का दिसली नाही?
(३) असमानता सूचकांकामध्ये २०१५-१८ आणि त्या आधी २०११ या वर्षांत फार मोठे बदल झालेले दिसतात. या सर्व वर्षांत असमानता लक्षणीय कमी झालेली दिसते. हे सर्व सूचकांक जरी भावात्म (perceptional) असले तरी याचे कारण पाहिले पाहिजे. या वर्षीचा WHR मधील असमानता सूचकांक आणि जागतिक अधिकोषाचा (WB: World Bank) जिनी सूचकांक (Gini Index) यांचा मेळ बसत नाही. जिनी सूचकांक “उपभोक्ता असामनतेचा” आहे, उत्पन्न असामनतेचा नाही हे जरी खरे मानले तरी भारताची उपभोक्ता असमानता ही लक्षणीय कमी आहे हे मानावे लागते! ही उपभोगाच्या सांख्यिकीवर आधारलेली असमानता २०११,२०१५-१०१८ च्या WHR च्या उत्पन्नावर आधारित भावात्म सूचकांकाचे एक प्रकारे समर्थन करते. उपभोगाची विदा (data) ही त्या त्या सरकारकडूनच घेतलेली असते हे सांगितले पाहिजे.
(४) या तक्त्यातील एक वर-वर (prima facie) विसंगत वाटणारा भावांक म्हणजे स्वातंत्र्य सूचकांक. गेली पांच वर्षे आपण “सध्या अघोषित आणीबाणी आहे” असा घोष ऐकतो. पण मागल्या पांच वर्षातला स्वातंत्र्य-सूचकांक हा गेल्या १५ वर्षांतला भारताचा सर्वोत्तम सूचकांक दिसतोय! एवढेच नव्हे; हा सूचकांक काही अतिउदारमतवादी समजल्या जाणाऱ्या नेदरलॅंड (हॉंलंड) सारख्या पहिल्या पांचांत असलेल्या देशाच्या स्वातंत्र्य-सूचकांकापेक्षा आणि पहिल्या पंधरामध्ये असलेल्या कित्येक देशांच्या स्वातंत्र्य-सूचकांकापेक्षा चांगला आहे. दोऩ्हीं संसदेने पारित केलेले शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आंदोलनानंतर मागे घेणाऱ्या सरकारला स्वातंत्र्याची सर्वोच्च श्रेणी द्यायला हरकत नसावी! मग “अघोषित आणीबाणीचे” काय? तर ती राजकारणासाठी बनवलेली प्रचार-कथा (narrative) होती. लोकांचा या कथेवर फारसा विश्वास बसलेला दिसला नाही. “घोषित आणीबाणी” (१९७५-७७) ज्यांनी अनुभवली आहे त्यांचा विश्वास तर या कथेवर नक्कीच बसणार नाही. (विद्यार्थीदशेत मी स्वतः आणीबाणीविरुद्ध सत्याग्रहात भाग घेतला होता). विगत पांच वर्षांची तुलना १९७२-७७ या वर्षांबरोबर करणे निरर्थक आहे.
आता (१) आणि (२) या प्रश्नांकडे पुन्हा येऊ. पाने का सडली? घोडा का अडला? भाकरी का करपली? याला एकच ढोबळ उत्तर म्हणजे “न फिरवल्याने”. पण हे उत्तर वरील संदर्भात तितकेसे खरे नाही. साम्यवादाच्या पराभवानंतर जगभरात होणारा प्रतिमान बदल (paradigm shift) हे एक कारण असू शकते. भारतात हा बदल मोदी-युगाच्या स्वरूपात झाला. लोकांना २६/११ च्या आतंकवादी हल्ल्याच्या सूत्रधारांविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई करू न शकणारा दुबळा पंतप्रधान नको होता. लोकांना सभ्य, सुसंस्कृत, विद्वान, .. पण, स्वतःचा जनाधार नसलेला, कठपुतळी पंतप्रधान नको होता. लोकांना भारताच्या साधन-संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे म्हणणारा पंतप्रधान नको होता. लोकांना ५६” छातीची जाहिरात झालेला, लोकांमधून निवडून आलेला आणि पाकिस्तानला धडा शिकवू अशी भाषा बोलणारा पंतप्रधान हवा होता, तो त्यांना २०१४ ला मोदींच्या रूपाने मिळाला. मग मोदींनी सर्जिकल स्ट्राइक केले, नोटबंदी केली, राम मंदिराच्या न्यायालयीन प्रक्रियेला गती दिली, DBT वापरून कोट्यवधी लाभार्थीं निर्माण केले आणि २०१९ ची निवडणूक अधिक मोठ्या बहुमताने पुऩ्हा जिंकली. हे दोऩ्हीं विजय ऐतिहासिक होते. त्याचे आकलन WHR च्या आकड्यांनी होणार नाही. बदलणारे प्रतिमान सूचकांकात परिवर्तित होईलच असे नाही. त्यासाठी प्रतिमान कसे घडते हे समजून घ्यावे लागेल. २०१४ नंतरचा राजकारणातला बदल हा भूस्तरांचा बदल (tectonic shift) होता. २०१९ च्या विजयानंतर पुन्हा मोठे निर्णय घेतले गेले. कलम ३७० रद्द झाले. तीन तलाक वर बंदी आली. राम-मंदिर न्यास स्थापन झाला. UAPA सुधार आला. उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर झाले. हे सर्व विषय भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात होते. भाजपच्या बहुसंख्य मतदारांना आणि कार्यकर्त्यांना हे सर्व हवे होते. यांतून मोदी-भाजप यांच्या २०२४ विजयाची निश्चिती झाली. पण हा विजय संपूर्ण बहुमताचा नव्हता. त्याची चाहूल WHR च्या सूचकांकात लागते. तरीही हा विजय बदललेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रतिमानाची पुष्टी करतो. याला विरोध करणारे अनेक प्रवाह भारतात आहेत. ते प्रादेशिक आहेत तसे आंतरराष्ट्रीय पण आहेत. एक प्रकारे, आजचा संघर्ष हा आंतरराष्ट्रवाद, प्रति-राष्ट्रवाद (internationalism, anti-nationalism) वि. सांस्कृतिक राष्ट्रवाद (cultural nationalism) वि. सांस्कृतिक-भाषिक प्रांतवाद (cultural, linguistic regionalism) असा आहे. या प्रकारच्या खेचाताणीत कित्येक देशांचे आणि काही बहुदेशिक संघटनांचे विभाजन झाल्याचे आपण पाहिले आहे. भारताचे प्रजातंत्र आणि संविधान या बबतीत पुरेसे लवचिक (federal, संघीय) आहे आणि त्याच बरोबर खंबीर (unitary, एकात्म) आहे. भारताच्या संविधानाचा कल मात्र एकात्मतेकडे आहे हे आपण (म्हणजेच आधुनिक लोकायतिकांनी) लक्षात ठेवायला हवे. घटनाकारांनी हे दूरदृष्टीने जाणीवपूर्वक केले आहे.
नेपाळचा प्रश्न वेगळा आहे. पूर्वीची हिंदू राजेशाही असलेल्या या देशाचा २१व्या शतकातला प्रवास पहा: राज-घराण्यात अंतर्गत शिरकाण (२००१), माओवादी आणि बंडखोर गट यांचे उठाव आणि गृहयुद्ध (२००१-२००६), त्यानंतर झालेला शांतता करार (२००६), अंतरिम धर्मनिरपेक्ष संविधान (२००७), राजेशाहीचे उच्चाटन, नेपाळचे लोकशाही संघीय प्रजासत्ताकात रूपांतर (२००८), त्यानुसार नवीन घटना (२०१५), मधेशी आंदोलन (२०१५), पहिली निवडणूक आणि कम्युनिस्ट संयुक्त सरकार (२०१७), अस्थिर सरकारे आणि पुऩ्हा निवडणूक (२०२२), अस्थिरता कायम, जी आजतागायत सुरू आहे. नेहमीचा भ्रष्टाचार, भाईभतीजेवाद. पुऩ्हा उठाव, हिंसा, जाळपोळ आणि सरकार कोसळणे. सुशीला कर्की अंतरिम पंतप्रधान होतात (१२ सप्टेंबर २०२५). या सर्व गदारोळात भारतापेक्षा (११८) नेपाळला (९२) वरची श्रेणी देणाऱ्या WHR सूचकांकाचा काय अर्थ लावायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
लोकायतचा एक अर्थ ‘लोकांना पसंत असलेले’ असा आहे. या अर्थाने लोकशाहीत राज्यकर्त्यांना लोकायतिक व्हावे लागते. लोकांसाठी श्रेयस काय आणि प्रेयस काय याचे भान ठेवावे लागते. हे करतांना निवडणुकांना सामोरे जावे लागते. त्यासाठी पैसा लागतो. त्यासाठी सत्ता लागते. या दुष्टचक्रातून जातांना आपले हात आणि कपडे कमीतकमी घाण होतील याची काळजी घ्यावी लागते. ही तारेवरची कसरत आहे. ही कसरत करतांना मूल्यव्यवस्था पक्की हवी. कपुमो चौकटीत ती करण्याचा प्रयत्न झाला. कालच्या लोकायितांकडे ती होती का याची कल्पना नाही. पण आधुनिक राज्यकर्त्या लोकायितांकडे ती असणे आवश्यक आहे.
माझ्या वरील लेखात सर्वदर्शनसिद्धांतसंग्रह या माधवाचार्य (चौदावे शतक) यांच्या ग्रथाचा उल्लेख आला आहे. हा ग्रंथ खंडनमंडनात्मक नसून संक्षिप्त विवरणात्मक आहे. त्यामुळे या ग्रंथाचा संदर्भ देताना मी वापरलेले खंडनाचे विभक्ती प्रत्यय हे विवरणाचे आहेत असे मानावे.
माधवाचार्यांचा हा ग्रंथ ‘ सर्वदर्शनसंग्रह ‘ होय. विरणात्मक आणि खंडन-मंडणात्मक असे त्या ग्रंथाचे ‘दुहेरी’ रूप आहे. तरी जे विवरण आहे, ते प्रामाणिकपणे केले आहे, असे दिसते.
आपण लिहिले आहे , ” माधवाचार्यांनी सर्वप्रथम लोकायत खण्डनासाठी घेतले. पण त्यांतील पूर्वपक्ष हा लोकायत प्रणालीचे संपूर्णपणे प्रातिनिधित्व करतो असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ “यावज्जीवेत्सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् | भस्मीभूतस्य देहस्य, पुनरागमनं कुतः ||” या ओळी चंगळवादी वाटतात. ”
याविषयी थोडा खुलासा केला पाहिजे. :
सर्वदर्शनसंग्रहात चार्वाक दर्शनाच्या विवरणात ‘यावज्जीवेत्सुखं जीवेत् ‘ हा प्रसिद्ध श्लोक दोनदा आलेला आहे. प्रारंभी सर्व लोक ह्या ‘लोकगाथेत’ सांगितल्याप्रमाणे वागतात हे दाखविणारा आणि शेवटी बृहस्पतीचा म्हणून उद्धृत झालेला एक श्लोक आहे. आपण येथे ‘ उदाहरणार्थ ‘ म्हणून जो दिला आहे तो बृहस्पतीचा आहे. तो ‘शेवटी’ येतो.
माधवाचार्यांनी दोन ठिकाणी केलेल्या उल्लेखापैकी पहिल्या ठिकाणी द्वितीय चरणाचा पाठ ” *नास्ति मृत्योरगोचर* : ” असा आहे ; तर दुसऱ्या ठिकाणी ” ऋण कृत्वा धृतं पिब्बेत” या स्वरूपात तो आढळतो.
प्रारंभीचाच पाठ मुळचा असला पाहिजे. तो संपूर्ण पाठ असा :
” यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचर:
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत: ? ”
( अर्थ : जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सुखाचा उपभोग घेत रहावे ; शेवटी मृत्यूच्या पाशात सापडत नाही असा कोणताही प्राणी नाही ; चितेवर भस्म झालेल्या देहाचे पुन्हा उज्जीवन कुठून होणार ?)
तेव्हा चार्वाकांनी विचारलेल्या ‘ भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत : ? ” ह्या प्रश्नाची संगती वरील पाठाने अधिक चांगली लागते , तशी ” ऋणं कृत्वां घृतं पिबेत्” ह्या दुसऱ्या पाठाने लागत नाही.
जयंताने लिहिलेल्या न्यायमंजरीत “नास्ति मृत्योरगोचर: ” असाच पाठ आहे.
गुणरत्नाने ” तावद्वैषयिकं सुखम् ” असा पाठ दिला आहे. तेव्हा , गुणरत्नाचा आणि आपण उदाहरण म्हणून दिलेला बृहस्पतीचा “ऋण कृत्वा धृतं पिब्बेत” हे पाठ मागाहून *विशिष्ट हेतूने* बदलेले दिसतात. चार्वाकमताची टिंगल करण्याचाही रोख त्यात दिसतो.परिमाणत: त्यामुळे चार्वाकदर्शन उथळ आहे, असा एखाद्याचा (गैर)समज झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने असेच आजवर झाले आहे. मग ते ‘चंगळवादी’ वाटले तर काय नवल ? (काही अभ्यासक वगळता ) स्वतःला चार्वाकमताचे म्हणविणारे कितीतरी जण नेमका हाच श्लोक चार्वाकाचा म्हणून उद्धृत करतात , असे दिसते.
खरंतर, ” ऋण ” ” धृतं ” ह्यासारखे शब्द पाहता कर्मकांडप्रधान पूर्वमीमांसा दर्शनाशी त्यांचा जवळचा संबंध दिसतो.
उलट ” नास्ति मृत्योरगोचर : ” ह्यामुळे चार्वाक किती सुसंगत व तर्कशुध्द युक्तिवाद करीत होते, हे दिसून येते.
आता , हा पाठ ज्यात आहे तो ‘चार्वाक दर्शन’ विभागातला पहिलाच श्लोक आहे. तो माधवाचार्यांनी आपल्या सर्वदर्शनसंग्रहात सुरूवातीलाच दिला आहे.
तेव्हा, श्री. पडळकरांना विनंती की , आपण कृपया पुन्हा ‘ सर्वदर्शनसंग्रहातील ‘ हा पहिला श्लोक बघायला हरकत नाही. त्यामुळे
” यावज्जीवं सुखं ” हे प्रकरण वेगळे वळण घेऊ शकेल.त्यामुळे चार्वाकास न्याय देण्यास थोडा हातभार लागू शकेल.
आपल्या लेखासाठी धन्यवाद आणि आभार.