विवेकवाद – १९

गीतेतील नीतिशास्त्र – आक्षेपांना उत्तरे

‘गीतेतील नीतिशास्त्र’ या माझ्या लेखावर आमचे अनेक मित्र नाराज झाले आहेत. त्यांपैकी प्रा. सुधाकर देशपांडे आणि प्रा. देवदत्त दाभोलकर यांची पत्रे जानेवारी १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली असून प्रा. श्री. गो. काशीकर यांचा लेख या अंकात अन्यत्र छापला आहे. प्रा. सुधाकर देशपांडे यांनी माझ्यावर सत्यशोधकाचा नि:पक्षपातीपणा सोडून वकिली बाणा स्वीकारल्याचा आरोप केला आहे, प्रा. काशीकर यांनी हे विवेचन विवेकवादी नव्हे असा सरळ निर्णय दिला आहे; आणि प्रा. दाभोलकर यांनी मला विनोबा भाव्यांचे ‘स्थितप्रज्ञदर्शन’ हे पुस्तक वाचण्याची आणि त्याला त्याच तोलाचे उत्तर देण्याची शिक्षा फर्मावली आहे. या तिहेरी हल्ल्यामुळे मी गांगरून गेलो आहे हे मी कबूल करतो. परंतु एकदा चव्हाट्यावर मतप्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य उपभोगल्यानंतर त्याच्यावर टीका करण्याचा वाचकांचा अधिकारही मान्य करायलाच हवा. मूळ मतप्रदर्शनात व्यक्त केलेली मते चुकीची होती हे कबूल करून ती मागे तरी घेतली पाहिजेत, किंवा ती जर पुरेशा विचारांती गंभीरपणे व्यक्त केली असतील तर त्यावरील आक्षेपांना समर्पक उत्तरे दिली पाहिजेत हे उघड आहे. त्या लेखातील मते गंभीरपणे व्यक्त केली होती असे मी म्हटले आहे, आणि म्हणून त्यावरील आक्षेपांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

प्रथम प्रा. सुधाकर देशपांडे यांच्या पत्राविषयी. त्यांचा माझ्या लेखावर एकमेव आक्षेप दिसतो, आणि तो म्हणजे चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध होते काय या प्रश्नाविषयी. मी तत्कालीन ग्रंथांच्या आधारे असे म्हणालो की गीतेतील चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध आहे. गीता काळी, महाभारतकाळी चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध होते हे प्रा. देशपांडे यांना मान्य आहे. परंतु त्यांचे म्हणणे असे आहे की एवढ्याने गीतेला अभिप्रेत चातुर्वण्यं जन्मसिद्ध होते हे सिड होत नाही. ते म्हणतात की उलट गीतेत जन्मसिद्ध चातुर्वण्याचे खंडन आहे. ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्मविभागशः’ या वचनातील उत्तरार्ध याचा पुरावा आहे. त्यांचे म्हणणे असे की मी त्या वचनातील पूर्वार्धच सोयीनुसार लक्षात घेतला, आणि उत्तरार्धाकडे दुर्लक्ष केले.

परंतु जर ‘मी चातुर्वर्ण्य गुणकर्मविभागशः निर्माण केले याचा अर्थ जन्मसिद्ध चातुवर्ण्य मी निर्माण केले असा नसेल तर तो काय असेल? या प्रश्नाचा विचार मी माझ्या लेखात काहीशा संक्षेपाने केला आहे. परंतु तो पुरेसा नव्हता असे दिसते, म्हणून आता त्याचा सविस्तर विचार करतो.

‘मी चातुर्वण्य निर्माण केलें’ या वचनाचा अर्थ मी चार प्रकारची माणसे-ज्यांच्यात समाजधारणाला आवश्यक अशा चार प्रमुख कर्मप्रकारांपैकी एकेकाला आवश्यक असे गुणविशेष होते अशी चार प्रकारची माणसं – भगवंतांनी निर्माण केली. नंतर त्यांचे गुणानुरूप चार वर्गात विभाजन करून प्रत्येक वर्गाला त्याच्या गुणानुरूप कमें नेमून दिली. म्हणजे कोणीही उठावे आणि वाटेल ते कर्म करावे हे स्वातंत्र्य नाकारले. नंतर हे एकदा केल्यावर ते वर्ग कायम राहावेत याकरिता अनुवंशाची – म्हणजे मातापितरांचे गुण आपल्यातही उतरतात या व्यवस्थेची-योजना केली. हा वरील वचनाचा मला आकलन झालेला अर्थ.

परंतु प्रा. देशपांडे म्हणतात की हे बरोबर नाही, त्यांचे म्हणणे भगवंतानी निर्मिलेले चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध नव्हते, ते गुणाधिष्ठित होते. पण असे म्हणायचे तर भगवंतांनी पुढील प्रकारची व्यवस्था केली होती असे मानावे लागेल:
कोणत्याही वर्णात जन्मलेले मूल जन्मतः वर्णहीन असे. ते आपल्या मातापित्यांच्या घरी वाढत नसे. कारण जर ते वाढत असते तर त्याच्या मातापित्यांच्या वर्णाचे संस्कार त्याच्यावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. उदा. व्युत्पन्न मातापित्यांच्या जवळ बाढणारे मूल आणि अशिक्षित मातापित्यांजवळ वाढणारे मुल यांच्या मानसिक, बौद्धिक वाढीत मोठी तफावत पडणार हे निश्चित. म्हणून समाजातील सर्व नवजात बालके सार्वजनिक संगोपनशाळांत ठेवली जात. त्यांना एकच समान वातावरणात शिक्षण दिले जाई. ती एका विशिष्ट वयाची झाली म्हणजे त्यांची परीक्षा घेतली जाई, आणि त्या परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार त्यांचा वर्ण ठरविला जाई. एवढेच नव्हे, तर ही सर्व प्रक्रिया दर पिढीत होई. म्हणजे बालकांचा वर्णनिश्चय हा प्रत्येक पिढीत करावा लागे. अशी व्यवस्था जर येथे कधीकाळी अस्तित्वात असेल, तर येथील चातुर्वर्ण्य गुणाधिष्ठित होते असे म्हणता येईल. अशी व्यवस्था भारतात कधीकाळी प्रत्यक्ष अस्तित्वात होती असा थोडाही पुरावा उपलब्ध आहे काय? प्रा. देशपांडे यांना तो सापडला असल्यास त्यांनी तो द्यावा.

अशा प्रकारची व्यवस्था भारतात किंवा अन्य कोठेही असल्याचा कसलाही पुरावा नाही असे मला वाटते. अशी व्यवस्था करणे योग्य होईल असे प्लेटो या तत्त्वज्ञाचे मत होते. ते मत हितकर होते की नाही हा प्रश्न अलाहिदा. पण त्याचा प्रयोग कोणी कुठे केल्याचे ऐकिवात नाही.
चातुर्वर्ण्य ‘मी निर्माण केले असे भूतकाळी क्रियापद असलेले वचन भगवंतांच्या तोंडी आहे. याचा अर्थ गुणाधिष्ठित चातुर्वर्य असा असता तर चातुर्वर्ण्य मी निर्माण करतो, करीत असतो, असे रीतिवर्तमान काळी क्रियापद त्यांनी वापरले असते.

तसे पाहिले तर एका अर्थाने चातुर्वर्ण्य सर्व जगात आहे. मनुष्यांचे गुणानुसार चार वर्ग पडतात असे मानले, (वस्तुतः गुणांचे चाराहून कितीतरी अधिक प्रकार आहेत. उदा. कलावंत, संशोधक, क्रीडापटू, इ.), तर या चार प्रकारची माणसे सगळीकडे आहेत, आणि ती आपापल्या प्रकृतीनुसार कर्माची निवड करतात. मग भारतातील चातुर्वर्याचे वैशिष्ट्य काय आहे? भगवंतांचे विशेष कर्तृत्व कोणते आहे? हे फक्त एवढेच असू शकते की येथील चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध आहे..

प्रा. देशपांडे विचारतात : ‘ग्रंथकाराच्या काळी इतर लोक काय मानत होते. आणि ग्रंथाचे भाष्यकार काय म्हणतात हे ग्रंथकांचा सिद्धांत समजून घेण्याच्या दृष्टीने अगदीच असंबद्ध नाही काय? आणि लगेच ज्ञानेश्वरीचा दाखला देऊन म्हणतात की ज्ञानेश्वरीत ज्या ज्या ठिकाणी वर्णाचा उल्लेख आहे त्या प्रत्येक ठिकाणी हे वर्ण गुणकर्मविभागशः ठरत असुन जातिविभागशः नन्हेत असे निःसंदिग्ध प्रतिपादन आहे.’

मी ज्ञानेश्वरीचा आभ्यासक नाही. परंतु मला जी काय थोडीबहुत माहिती आहे तिच्यावरून मी असे म्हणू शकतो की गीता वेदांच्या इतकी कृपण नाही असे ज्ञानेश्वर म्हणतात. वेद तीन वर्षाच्या कानाशी लागला, परंतु चौथ्या वर्णाच्या बाबतीत त्याने कृपणपणा दाखविला असे ते लिहितात. हे मत गीतेचेच आहे. वेदश्रवण वेदपठन वाचनाचा अधिकार फक्त त्रैवर्णिकांनाच होता. त्यामुळे शुद्भांना मोक्षाची दारे बंद होती. ती गीतेने त्यांना उघडून दिली. नवव्या अध्यायात गीता म्हणते:
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः।
स्त्रियों वैश्यास्तथा शुद्रास्तेऽपि यान्ति परों गतिम् ।।

भगवंतांची अनन्यभावाने भक्ती करून मोक्ष प्राप्त करण्याचा उपाय गीतेने शुद्रांनाही उपलब्ध करून दिला आहे. आपली नियत कर्मे फलाशा सोडून ईश्वरार्पण बुद्धीने केल्यास मनुष्य (मग तो कोणत्याही वर्णाचा असो) परम गतीला प्राप्त होतो. ज्ञानेश्वरांनी याचाच अनुवाद केला आहे. परंतु वर्ण गुणांनी ठरत असे त्यांनी म्हटलेले मला माहीत नाही.

वरील श्लोकात आलेला पापयोनयः या शब्दाचा अर्थ काय करावयाचा? हा शब्द तरी वर्ण जन्मसिद्ध होते हे सुचवितो की नाही? आणि तो भगवान कृष्णाच्या तोंडी आलेला आहे. त्यामुळे श्रीकृष्णाला ते मत मान्य होते असे समजायला काय हरकत आहे?

आता मा. श्री.गो. काशीकर यांच्या आक्षेपांकडे वळतो.
प्रा. काशीकर म्हणतात की माझे गीतेवरील विवेचन विवेकवादी नाही. अध्यात्मशास्त्र किंवा मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे. त्यामुळे अध्यात्मशास्त्राचे दोनच मार्गानी परीक्षण होऊ शकते. एकतर परीक्षकाने अनुभूतीच्या स्तरावर जाऊन तेथून ह्या शास्त्राचे परीक्षण करावयास पाहिजे. ते शक्य नसेल तर आधुनिक विज्ञान आपला आवाका वाढवून त्या शास्त्रांचे निर्णायक परीक्षण करीपर्यंत वाट पाहिली पाहिजे. हे दोन्ही मार्ग बंद असतील तर विवेकवाद्याने अज्ञेयवाद्याची भूमिका घेणेच विवेकीपणाचे होईल.

आता अध्यात्मशास्त्र जर बुद्धीच्या क्षेत्राच्या पलीकडे असेल तर त्याचे परीक्षण करणे अशक्य आहे असेच म्हटले पाहिजे. कारण एखाद्या सिद्धांताचे परीक्षण करायचे म्हणजे तो सिद्धांत बुद्धीच्या, तकच्यिा, विवेकाच्या कसोटीला उतरतो काय ते पाहायचे. उदा. कोणत्याही गोष्टीचे यथार्थ किंवा प्रमाण ज्ञान विसंगतिमुक्त, व्याघातमुक्त असले पाहिजे अशी तकांची मागणी आहे. तसेच एकाच गोष्टीचे भिन्न लोकांना होणारे ज्ञान एकच असले पाहिजे हीही तर्काची मागणी आहे. जर ह्या दोन अटी अध्यात्मात पाळल्या जात नसतील तर ते यथार्थ किंवा प्रमाण ज्ञान नव्हे असे मानावे लागेल. आता अध्यात्मशास्त्राचे निष्कर्ष या कसोट्यांना उतरत नाहीत हे मी माझ्या ह्यापूर्वीच्या लेखात दाखवून दिले आहे.

खरे म्हणजे या विषयाचे विवेचन विवेकवाद या लेखमालेत यापूर्वी अनेकदा येऊन गेले आहे. (उदा. ‘विज्ञान, अध्यात्म आणि साक्षात्कार, जुलै ९० ‘शब्दप्रमाण, ऑक्टोबर९०, ‘अध्यात्म आणि विज्ञान’, नोव्हेंबर ९० ; स्वामी धर्भद्रत यांच्या पत्रास उत्तर’, फेब्रुवारी ११ः साक्षात्कार, विज्ञान आणि विवेकवाद, जुलै २१.) हे लेख आक्षेपकांनी काळजीपूर्वक वाचावेत अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. त्या लेखांत बहुतेक प्रश्नांची उत्तरे आली आहेत असे मला वाटते. त्यामुळे त्या लेखांतील विवेचन बरोबर नसेल, किंवा त्यात काही दोष असतील तर आक्षेपकांनी त्यावर आक्षेप घ्यावेत असे मला सुचवावेसे वाटते. म्हणून मा. काशीकरांच्या आक्षेपांना आताच उत्तरे न देण्याची मी परवानगी घेतो.
परंतु त्यांनी आपल्या लेखात काही नवे आक्षेप घेतले आहेत त्यांना संक्षिप्त उत्तरे देतो.

ते म्हणतात की मी वापरलेले काही शब्दप्रयोग वाचताना खटकतात. उदा. कर्मसिद्धांत है पोकळ भारूड व पौराणिक धाप आहे असे मी म्हटले आहे. चातुर्वर्ण्य भगवंतानी निर्माण केले ही ‘धडधडीत थाप’ आणि ‘भगवंताची प्रौढी होय अशी ‘निर्भत्सना मी करतो.’ ‘कार्य आणि अकार्य यातील फरक मी तुला सांगतो अशी ‘बढ़ाईखोर सुरुवात श्रीकृष्णाने केली आहे असे मी म्हणतो, योग ही कर्मफळांच्या तडाख्यात न सापडण्याची ‘युक्ती आहे अशी संभावना मी करतो. या सर्व शब्दप्रयोगांमध्ये विचार किंवा विवेक यांपेक्षा विकाराचाच वास अधिक येतो, आणि म्हणून हे सर्व विवेचन पूर्वग्रहदूषित झाले आहे असे प्रा. काशीकर म्हणतात.

आता वरील शब्दप्रयोग पूर्णपणे निर्विकार नाहीत हे मी मान्य करतो. परंतु वरील एकही प्रयोग असत्य नाही असे माझे म्हणणे आहे. कर्मसिद्धांत खरा असणे शक्य नाही हे मी ‘कर्मसिद्धांत’ (जून १९९१) या लेखात दाखवून दिले आहे. चातुर्वर्ण्य कोणीही निर्माण केले नाही ही वस्तुस्थिती आहे. ते जर परमेश्वराने निर्माण केलेले असते तर ते फक्त हिंदुस्थानातच आढळले नसते, तर सर्व जगभर दिसले असते. कार्य काय आणि अकार्य काय हे मी तुला सांगतो असे म्हणून तो प्रश्न श्रीकृष्णाने वाऱ्यावर सोडला ही वस्तुस्थिती आहे की नाही? आणि कर्मयोग ही कर्मबंधन चुकविण्याची युक्ती असे तर खुद्द लोकमान्य टिळकांनी अनेक ठिकाणी म्हटले आहे. (उदा. ‘गीतारहस्य, पृ. ५२, ५७६.)
मा. काशीकर असेही म्हणतात की मी मोक्षशास्त्र व नीतिशास्त्र यांत गल्लत केली. परंतु ही गल्लत गौतेत नीतिशास्त्राचे समर्पक आणि पूर्व विवेचन आहे असे म्हणणारे गीताभक्तच करीत असतात. गीतेत नीतीचा विचार प्रायः नाहीच. तिच्यात विचार आहे मोक्षप्राप्तीच्या उपायांचा. मोक्षशास्त्राच्या ग्रंथात नीती शोधायची तर ती मी सांगितलेल्या पद्धतीनेच सापडणे शक्य आहे. म्हणजे मोक्ष हे अंतिम आणि सर्वोच्च साध्य असेल तर मोक्षपद कमें म्हणजे सत्कर्मे असे म्हणावे लागेल. प्रा. काशीकर म्हणतात की अध्यात्मशास्त्राच्या साध्यांत निःश्रेयसाबरोबर अभ्युदयही येतो, आणि समाजधारणा, लोकसंग्रह, इत्यादीकरिता करावी लागणारी कर्मेही अध्यात्मशास्त्राधिष्ठित नीतिशास्त्रात येतात. परंतु चातुर्वण्यांची नियत करें ही जरी चातुर्वण्य टिकविण्यास अवश्य असली, तरी त्यांनी चातुर्वण्याचे नैतिक समर्थन होत नाही, आणि तसे समर्थन गीतेत कुठे दिलेलेही नाही. जीवन्मुक्तानेही कर्मे कलीच पाहिजेत. का? तर श्रेष्ठे लोक जसे वागतात तसेच सामान्य लोकही वागतात, आणि म्हणून श्रेष्ठांनी (जीवन्मुक्तांनी) कर्मे टाकली तर सामान्य लोकही ती टाकतील, आणि ब्रह्मदेवाने सृष्टीच्या धारणपोषणाकरिता सुरू केलेले यज्ञचक्र खंडित होईल. हे सर्व खरे मानले तरी त्या यज्ञचक्राचे नैतिक समर्थन गीतेत कोठेही दिलेले नाही हे मान्यच केले पाहिजे.

आपल्या लेखाच्या शेवटी प्रा. काशीकर म्हणतात की सुधारकांचे दोन वर्ग आहेत. एक जुन्या श्रद्धास्थानांना नष्ट करू पाहणारा, आणि दुसरा जुन्यातील चांगल्याला अधिक विकसित करून वाईटाला निष्प्रभ करणारा, यांपैकी दुसरा वर्गच अधिक यशस्वी होण्याचा संभव आहे, आणि म्हणून मी त्या मागनि जावे, असे त्यांचे म्हणणे. परंतु त्या मागनि जाणाऱ्या संतांनी आणि इतर सुधारकांनी गेल्या ८०० वर्षात काय प्रगती केली असा प्रश्न विचारला तर आपल्या पदरी निराशाच येते. आपल्या समाजव्यवस्थेतील अन्य दोष सोडा. फक्त अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यात संत किती यशस्वी झाले आहेत? चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व वारकरी परस्परांना उराउरी भेटतात म्हणे. परंतु तेथून परत आल्यावर स्पृश्यांचे आचरण कसे असते? आजही महाराष्ट्रातील खेड्यांत पिण्याच्या पाण्याकरिता दलितांना हातात मडके घेऊन विहिरीवर कोणी स्पृश्य आपली दया येऊन आपले मडके भरून देईल अशा आशेने तिष्ठत उभे राहावे लागते ना? याच्या उलट महात्मा फुले, आगरकर, आंबेडकर यांनी आपल्या धर्मसंस्थेवर आणि आचारसंहितेवर कठोर प्रहार केले, आणि आज जी थोडीबहुत जागृती झालेली दिसते तिचे श्रेय या जहाल सुधारकांनाच दिले पाहिजे.

तिसरे पत्र प्रा. देवदत्त दाभोलकरांचे, त्यांना माझे लिहिणे अनभ्यस्त वाटले. विशेषतः माझ्या पुढील विधानामुळे ते खूपच नाराज झाले आहेत असे दिसतेः ‘एवढ्या मोठ्या देशात सर्वांनी उठावे आणि गीतेला डोक्यावर घेऊन नाचत सुटावे ही गोष्ट येथील लोकांच्या बुद्धिमत्तेला अभिमानास्पद आहे काय याचा आपण विचार केला पाहिजे.’ परंतु हे विधान कोणत्या संदर्भात आले आहे ते ते लक्षात घेत नाहीत. तो संदर्भ असा आहे. ‘कार्य आणि अकार्य यांतील फरक मी तुला समजावून सांगतो अशी बढाईखोर सुरुवात करून…….. चमत्कार नव्हे काय?’ एवढा मजकूर आल्यानंतर प्रा. दाभोलकरांनी उद्धृत केलेले वाक्य आले आहे. म्हणजे जे लोक गीता हा नीतिशास्त्राचा उत्कृष्ट ग्रंथ आहे असे म्हणतात त्यांना उद्देशन हे वाक्य आले आहे. गीता धर्मशास्त्राचा किंवा मोक्षशास्त्राचा अद्वितीय ग्रंथ असेल कदाचित् हे मी मान्य केले आहे. माझी तक्रार गीतेत नीतिशास्त्राचे विवेचन आहे या आग्रहाला आहे. तो आग्रह मुळीच बरोबर नाही, हे मी दाखविले आहे असे मी समजतो. माझ्या विवेचनात काही दोष असतील तर ते अवश्य दाखवावेत. ते मला पटले तर मी ते मान्य करीन आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन एवढे आश्वासन मी येथे देतो.

प्रा. दाभोलकर पुढे असे म्हणतात की मी विनोबाजींचे स्थितप्रज्ञदर्शन हे पुस्तक नजरेखालून घातलेले दिसत नाही. हा त्यांचा अंदाज बरोबर आहे. विनोबांजींची काही पुस्तके मी वाचली आहेत. परंतु त्यावरून त्यांना तार्किक कटोरता (logical rigour) कशाला म्हणतात याची फारशी कल्पना लसावी असा माझा समज झाला आहे. त्यांचे लिखाण प्रवचनकारासारखे, किंबहुना कीर्तनकारासारखे असते. निदान स्थितप्रज्ञदर्शन मधील लिखाण तसे आहे. प्रा. दाभोलकरांनी सांगितल्याप्रमाणे मी ते पुस्तक एकदा, नव्हे दोनदा वाचले. परंतु त्यामुळे माझ्या डोक्यात फारसा प्रकाश पडला नाही. त्यामुळे एवढे कळले की विनोबांना गीतेविषयी अत्यंत आदर आहे. त्यातील वाक्यन् वाक्य पूर्णपणे बरोबर आहे अशी त्यांची श्रद्धा आहे, आणि ते तसे आहे हे दाखविण्याकरिता शब्दांच्या अर्थाची ओढाताण करण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. त्या पुस्तकाने भाविक वाचकांचे समाधान होईल कदाचित, परंतु मला मात्र त्यामुळे फारसा अर्थबोध झाला नाही हे मी प्रांजळपणे कबूल करतो.

म्हणून माझी प्रा. दाभोलकरांना पुढील विनंती आहे. त्यांनी विनोबांचे म्हणणे काय आहे ते अनलंकृत गद्यात सांगावे. ते मला नक्की कळेल, आणि त्याला कदाचित् मी उत्तरही देऊ शकेन.

विनोबांची विबेचनपद्धती कीर्तनकाराची आहे असे मी म्हणतो त्यावरून त्यांचा मोठेपणा मला मान्य नाही असे नाही. व्यक्ती म्हणून ते महामानव आहेत असे म्हणायला मला काहीच हरकत वाटत नाही, हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.