नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचाराविरुद्ध लोकप्रतिनिधी बोलत नाहीत कारण त्यांना जिवाची भीती असते व निवडणुका जिंकायच्या असतात. विकासकामांना विरोध हे नक्षलवाद्यांचे अजूनही प्रभावी हत्यार असले, तरी यामागील गणिते परिस्थिती बघून ठरवली जातात. जनतेने विकासकामात सहभागी होऊ नये असे बजावणाऱ्या नक्षलवाद्यांना कंत्राटदारांनी केलेली कामे चालतात, कारण त्यांतून खंडणी मिळते. त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागाचा पायाभूत विकास झाला तर जनता पाठीशी राहणार नाही, अशी भीती या चळवळीला सतत वाटत आली आहे. यामुळे अशा प्रकरणांत खंडणी उकळताना अतिशय सावध पावले उचलली जातात. नक्षलग्रस्त भागाचा विकास झाला तर आदिवासी प्रगत होतील व कोणताही प्रगत माणूस या चळवळीकडून होणाऱ्या नरसंहाराबाबत शांत बसणार नाही याची जाणीव नक्षलवाद्यांना आहे; म्हणूनच त्याना विकास नको आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेतल्या तर ज्या उद्देशाने ही चळवळ सुरू झाली तोच नाहीसा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. खंडणीखोरांची संघटित टोळी असे स्वरूप झालेली ही चळवळ आता राजकीय उद्दिष्टांच्या गप्पा करत लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचे स्वप्न बघू लागली आहे, म्हणूनच देशाची अखंडता धोक्यात आली आहे.
[ देवेंद्र गावंडे यांच्या नक्षलवादाचे आव्हान या पुस्तकातून ]
आमचे चिरंजीव उत्पल चंदावारकडे आजचा सुधारक येतो. अधूनमधून मी पाहत असतो. मार्च2012 चा अंकही पाहिला आहे. यात नक्षलवादी, लोकशाहीच देशाची अखंडता’ हा श्री देवेन्द्र गावंडे यांच्या पुस्तकातला अंश मुखपृष्ठावर दिलेला आहे. विरोधातलीच भूमिका आजचा सुधारकची आहे, असेच मला वाटले. श्री देवेन्द्र गावंडे यांची भूमिका विरोधातलीच आहे, हे मला या आधीपासूनच माहीत आहे. अर्थात नक्सलवादाची राजकीय विचारसरणी क्रांतीची आहे, ती सुधारणावादाची नाही. म्हणून, आपली नक्सलविरोधाची भूमिका याला साजेशीच आहे, असे म्हणायला हरकत नसावी. पण, यामुळे नक्सली-माओवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सदोष राहन जात असेल तर, तो तसा राहू नये या विषयीची काळजी घ्यायला हवी. सुधारकांनी काळजी घेण्याचे कारण नाही असे म्हणून टाळू नये!
मी गेली कित्येक वर्ष नाक्सली-माओवादी प्रभावित क्षेत्रांच्या संपर्कात आहे.विशेषतः बिहार-झारखंड ही माझी क्षेत्रे राहिलेली आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतल्या नक्सली-माओवाद प्रभावित क्षेत्रांतही दोनदा निरीक्षण व अभ्यासासाठी मी जाऊन आलो आहे. लोकजीवनातले जे प्रश्न मूलभूत स्वरूपाचे म्हणता येतील त्यांच्या समाधानाचे उपाय दहशत व हिंसेतून माओवादी करतात, हे मला मान्य नाही. पण, या ” प्रश्नांच्या समाधानाचे निश्चित स्वरूपाचे उपाय शोधायलाच हवेत, याविषयी मतभेद असू नयेत! या बाबतीत आजचा सुधारक कोणती निश्चित स्वरूपाची भूमिका घेतो याची मला कल्पना नाही. पण. अशी काही स्पष्ट भमिका घेतली गेली असेल. तर ती मला कळायला हवी. या अनुषंगाने आपणाकडून काही कळू शकले, तर ते मी माझ्या लाभाचेच मानीन!
बाबूराव चंदावार,
साईनगर, दी. 1, फ्लॅट-13, सिंहगड रोड, पुणे 411030. दूरध्वनी – 020-24250693