पर्यावरणवादाचा तात्त्विक पाया

कोणत्याही धोरणाची मांडणी एकतर स्वयंसिद्ध, पायाभूत मूल्य (fundamental value) म्हणून करता येते किंवा त्या धोरणाची रचना इतर, सर्वसंमत पायाभूत मूल्यांवर आधारित असल्याचे दाखवूनही त्याची मांडणी करता येते.

धोरणाला पायाभूत मूल्य म्हणून मांडण्यात असा फायदा असतो की सर्वसंमत मूल्यांचा त्याला आधार असल्याचे सिद्ध करत बसावे लागत नाही. परंतु, धोरणाला पायाभूत मूल्य म्हणून मांडण्याचा तोटा असा असतो की ते ज्यांना मनापासून भावते त्यांनाच भावते. ज्यांना ते मूलभूत गृहीतक आपोआप भावत नाही त्यांच्या गळी ते मूलभूत गृहीतक उतरवता येत नाही, ते मूलभूत गृहीतक त्यांना कोणी ‘पटवून’ देऊ शकत नाही. हे मूल्य कुठून आले, तुम्हाला ते का योग्य वाटते, ह्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. त्याचे समर्थन केवळ “पाहिजे म्हणून पाहिजे” अशा हटवादानेच करावे लागते. त्याउलट, आपण मांडत असलेल्या धोरणाचा रास्तपणा जर, इतरांना आधीपासूनच मान्य असलेल्या इतर पायाभूत मूल्यांवरून अपरिहार्यपणे (necessarily) सिद्ध होत असल्याचे आपण दाखवू शकलो तर आपले ते धोरण इतर तार्किक व्यक्तींनाही मान्य करावे लागते.

“पर्यावरणासाठी पर्यावरणवाद” ह्या धोरणाला प्रतिस्पर्धी हट्ट म्हणून “स्वकेंद्रित भोगवाद” हे धोरण उपलब्ध आहे. कोणी म्हणाले की “मानवेतर सजीवांना किंवा निर्जीव निसर्गाला काही हक्क असतात हेच आम्हाला मान्य नाही” तर त्यांना पर्यावरणवाद कसा पटवून देता येईल?

“तुम्हाला जसे वागवलेले आवडेल तसेच तुम्ही इतरांना वागवा” हे Golden Rule मूल्य हजारो वर्षे जुने आहे. मानवी मनोवृत्तीत ते मूल्य बव्हंशी ‘मूलभूत मानवधर्म’ म्हणून साचेबद्ध (hard coded) झाले कारण तसे करणार्‍यांचा दीर्घकालीन स्वार्थच साधला गेला, तसे करणे उत्क्रांतीत रास्त, तार्किक ठरले. परस्परोपकार (reciprocal altruism) किंवा व्यावहारिक सहजीवन (transactional mutualism) ही धोरणे काही मानवेतर सजीवही पाळतात. परंतु, त्या मूल्यांचे पालन करणार्‍या कोणत्याही गटाचे सर्व सदस्य हे बव्हंशी तुल्यबळच असतात असे दिसते. कारण, सहकार्‍यासाठी त्याग करताना सहकार्‍याकडून परतफेडीची अपेक्षा नसते तेव्हा तो त्याग तार्किक उरत नाही. परतफेड न करणार्‍या सहकार्‍याला टाळण्याची, त्याचा तोटा करण्याची, किंवा इतर मार्गांनी त्याला ‘शिक्षा’ घडवून आणण्याची कुवत बाळगणार्‍या, ‘समतुल्य’ सजीवांनाच हे धोरणे परवडते. ती क्षमता नसते तेव्हा तो व्यवहार एकतर्फी बनतो आणि एकतर्फी व्यवहार करणे सजीवांच्या फायद्याचे उरत नाही, तार्किक उरत नाही. अत्यंत विषम सामर्थ्य असलेल्या सजीवांमध्ये केवळ शोषण/भक्षण/परजीवित्व, सहभोजित्व (commensalism), किंवा एकतर्फी उपकार हेच व्यवहार दिसतात. ते एकमेकांच्या (mutual) ‘हक्काचा’ आदर करताना दिसत नाही.

पुरेशी संसाधने आणि वेळ देऊन माणूस विरुद्ध पशू, माणूस विरुद्ध भाजीपाला, किंवा माणूस विरुद्ध दगड असे द्वंद्वयुद्ध जाहीर केले आणि दोघां प्रतिस्पर्ध्यांना सोडून दिले तर, बहुतेक सर्वच शक्यतांमध्ये माणूसच द्वंद्व जिंकेल. माणसा-माणसांमधील द्वंद्वात मात्र, कोण कोणाला मारेल ते खात्रीने सांगता येत नाही म्हणून कोणीच कोणत्याच माणसाला मारू नये असा कायदा बनतो. अगदी, नवजात बालकांनासुद्धा, पुरेशी संसाधने, शिक्षण, आणि वेळ मिळाल्यास ती कोणत्याही प्रौढ व्यक्तीचा सामना करू शकतीलच. त्याउलट, रुग्ण, अशक्त, वृद्ध झाल्यावरही आपले कोणी शोषण करू नये म्हणून रुग्ण, अशक्त, वृद्ध व्यक्तींच्या शोषणाविरुद्धचे नियम निरोगी प्रौढ व्यक्ती मान्य करतात. ज्याअर्थी, vegetative अवस्थेतील रुग्णांचा व्हेंटिलेटर बंद करण्याची नातेवाईकांना मुभा असते त्याअर्थी, आपली क्षमता जर मानवी क्षमतांऐवजी एखाद्या जनावर, भाजीपाला, किंवा दगडाइतकी उरली असती तर आपले आयुष्य हे क्षुद्र, संपवण्याच्या लायकीचेच झाले असते असे आपण मानतो. रुग्ण, अशक्त, वृद्ध व्यक्तींना संरक्षण दिल्यास त्यांची भविष्यकाळातील किंवा भूतकाळातील उत्पादकता वाढून समाजाला परतावा मिळण्याची शक्यता असते तसा काहीही लाभ मानवेतर प्राण्यांना संरक्षण देण्यातून मिळत नाही. म्हणून, तीव्र असमान पातळीवरील व्यवहारांचे नियम ठरवताना, गोल्डन रूलची आडकाठी होत नाही.

अशा प्रकारे, “मानवेतर सजीव आणि निर्जीव सृष्टीलाही काही हक्क असतात, त्यांचे जतन हे आपल्या स्वार्थासाठी न करता त्यांच्या हक्कांसाठीच करूया”, ह्या धोरणाला काही तार्किक आधार नाही. मानवेतर पृथ्वीला एक संतुलक देवता (Gaia) ठरवून निसर्गाला हक्क असल्याचे मानायचे असेल तर पर्यावरणवाद इतरांना पटवून देता येणार नाही. पाश्चात्य जगात मूल्ये ख्रिश्चन धर्मापासून मुक्त झाल्यानंतर करुणा, लीनता, इत्यादि धार्मिक परंपरेच्या भूमिका सेक्युलर वळचण शोधू लागल्या आणि ‘निसर्गासाठी निसर्ग’ ह्या धोरणाला तशा प्रकारचा ऐहिक धर्म मानता येईल.

त्याऐवजी, पर्यावरणवादाची मांडणी इतर पायाभूत तत्त्वांच्या आधारे, उदाहरणार्थ, “मानवांच्या भल्यासाठी पर्यावरणरक्षण” अशी करता येईल. अर्थात, त्यावर लगेचच प्रश्न उद्भवेल की कोणकोणत्या मानवांचे भले? एकंदर मानवजातीचे दीर्घकालीन भले, की, सध्या जिवंत सर्व/बहुसंख्य मानवांचे भले, की, त्यातही देश किंवा इतर भेदभाव करावेत?

ह्या पर्यायांमधून रास्त निवड करण्याचे निकष क्षुल्लक नाहीत. पर्यावरणावरील मानवी परिणाम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाटाघटींमध्ये ही दुविधा ठळकपणे दिसते. विकसित देश (उदा., अमेरिका, युरोप, जपान) म्हणतात की सर्वांनी प्रदूषण कमी करावे. त्याउलट, विकसनशील देश (उदा., चीन, भारत) म्हणतात की तुम्ही पुष्कळ प्रदूषण केलेत म्हणून तुमची प्रगती झाली, आता स्पर्धेत बरोबरी करण्यासाठी आम्हाला अधिक प्रदूषणाची संधी देऊन भूतकाळातील अन्यायाचे परिमार्जन करा.

देशांदरम्यानच्या असहमतीची ही समस्या व्यक्तींदरम्यानच्या पातळीवरही अस्तित्वात आहे. देशांमध्ये जशी विषमता आहे त्याहून अधिक विषमता देशांतर्गत नागरिकांमध्ये आहे. जे नागरिक विविध कारणांनी प्रगतीपासून दूर राहिले/ठेवले गेले, त्यांचा ‘विकास की पर्यावरण’ ह्या दुविधेविषयीचा प्राधान्यक्रम, ज्या नागरिकांची पूर्वीच उन्नतीच्या दिशेने वाटचाल झालेली आहे त्यांच्या प्राधान्यक्रमापेक्षा भिन्न असू शकतो. आजवरच्या प्रगतीसाठी पर्यावरणाची खूप हानी झालेली आहे. जे त्या प्रगतीचे लाभान्वित आहेत, ज्यांची प्रगतीची भूक आता भागलेली आहे, त्यांनी ‘ह्यापुढे पर्यावरणाचे रक्षण करूया’ असे म्हणणे इतरांना स्वार्थी, अभिजनवादी, आणि स्थितीवादी वाटू शकेल.

समाजाचे भले आणि व्यक्तींचे भले ह्या दोन ध्येयांमधील ताण, ‘सार्वजनिक संसाधनांची हेळसांड (tragedy of the commons)’ ह्या संकल्पनेतून स्पष्ट करता येतो. समजा, एका गावाची एक सामुदायिक चराऊ जमीन आहे. तिथे मर्यादित प्रमाणात गुरे चरली तर जमिनीचा कस टिकून राहतो आणि दीर्घकाळ गुरे चरवता येतात. कोणी तिथे प्रमाणाबाहेर चराई केली तर त्यांचा र्‍हस्वकालीन अतिरिक्त फायदा होतो, कदाचित दीर्घकालीन अतिरिक्त फायदाही होऊ शकतो, पण जमिनीचा कस कमी होतो आणि गावाचा मात्र तोटाच होतो. वरवर पाहता, गावाचा तोटा प्रत्येक व्यक्तीलाही प्रमाणशीर (pro-rated) भोगावाच लागतो. परंतु, नियम मोडणार्‍यांचा जो अतिरिक्त वैयक्तिक फायदा होतो तो त्या विभागल्या गेलेल्या तोट्यापेक्षा मोठा असू शकतो. अगदी, नियमभंगामुळे होणारा अतिरिक्त वैयक्तिक फायदा हा विभागल्या गेलेल्या तोट्यापेक्षा लहान असण्याची शक्यता असली तरी, ‘स्वतःचा एक डोळा फुटू देऊन प्रतिपक्षाचे दोन डोळे फोडणे’ ह्या धोरणाने ‘स्पर्धेसाठी समान संधींची परिस्थिती (level playing field)’ निर्माण करणेही काहीजणांना परवडू शकते. विशेषतः, ज्यांच्याकडे एवीतेवी कमीच गुरे असतात, नियमभंगाची शिक्षा म्हणून गमावण्यासारखेच ज्यांच्याकडे फारसे काही नसते (nothing to lose but their chains) त्यांच्यासाठी ती सापेक्ष किंवा निरपेक्ष उन्नतीची एक संधी असू शकते. खासगी जमीनमालकांनी स्वतःच्या मालकीची झाडे तोडण्यावर बंदी असते कारण समाजाला झाडांची गरज असते. हे धोरण म्हणजे एक externality (हलवायाच्या घरावर तुळशीपत्र) आहे कारण ह्या बंदीच्या बदल्यात, समाजाला ऑक्सिजन पुरवल्याबद्दल त्या वृक्षमालकांना सरकारकडून काहीही मोबदला मिळत नाही. अशा perverse धोरणांमुळे जनमत पर्यावरणवादापासून दूरच जाईल.

अशा प्रकारे, पर्यावरणाच्या र्‍हासाच्या दुष्परिणांकडे दुर्लक्ष करण्यामागची एक प्रेरणा, ‘वैयक्तिक उन्नतीची आकांक्षा’ ही तर असू शकतेच. परंतु, त्याहून अधिक वाईट प्रेरणा अगतिकता आणि अपरिहार्यतेचीही असू शकते. वैयक्तिक भौतिक परिस्थितीनुसार व्यक्तीची मूल्ये इतकी बदलतात की इतर परिस्थितीतल्यांना ती मूल्ये पटूच नयेत. अतितीव्र ध्वनिप्रदूषण करणार्‍या मिरवणुकींच्या मार्गांवर जमणार्‍या फेरीवाल्यांना त्या आवाजाचा त्रास होत नसेल का? परंतु, त्यांना तिथे रोजगाराची संधी इतकी आकर्षक असते की कधीकधी त्यांची स्वतःची लहान मुले हातगाडीजवळच झोपलेली असतात. किंवा, नदीचा परिसर जिवंत ठेवण्यापेक्षा, तिथे एखादे झोपडे टाकण्यात अनेकांना अधिक रस असू शकतो. पूर किंवा वायू/जल/ध्वनिप्रदूषण वगैरेंच्या दूरगामी दुष्परिणामांपेक्षा त्यांना अधिक भ्रांत उद्याची असू शकते. पर्यावरणाचे अधिक काटेकोर रक्षण सुरू केले तर त्या लोकांची जीवनशैली खालावेल. त्यांची जीवनशैली टिकून राहील (किंवा सुधारेल) ह्याची तजवीज न करता पर्यावरणरक्षण राबवणे असंवेदनशील ठरेल. आठ अब्ज व्यक्तींना ‘चांगले’ राहणीमान आणि शाश्वत विकास ही ध्येये परस्परविसंगत आहेत. आठ ‌अब्ज मानवांना चांगले आयुष्य मिळेल आणि तरीही डेटा सेंटर्स किंवा स्पेस टूरिजमवर निर्बंध घालता येईल अशा अर्थव्यवस्थेची आणि समाजाची तपशीलवार कल्पना माझ्या ऐकिवात नाही. विकसित देशांच्या लोकसंख्येचा कल स्थिरावतो आहे, घटूही लागला आहे. त्याला दिशा देणे, प्रोत्साहन देणे ठीकच. अन्यथा, लोकसंख्या कमी होणाआधीच शाश्वत विकास रेटणे कालविपर्यस्त आहे.

म्हणजे, ‘पर्यावरणासाठी पर्यावरण’ ही भूमिका प्रचारक्षम नाही. पर्यावरणवाद इतरांना पटवून द्यायचा असेल तर तो ‘मानवांसाठी पर्यावरण’ अशा प्रकारेच सांगावा लागेल. लोकांच्या वैयक्तिक आकांक्षांच्या, स्वार्थाच्या दृष्टिकोनातून आणि विशेषतः, रांगेतल्या शेवटच्या व्यक्तींना किमान सन्माननीय जीवनमान मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणवादाच्या उपयुक्ततेची मांडणी केली तरच पर्यावरणवादाला जन-चळवळीचे रूप देता येईल. अन्यथा, पर्यावरणवाद हे मूल्य अभिजनांपुरते मर्यादित राहील आणि फारतर राजाश्रय, कायदे, आणि विद्वन्मान्यतेच्या बळावर समाजावर पर्यावरणवाद लादण्याचा प्रयत्न करत रहावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.