मासिक संग्रह: नोव्हेंबर, २००७

प्रयत्नवादाचे फसवे तत्त्वज्ञान 

आपल्या काम-क्रोधादि षड्रिपूंवर मात करायची असेल तर त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे अशी शिकवण पारंपरिक साधुसंतांनी दिलेली आहे. आमचा सारा समाज अशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुद्धा अविरतपणे प्रयत्नवादाचा पुरस्कार करीत असतो. आमची प्रचलित शिक्षण पद्धती प्रयत्नवादावरच आधारलेली आहे. आई-वडील, शिक्षक, समाजधुरीण, आध्यात्मिक गुरु सारेच अव्याहतपणे आक्रोश करीत असतात “प्रयत्न करा, प्रयत्न करा.” 

आज मी हिंसाचारी असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अहिंसक बनू शकेन; आज मी मिथ्याचारी असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी सत्यनिष्ठ बनू शकेन आज मी चोरी करीत असलो तरी प्रयत्न करून, उद्या मी अस्तेय व्रतधारी बनू शकेन आज मी संचय करीत असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी अपरिग्रही बनू शकेन; आज मी कामलोलुप असलो तरी, प्रयत्न करून, उद्या मी ब्रह्मचर्यव्रती बनू शकेन अशा भाबड्या श्रद्धेने आत्म-निग्रह करण्याचा प्रयत्न लाखो साधकांनी केलेला आहे आणि आजही लाखो साधक असा प्रयत्न करण्यात व्यस्त आहेत. 

पुढे वाचा

अगा जें घडलेंचि नाहीं ! 

प्रिय वाचक, 

मागील एका संपादकीय संवादात (गड्या, तू बोलत का नाही?) आम्ही वाचकांना बोलण्याचे आवाहन केले होते. थेट त्याला स्मरून बहुधा, आमच्याकडे काही पत्रे आली आहेत. ह्या अंकातील पत्रांत त्यांतली दोन आहेत. कदाचित् त्याच वळणाने असेल आमच्या एका हितचिंतक वाचकाने एका पत्रात आमच्या पुष्कळ चुका दाखवल्या आहेत. त्याने म्हटले आहे की “जून-जुलै पासून आ. सु.त शुद्धलेखनाच्या, शब्दरचनेच्या तसेच वाक्य- रचनेच्या चुका ठळकपणे जाणवत आहेत.” त्यांची काही उदाहरणे दिली आहेत. त्यातले काना-मात्रेचे किरकोळ, ज्यांच्यामुळे अर्थहानी किंवा अर्थविपर्यास न झाला तरी तांत्रिक अर्थानि ते सदोष मुद्रण झाले त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

पुढे वाचा

पत्रचर्चा 

सौ. सुमित्रा र. सराफ, डी/21, सुरस, पी.एम.जी. कॉलनीमागे, नरेंद्रनगर, नागपूर 440015, दूरध्वनी 0712-2747413. 

ऑक्टोबर ’07 च्या मुखपृष्ठावरील प्रेरक उताऱ्यावर – प्रतिक्रिया (1) 

उतरणीवरील आयुष्य 

मायेचा झरा कधी आटला 

हे कळलेच नाही । 

पक्षी उडाले ही जाणीव 

झालीच नाही. 

वाटतं नावांत, नातीत 

आपल्या परिवारात, 

प्रेमाच्या भोवऱ्यात 

गुंफून राहावे । 

वृद्धावस्थेत प्रेमाचे बोल 

त्यांच्यासाठी संजीवनीच असतात । 

नातांनी जवळ यावे, हट्टाने काही 

मागावे, त्यांच्याजवळ बसावे, पण 

छे: कोठले ते? 

त्यांना ताकीद असते ! 

त्यामुळे, आजी आजोबांचे 

नातेच नष्ट झाले असे वाटते । 

म्हणून वृद्धाश्रम बरा किंवा 

पैसा गाठीला असेल तर वेगळे खुराडे बरे । 

पुन्हा वरून सल्ला “आपले आपणच 

करावयास शिका.

पुढे वाचा