भारतामधील पहिले नगर

भारतामधील पहिल्या नगराच्या उगमाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. मानवी संस्कृती ही नागरी समाजजीवनाशी आणि म्हणूनच नगरांशी निगडित असते. भारतामधील नगरांचा उदय हा आधुनिक यंत्रयुगाच्याही आधी किंबहुना सरंजामशाही काळाच्याही पूर्वी झाला होता.
गेल्या शतकापर्यंत पहिल्या भारतीय नगराचा पाया इ.स.पू. १००० वर्ष घातला गेला होता अशी समजूत होती. वायव्येकडून आलेल्या आर्यांच्या टोळ्या पूर्वेकडे, गंगा-यमुनांच्या खोऱ्यात पसरल्या आणि स्थिरावल्या. त्यानंतर पहिले महत्त्वाचे नगर, पाटणा हे उदयाला आले असे मानले जात असे. त्याला आधार होता तो संस्कृत पुस्तके, पोथ्या, गोष्टी आणि दंतकथांचा. पण १९२५ साली पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मोहन्-जो-दारो आणि हडाप्पा या दोन प्राचीन नगरांचे अवशेष सापडले, आणि या आधीच्या सर्व समजुतींना जोरदार धक्का बसला. सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली ही दोन्ही नगरे प्रगत होती. सरळ, रुंद रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, मोठाली धान्यगोदामे, दूर प्रदेशांशी व्यापार, चिनीमातीची भांडी, सोने, चांदी, मौल्यवान खडे या सर्व पुराव्यांच्या आधारे तेथील संपन्नतेची कल्पना येते. तेथे सापडलेले अक्षरधन अजूनही वाचता आलेले नाही. या नगरांत राहणारे लोक कोण होते, कसे होते, त्यांचा समाज कसा होता आणि त्यांची प्रगत नागर संस्कृती लयाला का गेली हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.

Culture and Civilization of Ancient India, A Historical Outline 1977, Vikas Publishing House, New Delhi.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.