लेखांक पहिला – सेक्युलॅरिझम आणि भारत

एप्रिल १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात ‘धर्मनिरपेक्षता : काही प्रश्न‘ या विषयावरील परिसंवादासाठी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्या संदर्भात प्रस्तुत लेख लिहीत आहे. प्रश्नावलीतील मुद्द्यांना तुटक तुटक उत्तरे देण्याऐवजी सेक्युलॅरिझम या संकल्पनेचा उद्गम कोणत्या परिस्थितीत झाला, या संकल्पनेचा मध्यवर्ती आशय कोणता, ही संकल्पना कोणत्या मागनि विकसित होत गेली आणि मुख्यतः भारतात तिला कोणते स्वरूप आले. भारतातील धार्मिक संघर्षाची समस्या सोडविण्यात ही संकल्पना पूर्णपणे यशस्वी का होऊ शकली नाही, सेक्युलॅरिझम ही संकल्पनाच येथील परिस्थितीच्या संदर्भात सदोष आहे की शासन आणि विविध राजकीय पक्ष यांच्या चुकीच्या धोरणामुळे सेक्युलॅरिझमची यशस्वी अंमलबजावणी होऊ शकली नाही यासारख्या प्रश्नांची चर्चा केल्यास प्रश्नावलीतील बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

‘आजचा सुधारक’च्या मे ९१जून ९१जुलै ९१ या तीन अंकांत श्री. दिवाकर मोहनी यानी तीन लेख लिहिले आहेत, पण या लेखांचा प्रश्नावलीत उपस्थित केलेल्या समस्यांशी फारसा संबंध नसल्याने आणि या तीन लेखांतील हिंदू-अहिंदू कोण, हिंदूंचे पाच प्रकार, मुस्लिमांच्या तुष्टीने हिंदूंचा अपमान का व्हावा, मुस्लिम समाजात रूढ असलेल्या ‘तलाकाच्या अधिक सुलभीकरणाने होणारा स्त्रियांचा लाभ यासारख्या मोहनी यांनी निर्माण केलेल्या अप्रस्तुत प्रश्नांच्या चक्रव्यूहात शिरण्याची आवश्यकता नाही, आणि मला त्यांची सूक्ष्म चिकित्सापद्धती (hairsplitting -साखरेची साल काढणारी) अवगतही नाही.

सेक्युलॅरिझम – “Render therefore unto Caesar the things that are Caesar’s, and unto God the things that are God’s.” या सुप्रसिद्ध वचनात सेक्युलॅरिझमची कल्पना अत्यंत मार्मिकपणे स्पष्ट करण्यात आली आहे. राज्यसत्ता आणि पारलौकिक शक्तीच्या संकल्पनेवर आधारित धर्मसत्ता (religious authority) यांची ऐहिक-लौकिक व्यवहारात फारकत करणे आवश्यक आहे; धर्मसत्तेने समाजाच्या ऐहिक व्यवहारात हस्तक्षेप करता कामा नये ही सेक्युलॅरिझमची मध्यवर्ती कल्पना आहे. गेल्या हजार दीड हजार वर्षांत या संकल्पनेचा विकास कसकसा होत गेला हे पाहणे उद्बोधक आहे. भारतानही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपले राजकीय उद्दिष्ट ‘सेक्युलर डिमॉक्रसी हेच निश्चित केले. कराची काँग्रेसच्या ठरावात या संकल्पनेचा उल्लेख ” the state shall observe neutrality in regard to all religions” या शब्दांत केला आहे. सेक्युलॅरिझमबरोबरच समान नागरिकत्वावर आधारलेली लोकशाही, सामाजिक सांस्कृतिक, आर्थिक समता या उद्दिष्टांचीही नेहरूंनी त्यावेळी घोषणा केली. या चतुर्विध ध्येयप्रणालीचा पाया ‘सेक्युलॅरिझम’ हाच आहे. जन्मजात वर्णजातिव्यवस्थेवर आधारलेल्या आणि बहुधर्मीय भारतीय समाजामध्ये लोकशाही आणि समता यांची प्रस्थापना करावयाची झाल्यास सेक्युलॅरिझमशिवाय अन्य पर्याय नाही हे नेहरूंनी ओळखले होते. धर्मनिरपेक्ष समान नागरिकत्वाच्या संघर्षातूनच सेक्युलॅरिझमचा उदय झाला. धर्मनिरपेक्ष समान नागरिकत्व हा लोकशाहीचा पाया असल्यामुळेच या तीनहीं कल्पना परस्परांशी निगडित आहेत.

निधर्मी अथवा धर्मातीत या शब्दांनी ‘सेक्युलॅरिझम’ या संकल्पनेतील अर्थ योग्यप्रकारे व्यक्त होत नाही, निधर्मी या शब्दाने तर अपसमजच निर्माण होतो. निधर्मी समाजव्यवस्था म्हणजे ज्या समाजात धर्म-अधर्म नीती-अनीती यांचा विवेक नाही; नैतिक बंधने, विधि-निषेध नाहीत अशी समाजव्यवस्था. भारतीय परंपरेत ‘धर्म शब्दाला व्यापक अर्थ आला आहे. रिलिजन आणि धर्म या संकल्पना एक नाहीत. रिलिजन या शब्दात ‘ विश्वाचे नियंत्रण करणारी पारलौकिक, अतिमानवी शक्ती’ अभिप्रेत आहे. धर्म या शब्दात ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही कल्पना समाविष्ट केल्या गेल्या आहेत. काही प्रसंगी तर धर्म हा शब्द संपूर्णपणे ऐहिक जीवनाशीच निगडित आहे.”धारणात् धर्म इति आहुः धर्मेण विधृताः प्रजाः। यस्याद्धारण संयुक्त सधर्म इति निश्चयः” कोणत्याही समाजव्यवस्थेला शासनाची आवश्यकता आहेच; मग ते राज्यशासन (स्टेट) असो, वा अराज्यवादी समाजाने निर्माण केलेले स्वयंशासन असो. ‘धारण करणारा तो धर्म’ यात हीच शासनाची कल्पना अभिप्रेत आहे. समाजाच्या लौकिक व्यवहाराची चक्रे सुव्यवस्थितपणे फिरत राहून सर्व समाजाच्या भौतिक आणि मानसिक-आत्मिक विकासाला साहाय्यभूत होणारी विधिनिषेधांची यंत्रणा (सिव्हिल अँड पीनल कोड) म्हणजेच शासन अथवा भारतीय परंपरेतील धर्म, सेक्युलॅरिझमचा याला विरोध नाही. सेक्युलर हा शब्द रिलिजन या शब्दाचा विरोधी होऊ शकेल. परंतु तो धर्माच्या ऐहिक-सामाजिक संकल्पनेच्या विरोधी नाही. म्हणून निधर्मी अथवा धर्मातीत या शब्दांचा उपयोग न करता येथे सेक्युलर ह्याच शब्दाची प्रामुख्याने योजना केली आहे. मधून मधून लौकिक, ऐहिक व क्वचित प्रसंगी धर्मनिरपेक्ष हेही शब्द योजिले आहेत. खरा मूलभूत प्रश्न असा आहे की लौकिक जीवनव्यवहारावर सत्ता गाजविणारी विधि-निषेध-यंत्रणा पारलौकिक, अतिमानवी सामर्थ्याच्या संकल्पनेवर आधारित आहे की ती मानवीबुद्धी, लौकिक-सामाजिक गरजा, माणसाचे ऐहिक सुखसमाधान यांतून निर्माण होते? माणसाच्या ऐहिक जीवनातील पारलौकिक सत्तेचा हस्तक्षेप थांबविणे, म्हणजेच धर्मसत्तेच्या (रिलिजन) जोखडातून ऐहिकव्यवहाराची, सामाजिक विधिनिषेधांची मुक्तता करणे हाच सेक्युलॅरिझम होय. गेली हजार दीड-हजार वर्षे युरोपात या संकल्पनेचा विकास होत आला आहे. परिस्थितीला अनुरूप असे नवे नवे विचारप्रवाह मूळ कल्पनेला येऊन मिळाले, आणि धर्मसत्ता (religion) आणि राजसत्ता (ऐहिक शासनयंत्रणा) यांची पूर्ण फारकत होऊन मूळ सेक्युलॅरिझमची कल्पना अधिकाधिक समृद्ध झाली.

१८५० च्या सुमारास जॉर्ज जेकब हॉलीओक याने सेक्युलॅरिझम हा शब्द रूढ केला. राजसत्ता (स्टेट) आणि धर्मसत्ता (चर्ची यांची संपूर्ण फारकत झाली पाहिजे हा विचार त्याने मांडला; शासनाचा कोणताही अधिकृत धर्म असणार नाही; कोणत्याही धर्माला (religion) शासनाचा पाठिंबा असणार नाही; सर्व धर्माच्या बाबतीत शासन तटस्थ असेल; शासनाचा सर्व व्यवहार कोणत्याही धर्मग्रंथावर अगर प्रेषिताच्या आज्ञेवर आधारित असणार नाही. मात्र हॉलीओकने नागरिकांच्या वैयक्तिक जीवनात धर्मस्वांतत्र्याला मान्यता दिली. परंतु हे धर्मस्वातंत्र्य व्यक्तीला देत असताना त्या व्यक्तीचे नागरिकत्व तिच्या धर्ममतावर अवलंबून असणार नाही-नागरिकत्व धर्मनिरपेक्ष असेल असे त्याने आग्रहाने सांगितले. मध्ययुगात दृढ असलेली मानवी मनावरील धर्माची पकड विज्ञानयुगात सैल होऊ लागली होती. निरनिराळी भौतिकशास्त्रे, सामाजिकशास्त्रे उदयाला येत होती. समाजशास्त्र, इतिहासशास्त्र, मानववंशशास्त्र यांसारख्या शास्त्रांचा अभ्यास सुरू झाला होता. याचा परिणाम असा झाला की शासनसंस्था, कुटुंबसंस्था, विवाह-संस्था, समाजाचे नियमन करणारे कायदे व त्यामागील तत्त्वज्ञान (जूरिस्यूडन्स) या सर्वांची निर्मिती सामाजिक गरजांना अनुसरून माणसानेच केली आहे, पारलौकिक शक्तीचा यांच्याशी काहीही संबंध नाही हे माणसाला कळून चुकले. यांत्रिक उत्पादनामुळे संपत्तीची अधिकाधिक निर्मिती होऊ लागली. समाजातील दैन्य, दारिद्र्य, उपासमार, शिक्षण-संस्कृती यांचा अभाव यासारखे हजारो वर्षे माणसाला भेडसावणारे प्रश्न विज्ञानाच्या साहाय्याने व समाजव्यवस्थेत परिवर्तन करून सोडविता येणे शक्य आहे हे माणसाच्या ध्यानात आले. विज्ञानपूर्वयुगात या सर्व प्रश्नांची सांगड ईश्वरी इच्छेशी (भारतात पूर्वजन्मातील कर्मविपाकाशी) घातली जाई. यामुळेच माणसाच्या ऐहिक जीवनातील सर्वच अंगांवर पारलौकिक सत्ता म्हणजेच धर्मसत्ता चालत असे. एखादा प्रेषित अथवा साक्षात्कारी पुरुष परमेश्वरी वचनांचा अगर आदेशांचा संग्रह करी, एखादा ग्रंथ अपौरुषेय मानला जाई; या ग्रंथांतील वचनानुसार सर्व ऐहिक व्यवहार चाले. नव्याने उदयाला आलेल्या शास्त्रांनी हे दाखवून दिले की माणसाचे ऐहिक जीवन सुव्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक अशा सर्व संस्था(सोशल इन्स्टिट्यूशन्स) मानवनिर्मित आहेत; त्यांमध्ये कालमानानुसार बदल करण्याचा अधिकार माणसाचा आहे. पारलौकिक शक्तीचा यात काहीही संबंध नाही. समाजावर प्रभुत्व चालविणाऱ्या समाजनेत्यांच्या बुद्धीवर वर्गीय-वर्णीय स्वार्थाचा पगडा असतो हे खरे; पण या वर्गीय-वर्णीय स्वार्थामागे पारलौकिक आदेशाचे सूत्र जोडून दिलेले असल्यामुळे सर्व लौकिक व्यवहार चालविणाऱ्या शासनव्यवस्थेवर धर्मसत्तेचे प्रभुत्व राहते. परंतु गेल्या काही शतकांत झालेल्या वैचारिक क्रांतीमुळे ऐहिक व्यवहारावरील धर्मसत्तेचे (चर्च) वर्चस्व हळूहळू लोप पावत चालले आहे. लौकिक-ऐहिक व्यवहाराचे नियंत्रण करणारी शासनसंस्था (स्टेट) आणि पारलौकिक संकल्पनेच्या नावे लौकिक व्यवहाराचे नियमन करू पाहणारी धर्मसत्ता यांची पूर्ण फारकत म्हणजे सेक्युलॅरिझम. सेक्युलॅरिझमचा मूळ आशय एवढाच आहे. युरोपमध्ये दीर्घ काळ (इ. स. ३१२ पासून) चालू असलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या संघर्षातून प्रथम सेक्युलॅरिझमची ही संकल्पना विकसित झाली. साहिजिकच उदारमतवाद, परधर्म सहिष्णुता, व्यक्तीचे धर्मस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष समान नागरिकत्व, ऐहिक व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिवाद यांचा स्वीकार, आणि शेवटी धर्मस्वातंत्र्याबरोबर धर्मापासून स्वातंत्र्य येथपर्यंत येऊन सेक्युलॅरिझमची संकल्पना स्थिरावली. हॉलीओकच्या काळातच जोसेफ ब्रडला नावाचा एक अज्ञेयवादी (आनॉस्टिक) विचारवंत होऊन गेला. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांची फारकत तर त्याने केलीच; पण व्यक्तिजीवनातूनही धर्माची हकालपट्टी करण्याचा त्याने आग्रह धरला. केवळ धर्मस्वातंत्र्यच नव्हे तर धर्मापासूनदेखील स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे त्याचे मत होते. भौतिकवादी विचारांचा स्वीकार करणाऱ्या साम्यवादी राष्ट्रांनी सेक्युलॅरिझमच्या या निरीश्वरवादी संकल्पनेचा स्वीकार केला अर्थात् मानवी मनातील धर्मभावना सक्तीने नाहीशी करणे शक्य होईल असे वाटत नाही. साम्यवादी राष्ट्रातील आजच्या घटनांवरून हे स्पष्ट झाले आहे. विश्वाचे रहस्य सोधण्याच्या मानवी प्रयत्नातून-(प्रारंभी भयग्रस्त मनःस्थितीतून) पारलौकिक शक्तीची कल्पना उदयाला आली असावी. माणसाच्या उन्नतावस्थेमध्ये या कल्पनेला अध्यात्माचे (स्पिरिच्युअलिझम) रूप लाभले. जोपर्यंत माणसाचा हा प्रयत्न वैयक्तिक पातळीवर राहतो, ऐहिक व्यवहारात हस्तक्षेप करीत नाही, तोपर्यंत अध्यात्मभावनेला बंधन घालणे इष्ट व शक्य वाटत नाही. पण या भावनेला जेव्हा संस्थात्मक धर्माचे रूप प्राप्त होते, संस्थात्मक धर्म लौकिक व्यवहारात हस्तक्षेप करू लागतो त्यावेळी धर्मसत्तेवर बंधने घालावी लागतात. कोणताही धर्म शुद्ध आध्यात्मिक पातळीवर राहात नाही. पारलौकिकाच्या आधारे ऐहिक जीवनावर सत्ता प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करतोच. इस्लामला तर ऐहिक आणि पारलौकिक ही विभागणीच मान्य नाही. संपूर्ण जीवनच प्रेषिताला मिळालेल्या ईश्वरी आदेशांनी नियंत्रित असले पाहिजे. हे आदेश ज्या ग्रंथात ग्रथित केले आहेत त्या ग्रंथात शब्दाचाही बदल करण्याचा माणसाला अधिकार नाही. पुरुषाने किती विवाह करावेत, घटस्फोट कसा घ्यावा, गुन्हेगाराला शासन कसे करावे-दगडांनी ठेचून मारावे की हातपाय तोडावेत यासारखे शुद्ध ऐहिक प्रश्न शरियतच्या म्हणजे प्रेषिताच्या तोंडून प्रगट झालेल्या आदेशांप्रमाणेच निर्णीत केले पाहिजेत. यामुळे इस्लाममध्ये धर्मसुधारणेला, धर्मपरिवर्तनाला अवकाशच राहात नाही. इतर धर्मात इतका बंदिस्तपणा नाही. वैदिक धर्मात श्रुती अपौरुषेय (ईश्वरदत्त) असल्या तरी मानवी व्यवहाराचे नियंत्रण करणाऱ्या स्मृती मानवनिर्मित आहेत. म्हणूनच हा धर्म मंदगतीने का होईना बदलत आलेला आहे, परिवर्तनशील आहे. ख्रिश्नच धर्म प्रेषिताच्या वचनांनी बंदिस्त झालेला असला, तरी या धर्माला परिवर्तनशील बनविणारे मार्टिन ल्यूथर सारखे बंडखोर युरोपात जन्माला आले. या परिवर्तनाला ग्रीक विद्यांच्या पुनरुज्जीवनापासून प्रारंभ झाला (रेनेसान्स), ल्यूथरच्या बंडातूनच पुढे धर्मनिरपेक्ष नागरिकत्व आणि धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची फारकत करणारी सेक्युलॅरिझमची संकल्पना उदयाला आली. मधून मधून या धर्मातही सेक्युलॅरिझमविरुद्ध फंडामेंटलिझम असा संघर्ष उद्भवतो. ख्रिश्चन धर्माप्रमाणे विश्वाची निर्मिती ईश्वराने सहा दिवसांत केली या श्रद्धेचा डार्विनच्या विकासवादाशी विरोध येतो; म्हणून धर्मश्रद्धेला धक्का देणारा डार्विनचा सिद्धांतच शिक्षणसंस्थांतून शिकविला जाऊ नये अशी मागणी अनेक कट्टरपंथीय ख्रिश्चनांनी अमेरिकन न्यायालयात केली. संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनालाच धर्मसंस्थांचा विरोध आहे. परंतु शेवटी प्रबोधन युगात जन्माला आलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, धर्मनिरपेक्ष नागरिकत्वाचा, सेक्युलॅरिझमचा विजय झाला. ऐहिक व्यवहारावर पारलौकिक सत्तेचे प्रभुत्व मान्य केल्यास सामाजिक परिवर्तनच अशक्य होईल. माणूस कालहत श्रद्धांचा आणि रूढींचा गुलाम होईल. मुस्लिम समाजातील स्त्रीविषयक विचार आणि आपल्याकडील देवदासींची समस्या ही याची ढळढळीत उदाहरणे आहेत. सेक्युलॅरिझम जरी माणसाचे श्रद्धास्वातंत्र्य मान्य करतो तरी मूढ, अंध धर्मश्रद्धांपासून माणसाला मुक्त करण्यासाठी प्रसंगी शासनाला (स्टेट) धर्मक्षेत्रात हस्तक्षेप करावा लागतो. गेल्या शतकात सतीची चाल बंद करण्यासाठी राज्यकर्त्यांना कायद्याचा अंगीकार करावा लागला. धर्मनिरपेक्ष शासन (सेक्युलर स्टेट) धर्माच्या बाबतीत जरी तटस्थ असले तरी विघातक सामाजिक रूढी-परंपरा नष्ट करण्यासाठी शासनाने तथाकथित धर्मक्षेत्रात हस्तक्षेप करणे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ठरते. (भारतीय घटनेत तशी व्यवस्था करण्यात आली आहे. याचा नंतर विचार करू.) शुद्ध आध्यात्मिक श्रद्धा सोडल्यास धर्माच्या नावाने रूढ झालेले बहुतेक सर्व आचार लौकिकच असतात, गेल्या दीड हजार वर्षात राजसत्ता आणि धर्मसत्ता (चर्च) यांच्यामध्ये जो प्रखर संघर्ष झाला त्यामागे धर्मसत्तेपासून ऐहिक-लौकिक जीवनव्यवहार मुक्त करणे हाच तात्त्विक विचार होता. धर्माधिष्ठित सत्तेने नागरिकांवर कोणत्याही धर्ममताची सक्ती करता कामा नये हा श्रद्धास्वातंत्र्याचा विचार प्रथम पुढे आला. ईश्वरविषयक श्रद्धा कोणत्या स्वरूपात असावी हा व्यक्तीच्या अंतःप्रेरणेचा प्रश्न आहे. राजसत्ता अगर पोपची धर्मसत्ता याबाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही. शासनाने सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. यातूनच नागरिक स्वातंत्र्याचा, धर्मनिरपेक्ष नागरिकत्वाचा प्रश्न पुढे आला. या धर्मस्वातंत्र्याच्या लढ्याला लॉकच्या व्यक्तिस्वातंत्र्य-संकल्पनेमुळे व्यापक रूप आले. यातूनच पुढे उदारमतवादाचा विकास झाला. इ. सनाच्या चौथ्या शतकापासून सुरू झालेला हा संघर्ष प्रबोधनयुगातील (एज ऑफ एनलायरन्मेंट) विज्ञाननिष्ठ बुद्धिवादाच्या आणि धर्मनिरपेक्षशासनव्यवस्थेच्या (सेक्युलर स्टेट) विजयाने संपला. या संघर्षातील महत्त्वाचे टप्पे अगदी थोडक्यात येथे देत आहे;
(१) इ. स. ३१२ मधील एडिक्ट ऑफ मिलान’ या हुकुमान्वये धर्मस्वातंत्र्याचा पाया घातला : “Liberty of worship shall not be denied to any, but that the mind and will of every individual shall be free to manage divine alfairs according to his own choice.”(२) इ. स. ३४६ मध्ये कॉन्स्टंटाईनने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ख्रिश्चनेतराचा छळ सुरू केला. त्याने राजसत्ता आणि धर्मसत्ता दोन्ही आपल्याकडेच घेतल्या. यातून पोपचे धर्मपीठ आणि राजसत्ता हा संघर्ष सुरू झाला, (३) पाचव्या शतकात पोप जेलासिअसने लौकिक व्यवहार राजाकडे आणि धार्मिक व्यवहार पोपकडे हा दोन तलवारींचा सिद्धांत मांडला. पण निर्णायक सत्ता पोपकडे ठेविली. (४) तेराव्या शतकात पोप आठवा बॉनिफेस आणि फ्रान्सचा राजा फिलिफ यांच्यामध्ये उग्र संघर्ष होऊन राजसत्तेचा निर्णायक विजय झाला. (५) १४ व्या शतकात मासिरिलओ (इटली) याने धर्मसत्तेचे कायदे आणि राजसत्तेचे लौकिक कायदे यामध्ये स्पष्ट भेद केला. (६) १५ व्या शतकाच्या सुमारास युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांतीला जन्मदेणारे रेनेसान्सयुग सुरू झाले. धर्मसुधारणा, मानवतावादाचा उदय, विज्ञाननिष्ठ बुद्धिवाद, निरनिराळे भौतिक शोध, आणि या सर्वांचा परिपोष करणारे इहवादी तत्त्वज्ञान यांसारख्या क्रांतिकारक घटनांनी मानवजातीच्या इतिहासाला अगदी नवे वळण लावले. सेक्युलॅरिझमचा विजय खऱ्या अर्थाने येथून सुरू झाला. ”

शिक प्रबोधनयुग : धर्मसुधारणा (रेफरमेशन) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत क्रांती सुरू झाली. पारलौकिक जीवनाऐवजी ऐहलौकिक जीवनावर माणसाची दृष्टी खिळली. ईश्वराऐवजी मनुष्य हा जीवनाचा केंद्रबिंदू झाला. खऱ्या अर्थाने मानवतावादाचे युग सुरू झाले. लिओनार्डो, व्हॅसालिअस, कोपर्निकस, केप्लर, गलिलिओ, न्यूटन या शास्त्रज्ञांनी मानवी बुद्धी या भौतिक विश्वावर खिळविली. नवे नवे शोध लावून त्यांनी भौतिक विश्वाचे रहस्य उलगडून दाखविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. यातून नवे इहलोकवादी तत्त्वज्ञान विकास पावले. डेकार्ट, जॉन लॉक, थॉमस मूर, इरस्मस, व्हॉल्टेर, रूसो यांनी प्रचंड वैचारिक क्रांती घडवून आणिली. इंद्रियसंवेदना आणि त्यांचा बुद्धीने लावलेला अर्थ हे या तत्त्वचिंतकांसाठी मार्गदर्शक ठरले. प्रेषित आणि त्याच्या अंतःप्रेरणेतून अवतरलेल्या आदेशांचा त्याग करून अनुभव, बुद्धिवाद, तर्क यांच्या साहाय्याने मानवी जीवनाची दिशा निश्चित करणे हे या तत्त्वचिंतकांनी आपले ध्येय मानले. एका तत्त्ववेत्याने enlightenment ही संकल्पना materialistic rationalism या शब्दांत स्पष्ट केली आहे. इहवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद आणि सेक्युलॅरिझम यांचा घनिष्ठ आंतरिक संबंध असल्याने प्रबोधनयुगातील क्रांतिकारक घटनांचा किंचित् विस्ताराने विचार केला. मानवाच्या बौद्धिक आणि वैचारिक प्रगतीशी सेक्युलॅरिझमचा संबंध आहे. कट्टर धर्मपंथीयांनी (फंडामेंटलिस्ट) अराजक निर्माण केलेल्या जगात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक इहवादी दृष्टिकोन यांवर आधारित सेक्युलॅरिझम हेच एक मार्गदर्शक तत्त्व उपलब्ध आहे. (स्यूडो सेक्युलॅरिझम नावाची कल्पना अस्तित्वातच नाही. भारतात या शास्त्रशुद्ध संकल्पनेच्या अमंलबजावणीत दोष निर्माण झाल्याने काही जण स्यूडो (pseudo) सेक्युलॅरिझम म्हणून मूळ शास्त्रीय संकल्पनेलाच विरोध करीत आहेत.)

वैज्ञानिक आणि वैचारिक क्रांतीमुळे सेक्युलॅरिझच अंतिम स्वरूप निश्चित झाले आणि त्याचा पहिला यशस्वी प्रयोग अमेरिकन वसाहतीत झाला. अनेक भिन्न धर्मपंथीय नागरिक एकाच वसाहतीत आल्याने अमेरिकन राज्यात शासनाचे अधिकृत धर्मपीठ (स्टेट चर्च) निर्माण झाले नाही. अमेरिकन घटनेत ईश्वराचा उल्लेखही नाही, १७९१ मध्ये जेम्स मॅडिसनने सुचविलेली घटनादुरुस्ती मान्य झाली. या दुरुस्तीने शासनसंस्था आणि धर्मसंस्था यांची पूर्ण फारकत झाली. “The Congress shall make no law respecting the establishment of Religion or prohibiting the free excercise thereof.” जेफरसनच्या मते ही घटनादुरुस्ती (मॅडीसन् अमेंडमेंट) म्हणजे धर्मसंस्था आणि शासनसंस्था यांच्यामधील भिंतच आहे. दीर्घकाळ धर्मस्वातंत्र्यासाठी चालविलेल्या संघर्षामुळे आणि प्रबोधनयुगातील सर्वकष क्रांतीमुळे व्यक्तीचे धर्मस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष नागरिकत्व, आणि ऐहिक व्यवहारात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिवाद यांचा स्वीकार या घटकांचा समावेश होऊन सेक्युलॅरिझमची मूळ संकल्पना अधिक समृद्ध झाली, वैज्ञानिक क्रांतीने प्रभावित झालेल्या आधुनिक जगातील बहुतेक राष्ट्रांनी आज सेक्युलॅरिझमचा स्वीकार केला आहे.

स्वतंत्र भारताचे नेतृत्व पं. जवाहरलाल यांच्याकडेच आल्याने सेक्युलॅरिझमची स्वीकृती सहज-सुलभ झाली. फाळणीनंतरही भारत देश बहुधर्मीयच राहिला असल्याने सेक्युलॅरिझमशिवाय अन्य पर्यायच भारतापुढे नव्हता. भारतातील सेक्युलॅरिझमचा प्रवास, या प्रवासमार्गातील अडचणी आणि त्यांचे निराकरण करण्याची दिशा यांचा पुढील लेखात विचार करू.

विद्यानगर, नांदेड ४३१६०२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.