प्रभावी शिक्षणाची ‘घरोघरी शाळा’

संकटे माणसाला संधी देतात. नवनव्या गोष्टी करण्यास उद्युक्त करतात. वेगळी वाट चोखाळण्याची प्रेरणा देतात. कोरोनाकाळाने जणू याचीच प्रचिती दिली. या आव्हानात्मक परिस्थितीत माणसांपुढे कितीतरी संकटे निर्माण झाली. मात्र त्यातूनच संधीचे आशादायक कवडसेही प्रत्ययास आले.

मुळातच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर कोरोनाने घाला घातला. शिक्षण हे महत्त्वाचे क्षेत्रदेखील त्याला अपवाद उरले नाही. कोरोना काळात शाळा बंद झाल्या. विद्यार्थी दिवसेंदिवस घरातच कोंडले गेले. त्यांच्या शिक्षणासमोर प्रश्नचिन्हे लागली. अर्थात यातूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने नवनव्या संकल्पना, नवनवे प्रयोग या काळात आकारास आले. ऑनलाइन शिक्षणासारखे शब्द शैक्षणिक प्रवाहात रूढ झाले. ऑनलाइन शिक्षणाला जिथे मर्यादा आल्या तिथे काही नवे पर्याय उभे राहिले. सातारा जिल्ह्यातील संजय खरात या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रभावी शिक्षण देण्यासाठी राबविलेली ‘घरोघरी शाळा’ ही संकल्पना अशांपैकीच एक.

माण तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे हे शिक्षक. त्यांनी अगदी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यास शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबविला. त्यातून प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे ऑफलाइन शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. पहिलीतील विद्यार्थ्यांचे शिक्षण हसत- खेळत, मनोरंजक पद्धतीने सुरू राहण्यासाठी प्रत्येक घटकावर आधारित वैविध्यपूर्ण शैक्षणिक साधने त्यांनी स्वतः तयार केली. प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच दिला. स्वतःचा वेगळा साहित्य संच ठेवला. प्रत्यक्ष गृहभेटी देऊन स्वतःकडील शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून योग्य सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना अध्यापन केले. अध्यापनाबरोबरच पालकांना विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव कसा घ्यायचा याविषयी सातत्याने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन केल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक अन् पालक यांची आंतरक्रिया झाली. या शैक्षणिक त्रिकोणातून विद्यार्थ्याची प्रगती गतीने होण्यास मदत झाली.

विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेले साहित्य त्यांना एकदम न देता प्रत्येक घटकानुसार टप्प्याटप्प्याने दिले. एका घटकाची अपेक्षित क्षमता त्याने अवगत केल्यानंतर पुढील घटकाचे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी आवडीने अन् गतीने अभ्यास करू लागले.

एक- दोन महिन्यात संपेल असा वाटणारा कोरोनाकाळ पुढे वाढतच गेला. तशी ‘घरोघरी शाळा’ ही संकल्पना आणखी विस्तारत गेली. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य देऊन गृहभेटीद्वारे शिक्षण देण्याची संकल्पना वाढत राहिली. त्यातून त्याचे घर अन् परिसरालाच शाळेचे स्वरूप प्राप्त झाले. घरातील भिंती, बाहेरील भिंती, अंगणातील फरशी, कोंबडीचे खुराडे, पाण्याच्या टाक्या तसेच नित्याच्या खेळण्याची जागा आदी ठिकाणांचा कल्पकतेने वापर करून वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक तक्ते निर्माण करण्यात आले. वितरीत केलेले शैक्षणिक साहित्य त्याला कोठेही घेऊन जाता येत असे. अगदी सहजतेने, सुलभतेने हाताळता येत असे. त्यामुळे एकही दिवस शाळेत न आलेले इयत्ता पहिलीतील विद्यार्थी वृत्तपत्रेही न अडखळता वाचू लागले.

यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, विविध वृत्तपत्रांतील बातम्या तसेच विविध न्यूज चॅनेलमुळे ‘घरोघरी शाळा’च्या यशोगाथा राज्यात व सर्वदूर पोचल्या. त्या पाहून राज्याच्या विविध जिल्ह्यातील शिक्षकांनी या उपक्रमाची माहिती घेतली. आपापल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरु केला. राज्यातील 20 जिल्ह्यातील 250 हून अधिक शिक्षकांना मार्गदर्शन करुन राज्यभर हा उपक्रम पोहचविल्याचे श्री. खरात यांनी नमूद केले. ‘घरोघरी शाळे’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचन-लेखन कौशल्याबरोबरच मूल्यशिक्षणाचेही धडे मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सातारा
मोबाईल। 9822454630
sunilshedage123@gmail.com

( लेखक हे शिक्षक, पत्रकार असून ‘उपक्रमशील शिक्षक’, ‘तंत्रस्नेही शिक्षक’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सातारा जिल्ह्यातील वैविध्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग, उपक्रमांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.)

अभिप्राय 4

  • अप्रतिम शब्दांकन

  • अचूक व नेमक्या शब्दात उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचे केलेले विवेचन हे सर्व शिक्षकांना मार्गदर्शक आहे. शेडगे सरांनी विभिन्न विषयांवर केलेले अभ्यासपूर्ण लेखन हे वाचनीयआहे. खरात सरांच्या कार्याला आणि शेडगे सरांच्या लेखणीला सलाम.💐

  • कोरोना काळातील मुलांच्या शिक्षण प्रक्रियेतील स्थित्यंतरे व मुलांच्या प्रभावी शिक्षणासाठी राबविण्यात आलेला श्री संजय खरात या उपक्रमशील शिक्षकांचा ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीवर अतिशय विस्तृत लेखन 👌👌💐💐

  • कोरोना काळात शिक्षकांनी राबवलेल्या प्रभावी उपक्रमांचा अभ्यासपूर्ण, दर्जेदार व नेमक्या शब्दात लेखन सुनील शेडगे सरांनी केले आहे.शिक्षक व पालकांही मार्गदर्शक लेख आहे. धन्यवाद सर.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.