मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस हे वाचल्यावर ‘श्वा, युवा, मघवा’ची आठवण होते ना? यातल्या दुसऱ्या त्रिकूटाला व्याकरणाच्या नियमांनी एकत्र आणले, तर पहिल्या त्रिकूटाला खोट्या माहितीने (disinformation) एकत्र आणले.

मेकॉलेने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय शिक्षणधोरणाविषयी केलेल्या एका भाषणाचा व्हायरस कोणीतरी मराठीलिखित माध्यमामध्ये सोडून दिला. ह्या तथाकथित भाषणाचा सारांश असा : ब्रिटिश राज्य येण्यापूर्वीची भारतीय शिक्षणपद्धती उत्तम आहे. त्यामुळे भारतीय माणूस नीतिमान, स्वाभिमानी, लाच-लुचपतीस बळी न पडणारा झाला आहे. कोणीही भीक मागत नाही. त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीला भारतात स्थिरावण्यासाठी भारतातील मूळ शिक्षणव्यवस्था मोडून काढून, कारकून बनवणारी, गुलाम वृत्ती जोपासणारी नवी शिक्षणव्यवस्था बनवावी लागेल.

आपला इतिहास उज्ज्वल होता, पूर्वी आपण सर्वगुणसंपन्न होतो, पण केवळ ब्रिटिशांच्या पद्धतशीर धोरणामुळेच आपली सध्याची अवनती झाली आहे, असे मानायला भारतीयांना आवडते. अशा पूर्वगौरवाला राष्ट्रप्रेमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मेकॉलेविषयीचा हा व्हायरस भारतभर भराभर पसरला आणि राष्ट्रपतींनीपण त्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला! छापून आलेले सर्व सत्यच असते असे बहुतेक भारतीय धरूनच चालतात. त्यामुळे मेकॉलेने खरेच असे भाषण केले होते का याची खातरजमा कोणीच केली नाही. अखेर डॉ. जनार्दन वाटवे आणि डॉ. विजय आजगावकर यांनी शोध घेत यातील खोटेपणा सिद्ध केला. (संदर्भ – लोकसत्ता वृत्तान्त, २७ ऑक्टोबर २००९.)

खरे म्हणजे या प्रसृत कृतक माहितीमध्ये सकृद्दर्शनीदेखील विश्वास ठेवण्याजोगे काहीही नव्हते. ब्रिटिश राजवटीच्या पूर्वी सार्वजनिक आणि बांधीव अशी शासकीय अथवा खाजगी कोणतीच शिक्षणव्यवस्था नव्हती. प्राचीन काळी, ऋषी मुनींच्या वेळी, गुरुकुल पद्धतीने, पण फारच थोड्या जणांना, शिक्षण मिळत होते. पण ती पद्धत ब्रिटिशपूर्व काळातच मोडीत निघाली होती. पुरोहितवर्ग व राजे, सरदार वगैरे खाजगी शिकवणीद्वारे आपल्या मुलांना थोडेफार शिक्षण देत असत. पण सर्वसामान्य माणसाला ते परवडतही नसे व तसा प्रघातही नव्हता. ब्रिटनमधील मुलांना चर्चमध्ये ‘थ्री आर’ म्हणजे वाचणे, लिहिणे आणि अंकगणित यांचे शिक्षण दिले जात असे. मुस्लिम देशात मशिदीमध्ये मुलांना निदान कुराण वाचण्याइतके शिक्षण दिले जात असे. पण भारतात धर्मसंस्थांनी, देवळांनी, सामान्य माणसाला शिक्षण देण्याचे ऐहिक काम कधीच केले नाही. उलट ‘खालच्या, नीच’ जातींना शिक्षणापासून दूर ठेवले. या बाबतीत जिज्ञासा असणाऱ्यांनी श्री. रा. भा. पाटणकर यांचे ‘अपूर्ण क्रांती’ हे पुस्तक जरूर वाचावे.

ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी भारतीय माणूस श्रीमंत, स्वाभिमानी आणि लाचलुचपतीस न बधणारा होता, यावर विश्वास ठेवणे म्हणजेदेखील भोळेपणाची कमाल आहे! त्या वेळचा सर्वसाधारण माणूस बापुडवाणा, लाचार, गांजलेला, गरीब, अडाणी, देशाभिमानाची कल्पनाच माहीत नसलेला आणि पंचक्रोशीच्या बाहेर काही संबंध वा माहिती नसलेला होता. परदेशी वकिलांनी नोंद करून ठेवली आहे की येथे राजालाही लाच देता येते. (परिस्थिती अलीकडे आणखीच बिघडली आहे की काय? म्हणजे राजाला – मंत्र्याला लाच द्यावीच लागते?). माणूस फक्त शेती करून कधी श्रीमंत होत नाही. एकतर व्यापाराने श्रीमंत होतो, त्यामुळे भारतात मारवाडी माणसे इतर भारतीयांपेक्षा खूपच श्रीमंत होती/ आहेत. सोळाव्या शतकाच्या पूर्वीपासूनच सर्वसाधारण भारतीय माणूस सर्वसाधारण ब्रिटिश, फ्रेंच, स्पॅनिश, डच किंवा इटालियन माणसापेक्षा खूपच गरीब होता. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता ह्या फक्त गप्पा आहेत. पण भारतीय माणूस गरीब असला तरी भारताशी व्यापार करून युरोपीय देश श्रीमंत होऊ शकले! जे युरोपातील देश व्यापार करू शकले नाहीत ते गरीबच राहिले, उदाहरणार्थ रशिया.

श्रीमंतीचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे समाजाची दर माणशी उत्पादनक्षमता वाढणे, वाढवणे. यासाठी सर्व समाजात शिक्षणाचा प्रसार, वैज्ञानिक संशोधन व तंत्रविद्येचा वापर आणि ह्यांना चालना देणारी ऐहिक मनोवृत्ती यांची आवश्यकता होती व अजूनही आहे. आजही आपल्याकडे फक्त तंत्रविद्येचा वापर आहे पण वैज्ञानिक संशोधन व त्याला लागणारी ऐहिक व अश्रद्ध विचारसरणी यांचा अभाव आहे. ब्रिटिश किंवा अन्य युरोपीय यांच्या आगमनाच्या वेळी भारतामध्ये या सर्वच गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे त्यावेळची भारतातील संपत्ती केवळ राजे, सरदार व व्यापारी यांच्याकडेच केंद्रित झाली होती. सर्वसाधारण भारतीय माणूस अत्यंत गरीब होता.

त्यावेळचा भारतीय माणूस गरीब असला तरी स्वाभिमानी, प्रामाणिक, लाचलुचपत न करणारा होता काय? शंका आहे. याबद्दल नक्की पुरावे माझ्याजवळ नाहीत. पण स्वाभिमानाला, प्रामाणिकपणाला बळ देण्यासाठी कायद्याचे राज्य लागते. ते त्यावेळी नसल्याने, सर्वसाधारण माणसाला येनकेनप्रकारेण स्वतःचा जीव वाचवून कसे तरी जगण्याचा प्रयत्न करावा लागत असावा. त्यामुळे फसवणूक, लुटालूट, फंड फितुरी यांची चलती होती असे एकंदर इतिहासावरून दिसते.

मेकॉलेबद्दलचे ऐतिहासिक पुरावेपण त्याचा हेतू बरोबर उलट होता असे दाखवणारे आहेत. आज ना उद्या ब्रिटिशांना भारत सोडून जावे लागणार आहे, त्यापूर्वी भारतीयांना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वतः राज्यकारभार चालविण्यासाठी लायक बनवणे हा त्याचा उद्देश होता. पहिला मॅट्रिक्युलेशनचा किंवा पदवीचा अभ्यासक्रम पाहता तो कारकून बनवण्यासाठीचा नक्कीच दिसत नाही. एक जबाबदार, सुशिक्षित नागरिक निर्माण करणे असाच त्यामागील हेतू दिसतो. या शिक्षणानेच जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई नवरोजी, गोखले, रानडे अशा स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या व्यक्तिंची निर्मिती केली. शिक्षणाची अवनती स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच, शिक्षणखाते भारतीय मंत्र्यांच्या ताब्यात गेल्यापासून सुरू झाली.

एकूण, मेकॉलेच्या या न केलेल्या भाषणाच्या थापेने शिक्षित महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा भाबडेपणा व भोळेपणा उघड केला. पण मुळात ज्या कोणी ही वावडी उठवली, त्याचा उद्देश काय होता याचा प्रत्येकाने आपापल्यापरीने तर्क लढवावा. ही अज्ञानातून झालेली चूक नव्हती, जाणूनबुजून बदनामी करण्यासाठी हा प्रचार केला गेला होता यात शंकाच नसावी. त्याच उद्देशाने नवनवीन वावड्या उठवणे अजून चालू आहेच, हेही लक्षात ठेवावे.

असाच अपप्रचार जी. एम. फूड्स — जनुक बदल पिकांबद्दल करण्यात आला व येत आहे. ही पिके खाल्यामुळे कॅन्सर होतो, नपुंसकत्व, वंध्यत्व येते, मुलांमध्ये स्वमग्नतेचा विकार जडतो, या पिकांमधील जनुके वनस्पतीजगतात पसरून राक्षसी वनस्पती तयार होतील, जमिनीतील उपकारक जीव जंतू आणि पाण्यातील मासे यांच्यावर अनिष्ट परिणाम होतील, जैवविविधता नष्ट होईल, असे काहीच्या काही भीतिवर्धक आरोप या पिकांवर करण्यात आले. प्रत्यक्षात, गेली वीस वर्षे जगातील बहुसंख्य देशात, बहुसंख्य जनतेने ही पिके खाऊन किंवा वापरून काही वाईट परिणाम झालेले दिसत नाहीत. कीटकनाशकांचा वापर कमी होणे, फळे, पालेभाज्या यांचे उत्पादन वाढणे, पौष्टिकता वाढणे असे चांगले परिणाम मात्र निश्चितच दिसले आहेत. काही तथाकथित शास्त्रज्ञ, काही सामाजिक कार्यकर्ते, काही पर्यावरणवादी संस्था, यांनी ‘जनुक बदल पिकां’विरुद्ध आघाडी उघडली आहे, आणि काहीही पुरावा हाती नसताना शासनाचे धोरण ‘जनुक बदल पिकां’वर बंदी घालण्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. लोकशाहीमध्ये मूठभर चळवळे लोक, सर्व देशाचे किती नुकसान करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. पण यामध्ये समाजातील अनेक मान्यवर डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, लेखक अशी मंडळी उतरलेली दिसतात, ज्यांच्या हेतूबद्दल शंका घेणे अवघड जाते. मानवी मेंदूचा असा एक गुण आहे की त्याने एकदा एक मत स्वीकारले, ग्रह निर्माण करून घेतला, की नंतर समोर येणारी निरीक्षणे, पुरावे, मेंदू निःपक्षपातीपणे तपासू, स्वीकारू शकत नाही. अगदी शास्त्रज्ञदेखील याला अपवाद असत नाहीत. आईनस्टाईनसुद्धा अनिश्चितता थिअरी शेवटपर्यंत स्वीकारू शकला नाही. नवीन निरीक्षणे, नवीन पुरावे तपासून, त्यानुसार आपले मत बदलता येणे हा तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे. पण मानवी मेंदू उत्क्रांत झाला त्यावेळी जगण्या-तगण्याच्या लढाईत, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा काही फायदा होत नव्हता – नसावा! त्यामुळे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जेनेटिक वारसा आपल्याला मिळत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन हा जाणीवपूर्वक आणि सततच्या प्रयत्नांनी अंगी बाणवावा लागतो, आणि राखावा लागतो. हिंदुत्ववादी, समाजवादी, पुरोगामी, पर्यावरणवादी, असे कायमचे चष्मे चढविलेल्या लोकांना ते फारच अवघड जात असणार! ग्रीन पीस नामक जागतिक पर्यावरणवादी संस्थेच्या एका माजी अध्यक्षांनी एकदा ‘माझा पूर्वीचा, अणुऊर्जा केंद्रे व ‘जनुक बदल पिके’ पर्यावरणास हानिकारक आहेत हा दृष्टिकोन चुकीचा होता आणि आता नवीन पुरावे पाहून माझे मत त्याउलट बनले आहे.’ असे जाहीर केले. अशी कबुली देणारी माणसे दुर्मीळ असतात. पण असे जाहीर केल्यानंतर त्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. एकट्या दुकट्या व्यक्तीला जर आपले मत बदलणे इतके अवघड जात असेल तर अख्ख्या संघटनेने आपले मत बदलून घूमजाव करणे तर अशक्यप्राय असणारच!

‘कॅन्सर एक्स्प्रेस’ ने तर समाजातील, डॉक्टर्स, संशोधक व इतर उच्च शिक्षितांचापण भोळेपणा उघड केला आहे. एका पर्यावरण विषयक मासिकामध्ये प्रथम ही बातमी आली की “पंजाबातील शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर केला जातो की त्यामुळे तेथील ग्रामीण जनतेमध्ये कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढले आहे. इतके की भटिंडा येथील कॅन्सर रुग्णालयाकडे जाणाऱ्या भटींडा एक्स्प्रेस मध्ये बहुसंख्येने कॅन्सरचे रुग्ण असतात, आणि त्यामुळे ह्या एक्सप्रेसचे नाव ‘कॅन्सर एक्स्प्रेस’ असे ठेवण्यात आले आहे. आमीर खानच्या ‘सत्यमेव जयतें’ ह्या दूरदर्शनवरील कार्यक्रमाने ह्या कॅन्सर एक्स्प्रेसला भारतभर प्रसिद्धी मिळवून दिली.

मी सर्जन असून, आजपर्यंतच्या शिक्षणात आणि वैद्यकीय वाचनात कीटकनाशके, तणनाशके, पेस्टिसाइड्स, फंगीसाइड्स, वनस्पती हार्मोन्स अशा विविध शेतीरसायनांपैकी एकानेही कॅन्सर होतो, असे उल्लेख आढळले नाहीत. त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाठ्यपुस्तकातून व इंटरनेट वरून माहिती काढली असता कोठेही तसा उल्लेख असल्याचे आढळले नाही. ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर कॅन्सर रिसर्च’ ह्या संस्थेने, ज्यामुळे कॅन्सर होतो असे नक्की सिद्ध झाले आहे, अश्या, आणि ज्यामुळे कॅन्सर उद्भवणे संभाव्य आहे अश्या गोष्टींच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्या दोन्हीमध्ये एकाही शेती रसायनाचा उल्लेख नाही. कॅन्सर सोडूनच द्या पण इतर साधे आरोग्यविघातक परिणामदेखील ह्या रसायनांच्या योग्य वापरानंतर आढळून आलेले नाहीत. वैद्यकीय पाठ्यपुस्तकात विषबाधाशास्त्र (टॉक्सिकॉलॉजी) नावाचा विभाग असतो. त्यामध्ये कीटनाशकांची अख्खी बाटली प्यायल्यावर काय परिणाम होतील व काय उपचार करावे हे दिलेले असते. टिकट्वेन्टी व एंडोसल्फान ही आत्महत्येची लोकप्रिय(?) साधने आहेतच. पण सातत्याने, अनेक वर्षे, ही रसायने सूक्ष्म प्रमाणात पोटात गेल्यास काय परिणाम होतात (क्रॉनिक लो डोस टॉक्सिसिटी) याबद्दल काहीच उल्लेख आढळत नाही. कारण तसे परिणाम होतच नाहीत. जगात जवळपास १०० वर्षे या रसायनांचा वापर सर्वत्र चालू आहे. जगातील ९०% लोकसंख्या तरी निदान सूक्ष्म प्रमाणात कीटकनाशके वगैरे असलेले अन्न खात आहे, पाणी पीत आहे, तरी कोणावर त्याचे कोणतेही वाईट परिणाम झालेले आढळून आलेले नाहीत. ह्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कीटकांच्या चयापचय क्रियेतील (metabolism) ज्या क्रिया/ द्रव्ये माणसाच्या – सस्तन प्राण्यांच्या शरीरातील चयापचय क्रियेपेक्षा भिन्न असतात,त्यांच्यावर नेमका हल्ला करणारी कीटकनाशके किंवा ‘जनुक बदल प्रथिने’ शोधून, निवडून, तपासून मग वापरली जातात. डीडीटीसारख्या टिकाऊ (organochloride) ऑरगॅनोक्लोराइड कीटकनाशकांवर आता बंदी आहे, कारण ही रसायने अन्नसाखळीमध्ये अधिक अधिक प्रमाणात साठत जातात. गरुडासारख्या (apex predator) मांसाहारी पक्ष्याच्या आहारात ते प्रमाण खूपच वाढल्याने त्याच्या अंड्यांचे कवच नाजूक बनून, ती लवकर फुटतात. त्यामुळे तो पक्षी नष्ट होऊ लागला. पण डीडीटी, गॅमॅक्झिन ही कीटकनाशके अनेक दशके वापरूनसुद्धा त्यांचा माणसांवर, जनावरांवर, किंवा माशांवर काही वाईट परिणाम सापडला नव्हता. मानवी दुधामध्येसुद्धा ही रसायने सापडत होती, पण एकाही बालकावर त्याचा वाईट परिणाम दिसला नाही. सध्या वापरात असलेली कीटकनाशके निसर्गात लवकर नष्ट होत असल्याने ती अधिकच सुरक्षित आहेत. आपल्या अन्नसुरक्षेसाठी व आरोग्यरक्षणासाठी कीटकनाशकांचा वापर – योग्य वापर – आवश्यक आहे. त्यांच्यापासून होणाऱ्या संभाव्य हानीबद्दल संशोधन जरूर चालू ठेवावे. पण त्यांच्याबद्दल भयगंड निर्माण करणे ही समाजविघातक गोष्ट आहे. डीडीटी मुळे मलेरिया रोगाचा प्रतिबंध होऊन कोट्यवधी प्राण वाचले याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे.

शिरोळ तालुक्यात, (जि. कोल्हापूर) सुमारे एक वर्षापूर्वी कीटनाशकांचा शेतीतील वापर वाढल्यामुळे कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढले आहे अशी हूल कोणीतरी, बहुधा एका पत्रकाराने, काहीही पुरावा किंवा आकडेवारी जमा न करता, उठवली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तेथे कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचे सापडले नाही, पण दरम्यानच्या कालावधीत तेथील भाजीपाल्याचे दर उतरून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. एखाद्या गोष्टीबद्दल समाजात भय निर्माण करणे सोपी गोष्ट असते. त्यामुळे मोबाईल फोनपासून आणि टॉवर्सपासून निघणाऱ्या रेडिओ लहरी, पवनचक्क्या, अणुशक्ती केंद्रे, हरित क्रांती, भांडवलशाही, जागतिकीकरण, डंकेल प्रस्ताव, ऍलोपॅथीची औषधे, गॅट करार, फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शिअम कार्बाईड, किंवा एथिलिन वायू, यांच्याबद्दल भीती पसरवून काही लोकांना आनंद मिळतो. कोणत्याही गोष्टीला शत्रू ठरवून त्याविरुद्ध आंदोलन करण्याला लगेच जनपाठिंबा मिळतो, प्रसिद्धी मिळते. तशी चळवळ चांगल्या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी करता येईल का? कीटकनाशके आवश्यक आहेत, उपकारक आहेत अशी चळवळ करता येईल काय? मोर्चा आणता येईल काय? अणुऊर्जा केंद्राच्या बाजूने घेराव घालता येईल का? उद्योगाला जागा देऊ नका अशी चळवळ सहज करता येईल, पण अमुक एक उद्योग देशाला, जनतेला अत्यावश्यक आहे, म्हणून त्याला जमीन द्यावी अशी चळवळ करता येईल का?

आपल्या प्रसिद्धी माध्यमांतून असा अपप्रचार, खोटी माहिती देणे मोठ्या प्रमाणावर चालू असते. इंटरनेटमुळे तर ही गोष्ट फार सोपी आणि स्वस्त झाली आहे. आपल्या समाजात व्यक्तिपूजा मोठ्या प्रमाणावर होते. एखाद्या व्यक्तीने न्यायमूर्ती म्हणून किंवा समाजसेवक म्हणून किंवा आरोग्यक्षेत्रात नाव मिळवले की त्याची कोणत्याही क्षेत्रातली मते न तपासता ग्राह्य धरण्यात येतात. खरे तर त्याची त्याच्या कौशल्यक्षेत्रातली मतेपण तपासून घ्यायला हवी. चिकित्सक बुद्धीने लोकांची विधाने, मते व त्यांनी दिले असले तर पुरावे तपासून घ्यायला हवेत. इंटरनेटच्या सहाय्याने ही गोष्ट आता सोपी आणि सर्वसामान्य माणसाला सहज शक्य अशी झाली आहे. अणुवीजप्रकल्पातून किती किरणोत्सर्ग होतो, त्याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो, जनुक बदल पिकांच्या विषारी परिणामांबद्दल काय संशोधन झाले आहे, कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो का, ही माहिती आज इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. चिकीत्सक वृत्ती बाळगणे आता फक्त विद्वानांची मिरासदारी राहिलेली नाही.

संपर्क : subhashathale@gmail,com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.