‘व्यक्तीच्या शरीरातील अवयवांत आणि समाजाच्या शरीरातील अवयवांत एक मोठा भेद आहे, तो हा की, ज्याप्रमाणे समाजाच्या प्रत्येक अवयवास ज्ञान, संवेदन, इच्छा इत्यादि मनोधर्म पृथक्त्वाने असल्यामुळे सुखदुःखाचा अनुभव प्रत्येकास होत असून ते संपादण्याविषयी अथवा टाळण्याविषयी प्रत्येकाचा प्रयत्न निरंतर चालू असतो, त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती नाही. त्यापैकी प्रत्येकास मन नाही. त्या सर्वांचे व्यापार नीट चालणे ही गोष्ट ज्या एका व्यक्तीचे ते अवयव आहेत त्या व्यक्तीस कल्याणकारक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. समाजाचे कल्याण म्हणजे या काल्पनिक पुरुषाचे कल्याण नव्हे; तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय.
विषय «उवाच»
आगरकर म्हणतात –
धर्ममंदिराची रचना श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे, असे हिंदू धार्मिकांचेच म्हणणे आहे असे नाही. पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय त्राता नाही व थारा नाही, या संबंधात बुद्धिवादाचे नाव काढले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो! एखाद्या दिवाळखोर कर्जबाजाऱ्यास ज्याप्रमाणे आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहण्याचे धैर्य होत नाही, किंवा ज्यांची जीविताशा फार प्रबल झाली आहे त्यांना आपल्या रोगाची चिकित्सा सुप्रसिद्ध भिषग्वर्याकडून करवत नाही, त्याप्रमाणे श्रद्धाळू धार्मिकास आपल्या धर्मसमजुती व त्यावर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही.