पश्चिम वऱ्हाडातील बदलत्या पर्यावरणाची नोंद
मे महिन्याचा उष्मा वाढू लागला की पश्चिम वऱ्हाडातील ग्रामीण परिसरात एक वेगळंच दृश्य दिसू लागतं. शेतातील धुरे पेटवले जातात, बांधांवरील गवत आणि झुडपे जाळली जातात, तर नाल्या आणि नदीकाठच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर छाटणी केली जाते. अनेक ठिकाणी झाडं अक्षरशः बुटकी करून टाकली जातात. ही प्रक्रिया इतकी सामान्य झाली आहे की तिच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. पण या सगळ्यामध्ये शांतपणे नष्ट होत असते ती म्हणजे ग्रामीण भागातील सूक्ष्म जैवविविधता.
आज जैवविविधतेचा प्रश्न केवळ जंगलापुरता मर्यादित राहिलेला नाही. शेतीभोवतीचे बांध, गवताळ पट्टे, नदीकाठची झुडपं आणि माळरानं ही देखील असंख्य जीवांची आश्रयस्थाने असतात. उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्यापूर्वी अनेक पक्षी घरटी बांधू लागतात. काही अंडी उबवत असतात, तर काही पिल्लांच्या संगोपनात गुंतलेले असतात. नदीकाठच्या झुडपांमध्ये कीटकांची घरं असतात. साप, सरडे, बेडूक आणि लहान जीव या भागात सुरक्षितता शोधत असतात.
अशा वेळी जेव्हा शेतातील धुरे पेटवले जातात, तेव्हा केवळ वाळलेले गवत जळत नसतं; तर एक संपूर्ण सूक्ष्म परिसंस्था राख होत असते. आगीच्या विळख्यात पक्ष्यांची घरटी, अंडी आणि पिल्लं नष्ट होतात. पळून न जाऊ शकणारे असंख्य कीटक आणि लहान जीव जागीच मरून जातात. जमिनीवरील सेंद्रिय थर जळून मातीतील सूक्ष्मजीवांचे अस्तित्व धोक्यात येतं. या प्रक्रियेचा परिणाम मातीच्या आरोग्यावर आणि शेतीच्या नैसर्गिक उत्पादनक्षमतेवरही होत असतो.
नदी आणि नाल्यांच्या काठावरील झाडांची अतिप्रमाणात छाटणी हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. अनेकदा झाडांच्या फांद्या पूर्णपणे कापून त्यांना फक्त खोडापुरतं मर्यादित केलं जातं. या झाडांवर पक्ष्यांची घरटी असतात, अनेक कीटकांचं जीवनचक्र अवलंबून असतं आणि उन्हाळ्यात ह्या झाडांच्या सावलीमुळे नदीकाठची आर्द्रता टिकून राहते. झाडे बुटकी झाल्यावर हा संपूर्ण पर्यावरणीय आधार कमकुवत होतो. पावसाळ्यात मृदाक्षरण वाढण्याचाही धोका निर्माण होतो.
दुर्दैवाने आधुनिक शेती व्यवस्थापनामध्ये ‘स्वच्छ’ शेत हीच प्रगतीची खूण मानली जाऊ लागली आहे. परिणामी बांधांवरील गवत, झुडपं, वनस्पती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली जीवसृष्टी हळूहळू नाहीशी होत आहे.
या बदलत्या वास्तवाची जिवंत नोंद पश्चिम वऱ्हाडातील अनेक गावांमध्ये दिसून येते.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील रामगाव परिसरात फिरताना गवताळ प्रदेश आणि ग्रामीण जीवनाचं एक वेगळेच नातं मला दिसून आलं. मानोरा ते कारंजा (लाड) महामार्ग सोडून पुढे घनदाट अभयारण्यातून तिथे जावं लागतं. या रस्त्याने जाताना हेकळ, हिवर, खाकरा-पळसाची झाडे डोळ्यांना भेटतात. त्यांच्या मधोमध पवना, कुंदा, मारवेल आणि गवताचे थोंबच थोंब कुठे फिकट हिरवे, कुठे उन्हाने सुकलेले आपल्याला दिसतात. रानातले हे दृश्य पाहताना मला जाणवलं की गवताच्या प्रदेशाचं खरंच एक स्वतंत्र जग असतं; आपण माणसं त्याकडे पाहायची नजर हरवून बसलो आहोत.
नेहमीपेक्षा यंदा मात्र या प्रदेशात गवत फारसं वाढलेलं दिसलं नाही. या भागात गावकऱ्यांकडून होणाऱ्या अनियमित चराईमुळे या माळरानाचा नैसर्गिक ताळमेळच बिघडला आहे असं जाणवत होतं. माळरानावरील गवताचे प्रमाण घटल्याने अनेक कीटक, लहान पक्ष्यांचे अधिवास कमी होत आहेत. पशुधनासाठी उपलब्ध चारा घटल्याने स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांनाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. अशा बदलांमुळे माळरानाशी जोडलेली स्थानिक उपजीविका आणि जैवविविधता दोन्ही धोक्यात येत असल्याचं दिसत आहे. रामगावात गोंड आदिवासी आणि गोर बंजारा पशुपालक समाज राहतो. गावात मोठ्या प्रमाणावर गायी-गुरं आहेत. तिथे दिसलेल्या बेरारी जातीच्या शेळ्या मात्र चांगल्या तब्येतीत होत्या. कारण विचारलं असता एका पशुपालकाने सहज सांगितलं नदी-नाल्याच्या काठानं जास्त चराई होते, म्हणून जनावरं इतक्या उन्हाच्या उष्णतेतही तग धरतात.
त्या पशुपालकाच्या गोठ्यात गेल्यावर एक वेगळंच जग उभं असलेलं दिसत होतं. त्यानं रानातल्या नदीकाठचं कप गवत कापून आणून गाईंसाठी गोठा बांधलेला होता. बांबू आणि बणाटीच्या काड्यांनी तयार केलेल्या त्या गोठ्यासमोर कुटार साठवण्यासाठी कणगी बांधलेली होती आणि तिच्यावर कप गवताचं छप्पर घातलेलं होतं. ऋतूनुसार पशुखाद्य साठवण्याची ही पद्धत आदीवाशी समुदायात आहे. पुढे गावात चौकशी केल्यावर कळलं की कप गवताच्या कणसातून निघणाऱ्या भुशाचा वापर पूर्वी आग पेटवण्यासाठीही केला जायचा. या गावात आल्यावर गवताशी, जंगलाशी आणि जगण्याशी इतकं खोल नातं जपून असलेल्या पशुपालकाला भेटून खूप बर वाटलं. रामगावाहून परतताना माळरानात तीन हरणं शांतपणे चरताना दिसली.अनेक जीवांच्या अस्तित्वाची आधारभूमी असणाऱ्या या माळरानाचं हे असं चित्र सगळीकडे तसंच राहिलेलं नाही.
मी राहतो त्या भागातल्या आटकळीच्या रानात फिरताना तिथे झालेले अनेक बदल मला दिसले. त्या भागातली पळसाची कोवळी पानं कधी नव्हे इतकी यावर्षी च्या उन्हामुळे फिकट पिवळी पडली होती. काही वर्षांपूर्वी बहाव्याच्या झाडांनी उजळून निघणारं हे रान आज छाटून बुटक झालेलं दिसलं. यंदा बहाव्याला फारशी फुलंही आली नाहीत. पळस आणि बहाव्यासारख्या स्थानिक वृक्षांच्या फुलोऱ्यात आणि वाढीत होणारे हे बदल वाढत्या उष्णतेचे आणि बदलत्या हवामानाचे संकेत मानावे लागतील. एकेकाळी आटकळीचं हे रान पशुंच्या चार्यासाठी प्रसिद्ध होतं. परिसरातल्या हातोला, टेंभी, सारकिन्ही अशा गावांमधले पशु इथे चरायला आणले जात होते. स्थानिक समुदायाचं या रानाशी जिव्हाळ्याचं नातं होतं. पण लोकांना विचारात न घेता वनविभागाने केलेल्या बदलांनी आतकलीच्या रानाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. तरीही बोंडी, मारवेल, तिखाडी आणि या गवताचे थोंब अजूनही त्या भूमीची जीवंत स्मृती जपून आहेत.
या सगळ्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लोकज्ञानाची किंमत. पश्चिम वऱ्हाडातील फासे पारधी आदिवासी समुदाय यांच्याकडे माळरान आणि त्या माळरानात राहणाऱ्या जैवविविधतेचं विलक्षण ज्ञान आहे. पक्ष्यांचे प्रकार, त्यांच्या खाद्य वनस्पती, अंडी घालण्याच्या जागा, ऋतूनुसार बदलणारं वर्तन हे सगळं ते सहज सांगू शकतात. त्यांच्या अनुभवामध्ये पर्यावरणाची एक जिवंत लोकडायरी दडलेली आहे. पण आधुनिक विकासाच्या गडबडीत हे लोकज्ञानही हरवत चाललं आहे.
दुसऱ्या बाजूला आज शहरं झपाट्याने वाढत आहेत. शहरातला झगमगाट, ट्रॅफिक, कॅफे संस्कृती आणि चकचकीत इमारती एका बाजूला उभ्या राहत आहेत; तर दुसऱ्या बाजूला कचरा वेचणारी मुलं, हॉस्पिटलमध्ये फिरणारे असहाय्य पालक आणि पुलाखाली थंडीने कुडकुडणारी माणसं हेही शहराचं वास्तव आहे. शहरं जशी वाढत आहेत, तशी जंगलं, माळरानं आणि त्यांच्यावर जगणारी जैवविविधता मागे पडत चालली आहे असं मला वाटतं.
शेवटी मला हे सांगावसं वाटतं की पर्यावरण वाचवणं म्हणजे केवळ झाडं लावणं नाही. आपल्या परिसरातील शेतीचे बांध, नदीकाठच्या नैसर्गिक पट्ट्यांचं संरक्षण करणं, माळरानं जपणं, पक्ष्यांच्या घरट्यांना जागा देणं, लोकज्ञानाला आदर आणि मान्यता देणं हेही तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं.