विदर्भातल्या अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत फासेपारधी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. फासेपारधी समुदायाच्या मुलांच्या शिक्षणावर काम करताना काही गोष्टी प्रकर्षाने मला दिसल्या. पहिली गोष्ट म्हणजे फासेपारधी समाजाचा परंपरागत शिकार व्यवसाय आणि त्यांचं स्थलांतर! १९७२च्या वन्यजीवसंरक्षण कायद्यानुसार शिकार करणं हे जरी कायदेसंमत नसलं तरी आत्ताही काही भागांत फासेपारधी समुदायाकडून लपून शिकार केली जाते. आणि हा व्यवसाय करण्यासाठी फासेपारधी समाजातील कुटुंबं स्थलांतर करतात. एका गावातून दुसऱ्या गावाच्या जंगलांमध्ये आसऱ्याने मुक्काम करून राहणे असं चालतं.
मागच्या वीस-पंचवीस वर्षांत फासेपारधी समाजातील माणसं काही प्रमाणात तांडा वस्ती करून एका ठिकाणी राहू लागली आहेत. यामध्ये रेडवा, वडाळा, टिटवा, तांदळी, मजलापूर यांसारख्या गावात हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या लोकांपर्यंतही शिक्षण पोहोचलेलं नाही. अशा तांड्यांवर राहणारे लोक मुख्यत: शिकारीचा आणि ओरिसा राज्यात जाऊन कटलरीच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे फासेपारधी समाजातल्या काही गावात मुलांची नावे शाळेत दाखल असली तरी ते मुलांना वर्षभर शाळेत ठेवू शकत नाहीत.
सीझननुसार कमाई करायला जाणे आणि आपला निर्वाह करणे असे असते. यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क नसणे, समाजातल्या काही धार्मिक धारणांमुळे समूहाच्या चौकटीतच राहणे, अश्या काही कारणांमुळे समाजातल्या मुलांचं शिक्षण होत नाही. ओरिसा राज्यात कटलरीचा व्यवसाय करायला गेले तर समाजातल्या लोकांवर गुन्हेगार समजून पोलीस अत्याचार करतात. २०१०मध्ये पोलिसांनी अश्याच धाडी टाकल्या आणि हैद्राबादला नेऊन समूहातील ६ माणसांना तुरुंगात टाकलं. कुठलाही गुन्हा न करता ते चार वर्षे कारावास भोगून आले. या समाजातील अशी किती निरपराध माणसं शिक्षा भोगत असतील याची कल्पनाही करवत नाही. शिक्षणाचा अभाव आणि त्यांची बाजू मांडणारे कोणीही नसल्यामुळे त्या समाजावर वारंवार अत्याचार होत राहिले आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे तांडा-बेड्यापासून दूर अंतरावर असणार्या शाळा, मातृभाषेपेक्षा वेगळ्याच भाषेतून मिळणारं शिक्षण अश्या अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणांमुळे समाजातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचत नाही. या सगळ्या प्रश्नांमुळे मला या समाजातल्या मुलांसोबत शिक्षणावर विशेष काम करण्याची गरज लक्षात आली. आणि मी ‘झेप’ नावाची सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून या आदिवासीबहुल तांडा-बेड्यावरील फासेपारधी समाजातल्या मुलांमुलींबरोबर शिक्षणासाठी काम करण्याचं ठरवलं.
शिक्षणावरचं हे काम २०१९पासून तांडाशाळेच्या माध्यमातून सुरू झालं. सुरुवातीला वडाळा आणि मग टिटवा (बेडा) वर तांडाशाळेचं काम सुरू झालं. तांडाशाळेचं हे काम करत असतांना आम्हाला मुलांकडून येणार्या प्रश्नांवर काम करणंही आवश्यक वाटलं. जसं की सतत गैरहजर राहणार्या मुलांची व शाळाबाह्य मुलांची नोंद करणे, मराठी न येणाऱ्या मुलामुलींना वागरी, पारधी भाषांतून शिक्षण देणे इत्यादी. मुख्य शाळेत जाण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून तांडाशाळेच्या माध्यमातून शिवारफेरीचं आयोजन केलं, खाद्यसंस्कृतीवर थाळी प्रकल्प राबवले, आपल्याच बेड्याचा इतिहास शोधणे, गवतांची, पक्ष्यांची-प्राण्यांची नोंद करणे, मुलांकडून हर्बेरियम बनवून घेणे, भोकर, चार, नीम, आंबा, आपटा, चिंच अश्या झाडांच्या बियांचं संकलन मुलांना करायला लावणे, पळसाच्या फुलापासून रंग तयार करायला लावणे असे अनेक प्रकल्प, उपक्रम राबवले गेले. परिणामी तांडाशाळांमध्ये मुलांचा सहभाग वाढला.
तांडाशाळेत येणार्या ३८ मुलांमुलींपैकी १२ मुलं आम्ही जिल्हा परिषदेच्या बाहेरगावच्या शाळेत पाठवण्यात यशस्वी झालो आहोत. मागच्या वर्षी झेप संस्थेने टिटवा (बेडा) वर स्वतःची जागा घेऊन बांबूच्या कमठ्यांची शाळा उभारली आहे. आणि या शाळेला ‘अक्षरभूमी ग्रीन स्कूल’ नाव दिलंय. बांबूपासून बांधलेल्या या शाळेमध्ये सध्या टिटवा आणि वडाळा असे दोन तांडे मिळून आता ६३ मुलं-मुली शिक्षण घ्यायला येतात. तांडाशाळेचा तीन वर्षांचा प्रवास आता ‘अक्षरभूमी शाळे’च्या नावाने सुरू झाला आहे. या कामात माझा मित्र मंगेश आणि माझी पत्नी सकिना शिकवण्यासाठी मदत करतात. अक्षरभूमीमध्ये शिकायला येणारी मुलं त्यांच्या आईबाबांसोबत शिकार करायला जाणारी आहेत. ही मुलं स्वतःही गटागटाने शिकारीला जातात.
ही मुलं साधारण दहा ते तेरा वर्षे वयोगटातील आहेत. दिवसा तीतर, ससे पकडून संध्याकाळी ही मुलं अक्षरभूमीमध्ये शिकायला येतात. प्रत्येकवेळी येणारं नवीन मूल त्याला शिकार करताना आलेले अनुभव आमच्यासोबत शेअर करते. आम्ही त्यांना जवळ घेऊन, पाठीवर हात फिरवून त्यांचा शिकार करताना आलेला अनुभव समजून घेत असतो. अक्षरभूमीमध्ये शिकवणार्या दादा-ताईंसोबत मुलं आता विश्वासाने वावरतात. मुलांना विश्वासात कसं घ्यावं, त्यांचं जीवन कसं समजून घ्यावं, मुलांना शिक्षण देण्याच्या कोणत्या पद्धती असू शकतात, हे समजून घेण्यासाठी आम्ही जळगाव जिल्ह्यातील आनंदघर आणि नागपूरच्या लर्निंग कम्पॅनिअनसोबत संपर्कात आहोत.
मुलं शाळेत शिकायला आली की प्राण्यांचे-पक्ष्यांचे आवाज काढून दाखवतात, पक्ष्यांची घरटी ओळखणे, खेकडे, मासे पकडण्याचं परंपरागत व्यवहारातलं ज्ञान, निसर्गासोबतचं त्यांचं शिक्षण समजून घेत अक्षरभूमीचं काम पुढे जात आहे.
मुलांना त्यांच्या पारंपरिक शिकारी व्यवसायाच्या व्यवस्थेतून मुक्त करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत.
आमचा मुख्य उद्देश हाच आहे की फासेपारधी समाजातील मुलं शिक्षणाच्या मुख्यधारेसोबत जोडली जावी. तसंच समजलेल्या इतिहासाचा आमच्या समाजाला चागंला उपयोग व्हावा.
पुढे या मुलांसाठी निवासी वसतीगृह उभारण्याचे स्वप्न आहे, जेणेकरून या समाजाच्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांसोबत गावोगावी भटकावे लागणार नाही!!
गोविंदाची गोष्ट…
काल संध्याकाळी लॅपटॉप घेऊन गावच्या पारावर जाऊन बसलो. थोड्या वेळात यज्ञेश आणि यंकेश, संध्या, इंदल अशी सगळी मुलं येऊन माझ्याजवळ बसली. नतंर राजेंद्र सायकल घेऊन आला. म्हणाला, “दादा, दहावीमध्ये गेलोय. आता तुमच्याकडे काही जुनी पुस्तकं असतील तर सागंजा मला.” मी “होय राजेन्द्र, नक्की सांगणार.” म्हटलं.
मग गोविंदा आला. गोविंदा फार हुशार मुलगा आहे. त्याला गणित खूप चांगलं येतं, माझ्या लॅपटॉपमधली गणिताची उत्तरं तो नेहमी सगळ्यात जास्त देतो. तसा आजही तो पटापट उत्तरं देत होता. परंतु मध्येच गोविंदा त्याच्या बाबासोबत शिकार करायला गेल्यावर, शिकार करताना त्याला आलेले अनुभव मला सागांयला लागला. आणि असं प्रत्येकवेळी होतं. जेव्हा जेव्हा गोविंदा माझ्याकडे शिकायला येऊन बसतो, तेव्हा तो त्याचे अनुभव मला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याला माझ्याशी खूप बोलायचं असतं. तशी त्याने सुरुवात केली. यज्ञेश, यंकेश आणि संध्या व इंदल आम्ही सगळे गालावर, पायाच्या गुडघ्यावर हात ठेवून ऐकायला लागलो.
गोविंदा म्हणाला, “दादा, परवा माझे बाबा आणि मी, आम्हीं दोघंच बापलेक पार्डीच्या जगंलात मुक्कामी सशाच्या शिकारीसाठी गेलो होतो. माझ्या बाबाच्या पायानं जास्त भारी सामान घेऊन चालणं होत नाही. तेव्हा मी बाबाचं वाघराचं भोतक खांद्यावर घेतलं. त्यामध्ये पाच वाघरा, जेवणाची शिदोरी, बांबूच्या बारीक कांड्या, एक चादर, फारी, एवढं सगळं सामान होतं.
आम्ही जंगलात पोहचलो. सुताडा जंगल तुम्हाला तं माहीत असेल. तिथे त्या जंगलात आम्ही सशासाठी वाघरा मांडल्या. आधीरात्रपर्यंत बाबासोबत मलाही जागावं लागलं. ससे काही आलेच नाहीत. शेवटी तीनेक वाजता रात्री एक सशाचं डांगरू येऊन वाघरामध्ये पडलं आणि ते पकडून आम्ही घरी आलो. सकाळी घरी येताना पार्डी गावच्या शसी पाटलाच्या वावरातल्या विहिरीजवळच्या झाडाला घणी रामफळं लागली होती. ती फळं पाटील यायच्या अगोदर तोडली आणि घराकडे गरगर निघालो.
गोविंदाची ही शिकार करून आणलेली गोष्ट आम्ही सगळ्यांनी मन लावून ऐकली आणि सगळ्या मुलांनी हुश्श असं केलं. यावर्षी गोविंदा सहाव्या वर्गात गेलाय.
मी म्हटलं, “यार गोविंदा, माझं खूप मन दुखेल तू जर या शिकारीपायी शाळा सोडली तर… ही गोष्ट तुझ्या बाबाला आणि आईलाही सांग की दादाचं खूप मन दुखेल म्हणून.” गोविंदा म्हणाला, “मन तं दुखतेच दादा. आईचंही दुखते. आई म्हणते शाळा नाही सोडू देणार. पण मला बाबाची खूप कदर येतै ना, त्याचं काय?”