ग्रामीण बँकेची कथा – अखेर काळ आमच्या बाजूने होता ! 

बांगलादेश निर्मितीची ५३वी वर्षगाठ नुकतीच झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्या धाडसी निर्णयाने आणि सॅम माणेकशॉ ह्यांच्या लष्करी नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तान हा स्वतंत्र बांगलादेश म्हणून अस्तित्वात आला. तेथील जुलमी राजवटीविरोधात झालेल्या अलीकडील जन-विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना ह्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. ग्रामीण बँक संकल्पनेचे जनक मोहम्मद युनूस हे प्रमुख सल्लागार म्हणून आंदोलकांना मार्गदर्शन करीत आहेत. निम्न आर्थिक स्तरावरील स्त्रियांसाठी रोजगानिर्मिती करून देणाऱ्या त्यांच्या ग्रामीण बँक प्रकल्पाबद्दल त्यांना २००६ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता.

मोहम्मद युनूस ह्यांची ‘Banker To The Poor ही ‘ग्रामीण बँक’ चळवळीची गोष्ट सामाजिक चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने वाचलीच पाहिजे अशी आहे. त्यांना होत असलेला मुल्ला मौलवींचा विरोध आणि आपल्याला होणारा सनातन धर्म आणि तत्सम संघटनांचा विरोध दोन्हींची जातकुळी एकच आहे.

जगातील दारिद्र्य संपविण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रा. युनूस ह्यांची कार्यशैली कुठल्याही इतर चळवळींना उपयोगाची ठरू शकते. प्रस्थापितांकडून, बड्या धेंडांकडून वा धार्मिक नेत्यांकडून कितीही विरोध झाला तरी हिंसात्मक प्रतिकार त्यांनी वर्ज्य मानला. ज्यांच्यासाठी काम करायचे, त्यांच्यात मिसळून जाण्याची त्यांची पद्धत चळवळीला पोषक ठरली. नियम, तत्त्व, वैचारिक भूमिका ह्या सर्वांपेक्षा ज्यांच्यासाठी हे सारे करायचे त्यांच्यातील गुंतवणुकीला ते झुकते माप देतात. दारिद्र्यरेषेखालील पीडित महिलांच्या सुप्त कर्तृत्वावरचा त्यांचा दुर्दम्य विश्वासच त्यांना घवघवीत यश देऊन गेला. बाह्य मदतीच्या ओघाची त्यांना गरज भासली नाही.

त्यांच्या कार्यशैलीची ही एक छोटीशी झलक, त्यांच्याच शब्दांत !

अखेर काळ आमच्या बाजूने होता!
बरेचवेळा आम्हीं एखाद्या खेड्यात नव्याने काम सुरू केले की गावातले मुल्ला-मौलवी आम्हाला जोरदार विरोध करीत असत. ग्रामीण बँकेतून कर्ज घेणारी बाई ही स्त्रियांसाठी निषिद्ध असलेल्या पुरुषांच्या क्षेत्रात अधिक्षेप करते, असे सांगून गरीब, भोळ्या लोकांना ते घाबरवीत असत. ह्याबद्दलची शिक्षा म्हणून तिला तिच्या मृत्यूनंतर दफनासाठीच्या पवित्र भूमीला व धार्मिक अंत्यविधीला मुकावे लागेल, असे सांगितले जाई. आधीच कफल्लक असलेल्या स्त्रियांना हे भविष्य भेडसावत असे. अशा तऱ्हेचा धार्मिक विरोध कितीही जोरदार असला तरी, हिंसा आणि धाकदपटशा पासून दूर रहाण्याचा सल्ला बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिला जात असे. हळूहळू आणि बिनबोभाटपणे खेड्याच्या एखाद्या कानाकोपऱ्यात तुम्ही काम सुरू करा, असे आम्हीं त्यांना सांगत असू. आम्हीं देऊ करत असलेली कर्जाची रक्कम काही मोजक्याच स्त्रियांनी जरी घेतली तरी, आजूबाजूच्या चारचौघी हे बघू शकत की कर्ज घेणाऱ्या स्त्रियांवर काही संकट (बला) कोसळत नाहीये. सुरुवातीच्या प्रतिकारानंतर लवकरच त्यांचा विरोध मावळू लागला. सुरुवातीला “नको रे बाबा!” म्हणणाऱ्या स्त्रिया, “काय हरकत आहे पैसे घ्यायला? मला पैशाची खरेतर अधिक गरज आहे.”, असे म्हणू लागल्या. अश्या रीतीने स्वीकाराची भावना हळूहळू सर्व गावभर पसरली. विरोधाची धार बोथट होत होत नाहीशी झाली.

परंतु आजही परत नव्याने एखाद्या खेड्यात काम सुरू केले की पुनश्च नवा युद्धप्रसंग पुढे उभा रहातो. धार्मिक पुढाऱ्यांकडून होणाऱ्या विरोधातून आचरटपणाची परिसीमा गाठणाऱ्या अफवा गावभर पसरू लागतात. पटूआखालीच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या पस्तीस वर्षाच्या महाराणी दास ह्यांना सांगण्यात आले की ‘ग्रामीण’ तुला ख्रिश्चन बनवेल. तिने बँकेत सहभागी होऊ नये म्हणून तिला कुटुंबात मारहाण झाली. ते साल होते १९८७. आता ती हसत हसत सांगते की तेव्हा अशा भीषण भविष्याचे भाकीत करणारे आता स्वत:च ‘ग्रामीण’मध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत. मुसम्मत कुटी बेगम ही फरीदपुरची बावीस वर्षांची तरुणी. तिची आई आणि आजी उपाशीपोटी अर्धवेळ घरकाम करीत असत. मुसम्मतला ताकीद देण्यात आली होती की जर ती ‘ग्रामीण’मध्ये सामील झाली तर, तिला मध्यपूर्वेच्या देशात नेऊन गुलाम म्हणून विकतील. पाईपाऱ्याच्या मुसम्मत माणीकजान बीबीला धनिक सावकारांनी सांगितले की ती ‘ग्रामीण’मध्ये सामील झाली तर ती भ्रष्ट मुसलमान ठरते आणि तिला खोल समुद्रात असे बुडविण्यात येईल की ती पुन्हा कधीच वर येणार नाही. अडतीस वर्षांच्या सकीना खानला सांगितले की तिच्या दफनासाठी पवित्र भूमीवर जागा मिळणार नाही. मंझीरा सातूनला सांगण्यात आले की ‘ग्रामीण’मध्ये सामील झाल्यास तिचा छळ करण्यात येईल, तिच्या दंडावर एक नंबर गोंदविण्यात येऊन तिला वेश्या म्हणून विकतील.

‘ग्रामीण’बद्दलच्या इतर अफवा अश्या होत्या.
ग्रामीण – तुम्हाला ख्रिश्चन बनवील.
ग्रामीण – तुमचे घरदार चोरून नेईल.
ग्रामीण – ही एक गुलामविक्री करणारी गुप्त संघटना आहे.
ग्रामीण – ख्रिश्चन मिशनरी चर्चची एक आघाडी आहे.
ग्रामीण – कर्ज घेणाऱ्या बायकांना नाहीशी करून टाकते.
ग्रामीण – तुमचे पैसे घेऊन सुंबाल्या करेल.
ग्रामीण – एक आंतरराष्ट्रीय तस्करी करणारी टोळी आहे.
ग्रामीण – नव्याने आलेली ईस्ट इंडिया कंपनी आहे. इथे पुन्हा ब्रिटिश वसाहत करण्याचा पाश्चिमात्य देशांचा गुप्त कट आहे.
ग्रामीण – आपल्या कर्मचाऱ्यांना ख्रिश्चन धर्मांतराचे काम करण्याची गुप्त शपथ घ्यायला लावते.
ग्रामीण – स्त्रियांना पडद्यातून बाहेर काढून इस्लामला धोका पोहोचवते.

ही अफवांची यादी अजून बरीच मोठी आहे. एकदा का एखादी अफवा पसरली की वातावरण तंग होते. दोन्हीं बाजू ‘आपले ते खरे’ करण्यासाठी सज्ज होतात.

बरेचवेळा उपाशीपोटी असलेल्या, नवऱ्याने टाकलेल्या, भीक मागून मुलांची पोटे भरणाऱ्या, अशा जिकिरीस आलेल्या स्त्रिया ‘ग्रामीण’मध्ये सामील होण्याच्या आपल्या निर्णयाला चिकटून रहातात. मुल्ला मौलवींच्या धमकावणीला आणि अफवांना त्या जुमानीत नाहीत. त्यांना दुसरा कोणताही आधार उपलब्ध नसतो. एकतर, ‘ग्रामीण’मध्ये या, अथवा उघड्या डोळ्याने आपली मुले मृत्यू पावताना बघा, ह्याखेरीज त्यांना पर्याय नसतो. त्या जबरदस्त अफवांकडे काणाडोळा करू न शकणाऱ्या कुंपणावरील इतर बायकांच्या लवकरच लक्षात येते की ‘ग्रामीण’च्या अधिकाऱ्यांची धार्मिक समज ही त्यांना धर्मद्रोही ठरविणाऱ्यांपेक्षा अधिक परिपक्व व सखोल आहे.

कुठेही गंभीर शारीरिक हल्ल्याच्या धमकावण्या देण्यात येत असतील तर त्वरित ती जागा सोडून दुसरीकडे जाण्याची कायमस्वरूपी सूचना ‘ग्रामीण’च्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे.

एका अगदी बुरसटलेल्या विचारसरणीच्या खेड्यातील खालील घटना आणि आमची त्याबाबतची हाताळणी आमच्या कार्यशैलीची प्रातिनिधिक म्हणता येईल. त्या खेड्यातील धार्मिक नेता आमच्या बँकेच्या अधिकाऱ्याकडे आला आणि म्हणाला, “आमच्या खेड्यात आलात तर तुम्हाला जीवावर उदार होऊनच यावे लागेल. आपली व आपल्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची हमी आम्ही देऊ शकत नाही.” आमच्या अधिकाऱ्याने त्या धार्मिक नेत्याला पटवून द्यायचा प्रयत्न केला; परंतु तो आपली भूमिका सोडायला तयार नव्हता. नाईलाजाने अधिकारीच गाव सोडून गेला. ‘ग्रामीण’मध्ये सामील होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी त्याबद्दल अधिकाऱ्याला विचारले; तर तो म्हणाला, “मी जर ह्या खेड्यात पाय टाकला तर माझ्या जीवाला धोका आहे, असे मला सांगण्यात आले आहे. तेंव्हा तुम्हाला ‘ग्रामीण’मध्ये सामील व्हायचे असेल तर पहिल्या प्रास्ताविक बैठकीसाठी शेजारच्या खेड्यात यावे लागेल.

एक स्त्रियांचा गट ‘ग्रामीण’मध्ये सामील होण्यासाठी रोज शेजारच्या खेड्यापर्यंत तंगडतोड करीत असे. इतर स्त्रियांनी मात्र मनाचा निश्चय केला होता. आजूबाजूच्या खेड्यातील लोकांचे जीवनमान ‘ग्रामीण’मुळे कसे सुधारले, हे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. आणि धार्मिक नेत्याशी वाद घालायला त्या पुढे सरसावल्या. त्यांनी सरळसरळ सवाल केला, “आपण ‘ग्रामीण’च्या अधिकाऱ्याला का धमकावलंत?” “तुम्हाला थेट नरकात जायची इच्छा आहे की काय?”, मुल्ला प्रतिवादला. त्यांचा पुढील संवाद असा झाला.

“’ग्रामीण’ केवळ लोकांचे भले करण्यासाठीच आपल्या गावात येत होती.”

“छे! छे! ती एक खिश्चन संस्था आहे.”

“हे पहा ‘ग्रामीण’चा अधिकारी एक मुस्लिम गृहस्थ आहे आणि पवित्र कुराणाची आपल्यापेक्षा चांगली जाण त्याला आहे.”

“असू दे. पण पडद्याची चाल बंद करण्यासाठी ‘ग्रामीण’ येथे आली आहे.”

“हे साफ खोटे आहे. आम्ही घरच्याघरी भात घिरटणे, चटया विणणे, वेतकाम करणे, गाई पोसणे, मुलांचे पालनपोषण करणे ही कामे करू शकतो. आम्हाला बाहेर पडायची गरजच नाही. ‘ग्रामीण’च आमच्या दारात येते. हे पडद्याच्या विरोधात कसे असू शकते? खरेतर तुम्हीच पडद्याच्या विरोधात आहा. तुम्हीच आम्हाला रोजच्या रोज पैशाच्या कामासाठी गावाबाहेर जायला लावता. तुम्ही आमचा संपूर्ण दिनक्रमच बिघडवून टाकला आहे.”

“मग गावातल्या सावकाराकडे जा. तो एक चांगला मुसलमान आहे.”

“तो तर आठवड्याला दहा टक्के व्याज आकारतो.”

“तुमचे आत्मे असेच निरंतर नरकात लोळत पडणार.”

“हे बघा आम्ही ‘ग्रामीण’कडे जाऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही द्या आम्हाला कर्ज!”

“दिवस रात्र तुम्ही माझा पिच्छा पुरविता. हा माझा छळ थांबवा.”

“’ग्रामीण’ला आपल्या गावात प्रवेश नाकारून तुम्हीच आमचा छळ आरंभला आहे.”

“मी हे सगळे तुमच्या हितासाठीच करीत आहे. म्हणजे मेल्यावर तुमच्या दफनासाठी तुम्हाला पवित्र भूमीचा लाभ होईल. इतःपर तुम्हाला कळत नसेल तर चालते होता की नाही येथून?”

“तुम्ही ‘ग्रामीण’ला प्रवेश देईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही.”

“चालते व्हा. माझ्या डोक्याला जरा शांती मिळू दे.”

“जोवर तुम्ही ‘ग्रामीण’ला हो म्हणत नाही, तोवर रोज येऊन आम्ही तुम्हाला हैराण करणार.”

“ठीक आहे, नरकात जाऊन पडा तुम्ही. तुम्हाला तिकडे कायम खितपत पडायचे असेल, तर जा ‘ग्रामीण’कडे. मी तुम्हाला सावध करायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. कुणी असे म्हणू नये की मी तुम्हाला धोक्याची कल्पना दिली नाही. इत:पर जायचे तर जा खुशाल आणि घ्या ‘ग्रामीण’कडून पैसे आणि भोगा आपल्या कर्माची फळे!”

स्त्रियांना अतिशय आनंद झाला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्या सगळ्याजणी धावतच नजीकच्या गावातील ‘ग्रामीण’च्या अधिकाऱ्यांना भेटल्या आणि आपल्या गावी येण्याचे आमंत्रण त्यांना दिले. त्या धार्मिक नेत्याची ‘ग्रामीण’ला आता काही हरकत नाही, असे त्यांनी सांगितले. बँक मॅनेजरने त्यांनी दाखविलेल्या चिकाटीबद्दल स्त्रियांचे कौतुक केले. परंतु, “ज्याने मला आधी धाक दाखविला त्यानेच मला अभय दिले तर आम्ही तुमच्या गावात येऊ. काही गैरसमजुतीने माझ्यावर अथवा आमच्या ‘ग्रामीण’च्या कार्यकर्त्यांवर संभाव्य शारीरिक हल्ल्याची टांगती तलवार असणे मला परवडणार नाही”, असे तो मॅनेजर म्हणाला.

स्त्रिया पुन्हा मुल्लाकडे परतल्या. त्यांची शाब्दिक झटापट झाली. त्यांनी इतका वाद घातला की कुठून ह्या फंदात पडलो, असे त्याला झाले. शेवटी वैतागून तो शेजारच्या गावातील ‘ग्रामीण’च्या ऑफिसला गेला आणि सर्वांसमक्ष म्हणाला, “आता ऐका. मागे मी काय म्हणालो ते विसरा आणि आमच्या गावात या. तुम्हाला अथवा तुमच्या मालमत्तेला कुणीही हात लावणार नाही, ह्याची मी हमी देतो. ह्या स्त्रिया तुमच्या ‘ग्रामीण’मध्ये सामील होण्यासाठी उतावीळ आहेत.”

अश्या रितीने पुन्हा एकदा ‘ग्रामीण’ धीम्या परंतु विचारपूर्वक उचललेल्या पावलांनी गावात प्रवेश करती झाली. अखेर काळ आमच्या बाजूने होता!

सामाजिक चळवळींसाठी वस्तुपाठ ठरावी अशी आहे ही ग्रामीण बँकेची यशोगाथा!

Comments 1

  • ग्रामीण बेंक व महम्मद युनुस यांची साद्याष्टीती काय आहे? य विषयावर माहिती आवडेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *