आपणच आपल्या नद्यांचे सर्वात मोठे प्रदूषक आहोत का?

दैनंदिन जीवनातील रसायनांचा अदृश्य प्रवास आणि ‘इको लेबल’ची नव्याने गरज

नदी प्रदूषण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम कारखान्यांचे सांडपाणी, शहरांतील मैला, प्लास्टिकचा कचरा किंवा धार्मिक विसर्जन ह्यांची चित्रे उभी राहतात. पण, आपण स्वतःकडे कधी बोट दाखवले आहे का?

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेली टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, डिटर्जंट, सौंदर्यप्रसाधने, स्वच्छता उत्पादने, कीटकनाशके, औषधे, आणि इतर अनेक वस्तूंमधील रसायने अखेरीस कुठे जातात?

मी अनेक वर्षांपूर्वी मांडलेला हा प्रश्न आज अधिक तीव्र झाला आहे. हवामानबदल, वाढते शहरीकरण, औषधांचे अवशेष, मायक्रोप्लास्टिक्स, आणि हजारो कृत्रिम रसायनांच्या वाढत्या वापरामुळे आपल्या नद्यांवरील ताण पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वाढला आहे. मात्र ह्या समस्येची मुळे आजही तशीच आहेत—आपली दैनंदिन जीवनशैली.

१. नदी प्रदूषणाची सुरुवात आपल्या घरातून

‘लाईफ सायकल अॅनालिसिस’ ह्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून मी माणसाच्या दिवसातील प्रत्येक कृतीचा अभ्यास केला. उत्पादन तयार होण्यापासून ते त्याचा वापर आणि शेवटी त्याची विल्हेवाट—ह्या संपूर्ण प्रवासात पर्यावरणावर काय परिणाम होतो, ह्याचा मी शोध घेतला. ह्या अभ्यासातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला.

नदीतील ७० ते ८० टक्के प्रदूषणात सामान्य नागरिकांचा दैनंदिन रासायनिक वापर मोठा वाटा उचलतो. प्रत्येक व्यक्ती दररोज सरासरी ४० ग्रॅम जैविक विघटन न होणारी रसायने पाण्यात सोडते, असे मी माझ्या ह्या अभ्यासात नमूद केले आहे.

ही आकडेवारी अनेक वर्षांपूर्वीची असली, तरी तिच्यामागील वास्तव आज अधिक गंभीर झाले आहे.

२. आपल्या दिनचर्येचे रासायनिक वास्तव

‘दिनचर्येतील रसायनांचा वापर’ दर्शविणारा एक तक्ता खाली दिला आहे. ह्या तक्त्यात दात घासण्यापासून वाहन वापरण्यापर्यंतच्या पंधरा दैनंदिन कृतींचा अभ्यास करण्यात आला आहे.

तक्ता : दिनचर्येतील रसायनांचा वापर

क्र. क्रिया रसायने (माणशी वापर) कमीत कमी प्रदूषण लोकसंख्येनुसार
1 दात घासणे पेस्ट वा दंतमंजनमधून कमीत कमी २ ते ५ ग्रॅम फॉस्केट, कार्बोनेट्स, सुगंधी रसायने, रंग सर्फिक्टंट्स, मिश्री, तंबाखू ३० x २ ग्रॅम लाख ६० लाख ते २५० लाख ग्रॅम
2 दाढी (पुरुष) साबणातील ५ रसायने, सल्फेट, कार्बोनेट्स, सुगंधी द्रव्ये, अल्कली, स्टेअरिक अॅसिड, फोमिंग एजंट्स, इथेनॉल अमिन, कमीत कमी २ ग्रॅम वापर १५ x २ ग्रॅम लाख ३० लाख ग्रॅम
3 स्नान साबण रसायने सोडियम संयुग फॅटी ऑसिडची डिटर्जंट्स मधील सल्फेट, तेले इत्यादी, जास्तीत जास्त ६ ग्रॅम ३० x ४ ग्रॅम लाख १२० लाख ग्रॅम
4 शांपू (स्त्रिया-पुरुष) सल्फोनेटेड तेले, साबण इत्यादी अनेक तऱ्हेचे ५ x १ ग्रॅम लाख ५ लाख ग्रॅम
5 धुणावळ
(घर, लाँड्री इत्यादी)
डिटर्जंट्समधील रसायने ८ ते १५ ग्रॅम
अल्किल बेंझिन (Alkyl Benzene), ॲसिड इत्यादी
३० x ८ ग्रॅम लाख २४० लाख ग्रॅम
४५० लाख ग्रॅम
6 भांडी घासणे कार्बोनेट्स सिलिका ५ ते १० रसायने ग्रॅम फॉस्फेट्स ३० लाख x १० ३० लाख ग्रॅम
7 बाथरूम शौचालय सफाई पावडर ब्लिचिंग पावडर, निरनिराळी ॲसिड्स, सल्फेट, क्लोराईड, क्लोरीनयुक्त रसायने, फिनॉल इत्यादी
8 सौंदर्यसाधने अनेक प्रकारची १८ रसायने ३० लाख x ५ ग्रॅम १५० लाख ग्रॅम
9 देवपूजा नायट्रेट, थॅलेट्स, उदबत्ती, धूप २० लाख x २ ग्रॅम ४० लाख ग्रॅम
10 स्वयंपाकघर चहा, कॉफी, दूध, भाजीपाला, मसाले, पदार्थ टॅनिन, कॅफिन फॅट्स इत्यादी फॅटी ऑसिड्स, तेले, रस इत्यादी ३० लाख x २० ग्रॅम ६०० लाख ग्रॅम
11 विडी पान/मसाला, तंबाखू सुगंधी रसायने, टॅनिन, निकोटिन ५ लाख x १० ग्रॅम ५० लाख ग्रॅम
12 कीटकनाशके फवारणे, डास, झुरळे कार्बोनेट्स, नायट्रेट्स इत्यादी, केरोसीन २० लाख x १ ग्रॅम २० लाख ग्रॅम
13 मलमूत्र विसर्जन फॉस्फेट, युरिक ॲसिड, ॲसिटोन इत्यादी
14 औषधे अनेक रसायने
15 वाहन पेट्रोल, डिझेल, वंगण

त्यातून स्पष्ट होते की—

  • टूथपेस्टमध्ये फॉस्फेट्स, कार्बोनेट्स, रंगद्रव्ये आणि सुगंधी रसायने आहेत.
  • दाढीच्या साबणात आणि शेव्हिंग उत्पादनांमध्ये अनेक प्रकारचे सर्फॅक्टंट्स आणि कृत्रिम रसायने आहेत.
  • स्नानासाठी वापरल्या जाणाऱ्या साबण-शॅम्पूमधून डिटर्जंट्स आणि विविध रासायनिक संयुगे पाण्यात जातात.
  • कपडे धुण्यासाठी वापरले जाणारे डिटर्जंट्स, अल्किल बेंझिनसारखी संयुगे आणि इतर रसायने नदीपर्यंत पोहोचतात.
  • भांडी घासण्याची उत्पादने, बाथरूम क्लीनर, सौंदर्यप्रसाधने, देवपूजेतील सामग्री, स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ, कीटकनाशके, औषधे आणि वाहनांमधूनही विविध प्रकारची रासायनिक प्रदूषके पर्यावरणात मिसळतात.

हा तक्ता आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून देतो—नदी प्रदूषण हे फक्त कारखान्यांचे किंवा महानगरपालिकांचे अपयश नाही; ते आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज घडत असते.

३. रसायने दिसत नाहीत, पण परिणाम दिसतात

आज अनेक नद्यांमध्ये फेस निर्माण होणे, मासे मरून तरंगणे, जलचर जैवविविधतेत घट, पाण्याचा दुर्गंध, शेवाळाची अनियंत्रित वाढ आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण ही सर्व लक्षणे आपल्यासमोर आहेत. ह्यामागे केवळ सांडपाणीच नाही, तर घरगुती वापरातील हजारो रसायनांचे मिश्रणही कारणीभूत आहे.

आज संशोधनातून औषधांचे अवशेष, अँटिबायोटिक्स, हार्मोनल संयुगे, मायक्रोप्लास्टिक्स आणि ‘फॉरएव्हर केमिकल्स’ (PFAS) ह्यांसारख्या पदार्थांचाही नदी-परिसंस्थांवर गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

४. ‘इको लेबल’ : विस्मृतीत गेलेली दूरदृष्टी

ह्या लेखातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इको लेबल. बहुतांश भारतीय नागरिकांना आजवर माहीतसुद्धा नाही, अशी ही कल्पना.  

उत्पादन तयार करताना कमी प्रदूषण होणे, पुनर्वापर शक्य असणे, जैविक विघटन होणे, ऊर्जेचा कमी वापर होणे, आणि पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होणे—या निकषांवर उत्पादनांचे मूल्यमापन करण्याची संकल्पना म्हणजे इको लेबल.

भारतासाठी पर्यावरणस्नेही चिह्न म्हणून ‘मातीचा घडा’ (माठ) स्वीकारण्यात आला होता. त्यामागील विचार अत्यंत व्यापक होता—नैसर्गिक साधनसंपत्तीचा विवेकपूर्ण वापर, कमी ऊर्जा, पुनर्वापर आणि पर्यावरणाशी सुसंगत उत्पादन.

‘इको लेबल’ ही भारतातील नद्यांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी १९९० च्या दशकात शास्त्रज्ञांनी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी आणि अथक चळवळ होती. दुर्दैवाने, केंद्रसरकारने तिची अंमलबजावणी ऐच्छिक ठेवल्यामुळे उद्योगक्षेत्राने तिला अपेक्षित तेवढे महत्त्व दिले नाही. म्हणून ही संकल्पना व्यापक ग्राहक चळवळ बनू शकली नाही. 

आज बाजारात ‘ग्रीन’, ‘नॅचरल’, ‘इको फ्रेंडली’ अशा दाव्यांची रेलचेल आहे; मात्र प्रत्येक दावा वैज्ञानिकदृष्ट्या पडताळलेला असेलच असे नाही. त्यामुळे पर्यावरणपूरक उत्पादनांची निवड करताना ग्राहकांनी अधिक सजग होण्याची गरज आहे.

५. बदल फक्त सरकारने करायचा नाही

नदी स्वच्छ करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांच्या योजना राबविल्या जात आहेत. सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प उभे राहत आहेत. पण जर दररोज घराघरांतून हजारो टन रसायने गटारात जात असतील, तर केवळ नदी स्वच्छ करण्याच्या योजना पुरेशा ठरणार नाहीत.

समस्या निर्माण होण्यापूर्वीच ती टाळणे अधिक शहाणपणाचे आहे.

६. मग आपण काय करू शकतो?

  • गरज नसताना रसायनांचा वापर टाळणे.
  • जैविक विघटन होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देणे.
  • डिटर्जंट, क्लीनर आणि सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक टाळणे.
  • नैसर्गिक पर्याय उपलब्ध असतील तेथे त्यांचा स्वीकार करणे.
  • उत्पादन खरेदी करताना त्यातील घटक आणि पर्यावरणीय माहिती वाचण्याची सवय लावणे.
  • पर्यावरणपूरक उत्पादनांना प्राधान्य देऊन उद्योगांनाही जबाबदार उत्पादनासाठी प्रोत्साहन देणे.

मी अनेक वर्षांपूर्वी दिलेला इशारा आज अधिक समर्पक वाटतो. नदीप्रदूषणाचा विचार करताना आपण कारखाने, सांडपाणी किंवा प्रशासनाकडे बोट दाखवतो; पण दिवसातून अनेक वेळा आपल्या हातून नदीकडे जाणाऱ्या रसायनांकडे दुर्लक्ष करतो.

नदीचे प्रदूषण आपल्या बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात, धुणीभांड्यांत आणि दैनंदिन सवयींमध्ये सुरू होते.

नदी वाचवायची असेल, तर केवळ नदी स्वच्छ करून भागणार नाही; आपली जीवनशैली अधिक पर्यावरणस्नेही करावी लागेल. कदाचित नदी संवर्धनाची खरी सुरुवात आपल्या घरातील वॉशबेसिनपासूनच होते.

लेखक राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथून सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
हा लेख सर्वप्रथम ‘वनराई’च्या विशेषांकात (२०२४) प्रकाशित झाला होता. प्रकाशकांच्या परवानगीने, आवश्यक बदल करून, तो पुनःप्रकाशनासाठी येथे उपलब्ध करून देत आहोत.

Comments 4

  • डॉ. प्रमोद मोघे यांचा “आपणच आपल्या नद्यांचे सर्वात मोठे प्रदूषक आहोत का?” हा लेख कळकळीने लिहिला आहे व तो संशोधनावर आधारित आहे हे महत्वाचे.
    आपण आपल्या सवयीतून किती प्रदूषण करीत असतो याचे भान देणारा हा लेख काही माणसांना, वाचकांना स्वतःच्या सवयी व रसायनांचा, साबणाचा ल, perfumes यांचा अतिरेकी वापर करण्यापासून परावृत्त करेल असे वाटते.
    ‘इको लेबल” ही संकल्पना महत्वाची आणि अत्यावश्यक वाटते, हे लेबलिंग अमलात आणण्यासाठी बाबत सरकारने सकारात्मक पुनर्वीचार करावा असेही वाटते.

  • सर, छान सविस्तर माहिती दिली आहे. माणसाला स्वतःपुढे काहीही दिसत नाही…केमिकल वापरून सगळेच पाणवठे दूषित झाले आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

  • सर, छान सविस्तर माहिती दिली आहे. माणसाला स्वतःपुढे काहीही दिसत नाही…केमिकल वापरून सगळेच पाणवठे दूषित झाले आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

  • Thank you Dr. Moghe sir and Ajacha Sudharak.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *