मासिक संग्रह: जुलै, 1998

संपादकीय

आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
आपल्या आचरणामध्ये श्रद्धामूलक वा संस्कारजन्य परिस्थितिशरणता आहे. विवेकाला परिस्थितिशरणतेचे वावडे आहे. विवेकवाद्यांचे कोणत्याही व्यक्तीशी भांडण नसून श्रद्धेशी आहे, संस्कारांशी आहे त्याचप्रमाणे श्रद्धा, संस्कार आणि आप्तवाक्यप्रामाण्य ह्यांत फरक नाही ह्याचा उल्लेख मागच्या अंकात केला होता. समाजातील विषमता काही व्यक्तींवर अतिशय अन्याय करणारी असल्यामुळे आणि विवेकवाद्यांना तिच्याशी लढा द्यावयाचा असल्यामुळे विषमतेची काही बटबटीत उदाहरणे ह्या स्तंभातून देण्याचा मानस आहे. त्यायोगे विषमता का नको ते पुन्हा स्पष्ट होईल आणि तीवर उपाय शोधणे शक्य होईल. अन्यायकत्र्या व्यक्तींना उपदेश केल्याने, त्यांना घेराव, मारहाण किंवा त्यांचे प्राण-हरण केल्याने प्रश्न सुटणार नाहीत तर अविवेकी लोकांच्या मनांत विवेकाचा उदय झाल्यासच ते सुटतील आणि शंभर टक्के लोक विवेकी झाले नाहीत तरी पंचावन्न टक्के होऊ शकतील, विवेकी नेहमीसाठी अल्पसंख्य राहणार नाहीत, असा विवेकवाद्यांचा विश्वास आहे.

पुढे वाचा

पत्रपरिचय

संपादक, आजचा सुधारक
श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांची पत्रे वाचली. स. ह. देशपांडे यांचा लेखही वाचला होता. मला श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत.
१) राष्ट्रवाद म्हणजे काय व तो नेहमीच आवश्यक असतो असे आपल्याला वाटते
काय?
२) भारतीय नागरिक राष्ट्रवादी नाही व चिनी आहे हे गृहीतक कशाच्या आधारे मांडायचे?
३) विवेकी राष्ट्रवाद वा प्रगमनशील राष्ट्रवाद कोणता हे कोणी व कसे ठरवायचे?
चीनविषयक तपशिलात जाऊन मूळ मुद्दे बाजूला पडू नयेत अशी विनंती आहे.

पुढे वाचा

स्फुटलेख

अकारविल्हे रचनेमध्ये ‘अ’ चे स्थान
एकदोन महिन्यांपूर्वी सत्यकथा साहित्यसूची ह्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे झाले. ही सूची श्री. केशव जोशी ह्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक सिद्ध केली आहे. सूची नुसती चाळली तरी त्यांच्या परिश्रमाच्या खुणा जागोजाग दिसतात. सूची सहजिकच अकारानुक्रमाने रचली आहे. आणि येथेच म्हणजे अकारानुक्रमाच्या बाबतीत आजवर एक विवाद्य राहिलेला प्रश्न पुन्हा चर्चेला घ्यावयाचा आहे. तो वर्णमालेमधल्या ‘अ’ ह्या वर्णाबद्दल आहे.
वर्णमालेतल्या अं ह्या अक्षराच्या, नव्हे वर्णाच्या, स्थानाबद्दल कोशकारांचा नेहमीच घोटाळा होत आला आहे. मराठीतले निरनिराळे कोश अं चे स्थान निरनिराळ्या जागी कल्पून रचले गेले आहेत.

पुढे वाचा

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतीचे अर्थ-राजकारण

महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागातील विदर्भात १९९७-९८ या कृषि-वर्षात गेल्या ५० वर्षात न घडलेली अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीची घटना घडली. महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये (मराठवाडा, कोकण) काही प्रमाणात नैसर्गिक कोप घडून आला तरी त्याची वारंवारता, तीव्रता व विस्तार विदर्भात अधिक होता. सुरुवातीला जून आणि जुलै महिन्यांमध्ये तुरळक पाऊस पडल्यानंतर पाऊस सामान्य राहील अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण जून-जुलै जवळपास कोरडे गेले. पिके उगवलीच नाहीत किंवा वाळून गेली. त्यामुळे ऑगस्टमध्ये दुसऱ्यांदा, काहींना तिसऱ्यांदा, पेरण्या कराव्या लागल्या. पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेला. पिके उशीरा पेरली तर पीकवाढीच्या प्रक्रियेत प्रत्येक वेळी आवश्यक असलेले अनुकूलतम हवामान मिळत नाही व ऑक्टोबरच्या उन्हाने धरली जाणारी फुले-फळे उत्पादनसंख्या, आकारमान,प्रत व मूल्य ह्या सर्वच बाबतींत गौण (निपजतात व) निपजली.

पुढे वाचा

उपयोगितावादावरील एक आक्षेप

उपयोगितावादाच्या टीकाकारांच्या आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की सुख ही एकमेव गोष्ट स्वतोमूल्यवान आहे असे उपयोगितावाद्यांचे प्रतिपादन आहे; पण त्यांच्या अनुभववादाशी सुसंगत राहायचे तर ते स्वतोमूल्याची (intrinsic value) कल्पना वापरू शकत नाहीत. कारण स्वतोमूल्याची कल्पना आनुभविक (empirical) कल्पना नाही.
या आक्षेपाला उत्तर देण्यापूर्वी प्रथम स्वतोमूल्य म्हणजे काय ते पाहिले पाहिजे.
प्रथम मूल्य या कल्पनेविषयी. मूल्य म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला हवीशी, महत्त्वाची वाटते, आणि तिच्या प्राप्तीकरिता आपण कष्ट करायला, विविध प्रकारची किंमत द्यायला तयार असतो. उदा. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादि.

पुढे वाचा

अनीती दुसर्‍यांचे नुकसान करण्यात

लोक अश्लील कशाला म्हणतात ते पाहिले तर असे दिसतें कीं परिचयाच्या गोष्टींना लोक अश्लील मानीत नाहीत. उदाहरणार्थ हिंदुस्थानांत उच्च वर्गातील स्त्रिया स्तन उघडे टाकून रस्त्याने जात नाहीत व बहुतेक ठिकाणीं घरींही उघडे टाकीत नाहीत तथापि हिंदुस्थानांतही कांही ठिकाणी घरीं स्तन उघडे ठेवतात व बाहेर जातांना मात्र वर पातळ आच्छादन असते. जाव्हा बेटांत गेल्यास तेथे ते बाहेर जातांनाही झांकीत नाहीत. अशी उदाहरणे दिसलीं असतां अश्लीलता ही केवळ सांकेतिक कल्पना आहे, यापेक्षा जास्त तथ्य त्यांत नाही, हे समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नीतीची गोष्ट.

पुढे वाचा