शाश्वत विकास : समग्र दृष्टिकोनाच्या शोधात 

भूमिका :
सर्वप्रथम हे सांगणे आवश्यक आहे की मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद दर्शनाचा मी गेले काही वर्षे अभ्यास करतो आहे. त्यामुळे मी जे लिहितो आहे ते एका विद्यार्थ्याच्या भूमिकेमधून लिहितो आहे. माझ्या मागील लेखात –आजचा सुधारक : मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद : एक सांप्रत दर्शन – ह्या दर्शनाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला होता.
प्रस्तुत लेखात शाश्वत विकासाच्या संदर्भात मध्यस्थ दर्शनाने मांडलेले काही विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या संकल्पनांपैकी काही विचार करण्यासारख्या वाटतात; त्यांची थोडक्यात ओळख येथे करून देत आहे 

१. आपण समस्यांचे निराकरण करतो आहोत की स्थलांतर?

आज जगभर शाश्वत विकास, हवामानबदल, पर्यावरण संरक्षण, जैवविविधता आणि संसाधनांचे न्याय्य वाटप ह्यांवर व्यापक चर्चा सुरू आहेत. ह्या चर्चांचे महत्त्व नाकारता येणार नाही. परंतु ह्या सर्व प्रयत्नांकडे पाहताना एक प्रश्न वारंवार मनात येतो — आपण समस्यांचे निराकरण करीत आहोत की त्यांचे केवळ स्थलांतर?

एक सोपे उदाहरण घ्या. मुंबईत लोकल ट्रेनमुळे शहरातील प्रदूषण कमी होते. परंतु त्या गाड्या चालवण्यासाठी लागणारी वीज जर चंद्रपूरसारख्या औष्णिक विद्युत प्रकल्पांतून येत असेल, तर प्रदूषण नाहीसे होत नाही; ते केवळ मुंबईहून विदर्भात स्थलांतरित होते. हीच समस्या आपल्याला विद्युतवाहनांतही (EV) दिसते. आश्चर्य वाटेल पण बॅटरी उत्पादनात पेट्रोलपेक्षा जवळपास दीड ते दोन पट कर्ब उत्सर्जित होतो. ह्याचा अर्थ EV उपयुक्त नाही असा नाही; तर कोणत्याही उपायाकडे संपूर्ण जीवनचक्राच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. अशा स्वरूपाची उदाहरणे विकासाच्या अनेक क्षेत्रांत दिसतात. (संदर्भ सूची : References 1-2) 

दुसरे उदाहरण म्हणजे प्लास्टिक पुनर्वापर. अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतरही जगातील प्लास्टिक पुनर्वापराचा दर सुमारे ९ टक्क्यांवरच आहे, तर २०२३ मध्ये प्लास्टिक उत्पादन ४१५ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले. म्हणजे पुनर्वापर वाढला, पण प्लास्टिक उत्पादनही वाढत राहिले. पुनर्वापराची व्यवस्था सुधारणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर नवीन प्लास्टिकचे उत्पादन कमी केले नाही तर प्लास्टिकचे संकट वाढतच राहणार आहे. (संदर्भ सूची : References 3-4 )

तिसरे उदाहरण म्हणजे कार्बन ऑफसेट बाजारपेठ. अनेक कंपन्या कार्बन क्रेडिट्स विकत घेऊन स्वतःला “कार्बन न्यूट्रल” घोषित करतात. परंतु २०२४ मधील एका अभ्यासात ४७ प्रमुख प्रकल्पांपैकी सुमारे ८० टक्के प्रकल्पांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशा वेळी उत्सर्जन कमी होते की ते केवळ कागदोपत्री अदृश्य होते, हा प्रश्न उभा राहतो. (संदर्भ सूची : References 5-6 )

ह्या सर्व उदाहरणांमध्ये एक समान धागा दिसतो. आपण अनेकदा समस्यांवर उपाय शोधतो, पण त्या समस्यांना जन्म देणाऱ्या मूळ विचारसरणी आणि धारणांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे विकासाचा प्रश्न केवळ नवीन तंत्रज्ञान किंवा अधिक चांगल्या व्यवस्थापनाचा नसून, मानव, निसर्ग आणि त्यांच्या परस्परसंबंधांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचाही आहे.

३. शाश्वततेचा शोध : केवळ तंत्रज्ञानापलीकडे 

ही उदाहरणे कोणत्याही तंत्रज्ञानाच्या किंवा उपक्रमाच्या विरोधासाठी नाहीत. त्यांचा उद्देश एवढाच आहे की, व्यापक संदर्भ आणि मूळ कारणांचा विचार न करता केवळ तांत्रिक उपायांवर अवलंबून राहिल्यास आपण अनेकदा समस्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांचे स्वरूप बदलतो, त्या दुसरीकडे हलवतो किंवा अधिक गुंतागुंतीच्या बनवतो.

म्हणूनच खरा प्रश्न असा आहे — समस्या तंत्रज्ञानात आहे, की विकासाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीत? 

मुळात “विकास” म्हणजे काय आणि “शाश्वत” म्हणजे काय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. कारण विकासाची संकल्पना कोणत्या मानवी धारणेवर उभी आहे, ह्यावरच तिचे परिणाम अवलंबून असतात.

आजच्या बहुतेक विकासप्रतिमांमध्ये मानव आणि निसर्ग ह्यांच्यात एक प्रकारचे द्वैत गृहीत धरलेले दिसते. मानव हा निसर्गापासून वेगळा आहे, निसर्गावर प्रभुत्व मिळवू शकतो, त्याचे व्यवस्थापन करू शकतो किंवा त्याचा उपभोग घेऊ शकतो अशी एक अंतःसलिला ह्या विचारांमध्ये आढळते. परिणामी निसर्गाशी असलेले नाते सहजीवनाचे न राहता संसाधन वापराचे बनते.

४. मध्यस्थ दर्शनाची मूलभूत मांडणी : सहअस्तित्वाची दृष्टी 

ह्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न म्हणजे मध्यस्थ दर्शन किंवा सहअस्तित्ववाद. ह्या दर्शनात काही मूलभूत प्रतिपादने मांडली आहेत. त्यांपैकी दोन सूत्रे विशेष लक्षवेधी वाटतात. 

  • “अस्तित्व सहअस्तित्व स्वरूप आहे.” 

हे सूत्र केवळ तात्त्विक विधान नाही. त्याचा अर्थ असा आहे की अस्तित्वातील कोणतेही एकक स्वतंत्र, विलग किंवा संघर्षप्रधान स्वरूपात अस्तित्वात नाही. प्रत्येक एकक इतरांशी संबंधात आहे आणि त्या संबंधांमुळेच त्याचे अस्तित्व अर्थपूर्ण आहे.

ह्याच विचाराचा पुढील विस्तार ह्या सूत्रात दिसतो:

  • “अस्तित्वातील प्रत्येक एकक स्वतःमध्ये व्यवस्था आहे आणि समग्र व्यवस्थेमध्ये भागीदारीसहित आहे.”

ह्या सूत्राकडे नीट पाहिले तर निसर्गाचे चित्र संघर्षाचे नसून व्यवस्थेचे दिसू लागते. अणूंपासून आकाशगंगांपर्यंत, वनस्पतींपासून प्राण्यांपर्यंत आणि परिसंस्थांपासून संपूर्ण अस्तित्वापर्यंत सर्वत्र एक प्रकारची नियमितता, परस्परपूरकता आणि संतुलन दिसून येते. वानगीदाखल काही उदाहरणे खाली दिली आहे.

जंगलातील परिसंस्था हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. झाडे, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, माती आणि पाणी हे प्रत्येक घटक स्वतःची व्यवस्था असतानाही संपूर्ण परिसंस्थेच्या संतुलनात सहभागी असतात.

मानवी शरीरातही हेच तत्त्व दिसते. हृदय, फुफ्फुसे, मेंदू आणि शरीरातील असंख्य पेशी स्वतंत्र कार्य करतात, परंतु त्यांचे अस्तित्व एकमेकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. एका भागातील असंतुलनाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

पाण्याचे चक्र हे आणखी एक उदाहरण आहे. समुद्र, ढग, पाऊस, नद्या आणि भूजल हे वेगवेगळे घटक वाटले तरी ते एका अखंड व्यवस्थेचा भाग आहेत. एका घटकावर होणारा परिणाम संपूर्ण चक्रावर परिणाम घडवतो.

ह्या सर्व उदाहरणांतून स्पष्ट होते की अस्तित्व हे स्वतंत्र घटकांचा समूह नसून परस्परसंबंधांनी जोडलेली एक समग्र व्यवस्था आहे. प्रत्येक एकक स्वतःमध्ये व्यवस्था आहे आणि त्याच वेळी व्यापक व्यवस्थेत भागीदारीसहित आहे.

५. संघर्ष की व्यवस्था? — समाधानात्मक भौतिकवादाचा दृष्टिकोन 

ह्याच संदर्भात मध्यस्थ दर्शनाने मांडलेला “समाधानात्मक भौतिकवाद” हा विचार महत्त्वाचा ठरतो.

मानवी इतिहासात संघर्ष, स्पर्धा आणि द्वंद्व ह्यांना मोठे स्थान देणारे अनेक विचारप्रवाह आपल्याला दिसतात. मध्यस्थ दर्शन मात्र एक वेगळा प्रश्न विचारते — अस्तित्वाचे मूलभूत स्वरूप संघर्षाचे आहे की व्यवस्थेचे? 

जर संघर्षच मूलस्वभाव असता, तर अस्तित्वाची निरंतरता, नियमबद्धता आणि संतुलन टिकून राहणे कठीण झाले असते. उलट आपण पाहतो की अस्तित्वात व्यापक स्तरावर व्यवस्था टिकून आहे. वरवर पाहता संघर्ष दिसतात, पण ते व्यवस्थेच्या चौकटीत घडतात; व्यवस्था संघर्षाच्या चौकटीत घडत नाही.

म्हणून मध्यस्थ दर्शन संघर्षाला अंतिम सत्य मानत नाही. ते व्यवस्थेला, परस्परपूरकतेला, आणि सहअस्तित्वाला सत्य मानते. म्हणूनच त्याचा दृष्टिकोन “संघर्षात्मक” नसून “समाधानात्मक” आहे.

येथे द्वंद्वात्मक भौतिकवादाची चिकित्सा करणे हा उद्देश नसून, अस्तित्वाकडे पाहण्याच्या दोन भिन्न दृष्टिकोनांतील फरक समजून घेण्याचा प्रयत्न आहे.

हीच गोष्ट शाश्वत विकासाच्या चर्चेत अत्यंत महत्त्वाची ठरते.

जर अस्तित्वाचे स्वरूप सहअस्तित्वाचे असेल, तर विकासाचे स्वरूपही सहअस्तित्वाशी सुसंगत असले पाहिजे.

६. मानव : उपभोक्ता की सहअस्तित्वातील जाणकार सहभागी? 

मध्यस्थ दर्शन मानवाचे एक वैशिष्ट्य अधोरेखित करते. ते म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाविषयी, इतर मानवांविषयी, आणि निसर्गाविषयी प्रश्न विचारण्याची व समज विकसित करण्याची त्याची क्षमता. म्हणून, मानवाला केवळ उपभोक्ता किंवा उत्पादक म्हणून नव्हे, तर अस्तित्वातील व्यवस्थेला जाणून घेणारा आणि त्यात सहभागी होऊ शकणारा घटक म्हणून पाहिले जाते. 

मानवाचे संपूर्ण जगणे दोन प्रकारच्या संबंधांमध्ये घडते:
– मानव आणि मानव ह्यांतील संबंध
– मानव आणि निसर्ग ह्यांतील संबंध

प्रत्येक संबंधामध्ये काही अपेक्षा अंतर्भूत असतात. त्या समजून त्यांची पूर्तता, आणि त्यातून मिळणारी “उभय तृप्ती”, ह्या प्रक्रियेला मध्यस्थ दर्शन ‘न्याय’ असे संबोधते. म्हणजे मानव मानवाशी तर न्यायपूर्वक जगला पाहिजेच, पण निसर्गालाही, चक्रीयतेचा नियम समजून, न्याय दिला पाहिजे. म्हणजेच निसर्गातील चक्रीयता, पुनरुत्पादकता, आणि संतुलन अबाधित ठेवणे, हे त्याचे सहभागाचे स्वरूप होय. त्यामुळे न्याय हा कायदेशीर किंवा दंडात्मक अर्थाने नसून, मानवी संबंध आणि निसर्गाशी असलेल्या सहभागाच्या समतोलाशी जोडलेला आहे.

आज पर्यावरणीय संकटांचा विचार करताना आपण अनेकदा तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था किंवा धोरणांवर चर्चा करतो; परंतु मानवी नातेसंबंध आणि मानवी चेतना ह्यांचा विचार दुय्यम ठरतो. मध्यस्थ दर्शन ह्या क्रमाला उलटे करते.

त्याच्या मते विकासाची सुरुवात बाहेरून नव्हे तर मानवाच्या धारणेतून होते.

  • सुख म्हणजे काय?
  • समृद्धी म्हणजे काय?
  • मानवी नाते म्हणजे काय?
  • निसर्गाशी पूरक संबंध म्हणजे काय?

ह्या प्रश्नांची स्पष्टता निर्माण झाल्याशिवाय शाश्वत विकासाची कोणतीही संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही.

७. धारणा ते व्यवहार : आवर्तनशील अर्थशास्त्र 

वरील सर्व संकल्पनांना जगण्यात उतरवण्यासाठी मध्यस्थ दर्शन आवर्तनशील अर्थशास्त्राचा विचार देते. ह्या अर्थशास्त्रात अर्थाची व्याख्या केवळ आर्थिक संपत्तीपुरती मर्यादित राहत नाही. तन म्हणजे शरीर, मन म्हणजे मानसिकता, आणि धन म्हणजे प्राकृतिक संपदा ह्या तीनही गोष्टींची समग्रता म्हणजे “अर्थ”. आणि ह्या तिन्हींच्या म्हणजे तन, मन, आणि धन ह्यांचा सदुपयोग,संवर्धन आणि सुरक्षिततेला (शाश्वततेला) अर्थनीती म्हटले आहे.

उत्पादन म्हणजे निसर्गातील चक्रीयता (आवर्तनशीलता) अबाधित ठेवून मानवाद्वारे श्रमपूर्वक, मानवीय उपयोगासाठी केलेली मूल्यवृद्धी. निसर्गाच्या पुनरुत्पादक क्षमतेचा ऱ्हास न करता, उलट निसर्गाचे आणि मानवाचेही पोषण साधत केलेले उत्पादन.आणि असेच नियमपूर्वक उत्पादन करून आपल्या परिवाराच्या भौतिक गरजांपेक्षा अधिक असण्याचा भाव मानवामध्ये असणे, ह्यालाच दर्शन “समृद्धी” हे सार्थक नाव देते.

शेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादन घेणे, जलचक्र अबाधित ठेवणे किंवा ऊर्जेचा पुनर्भरणक्षम स्रोत वापरणे ही त्याची व्यवहारातील काही उदाहरणे मानता येतील. ह्या दृष्टिकोनात उत्पादनाचा प्रश्न ‘किती वाढले?’ एवढाच नसून ‘त्या वाढीमुळे निसर्गाची पुनर्निर्मिती क्षमता टिकली का?” हाही असतो. (व्यवहारातील मांडणी ‘आवर्तनशील अर्थशास्त्र’ मध्ये केली आहे.)

मध्यस्थ दर्शनाची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ते केवळ तात्त्विक प्रतिपादने मांडून थांबत नाही. ‘समाधानात्मक भौतिकवाद’ ह्या ग्रंथातून त्या प्रतिपादनांचा तर्कसंगत उलगडा केला जातो, तर ‘आवर्तनशील अर्थशास्त्र’ ह्या ग्रंथातून त्यांचे क्रियान्वयनाची सूत्रे स्पष्ट केले जातात. 

अशा दृष्टीने पाहिले तर शाश्वत विकास ही केवळ पर्यावरणीय संकल्पना राहत नाही. ती मानवी धारणेपासून सुरू होऊन अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण, आणि व्यवस्था, ह्यांपर्यंत विस्तारलेली जीवनदृष्टी बनते.

८. शाश्वत विकासाची सूत्ररचना 

म्हणूनच शाश्वत विकासाची खरी शृंखला अशी दिसते:

धारणा → विचार → व्यवहार → नीती → विकास

या शृंखलेतील पहिला दुवा दुर्लक्षित करून केवळ शेवटच्या टप्प्यांवर काम केल्यास काही सुधारणा घडू शकतात; परंतु मूलभूत परिवर्तन घडत नाही. समस्यांचे स्वरूप बदलते, त्यांचे स्थलांतर होते, परंतु त्या संपत नाहीत.

शाश्वत विकासाविषयीच्या आजच्या चर्चांमध्ये तंत्रज्ञान, धोरणे, आणि अर्थव्यवस्था, ह्यांना योग्यच महत्त्व दिले जाते. परंतु मानवी धारणा, नातेसंबंध, आणि अस्तित्वाविषयीची समज, हा त्याहून अधिक मूलभूत प्रश्न असू शकतो का? मध्यस्थ दर्शन हा प्रश्न गांभीर्याने विचारण्याचे निमंत्रण देते. त्यातील सर्व प्रतिपादने मान्य करावीत किंवा नाही, हा वेगळा मुद्दा आहे; परंतु शाश्वत विकासाच्या चर्चेला एक व्यापक तात्त्विक चौकट उपलब्ध करून देण्याचा त्याचा प्रयत्न निश्चितच लक्षवेधी आहे.

शाश्वत विकासाचा शोध शेवटी केवळ नवीन तंत्रज्ञानाच्या शोधात नाही, तर मानव स्वतःला, समाजाला आणि निसर्गाला कसे समजतो ह्याच्या शोधात आहे. ह्यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी ह्या विचारांची चिकित्सा, संवाद, आणि व्यवहारातील प्रयोग आवश्यक आहेत. प्रस्तुत लेख त्या दिशेने केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. 

मी ह्या दर्शनाचा अभ्यासक आणि विद्यार्थी आहे. त्यामुळे येथे मांडलेले विचार माझ्या आजपर्यंतच्या वाचन, मनन, आणि चिंतनावर आधारित आहेत. माझ्या समजुतीमध्ये त्रुटी राहू शकतात. जिज्ञासूंनी मूळ स्रोतग्रंथांचा अभ्यास करून ह्या विचारांची स्वतंत्र चिकित्सा करावी, एवढीच अपेक्षा.

अभ्यासक : मध्यस्थ दर्शन

संदर्भ सूची :
अ. लेखात वापरलेले संदर्भ : 

  1. Wang, Y., et al. (2023). Development and application of life-cycle energy consumption and carbon footprint analysis model for passenger vehicles in China. Energy, Volume 282, 128412.
    — A life-cycle assessment comparing battery electric vehicles (BEVs) and internal combustion engine vehicles (ICEVs). The study found that due to battery production, BEVs had 65.6–89.0% higher greenhouse gas emissions during the vehicle manufacturing stage compared with conventional vehicles. The study also noted that lower emissions during the use phase can offset this initial carbon burden over the vehicle lifetime.
    https://www.sciencedirect.com/science/article/pii/S0360544223018066
  2. International Energy Agency (IEA) (2024). Global EV Outlook 2024 – Outlook for emissions reductions.
    — Provides a broader lifecycle perspective, showing that while EV production generally has higher upfront emissions because of batteries, these emissions can be compensated during vehicle use depending on the electricity mix.
    https://www.iea.org/reports/global-ev-outlook-2024
  3. OECD (2022). Global Plastics Outlook: Economic Drivers, Environmental Impacts and Policy Options. Organisation for Economic Co-operation and Development (OECD).
    — Reports that only around 9% of plastic waste is recycled globally, while plastic production and waste generation continue to grow rapidly.
    https://www.oecd.org/en/publications/global-plastics-outlook_de747aef-en
  4. Geyer, R., Jambeck, J. R., & Law, K. L. (2017). Production, use, and fate of all plastics ever made. Science Advances, 3(7), e1700782.
    — Found that the vast majority of plastic waste accumulates in landfills or the environment, with only a small fraction recycled.
    https://www.science.org/doi/10.1126/sciadv.1700782
  5. Corporate Accountability (2024). The Carbon Market of the Future: Built to Fail? — Analysis of 47 major carbon offset projects examining the reliability and effectiveness of voluntary carbon credits.
    https://corporateaccountability.org/resources/built-to-fail-carbon-offset-projects/
  6. Probst, B. S., et al. (2024). Systematic assessment of the climate impact of carbon offset projects. Nature Communications. — Research highlighting concerns about the actual climate benefits delivered by many carbon offset projects and the gap between claimed and achieved emission reductions.
    https://www.nature.com/articles/s41467-024-51151-w

ब. मध्यस्थ दर्शन : संदर्भ ग्रंथ सूची : 

  • जीवन विद्या एक परिचय 
  • विकल्प एवं अध्ययन बिंदू 
  • मानव व्यवहार दर्शन 
  • मानव कर्म दर्शन 
  • मानव अभ्यास दर्शन 
  • मानव अनुभव दर्शन 
  • समाधानात्मक भौतिकवाद 
  • अनुभवात्मक अध्यात्मवाद 
  • व्यवहारात्मक जनवाद
  • आवर्तनशील अर्थशास्त्र 
  • व्यवहारवादी समाजशास्त्र 
  • मानव संचेतानावादी मनोविज्ञान 
  • मानवीय आचार संहिता रुपी मानवीय संविधान सूत्र व्याख्या 

लेखक : श्री. ए. नागराज
प्रकाशक : जीवन विद्या प्रकाशन, दिव्या पथ संस्थान, अमरकंटक, जिल्हा अनुपपुर -४८४८८६ मध्य प्रदेश 

परिशिष्ट : दर्शन प्रणेता श्री नागराज ह्याविषयी थोडक्यात माहिती

श्री अग्रहर नागराज (१९२०-२०१६), हे मूलतः कर्नाटक राज्यातील हासन तालुक्यातील अग्रहर गाव येथील आहेत. वेद-अध्ययन होऊनही अनेक प्रश्न अनुत्तरित राहिल्याने त्यांनी जवळजवळ ३०-४० वर्षे त्या प्रश्नांवर अमरकंटक येथे अनुसंधान केले. हे दर्शन त्याचे फलित आहे.

अभ्यासाकरिता काही अन्य संदर्भ : 

  • Das, P. K., Bhat, M. Y., & Sajith, S. (2023/2024). Life cycle assessment of electric vehicles: A systematic review of literature. Environmental Science and Pollution Research.
    — Reviews multiple EV life-cycle studies and highlights that battery manufacturing and electricity generation are key factors determining the overall environmental performance of EVs. https://link.springer.com/article/10.1007/s11356-023-30999-3
  • International Energy Agency (IEA) (2024). Global EV Outlook 2024 – Outlook for emissions reductions.
    — Provides a broader lifecycle perspective, showing that while EV production generally has higher upfront emissions because of batteries, these emissions can be compensated during vehicle use depending on the electricity mix.
    https://www.iea.org/reports/global-ev-outlook-2024
  • Statista (2024). Global Plastic Production – Statistics & Facts.
    — Provides global plastic production data, including estimates that global plastic production reached approximately 415 million metric tonnes in 2023 and highlights the limited share of recycled plastic in overall production.
    https://www.statista.com/topics/5401/plastic-waste/

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.