भौतिक विज्ञानामुळे जो निर्माण होतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन असा समज सार्वत्रिक आहे. भौतिक विज्ञान ज्यांना उपलब्ध झालेले आहे त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होतोच असे म्हणता येत नाही, आणि त्याच्या उलट ज्यांना भौतिक विज्ञानाचे रीतसर शिक्षण मिळालेले नाही, त्यांच्यात तो असल्याचे अनेक वेळा ध्यानांत येते. असे जर आहे तर हा वैज्ञानिक शब्द सोडून देऊन त्याऐवजी चिकित्सक दृष्टिकोन, किंवा चिकित्सक बुद्धी, हा शब्द वापरणे जास्त अर्थवाही होणार नाही काय? ही चिकित्सक बुद्धी अगदी निरक्षर अशा खेडूत माणसांच्या अंगी असलेली मी पाहिली आहे, आणि त्याचबरोबर विद्वान आणि विज्ञानाची उच्च पदवी धारण केलेल्यांच्या अंगी ती नसल्याचेही अनुभवले आहे. ही जी चिकित्सक बुद्धी आहे, ती माणसाला जन्मतः प्राप्त होते ही पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चिकित्सक बुद्धीच्या अनेक श्रेणी किंवा ग्रेड्स असतात, व ज्याला जी ग्रेड जन्मतःच मिळालेली असेल, तिच्या चौकटीतच त्याची विवेचक बुद्धी तिचे कार्य करू शकते. या चौकटीची व्याप्ति वाढू शकत नाही. आयुष्यभर ती आहे तेवढीच राहते. माझे हे म्हणणे पटवून देण्यासाठी मी काही अन्य उपजत गुणांची उदाहरणे देतोः- तालाचे म्हणजे लयीचे भान, सुरांचा संवाद ओळखण्याचे भान, रंग-संगतीची जाणीव, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असणे किंवा नसणे, हे व असे गुण माणसात उपजतच असतात. ते ज्याच्याजवळ नाहीत ते त्याच्या अंगी कोणीही नव्याने निर्माण करू शकत नाही. चिकित्सक बुद्धीचेही तसेच आहे. (शेषन हे ज्योतिषीही आहेत या गोष्टीचे नवल वाटायला नको!)
चिकित्सक बुद्धी ही फक्त विज्ञानाच्या क्षेत्रातच आवश्यक असते असे नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात ती आवश्यक असते. इतिहासाच्या अभ्यासांत, राजकारणात, अर्थकारणात, तत्वज्ञानांत, जिथे जाल तिथे या चिकित्सक बुद्धीची गरज असते. इथे चिकित्सक बुद्धीऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द किती अपुरा वाटतो हे ध्यानात येईल. विज्ञानाच्या प्रसारामुळे चिकित्सक बुद्धीला तिचे कार्य अधिक सुलभतेने करता येते हे जरी खरे असले तरी विज्ञान स्वतः चिकित्सक बुद्धी निर्माण करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे शिक्षणाच्या प्रसाराने अंधश्रद्धा कमी होतात ही समजूत खरी नसते. एखाद्या बाबाने चालवलेल्या बुवाबाजीचे बिंग फोडावे तोवर आणखी दहा बाबांनी आपला जम बसवलेला असतो. बुवा-लोक करीत असलेले चमत्कार एखाद्या कार्यकर्त्याने करून दाखवले, म्हणजे त्या विशिष्ट चमत्कारांबद्दलचे कुतूहल संपते, आणि ते चमत्कार करणारे लोक खरेखुरे सिद्धपुरुष नव्हेत एवढेच सिद्ध होते. परंतु कालांतराने त्यांची जागा दुसरे सिद्धपुरुष घेतात, आणि पुनः बुवाबाजी चालूच राहते. मी जे म्हणतो ते जर चुकीचे असेल तर मग चार्वाकापासून ते थेट शं. वा. किर्लोस्करांनी चालवलेल्या बुवाबाजी विरोधी मोहिमेनंतर आज ५०-६० वर्षे उलटली तरी बुवाबाजी जोरांत कां चालू आहे याचा खुलासा कसा करायचा? अगदी कडवट असलेले सत्य स्वीकारण्याची जर मनाची तयारी असेल तर ते हे आहे की, “हे असंच चालायचं!”
पण मग ज्यांची अवस्था ‘बुडती हे जन, न पाहवे डोळा’ अशी झालेली आहे त्यांनी काय करायचे? हात जोडून स्वस्थ बसायचे? मुळीच नाही. तशी अवस्था असलेल्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्याला जेवढे शक्य असेल तेवढे कार्य करीत रहावे. त्यांची मनःप्रवृत्ति त्यांना हे कार्य करायला भागच पाडील. आपला मुकाबला हा किती प्रतिकूल वस्तुस्थितीशी आहे, आपली ताकद आणि कुवत किती आहे, आपल्यापुढे मोठ्यात मोठे उद्दिष्ट केवढे ठेवता येईल, याचा विचार मनात जागा ठेवून आपली कार्यकक्षा ठरवावी. असे केल्याने निराशेने खचून जाण्याची वेळ यायची नाही. आपल्या संघटित अस्तित्वाचा जो एक प्रकारचा दबाव निर्माण होतो, त्यामुळे घातक रूढी-परंपरा जोपासणाऱ्यांचे मतपरिवर्तन जरी झाले नाही, तरी त्यांच्या उद्योगांना काही प्रमाणात पायबंद बसतो यात काही संशय नाही, आणि एवढ्याच फलिताची अपेक्षा ठेवावी.
परमेश्वर आहे की नाही, धर्म या शब्दात कोणच्या गोष्टींना स्थान असावे, कोणच्या गोष्टी त्याज्य मानाव्यात, नीतीमत्तेची कसोटी काय असावी, या व अशा विषयांच्या चर्चेत भौतिक विज्ञानाचा काहीच संबंध येत नाही, परंतु चिकित्सक बुद्धीचा संबंध जरूर येतो. अशा विषयावर खुल्या चर्चा-संवाद होत राहिले तर त्याचा एक फायदा असा होतो की आपले समविचारी लोक कोण ते समजल्यामुळे एक तऱ्हेचे ध्रुवीकरण होऊ शकते. या ध्रुवीकरणामुळे एक गट निर्माण होतो, आणि त्या गटाचे असे एक वैचारिक सामर्थ्य निर्माण होते, व त्याचा वचक अंधश्रद्धाळू लोकांना जाणवतो. शब्दप्रामाण्य मानणारे, विभूतिपूजेच्या आहारी गेलेले आणि पोथीनिष्ठा बाळगणारे अंधश्रद्धाळू लोक सर्वच क्षेत्रात आढळतात एवढी गोष्ट मात्र ध्यानांत ठेवायची.
‘विज्ञानाचा प्रसार करा’ हे म्हणणे योग्य आहे, परंतु ‘वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा’ हे म्हणणे मात्र अवैज्ञानिकपणाचे वाटते! वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दाऐवजी चिकित्सक दृष्टिकोन हा शब्द ठेवला तरीसुद्धा चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करा असे म्हणण्यात काही अर्थ नाही. एवढे मात्र खरे की ज्यांना हा चिकित्सक दृष्टिकोन उपजत लाभलेला आहे त्यांना त्याचा वापर मुक्तपणाने करता येणे न येणे हे आजूबाजूच्या परिस्थितीवर पुष्कळसे अवलंबून असते. आपली हजार-दीडहजार वर्षांची “गप्प बसा” संस्कृती चिकित्सक दृष्टिकोन गुदमरवून टाकत आली. ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः’ असा प्रश्न विचारणारा एखादाच चार्वाक किंवा ‘गाय ही देवता नव्हे, फक्त उपयुक्त पशु आहे’, असे सांगणारा एखादाच सावरकर या संस्कृतीत निर्माण होत असतो, आणि तोही कालांतराने विस्मृतीत गडप होतो. उद्विग्न करणारी ही वस्तुस्थिती आहे इतके खरे; तिच्याशी मुकाबला करू इच्छिणाऱ्यांनी एकत्रितपणे कार्य करणे एवढेच त्यांच्या हाती आहे.
लिहिलेलं सत्य आहेच.कारण पहिलीपासून दहावीपर्यंत विज्ञान हा विषय शाळेत शिकवला जातो परंतु वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होत नाही. उच्च विज्ञान विभूषित व्यक्ती जेंव्हा एखाद्या बुवा बाबा कडे जाऊन आशीर्वाद घेतात आणि त्यांचे फोटो वर्तमान पत्रात छापून येतात तेंव्हा समाजात अजून अंधश्रद्धा पसरतात.