रोहन आणि सानिका दोघे दोन वेगवेगळ्या खंडात राहून आपापले करिअर आणि त्यांचे दूरस्थ वैवाहिक जीवन सांभाळत होते. पण एक दिवस त्यांनी समन्वयाने घटस्फोट घ्यायचे ठरवून सुटकेचा श्वास घेतला.
पुण्यात शिकायला आला एका छोट्या गावातून. नवीन भाषा, नवीन जीवनशैली, गतिमान वाहतूक ह्यांच्याशी जुळवून घेता घेता आता फ्लॅट घेतलाय, ज्याचा EMI भरतोय; पण गावाकडे मागे सोडलेले घर आठवून मन उदास होते. असा हा “महादेव” हल्ली नाव फक्त “देव” सांगतो – कारण सुटसुटीत आणि कूल आहे ते.
नाईक आजीआजोबा आताच कॅनडामधून मुलीच्या मुलाला सहा महिने सांभाळून परत आलेत. आणि आता एका महिन्याने त्यांना मुलाकडे ऑस्ट्रेलियात जायला हवे, कारण ती दोघेही आपापल्या टूर्सवर निघणार आहेत. तिथल्या नातवंडांचे बेबी सीटिंग करायचे आहे. ह्या सगळ्या धावपळीत आजींच्या गुडघेदुखीकडे दुर्लक्ष होतेय आणि नाईक आजोबा त्यांच्या कट्ट्यावरच्या मित्रांना भेटून निवांत गप्पा मारणे मिस करीत आहेत.
घडतेय ना हे सगळे आजूबाजूला आपल्या! सतत एक प्रकारची धावपळ चालू आहे. आयफोन, फेस टाईम, आणि गॅजेट्स आहेत, आरामाचा विमानप्रवास आहे, रोबो झाडू आहे, – सगळे आहे दिमतीला; पण परवड काही संपत नाही. आर्थिक वृद्धी होतेय पण प्रचंड विषमताही आहे समाजात. जीडीपी वाढतोय पण त्याचबरोबर रस्त्यावरचे अपघात आणि सायबरक्राईमचे प्रमाणही वाढतेय. जीवनशैलीचे आजार, रात्रीची शिफ्ट, जेट लॅग, आंतरराष्ट्रीय प्रथितयश शाळेत प्रवेश, जेईई क्रॅक करायची, सीएचा शेवटचा प्रयत्न आणि बरेच काही! ह्या सततच्या धावपळीत आपली शारीरिक आणि मानसिक दमछाक तर होत नाही ना? आत्मपरीक्षण करायला हवे.
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून हृदयतज्ज्ञ आणि मधुमेहतज्ज्ञ डॉक्टरांबरोबर काम करत असताना लाईफस्टाईल आजारांना आमंत्रण देणारी मंडळी बघितली. २८ ते ३८ वयोगटातले हे स्त्री-पुरुष चांगल्या कंपन्यांमध्ये, मोठ्या पदावर, ६ आकडी पगार घेणारे होते. ते जेव्हा हृदयविकाराची आणि डायबिटीस, बीपीची लक्षणे दाखवायला डॉक्टरकडे जायचे तेव्हा त्यांना “तणावामुळे निर्माण झालेले” (stress induced) असे लेबल लावून त्यांची रवानगी समुपदेशनासाठी माझ्याकडे केली जायची. ह्या लोकांशी बोलताना लक्षात आले की जैविक घड्याळ (Circadian rhythm) बिघडल्याने त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे.
बऱ्याचवेळा लोकांचे देशाबाहेरील क्लायंट किंवा सहकारी असतात. त्यामुळे त्यांची दिनचर्या स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्त ह्यांना विसंगत असते. आजूबाजूला सगळे ‘दिवस’ जगत असतात तेव्हा झोपण्याचा प्रयत्न करणे आणि जेव्हा बाकीच्यांची रात्र होते तेव्हा कृत्रिम उजेडात आपला दिवस सुरू करणे, ह्याला “घोस्ट लाइफस्टाइल” म्हणतात. ह्यामुळे जैविक घड्याळ (circadian rhythm) बिघडते. जेवणाच्या व्यायामाच्या वेळा विचित्र होतात. सामाजिक संपर्क तुटतो. नातेसंबंधांमध्ये ताण येऊ लागतो आणि अर्थातच ह्या सगळ्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
ह्याचबरोबरीने सध्या कामावरून काढून टाकले जाण्याच्या भीतीने अनेकजण ग्रासलेले आहेत. AI बऱ्याच लोकांची जागा घेत आहे आणि कधीही आपला नंबर लागेल ह्या भीतीखाली लोक आहेत. वरून आलेली एखादी मेल, सहकाऱ्यांमध्ये चालू असलेली खुसपुस, “we need to talk” असा बॉसचा मेसेज ह्यातले काहीही माणसाला चिंताग्रस्त करायला पुरेसे ठरते. स्वतःच्या क्षमतांवर अविश्वास आणि भविष्याबद्दल अनिश्चितता माणसाला असुरक्षित करून टाकते. कामाच्या सध्याच्या ढिगाऱ्यामधून वेळ काढून लोक AI tools शिकणे, नवीन कौशल्ये आत्मसात (upskilling ) करणे ह्या गोष्टी करत आहेत. अर्थातच दिवसाचे २४ तास पुरेसे न वाटून burnout त्यांच्या वाट्याला येत आहे.
कोरोना व्हायरस साथीने work from home चे दालन उघडले आणि मग बरेचजण The always ON trap मध्ये अडकायला लागले. कधीही आणि सतत उपलब्ध राहण्याची निकड भासायला लागली आणि मग सवय लागली. बरेचजण त्यांच्या फोनमध्ये मेल्स, स्लॅक, किंवा टीम्स, सारखे चाचपत असतात. ह्यामुळे अतिसतर्कता (hypervigilance) निर्माण होते ज्यामुळे cortisol नावाच्या ताण निर्माण करणाऱ्या संप्रेरकाची शरीरातील पातळी वाढते. ज्यामुळे ताण-तणाव – चिंता – निराशाचे चक्र चालू राहते.
आर्थिक प्रगतीचा अथक ध्यास मानसिक आरोग्य संकटाला खतपाणी घालत आहे का? (The Burnout economy: poverty and mental health) ह्या शीर्षकाचा अहवाल UN चे विशेष वार्तहार ऑलिव्हर डे स्क्खुटर ह्यांनी २०२४ मध्ये सादर केला. जगभरात भांडवलशाही समाज आर्थिक प्रगतीच्या मागे लागल्याने समाजाच्या वंचित घटकाला जास्त प्रमाणात मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्रांतीपासून “प्रगती = आर्थिक वृद्धी” हे समीकरण जगभर ग्राह्य धरले जाऊ लागले. अनेक सरकारे, जागतिक व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय संस्था ह्याच धोरणाचा अवलंब करतात आणि सामाजिक व पर्यावरणीय बाबींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो.
जागतिक आरोग्य संघटना WHO च्या मते जागतिक लोकसंख्येच्या ११% जनता मानसिक आजारांनी ग्रस्त आहे आणि कमी उत्पन्न असणाऱ्यांना जास्त उत्पन्न असणाऱ्यांच्या तुलनेत निराशा, चिंता आणि इतर मानसिक आजार होण्याचे प्रमाण तीन पटीने जास्त आहे. मोठ्या व्यवसायांचे मोठे शिलेदार काहीतरी आक्रमक लक्ष्य ठरवतात. परिणामी, अन्नसाखळीच्या तळाशी असणाऱ्या कामगाराला रोज १० ते १२ तास काम करावे लागते. International labour organisation च्या आकडेवारीप्रमाणे भारत दररोज जास्त तास काम करावे लागणाऱ्या देशांमध्ये अग्रणी आहे. स्टार्टअप ट्रेण्ड सुरू झाला तेव्हा Hustle culture अर्थात ‘धडपड संस्कृती’चे जोरदार स्वागत झाले; पण हळूहळू त्याचे रूपांतर कॉर्पोरेट शोषण, कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन, आणि मानसिक आरोग्याचे सावट, ह्यांत तर होते नाही ना हे बघणे आवश्यक आहे. बाकी अनेक प्रगत देशांमध्ये अंमलात येणारे ‘right to disconnect’चे bill आपल्याकडे सादर झाले आहे, पण अजून पास झालेले नाही. रात्री आपला फोन, लॅपटॉप बंद करण्याचा अधिकार मागावा लागत आहे ही खंत आणि काळजीची बाब आहे.
ही “उंदीर शर्यत” वेग आणि उत्पादकता ह्यांना अधिकाधिक महत्त्व देत आहे पण त्यामुळे माणसाचा समतोल ढळत आहे.
आपल्या मनाला आणि शरीराला होमिओस्टेसिस (Homeostasis) ही प्रक्रिया आवश्यक असते. ह्या प्रक्रियेमुळे शरीराचे तापमान, रक्तातील साखरेची पातळी, शरीरातील द्रवांचे प्रमाण ह्यांसारखे महत्त्वाचे घटक निरोगी मर्यादेत ठेवले जातात. आपल्यासमोरचे खरे आव्हान केवळ ह्या वेगवान प्रगतीच्या युगात टिकून राहण्याचे नाही, तर ह्या प्रवासात समतोल राखता येऊन आपला माणूसपणा जपण्याचे आहे.
ह्यासाठी समाज आणि राष्ट्रीय पातळीवर, पॉलिसीमध्ये महत्त्वाचे बदल व्हायला हवेत. ते होतील तेव्हा होतील, तोपर्यंत वैयक्तिक पातळीवर आपण काही बदल नक्की करू शकतो.
आपण काय करू शकतो बघूया.
आपल्या ‘स्व‘ ची किंमत जर नोकरी, हुद्दा, पगार ह्या गोष्टींवरून ठरवली गेली तर नक्कीच आत्मविश्वासाला तडा जाणे, सतत तुलना करत राहणे, इतरांकडून आपल्याला मान्यता मिळालीच पाहिजे असा हट्ट असणे असे त्रास वाट्याला येतात. म्हणून ‘स्व’ची किंमत अशा materialistic आणि अस्थिर गोष्टींवरून न ठरवणे हेच उत्तम.
ह्यासाठी एक उपक्रम करू या. ‘माझी आयुष्याची पाच जीवनमूल्ये (5 Core values I live by)’ आपल्या डायरीमध्ये लिहून काढूया.
जीवनमूल्ये आयुष्याची मार्गदर्शक तत्त्वे असतात. आपण आपले आयुष्य कसे जगतो हे ती ठरवतात. आपण कठीण परिस्थितीचा सामना करत असतो, तेव्हा ही मूल्ये एखाद्या होकायंत्रासारखे (Compass) काम करतात, आपल्याला योग्य दिशा दाखवतात.
ही जीवनमूल्ये लिहून ठेवण्यासाठी खालील मुद्द्यांचा आधार घेता येईल:
- आरोग्याशी संबंधित (Health related)
- कुटुंबाशी संबंधित (Family related)
- कामाशी/नोकरी–व्यवसायाशी संबंधित (Work related)
- समाजाशी संबंधित (Society related)
- आणि शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, माझा आंतरिक ध्यास/माझे जीवनाचे ध्येय काय आहे? (What is my calling?)
हा दस्तऐवज स्वतःबद्दल मनात शंका निर्माण करणाऱ्या प्रसंगांमध्ये खूप उपयोगी पडतो आणि आपली नौका स्थिर ठेवायला मदत करतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कामाव्यतिरिक्त आपल्याला समाधान देणाऱ्या, काहीतरी साध्य केल्याचा आनंद देणाऱ्या गोष्टींची नोंद घेत रहाणे. बागकाम, देशाटन, ट्रेकिंग, चित्रकला, क्रोषे, कविता असे आपले सगळे छंद नुसते जोपासले पाहिजेत असे नाही तर साजरे केले पाहिजेत. ह्यामुळे आनंद आणि प्रेरणेसाठी कारणीभूत असणारे चार रासायनिक संदेशवाहक (Chemical messengers) मेंदूत स्रवतात आणि त्यांच्यामुळे आपल्या भावना, उत्साह आणि मानसिक आरोग्य नियंत्रित होते.
हे चार रासायनिक संदेशवाहक (DOSE) खालीलप्रमाणे आहेत :
डोपामाइन (Dopamine) – प्रेरणेचे रसायन (The Motivation Chemical)
डोपामाइन आपल्या मेंदूची ‘पुरस्कारयंत्रणा’ (Reward System) चालवते. कृती करण्याची, लक्ष केंद्रित करण्याची, आणि ध्येय गाठण्याची प्रेरणा देते. डोपामाइन वाढवायचे तर लहान-लहान यश साजरी करणे, नवीन काहीतरी शिकणे चालू ठेवले पाहिजे.
ऑक्सिटोसिन (Oxytocin) – प्रेम आणि विश्वासाचे रसायन (The Love & Trust Chemical)
ऑक्सिटोसिन सामाजिक बंध, विश्वास आणि जवळीक निर्माण करते. प्रियजनांबरोबर वेळ घालवणे, कुणालातरी मदत करणे आणि हो, पाळीव प्राण्यांबरोबर वेळ घालवणे, ह्याने ऑक्सिटोसिन वाढायला मदत होते.
सेरोटोनिन (Serotonin) – मूड स्थिर ठेवणारे रसायन (The Mood Stabiliser)
जेव्हा आपल्या शरीरात सेरोटोनिनची पातळी संतुलित असते, तेव्हा शांत, भावनिकदृष्ट्या स्थिर, आणि आयुष्याबद्दल समाधानी वाटते. नियमित व्यायाम करणे, ध्यान (Meditation practice) करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे (Gratitude practice) ह्याने सेरोटोनिन वाढते.
एंडॉर्फिन (Endorphins) – वेदनाशामक रसायन (The Pain Reliever)
एंडॉर्फिन वेदना कमी करण्यासाठी तात्पुरती अत्यंत आनंदाची (Euphoria) भावना निर्माण करतात. जसे की, धावल्यानंतर येणारा ‘रनर्स हाय‘. एंडॉर्फिन वाढवायला सणसणीत व्यायाम करावा, आणि साहसी खेळ, मोहिमा, ह्यांत भाग घ्यावा.
अजून एक महत्त्वाचे आत्मपरीक्षण आपण सर्वांनी नक्कीच केले पाहिजे. आर्थिक वाढीवर केंद्रित असलेल्या ह्या युगात, खऱ्या मानसिक आरोग्यासाठी माणूस यशाची व्याख्या काय करतो हे बदलणे आवश्यक आहे. आणि तीन प्रश्नांची आपली आपली उत्तरे शोधली पाहिजेत
१) माझ्यासाठी खरी श्रीमंती काय आहे? (What’s real richness for me?)
श्रीमंती मोजण्याचे मापदंड खरेतर मनःशांती, उत्तम आरोग्य, नात्यांमध्ये आपलेपणा, वेळेचे स्वातंत्र्य, स्वतःच्या मूल्यांनुसार जगण्याचे धैर्य, समाजाला काहीतरी परत देण्याची क्षमता, हे असायला हवेत.
२) किती पुरेसे आहे? (how much is enough)
अधिक कमावण्याच्या धावपळीत मी माझे आरोग्य, नाती, किंवा आयुष्यातील आनंद तर गमावत नाही ना? माझ्या इच्छा आणि गरजा ह्यातील फरक मला समजतो आहे का? अधिक मिळवण्याची माझी धडपड भीतीतून आहे की खऱ्या अर्थाने काही मूल्य निर्माण करण्याच्या प्रेरणेतून?
३) आणि कुठे थांबायचे? (when to stop)
थांबणे म्हणजे स्वप्न सोडणे आणि जगणे थांबवणे नव्हे; तर “आता पुरेसे आहे” हे ओळखण्याचे शहाणपण आणि कृतार्थतेची भावना!
अर्थात केवळ वैयक्तिक पातळीवर उपाय शोधून आपण या व्यवस्थाप्रणित मानसिक आरोग्य संकटाचे निवारण करू शकत नाही. देशाने आता केवळ ‘जीडीपी’ वाढवण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून मानवी आरोग्य, समाजाशी जोडलेले असणे, नैसर्गिक परिसंस्थांकडे बघण्याचा सुदृढ दृष्टिकोन, ह्यांना देशाच्या प्रगतीचे खरे दर्शक मानणाऱ्या समग्र निकषांचा (Holistic metrics) स्वीकार केला पाहिजे.
मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक
अतिशय सुंदर लेख !
स्वतःचे जैविक घड्याळ आणि संप्रेरके नियंत्रित करून मानसिक आणि शारीरिक आजाराला दूर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
याबरोबर नैतिक मूल्ये आणि सुदृढ कुटुंब व्यवस्था आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना सक्षम ठेवण्यास मदत करतात
खूपच उदबोधक लेख आहे.. वैयक्तिक, भौतिक, सामाजिक पातळीवर करण्याचे बदल नक्कीच खुप उपयोगी असे मार्गदर्शन.. खरी श्रीमंती म्हणजे समृद्धी… विचारांची, असलेल्या रिसॉर्सस जपणे आणि वाढवणे 🙏🏻🙏🏻
हा लेख मनाला स्वतःशी संवाद साधायला भाग पाडतो. 👌👌
आजच्या जगात यश, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावताना आपण आपल्या मनाचा आवाज ऐकायचाच विसरलो आहोत. “आनंद नेमका कशात आहे?”, “आपण का धावत आहोत?” आणि “या धावण्याचा शेवट कुठे आहे?” असे अनेक प्रश्न हा लेख सहजपणे आपल्या मनात जागे करतो.
DOSE या चार गोष्टींचे केलेले सोपे आणि जीवनाशी जोडलेले संदर्भ खूप आवडले. पण त्याहूनही जास्त भावला तो संदेश—छंद जपा, नाती जपा, स्वतःसाठी वेळ काढा आणि प्रत्येक छोट्या आनंदाचा उत्सव साजरा करा. खरा आनंद बाहेर कुठे नसतो; तो आपल्या जगण्याच्या पद्धतीत दडलेला असतो, याची जाणीव हा लेख करून देतो. मला वाटतं हे माझ्यासाठी तर खूपच लागू पडते.
“माझ्यासाठी खरी श्रीमंती काय?”, “किती पुरेसे आहे?” आणि “कुठे थांबायचे?” हे तीन प्रश्न तर प्रत्येकाने आयुष्यात स्वतःला विचारलेच पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरेच माणसाला खऱ्या अर्थाने जगण्याचे उद्दिष्ट दाखवू शकतात. असेच मागे एकदा DSK च्या जावयाने एका व्हिडिओ मध्ये सांगितले होते की कोणतीही वस्तू विकत घेताना – मला गरज आहे का? मला शोभेल का? आणि मला परवडेल का? याचे उत्तर “हो” असेल तरच ती वस्तू विकत घ्यावी.
एक छोटी सूचना मात्र नक्की करावीशी वाटते. मानसिक आरोग्य जपण्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाचेच आहेत; पण काही वेळा तज्ज्ञांची ही मदत घेणेही तितकेच आवश्यक असते. त्याचाही थोडासा उल्लेख असता तर अजून एक दिशा मिळाली असती.
एकूणच, हा लेख केवळ वाचून संपत नाही (मी क्रमशः म्हणत नाही आहे 😀); तो मनात रेंगाळतो, विचार करायला लावतो आणि आयुष्याकडे नव्या उमेदीने पाहण्याची प्रेरणा देतो. अशा संवेदनशील, अभ्यासपूर्ण आणि आमच्या सारख्या गरजूंना दिशा देणाऱ्या लेखनासाठी लेखिका व मानसोपचार तज्ञ अपर्णा मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
असेच विचारप्रवर्तक लेख आपल्याकडून सातत्याने वाचायला मिळोत, हीच मनापासून शुभेच्छा. 🎉💐💐🌸🌸🎉
Excellently written article Aparna. This details out most of the issues faced by modern city dwellers in their life.
What I liked most is that you have not only mentioned the symptoms or the problem statement but also have suggested solutions.
The exercise of writing 5 core values and more importantly introspecting and post meditation or self-dialogue deciding how much is enough, when to stop and what matters most to me? (My understanding of what is my richness) Is invaluable.
पूर्ण पणे अभ्यास करून आणि अनुभव सिद्ध असा हा लेख आहे. आम्ही ह्या लेखाचे घरात सार्वजनिक वाचन केले.
मला लेखिकेने केलेले सध्याच्या परिस्थितीचे विवेचन व त्यावरील दिलेले उपाय आवडले. तसेच DOSE बद्दल किती सोप्या भाषेत लिहिले आहे. धन्यवाद🙏.
प्रत्यक्ष भेट घडेल तेव्हा तुमचे अजून जास्त अनुभव ऐकण्यास आम्ही (बायको आणि मी) उत्सुक आहोत.
Excellent. You have described several stressors of today’s life. This article addresses the IT workforce mainly. This sector has been the most well paying one for middle class Marathi boys and girls. These well paying jobs have made it possible for many to experience an upward mobility, from lower middle to upper middle class. The upwards mobility comes at a cost which you have well described in your article. Disruption of natural circadian rhythm, loss of privacy and me-time, exhaustion of always being connected and on call and poor lifestyle are the results of chasing a high paying job.
You have discussed some practical solutions too.
There is another, maybe deeper factor at work, which is increased consumption, often conspicuous consumption.
Aspiring for a good life often ends up spending more on expensive, bright shiny objects, from the latest IPhone to a new car and dining out or ordering in.
The family expenses too go up from private tuitions to foreign holidays.
This consumption is often funded by loans, and this well earning class is constantly tempted by advertisers and lenders alike promising them cheap loans.
There is a way of reducing this burden and the vicious circle of working hard to spend more and then to work harder to keep up with the expenses.
There is a need to look at the consumption pattern and to plan and prioritise.
Excessive and often unwarranted consumption does not make a person more successful or happy. One does not have to show off and be in competition with your colleagues. This is not a way to validate your success to yourself and others. There are better ways to do it.
Take pride in your work and honest efforts to provide for your family. Rediscover simple joys in life, being with family, pursuing hobbies, and alway learn something new. Be engaged in social work where you can spend some of your hard earned money, be good and feel good.
Find joy in doing rather than possessing.
Returning to a simpler lifestyle, reducing excessive consumption, be prepared for the changes to come and pay attention to the basic needs of life, simple food, sleep, rest,relaxation, recreation and relationships.
This discussion is often a part of my conversation and treatment of many such young people who come to me, highly stressed.
Dr Shreekant Joshi
Psychiatrist