बर्बादीचा माहामार्ग

{प्रस्तुत फोटो हे आभासी तथा इंन्स्टाग्राम/गुगलवरून घेतलेले नसून आमच्या शेत-शिवारातले जिवंत फोटो आहेत.}

स्वातंत्र्याच्या पाऊणशे वर्षांनंतरही…
वावरात हातभर लांबीच्या बंडीभर काकड्या,
नारळाएवढाले सीताफळं निरानाम सडू घातलेले.
पान्यामुळं बाबडलेला मुंग, वांझोटा भुईमुंग,
काळंवडलेल्या तीळाची मती गुंग
घरी आनाचं कसं एकाएकी गर्भपात झालेलं सुयाबीन ?

सडत पडलेल्या काकड्या
रानडुकरांनी खाऊन बरबाद केलेला भुईमुंग

वावराजौळचे असे  दूरदूर चिखलप्रेस समृद्ध हायवे
ऐन हंगामावर अभाळाले हैजा झालेला
रस्त्यानं आपलाच जीव आपल्याले भारी
कुठून इथं जल्म घेतला इच्यामारी !

शेतातले चिखलसमृद्ध हाय-वे

खालून चिक्कट चिखलगाळ
अन् वरतून ओरबाडणाऱ्या चिल्हाट्या-बोराट्या!
चालता चालताच जातेत सरनावर तुऱ्हाट्या.

पायतळी चिखल आणि डोक्याला ओरबाडणाऱ्या चिल्हाट्या-बोराट्या

बैलबंड्या फसतेत,
वाटसरू घसरून मोडतेत
कोनाचा हेंगडते पाय
कुठं नुसतीच रुतून बसते पान्हावली गाय
अवंदा दुरूस्तीसाठी कास्तकारांजवळ  नाई दमडं
ज्याच्याजौळ लुगडं, थेच पडलं उघडं !!

चिखलगाळ पांदणरस्ते

अशातच आलं ई पीक पाहनीचं फर्मान
पटवारी परेशान अन् चळलेला किसान
म्हने, आता याच्यापुढं डिजिटल ई सातबारा
फुसक्या स्लो सर्व्हरच्या ढुंगनातून वारा !

तुमाले लखलाभ स्मार्ट सिटीतले आरसेमहाल
इथं कुत्रेबी खाईनात आमचे हाल !

…एखांद्यातरी डिजिटल इंडियातल्या
बगळासफेद लोकउपाद्यानं
(लोकप्रतिनिधी नाहीच राह्यला ना भौ, कोनी)
आमच्या वावरात येऊन दाखवाव्  नंगेपाव !!!
योग्य थे बक्षीस देऊ !!
मनान् तं सत्कारबी करू !!

संपर्क: 09049641474
मु.पो.कचारी सावंगा, ता.काटोल, जि.नागपूर..441103

अभिप्राय 3

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *