मासिक संग्रह: ऑगस्ट, २००९

डार्विन आणि शेती

जागतिक इतिहासात – विशेषतः युरोपच्या संदर्भात – एकोणिसावे शतक हे एका मोठ्या मन्वंतराचे आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत दूरगामी परिणाम घडवून आणणारे राहिले आहे. वैज्ञानिक प्रगती, औद्योगिक क्रांतीचा प्रसार, भांडवलशाहीचा पगडा व लोकशाहीचा उद्गम ही या कालखंडाची वैशिष्ट्ये होत.

एकोणविसाव्या शतकातील विज्ञानाचा जेवढा व्यापक परिणाम समाजजीवनावर झाला, तेवढा याआधीच्या काळात झाला नव्हता. या काळात विज्ञान सर्वव्यापी झाले. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये असा कोणताही प्रश्न नाही की जो विज्ञानाने सोडविता येणार नाही, असा समज पसरला. विज्ञानावरील या आगळ्यावेगळ्या भक्तिभावामुळे त्या काळातील विज्ञानाला एक विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

पुढे वाचा

सारे ठरीव? का सारे घडीव ?

एक शिक्षक होता. त्याचा मुलगा दुसऱ्याच गावातील एका दुसऱ्या शाळेत शिकत होता. त्या मुलाचा दहावीच्या परीक्षेत बोर्डात नंबर आला. शिक्षकाचा ऊर अभिमानाने भरून आला. त्याच्या मनात आले, “शेवटी माझाच मुलगा आहे हा. बुद्धीचा आनुवंशिक वारसा मिळाल्यामुळेच हे यश मिळवणे त्याला शक्य झाले.’ संध्याकाळी त्याचा एक विद्यार्थी पेढे द्यायला आला. त्याचाही बोर्डात नंबर आला होता. शिक्षकाचा ऊर पुन्हा अभिमानाने भरून आला. त्याच्या मनात आले, “शेवटी मीच शिकविले त्याला. ही मुले म्हणजे मातीचे गोळे असतात. आकार द्यावा तशी घडवता येतात.

‘ या शिक्षकाच्या जागी तुम्ही-आम्ही कोणीही असतो, तरी असेच विचार मनात आल्यावाचून राहिले नसते.

पुढे वाचा

जीव आणि जाणीवः उत्क्रांतिवादी दृष्टिकोन

स्वीकारलेल्या मर्यादा वैज्ञानिक दृष्टीने जीव (life) आणि जाणीव (consciousness) या संकल्पनांकडे पाहणाऱ्यांपैकी अनेकांना, विशेषतः जीवशास्त्रज्ञांना पटणारा दृष्टिकोन इथे मांडलेला आहे. काहीजणांना तो मर्यादित, सीमित वाटू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने स्वीकारलेली काही गृहीतके (assumptions) सुरुवातीला स्पष्ट करू.

१) ज्या भावना, विचार, श्रद्धा एखाद्याच व्यक्तीपुरत्या, किंवा मूठभरच व्यक्तींपुरत्या आहेत आणि ज्या ते इतरांना सांगू शकत नाहीत, त्या या चर्चेपुरत्या बाद केल्या आहेत. कधीकधी एखादी सुटी बाब उद्बोधक ठरू शकते, हे इथे नाकारले जात नाही आहे. पूर्णतः व्यक्तिनिष्ठ माहिती इतरांना शंकास्पद वाटू शकते, म्हणून ती वगळण्याचा सावधपणा दाखवला आहे, इतकेच.

पुढे वाचा

नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’

[ सूचनाः १) मनुष्यांबाबत सांस्कृतिक अंग महत्त्वाचे असल्याने ही मांडणी प्राकृतिकतेची पूर्वपीठिका एवढ्या मर्यादित अर्थानेच घ्यावी.

२) या मांडणीतील ज्ञानाचे श्रेय रिचर्ड डॉकिन्स व मॅट रिडली यांचे आहे.] स्वतःच्या प्रती छापल्या जाण्याची परंपरा अव्याहत राखणे हा जनुकांचा स्वभाव आहे. जनुके ज्या जीवाच्या केंद्रस्थानी वास्तव्य करीत असतात त्या जीवाची वर्तने ती प्रवर्तित करत असतात. ही वर्तने अशी असतात की जेणेकरून त्या जीवातली जनुके पुढे चालू राहतील. जीवाची धडपड ही जणू काही जनुकांनी त्याच्यावर सोपवलेल्या कार्यांची पूर्ती करण्यासाठी चालते. जीव ज्या तुंबळ जीवनसंघर्षात सापडलेला असतो (भक्ष्य-भक्षक, यजमान-परोपजीवी, सामाईक भक्ष्यासाठी स्पर्धा, सामाईक भक्षकांपासून वाचण्याची स्पर्धा, नर-नर, मादी-मादी, नर-मादी, पालक पाल्य, भावंडे-भावंडे इत्यादींतील संघर्ष) त्यातील आह्वाने पेलत तो आपले जनुकीय कार्य पार पाडण्यात यशस्वी ठरतो की नाही, यावर त्याच्यातील जनुके पुढे चालू राहतात की नाही हे ठरत असते.

पुढे वाचा

मेंदुविज्ञानाच्या बगीच्यात

विसाव्या शतकात बुद्धीला विशाल करणारे आणि उत्तेजित करणारे दोन प्रदेश अभ्यासासाठी खुले झाले. आपल्या डोक्यावर असलेले. असंख्य आकाशगंगा कवेत घेणारे अवकाश आणि त्याच डोक्याच्या आत बसलेले अनंत मेंदुपेशींनी बनलेले मेंदुविश्व. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्य झाले आहे. माणूस विचार का करतो? तो अनुभवतो म्हणजे काय ? तो नीतिमूल्ये निर्माण करतो, जपतो आणि बदलतोही. कोणते गुणविशेष त्याला माणूसपण आणि माणूसपद देतात ? “आहे प्राणीच, पण माणूस आहे” असे मोठ्या अभिमानाने माणूस स्वतःबद्दल म्हणतो. कथा, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान यांची निर्मिती माणसानेच केली.

पुढे वाचा

वेध डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा

सुमारे पंचवीस वर्षांच्या सृष्टिनिरीक्षण व संशोधनानंतर सजीवांच्या उत्क्रांतीचा जो सिद्धान्त चार्ल्स रॉबर्ट डार्विन (१२ फेब्रुवारी १८०९ ते १९ एप्रिल १८८२) यांनी साकार केला, त्याची मांडणी त्यांनी अशी केली – सजीवांमध्ये प्रजोत्पादनाची प्रचंड क्षमता असते. त्यामुळे सजीवांची बेसुमार निर्मिती होते. सजीवांच्या प्रचंड संख्येच्या मानाने अन्न व निवाऱ्याच्या सुविधा कमी असल्याने त्यांच्यात जगण्यासाठी व तगण्यासाठी धडपड सुरू होते (struggle for existence). या धडपडीतूनच जीवघेणी स्पर्धा (competition) सुरू होते. स्पर्धेत तगून राहण्यासाठी परिस्थित्यनुरूप सजीवांच्या गुणांत बदल घडून येतात. बदललेल्या सुयोग्य गुणांची निसर्ग निवड करतो (natural selection).

पुढे वाचा