‘पैस पर्यावरणसंवादाचा’ : वैश्विक आवाका, भारतीय संदर्भ
लेखक: संतोष शिंत्रे
मनोविकास प्रकाशन, पुणे.
पृष्ठे: ३६०, मूल्य: रुपये ४८०.
मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी
ग्रंथ उपलब्धी: ८८८८५५०८३७
पर्यावरण, निसर्गाचे-पर्यावरणाचे रक्षण हा आजकाल एकतर टिंगलीचा, कुचेष्टेचा किंवा उपेक्षेचा विषय झालेला असताना पर्यावरण पत्रकार, लेखक संतोष शिंत्रे ह्यांनी अतिशय कष्टपूर्वक सिद्ध केलेला ‘पैस पर्यावरणाचा’ हा ग्रंथ पर्यावरण-रक्षण, संशोधन आणि त्यासाठीच्या चळवळींसाठी संदर्भमूल्य असलेला एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. पर्यावरणीय विषयांवर काम करणारे अनेक आहेत, पण ह्या विषयाचा ध्यास घेऊन, संदर्भ धुंडाळून त्यावर सातत्यपूर्ण लेखन करणारे श्री.शिंत्रे हे अपवादात्मक उदाहरण आहे. ह्यामुळेच ‘वैश्विक आवाका आणि भारतीय संदर्भ’ असलेला हा ग्रंथ ह्या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, संशोधक, लेखक, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि धोरणकर्ते (त्यांनी हा ग्रंथ वाचला तर) ह्यां सगळ्यांसाठी दीपस्तंभासारखे काम करेल, ह्यात शंका नाही.
एका वेगळ्या, थोड्याशा किचकट, अनवट विषयावरील ग्रंथ लिहिण्याचे अत्यंत कठीण काम श्री.शिंत्रे ह्यांनी लीलया पेलले आहे. त्याचबरोबर तो प्रसिद्ध करण्याचे धाडस मनोविकास प्रकाशनचे श्री.अरविंद पाटकर आणि आशिष पाटकर ह्यांनी दाखवले, ह्याबद्दल तिघेही अभिनंदनास पात्र आहेत. पाच विभागांतील एकूण २२ प्रकरणे, महत्त्वाची दोन परिशिष्टे, विषय-सूची आणि व्यक्तीनाम-सूची असलेला हा ग्रंथ संशोधकीय शिस्तीने लिहिलेला असून तो परिपूर्णतेच्या जवळपास जाणारा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. श्री.शिंत्रे ह्यांनी हा ग्रंथ भारतीय निसर्ग-पर्यावरण चळवळीतील आजवरच्या सर्व ज्ञात-अज्ञात योद्ध्या कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे आणि ते रास्तही आहे.
पर्यावरणसंवाद म्हणजे ‘एन्व्हायरोंन्मेंटल कम्युनिकेशन’ ही पाश्चिमात्य जगात तीन दशकांपूर्वी आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणून विकसित झालेली संकल्पना भारतात अद्याप अपरिचित आहे. पर्यावरण म्हणजे झाडे लावा, पाणी अडवा, वाघ वाचवा आणि लेखकाच्या भाषेत ‘स्स! हाय’ प्रकारचे निसर्गलेखन अशी सर्वसामान्य धारणा आहे. सर्वसामान्य नागरिकाचे औदासिन्य आणि अज्ञान, हा विषय ‘मतप्रभावी’ (इलेक्टोरल मेरिटचा) नसल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्याकडे केलेले दुर्लक्ष, अशा परिस्थितीत पर्यावरणसंवादाचा पैस म्हणजे परीघ किंवा आवाका किती जगड्व्याळ आहे आणि पृथ्वीवरील सर्व सजीवमात्रांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, हा मुद्दा हे पुस्तक अधोरेखित करते.
‘संवादाआधीचा संवाद’ ह्या मोजक्या आणि नेमक्या मनोगतात हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका लेखक स्पष्ट करतो. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात निसर्ग-पर्यावरणाचा अपरिमित, अपरिवर्तनीय विनाश सुरू आहे. २०२४ पर्यंत हा विनाश भयात्कारी स्वरूप धारण करुन चुकला आहे. ह्या दृष्टिकोनातून लेखकाने काही तथ्ये ह्या मनोगतात मांडली आहेत. ती समजून घेतली तर ग्रंथवाचनाचा पुढचा प्रवास सोपा होतो.
पर्यावरणसंवाद आंतरविद्याशाखीय
पर्यावरण म्हणजे केवळ झाडे, डोंगर, नद्या, पाऊस, निसर्ग ह्याचे ज्ञान नव्हे. हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आणि मानवाबरोबरच सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ह्या विषयाला आर्थिक, सामाजिक, राजकीय अशी अनेक अंगे आहेत. हे पुस्तक अनेक उदाहरणे, स्पष्टीकरणे आणि संदर्भांसह पर्यावरण आणि त्याविषयीची गुंतागुंत उलगडवून दाखवते. मानवाकडून, विशेषत: टोणग्या (हा लेखकाचा शब्द) कॉर्पोरेट कंपन्या, उद्योगमार्तंड, ह्यांना हवे तसे कायदे करून देणारे राजकीय आणि सरकारी माफिया पर्यावरणावर उघडपणे आणि निलाजरेपणाने अत्याचार करीत आहे. सामान्य माणसाला एकतर ह्यातले काही कळत नाही किंवा तो हतबल तरी आहे. तरीही सजग, विचारी माणसाला प्रश्न पडतच असतात. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूह, अभ्यासक ह्यांनाही सामान्य माणसापेक्षा अधिक कठीण प्रश्न पडत असतात. ह्या प्रश्नांची उत्तरे आसपास दिसत नाहीत किंवा दिशा सापडत नाही. ह्यासाठी ‘पर्यावरणसंवाद’ ही संकल्पना जाणून घेणे आवश्यक आहे. ह्याबाबत भारतीय संदर्भ असलेला ह्या विषयाचा आवाका आणि बहुतेक प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकातून मिळतात. पर्यावरणाचा विनाश रोखण्यासाठी अनेक संस्था, समूह आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. त्यांना ह्या पुस्तकातून नक्कीच दिशादर्शन मिळेल. पर्यावरणसंवाद आंतरविद्याशाखीय आहे. सामाजिक न्याय, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, विक्री कौशल्ये अशा अनेक विषयांशी ह्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ह्या पुस्तकाच्या वाचनामुळे ह्या आणि अन्य अनेक विषयाच्या अभ्यासकांना ह्या विषयाची वीण उलगडता येईल.
पर्यावरणसंवाद ह्या विषयावर भारतीय संदर्भांसह आजपर्यंत एकही ग्रंथ लिहिला गेला नाही. केवळ सैद्धांतिक नव्हे, तर उपयोजित मांडणीसह सिद्ध केलेला हा ग्रंथ ही उणीव भरून काढतो. ह्याच लेखकाने २०१२ साली पर्यावरण पत्रकारितेवर अत्यंत शिस्तबद्ध, सूत्रबद्ध मांडणी केलेले एक महत्त्वाचे पुस्तक इंग्रजी आणि मराठीतून लिहिले. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड आहे, असे म्हणायला हरकत नाही. परंतु, शास्त्रशुद्ध पर्यावरणसंवादाच्या सात महत्त्वाच्या घटकांपैकी ‘पर्यावरण पत्रकारिता’ हा एक घटक आहे. बाकीच्या घटकांना धरून लेखनही तितकेच आवश्यक आहे, ह्या भावनेतून कोणतेही संदर्भ, संदर्भग्रंथ हाती नसताना ह्या विषयात उडी मारण्याचे धाडस लेखकाने केले आणि ते कष्टपूर्वक निभावले.
संतोष शिंत्रे ह्यांची बावीस वर्षे पर्यावरण-पत्रकारितेत गेली आहेत. १९९७ साली त्यांनी वन्यजीव-पत्रकारितेला सुरुवात केली आणि लवकरच ह्या विषयाचा व्याप, आवाका आणि परीघ त्यांच्या लक्षात येऊ लागला. ह्या विषयावर त्यांनी सातत्याने मूलभूत स्वरुपाचे लेखनही केले. वन्यजीव तस्करी, केंद्रीय अर्थसंकल्पातील अत्यंत तुटपुंज्या तरतुदी, पश्चिम घाटासंदर्भातील पर्यावरणविषयक समस्या, पर्यावरणविषयक आंदोलने येथपासून ते अंदमान-निकोबारच्या प्रस्तावित विनाशासह कित्येक विषय त्यांनी हाताळले. ह्या पार्श्वभूमीमुळे त्यांच्याकडे ह्याबाबतची भारतीय उदाहरणे आणि संदर्भ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. परंतु, पर्यावरणसंवाद ह्या विषयाची व्याप्ती खूपच मोठी होती. ह्या विषयाच्या संदर्भाने पूर्वी केलेली पत्रकारिता, लेखन, भारतीय संदर्भांचे संकलन, अवांतर वाचन ह्यामुळेच लेखक शास्त्रशुद्ध पर्यावरणसंवाद तपशीलवार सांगू शकणारे, मराठीतीलच नव्हे तर भारतातील पहिले आणि परिपूर्णतेच्या जवळ जाणारे पुस्तक लिहू शकला. ‘आजचा सुधारक’च्या एप्रिल २०२४ च्या अंकात त्यांनी ‘अपरिवर्तनीय पर्यावरण-विनाशाकडे’ (भाग १ व भाग २) हे अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण लेख लिहिले होते. शिंत्रे ह्यांच्यानंतर कोणी ह्या विषयाला हात घालील, अशी शक्यता मला तरी दिसत नाही.
तांत्रिक जार्गन टाळले
हे पुस्तक पूर्णत: तांत्रिक विषयावरील आहे. पर्यावरणाबाबत आस्था असलेल्या सर्वांसाठी हे पुस्तक लिहिलेले असले तरी त्यात अति-सुलभीकरण केलेली, चित्ताकर्षक भाषा वापरलेली नाही. मात्र ती जडजंबाल होणार नाही, ह्याचीही दक्षता घेतली आहे. काही शब्दांबाबत जाणीवपूर्वक सहजसुलभ शब्दांचा वापर चपखलपणे केला आहे. उदाहरणार्थ, ‘कम्युनिकेशन’ ह्यासाठी सामान्यत: ‘संज्ञापन’ किंवा ‘संप्रेषण’ हा शासकीय आणि विद्यापीठीय शब्द वापरला जातो. पण लेखक जाणीवपूर्वक हा शब्द टाळतो आणि ‘संवाद’ ह्या शब्दाची योजना करतो आणि ती यशस्वी होताना दिसते. काही ठिकाणी मराठी प्रतिशब्दांचा सोस टाळून जर कल्पनाच परकीय असेल तर मूळ इंग्रजी शब्दच (उदा. डिजिटल ॲक्टिव्हिझम, डेटा, इंटरनेट) वापरले आहेत.
विषयाची मांडणी सूत्रबद्ध होण्यासाठी लेखकाने एकूण २२ प्रकरणांचे पाच विभाग केले आहेत. १) आवाका, २) संकल्पना, संगती आणि भाषा, ३) संघर्ष, न्याय, समाजभान, ४) माध्यमे, तंत्रज्ञान, ग्राहक, आणि ५) उपयोजित पर्यावरणसंवाद. अनुक्रमणिकेची ही मांडणी करण्यातच बराच कालावधी गेला. ही अनुक्रमणिका तब्बल आठवेळा बदलली. अभिप्रायासाठी ती मार्गदर्शक आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे भूतपूर्व अध्यक्ष डॉ.असद रहमानी ह्यांना पाठवली असता त्यांनी ‘ह्यात लहान मुलांशी संवाद साधणे, हा अत्यंत महत्त्वाचा विषय का घेतलेला नाही?’ असा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर त्याचा समावेश ‘उपयोजित पर्यावरणसंवाद’ ह्या विभागात केला, अशी आठवण लेखक सांगतो. ह्या उदाहरणावरून लेखक आपल्या सादरीकरणाबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते.
पर्यावरणसंवाद का गरजेचा ?
मुळातच पर्यावरणसंवादाची गरजच का भासते, ह्यावर पहिल्याच प्रकरणात विवेचन केले आहे. खरेतर निसर्ग, पर्यावरण, त्यांचे संरक्षण ह्याबाबत वाद, मतभेद होण्याचे कारणच नाही. सर्वचजण ह्यावर तावातावाने बोलतात. तरीही ह्या प्रश्नावरून विविध प्रकारे वाद, मत-मतांतरे, संघर्ष, रक्तपात, हिंसा होताना दिसते, हा विरोधाभास लेखक नोंदवतो. स्वत: निसर्ग बोलू शकत नसल्याने त्याच्या वतीने कोणी बोलायचे, ह्या प्रश्नाचे उत्तर पर्यावरणसंवादाच्या गरजेत दडलेले आहे. अर्थात अशा संवादासाठी, चर्चेसाठी खुले आणि मोकळे वातावरण ही एक पूर्वअट असतेच. असे बोलले गेले नाही तर निसर्गच स्वत:च्या वेगळ्या भाषेत बोलू लागतो. मात्र ती भाषा मनुष्यजातीला अजिबात कल्याणकारक नसते. तीव्र हवामान, अरिष्टे, वादळे, पूर ह्या प्रकारच्या घटना हे ह्या भाषेचेच हुंकार असतात. ह्यासाठीच पर्यावरणसंवाद अत्यंत गरजेचा आहे. पर्यावरणसंवादाचा उदय, व्याख्या आणि व्याप्ती ह्यावर ह्याच प्रकरणात विवेचन केले आहे.
पर्यावरणसंवाद हा मतप्रवाह तयार करण्याइतपत प्रभावी आणि धोरणात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला हवा. ह्यासाठी अशा संवादाची मूलभूत तत्त्वे जाणून घ्यायला हवीत. पर्यावरणसंवादाची पर्यावरणस्नेही प्रतीकात्मक कृती, मनोवृत्ती/धारणा ह्यांवर पडणारा पर्यावरणसंवादाचा प्रभाव आणि वैचारिक आदानप्रदानाची एक व्यापक जागा अशी तीन मूलभूत तत्त्वे आहेत. ह्या तिन्ही तत्त्वांबाबतचे विवेचन सोदाहरण केले आहे. फिलिपिन्सच्या अलेक्झांडर फ्लोर ह्या अभ्यासकाने २००४ मध्ये सर्वप्रथम पर्यावरणसंवादाचा साकल्याने विचार करून ह्या विद्याशाखेचा पाया रचला. फ्लोरने पर्यावरणसंवादाची सहा वैशिष्ट्ये किंवा गुण नोंदवले आहेत. १. सृष्टीविज्ञानाच्या बॅरी कॉमनरने सांगितलेल्या चार मूलभूत नियमांची माहिती. २. पर्यावरण, सृष्टिविज्ञान ह्याबाबतच्या (निव्वळ शास्त्रीय नव्हे, तर) सांस्कृतिक अंगांची माहिती. ३. आपले इप्सित ध्येय गाठण्यासाठी स्वतःची प्रभावी संपर्कयंत्रणा निर्माण करण्याची क्षमता. ४. इप्सित सामाजिक कार्यक्रमाचा प्रचार होण्यासाठी माध्यमांचा कार्यक्षमतेने आणि कुशलतेने वापर करण्याची क्षमता. ५. पर्यावरण नीतिशास्त्राची कदर असणे आणि त्यानुसार वर्तन असणे. ६. पर्यावरणीय संघर्ष सोडवण्याची, त्यात मध्यस्थी करू शकण्याची किंवा ‘लवाद’ म्हणून काम करू शकण्याची क्षमता. पर्यावरणसंवाद कौशल्याने करण्यासाठी संवादकाने ही वैशिष्ट्ये अंगिकारणे आवश्यक ठरते. फ्लोरच्या सिद्धांताची मांडणी तिसऱ्या प्रकरणात सविस्तरपणे केली आहे. अमेरिकी जीवशास्त्रज्ञ बॅरी कॉमनरने आपल्या ‘द क्लोजिंग सर्कल’ ह्या पुस्तकात जे चार नियम सांगितले आहेत, ते खूपच मनोरंजक पद्धतीने सोदाहरण सांगितले आहेत. प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीशी संलग्न असते, प्रत्येक गोष्ट कुठे तरी गेलीच पाहिजे, निसर्गाकडे सर्वोत्तम प्रकारचे ज्ञान आहे आणि जगात कुठलीही गोष्ट फुकट नसते, हे कॉमनरचे चार नियम आहेत. हा सर्व भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. पर्यावरण नीतिशास्त्राचीही ओळख ह्या प्रकरणात करून दिली आहे.
पर्यावरणसंवाद ज्या प्रमुख सार्वजनिक/सामाजिक अवकाशांमध्ये, चौकटींमध्ये घडतो, तो संघटित प्रकारचा असतो. जे. रॉबर्ट कॉक्सने अशा संघटित पर्यावरणसंवादाचे जे सात प्रकार सांगितले आहेत, त्यांची ओळख आपल्याला चवथ्या प्रकरणात होते. लोकसहभाग, माध्यमे, पत्रकारिता, चळवळी ह्यांचा उहापोह येथे केला आहे. कॉक्सने सांगितलेल्या ह्या सातही प्रकारांचे स्वतंत्र महत्त्व आहे.
या पुस्तकात विषयाची गुंफण इतक्या सुंदर पद्धतीने केली आहे की, एखाद्या लडी उलगडत जाव्यात, तसे संलग्न विषय, संदर्भ, उदाहरणे, संकल्पना, व्याख्या एकातून एक उलगडत जातात. हे पुस्तक सलगपणे वाचताना हा अनुभव येतो. अर्थात अशा तांत्रिक विषयावरील पुस्तक सलगपणे वाचले जाणे कठीण आहे. ब्रेक घ्यावाच लागतो. मात्र ह्या ब्रेकचा कालावधी मोठा झाला तर मात्र बरेचदा आधीच्या संदर्भांसाठी मागे जावे लागते, असा अनुभव येतो. ह्यासाठी पुस्तक वाचताना नोंदी ठेवल्या, थोडक्यात टिपण ठेवले तर हा प्रश्न येणार नाही. ह्या पुस्तकातील सर्वच विभागांचा मागोवा विस्तारभयास्तव येथे घेता येणार नाही. वाचकाचे कुतूहल चाळवावे आणि तो ह्या पुस्तकाच्या वाचनासाठी उद्युक्त व्हावा, एवढाच उद्देश ह्या लेखनामागे आहे.
श्री.शिंत्रे ह्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनात ते आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ किंवा तो मुद्दा वाचकापर्यंत पोचावा, ह्यासाठी भरपूर उदाहरणे देतात. ह्यामुळे आकलन सोपे होते आणि पुस्तकाची वाचनीयता वाढते. ‘संवादाआधीचा संवाद’ ह्या मनोगतामध्ये लेखक म्हणतो की, निसर्ग-पर्यावरणक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती/संस्था/समूह ह्यांना आजवर पडलेल्या बहुतांश अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे प्रस्तुत पुस्तकात मिळण्याची शक्यता आहे. उद्योगविश्व, पत्रकार, निसर्ग-पर्यावरणविषयक लिहिणारे लेखक, पर्यावरण विषयातील विविध अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या लोकांनाही ते उपयुक्त वाटण्याची पुष्कळ शक्यता आहे. ह्या विद्याशाखेत भारतीय संदर्भ घेऊन संशोधन करण्यास प्रचंड वाव आहे. त्यासाठीही मूलभूत संदर्भ म्हणून हे पुस्तक उपयुक्त हे ठरेल, असा विश्वास वाटतो. हे स्पष्ट करताना लेखक ‘Always go too far, because that is where you will find the truth’ हे अल्बेर कॅम्यूचे वाक्य उद्धृत करतो.
लोकमानसाचा ‘चव्हाटा’
पर्यावरणसंवादाची मूलतत्त्वे सांगताना लेखकाने खूप छान उदाहरणे दिली आहेत. निसर्ग-पर्यावरणविषयक थेट कामे करणारे अनेक समूह भारतासह जगभरात कार्यरत आहेत. अनेक समूह ह्यासाठी महाजालाचा अतिशय उत्तम वापर करतात. उदा. (change.org, jhatka.org, awaj.org). ह्या समूहांनी आजवर वैज्ञानिक निसर्ग-पर्यावरणाबाबतच्या संवादाला कायमच अतिशय गरजेचे असलेले शास्त्रीय पाठबळ पुरवले आहे. अधिकृत मान्यता मिळण्यासाठी असा संवाद प्रथमतः वैज्ञानिक व्यासपीठांवर, अथवा शास्त्रीय नियतकालिकांमधून केला जातो. पण ती मान्यता मिळाल्यावर, ज्या शोधांमध्ये किंवा निष्कर्षांमध्ये व्यापक सामाजिक हिताचे प्रश्न असतात, तिथे शासकीय आणि लोकव्यासपीठांमध्ये (लेखकाने ह्याला ‘चव्हाटा’ असा अर्थवाही शब्द वापरला असून त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे.) ते मुद्दे आपसूक चर्चेला येऊन त्यासंबंधीच्या कृतीला सुरुवातही होते. उदाहरणार्थ, १९८८ मध्ये अमेरिकी संसदेत सर्वप्रथम तापमानवाढ आणि हवामानबदल ह्याविषयीचे संशोधन (त्याच्या सत्यतेची पुरेपूर खात्री करून घेतल्यावर) सादर केले गेले आणि त्याबाबतच्या कृती-आराखड्याची चर्चा पूर्ण जगाला एक नवी दिशा देऊन गेली.
अशाच एका समूहाचे टोकाचे आणि मजेशीर उदाहरणही लेखक देतो. कॅप्टन पॉल वॅटसन हा कॅनडामधील कार्यकर्ता शार्क, व्हेल आणि अन्य सागरी जीवांसाठी काम करतो. त्यांच्यासाठी कॅप्टन पॉल देवदूतच आहे; तर त्या प्राण्यांच्या तस्करांसाठी तो एक धडकी भरवणारा ‘इको-टेररिस्ट’ आहे. Seashepherd.org ह्या त्याच्या संघटनेची जहाजे, जगभरातल्या समुद्रात गस्त घालत असतात आणि व्हेल मारणारे लोक, समुद्री वन्यजीव तस्करे, त्यांची जहाजे, ह्यांना ती थेट धडक देऊन जलसमाधी देऊन संपवतात. सांगायचा उद्देश इतकाच, की हे समूह इतक्या विविध प्रकारे पर्यावरणसंवाद साधत असतात.
सामान्य माणसाचे योगदान
व्यक्तिशः नागरिक एकेकटे असूनही प्रचंड परिणामकारक असा पर्यावरणसंवाद आणि त्यातून पर्यावरणाचे भले घडवून आणू शकतात. भारतीय वाघांसाठी माधव सुब्रमणियम् ह्या अवघ्या पंधरा वर्षांच्या मुलाने शाळाशाळांमध्ये कार्यक्रम करून पाच लाख रुपयांहूनही जास्त निधी निर्माण करून तो योग्य संस्थेच्या हाती पोचवला. उत्तर प्रदेशातल्या पिंकी मिश्रा ह्या प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने जनहित याचिका दाखल करून घटनेच्या ४८-अ कलमाखाली राज्यसरकारला कारवाई करायला भाग पाडून तिथल्या जंगलांमधल्या सहा हजारहूनही जास्त अवैध लाकूडकटाई गिरण्या बंद करण्यास भाग पाडले. अनेक वेळी अनौपचारिक समूहांद्वारे काही नागरिक एकत्र येऊन एखाद्या कृतीतून पर्यावरणसंवाद साधतात. ह्यात एखाद्या नदीतली जलपर्णी साफ करणे, एखादा परिसर प्लॅस्टिकमुक्त करणे अशांसारख्या कृतींमधून संवाद साधून ते संबंधितांना, प्रशासनाला त्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास भाग पाडतात. भारतातल्या प्रत्येक राज्यात, गावात अशी उदाहरणे मुबलक संख्येने आढळतात.
जागरुक पत्रकारही ह्याबाबतीत महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. ह्याचे उदाहरण देताना लेखक सांगतो की, काही वर्षांपूर्वी एका राष्ट्रीय, इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराने माहिती अधिकाराखाली अर्ज करून, माहिती मिळवून वाचकांना वृत्तपत्राद्वारे कळेल, अशी छापली. महाराष्ट्रातील सर्व व्याघ्रप्रकल्पांचे संचालक प्रत्यक्ष प्रकल्पात, म्हणजेच जंगलात किती दिवस होते, ह्याची विचारणा त्याने केली होती. धक्कादायक रीतीने बाहेर आलेली माहिती अशी होती की ते सगळेच जण आपापल्या प्रकल्पस्थानावर वर्षातील सरासरी फक्त ५५ दिवस होते. अन्य सर्व दिवस ते (सर्वांत जवळचे शहर) नागपूर इथेच कुटुंबियांसमवेत राहत होते. त्यामुळे तेथील व्याघ्रप्रकल्पांमध्ये त्यांचा काही वचकही राहिला नव्हता, अन्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य ढासळलेले होते. व्याघ्रावयवांची तस्करी चालूच होती. ही बातमी वृत्तपत्रामध्ये झळकताच संबंधितांवर कारवाई केली गेली. माध्यमांद्वारा होणाऱ्या संवादाने घडवलेल्या कृतीची अशासारखी कैक उदाहरणे भारतभर आणि जगभर मिळतात. ह्या उदाहरणातील शोधपत्रकारिता आणि त्यातून घडणारा संवाद ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
पर्यावरणसंवादाचे यश
जैववैविध्य, पर्यावरणीय घटकांचा मानवी आरोग्यावरील परिणाम ह्याबाबतही वैज्ञानिक संवादाने आजवर फार मोठी भर घातली आहे. भारतात ह्या बाबतीत के.उल्हास कारंत ह्या व्याघ्रशास्त्रज्ञाचे लक्षवेधी उदाहरण लेखक देतो. पायांच्या ठशांवरून वाघांची मोजणी करणे, ही अशास्त्रीय व ढोबळ पद्धत आहे; त्याऐवजी कॅमेरा ट्रॅपिंग हे तंत्र अधिक अचूक आहे, हे डॉ. कारंत कित्येक वर्ष सांगत आले होते. १९९० च्या दशकात वनखात्यात आणि एकूण सरकारी पातळीवर त्यांची फक्त कुचेष्टाच केली गेली. पण २०१५ नंतर झालेल्या सर्व मोजण्या शंभर टक्के कॅमेरा ट्रॅपिंग तंत्राने केल्या गेल्या, हे त्यांच्या प्रदीर्घ पर्यावरणसंवादाचे यशच म्हणावे लागेल, असे उदाहरण लेखकाने दिले आहे.
निसर्गाचे लोकसंस्कृतीतील आविष्करण आणि निसर्गसंवर्धनात लोकांचा सहभाग ह्यावरही लेखकाने भर दिला आहे. तसे पाहिले तर अगदी आदिमानवाच्या गुहांमधील चित्रातही काही स्वरूपात निसर्ग उमटत आला आहे. मौर्य सम्राट अशोकाने (ख्रिस्तपूर्व २६८-२३) काढलेला एक वटहुकूम म्हणजे ‘वने-जंगले, आणि वन्य जीव ह्यांचे संरक्षण करणे हे राजाचे परम कर्तव्य आहे.’ हे आदेश त्याने विविध जागी स्तूपांवर कोरून त्याच्या साम्राज्यात अनेक ठिकाणी लावले होते. त्यानुसार वन-विनाश आणि वन्य जीवांची हत्या ह्यास मनाई होती. निसर्गसंरक्षणासाठी संपूर्ण जगभरातच उचललेले हे पहिले, नोंदले गेलेले पाऊल ठरते. स्व.इंदिरा गांधी ह्यांनी व्याघ्रप्रकल्प सुरू करताना सामान्य जनतेला त्याच्याशी बांधून घेण्यासाठी ह्या वचनांचा वापर केला होता, असा संदर्भ लेखक देतो.
आदिवासी जमातींचे योगदान
जल, जंगल, जमीन हे तर आदिवासींचे जीवन आहे. त्यामुळे त्यांचे जीवनच ह्याभेवती फिरत असते. ह्याबाबत लेखक सांगतो की, प्रत्येक आदिवासी जमातीचे कुलचिन्ह एखाद्या प्राण्याचे अथवा वृक्ष, वनस्पतीचे सूचक चिन्ह असते. त्या चिन्हाने ती टोळी, वंश, जमात ह्यांपैकी काही दर्शवले जाते. आदिवासी समुदायांच्या अंतर्गत सामाजिक रचनेत ह्या चिन्हाचे मोठे महत्त्व असते. ह्या चिन्हाने दर्शवलेला जीव, हा ते आपला मुख्य संरक्षक मानतात. साहजिकच ती ती जमात त्या विशिष्ट जीवाची हत्या करत नाही. उदाहरणार्थ, टिग्गा (माकड) जमातीत माकडे मारून खाणे अथवा त्यांना पाळणे निषिद्ध मानले जाते. बारवा जमातीचे लोक कोळसून ( वाइल्ड डॉग ) कधीच मारत नाहीत. झारखंडमधील ‘हो’ जमातीत विविध गट आणि त्यांची प्रत्येकी हंस, वाघ, कोल्हा अशी कुलचिन्हे आहेत. त्या त्या विशिष्ट टोळ्या तो प्राणी कधीच मारत नाहीत. ह्याच्याच जोडीने काही वृक्ष पवित्र मानले गेल्याने हे लोक पूजतात. ही पूजा वृक्षाच्या नैसर्गिक अस्तित्वाची असू शकते किंवा वृक्षाच्या आत्म्याची असू शकते. अशी अनेक उदाहरणे वोरेल कुमार जैन ह्यांनी त्यांच्या शोधनिबंधात दिली आहेत.
भारताचा चिमुकला शेजारी भूतानचे पर्यावरणरक्षणातील सामाजिक सहभागाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. बौद्धधर्माच्या प्रभावामुळे मुळातच अहिंसा, साधी राहणी, संसाधनांची उधळपट्टी बिलकूल नसणे हे सर्व आपसूक अंगीकारलेला हा देश. सकल राष्ट्रीय उत्पन्न हा प्रगतीचा निकष अजिबात न मानता सकल राष्ट्रीय आनंद (Gross national happiness) हा विकासाचा, प्रगतीचा निकष मानणे, अशा अनेक गोष्टींमुळे हा छोटासा देश ‘उणे कर्ब उत्सर्जन’ करणारा लवकरच होईल. आज तो ‘शून्य कर्ब उत्सर्जन’ करणारा आहेच. सांस्कृतिक धारणांमध्ये त्यांच्या अनेक श्रद्धाही त्यांना पर्यावरणविघातक गोष्टी करण्यापासून वाचवतात. उदाहरणार्थ – गिर्यारोहण करणे, शुद्ध स्वच्छ जलाशयात डुंबणे ह्यामुळे अनुक्रमे गिरीदेवतांचा आणि जलदेवतांचा कोप होतो, ही श्रद्धा पक्की असल्याने ह्या गोष्टींना भूतानमध्ये सक्त मनाई आहे. पण परिणामी गिर्यारोहक निर्माण करतात तो हजारो टन कचरा, प्राणवायूची रिकामी नळकांडी, अन्नाचे रिकामे फेकून दिलेले डब्बे, मृत गिर्यारोहकांची शरीरे अशा प्रचंड घनकचऱ्यापासून आणि जलस्त्रोत प्रदूषित होण्यापासून भूतान आज संपूर्ण मुक्त आहे.
पर्यावरणीय विनाश अत्यंत धीम्या गतीने आणि टप्प्याटप्प्यांनी होत असतो. एकंदरीत माणसे पटदिशी दिसणाऱ्या, दृश्य स्वरूपाच्या विनाशाच्या आकलनात जरा बरी असतात. पण धीम्या गतीने होणारे नुकसान बहुतेकांना जाणवत नाही. हे स्पष्ट करताना लेखक बेडकांवर केलेल्या प्रसिद्ध प्रयोगाची आठवण करुन देतो. खूप गरम पाण्यात बेडूक टाकले तेव्हा ते चटकन उडी मारून बाहेर पडले; पण गार पाण्यात ठेवून पाण्याचे तापमान हळूहळू वाढवत नेले तेव्हा ते न कळल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि ते उकळत्या पाण्यात मेले, हा तो प्रयोग.
मिथकांचे महत्त्व
ह्या सगळ्यात महत्त्वाचा अजून एक लक्षवेधी प्रकार म्हणजे मिथके. जनसामान्य लोकांनी, पिढ्यानुपिढ्या एकमेकाला सांगितलेल्या सांस्कृतिक गोष्टी, कथा म्हणजे मिथके. विविध प्रांतांनुसार त्यातले तपशील मूल गाभा कायम राहून बदलतही जाऊ शकतात. भारतात तर त्यांची संख्या काही लाखात जाईल. जगासाठी भलेबुरे काय आहे, हे त्यात ठामपणे सांगितलेले असते. रामायण-महाभारताच्या विविध प्रादेशिक कथनामधून अशी मिथके सतत झिरपत असतात. उदाहरणार्थ, रावण एके ठिकाणी म्हणतो, ‘मी एकही वडाचे झाड तोडले नसताना माझ्यावर हे संकट का कोसळते आहे? मिथके ‘शापित पैशा’चे वर्णन करताना, सामूहिक दोषाची वेसण घालताना किंवा स्थानिक इतिहासाची पर्यावरणपूरक मांडणी करताना कळत-नकळत अशा संवादांद्वारे निसर्गरक्षणाची शिकवण सहजी देऊन जातात. लाकूडतोड्यांच्या जीवनात आणि कुटुंबावर आलेली संकटे सांगून अशा वृक्षतोडीमधून मिळवलेले धन विनाशाला कसे कारणीभूत ठरते ते स्पष्ट करून शापित पैशाच्या कहाण्या समाजमनावर बिंबवतात, ह्याचा दाखला लेखक देतो.
या कहाण्या अमुक प्राण्याची शिकार किंवा विशिष्ट भागातील वृक्षतोड ही संपूर्ण गावच कसे बेचिराख करेल, ह्याची कहाणी सांगून अशा वर्तनाला एक सामूहिक वेसण घालताना दिसतात. कैक पिढ्या मिथके आणि पारंपरिक संवाद ह्यातून बिश्नोई समाजाच्या निसर्गप्रेमाचा इतिहास आजच्या पिढ्यांपर्यंत इतका प्रभावीपणे पोहोचला आहे, की सलमान खानने चिंकारा मारल्यानतर काही काळातच त्याला सप्रमाण पकडून न्यायालयात हजर करण्यापर्यंत आजच्याही काळात हे संस्कार झिरपले आहेत.
बऱ्याच वेळी मिथकांमध्ये ‘विज्ञान’ नसते असे एक प्रतिपादन कानावर येते. काटेकोर विज्ञानाच्या पद्धती आणि कसोट्या ह्या निकषांवर तसे असूही शकते. पण नंद जमातीच्या अंथू नामक कथारूपी ज्ञानसाठ्यातील पाइन आणि ओक वृक्षांचे शाप आणि वरदाने ह्यांची वर्णने म्हणजे मुळात त्या त्या वृक्षांच्या सृष्टीविज्ञानात्मक गुणधर्मांची एक जंत्री आहे. हिमवर्षाव किती होणार आहे, ह्याचा अंदाज ते कावळा, वृक्षाचा सर्वाधिक उंच भाग घरटे करण्यासाठी निवडतो, की मधला, की खालचा ह्यावरून अचूक बांधू शकतात. भारतीय अस्मितेची प्रतीके असलेल्या आंबा, कमळ, मोर, वड ह्या सर्वांवर आधारित, तसेच वाघ, नाग-साप, वन्य प्राणी ह्यांच्याबद्दलची मिथके भारतात अगणित आहेत. त्या त्या काळात त्यांनी आपले पर्यावरणसंवादाचे काम चोख केले आहे, असे लेखक स्पष्ट करतो.
डावपेच आणि सर्जनशीलता
आजच्या आधुनिक जगात डावपेच आणि सर्जनशीलता वापरणे महत्त्वाचे ठरले आहे. ग्रीनपीस ही जागतिक संघटना अशा डावरपेचात विशेष कल्पक असलेली दिसते. ह्याचे उदाहरण म्हणून लेखक ग्रीनपीसची गोष्ट सांगतो. १९७५ साली स्पर्म व्हेल हे महाकाय मासे मारण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापासून ५० किलोमीटरवर एक रशियन जहाज १६० पाउंड दारूगोळा असणारे हार्पून घेऊन निघाले होते. त्यांच्याच जोडीने फक्त तीन रबराच्या, फुगवता येणाच्या छोट्या झोडियाक प्रकारच्या अगदी छोट्या बोटीमधून ग्रीनपीसचे सहा योद्धे कार्यकर्ते शेजारूनच निघाले. त्यांच्याकडे फक्त चित्रीकरण करणारे छोटे कॅमेरे होते. व्हेल आणि जहाजावरील हार्पून ह्यांच्या मध्ये ते सतत स्वत:ला ठेवत होते. त्यांचा अंदाज असा होता, की मध्ये जिवंत माणूस पाहून तरी ते हार्पून मारणार नाहीत. (१९७५ साल होते ते!) पण कोणतीही पूर्वसूचना न देता जहाजावरून हार्पून सोडले गेलेच, त्यांना ह्यांच्या जीवाशी काही घेणे नव्हते. ते ह्या योद्ध्यांच्या डोक्यावरून जाऊन व्हेलला बरोबर लागले. ते व्हेल वाचवू शकले नाहीत. पण त्यांनी केलेले चित्रीकरण जगभर आणि अमेरिकेत सर्वत्र पाहिले गेले. नि:शस्त्र पर्यावरणवादी एका अत्यंत छोट्या बोटीतून व्हेल वाचवण्यासाठी उभे ठाकले आहेत, प्राणघातक हार्पून तरीही आपले क्रूर काम करत आहे, ही दृश्ये जगाने पाहिली तेव्हाच ग्रीनपीस आधुनिक अमेरिकेच्या सामूहिक सदसद्विवेकबुद्धीमध्ये प्रवेश करती झाली. सर्वात प्रभावी वक्ता किंवा अत्यंत प्रतिभावान लेखकसुद्धा व्हेलच्या शिकारीला आपल्या सर्व शब्दांनिशी इतके मोठे आव्हान देऊ शकला नसता, अशी टिप्पणी लेखक करतो.
सरकार किंवा सरकारी यंत्रणा कधीकधी पर्यावरणीय खटल्यांबाबत न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकते. ह्याचे उदाहरण देताना लेखक सांगतो की, अशी न्यायालयीन यंत्रणा राजधानीच्या ठिकाणी किंवा प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी असल्यास वेळ, होणारा खर्च आणि दूर अंतरावर असल्याने होणाच्या गैरसोयी हे सर्व विचारात घेणे न्यायाचे ठरते. पण असे होत नाही. ह्याचे करुण विनोदी उदाहरण म्हणजे २०१९ च्या आसपास गोवा राज्यातील सर्व पर्यावरणविषयक खटले, दावे हे पुणे येथील राष्ट्रीय हरित अभिकरणात चालवण्याऐवजी दिल्ली इथे चालवावेत, असा हुकूम केंद्रीय वनखात्याने जाहीर केला. दिलेले कारण विनोदी होते – पुणे ते गोवा ये-जा करण्याची सोय फारशी चांगली नाही! (प्रत्यक्षात पुणे-गोवा बससेवेचे मोठे जाळे आहे आणि दिवसातून दोन्ही बाजूनी किमान २० बसगाड्या सुटत असतात.) गोव्यातील बेकायदा खाणींविरुद्ध लढणाऱ्या मध्यमवर्गीय लोक, संस्था ह्यांना पुणे-गोवा बसपेक्षा दिल्ली-गोवा विमानप्रवासाच्या खर्चात पाडायचे, म्हणजे लढ़ाच कमकुवत होईल, अशी ती योजना होती. अर्थात हे टिकले नाहीच.
अशा खटल्यांबाबत न्यायाधीश अथवा वकील असे निर्णय देण्यासाठी सक्षम असणे, हाही एक घटक असतो. २०२० मध्ये जुही चावला ह्यांनी ५-जी मोबाईल तंत्रज्ञानाचे धोके त्याला सरसकट परवानगी देण्याआधी न्यायालयांनी तपासावेत, इतकी साधी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यात तथ्य होते. ह्या तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आता जगभर मुद्रित स्वरूपात उपलब्ध असूनही न्यायालयाने चावला ह्यांनाच पंचवीस लाख रुपये दंड ठोठावला. काल्पनिक गोष्टीत कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून! ह्याचे कारण म्हणजे न्यायाधीशांची सदर विषयात तज्ज्ञता तर नव्हतीच, पण माहिती घेण्याइतकी तयारीही नव्हती. सुदैवाने भारतात आजवर निदान सर्वोच्च न्यायालयात अद्याप असले प्रकार फारसे घडत नाहीत, असे निरिक्षण हे उदाहरण देताना लेखक नोंदवतो.
पुरुषप्रधान मानसिकतेचा अडथळा
सर्वच क्षेत्रे ही आपलीच मक्तेदारी असे समजणारा पुरुषप्रधान मानसिकतेचा समाज हीसुद्धा पर्यावरणसंरक्षण विषयातील मोठी अडचण आहे. रँचिल कार्सन ही मूळची सागरी जीवनातील संशोधक आणि निसर्गशास्रज्ञ. पण तिने कीटकनाशकांविरूद्ध आवाज उठवताच, त्यांच्या लॉबीने तिला चुटकीसरशी ‘सूडबुद्धीने पेटलेली’, ‘हिस्टेरीकल’ आणि ‘चेटकीं’ ठरवून टाकले. टाइम्स मासिकाची ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून ग्रेटा थनबर्ग निवडली जाताच डोनाल्ड ट्रंप ह्यांनी तिला तत्काळ ‘चिल’ असा सल्ला दिला. मेधा पाटकरांना सी.आय.ए. एजंट वगैरे किताब देऊन झाले आहेतच. अशा शेलक्या संबोधनांमुळे मूलतः स्त्री-आंदोलक काय म्हणत आहेत, त्याकडे गंभीरपणे न पाहता त्यांचे कष्ट वाया जातात अथवा दुर्लक्षित राहतात.
आजचा जमाना सामाजिक माध्यमे आणि सहज परवडतील अशा साधनांचा आहे. सर्वसामान्य व्यक्तींना सामाजिक माध्यमे वस्तुस्थिती नोंदवण्याची, सावधानतेचे इशारे देण्याची, शास्त्रीय निरीक्षणे नोंदवण्याची प्रचंड क्षमता देतात. ह्यात त्यांना त्यांच्याकडील मोबाइल अॅप्स, स्मार्ट फोन्स, कॅमेरे, आयपॅड असल्या सर्व आयुधांचा उपयोग होतो. तो अनेकवेळा शास्त्रीय संशोधनांनाही उपयुक्त ठरतो. सिटीझन सायन्स अशी एक शाखा निर्माण होण्यात सामाजिक माध्यमांचा मोठा वाटा आहे.
२०१५ साली, वनस्पतीशास्त्रज्ञांनी ‘magnificent Sundew’ नामक झाडाला ‘शोधले गेलेले पहिलेवहिले झाड’ हा सन्मान फेसबुकवर दिला. एका हौशी भटक्या संशोधकाने ब्राझिलमधील एका दुर्गम डोंगरात त्याचे प्रकाशचित्र (फोटो) घेऊन फेसबुकवर टाकले. आजवर विज्ञानाला हे झाड माहीत नव्हते आणि मुख्य म्हणजे ते ‘गंभीर स्वरूपाच्या धोक्यात’ ह्या वर्गवारीत टाकावे लागण्याइतके दुर्मिळ होते. २०१५ साली पक्षीशास्त्रज्ञ विक्रम ग्रेवालने १८४० सालातील ब्ल्यू पिट्टा नामक एका पक्ष्याचे जुने रेखाटन फेसबुकवर ‘भारतातील विवादास्पदरीत्या सर्वाधिक दुर्मिळ पक्षी’ अशा ओळीसह टाकले. (म्हणजे तो ‘सर्वांत दुर्मिळ’ आहे हा दावा विवादस्पद ठरू शकतो अशा अर्थी.) त्यावर काही लोकांनी असा दावा केला की वन्यअवस्थेत सदर पक्ष्याचा, भारतात काढला गेलेला एकही फोटो उपलब्ध नाही. प्रिया सिंग नामक संशोधिकेचे ह्या सर्व प्रकाराकडे लक्ष गेले आणि तिला कळले की मिझोराममधील डाँपा व्याघ्रप्रकल्पातील कॅमेरा ट्रॅपमध्ये ह्या पक्ष्याची छबी नोंदली गेली आहे. मग तिने ते प्रसिद्ध केले. ज्ञान, माहितीची समाजमाध्यमांवरून होणारी ही आवकजावक थक्क करणारी आहे, असे लेखक म्हणतो.
पश्चिम बंगालमधील गोरुमारा राष्ट्रीय उद्यानातला उत्तर धूपझोरा रस्ता उद्यानाच्या बरोबर मध्यातून जातो. २०१३ पासून तिथे काम करणारी स्पोआर नामक संस्था अशी मागणी करत होती, की सदर रस्त्यावरून रात्रीच्या वाहतुकीला बंदी करावी. २०१६ मध्ये तत्कालीन जिल्हान्यायाधीशांनी त्याला मान्यताही दिली होती. पण नेहमीची रड – ह्या बंदीची अंमलबजावणी कधीच झाली नाही. स्पोआरला मग वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाने तयार केलेल्या रोडवॉच ह्या अॅपचा शोध लागला. त्याच्या सहाय्याने जेव्हा त्या संस्थेने वेगवान मोटारीखाली येणाच्या प्राण्यांचे एक हजारपेक्षाही अधिक फोटो जिल्हान्यायाधीशांना दाखवले, तेव्हा मात्र तो रस्ता वाहतुकीसाठी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा बंद करण्यात आला.
आज देशभरात, विशेषत: महाराष्ट्रात पर्यावरणभान वाढते आहे. समाज सजग होतो आहे. छोट्यामोठ्या चळवळी आपापल्या परीने काम करताना दिसून येतात. मात्र पर्यावरणसंरक्षण, संवर्धन, जागृती, कृती ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूह ह्यांच्यासाठी पर्यावरणसंवादाची संकल्पना सोप्या भाषेत, तीही मराठीत कुणीतरी सांगण्याची आवश्यकता होती. पर्यावरण ह्या विषयाकडे अतिशय गांभिर्याने पाहणारे संतोष शिंत्रे ह्यांनी ‘पैस पर्यावरणसंवादाचा’ ह्या अतिशय कष्टपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाने ती पूर्ण केली आहे. एकुणच आज अतिशय महत्त्वाच्या अशा भारतातील पर्यावरणसंवादावरील पुस्तकाची उणीव ह्या ग्रंथाने भरुन काढली आहे, एवढेच नव्हे तर मराठीतील संशोधनपर ग्रंथांच्या यादीत मोलाची भर घातली आहे, हे निश्चित. ह्या पुस्तकाला राज्यशासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ह्या पुस्तकाची निवड केसरी मराठा ट्रस्ट संस्थेतर्फे साहित्यसम्राट न.चिं. केळकर ह्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिल्या जाणाऱ्या २०२४ च्या ‘केळकर ग्रंथोत्तोजक पारितोषिका’साठी झाली आहे, हीसुद्धा एक आशादायक बातमी आहे. ह्यासाठी तर श्री.शिंत्रे अभिनंदनासाठी पात्र आहेतच.
ग्रंथलेखक संतोष शिंत्रे ह्यांचा परिचय:
- पुणे विद्यापीठातून ‘औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र’ विषयात पदव्युत्तर शिक्षण.
- जैवतंत्रज्ञानाधारित संशोधन उपकरणांच्या विक्री-विपणनात पुढील सतरा वर्षे.
- पत्रकारिता, तांत्रिक लेखन, ई-लर्निंग ह्यामधील पुणे विद्यापीठाच्या पदविका.
- ‘ग्रे सेल्स’ हा व्यावसायिक संहितानिर्मितीचा स्वतंत्र व्यवसाय.
- सजग पर्यावरण पत्रकारिता. अग्रगण्य दैनिके आणि नियतकालिके ह्यांमधून सुमारे १५० लेख प्रकाशित.
- निसर्ग-पर्यावरण, कथा, कोश इत्यादी अन्य १६ पुस्तके प्रकाशित
- महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका ह्यांचा २०२१ साठीचा वाङ्मय लेखन (पर्यावरण) पुरस्कार.
- आजवर दोन वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित.
- महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, माहिम सार्वजनिक वाचनालय, पुणे महानगरपालिका, ह्यांचे पुरस्कारही प्राप्त.
परीक्षण लेखक निवृत्त माहिती उपसंचालक असून ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
मोबाइल : ९४२२४१३८००
सिंधुदुर्ग
