जणूचा प्रवास

कोमल गौतम २०२४ पासून लर्निंग कंपॅनिअन्सच्या चक्रीघाट सेंटरवर टीचिंग फेलो म्हणून काम करते. नागपूर जिल्ह्यातील खेतापूर या छोट्याश्या गावातून आलेल्या कोमलने डी.एड. करीत असतानाच गावाजवळील शाळेत लहान मुलांना शिकवणे सुरू केले होते. परंतु तिथे खूप अडचणी येत होत्या. मोकळेपणाने काम करणे शक्य होत नव्हते. मुले तर मोकळेपणाने शिकू शकत नव्हतीच, ती स्वतःही नवे काही शिकते आहे का, पुढे जात आहे का, हे पाहू शकत नव्हती. दरम्यान, लर्निंग कंपॅनिअन्सच्या फेलोशिप अंतर्गत तिची निवड झाली.
‘लर्निंग कंपॅनिअन्स’ भटक्या पशुपालक भरवाड समुदायातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात. गुजरातमधून स्थलांतरित झालेली सुमारे ४००० कुटुंबे नागपूर जिल्ह्यात जंगलालगतच्या सुमारे ८० पाड्यांमध्ये राहतात. हा समुदाय नागपूर शहराला दररोज जवळपास १,००,००० लिटर दुधाचा पुरवठा करतो. वर्षातील ६–८ महिने स्थलांतर, परकी भाषा आणि शाळेपासूनचे अंतर ह्यांमुळे समूहातील मुले शिक्षणापासून तुटलेली आहेत. ही अडचण ओळखून समुदायाधारित, स्थलांतराशी अनुकूल अशी शिकण्याची रचना उभी करण्याचा प्रयत्न लर्निंग कम्पॅनियन्स मागील ४-५ वर्षांपासून करीत आहेत. सध्या भरवाड समुदायाच्या ५ वस्त्यांमध्ये सुमारे २०० मुलांसोबत त्यांचे शिक्षणाचे काम चालू आहे.

भरवाड समुदायाच्या स्थलांतराच्या काळात त्यांच्यासोबत कोमलने अनुभवलेल्या क्षणांचे हे टिपण.

एक झोपडी, एक स्वप्न

जणूताईचा बेडा चंद्रपूरच्या दिशेने निघाला होता. रात्री त्यांनी २२ मैलावरील गावाजवळ एका शेतात मुक्काम केला. सकाळी समोर चंद्रपूरच्या दिशेने निघायचे होते. सकाळी जणूताई बंडी आवरत होती. पुढच्या प्रवासाला निघायची सुरुवात झाली. पण तितक्यात अजयदादा सांगत आले, “तीन गायींना ताप आहे.” पुढचा प्रवास अजून ४०–५० किलोमीटरचा होता. सगळे विचारात पडले. इथेच थांबलो तर ५०-६० गायींचा चारा कुठून आणायचा? आणि निघायचे तर, तीन आजारी गायी घेऊन प्रवास कसा करणार?

भरवाड समाजाचे जीवन म्हणजे गायी आणि त्यांच्या चाऱ्यासाठी वर्षभराची भटकंती. दरवर्षी पूर्ण पावसाळा जणूताईचे कुटुंब आणि पूर्ण बेडा नागपूरपासून साधारण ४० किलोमीटर दूर चक्रीघाट बेड्यावर थांबतो. बेडा म्हणजे १०-१५-२० भरवाड कुटुंबांची एकत्र वस्ती. पावसाळ्यात आसपासच्या जंगलात चारा मिळतो. त्याच्या आधाराने साधारण ४-५ महिने ते चक्रीघाट परिसरात थांबतात. पावसाळा संपला की लवकरच इथला आसपासचा चारादेखील संपतो आणि चाऱ्याच्या शोधात पुन्हा प्रवास सुरू होतो. प्रवास चालू असताना ते जागोजागी शेतांमध्ये डेरे टाकतात. जणूताईचे कुटुंब म्हणजे दोन मुले – वालू (१४), जयेश (१०), आणि एक मुलगी हिरू (८), जणूताईंचे पती गोविंददादा आणि त्यांचे वृद्ध सासरे. बेड्यावरून झोपडी काढून, सामान आवरून झाल्यावर गोविंददादा आणि वालू गायी घेऊन चरायला गेले. जणूताईने झोपडीतले गरजेचे सामान बंडीत भरले आणि बाकीचे सामान बेड्याजवळील हेटी गावात भाड्यावर घेतलेल्या एका खोलीमध्ये नेऊन ठेवले. ती खोली खास बेड्याचे सामान ठेवण्यासाठी केलेली आहे. बेड्यावरील सगळी कामे आटोपली आणि जणूताई बंडी चालवायला बसली. हिरू आणि जयेशही ताईंबरोबर बसले. त्यांच्याचप्रमाणे त्यांच्या बेड्यातले इतर कुटुंबेदेखील डेरे घेऊन निघाले. सायंकाळी सगळे एकत्र २२ मैलावरील शेतात पोहोचले. जणूताईसुद्धा बंडी घेऊन तिथे पोहचली. वालू आणि त्याचे वडील गायी घेऊन आले. सगळे आपापल्या कामात गुंतले. तिकडे लाईट नव्हता म्हणून जणूताईला संध्याकाळी लवकर स्वयंपाक करावा लागला. हिरू तिची थोडीफार मदत करत होती. बाकीजण गायींची दुवारी (दूध काढणे) करत होते. सर्व काम झाल्यावर सर्वानी जेवण केले आणि सगळे थकलेले असल्यामुळे लवकर झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना डेरे घेऊन चंद्रपूरकडे निघायचे होते. जणूताई आपल्या कामाला लागली. त्यांनी गायीची दुवारी केली आणि स्वयंपाकाला लागल्या. तेवढ्यात अजयदादा सांगत आले की ३ गायींची तब्येत खराब दिसत आहे. जणूताई, गोविंददादा विचारात पडले. त्यांना समोर अजून ४०-५० किलोमीटर चालायचं होते, त्यामुळे तीन आजारी गायींना घेऊन चालू शकले नसते. जणूताई म्हणाली, “इथेच थांबायचे का? पण थांबलो तर ५०-६० गायींचा चारा कुठून आणायचा?” तेव्हा गोविंददादांनी विचार केला की जास्त दूर न जाता जवळच्याच शेतामध्ये दोन दिवस थांबायचे. पण दोन दिवस थांबण्यासाठी शेत मिळेल का? शेतात डेरा टाकायचा असेल तर आधी शेतकऱ्यांकडून परवानगी मागावी लागते. वेळेवर लोक तयार होत नाहीत, त्यासाठी खूप समजवावे लागते.

तेव्हा जणूताईचा मुलगा जयेशने त्यांच्याकडे पाहत विचारले, “માં, ગાયીઓ સારી થઈ જશે ને?” (आई, गायी बऱ्या होतील ना?) त्या एका वाक्याने जणूताईंचे मन भरून आले. काहीतरी उपाय शोधावाच लागणार होता. त्यांनी गोविंददादाला म्हटले, “ગામમાં કોઈ ઓળખીતાં બળદધારક સાથે વાત કરી જુઓ.” (गावात एखाद्या ओळखीच्या बैलधारकांशी बोलून बघा.) गोविंददादा गावात गेले आणि एका ओळखीच्या व्यक्तीशी बोलले. त्यांनी सांगितलं, “धानाच्या शेतात कापणी झाली आहे. दोन दिवस गायी तिथे ठेवू शकशील, पण शेतकऱ्यांची परवानगी लागेल.” गोविंददादा लगेच शेतकऱ्याकडे गेले. सुरुवातीला शेतकऱ्याने, “तुम्ही फिरते लोक, रोज नवी जागा. चुकून गायी पिकात घुसल्या तर नुकसान होईल. तसे होणार नाही, ह्याची खात्री कशी देणार?” असे म्हणून नकार दिला. पण गोविंददादांनी समजवण्याचा प्रयत्न केला, “मेरी गायें मेरे बच्चों जैसी हैं। मैं उन्हें ऐसे नहीं छोड़ूँगा। मेरी तीन गायों को बुखार आया है। अगर उन्हें आगे ले गए तो वे और बीमार पड़ जाएँगी। अगर उनको कुछ हो गया तो हमारा बहुत नुकसान होगा। उन गायों को आराम और इलाज की ज़रूरत है। जब वे ठीक हो जाएँगी, तब हम जगह छोड़कर निकलेंगे।”

तरीही शेतकरी मानायला तयार नव्हते. नंतर गोविंददादा म्हणाले, “हमारी गैया का गोबर आपके खेत में ही रहेगा। उससे आपकी खेती में अच्छी फसल आयेगी। आपका नुकसान नहीं होगा। कुछ भी करके इतनी मदद कीजिये।” पोटतिडीकेने केलेली ही विनवणी आणि त्यांचा निर्धार पाहून शेवटी शेतकऱ्यांने  कसाबसा होकार दिला. मात्र एक अट घातली, “गायी कुठेही सोडून ठेवायच्या नाहीत, माझ्या शेतीचे नुकसान नाही झाले पाहिजे.” गोविंददादा हसून म्हणाले, “मेरी गाय मेरे बच्चों जैसी हैं – मैं यूं ही उन्हें नहीं छोड़ूंगा.” त्यांना त्या शेतात राहण्यासाठी जागा मिळाली. सगळे आपले डेरे घेऊन दुपारपर्यंत जवळच्या शेतात गेले. त्यांना आता त्यांच्या ३ गायींकडे लक्ष द्यायचे होते. जणूताईंनी गायींना झाडाखाली बांधले. दर काही वेळाने गरम पाणी पाजले. दर थोड्या वेळाने तुळस, अद्रक आणि हळदीचे कोमट पाणी दिले. गोविंददादांनी त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना बोलावले. डॉक्टर सायंकाळपर्यंत २२ मैलाला पोहोचले. गोविंददादा त्यांना घ्यायला तेथे गेले. डॉक्टरांनी गायींना तपासले आणि गायींना Antibiotics ची इंजेक्शने दिली. वालू आणि जयेश गावातून पाणी भरून आणत होती. जणूताई त्यांना म्हणाली, “અપણે મુસાફરી શરૂ તો કરવી જ છે… પણ ગાયો સાથે લઈને જ.” (आपल्याला प्रवास सुरू करायचाच आहे. पण गायींना घेऊनच.) दोन दिवस त्यांनी गायींमागे खूप मेहनत घेतली. हिरु छोटी-छोटी गवताची झुडुपे हलवून गायींच्या अंगावर टाकायची. गायींची डोळे बारीक झाले होते. जणूताई गायींच्या डोळ्यांत पाहून म्हणाली, “તમે સારાં તો થવાના જ છો.” (तुम्ही बऱ्या तर होणारच.)

दोनच दिवसांनी गायी उभ्या राहिल्या. त्यांच्या नजरेत पुन्हा ताकद आली. सगळे आनंदी झाले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा बंडी आवरली. त्या शेतामधून निघून पुढचा प्रवास सुरू केला. गोविंददादा गायी घेऊन निघाले आणि जणूताई बंडी घेऊन निघाली. गोविंददादा पुढे जाऊन आधीच गावातील लोकांना शेतात डेरे टाकण्याची परवानगी घेत जातात. तेव्हा जयेश विचारतो, “મા, આપણે પહોંચશું ને?” (माँ, हम पहुंचेंगे ना?) जणूताई हसून म्हणतात, “હા રે બેટા, પહોંચશું.” (हां रे बेटा, पहुंचेंगे.)

भरवाड असे रोज एकेक मैल पुढे जातात, आपल्या गायी आणि आपले कुटुंब सांभाळण्यासाठी. त्यांचे संपूर्ण जीवनच एक सुंदर प्रवास आहे.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.