मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद : एक सांप्रत दर्शन – परिचय 

‘आजचा सुधारक’च्या ऑक्टोबर-२३ च्या अंकातील श्रीधर सुरोशे यांचा ‘मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २‘ हा लेख वाचला. त्यातील विचार आणि मी ज्या दर्शनाचा अभ्यास करीत आहे, यांतील साम्यस्थळे मला दिसली. त्यावरील माझ्या अभिप्रायांवर ‘आजच्या सुधारक’ने प्रोत्साहन दिले की ‘मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद’ याविषयी मी काही लिहावे, ज्याने एक नवा मौलिक विचार लोकांसमोर येईल आणि संवादाचा एक मोठा अवकाश खुला होईल. मला लिहिते केल्याबद्दल ‘सुधारक’चे आभार.

भूमिका : 

सर्वप्रथम हे सांगणे आवश्यक आहे की मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद या दर्शनाचा मी गेले काही वर्षे अभ्यास करतो आहे. त्यामुळे मी जे लिहितो आहे ते एका विद्यार्थ्याच्या भूमिकेमधून लिहितो आहे. यात काही त्रुटी राहू शकतात. जिज्ञासूंनी मूळ स्रोत : श्री नागराज प्रणित ‘मध्यस्थ दर्शन-सहअस्तित्ववाद’ यामध्ये समाविष्ट असलेल्या १२ स्रोतग्रंथांचा संदर्भ बघावा. हा लेख मी परिचयात्मक दृष्टीने लिहिलेला आहे.

माणसाचे प्रयोजन काय?

माणसाचे प्रयोजनच काय? किंवा सार्थक आयुष्य म्हणजे काय? आयुष्याचा अर्थ काय? आणि एक अंतर्विरोधमुक्त, सहज, संतुलित आयुष्य कसे आहे? किंवा आहे की नाही? यांसंबंधी माझा शोध सुरू असताना मला या दर्शनाचा सुमारे बारा वर्षांपूर्वी परिचय झाला. तेंव्हापासून माझा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यातून आजच्या सगळ्या समस्यांवर, हे दर्शन हे मानवीयतेकडे किंवा मानवीयतेच्या दिशेने एक पुढचे पाऊल आहे, असे माझे मत आहे. या पृथ्वीवरील सर्व सृष्टीच्या शाश्वततेचे, मानवाच्या कल्याणाचे, जीवनाचे, समग्र प्रतिमानाचे दर्शन आपल्याला यांत होते, असे मला वाटते. 

अस्तित्वमूलक मानवकेंद्रित चिंतन : 

मानव हा अस्तित्वाचा एक घटक आहे, पण त्याचवेळी ‘तो’च समजू शकतो, ‘त्याला’ समजण्याची दृष्टी आहे. ही दृष्टी त्याचे तोपर्यंत झालेले शिक्षण, त्याचे अनुभव आणि त्यातून बनलेले काही निष्कर्ष, यांतून विकसित झाली असते. त्यामुळे त्याच्या दृष्टीला त्याच्या पूर्वानुभवांची आणि त्यावर आधारित पूर्व निष्कर्षांची (मान्यतांची) एक चौकट असते. मानवाचे भाषेतून झालेले अभिव्यक्त ज्ञान हे सापेक्षच (relative) राहते आणि त्यामुळे काही निरपेक्ष ज्ञान असू शकते का? किंवा अशा निरपेक्ष (absolute) ज्ञानाचे अस्तित्वच आहे की नाही? हे प्रश्न उपस्थित होतात.

सध्या जगातील समस्यांचे स्वरूप बघता, असे लक्षात येते की या समस्या, मग त्या पर्यावरणीय असो किंवा समाजातील विषमता, असमानता, संघर्ष यांविषयी असो, किंवा मानवा-मानवातील संबंधांविषयी असो किंवा मानवामध्ये स्वतःमध्ये असलेल्या अंतर्विरोध आणि त्यातून अभिव्यक्त झालेल्या मानसिक विकृतीसंबंधी असो, सगळ्यांचे मूळ मानवी विचारांमध्ये आहे. हे दर्शन मानवाला केंद्रस्थानी ठेवते, त्याचे अध्ययन करते आणि अत्यंत स्पष्ट शब्दांत त्याच्या मौलिकतेला परिभाषित करते.

अस्तित्व म्हणजे ‘जे आहे’, त्याला मानवाने जसे ‘आहे’ तसे ‘बघणे’ अश्या चिंतनात्मक पद्धतीमुळे ह्याला ‘अस्तित्वमूलक मानवकेंद्रित चिंतन’ असेही म्हंटले आहे.

मध्यस्थ दर्शन हे संपूर्ण प्रकृतीचे चार अवस्थेत वर्गीकरण करते:

 • पदार्थ अवस्था म्हणजे पदार्थ संसार (Physical matter ), 
 • प्राणावस्था म्हणजे पूर्ण वनस्पती संसार (Plant kingdom), 
 • जीवावस्था म्हणजे पूर्ण प्राणी संसार (Animal Kingdom), आणि 
 • माणूस, ज्याला ज्ञानावस्था म्हटले आहे.

संपूर्ण प्रकृतीमध्ये मानव हाच ‘द्रष्टा’ म्हणजे ‘बघणारा’ म्हणजेच ‘समजणारा’ म्हणजेच ‘जाणणारा’ आहे, आणि म्हणून दर्शन त्याचे वर्गीकरण ‘ज्ञान’अवस्थेत करते. एक सर्वमान्य तथ्य असे आहे की, मानव ही एकमेव प्रजाती अशी दिसते की जी पिढी-दर-पिढी उन्नत जगण्याच्या प्रयत्नात असते. मागच्या पिढीचे शहाणपण पुढील पिढीला विनासायास मिळते आणि त्याचमुळे जंगलयुग – अश्मयुग – धातूयुग – यांत्रिकयुग असा मानवजातीचा उत्क्रांतीक्रम आपण बघतो.

मानवेतर सृष्टी – निश्चित आचरण – नियम : 

मानवेतर सृष्टीचा जर आपण विचार केला तर असे लक्षात येते की मानवेतर सृष्टी, मग ते भौतिक पदार्थ, वनस्पतीसंसार, किंवा प्राणीसंसार असो, या सगळ्याच गोष्टी अध्ययनगम्य आहेत, म्हणजेच यांचा अभ्यास होऊन, याविषयीचे नियम मानवजातीला कळतात. या नियमांना समजून तो मानवेतर सृष्टीचा आपल्या जगण्यासाठी उपयोग करत असतो. किबहुना विज्ञानाचा प्रमुख उद्देश सृष्टीच्या नियमांची उकल करणे, हाच आहे.

दुसऱ्या शब्दात, या मानवेतर सृष्टीचे आचरण निश्चित आहे आणि निश्चिततेचेच अध्ययन होऊ शकते. मानवेतर तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे पदार्थवस्था, प्राणावस्था, आणि जीवावस्था या तीनही अवस्थांमध्ये आपल्याला परस्परपूरकता, परस्परावलंबन दिसते. उदाहरणार्थ: मातीतून (पदार्थवस्था), वनस्पती (प्राणावस्था) आपले अन्न घेते आणि तीच वनस्पती एक कालावधी झाल्यावर विरचित होऊन त्याच मातीला समृद्ध करते. थोडक्यात मानवेतर सृष्टीचे चक्र हे उत्तरोत्तर समृद्ध होत असते. त्यामागे निश्चित नियम काम करतो, किंबहुना हेच या प्रकृतीचे निश्चित आचरण आहे. दर्शनाच्या भाषेत ‘प्रत्येक एक स्वतःमध्ये व्यवस्था आणि मोठ्या व्यवस्थेमध्ये आपली भागीदारी’ निभावत असतो. यालाच उपयोगिता-पूरकता सिद्धांत म्हंटले आहे.

पण मानव, ज्याचे हे दर्शन ज्ञानावस्था या वर्गात वर्गीकरण करते, त्याचे आचरण मात्र अनिश्चित आहे आणि मानवेतर सृष्टीशी त्याचा व्यवहार हा आतापर्यंत प्रमुखतः एकांगीच झालेला आहे. म्हणजे थोडक्यात मानवाने मानवेतर सृष्टीचे शोषणच केले आहे. परिणामी आपल्याला तापमानवाढ आणि हवामानबदल याला तोंड द्यावे लागते आहे.

मानवांतील समस्यांचे स्वरूप आणि दर्शन :

मानवातील म्हणजेच मानव समाजातील ज्या आंतरिक समस्या आहेत, अगदी व्यक्तीमधील ताण, नैराश्य यापासून तर कुटुंबातील, संबंधातील ताणतणाव, ते समाजातील आणि राष्ट्र-राष्ट्रातील रंग, भाषा, वंश, पंथ या आणि अशा अनेक भेदांवर आधारित ‘आपला’ आणि ‘परका’ या भावनेतून उत्पन्न झालेले संघर्ष आणि त्यामुळे माणसातील माणूसपणाचा लोप होणे आणि हे वास्तव स्वीकृत नसल्यामुळे एक क्षोभ, प्रत्येक संवेदनशील माणसांमध्ये जाणवतो.

माणूस असा मूलतः विध्वंसक, क्रूर आहे का? नसेल, तर असा का होतो? का वागतो? हा प्रश्न उठणे साहजिक आहे.

त्यामुळे जो या दर्शनाचा केंद्रबिंदू, त्या माणसाचा एक संपूर्ण पद्धतीने अभ्यास होणे, माणसाला समजणे, माणसाच्या एकंदरीतच मूळ अस्तित्वाला समजणे आवश्यक ठरते. आणि अशा माणसाला समजून त्यावर आधारित पूर्ण व्यवस्थेचे स्वरूप कसे असेल, त्याविषयी अखंड मानवजातीसाठी एक संपूर्ण प्रतिमान हे दर्शन प्रस्तावित करते.

हे दर्शन फक्त माणसाची तात्त्विक परिभाषा करून थांबत नाही किंवा व्यावहारिक जीवनामध्ये हे तत्त्व कसे जगता येईल याचे संपूर्ण तपशीलवार स्पष्टीकरणच केवळ करत नाही तर, त्या आधारे एक शाश्वत मानवीय परंपरा कशी उभी होईल याविषयी एक व्यावहारिक रचनाबद्ध कार्यक्रम आपल्याला देते.

मानवाची चिरकालीन इच्छा : 

माणसाची आंतरिक इच्छा निरंतर सुखी होण्याची आहे. या सुखाच्या संकल्पनेविषयी त्याच्या मान्यतेनुसार, त्याचे लक्ष्य आणि दिशा ठरत असते . त्यातून त्याचा कार्यक्रम आणि त्याचे फल/परिणाम, असे त्याच्या जगण्याचे स्वरूप आपल्याला दिसते. त्यातील काही फल/परिणाम अनुकूल मिळतातही, ते कधी कधी तात्कालिक सुख देतातही, पण त्याने निरंतर तृप्ती मिळत नाही, असा सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे कुठेतरी ही एक अतृप्ती- ही अपूर्णता प्रत्येक माणसाला त्रास देत असते.

दर्शन असे सांगते की, माणसाची निरंतर सुखी होण्याची इच्छा – त्यातून निघणारे लक्ष्य आणि दिशा – त्यातून निघणारा कार्यक्रम आणि त्यातून मिळणारे अपेक्षित फल/परिणाम हे सगळे जेव्हा सुसूत्रीत होतात, तेव्हाच माणूस सुखी होतो. जर त्याची समजच अपूर्ण असेल तर पुढील सर्व शृंखला अपेक्षित परिणाम देत नाही आणि हेच समग्र दु:खाचे कारण आहे.

तर प्रश्न उपस्थित होतो, पूर्ण समज म्हणजे काय? समजायचे काय आहे? वानगीदाखल काही सूत्रे इथे सांगतो :

अस्तित्वातील व्यवस्था आणि मानव लक्ष्य :

अस्तित्व एक प्राकृतिक व्यवस्था आहे. यातील प्रत्येक घटकाचे एक निश्चित प्रयोजन आहे. किंबहुना हीच त्या घटकाची सार्थकता आहे. असे सगळे घटक एकमेकांत परस्परपूरकतेच्या धाग्यात घट्ट विणलेले आहेत. 

अस्तित्वातील ही व्यवस्था समजणे हे केवळ मानवालाच शक्य आहे. कारण ‘तो’च हे समजू शकतो. त्यामुळे मानवाचे प्रयोजन हे या अस्तित्वातील व्यवस्थेला समजणे, आणि त्यानुसार जगणे हे आहे, असे दर्शन प्रतिपादित करते. किंबहुना मानवातील निरंतर सुख, जी त्याची चिरकालीन इच्छा आहे त्याची पूर्ती समजण्यातूनच होते. यालाच दर्शन ‘समाधान’ असे परिभाषित करते आणि हेच प्रत्येक व्यक्तीच्या, म्हणजे मानवाच्या अस्तित्वाच्या प्रथम स्तरावर (स्वयं) लक्ष्य म्हणून निश्चित करते. 

अशा समाधानी माणसाचे जगण्याचे स्वरूप कसे असते? तर आपल्या कुटुंबाच्या सगळ्या गरजांपेक्षा जास्त उत्पादन आपण करू शकतो हा भाव. याला दर्शन ‘समृद्धी’ असे परिभाषित करते. आणि समजदार मानव हे उत्पादन निसर्गचक्र अबाधित ठेवून, नियम समजूनच करेल, शोषण करणार नाही. समृद्धी हेच कुटुंबाच्या, म्हणजे मानवाच्या अस्तित्वाच्या द्वितीय स्तरावर (कुटुंब) लक्ष्य म्हणून निश्चित होते.

अशा समाधानी व्यक्तींसह जगणारी, समृद्धीच्या भावासह जगणारी सगळी कुटुंबे असतील तर समाजामध्ये घेण्यापेक्षा, देण्याची प्रवृत्ती राहील. अश्या समाजामध्ये विश्वास आपोआप प्रतिष्ठित होईल, भयाचे कारणच उरणार नाही. यालाच म्हंटले आहे ‘अभय’, जे मानवाच्या तिसऱ्या स्तरावरील (समाज) लक्ष्य म्हणून निश्चित होते.

अशा समाधानी व्यक्तींनी, समृद्ध कुटुंबांनी बनलेला अभय समाज निसर्गाचे शोषण करणे कधीच शक्य नाही. उलट तो पोषणच करेल. प्रकृतीच्या चारही अवस्थांमध्ये एक संतुलन प्रस्थापित होईल. यातूनच मानवाचा जगण्याचा चौथा आणि अंतिम स्तर, म्हणजे निसर्ग, या निसर्गासह संपूर्ण अस्तित्वाचे ‘सह-अस्तित्व’ हे चतुर्थ स्तरावरील लक्ष्य असे दर्शन निश्चित करते.

थोडक्यात संपूर्ण अस्तित्वाला समजून – त्यातील एक द्रष्टा – सर्वांत महत्त्वाचा घटक – मानवासाठी, त्याच्या जगण्याच्या सर्व स्तरावर, दर्शन एक लक्ष्य परिभाषित करते – समाधान – समृद्धी – अभय – सह-अस्तित्व. हेच सर्व मानव लक्ष्य.

एक व्यक्तीपासून संपूर्ण समष्टीपर्यंत एकसूत्रतेचे आणि निरंतरतेचे/शाश्वततेच एक सूत्र, उपरोल्लेखित परिभाषेतून अभिव्यक्त होते.

अशा मानव लक्ष्याला साकार करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे, ते या दर्शनाची संपूर्ण विषय-वस्तू आहे. जगण्याचा कुठलाही आयाम यातून सुटत नाही. खरे तर उपर निर्देशित मानव लक्ष्याला साकार करण्याचा संपूर्ण मानवजातीचा संपूर्ण आराखडा हे दर्शन देते.

मानव-मानव संबंध आणि न्याय : 

या दर्शनाचा एक विस्तृत भाग मानव-मानव परस्परतेचे स्पष्ट दर्शन करवतो. वरती उल्लेख केला आहे की अस्तित्वगत प्राकृतिक व्यवस्थेचे वस्त्र परस्परतेने घट्ट विणलेले आहे. याच्याच आधारे न्याय काय आहे हे सुस्पष्टपणे समजते. दर्शन प्रतिपादित करते की परस्परता म्हणजे संबंध आहेतच (अस्तित्व सह-अस्तित्व स्वरूप आहे.) प्रत्येक संबंधाचे विशिष्ट मूल्य आहे. ह्या मुल्यांचा जेंव्हा दोनही बाजूने निर्वाह होतो, तेंव्हाच उभयतृप्ती होते. त्यालाच न्याय म्हणतात. उदाहरणार्थ : आई आणि मुलाच्या संबंधामध्ये ‘ममता = शरीर पोषण’ हे मूल्य अपेक्षित आहे. जेंव्हा आई भुकेल्या मुलाला अन्न भरवते, तेंव्हा दोघेही तृप्त होतात.

दुसऱ्या भाषेत, संबंध निश्चित आहेत, अपेक्षाही निश्चित आहेत हे समजून संबंधांना निभावणे सोपे होते. हेच न्यायाचे व्यावहारिक स्वरूप आहे, असे दर्शन सांगते.

सगळ्या मानवी संबंधातील निहित मूल्ये हे दर्शन निश्चितपणे स्पष्ट करते, आणि आत्तापर्यंतच्या मानवी नात्यांना, ज्यांना आत्तापर्यंत अगम्य, अनिश्चितपणे परिभाषित केले आहे, ती नाती फक्त समजण्यासाठीच नव्हे, तर निभावण्यासाठी एक मजबूत रचना परिभाषित करते, आणि ही रचना प्राकृतिक व्यवस्थेचाच एक भाग असल्याचे प्रतिपादित करते.

वरील काही सुत्रांद्वारे ह्या दर्शानाच्या एकंदरीत व्याप्तीची आपल्याला कल्पना आली असेल. तर आता दर्शन वांग्मय परिचय करून लेख आटोपता घेतो. 

दर्शनाचे वांग्मय:

दर्शनातील मुख्य संदर्भ ग्रंथांची नावे आणि त्यात काय आहे याचा एक थोडक्यात परिचय खालीलप्रमाणे:

१. जीवन विद्या एक परिचय – हे एक परिचयात्मक कथन आहे. यामध्ये वर्तमानातील परिस्थितीची एक समीक्षा व दर्शनातील काही मुख्य बिंदूंच्या आधारे एक प्रस्तावस्वरूपात संभाषण आहे.
२. मानव व्यवहार दर्शन – हा या दर्शनाचा सगळ्यात मौलिक ग्रंथ आहे. यामध्ये संपूर्ण अस्तित्व दर्शन आणि त्यामध्ये मानवाचे आणि मानवीय व्यवहाराचे दर्शन यासंबंधी चिंतन आहे.
३. मानव कर्म दर्शन – हे दर्शन मानवी कर्ममीमांसा आहे. मुख्य म्हणजे यामधील मुख्य भाग सह-अस्तित्ववादी विज्ञान हा आहे, ज्यामध्ये अनेक मूल वैज्ञानिक संकल्पनांचा नव्याने विचार आहे.
४. मानव अभ्यास दर्शन – हा ग्रंथ, अभ्यास, म्हणजे आचरणात आणण्याच्या दृष्टीने अभ्यास (practice) म्हणजे काय? आणि अभ्यास कसा करावा? याचे विवेचन आणि एकंदरीतच मानवीय समाज, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा संतुलन राहील याचे विवेचन हा ग्रंथ करतो.
५. मानव अनुभव दर्शन – हा अत्यंत छोटा ग्रंथ असून यात पूर्ण अनुभव स्थितीतील सत्य तत्त्वांचा अंतर्भाव आहे.

या दर्शनानंतर वरील दर्शनाचा तार्किक विस्तार या रूपाने खालील वाद आहेत.

६. व्यवहारवादी जनवाद – यात सामान्य जनचर्चेचे/संवादाचे मुद्दे काय आहेत? आणि काय असायला हवेत? यासंबंधी विस्तृत चर्चा आहे.
७. समाधानात्मक भौतिक वाद – यात समाधानमूलक भौतिक वाद आहे जो आतापर्यंतच्या द्वंद्वात्मक भौतिकवादाचा एक विकल्प आहे.
८. अनुभवात्मक अध्यात्म वाद – अनुभवावर आधारित अध्यात्माचे विश्लेषण या ग्रंथात आहे.

वरील सर्व वाद हे विचारांना स्पष्ट करतात या आधारित जगण्याचे स्वरूप/व्यावहारिकता या दृष्टीने खालील तीन शास्त्र प्रस्तावित आहेत.

९. व्यवहारवादी समाजशास्त्र – मानवी व्यवहाराचे, सभ्यतेचे, संस्कृतीचे जगण्याचे स्वरूप.
१०. आवर्तनशील अर्थशास्त्र – मानवी कर्माचे प्राकृतिक चक्रीय नियमांसहित अर्थशास्त्राचे स्वरूप.
११. मानव संचेतनावादी मनोविज्ञान – मानवी चैतन्याच्या पूर्णतेच्या आधारे मनाचे जगण्याचे शास्त्र.

वरील तीन शास्त्रांना आणि एकुणातच दर्शनाला मानवीय परंपरेत प्रतिष्ठित करण्यासाठी :

१२. मानवी संविधान – अशा अखंड मानवजातीसाठी वरील दर्शनवाद आणि शास्त्राधारित जगण्यासाठीचे मानवी संविधान. यात सुमारे १००० करोड लोकसंख्येसाठी संपूर्ण पृथ्वीवरील व्यवस्थेचे सविस्तर संविधानात्मक स्वरूप आहे.

थोडक्यात तुम्हाला कल्पना येईल की या दर्शनाची विशेषता ही आहे की यात फक्त तात्त्विक बाबींचा उल्लेख नसून या तत्त्वाला मानवी व्यवहारात आणि रोजच्या आयुष्यात कशाप्रकारे प्रतिष्ठित करता येईल आणि पूर्ण पृथ्वीवर अखंड मानवजातीसाठी एकसूत्रित संपूर्ण जगण्याचे स्वरूप यामध्ये स्पष्ट होते.

सार रूपात, मध्यस्थ दर्शन – या दर्शनाची मंगल कामना या शब्दांत व्यक्त करते : 

भूमि: स्वर्गताम यातु,
मानवो यातु देवताम,
धर्मो सफलताम यातु,
नित्यं यातु शुभोदयम

म्हणजेच 

‘भूमि स्वर्ग होवो, मानव देवता होवो, धर्म सफल होवो, नित्य मंगल होवो’

माझ्या आजच्या स्थितीनुसार एक परिचयात्मक लेख या दृष्टीने मी वरील लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा माझा दर्शनावर लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळे यातील त्रुटींची पूर्ण जबाबदारी माझी आहे.

तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाचे स्वागत आहे. जर तुम्हाला आवडले, तर यावर पुढे अजून काही लेख प्रस्तुत करू शकतो.

१४/१०/२०२३ 

दर्शन प्रणेता श्री नागराज याविषयी थोडक्यात माहिती

श्री अग्रहर नागराज (१९२०-२०१६), हे कर्नाटक राज्यातील हसन तालुक्यातील अग्रहर गाव येथील एका विद्वान व सेवाभावी कुटुंबात जन्मले. वेदमूर्ती परिवारातील वातावरणामुळे वेद-अध्ययन साहजिकच झाले .पण काही प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने त्यांनी जवळजवळ ३०-४० वर्षे या प्रश्नांवर अमरकंटक येथे अनुसंधान केले. हे दर्शन त्याचे फलित आहे. हे दर्शन ग्रंथ स्वरूपात यायला साधारण ई.स.२००० च्या पहिल्या दशकात सुरुवात झाली. भारतात काही ठिकाणी याची अध्ययनकेंद्रे असून अनेक विद्यार्थी याला समजण्याचा, तसेच जगण्याचे काही प्रयोग, शिक्षणात याचा समावेश कसा करता येईल, यावर काम करीत आहेत.

अभिप्राय 13

 • हेमंतभाऊ,
  खूप छान लिहिले आहे.

 • मीही यामध्ये दर्शनाचा गेले तेरा वर्षापासून अभ्यास करत आहे. अगदी सार्थ शब्दात दर्शनाची पार्श्वभूमी मांडून आजच्या जगत असलेल्या माणसाची स्थिती तुम्ही वर्णन केली आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ वाङ्मयात ज्याप्रमाणे घेतला आहे तसे लोकांना सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. वांग्मय म्हणजे काय आणि दर्शनामध्ये काय आहे याचे उत्तर नेमक्या शब्दात संक्षिप्त मध्ये तुम्ही मांडले आहे फारच छान दादा. तुमचा हा लेख वाचून लोकांच्या मनात दर्शन एकदा वाचण्याची उत्सुकता जागृत होईल असे मला वाटते.

 • मोजक्या शब्दात या विषयाची मांडणी तसे कठीणच आहे परंतु लेखकाने सुसंगतपणे आपले विचार व्यक्त केले आहेत.
  लेखकाचा आदरभाव आणि शालीनता लेखात बघायला मिळते. नवीन पिढीला हा विषय थोडा कठीण वाटू शकतो कारण निसर्ग, मानव अस्तित्व, समाज, संबंध, पुरकता, व्यवस्था अशा सर्व शब्दांचे मूल्य भोगवादी दृष्टीने जगताना त्यांच्या जीवनात अतिशय सूक्ष्म स्तरा पर्यंत खोलवर स्वकेंद्रित झालेले आहेत.
  परंतु याचे अभ्यासक वाढत असल्याचे वाचून आनंद झाला. पुढील लेखाचे नक्कीच स्वागत असेल.
  धन्यवाद

 • दादा खूप छान
  सार रुपात लिहिल्याने मूळ दर्शन वाचण्याची इच्छा वाचकांना नक्कीच जाणवेल.

 • श्री. हेमंत मोहरीर जी,
  आपल्या विनम्र प्रतिसादासाठी आभार.
  कोणत्याही दर्शनात एक विश्वदृष्टी अंतर्भूत असते. समग्र विश्वाच्या स्वरूपाचा— मानव हा सुद्धा ज्याचा एक महत्वपूर्ण घटक आहे अशा विश्वाच्या संदर्भात —- वेध घेत आपल्या जीवनविषयक दर्शनाची घडण करण्याची आणि आपल्या जीवनाला त्यानुसार आकार देण्याची स्वाभाविक वृत्ती मानवात आढळते.(ही वृत्ती दडपणे म्हणजे अप्रामाणिकपणे जगल्यासारखे होईल.) अशा या दर्शनाचे प्रामाण्य हे केवळ अनुभवावर आधारता येणे संभव नसते,तर अनुभवाला व्यापणाऱ्या परंतु अनुभवातीत अशा संकल्पनात्मक व्युहाच्या मदतीने बहुधा (पण नेहमीच नाही) या दर्शनांची घडण होत असते…हे एक संकल्पनात्मक चित्र असते. या रूढ अर्थाने, दर्शन ही विज्ञानाच्या पलीकडे जाणारी गोष्ट असते. पण धर्माच्या प्रांतात अनिवार्यपणे तिचे स्थान असतेच असे नाही….धर्म आणि विज्ञान यांच्या दरम्यानची ‘ no man’s land ‘ असावी असे दर्शनाचे स्वरूप असते,असे बर्ट्रांड रसेलला अनुसरून म्हणता येईल.
  ‘मध्यस्थ दर्शन’ असे मानवी जीवनाला व्यापणारे तत्वज्ञान आहे. त्याचा आशय ‘अस्तित्व हे सह-अस्तित्व आहे.’ या एकाच सूत्रात व्यक्त करता येईल.
  भारतीय दार्शनिक परंपरेचा असा विकास आजच्या आधुनिक काळात शक्य झाला आहे, हे तिच्या भावी विकासाच्या दृष्टीने आश्वासक चित्र आहे.
  या दर्शनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ते जगण्यावर व जीवनाला प्रमाणित करण्यावर भर देते…तेव्हा या दर्शनाचे प्रामाण्य जीवनामध्येच अनुस्यूत असले पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय यांसारख्या आधुनिक मुल्यांचा अनुभव हा मानवी जीवनसाफल्याचा अनुभव असतो, अशी आधुनिकेची भूमिका आहे.विवेकशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या मानवी व्यक्तीला स्वीकृत अशी ही आधुनिक दृष्टी असते. चैतन्यशील जीवनाचा आविष्कार हेच प्रस्तुत दर्शनात जीवनाला प्रमाणित करण्याचे ध्येय असेल, तर ते या आधुनिक दृष्टीशी सुसंगत अशापरीने विकसित करता येईल,अशा रितीने त्याचा विकास शक्य आहे ही भूमिका घ्यायला जागा आहे.पण ज्या भेदावर— म्हणजे आधुनिक व आधुनिकेत्तर या भेदावर— ही भूमिका आधारलेली असेल त्या भेदाला दूर करण्याची साधने विकसित करूनच हे करता येईल.अर्थात, ज्याच्या अनेक दिशांनी विकासाच्या शक्यता आहेत,अशा एका दर्शनाचा– मध्यस्थ दर्शनाचा—एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी कसा विकास होतो ह्यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे.
  प्रस्तुत दर्शनाचे चिकित्सक समीक्षण व्हावे,एवढी अपेक्षा शेवटी करता येईल.
  पुनश्च एकदा आभार.
  ‘आजचा सुधारक’ परिवाराने या विषयांवरील चर्चेसाठी अवकाश उपलब्ध करून दिल्याने, त्यांचेही आभार.

  • धन्यवाद श्रीधर दादा. खरे तर तुमच्या लेखामुळेच या लेखनाची सुरुवात झाली. माझ्या मते मध्यस्थ दर्शन हे एकविसाव्या शतकातील एक मानवाच्या कल्याणाचे सर्वसमावेशक आणि सर्वमान्य दर्शन होईल असे वाटते. तुमच्यासारख्या ,नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांनी याची चिकित्सक समीक्षा करावी, आणि आपल्या जगण्याचे अधिष्ठान मजबूत करावे, यापेक्षा चांगली गोष्ट होऊ शकत नाही. आपल्याला शुभकामना!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.