नगरे आणि आर्थिक विकास

आर्थिक दृष्टीने बघता छोट्या भौगोलिक परिसरात मोठी लोकसंख्या एकवटण्याची प्रक्रिया ही सर्व समाजाकराता फायदेशीर असते. नागरीकरणाची प्रक्रिया आर्थिक कारणांमुळेच घडत असते हे उघड आहे. या प्रक्रियेमुळे संपत्ती निर्माण झाली नसती तर ही प्रक्रिया कधीच वाढली नसती. जेव्हा लोकांची दाटी वाढते तेव्हा उत्पादनही वाढते. या दाटीवाटीमुळे काही लोकांच्या अंगभूत वैशिष्ट्यांना प्रगट व्हायची संधी मिळते. ज्या माणसांकडे काही विशेष कसब असते त्याचा वापर करून त्यांना त्यात प्रावीण्यही मिळवता येते. माणसांच्या आकांक्षापूर्तीसाठी मोठा परिसर उपलब्ध होतो, आणि अशाच ठिकाणी व्यक्तींच्या क्षमता उजेडात येतात. सत्ताधाऱ्यांना व्यापारी नगरांमधून खूप कर मिळतो याची चांगली जाणीव असते. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की नागरी संपत्तीमुळे खेड्यांनासुद्धा आर्थिक चालना मिळते. नगरांमधले ग्राहक हे खेड्याकडे तयार होणाऱ्या मालाला चांगला नफा मिळवून देतात हे अॅडम स्मिथ यांनी पूर्वीच दाखवून दिले आहे. हल्लीच पार्लमेंटच्या कमिशनने इंग्लडमध्ये पहाणी करून हे दाखवून दिले आहे की लंडन आणि इतर औद्योगिक नगरांच्या आजूबाजूचे ग्रामीण विभाग हे शेतीक्षेत्रातील मंदीलाही चांगल्या प्रकारे तोंड देत आहेत. नगरांतील ग्राहकांमुळे खेड्यांमधील शेती-उत्पादनामध्ये सुधारणा करण्यासाठी नेहमी दबाव असतो. व्यापार आणि औद्योगिक उत्पादनांमुळे नगरांमध्ये शिस्त आणि चांगले व्यवस्थापन असण्याची आवश्यकता असतो. त्याचबरोबर नगरांमुळे खेड्यांमधील व्यक्तींनाही संरक्षण आणि स्वातंत्र्याचा लाभ घेता येतो.

संदर्भ: The Growth of Cities in Nineteenth Century.
A Study in Statistics (1899): प्रस्तावनेमधून Reprinted by Cornell University Press, Ithaca, NewYork. (1963)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.