मन, मेंदू आणि सर्ल

‘न्यूरोसायन्स’ किंवा ‘मेंदू-विज्ञान’ ह्या क्षेत्रात झपाट्याने जे नवे शोध लागत आहेत, त्यांची दखल तत्त्वज्ञान घेते का, असा प्रश्न जेव्हा ऐकला, तेव्हा नजरेसमोर नाव आलेते सर्ल यांचे. अर्थात जे. जे. सी. स्मार्ट, डेनेट, चर्चलन्ड, डेव्हिडसन, नागेल ही नावेही नजरेआड करता येणारी नाहीत; पण ‘चायनीज रूम आर्युमेंट’ मांडणाऱ्या सर्ल यांचे नाव ठळकपणे नजरेत भरते. वैज्ञानिक दृष्टी ढळू न देता त्यांनी मनाविषयी ज्या सर्वसाधारण समजुती आहेत, त्यांचीही दखल घेतल्याने सर्ल यांचा दृष्टिकोण मोलाचा ठरतो.
वैज्ञानिक दृष्टिकोणाचा वारसा सर्लना मिळाला, तो आई-वडिलांकडून. वडील इंजीनिअर तर आई डॉक्टर. अशा सुविद्य दांपत्याचा मुलगा जॉन सर्ल याचा जन्म 31 जुलै, 1932 रोजी अमेरिकेतील डेन्वर येथे झाला व शिक्षण प्रामुख्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ जॉन ऑस्टिन यांच्या मार्गदर्शनानुसार ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. ‘व्होडस स्कॉलर’ असणाऱ्या सर्लने 1956 ते 1959 दरम्यान ऑक्सफर्ड येथील ख्राइस्ट चर्च महाविद्यालयात अध्यापन केले व 1959 पासून ते आजतागायत बर्लेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आजवर अनेक सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विविध विषयांवर त्यांनी विपुल लिखाण केले आहे. वीस भाषांत त्यांच्या लिखाणाचा अनुवाद झाला आहे.
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सर्लचा जैविक निसर्गवाद प्रसिद्ध आहे. जैविक निसर्गवाद किंवा Biological Naturalism हे नावच मुळी छाती दडपून टाकणारे वाटते; पण मुद्दा सोपा आहे. सर्ल म्हणतात, “पचन-उदर समस्या ऐकिवात आहे काय?” उदरात पचन होते, हे सर्वांना माहीत आहे. ती अत्यंत स्वाभाविकपणे होणारी जैविक प्रक्रिया आहे. त्यात कोणतीही वैचारिक गुंतागुंत नसते, समस्या नसते. त्याचप्रमाणे भावणे, विचार करणे, आठवणे, कल्पना करणे अश्या ज्या ज्या प्रक्रिया मेंदूत होतात, त्याही पचनाप्रमाणे जैविक असतात. त्यांचे जीवशास्त्रीय स्पष्टीकरण विज्ञानाला आज पूर्णांशाने देता आले नाही, तरी आज ना उद्या विज्ञानाला हे नक्की जमणार; असा विश्वास सर्लना वाटतो.
त्यामुळे ‘मन-शरीर समस्या’ मुळात निर्माण करू नये, तिचा बागुलबुवा तर मुळीच करू नये, असे सर्ल यांचे म्हणणे आहे. ‘पचन-उदर समस्या’ जशी उद्भवत नाही, तशीच ‘मन-शरीर समस्या’ मुळातच नाही, पचन उदरात होते तशा मानसिक क्रिया-प्रक्रिया शरीरातील मेंदूत घडतात. उदरातील पचनाचे जसे जीवशास्त्रीय स्पष्टीकरण देता येते, त्याचप्रमाणे मेंदूतील मानसिक क्रियांचे जीवशास्त्रीय स्पष्टीकरण देता येते. रागावणे, हसणे, विचार करणे, स्वप्नरंजन, स्मरण इत्यादी मनोव्यापार वा मानसिक क्रिया मेंदूतील विविध जैविक प्रक्रियांचा परिपाक असतात. जर मेंदूत काहीच घडले नाही, तर कोणतीही मानसिक अवस्था अशक्यप्राय ठरते.
आजच्या घडीला विज्ञान असे मानते की डेल्टा अ फायबर्समार्फत (विशिष्ट प्रकारची स्पर्श-संवेदना वाहून नेणारे मज्जातंतू) काटा टोचल्यासारखा अनुभव मेंदूपर्यंत पोचवला जातो. तर डेल्टा क फायबर्समुळे भाजणे, दुखणे असे अनुभव पोचवले जातात. त्याच्या प्रवासाविषयी वैज्ञानिक विवेचन सर्लनी केले आहे. त्याचा मथितार्थ हाच की वेदनानुभवाचे कारण मस्तिष्कवापर. मेंदूत उद्भवणाऱ्या प्रक्रियांचा परिपाक म्हणजे वेदनानुभव.
मुद्दा असा आहे की हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्यातील आंतरक्रियांमुळे पाण्यात जसा द्रवत्व हा गुणधर्म येतो, त्याचप्रमाणे मेंदूतील आंतरप्रक्रियांमुळे मनोव्यापार उद्भवतात, असे सर्लचे म्हणणे आहे. मोटारीच्या इंजिनाची यंत्रणा ज्याप्रमाणे समजावून सांगता येते, त्याचप्रमाणे मेंदूत घडणाऱ्या घडामोडीही समजावून सांगता येतात. मग त्यातील गूढता बऱ्याच अंशी कमी होते. अशी गूढता कमी झाली, तरी त्यामुळे माणसाला निसर्गाचे वाटणारे आकर्षण यत्किंचितही कमी होत नाही, ह्याकडेही सर्ल आपले लक्ष वेधतात.
गुरुत्वाकर्षण, प्रकाशसंश्लेषण, आकाशगंगा ह्या निसर्गाच्या चमत्कारांचे विज्ञानाने सविस्तर स्पष्टीकरण दिले, तरीही माणसाला त्याविषयी वाटणारे आकर्षण कायम राहते. त्याचप्रमाणे वैज्ञानिकांनी जरी मानसिक घटना कशा मेंदूतील आंतरप्रकियांमुळे घडतात, हे स्पष्ट केले, तरी ‘मन’ ही संकल्पना माणसाला जी भुरळ घालते, ती कायमच राहणार. अशा रीतीने विज्ञानाला बगल न देता सर्ल मनाविषयीच्या सर्वसाधारण समजुतींनाही पुष्टी देतात. म्हणून त्यांनी आपल्या भूमिकेला Biological Naturlism as scientifically so phisticated common-sense असे म्हटले आहे. अर्थात असे म्हणताना ‘कॉमन सेन्स’ला कमी लेखायचे नसून प्रतिष्ठा द्यायची आहे, हे लक्षात घ्यावयास हवे.
विसाव्या-एकविसाव्या शतकात, सतराव्या शतकातील परिभाषा वापरून चालणार नाही, असे सर्लनी आवर्जून सांगितले आहे. सतराव्या शतकात देकार्तने मांडलेली द्वैताची संकल्पना वैज्ञानिक युगात टिकणारी नाही; म्हणून आजची, काळाच्या कसोटीवर टिकणारी मेंदु-विज्ञानाची परिभाषा स्वीकारण्याचा आग्रह सर्ल धरतात. त्याचा अर्थ केवळ विज्ञानाच्या भाषेत बोलून ते सर्वसामान्य माणसापासून दूर जातात असा नव्हे. राग, आनंद, असूया, लोभ वगैरे भाव-भावना केवळ मेंदूतील प्रक्रियांमुळे उद्भवतात, हे विज्ञानाचे म्हणणे/प्रतिपादन सामान्य माणसाला पटत नाही कारण त्याचा मनःसामर्थ्यावर विश्वास असतो. मन जागरूक असते; अवतीभवती घडणाऱ्या घटनांची नोंद घेते; मनामुळे बऱ्याच उलथापालथी घडतात, किंबहुना आज माणसाने जी सांस्कृतिक प्रगती केली आहे, ती मनाच्या जोरावरच शक्य आहे; त्यामुळे मनाला लाटांवरील फेसासारखे नगण्य मानता येणार नाही, हे सर्वसामान्य मत सर्ल नाकारत नाहीत. मात्र त्याचवेळी विज्ञानाने केलेली घोडदौडही सर्ल विसरत नाहीत. म्हणून सर्लना समन्वयवादी म्हणता येईल.
आपली भूमिका स्पष्ट करताना सर्लनी सुप्रसिद्ध ‘चायनीज रूम आर्युमेंट’ मांडली. प्रस्तुत युक्तिवाद स्पष्ट करण्यापूर्वी तो ज्या पार्श्वभूमीवर मांडला, त्या ट्युरिंग टेस्ट’चा उल्लेख करावा लागेल. अॅलन ट्युरिंगने 1950 साली एका अभिनव प्रयोगाची कल्पना मांडली. त्याचा मथितार्थ असा : समजा ‘क’ व्यक्तीने ‘अ’ व ‘ब’ ला काही प्रश्न विचारले आणि त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून ‘अ’ व ‘ब’ ह्यांपैकी संगणक कोण व माणूस कोण हे ओळखणे शक्य झाले नाही तर संगणकाला बुद्धिमत्ता आहे हे गृहीत धरावे लागेल. संगणकही माणसाप्रमाणे विचार करतो, अशा जहालमताच्या (Strong Artificial Intelligence) जवळ जाणारा विचार ट्युरिंगने मांडला; पण तो सर्लने ‘चायनीज-रूम आयुमेंट’च्या आधारे खोडला.
सर्ल यांच्या मते, मानवी मन व संगणक ह्यात थोडेफार साम्य असले, तरी मानवी मनाला ज्याप्रमाणे आकलन होते व संगणक टला ट जुळवून’ ज्याप्रमाणे उत्तरे देतो, त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. संगणक उत्तरे देतो, ती केवळ आज्ञेबरहुकूम. त्याला विशिष्ट आज्ञावली पुरवलेली असते, म्हणून त्यानुसार उत्तरे पुढे केली जातात. पण शब्दाशब्दांमधून प्रतीत होणारे अर्थ समजून घेण्याची क्षमता किंबहुना ‘शब्दाच्या पलीकडले’ समजून घेण्याची मानवी मनाची क्षमता संगणकात नाही.
आपल्या म्हणण्यापुष्ट्यर्थ सर्लनी एक उदाहरण दिले आहे. हॉटेलमध्ये शिरलेला एक माणूस बर्गर मागवतो. पण समोर आलेला जळका बर्गर पाहून रागारागाने निघून जातो. बिल-टिप न देता. ह्यावरून त्याने बर्गर खाल्ला नाही’ हे फक्त मानवी बुद्धीच जाणते. संगणकाकडे अशी बुद्धिमत्ता नसते. न सांगता समजू शकण्याचे to read between the lines’ चे कसब फक्त मानवी बुद्धीत असते; संगणकात नाही, असा सर्लचा ठाम विश्वास आहे. ह्या संदर्भात त्यांनी 1984 मध्ये ‘चायनीज रूम’ युक्तिवाद मांडला. चिनी भाषा लिहिता, वाचता, बोलता येत नसताना जर एखाद्याला खोलीत कोंडून ठेवले, व हातात चिनी भाषेतील मजकूर ठेवला, तर त्यातील ओ का ठो त्याला कळणार नाही. मात्र जर सोबत चिह्नांचा अर्थ सांगणारी नियमावली दिली, आज्ञावली दिली, तर त्याबरहुकूम थोडीफार उत्तरे देता येतील. म्हणजे, ह्या चिह्नाचा अर्थ माणूस, ह्या चिह्नाचा अर्थ कुत्रा, ह्या चिह्नाचा अर्थ हाडे असा सांगितला, तर थोडाफार अर्थबोध होऊ शकतो. पण प्रस्तुत मजकूर कविता आहे की कथा, त्याच्यामागील गर्भितार्थ कोणता, हे काही त्याला सांगता येणार नाही. भाषा अवगत असल्यावर जसा शब्दबोध होतो, तसा येथे होणार नाही. मात्र चिनी भाषेचे तिळमात्र आकलन न होताही आपण ‘ट ला ट जुळवून’ आज्ञावलीच्या साहाय्याने जी थोडीफार उत्तरे देऊ शकतो, त्याचप्रमाणे संगणकही उत्तरे देत असतो. उत्तरे देऊ शकण्याच्या त्याच्या क्षमतेचा अर्थ त्याला विषयाचे आकलन होत आहे, असा बिलकूल नसतो. फ्रान्सिस क्रिक, एडेल्मन, क्रिस्टॉफ कोच इत्यादी मेंदूतज्ज्ञांचा हवाला देत सर्ल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संगणकाला फक्त वाक्यरचना (syntax) कळते, शब्दार्थविचार (seman tics) उत्तरे देत राहतो.
परंतु येथे ‘आकलन’ ह्या संकल्पनेचा सूक्ष्म विचार करणे आवश्यक ठरते. सर्ल यांनी म्हटल्याप्रमाणे, आकलन विविध पातळ्यांवर होत असते. हल्ली आपण विशिष्ट प्रकारचे दरवाजे बघतो. आत शिरण्यापूर्वी ते बरोबर उघडतात नि शिरल्यावर बंद होतात. ह्याचा अर्थ कुणी आत येत असल्याचे ‘ज्ञान’ दरवाजाला होते का? अर्थातच नाही. सर्लनी म्हटल्याप्रमाणे, फोटोइलेक्ट्रिक सेलमुळे दरवाजाची उघडझाप शक्य होते. थर्मोस्टॅटला तापमान ‘कळते’ का? समजा, हो म्हटले, तरी ते कळणे मानवी आकलनक्षमतेहून भिन्न आहे, हा कळीचा मुद्दा आहे. मानवी मन व संगणक जरी ग्रहण केलेल्या माहितीचे प्रोसेसिंग करत असले तरी मानवी मन ज्याप्रकारे माहिती ग्रहण करते, आत्मसात करते, तसे कार्य संगणकाकडून घडणार नाही. मात्र मनोव्यापार समजून घेताना संगणकाचे प्रारूप उपयुक्त ठरू शकेल असे म्हणताना सर्ल Weak Artificial Intellegence (मवाळ कृत्रिम बुद्धिमत्ता) मांडतात. 1980 साली लिहिलेल्या ‘Minds, Brains and Programs discovery of Mind’ (1992) ‘The Mystery of Consciousness’ (1997), अलीकडील ‘Mind : A Brief Introduction’ मूळ भूमिकेत फारसा बदल झालेला नाही असे दिसून येईल. हॅरी केस्लरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रस्तुत प्रश्न मेंदू विज्ञानाच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. कोणत्याही मूलभूत समस्येला जेव्हा ठाम/ठोस उत्तरे मिळू लागतात तेव्हा ती समस्या तत्त्वज्ञानातील राहात नाही. आदिम मानवाला सृष्टीसंबंधीचे जे मूलभूत प्रश्न पडले, त्याचा त्याने वेध घेतला व त्याला ठाम उत्तरे मिळू लागली व त्यातून पुढे विविध शास्त्रे निर्माण झाली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र नि कालांतराने समाजशास्त्र, अर्थशास्त्र, व अगदी अलीकडील मानसशास्त्र ह्याच प्रकारे तत्त्वज्ञानातून बाहेर पडले. Study of consciousness किंवा जाणिवेच्या शास्त्रातही जर अशी ठाम-ठोस उत्तरे मिळाली, तर त्याचा समावेशही तत्त्वज्ञानात होणार नाही, हे मत सर्लने मुलाखतीत मांडले आहे. मात्र हे मत एकतर सर्व तत्त्वज्ञांना मान्य होणारे नाही; शिवाय, भारतीय तत्त्वज्ञानाची दृष्टी निराळी आहे; परंतु तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
एकंदरीत, मेंदू-विज्ञानाला जर ठोस उत्तरे मिळत गेली, तर मन-शरीर समस्या राहणार नाही, असे चित्र बऱ्याचदा उभे केले जाते. समजा, असे घडले, तरी त्यामुळे तत्त्वज्ञान संपले, असे होत नाही. विविध संदर्भात विविध समस्या उद्भवतात; तत्त्वज्ञान त्यांचा वेध घेते. जुन्याच उत्तरांचा नवीन संदर्भात नवा अन्वयार्थ लावते. नव्या वाटा वळणांनी, नव्या प्रवाहांना सामावून घेत, तत्त्वज्ञान पुढे जात राहते…. मेंदू-विज्ञानाने कितीही संशोधन केले, तरीही ‘तत्त्वज्ञान’ संपत नसते. सर्लही जरी नव्या शतकाला साजेशा भाषेचा आग्रह धरत असला, जैविक निसर्गवाद मांडत असला, तरी जाणिवेला, जाणिवेच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवाला नकार देत नाही. सर्लचे हे समन्वयाचे कार्य मोलाचे वाटते.
[ अॅलन ट्युरिंगने माइंड या नियतकालिकाच्या ऑक्टो. 1950 च्या अंकात ‘द इमिटेशन गेम’ नावाचा एक लेख लिहिला. त्यात संगणकांना बुद्धिमान केव्हा मानता येईल हे ठरवायला एक विचार-प्रयोग सुचवला होता. त्याला आज ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ट्युरिंगच्या युक्तिवादाचा गाभा असा : विचार करण्याची पटेल अशी नक्कल करणे म्हणजेच विचार करणे. लेखाच्या नावातील ‘इमिटेशन’ हा शब्द त्यामुळेच महत्त्वाचा ठरतो. ]
आता सर्लच्या ‘चायनीज रूम’ विचार-प्रयोगात जी थोडीफार उत्तरे’, ‘थोडाफार अर्थबोध’, अशी भाषा आहे, ती पाहता सर्ल अल्पसंतोषी आहे! पण जर एखादी व्यक्ती व्यापक प्रश्नोत्तरांमध्ये तपासनिसाला पटेल इतपत क्लिष्ट उत्तरे पटेल इतपत वेळात देऊ शकली, तर (आणि तरच!) तिला चिनी भाषा येते असे प्रमाणपत्र देता येईल. याच युक्तिवादाने संगणक विचार करू शकतो की नाही याचे उत्तर ठरवावे, असे ट्युरिंग म्हणाला.
म्हणजे ‘चायनीज रूम’ने जो मुद्दा खोडला असे सांगतात, तो ‘ट्युरिंग टेस्ट’ला मुळात मान्यच नव्हता! ह्न नंदा खरे ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.