माझे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील गुरू डॉ. भालचंद्र फडके मला १९६६ मध्ये अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रो. श्रीमती म. गं. नातू यांच्याकडे घेऊन गेले. डॉ. भालचंद्र फडके यांनी माझी हमी घेतल्यामुळे बाईंनी मला पीएच्. डी. करिता मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. मी विदर्भातील नोकरी सोडून पैठणला आलो. १९७६ मध्ये मला पीएच्. डी. मिळाली. बाईंशी या निमित्ताने आलेला ऋणानुबंध पुढेही कायम राहिला. १९४६ पासून १९७७ पर्यंत बाई विदर्भ महाविद्यालयात होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्या नागपूर येथे स्थायिक झाल्या. दि. ३ एप्रिल १९८८ रोजी बाई नागपूर येथे निधन पावल्या.
विषय «संघटना-व्यक्ती विशेष»
“बाई”
सुमारे ३० वर्षापूर्वी मी नातूबाईंना प्रथम पाहिले. “वाचक पाहिजे” अशी जाहिरात त्यांनी दिली होती. मला शिक्षण घेता घेता करण्याजोगे काही काम हवे होते. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला तेव्हा खोलीत काळोख होता. पडदे सरकवलेले होते. पंखा मंद सुरू होता आणि हाताशी असलेल्या आटोपशीर स्टुलावर डोके खाली केलेला टेबललॅम्प जळत होता. बाई पलंगावर किंचित रेलून, विसावून पहुडलेल्या होत्या. अंगावर शुभ्र सुती साडी, कपाळावर अगदी बिंदुले काळे कुंकू, लख्ख गोरा वर्ण, काळेभोर केस. त्यांनी पुस्तक पुढे केले तेव्हा दिसलेला मृदू गुलाबी तळवा आणि नाजुक त्वचा.